पट्टदकल १: काडसिद्धेश्वर, जांबुलिंग, चंद्रशेखर, गळगनाथ आणि संगमेश्वर मंदिरे

प्रचेतस's picture
प्रचेतस in भटकंती
5 May 2025 - 6:19 pm

बदामी १: चालुक्यांचा संक्षिप्त इतिहास आणि बदामी लेणी

बदामी २: बदामी किल्ला, मंडप, धान्यकोठारे आणि शिवालये

बदामी ३: भूतनाथ, मल्लिकार्जुन मंदिरे, विष्णूगुडी आणि सिदलाफडीची प्रागैतिहासिक गुहाचित्रे

ऐहोळे १ - जैन लेणे आणि हुच्चयप्पा मठ

ऐहोळे २: त्र्यंबकेश्वर मंदिर, जैन मंदिर आणि मल्लिकार्जुन मंदिर समूह

ऐहोळे ३ - दुर्ग मंदिर संकुल

ऐहोळे ४: रावणफडी आणि हुच्चीमल्ली मंदिर

ऐहोळे ५: मेगुती टेकडीवरील बौद्ध, जैन मंदिरे आणि अश्मयुगीन दफनस्थळे

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मलप्रभायाः सलिलैः सुशीतैः,
सिंचन्महीमञ्जुलकाननानि।
चालुक्यराजाः श्रियमावहन्ति,
भूभृत्सु कीर्तिं दिशतः सदा ते॥

मलप्रभा नदीच्या शीतल जलाने सिंचित झालेल्या सुंदर वनांनी भरलेल्या प्रदेशात चालुक्य राजांनी राज्य स्थापन केले. त्यांनी पृथ्वीवरील राजांमध्ये आपल्या कीर्तीचा प्रसार केला.

पट्टदकल - पट्टद (राज्याभिषेक) कल्लू (शिळा). अर्थात पट्टदकल्लू किंवा पट्टदकल हे राज्याभिषेकाचे स्थान. चालुक्यांचे अतिशय महत्वाचे ठिकाण. ऐहोळेत मंदिरनिर्मितीला सुरुवात करुन बदामीत थोडी अधिक विकसित मंदिरे आणि लेण्या कोरून चालुक्यांनी आपल्या मंदिरकलेचा उत्कर्ष पट्टदकलला केला. एकूण १० मंदिरांचा हा समुच्चय. त्यातील ८ मंदिरे जवळजवळ आणि एकाच प्रचंड मंदिरसंकुलात आहेत तर नववे पापनाथ मंदिर ह्या संकुलाच्या बाहेर थोडे गावाच्या बाजूला आहे तर दहावे जैन मंदिर गावाच्या बाहेर साधारण दीडेक किमी अंतरावर आहे. वेळेअभावी आम्हाला पापनाथ आणि जैन मंदिर पाहता आले नाही मात्र संकुलातली सर्व ८ मंदिरे व्यवस्थित पाहता आली. ऐहोळे बघून पट्टदकलला आम्ही साधारण दीड दोनच्या सुमारास आलो. ऐहोळेला जेवायला काही मिळत नाही मात्र पट्टदकलला जेवण मिळते. मंदिरसंकुलाच्या बाहेरच टपरीवजा लहान लहान हॉटेलं आहेत आणि तिथे ग्रामीण कर्नाटकी पद्धतीचे जेवण मिळते. ज्वारीच्या लाटलेल्या पातळ भाकर्‍या, एखादे कडधान्य, भाजी, शेंगा चटणी आणि डाळभात असे साधेच पण रूचकर जेवण. जेवण करुन तिकिट काढून आम्ही मंदिर संकुलात गेलो. मंदिर संकुलाचे आवार विस्तीर्ण असून हिरवळ जोपासली आहे. पट्टदकल हे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत असल्याने परिसर अतिशय स्वच्छ, नीटनेटका आहे.

मलप्रभेच्या खोर्‍यात चालुक्यांचे राज्य बहरले. बदामी तसे मलप्रभेपासून लांब. ऐहोळेपासून मलप्रभा जवळ असली तरीही नदी तशी गावाच्या बाहेरुन वाहते मात्र पट्टदकल हे मलप्रभेच्या काठावरच वसलेले आहे. पट्टदकल येथील मंदिरे अधिक विकसित आणि देखणी असल्याचे कारण म्हणजे येथील मंदिरांची निर्मिती ही प्रामुख्याने विजयादित्य आणि विक्रमादित्याच्या (दुसरा) ह्याच्या काळात झाली आणि चालुक्य राजवटीचा हा काळ शांततेने भरलेला असल्यामुळे अगदी भरभराटीचा होता. इथल्या मंदिरांवर अप्रतिम नक्षीकाम आणि मूर्तीकाम आहे. मंदिराच्या आतील स्तंभांवरदेखील विविध पौराणिक प्रसंग कोरलेले आहेत किंबहुना अशा पद्धतीच्या मूर्तीकामाची सुरुवात येथेच झाली असे म्हणता येईल. येथेही दक्षिण भारतीय द्रविड शैली, उत्तर भारतीय नागर शैली, दोन्हीचे मिश्रण असलेली वेस्सर शैली, प्राथमिक मंदिरांची मंडप शैली अशा विविध प्रकारांनी बांधलेली मंदिरे आपणास दिसतात. त्यातीलच एकेक आपण आता पाहू.

पट्टदकल मंदिरसंकुल

a

संकुलाच्या अगदी सुरुवातीला लागणारी काडसिद्धेश्वर आणि जंबुलिंग मंदिरे ही अगदी लहान आहेत आणि जवळपास सारखीच आहेत.

१. काडसिद्धेश्वर मंदिर

सातव्या शतकाच्या मध्यात बांधले गेलेले हे मंदिर आकाराने लहान असून त्याचे शिखर उत्तर भारतीय रेखा नागर पद्धतीचे आहे. द्वारशाखेवर दोन्ही बाजूंना द्वारपाल आहेत. पीठावर शिवलिंग स्थापित असून त्याच्या द्वारशाखेवर शिवपार्वती प्रतिमा कोरलेली आहे. मंदिराच्या शुकनासीवर नटराज आणि पार्वती आहे तर बाह्यभिंतीवर लकुलिश शिव, हरीहर आणि अर्धनारीश्वराच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत.

मंदिराचे मुखदर्शन

a

लकुलिश

a

हरिहर

a

अर्धनारीश्वर
a

गर्भगृहातले शिवलिंग

a

२. जंबुलिंग मंदिर

ह्या मंदिराचे स्थापत्य देखील काडसिद्धेश्वर मंदिरासारखेच आहे. रेखा नागर पद्धतीचे शिखर आणि शुकनासीवर शिव पार्वती

रेखा नागर पद्धतीचे पद्धतीचे शिखर आणि शिवपार्वती

a

३. चंद्रशेखर मंदिर

हे मंदिर गळगनाथ आणि संगमेश्वर मंदिराच्या मध्ये असून हेही अगदी लहान आहे. मंदिराचा शिखरभाग आज नष्ट झाला असून हे मंदिर मंडप शैलीत साधे चौकोनी असे दिसते. गर्भगृहात पीठावर शिवलिंग स्थापित आहे.

चंद्रशेखर मंदिर

a

चंद्रशेखर मंदिर

a

४. गळगनाथ मंदिर

पट्टदकलमधले हे आगळ्यावेगळ्या शैलीचे मंदिर. आठव्या शतकातल्या मध्यातले हे मंदिराचे शिखर रेखा नागर पद्धतीचे असून अतिशय उत्तम स्थितीत आहे. नागरी शैलीच्या शिखर प्रकाराचे हे एक उत्कृष्ट उदाहरणच म्हणा ना. कलत्या छपरांवर तोललेला मुखमंडप, वर नागर पद्धतीचे उतरते शिखर आणि कळसाच्या भागात आमलक अशी ह्याची रचना. येथील सभामंडप आज पडून गेलेला दिसतो आणि शुकनासी भग्न झालेली दिसते. मात्र ह्याचे वैशिष्ट्य आहे ते येथील प्रदक्षिणा मार्गात. मंदिराचा प्रदक्षिणा मार्ग गर्भगृहातूनच काढलेला दिसतो. ऐहोळेतील असाच प्रकारचे हुच्चीमली मंदिर ह्याआधीच्या लेखात पाहिल्याचे आपल्याला आठवतच असेल. ह्या मंदिराचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे येथील तीन बाजूंना असलेली घनद्वारे. म्हणजे तिन्ही बाजूंना दरवाजाचा आभास निर्माण केलेला असून हि द्वारे मात्र भिंतीनी अथवा दगडाच्या जाळीदार खिडक्यांनी बंदिस्त असतात. मंदिराच्या मुखमंडपावर गंगा-यमुना कोरलेल्या असून एका भिंतीवर अंधकासुरवधाची प्रतिमा आहे.

गळगनाथ मंदिर

a

अंधकासुर वध

a

काडसिद्धेश्वर मंदिराच्या बाजूने दिसणारे गळगनाथ मंदिर

a

घनद्वार

a

रेखानागर पद्धत दर्शवणारे आदर्श शिखर

a

a

ह्या मंदिराच्या बाजूलाच आहे ते संगमेश्वर मंदिर

५. संगमेश्वर मंदिर

आतापर्यंत आपण वरील मंदिरे पाहिली ती नागर शैलीत होती तर चंद्रशेखर मंडप शैलीत (मूळचे नष्ट झालेले शिखर नागर शैलीतले असावे). मात्र संगमेश्वर मंदिर हे पूर्णतः द्रविड शैलीत आहे. हे मंदिर पूर्वी विजयेश्वर नावाने ओळखले जात असून चालुक्य सम्राट विजयादित्याने इसवी सन ७२० ते ७३३ च्या दरम्यान बांधले. एका उंच अधिष्ठानावर असलेल्या मंदिरात स्वतंत्र नंदीमंडप असून तीन बाजूंना मुखमंडप आहेत. मंदिराची विमान रचना हि द्विस्तरीय असून वरती कलश आहे आणि त्याखाली कूट शिखरे कोरलेली आहेत. प्रदक्षिणा मार्गावर वेगवेगळ्या नक्षीच्या जाळीदर खिडक्या असून बाह्यभिंतींवर देवकोष्ठे आहेत त्यावर अंधकासुर वध, त्रिपुरांतक, वराह, गजासुरवध, हरिहर अशा विविध मूर्ती बघायला मिळतात. सभामंडप अनेक स्तंभांवर तोललेला असून अंतराळ आणि गर्भगृहामध्ये प्रदक्षिणा मार्ग आहे. गर्भगृहात शिवलिंग स्थापित आहे. अर्थात हे मंदिर जरी खूप मोठे असले तरीही ते येथील विरुपाक्ष आणि मल्लिकार्जुन मंदिरांच्या मानाने लहानच आहे.

द्रविड शैलीतले संगमेश्वर मंदिर

a

भल्या थोरल्या अधिष्ठानावर असलेले संगमेश्वर मंदिर

a

गळगनाथ (डावीकडे) आणि संगमेश्वर (उजवीकडे)
a

संगमेश्वर आणि जांबुलिंग

a

मंदिराच्या बाह्य भिंतींवरील मूर्तीकाम

a

विविध प्रकारच्या जाळीदार खिडक्या

a

संगमेश्वर आणि पाठीमागे काशी विश्वेश्वर

a

आतापर्यंत आपण काडसिद्धेश्वर, जांबुलिंग, चंद्रशेखर ही तीन लहान मंदिरे, गळगनाथ हे मध्यम आणि संगमेश्वर हे मोठे अशी पाच मंदिरे पाहिली. आता राहिलीत ती तीन महत्वाची मंदिरे. काशी विश्वेश्वर, मल्लिकार्जुन आणि विरुपाक्ष. काशी विश्वेश्वर हे तसे लहान असूनही आतमधील स्तंभांवर असलेल्या अप्रतिम शिल्पपटांमुळे विख्यात आहे तर विरुपाक्ष आणि मल्लिकार्जुन ही जुनी मंदिरे तर प्रचंड मोठी आणि शिल्पकामाने अगदी भरलेली आहेत. या तिन्ही मंदिरांवर लिहायचे झाल्यास प्रत्येकावर एक स्वतंत्र लेखच लिहायला लागेल. त्यामुळे प्रत्यक्ष मंदिरे बघताना जरी वेळेचे नियोजन करायचे असल्यामुळे आम्ही मंदिरे बघताना काशी विश्वेश्वर, विरुपाक्ष, मल्लिकार्जुन, संगमेश्वर, गळगनाथ आणि उरलेली तीन लहान मंदिरे असा क्रम घेतला तरी लिहिण्याच्या सोयीच्या दृष्टीने इतर मंदिरांवर आधी लिहिले आणि आता पुढच्या भागात आपण उरलेले एकेक मंदिर विस्ताराने बघू. पुढच्या भागात भेट देऊ ती काशी विश्वेश्वराला.

क्रमशः

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

5 May 2025 - 7:55 pm | कर्नलतपस्वी

नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण लेख. अभ्यासकांना पर्वणी.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 May 2025 - 10:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितीपूर्ण लेखन म्हणजे वल्ली असा एक अलिखित नियमच झाला आहे. पट्टदकल्लूचा प्रवास आवडला. काडसिद्धेश्वर, जांबुलिंग, चंद्रशेखर या लहान मंदिरांबरोबर, गळगनाथ आणि संगमेश्वर ही मंदिरंही आम्ही आपल्या लेखनातून पाहिली. सर्वच छायाचित्रे सुंदर आली आहेत. नंबर एकचं छायाचित्र अजून मोठ्या आकारात टाकलं असतं तर, अजुन आवडलं असतं. बाकी, मंदिरांच्या वेगवेगळ्या शैली त्यांची रचना सविस्तर माहिती देणारं लेखन मनापासून आवडलं.

वल्लीशेठ लिहिते राहा.

-दिलीप बिरुटे

राजेंद्र मेहेंदळे's picture

5 May 2025 - 11:30 pm | राजेंद्र मेहेंदळे

सुंदर प्रचि!! आज फक्त प्रचि बघितली, लेख नंतर निवांतपणे वाचणार. आणि हो, मालिकाही परत वाचायला लागेलच, कारण हा लेख एक वर्षानंतर आला आहे, त्यामुळे लिंक गेली आहे.

पुढचे भाग जरा पटापट येउंद्या. तुमच्या लेखांमुळे कुठल्याही मंदीरात गेलो की मूर्तीकामाकडे नीट बघायला शिकतो आहे, कधी कधी थोडेफार कळतेही. बरेचदा कळत नाही. पण बघण्याची नजर आली हेही नसे थोडके. आभार!!