रॉय २ - सेरो तोरे

किल्लेदार's picture
किल्लेदार in भटकंती
10 Jan 2025 - 9:41 am

रॉय १

प्रसिद्ध ब्रिटिश गिर्यारोहक जॉर्ज मेलरीला एकदा एका पत्रकाराने प्रश्न केला, "व्हाय क्लाइंब माऊंट एव्हरेस्ट ?” त्यावर तो चटकन् उत्तरला, "बिकॉज इट इज देअर!” त्याच ढंगात जर मला विचारलं की का रे बाबा अर्जेंटिनाला का जावं तर मीही लगेच म्हणेन “तिथे रॉय आहे म्हणून!” अर्थात कुणी पत्रकार असं मला विचारणार नाही आणि काही वदलो तर ते प्रसिद्धीही पावणार नाही. पण अर्जेंटिनाच्या इतक्या कोपऱ्यात रॉयच मला ओढून घेऊन गेला होता एवढं मात्र खरं.

अर्जेंटिनाच्या, खरंतर जगाच्याच या कोपऱ्यात पहाटेचे सहा वाजले होते. अजूनही पुरतं उजाडलं नव्हतं. रात्री पावसाची एक जोरदार सर सडा टाकून गेली होती त्यामुळे वातावरण कुंद होतं. आदल्या दिवशी कितीही दमणूक झाली असली तरी जाग मात्र ठरल्या वेळेलाच आली. लवकर उठणं तसं अंगवळणी पडलं असलं तरीही काल ते अंग इतक्या कोनांतून वळलं होतं की आता एकशे-ऐंशी अंशाचा वगळता इतर कुठलाही कोन, नको वाटत होता. उशीत डोकं खुपसून निपचित पडून होतो तेवढ्यात तळमजल्यावरच्या रेस्टॉरंटमधली खुडबुड ऐकून चहा-कॉफीची तलफ आली. शूचिर्भूत झाल्याशिवाय चहा-नाश्ता काही मला मानवत नाही तेव्हा खांद्यावर टॉवेल टाकून लगोलग वॉशरूम मधे घुसलो. शॉवरखाली उभं राहिलं की सगळी मरगळ धुतल्या जाते आणि "आता मी जग जिंकणार!" असा ओव्हर कॉन्फिडन्स कुठूनसा येतो कुणास ठाऊक. दुर्दैवाने हा प्रभाव जेमतेम तासभरच टिकतो तेव्हा त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा म्हणून झटपट आवरलं आणि रेस्टॉरंटच्या कोपऱ्यातल्या एका खिडकीपाशी जाऊन बसलो.

इथला अर्जेंटेनियन “ब्रेक-फास्ट” हा फक्त उपास सोडण्या इतपतच लायकीचा होता. तरीही यथेच्छ उदरभरण उरकून, “यज्ञकर्म” संध्याकाळी तब्येतीत करू असं स्वतःलाच आश्वासन देत बाहेर सटकलो. डोक्यावर मळभ दाटलं होतं. अगदी बदाबदा पाऊस पडायची लक्षणं नसली तरी एखाद दुसरी सर चिंब करून जाईल याची धास्ती मात्र होती. तसा हा प्रदेश आणि त्यातही हा ऋतू जरा लहरीच आहे. कधी पाऊस येईल, कधी तुफान वारा सुटेल कधी बर्फवृष्टी होईल काही म्हणून सांगता यायचं नाही.

20240915_170630

रिओ फिट्झ रॉयने कवेत घेतलेला लहानसा रस्ता सकाळचे दहा वाजले तरी पेंगलेलाच होता तेव्हा वाट कोण दाखवणार? मला या काळजीत बघून अचानक कुठुनसा एक गाईड आपली झुपकेदार शेपटी हलवत दिमतीला हजर झाला आणि नेमक्या वाटेकडे घेऊन गेला. पायथ्याची लगुना तोरे ची पाटी बघितली आणि मनोमन या आगंतुकाचे आभार मानत चढाला लागलो. मी व्यवस्थित मार्गस्थ झालो याची खात्री पटल्यावरच हा स्वयंसेवक त्याच्या पुढच्या कामगिरी साठी चालता झाला. महाराष्ट्रात दुर्गभ्रमण करतांना असा अनुभव बऱ्याचदा घेतलांय. निष्काम कर्मयोग्यासारखे कुठलीही अपेक्षा न ठेवता आणि कसलीही कुरकुर न करता हे “कुक्कुर-स्वयंसेवक” वाटाड्याची जबाबदारी चोख पार पाडतात.

रात्रीच्या सरीमुळे पाऊलवाट अजूनही ओलसर होती. सोवळा होऊनच निघालो असलो तरीही ढगांनी “प्रोक्षण” करून मला परत एकदा पवित्र करून घेतलं. माथ्यावरचं काळं करडं आभाळ आणि त्याखालचा हिरवट, मातकट भवताल एखाद्या कृष्णधवल चित्रपटासारखा वाटत होता.

20240816_212140-COLLAGE~2

बऱ्यापैकी उंची गाठल्यावर वाट एका खिंडीतून पलीकडल्या रिओ फिट्झ रॉयच्या खोऱ्यात शिरली आणि… एखाद्या निष्णात चित्रकारानं कच्च्या रेखाटनाचं, ब्रशच्या दोन चार फटकाऱ्यात अफलातून चित्रामध्ये रूपांतर करावं, तसं समोरचं दृश्य एकदम बदललं…खरंच, निसर्ग निःसंदिग्ध सर्वश्रेष्ठ चित्रकार आहे. आपल्या ठसठशीत आणि चटक रंगसंगतीच्या शैलीसाठी प्रसिद्ध असलेला विख्यात डच चित्रकार व्हिन्सेंट व्हॅन हॉघ म्हणतो, शरद ऋतूत झरझर बदलत जाणारं सौंदर्य चितारण्यासाठी माझ्याजवळचे हात, कॅनव्हॉस आणि रंग अपुरे आहेत !

मिराडोर देल तोरेच्या गॅलरीतून शरद ऋतूतलं हे भव्यदिव्य निसर्गचित्र डोळेभरून पाहून घेतलं.

PXL_20240402_150124263

PXL_20240402_154907927 (1)

20241202_094143-COLLAGE

वाट चढत जेवढी वर घेऊन आली होती तेवढीच पुन्हा उतरत तळात घेऊन गेली. सतत चढ-उतारांची पण तशी अगदीच सोपी असलेली ही रेताड, खडकाळ पाऊलवाट कधी खुरट्या, रंगीबेरंगी ग्वानाको झुडुपांमधून तर कधी लेंगा वृक्षांच्या गच्च रानातून गेलेली आहे. एका बाजूने फेसाळत वाहणाऱ्या रिओ फिट्झ रॉयचा एखादा लहानसा प्रवाह मधूनच खोडसाळपणे वाटेला छेद देऊन जातो. तिथे टाकलेले लाकडी ओडक्यांचे साधे, छोटेसे पूल तर कुठे घसरड्या चढावर लावलेल्या लाकडी पायऱ्या, वाटेचे सौंदर्य अधिकच खुलवतात. पण हा मानवी हस्तक्षेप अगदीच नगण्य आणि तो सुद्धा कुठेही विद्रुपीकरण होऊ न देता केलेला. निसर्ग जसा आहे तसाच ठेवण्याकडे कल.

20250107_182417-COLLAGE

मध्यान्ह झाली तसं आभाळ निवळलं आणि ढगांच्या पडद्याआडून समोरच्या “रंग”-मंचावर हळूहळू एकेका पात्राचा प्रवेश होऊ लागला. डावीकडचा आडवा सेरो सोलो, त्याला लागूनच शुभ्र-धवल ॲडेला पर्वतरांग, अगदी उजवीकडच्या कोपऱ्यात आगुखा बिफिडा, तोरे पच्मामा, तोरे अचाचीला, तोरे इंती आणि अजून बरीच कितीतरी शिखरं हारीनं उभी होती. पण कदाचित प्रमुख पात्रांची एन्ट्री शेवटच्या अंकासाठी राखून ठेवली असावी.

20241229_115640

दे ॲगोस्टीनी कँपसाईटला वळसा घालून वाट लहानश्या चढावरनं लगुना तोरेच्या काठावर गेली आणि नाट्याचा शेवटचा अंक सुरू झाला. ढगांचा दाट पडदा अखेर वर गेला आणि त्यामागून उंचच उंच सेरो तोरे आणि त्याबाजूची तोरे एग्गर, पुंटा हर्रोन आणि आगुखा स्टँडहार्टची शिखरं प्रकट झाली. रॉय मात्र आज ढगांमागे विंगेत उभा राहून इतरांना तोरा दाखवायची थोडी संधी देत होता कारण तोरे शिखरं कितीही आडदांड वाटत असली तरीही या इलाख्यात खरी दादागिरी रॉयचीच. बाजूच्या प्लीएगे तुंबादोवरून बघितलं तर हे सहज लक्षात येतं.

PXL_20240402_164036414~2-01

PXL_20240402_173648775

SmartSelect_20250109_074530_Google Earth
गूगल अर्थ द्विमितीय नकाशा

लगुना तोरेकाठी घटकाभर घुटमळलो. या तळ्याचं पाणी दिसायला जरी राखी-मातकट असलं तरी त्यापुढच्या नदीखोऱ्याला मात्र रंगवून टाकण्याचं त्यात सामर्थ्य होतं. तोरे ग्लेशियर मधून तुटलेले निळे काळे हिमनग तळ्यात आरामात डुंबत पडले होते. सूर्योदयाच्या वेळी ही सर्व तोरे शिखरं काही मिनिटं तांबड्या लाल रंगात उजळून निघतात. ते बघायला मिळणं म्हणजे खरं तर एक पर्वणीच मात्र त्यासाठी रात्रीच दे ॲगोस्टीनी कँपसाईटला तळ ठोकून बसायचं आणि रामप्रहरी उठून तळ्याकाठी हजेरी लावायची. पण तो योग नव्हता. तरीही इतक्या विलक्षण देखाव्याचा साक्षीदार केल्याबद्दल कृतज्ञता म्हणून दुसऱ्या प्रहरी का होइना, तळ्यातल्या बर्फाचा एक लखलखता स्फटिक उचलून अर्घ्य अर्पण केलं.

20240915_180350

परतीच्या वाटेला लागलो. वाटेवरचा “व्हॅली ऑफ डेथ अँड रीबर्थ” हा पट्टा एकदम मुलुखावेगळा (अर्थात हे काही अधिकृत नाव नाही). नारिंगी, हिरव्या झुडपांमधून निष्पर्ण वृक्षांचे पांढरेधोप बुंधे आपले असंख्य हात उंचावत समोरच्या सेरो तोरे शिखराची प्रार्थना करताहेत असं काहीसं हे दृष्य बघितल्यावर वाटलं. या काळातला, वसंत ऋतूतला, रंगपंचमीचा आपला उत्सव इथे त्याच वेळी पण शरद ऋतूत निसर्गच साजरा करतो. दोन डोळ्यांनी किती आणि काय काय बघावं? सरळ नाकासमोर न चालता थोड्या थोड्या वेळानं थांबत पाठी वळून बघितलं तर बदलत जाणाऱ्या छाया प्रकाशात दर वेळी निराळेच रंग बघायला मिळतात. तेव्हा सहस्राक्ष इंद्राइतके अगदी अंगभर नाही तरी निदान पाठीवर डोळ्यांची अजून एक जोडी जरा सोयीची झाली असती असा विचार नक्कीच डोकावून जातो.

PXL_20240402_185306918

PXL_20240402_182006462-01 (1)

PXL_20240402_184253238

PXL_20240402_175549119 (1)

दमून भागून परत एकदा मिराडोर देल तोरे ला पोहोचलो. इथून वाटेनं वळण घेतलं की तोरे शिखरं नजरेआड जाणार होती म्हणून एका सावलीखाली आरामात बैठक मारून संध्याकाळच्या सोनेरी उन्हात झळाळणारं ते निसर्गवैभव एकवार बघून घेतलं.

PXL_20240402_185715282

इथून पाय निघेनात…आजवर दृष्टीआड असलेल्या इतक्या अलौकिक सृष्टीनं अवाक् तर केलंच होतं आणि आता ढोपरं आखडल्यामुळे “अ-वॉक” व्हायचीही वेळ आली होती. एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ! म्हणत स्वतःच्याच पायांपुढे हात जोडायचीही सोय नव्हती. आजवरच्या अनुभवांतून बोध घेऊन सुद्धा नी-कॅप्स जवळ ठेवल्या नाहीत तेव्हा अक्कल काय गुडघ्यात गेली होती काय रे? असा मलाच त्यांनी उलट सवाल केला असता. तेव्हा तिरक्या चालीनं आणि धीम्या गतीनं रखडत, रडत-खडत शेवटच्या टेकाडावरनं गावात उतरलो.

20241205_154138

लटपटत्या पायांनी हॉटेल गाठलं आणि बिछान्यावर झोकून दिलं. अर्धवट ग्लानीत कधीतरी वाचलेली टॉलस्टॉयची एक समर्पक गोष्ट आठवली…

दिवसभरात पायाखालून घालशील तेवढी जमीन तुझी असं आश्वासन मिळाल्यावर, जास्तीत जास्त जमीन हस्तगत करायच्या लोभानं एक गरीब शेतकरी दिवस मावळेपर्यंत छाती फुटेस्तोवर धावतो आणि सरतेशेवटी काहीही प्राप्त न करता गत:प्राण होतो. आठ दहा दिवसांच्या तुटपुंज्या रजेवर, अलम् पातागोनिया पादाक्रांत करायची लालसा बाळगून असलेला मी तरी कुठे वेगळा होतो? पण गोष्टीनं थोडं शहाणपण मात्र नक्कीच आणलं होतं. पुढच्या दिवसासाठी आखलेल्या, एकाच वेळी सर्व शिखरांचं दर्शन घडवणाऱ्या आणि म्हणून अधिकच मोहात पाडणाऱ्या, प्लीएगे तुंबादोच्या मोहीमेचा हट्ट सोडून दिला.

पहाटेच एल चॅल्टेन मधून चंबुगबाळं आवरलं आणि एल कलाफातेच्या बस मध्ये चढलो. तांबडं फुटलं तसं एक मोठ्ठी जांभई काढून बस सावकाश धावू लागली. गावात अंगावर येऊ पहाणारी अजस्त्र शिखरं, लांब जाऊ लागलो तशी लहान होत गेली. बरंच काही राहून गेलं ही चुटपुट बसमधल्या बहुतेकांच्या मनात असावी कारण हळूहळू उजळत जाणाऱ्या रॉयकडे पुनःपुन्हा वळून बघणारा मी काही बसमध्ये एकटाच नव्हतो.

20241202_100514

क्रमशः

प्रतिक्रिया

किल्लेदार's picture

10 Jan 2025 - 9:45 am | किल्लेदार

कृपया हा धागा भटकंती विभागात हलवावा.

गोरगावलेकर's picture

10 Jan 2025 - 10:32 am | गोरगावलेकर

लेख आणि फोटो दोन्हीही आवडले

सुप्रिया's picture

10 Jan 2025 - 10:57 am | सुप्रिया

लेख आणि फोटो दोन्हि अप्रतिम

कर्नलतपस्वी's picture

10 Jan 2025 - 11:13 am | कर्नलतपस्वी

अप्रतिम निसर्ग, अप्रतिम छायाचित्रण आणी त्याच तोडीचे अप्रतिम शब्दांकन. थोडावेळ मी स्वतःच तीथे गेलोय असे वाटले.

मस्तच.

नचिकेत जवखेडकर's picture

10 Jan 2025 - 11:41 am | नचिकेत जवखेडकर

फोटो आणि वर्णन, केवळ अप्रतिम!

चौथा कोनाडा's picture

10 Jan 2025 - 12:10 pm | चौथा कोनाडा

wowimoji

_______ जबरदस्त.
___________अप्रतिम.
तिथल्या निसर्ग सौंदर्याचे वर्णन करायला शब्दच नाहीत.
एक वेगळा अनुभव दिल्या बद्दल मनापासून धन्यवाद !

सुंदर! खुप वाट बघावी लागली दुसऱ्या भागाची!!

सौंदाळा's picture

10 Jan 2025 - 11:53 pm | सौंदाळा

अप्रतिम
हे सर्व एका ठिकाणी आहे विश्वासाच बसत नाही.
शब्द संपले.

प्रचेतस's picture

11 Jan 2025 - 10:12 am | प्रचेतस

आहा.....! अतीव सुंदर.

लवकर उठणं तसं अंगवळणी पडलं असलं तरीही काल ते अंग इतक्या कोनांतून वळलं होतं की आता एकशे-ऐंशी अंशाचा वगळता इतर कुठलाही कोन, नको वाटत होता.

😀 😀 😀

मॅग्निफिका नारासीऑन...एरमोसा फोतोस... मुई लिंदो 👍
(मागे खरडफळ्यावर गवि साहेबांनी सुचवलेल्या duolingo.com वर पुन्हा स्पॅनिश शिकण्याचा प्रयत्न सुरु केलाय. सुरुवातीला मोट्या जोशात रोज २० मिनिटांच्या शिकवणीत आठवड्याला १०० शब्द शिकवणारा 'इंटेन्स' हा पर्याय निवडला होता, पण आता दोन महिने होत आले तरी ते १०० शब्द काही अजुन शिकुन पुर्ण झाले नाहीत 😂)

असो... मस्तच झालाय हा भाग पण! आता पुढील भागाच्या प्रतिक्षेत आहे.

किल्लेदार's picture

12 Jan 2025 - 11:39 am | किल्लेदार

गोरगावलेकर, सुप्रिया, कर्नल तपस्वी, नचिकेत जवखेडकर, चौथा कोनाडा, सौंदाळा, प्रचेतस - प्रतिक्रियांबद्दल आभार.
अथांग आकाश - वेळ लागला खरा.
टर्मीनेटर - शिकून घ्या लवकर. साऊथ अमेरिकेत स्पॅनिश येत असलं तर खूप पैसे वाचवता येतात.

टर्मीनेटर's picture

12 Jan 2025 - 4:36 pm | टर्मीनेटर

साऊथ अमेरिकेत स्पॅनिश येत असलं तर खूप पैसे वाचवता येतात.

क्या बात... ही टीप लक्षात ठेवली आहे, तिकडे जाण्याचा अजून योग आला नाहीये! अर्थात तो आला तरी दुर्गभ्रमण किंवा अशी पायपीट करण्याची अजिबात इच्छा नाही, कारण तेवढी शारीरिक क्षमताच आता राहिली नाहीये 😀

राघव's picture

15 Jan 2025 - 12:16 am | राघव

नेहमीप्रमाणेच! अत्त्युत्तम! :-)

किल्लेदार's picture

21 Jan 2025 - 5:35 pm | किल्लेदार

:)

नि३सोलपुरकर's picture

15 Jan 2025 - 12:30 pm | नि३सोलपुरकर

किल्लेदार साहेब,
खुप खुप धन्यवाद _/\_

किल्लेदार's picture

21 Jan 2025 - 5:34 pm | किल्लेदार

:)

Bhakti's picture

21 Jan 2025 - 6:03 pm | Bhakti

अतीव सुंदर!
कोणाचं तरी स्वप्न वाचतेय, पाहतेय असं वाटलं.