पुणे ते अयोध्या सायकल राईड

Abhay Khatavkar's picture
Abhay Khatavkar in भटकंती
18 Dec 2024 - 10:23 pm

जय श्रीराम उत्तर दिग्विजय

पुणे ते अयोध्या सायकल राईड २३ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२४

यंदा Indo Atheletic Society तर्फे प्रभू श्री रामचंद्र यांच्या जन्मभूमी आणि तमाम हिंदूच्या भावनेचे प्रतीक असे श्री राममंदीर अयोध्या येथे सायकल राईड आयोजित केली होती. साधारणतः IAS ची मोठी सायकल राईड ही डिसेंबरमध्ये दुसऱ्या आठवड्यात असते आणि त्याच दरम्यान माझ्या पुतणीचे लग्न (१४ डिसेंबर ) असल्याने ह्या वेळेस राईड होणार नाही असे दिसले, परंतु ही राईड २३ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२४ असे समजल्यावर लगेचच राईडसाठी नोंदणी केली आणि निर्धास्त झालो. जायच्या ४-५ दिवस आधी सायकल सर्व्हिस करून दोन्ही टायर बदलून घेतले.

दिवस-१ निगडी ते शिर्डी २३.११.२०२४-शनिवार

पुणे ते अयोध्या सायकल राईड ही निगडी येथील भक्ती शक्ती पासून पहाटे ४ वाजता सुरु होणार होती, आम्ही मात्र ( मी आणि बालाजी जगताप) नाशिक फाटा येथे जाऊन मोशी येथे इतरांना जॉईन करू असे ठरले. आदले दिवशी एक वाढदिवस कार्यक्रम असल्याने रात्रीचे झोपायला १२ वाजले होते आणि आमची राईड पहाटे ४ वाजता सुरू होणार होती, म्हणजे झोप २-३ तास मिळणार होती...पहाटे २.३० वाजता उठून सायकल व्यवस्थित चाचपणी करून पहाटे ३.४५ वाजता मी आणि बालाजी पिंपळे गुरव येथुन निघालो. नाशिक फाट्याने जात असताना एकेक सायकल मिञ जॉईन होत होते.... मोशी येथे पोचल्यावर बाकीचे सायकलस्वार एकत्र येऊन जय भवानी, जय शिवाजी आणि जय श्रीरामच्या जयघोषात शिर्डीच्या दिशेने मार्गस्थ झालो

सकाळी ८.३० च्या दरम्यान नारायणगाव येथे हॉटेल श्रीराज चे मालक श्री सुनिल इचके यांच्या तर्फे सकाळची न्याहारी ठेवण्यात आली होती. गरम पोहे आणि गरम मसाला दुध हे त्यांच्यातर्फे आयोजित केले होते, त्याचा आस्वाद घेऊन त्यांचे आभार मानून आम्ही पुढील प्रवास सुरू केला. सकाळच्या वातावरणातील गारवा एक प्रकारे वेगळीच अनुभूती देणारा होता. घारगावच्या पुढे एक सरळ चढ / घाट आहे याची आधीच माहिती होती कारण याआधी पुणे ते शिर्डी सायकल राईड केली असल्याने रस्ता माहिती होता, त्या घाटाच्या अलीकडे थोडे थांबून पाणी पिऊन पुढे निघालो. तिथून पुढे काही अंतर गेल्यावर चंदनापुरीचा तीव्र उतार असल्याने सायकली वेगाने पळत होत्या, पण वेगाला आवर घालायचे काम आम्ही ब्रेक लावुन करत होतो कारण तो घाट अती तीव्र उतार आहे आणि उताराला जर काही खड्डा आला की तो चुकवता आला नाही तर कोठे तरी कपाळमोक्षच व्हायचा.

दुपारी १.३० च्या दरम्यान सायकलमित्र संतोष नखाते आणि गगन गिरी महाराज मठ संगमनेर यांच्या वतीने संगमनेर येथे उत्तम भोजनाची व्यवस्था केली होती त्यावर ताव मारून थोडावेळ विश्रांती घेऊन आम्ही २.३० च्या दरम्यान शिर्डीकडे निघालो.. दुपारची वेळ जेवण झालं असल्याने सायकल हळु हळू चालवत होतो...काही किमी अंतर गेल्यावर अचानक काहीतरी वेगळेच जाणवत होते...सायकल वेग घेत नव्हती...आणि अजुन थोडे अंतर गेल्यावर तर असे वाटले की ही राईड इथेच कायमची सोडुन द्यावी आणि ट्रकमध्ये बसावे असे वाटले...पण बाकीचे मित्र, नातेवाईक.. ऑफिस मधील सहकारी काय म्हणतील??? सगळे आमच्याकडे आशेने डोळे लावुन बसले असतील की अभय अयोध्या राईडला गेलाय आणि तो पुर्ण करणार ही त्यांची खात्री असणार आणि मी मात्र राईड सोडुन देणार याच्या विचारात होतो.... मी तसे बालाजी जगताप यास तसे सांगितले पण....तो म्हणाला पुढे ट्रक मधील टेक्निशियन सुजीथ याला सायकल दाखवू... बघू काय होतंय ते... शिर्डी विमानतळ जवळ सुचीथ भेटला...त्याला मी सांगितले सायकल पळत नाही...नवीन टायर टाकल्याने रस्त्याला वेग मिळत नाही का... ग्रीप पकडत नसेल आणि बऱ्याच शंका त्याला विचारल्या...त्याने तसे काही सांगितले आणि टायरमधील हवा तपासली...तर पुढील आणि मागील टायर मधे हवा कमी होती...त्याने ती हवा भरली आणि पुढे निघालो ( त्याने भरलेली हवा ही शेवटच्या १२ ते १३ दिवसात अजिबात कमी झाली नाही) त्यानंतर थोडे जरा हायसे वाटले..

शिर्डी विमानतळ जवळून जाताना एक दोन विमाने उड्डाण आणि उतरताना दिसली...मजल दर मजल करत सायंकाळी ६ वाजता शिर्डी येथील साई आश्रम भक्तनिवास येथे आम्ही पोचलो... निवासाची उत्तम व्यवस्था सुधाकर टिळेकर यांनी केली होती...रूम मध्ये गेल्यावर आवरुन साई बाबांच्या दर्शनासाठी गेलो. सायकलमित्र प्रदीप टाके यांच्या वतीने साईबाबांचे दर्शन मस्त झाले... त्याबद्दल त्यांचे आभार त्यानंतर अन्नछत्र येथे जाऊन रात्रीचे भोजन पर प्रसाद याचा आस्वाद घेतला आणि निवासावर येऊन रात्री १० वाजता झोपी गेलो.

दिवस-२ शिर्डी ते शिरपूर २४.११.२०२४-रविवार

आज २०० किमी अंतर असल्याने पहाटे ४.३० वाजता फ्लॅग ऑफ झाल्यावर आम्ही सर्व सायकलस्वार निघालो, पहाटेच्या वातावरणात अंगावर गार वारं घेत, सायकलिंग करत सकाळी ७.३० च्या दरम्यान नाष्ट्यासाठी थांबलो. येवला सायकल क्लबच्या वतीने पोहे, उपीट आणि चहा ठेवण्यात आला होता. त्यावर ताव मारून आम्ही निघालो. सकाळी १० च्या दरम्यान मनमाड मालेगाव ह्या हॉटेल सनशाईन मध्ये मेहता बिल्ड कन्स्ट्रक्शन कंपनी नाशिक यांच्या वतीने आमची उत्तम जेवणाची व्यवस्था केली होती. आम्ही अपेक्षेप्रमाणे फारच लवकर २ तास आधी तिथे पोचलो होतो.सकाळी १० ची वेळ जेवायची जरी नसली तरी आणि आम्हाला अजून बरेचसे अंतर जायचे असल्याने अतिथी देवो भव ही भावना मनात ठेऊन आणि उभयतांनी केलेली इतकी व्यवस्था पाहून भारावून गेलो, तसेच तयार होत असलेल्या जेवणाचा अपमान होऊ नये म्हणून आम्ही तिथेच थांबलो...जेवण तयार होई पर्यंत...दरम्यान तिथं एक मसाज करणारी व्यक्ती त्या आयोजकांकडून करण्यात आली...त्याचा फायदा सगळ्यांनी घेतला....त्याने कडाकड मान मोडली आणि पाठीला मसाज करून अंग हलके करून दिले...आराम करायला गादी ठेवल्याने असे वाटत होते की आज इथेच मुक्काम करावा...त्यानंतर जेवण इतके मस्त होते की जेवणाचा पुरेपूर आस्वाद घेतला... कुठेही तेलकट नाही की तिखट नाही. जेवण झाल्यावर त्यांच्याकडून एक सन्मानचिन्ह आणि आवळा कांडी सगळ्यांना देण्यात आली. त्यानंतर त्यांचे आभार मानून दुपारी १२.३० च्या आम्ही शिरपूर साठी रवाना झालो. वाटेत काही लहान मुले उत्साहाने आम्हाला बाय बाय करत होती. आम्ही पण त्यांना बाय बाय करत होतो. जेवण लवकर झाल्याने सायकल प्रवास निवांत सुरू ठेवला... पुढे मागे करत आम्ही दुपारी २.३० च्या दरम्यान धुळे शहर पास केले. सायंकाळी ४ च्या दरम्यान सायकल मित्र श्रीकांत चौधरी यांच्या ओळखीने धुळे सायकल क्लब यांच्या वतीने अजय भवन येथे कुंकुमतिलक करून औक्षण आणि स्वागत करण्यात आले, त्यानंतर आम्ही शिरपूर कडे रवाना झालो आणि सायंकाळी ६.३० च्या दरम्यान शिरपूर येथील अग्रसेन भवन येथे मुक्कामी पोचलो. येथे पण श्रीकांत चौधरी यांच्या मामाच्या वतीने रात्रीच्या जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था करण्यात आली. उत्तम अशा स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊन आम्ही झोपी गेलो.

दिवस-३ शिरपूर ते माहेश्वर २५.११.२०२४-सोमवार

आज पहाटे ५.३० ला फ्लॅग ऑफ झाल्यावर व शंख निनाद झाल्यावर आम्ही सर्व जय श्री रामच्या घोषणा देत माहेश्वरच्या दिशेने निघालो. आज आम्ही महाराष्ट्र राज्य सोडुन मध्यप्रदेश राज्यात प्रवेश करणार होतो. सकाळी ८ च्या दरम्यान आम्ही मध्य प्रदेश राज्यात प्रवेश केला. त्यानंतर सेंधवा येथे नाष्टा उरकून प्रवास सुरू झाला. रस्त्यानं जाताना डावीकडे पांढरे पट्टे मारलेले बऱ्यापैकी मोठे होते, म्हणजे दोन सायकलस्वार जातील एवढी जागा होती आणि विशेष म्हणजे एकही मोठे वाहन त्या पांढऱ्या पट्टयातुन जात न्हवते, सगळीच वाहने आपापल्या मार्गाने जात होती. आता मध्यप्रदेश मधून जाताना वस्ती विरळ होती आणि दूरवर कोठेच हॉटेल अथवा खाण्याची व्यवस्था दिसत न्हवती, होते ते ढाबेच दिसत होते. हळुहळू गप्पा मारत आम्ही १२ च्या दरम्यान जेवणासाठी हॉटेल शोधत होतो...पण ते काही कोठेच दिसत न्हवते, जवळची चिक्की, लाडू संपत आले होते. शेवटी मांहेश्वरच्या अलीकडे दुपारी २.३० वाजता जेवण करून दुपारी ३ वाजता माहेश्वरच्या ११ किमी अलीकडे श्री मिलन मंगल कार्यालय धामनोद येथे मुक्कामी पोचलो. लगेच आवरुन आम्ही १०-१२ जण पुण्यश्लोकदेवी अहिल्याबाई होळकर यांच्या....... झालेल्या माहेश्वर येथे पोचलो. तिथे गेल्यावर त्यांचा तो राजवाडा, त्यांची कामगीरी आणि संपूर्ण कारकीर्द यांची माहिती घेऊन सूर्यास्तसाठी घाटावर गेलो. सूर्यास्ताचे अमोघ दर्शन घेऊन मंदिरात गेलो, तो पर्यंत बाकी सर्व सायकलवीर तिथे आलेच होते. एका मंदिरात सगळ्यांनी दर्शन घेऊन ग्रुप फोटो घेतला आणि परत मिलन मंगल कार्यालय येथे आलो. इथेच मला आमच्या ऑफिस मधील महिला सहकारी विद्या भोसले यांच्या वडिलांचे मित्र श्री चिंतामणी बोडस सर पण याच राईडसाठी सांगली वरून आले आहेत याची माहिती मिळाली, मग काय त्यांची माहिती घेऊन एकमेकाची विचारपूस केली. आश्चर्य म्हणजे बोडस सर यांना पण माझी माहिती विद्या भोसलेकडून देण्यात आली होती. त्यांनतर रात्रीचे जेवण करून आम्ही थोडा वेळ कॅम्प फायरचा आनंद घेऊन रात्री ११ वाजता झोपी गेलो.

दिवस-४ माहेश्वर ते उज्जैन २६.११.२०२४-मंगळवार

आज पहाटे ५.३० वाजता आम्ही सर्व सायकलस्वार महाकालची नगरी उज्जैनकडे रवाना झालो. आज जाताना माहेश्वर पासून ३० किमी पुढे गेल्यावर एक नवीन घाट बायपासचे काम चालू होते, त्यामार्गे गेल्यावर बऱ्यापैकी अंतर वाचले होते. त्या रस्त्याने कोणतीच वाहने नसल्याने सगळ्यांनी मनसोक्त फोटो काढून घेतले आणि सायकली उज्जैन कडे दामटल्या. आज जाताना दिपक उमरानकर आणि संजय कुचे यांची साथ होती. आम्ही तिघे दुपारी इंदोर शहर सोडल्यावर एका हॉटेल मध्ये जेवण केले आणि निघालो उज्जैनकडे. वाटेत जाताना एक दोन लोकांना उज्जैनचा रस्ता विचारला कारण दोन रस्ते दाखवत होते, एक जरा खराब असलेला तर दुसरा हायवे मार्गे. आम्हाला काही लोकांनी हायवे मार्गे जा असे सांगितले आणि तसे गेलो, काही अंतर गेल्यावर समजले की हे अंतर जास्त (८-९ किमी) आहे, परत मागे फिरणे शक्य नाही म्हणून त्याचं मार्गे महाकाल नगरी निघालो. रस्त्यानं जाताना गावाची नावे काही विलक्षण होती. उदा.. लोहार पिपल्या... लोहारी असे. ही नावे माझ्या एका मित्राच्या आडनावावरून होती..ती त्याला फोटो काढून पाठवली. सायंकाळी ५.३० वाजता आम्ही उज्जैन मंदिरी पोचलो. थोड्या वेळाने सर्व सायकलस्वारांची सायकल प्रदक्षिणा मंदिराजवळून काढण्यात आली, त्यासाठी तेथील मिडिया उपस्थित होती, त्यांनी सर्व माहिती घेतल्यानंतर फोटोसेशन झाल्यावर आम्ही आवरुन महाकाल नगरी प्रसाद पर भोजन करून महाकालचे दर्शन घेतले. मंदिराजवळ भव्य दिव्य अशा मूर्ती आणि कलाकुसर केलेल्या शिल्प उभी केलेली आहेत, ती पाहून रात्री ९.३० वाजता श्री महाकालेश्वर भक्तनिवासी येऊन झोपी गेलो.

दिवस-५ उज्जैन ते ब्यावरा २७.११.२०२४-बुधवार

आता रोज पहाटे ४ वाजता ऊठुन ५.३० ला निघायची सवय झालेली होती. झोप काही पुर्णतः होत नसे. तरीही जिद्दीने आम्ही सर्व प्रभू श्री रामचंद्र यांच्या जन्मभूमी मध्ये पोचण्याच्या आशेने प्रवास करत होतो. सकाळी ९ च्या दरम्यान एका ठिकाणी नाष्ट्यासाठी थांबलो. पनीर पराठा आणि अस्सल दही यावर ताव मारला आणि थोडावेळ गाण्यावर नृत्य करत मजा केली. आज मी, दीपक, मुकुंद आणि संजय एकत्र सायकलिंग करत होतो. आज रस्त्याने चढ उतार कमी असल्यानं आणि सपाट रस्ता असल्याने सायकली पळत होत्या. मध्येच एका ठिकाणी हरिणांचा कळप दिसला, पण व्हिडिओ काढे पर्यंत तो दूरवर निघून गेला होता. आज रस्त्याने जाताना विरुद्ध दिशेने वाहने येत होती. त्यात दुचाकी, चारचाकी तर काही मोठे ट्रक आणि कंटेनर पण होते आणि ते वेगाने पण होते, त्यामुळे आम्हाला सुरक्षित आणि जबाबदारीने सायकल करावी लागत होती. पुण्यात पण ही स्थिती आहे, पण एवढ्या वेगात अथवा मोठी वाहने नसतात.

काही ठिकाणी तर रस्त्याच्या विरुद्ध बाजूला उजवीकडून वाहने विरुद्ध दिशेने न जाता ती डाव्या बाजूने जात होती, त्यात शाळेची बस, पोलिस वाहने पण होती. त्यात भरीस भर म्हणून काही दुचाकी, चारचाकी ह्या विना नंबरच्या होत्या. चौकशी केल्यावर त्या दोन नंबरच्या विकत घेतलेल्या होत्या. ज्या कोणीतरी चोरून विकलेल्या होत्या. पोलिस पण ह्याकडे बिनधास्त दुर्लक्ष करत होते...किती हे भयानक, एखादा अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण ????

आज जाताना माझ्या नावाचे गाव ( अभयपुर) दिसले, मग काय लगेच फोटो काढून घेतले आणि व्हॉट्सॲप ग्रुप वर पाठवले, छाती एकदम ५६ इंचाची भरून आली... आणि इथचं कायमचं रहा असा सल्ला काही नातेवाईकांनी दिला. काही अंतर गेल्यावर भडक्या असे गावाचे नाव दिसले सायंकाळी ५.३० च्या दरम्यान ब्यावरा येथील हॉटेल ज्योती पॅलेस येथे मुक्कामी पोचलो. गेल्यावर आवरुन थोडे वॉकिंग करून जेवण केले आणि रात्री ९.३० वाजता झोपी गेलो.

दिवस-६ ब्यावरा ते बदरवास २८.११.२०२४-गुरुवार

आज सरळ रस्ता आहे असे सांगितले गेले त्याप्रमाणे पहाटे ५.३० वाजता फ्लॅग ऑफ झाल्यावर आम्ही सकाळच्या कडक थंडीत प्रवास सुरू केला. काही अंतर गेल्यावर आम्ही तिघे थोडा ब्रेक घेऊन अथवा Hydration ला थांबुन पाणी घेत, संत्री, चिकी खाल्ली आणि पुढे निघालो. आज पुन्हा सपाट रस्ता असल्याने सायकली निवांत होत्या... जास्त चढ नाही की उतार नाही. दुपारी जेवण केल्यावर बदरवास कडे जाताना ४० किमी बाकी असताना उलटे वारे सूरू झाले आणि सायकलचा वेग कमी झाला, रस्त्यात आज पुन्हा एका गावाचे नाव दिसले "गौरा" जे की मी माझ्या मुलीला म्हणत असतो ( गौरी नाव तिचे) त्याचा फोटो घेतला आणि पुढे निघालो, वाटेत थोडा चहा घेऊन सायंकाळी ४.३० वाजता बदरवास येथील हॉटेल सिल्व्हर पार्क येथे पोचलो. हॉटेल एकदम मस्त होते, प्रशस्त लॉन, भरपूर मोठी जागा आणि आलिशान रूम्स, एकदम आरामशीर. आवरल्यावर थोडे चालून आलो आणि जेवण करून घेतले. तिथे एकदम थंडी होती. तापमान ९ डिग्री पर्यंत असेल आणि उद्या पहाटे काय स्थिती असेल याचा अंदाज सगळ्यांना आला होताच... सूर्यास्त ५.३० ते ६ च्या दरम्यान होत असल्याने अंधार लवकर होत होता. तिथेच काही स्थानिक मिडिया वाले प्रतिनिधी आले होते. त्याचबरोबर फोटो काढून नंतर रात्री ९.३० वाजता झोपी गेलो.

दिवस-७ बदरवास ते झांसी २९.११.२०२४- शुक्रवार

आजचा ७ दिवस आणि जवळपास... किमी अंतर कापले होते, आज पहाटे प्रचंड थंडी होती, ५.३० वाजता सायकल मित्र श्री रामदास कदम यांचा शंखनाद झाल्यावर आम्ही सगळे ऐतिहासिक अशा झांशी शहराकडे निघालो. मी दीपक उमरानकर, मुकुंद पाटे आणि संजय कुच्छे असे चौघे एकत्र निघालो. गारठा प्रचंड असल्याने एक प्रकारे वेगळीच ऊर्जा मला मिळत होती जी मला सायकलिंग करताना फायद्याची होती, ना कोणते जर्किन, की स्वेटर. गार वाऱ्याची झुळूक अंगावर घेत त्याला गोंजारत प्रवास सुरू केला. पुन्हा स्थानिक ठिकाणी नाष्ट्यासाठी थांबलो आणि आलू पराठा आणि पनीर पराठा खाऊन घेतला... रस्त्यावर शिवपुरी गावाजवळ मुख्य रस्त्यापासून ५०० मीटर डावीकडे आतील एक जुनी सुरवाया गढी (किल्ला) बघण्यासाठी थांबलो...प्रशस्त अशी ती वास्तू १००० वर्ष जुनी आहे आणि उत्तम वास्तू कलेचा नमुना आहे. त्यात एक मंदीर पण आहे जे भगवान शंकर यांच्याशी निगडित आहे. थोडा वेळ थांबून ग्रुप फोटो काढून परत मुख्य रस्त्याला लागलो आणि झांशीकडे निघालो. नेहमीप्रमाणे सपाट असल्याने गप्पा मारत...गाणी ऐकत दुपारी १ वाजता जेवण्यासाठी थांबलो. जेवण करून थोड्या वेळाने निघाल्यावर झांशी शहरात आल्यावर रस्त्याची कामे चालू असल्याने वाहतूक कोंडी झाली होती आणि त्या नादात एका ठिकाणी उजवीकडे मुक्कामी ठिकाणी जायचे ते सोडुन पुढे गेलो, बहुतेक वाहतूक कोंडीमुळे समजले नाही. ६-७ किमी पुढे आल्यावर समजले की आपण पुढे आलो आहोत, तिथून २ रस्ते दाखवत होते जे हायवे वरून एक आणि दुसरा जवळून...आम्ही जवळच्या रस्त्याने गेलो आणि क्षणभर पुण्यातील तुळशीबागेत सायकल चालवतोय असा भास झाला. झांसी की गलीया म्हणतात त्या प्रमाणे बारीक, दोन दुचाकी जाईल एवढाच रस्ता, एकतर छोट्या गल्ल्या त्यात पायी चालणारे लोक...दुचाकी गाड्या आम्ही सायकलस्वार..काहीवेळेस सायकलवर उतरून चालत जाण्याची वेळ आली.

शेवटी ४.३० च्या दरम्यान त्या झांसी की गलीया मधून बाहेर पडून ऐतिहासिक अशा झांशी किल्ल्यावर गेलो आणि किल्ल्याची माहिती घेतली व फोटोसेशन करून कियारा ओॲसिस मॅरेज गार्डन येथे मुक्कामी पोचलो. तिथे आवरुन रात्रीचे जेवण करून लवकर झोपी गेलो कारण दुसऱ्या दिवशी २२० किमी अंतर कापायचे होते. थंडी तर खूप प्रमाणात होती.

दिवस-८ झांसी ते कानपुर ३०.११.२०२४- शनिवार

आज पहाटे ३ वाजता उठून ४ वाजता आम्ही प्रचंड थंडीत (तापमान ८-९ असेल) बाहेर पडलो..आज मी बालाजी, दीपक, मुकुंद आणि संजय बरोबर होतो. आज २२० किमी अंतर होते. खरंतर रोजचे १५०-१६० किमी अंतर कापल्याने ८ व्या दिवशी २२० किमी अंतर फारच होते..पण त्याला काही पर्याय न्हवता आणि तो पूर्ण करायचाच असा आम्ही ५ जणांनी प्लॅन केला. पहाटे ४ ते सकाळी ७ पर्यंत जास्तीत जास्त अंतर कापायचे आणि मग थोडा वेळ थांबायचे. त्याप्रमाणे सकाळी ७ ते ७.३० वाजता चहा घेऊन निघालो. रोज दुपारी १२.३० ते १ दरम्यान आम्ही १०० ते ११० किमी अंतर पूर्ण करत असू...पण आज जरा वेगळा निर्णय घेतला..तो असा की दुपारी १ ते २ पर्यंत १६० किमी अंतर पूर्ण करायचेच आणि मग राहिलेले ६० किमी दुपारी ३ ते ६ या वेळेत.

त्या प्रमाणेच आम्ही सायकलिंग करत राहिलो... थोडा वेळ थांबून चहा...पाणी घेऊन निघायचे..असे करत करत बरोबर १ वाजता १५५ किमी अंतर पूर्ण झाले होते... आता भुका लागल्या होत्या.. शेवटी आम्ही एका ढाब्यावर थांबलो आणि जेवण केले... थोड्यावेळ थांबून निघालो कानपुरकडे.... जसजसे कानपुर जवळ येत होत होते तसतसे वाहनांची गर्दी आणि सतत हॉर्न वाजवणारी वाहने अशी संख्या वाढू लागली. गाड्यांचे हॉर्न पण एवढे की पुढे एखादे वाहन नाही, तरीपण मागील वाहन विनाकारण हॉर्न वाजवत जात असे..आणि जड अवजड वाहने पण कमी न्हवती... त्यांचे हॉर्न तर एवढे विचित्र होते की हॉर्न वाजवायची स्पर्धा जर पूर्ण भारतात लागली तर कानपुर शहराचा एक नंबर लागेल आणि म्हणून त्या शहराला कानपुर नाव पडले असेल... म्हणजेच कानातून हॉर्नचे आवाज पुरासारखे वाहत असतील तसेच डावीबाजूने सर्व्हिस रोडने जायचे असल्याने प्रचंड वाहतूक कोंडी... पुलावर जड अवजड वाहने असल्याने तिथं पण वाहतूक कोंडी. आम्ही आपले सर्व्हिस रोडने हळु हळू जात शेवटी सायंकाळी ६ च्या दरम्यान आम्ही ट्विंकल galaxy हॉल येथे पोचलो ते २२० किमी अंतर पार करूनच........

तिथे पोचल्यावर सगळ्यांनी एकमेकांचे अभिनंदन केले कारण सगळ्यात महत्वाचा आणि मोठा किमी टप्पा पार केला होता.. आता उरलेले दोन दिवस अंतर फक्त २२० किमी बाकी होते. रात्री मस्त पैकी जेवण करून झोपी गेलो.

दिवस-९ कानपुर ते लखनौ १.१२.२०२४- रविवार

आजचे अंतर कमी म्हणजेच ९५ किमी असल्याने आम्ही निवांत होतो.. सकाळी उशिरा ६.३० वाजता फ्लॅग ऑफ झाला.. आणि आम्ही निघालो लखनौकडे.. आज २० किमी सोबत कानपुर सायकल क्लबचे काही सायकलिस्ट आमच्या सोबत राईड करणार होते. त्यांनी आम्हांस हायवे मार्गे न नेता कानपुर शहरातून नेले...त्यांच्या सोबत काही फोटो काढून त्यांनी आम्हांस मुख्य रस्त्याला घेऊन आले... तिथंपर्यंतच त्यांची आम्हाला सोबत होती. आम्ही तिथून त्यांचा निरोप घेऊन पुढे निघालो आणि काही क्षणातच आम्हाला आम्ही ज्यासाठी ही सायकल राईड सूरू केली होती तो अयोध्येचा १९९ किमी फलक दिसला आणि फोटो काढून घेतले....आता फक्त १९९ किमी.

सकाळी ८ च्या दरम्यान मी, बालाजी, मुकुंद, दीपक आणि संजय असे एका ठिकाणी नाष्टा करण्यास थांबलो... तिथे पराठ्यावर ताव मारुन निघालो लखनौ कडे... दुपारी १२ च्या दरम्यान लखनौ शहरात पोचल्यावर पुन्हा एकदा वाहतूक कोंडीत मार्ग काढत दुपारी १ च्या दरम्यान जवाहर लाल नेहरू युवा केंद्र लखनौ येथे पोचलो..दुपारी जेवण केल्यावर रूमवर आलो आणि आवरुन त्यानंतर सावरकर विचार मंच लखनौ यांच्या वतीने आम्हा सायकलस्वारांचा सत्कार ठेवला होता त्याठिकाणी गेलो. त्या ठिकाणी दोन बालकांनी संस्कृत मध्ये वेद म्हणले...ते ऐकण्यारखे होते, दोघांची शब्दावर आणि त्या तालावर पकड थक्क करणारी होती. त्यानंतर तेथील उपस्थित मान्यवर यांचे आभार मानून आम्ही परत रुमकडे आलो.

आमचे सायकल मित्र सुशील मोरे हे व्हॉट्सॲप वर सतत आम्हाला प्रोत्साहन देत होते...त्यात त्या दिवशी त्याने सांगितले की लखनौ मध्ये गलौटी कबाब, टुंडे कबाब खाण्यासाठी प्रसिद्ध आहेत ते जरूर खा...मग काय चौकशी केली तर ते नॉन व्हेज साठी आहेत असे समजले.. पण व्हेज पण मिळतील असे समजल्यावर एका व्हेज हॉटेल मध्ये गलौटी कबाबची चौकशी केली आणि मस्त पैकी त्यावर ताव मारत रूम वर आलो आणि रात्री ९ वाजता झोपी गेलो.

दिवस-१० लखनौ ते अयोध्या २.१२.२०२४- सोमवार

पुणे ते अयोध्या सायकल प्रवास..... याज साठी केला होता अट्टहास म्हणण्याचा दिवस उजाडला, आज पहाटे ५ वाजता इमामबडा येथुन फ्लॅग ऑफ झाल्यावर लखनौ शहरातून आम्ही निघालो. आजचा रस्ता पुर्णतः सपाट आणि सरळ होता... त्यामुळे सायकली सुसाट पळवल्या...आज १३५ किमी अंतर होते.. आणि दुपारी १२.३० च्या दरम्यान श्री राम मंदिराच्या १० किमी अलीकडे अयोध्या नगरी में आपका स्वागत हैं असा कमानी फलक दिसला आणि मी बालाजी , मुकुंद, दिपक आणि संजय तसेच आम्ही सर्व सायकलस्वार त्या कमानी जवळ थांबलो. एका ऐतिहासिक ठिकाणी आम्ही १० दिवस प्रवास (१६०१ किमी) करुन आलो होतो तो क्षण शेवटी आलाच... सगळ्यांनी एकमेकांचे अभिनंदन करून आलिंगन दिले आणि शुभेच्छा दिल्या...तसेच घरी ही शुभवार्ता दिल्या गेल्या... त्यानंतर दुपारी जेवण करून सायंकाळी आवरुन श्री राम जन्मभूमी मंदीर पाहायला गेलो.... अवघ्या ३० मिनिटात रामलल्लाचे दर्शन डोळे भरून घेऊन बाहेर आलो...आणि रात्री सायकली ट्रक मध्ये पॅक करून टाकल्या गेल्या...त्या पुण्याला येण्यासाठी...आम्ही मात्र मुक्काम करून ३ तारखेला आयोध्यातून वाराणसीला बस मधून गेलो आणि काशी घाटावर जाऊन गंगा आरतीचे नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी गेलो... त्यानंतर श्री काशी विश्वनाथ मदिर पाहिले आणि रात्री जेवण करून ३ तारखेला पहाटे पुण्याकडे येण्यासाठी वाराणसी रेल्वे स्टेशन कडे रवाना झालो.... अशा तऱ्हेने आमचा पुणे ते अयोध्या प्रवास पूर्ण झाला..

या प्रवासात कानपुर ते अयोध्या दरम्यान एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की रस्त्याने बरेच स्थानिक लोक सायकल चालवत होते आणि बऱ्यापैकी सायकलची दुकाने ही जागोजागी दिसत होती, त्याचे खूप अप्रुप वाटत होते....तसेच सपाट आणि प्रशस्त रस्ते (काही अपवाद वगळता) ज्यामुळे सायकलिंग करणे सोपे जात होते...फक्त कमतरता याची जाणवली की हॉटेलची संख्या हायवेच्या मानाने कमीच दिसत होती.

या संपुर्ण प्रवासात सायकलचे शतःश आभार.. जिला फार पळवली नाही, की जास्त ताण दिला नाही त्यामुळेच तीने न कुरकुरता, न रुसता.. अखंड १६०० किमी रस्त्यावर पळाली, जराही थोडीशी न बसता... त्यानंतर बायकोचे आभार. जिच्यामुळे मी बिनधास्त राईड करु शकलो...आई वडील, मुलगा मुलगी.... समस्त नातेवाईक...कॉलेज मित्र परिवार... ऑफिस मधील सहकारी आणि सर्व सायकल मित्र यांचे खूप खूप आभार.. ज्यांचा संपूर्ण पाठिंबा व्हॉट्सॲप द्वारे मिळत होता. तसेच पुणे ते अयोध्या ही सगळ्यात माझी मोठी लांब पल्ल्याची एकूण १६०१ किमी सायकल राईड झाली, याआधी पुणे ते कन्याकुमारी एकूण १५८५ किमी झाली होती. म्हणजेच मीच माझा लांब किमीचा सायकल प्रवास फक्त १६ किमीने मोडला होता... खरचं आपणच आपले विक्रम मोडीत काढण्याचा आनंद काही वेगळाच असतो की जो आपले सामर्थ्य, जिद्द, चिकाटी आणि आपल्यातील क्षमतेचा सक्षम भक्कम पुरावा असतो की जो आपल्याला काहीतरी वेगळेच, नवीन करून दाखवण्याची स्फुर्ती देत असतो.

तसेच ह्या संपूर्ण १० दिवसात रोज सायंकाळी सायकलिंग करून मुक्कामी पोचल्यावर आवरुन मी बालाजी, मुकुंद, दीपक आणि संतोष नखाते आम्ही १-२ किमी तरी पायी चालून येत असे... त्यामुळे पाय मोकळे आणि स्नायु Relax होत होते...त्याचा पण खुप फायदा संपूर्ण प्रवासात झाला.

यावेळेस पण सलग ४ थ्या वर्षी एकही वेदनाशामक गोळ्या न वापरता, Move स्प्रे न मारता, अथवा कोणतीही वेदना न होता हा संपूर्ण सायकल प्रवास झाला. दरवर्षी मोठ्या राईडला जाण्याआधी मेडीकल मधून साहित्य घेत असे, पण त्याचा वापर कधीच झाला नाही...परत ते साहित्य मेडीकल मधे परत केले जाते... याचे श्रेय हे खरंतर रोजच्या रोज थोडे थोडे ऑफिससाठी सायकलचा वापर आणि लांब सायकल प्रवासात जास्त सायकल न पळवता गुडघ्यावर जास्त ताण न देता निवांत पेडल मारणे आणि रमत गमत सायकलिंग करणे यासाठी देता येईल.

तसेच सर्व IAS कोअर कमिटी, hydration point चे सोबती, अयोध्या राईड मधील सर्व सायकल सोबती... ज्यांच्या सोबत गप्पा मारत... गाणी म्हणत रोजचा दिवस पूर्ण जात असे....तसेच मुख्यतः आणि शेवटी गजानन खैरे सर, अजित पाटील सर आणि भुजबळ साहेब यांचे मानावे तेवढे कमीच आभार आहेत...जे संपूर्ण प्रवासात सतत पुढील अपडेट्स देत होते... रोजच्या रोज आमची काळजी घेत, सगळ्यांना काळजीपूर्वक सूचना देत, सतत आजच्या पेक्षा उद्याचा दिवस किती चांगला जाईल याच्या विचारात असणारे हे तिघे....खरचं त्यांना आमच्या सर्व सायकलस्वारांकडून मानाचा मुजरा...

आयुष्यात पुन्हा सायकल घेऊन इतका सायकल प्रवास होईल याची स्वप्नातपण कधी कल्पना केली नसेल, खरंतर ऑफिस मध्ये Cycle 2 Work ही संकल्पना एन्प्रो इंडस्ट्रीज कंपनीचे मालक करकरे सर, करकरे मॅडम आणि अनुज सर यांनी आणली आणि त्यामुळे सायकलवरून भ्रमंती करण्याची संधी मिळाली त्यामुळे त्यांचे पण खुप खुप आभार...

भेटू पुन्हा अशाच कोणत्या तरी सायकल राईडला... तोपर्यंत सायकल चालवा आणि फिट राहा

अभय खटावकर
Commuter Cyclists
शतकवीर रक्तदाता

प्रतिक्रिया

वामन देशमुख's picture

19 Dec 2024 - 12:23 am | वामन देशमुख

महान सायकल प्रवास पूर्ण केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. निवेदन शैली आवडली, अजूनही अनुभव वर्णन येऊ द्या.

कधी मीही तुमच्यासारखीच सायकल चालवू शकेन अशी इच्छा आहे.

(केवळ दिवास्वप्नात सायकल चालविणारा) द्येस्मुक् राव

कंजूस's picture

19 Dec 2024 - 5:01 am | कंजूस

अभिनंदन.

सायकलींगचा वर्णन धागा बऱ्याच महिन्यांनी मिपावर आला.
रूट ट्रेसिंगचा फोटो टाका. इतरही फोटो असावेत.

मुक्त विहारि's picture

19 Dec 2024 - 7:09 am | मुक्त विहारि

खूप मोठा पल्ला पार केलात...

जमल्यास काही फोटो पण टाका.

चंद्रसूर्यकुमार's picture

19 Dec 2024 - 10:16 am | चंद्रसूर्यकुमार

अरे वा. हार्दिक अभिनंदन.

इतके अंतर सायकलवरून पार करायला जबरदस्त फिटनेस हवा. दररोज बदलणारे पाणी, प्रत्येक ठिकाणचे खाणे वेगळे, अपुरी झोप असे सगळे असताना इतके दिवस हा प्रवास करणे ही नक्कीच सोपी गोष्ट नाही. हा मोठा पल्ला पार केल्याबद्दल आणि त्यासाठी गरजेची असलेली फिटनेस लेव्हल ठेवल्याबद्दल खरं सांगायचं तर तुमचा हेवा वाटतो. असो. प्रवासाचे वर्णन आणि लेखनशैली आवडली. फोटो असते तर आणखी मजा आली असती.

आपल्या मिपावरील एक फिटनेस प्रेमी व्यक्तिमत्त्व, मिपाचे चालक आणि तांत्रिक भाग सांभाळणारे मा. प्रशांतशेठ हे देखील हल्लीच अयोध्येपर्यंत सायकल राईड करून आले. त्यांच्या चिकाटी आणि धाडसास सलाम. लगे रहो ...

खुप जबरदस्त!मिपा चालक प्रशांतशेठ यांची ही सफर स्ट्राव्हावर फॉलो करतच ह़ोते.भारीच!

चौथा कोनाडा's picture

19 Dec 2024 - 8:09 pm | चौथा कोनाडा

असली धाडसं करणारी मंडळी मला देवासमान आहेत _/\_

सुंदर लिहिलंय .... आपलं कौतुक वाटतं .. हार्दिक अभिनंदन !

विवेकपटाईत's picture

20 Dec 2024 - 11:59 am | विवेकपटाईत

अभिनंदन. प्रवासी लोकांच्या धाडसाचे कितीही कौतुक केले तरी ते कमीच.

नि३सोलपुरकर's picture

20 Dec 2024 - 12:24 pm | नि३सोलपुरकर

दंडवत _/\_

जय श्रीराम .