चटणी-लोणचे हे प्रकार मुख्यत्वे तोंडी लावण्याचे प्रकार. अनेकांना रोजच्या जेवणात ह्यापैकी एक काहीतरी लागतेच. मला ह्या दोन्ही गोष्टींचे फारसे कौतुक नाही. मुगाची खिचडी असेल तर शेंगदाण्याची किंवा लसणाची चटणी, साबुदाण्याच्या थालीपीठाबरोबर लिंबाचे गोड लोणचे आणि भाजणीच्या थालीपीठाबरोबर हिरव्या मिरचीचे, इतकीच माझी माफक आवड आहे. वर्षभर घरात असतात त्या कैरी / लिंबू वगैरे लोणच्यांच्या वाटेला मी जात नाही. चटण्यासुद्धा थोड्या हटके - म्हणजे जवस, कारळे आवडतात, पण क्वचित.
मध्यंतरी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर घरी देवासमोर नारळ फोडला. फोडलेला नारळ खवण्यासाठी कोकोनट स्क्रॅपर नव्हता. इकडे मस्कतला खवलेला ओला नारळ मॉलमध्ये रेडिमेड मिळतो. त्यामुळे घरी नारळ आणून खवणे प्रकार नाही. फोडलेल्या नारळाचे काय करावे ते ठरत नव्हते, म्हणून बिचारा ५-६ दिवस फ्रीजमध्ये 'गपगार' पडून होता. इतके दिवस फ्रीजमध्ये असल्याने धड ओला नाही आणि धड सुका नाही अशी अर्धवट अवस्था झाली होती. लसणाच्या चटणीला एरव्ही आपण सुके खोबरे वापरतो. ह्या अर्धवट अवस्थेतल्या नारळाची चटणी बरी लागेल, असा विचार करून त्याचे बारीक तुकडे कापले. लसणाच्या तीन-चार पाकळ्या आणि तिखट आणि 'चवीपुरते मीठ' घालून मिक्सरमध्ये जाडसर फिरवून घेतले. माझ्या आईने कांद्याची चटणी केली होती, त्यात खोबरे-लसूण घातले होते, ते आठवले. मग ह्या मिश्रणात एक छोटा कांदा घालून जाडसर फिरवून घेतला. मग कढईत ५-६ चमचे तेल आणि मोहरी तडतडल्यावर थोडे हिंग आणि मिक्सरमधील ऐवज घालून २ मिनिटे परतला. ही चटणी ओलीही नाही आणि खडखडीत कोरडीही नाही अशी मध्यम ओलसर ठेवली.
चटणी पाहून तोंडाला पाणी सुटले. मग दुसऱ्या दिवशी दुपारच्या जेवणाला चक्क 'चटणी-भाकर' असा गरिबांचा बेत केला. ज्वारीची गरम भाकरी, त्यावर रवाळ तूप आणि बाजूला ही ओलसर चटणी फारच अप्रतिम लागली. ह्याउपर काहीही नको. फक्त जेवणानंतर ताक आणि तासभर 'चैन कि नींद’.
अर्धवट ओल्या नारळामुळे आणि एक छोट्या कांद्यामुळे चव आणि ओलसरपणा एकदम योग्य आला होता. त्यामुळे वरून वेगळे तेल किंवा दही घालायची गरज वाटली नाही. तुम्हाला थोडेसेसुद्धा तिखट झेपत नसेल, तर दही घालू शकता. पूर्वी गरिबांना भाजी वगैरे 'चैन' परवडायची नाही, त्यामुळे नुसती कांदा आणि चटणी-भाकरी खाऊन राहायचे. अशी चटणी असेल तर भाजीची गरजच नाही.
संत सावता माळी म्हणतात, "कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी".. तसे ही खमंग चटणी-भाकरी खाऊन 'लसूण कांदा भाकरी, अवघा झाला माझा हरी' म्हणायला हवे.
अगदी पूर्वी मी पुण्यात टिळक रोडवरील 'जयश्री पावभाजी' येथे काही लोकांना पावभाजीबरोबर 'कडक पाव आणि लसणाची चटणी' खाताना पाहिलेय. बेळगावमध्ये 'चटणी टोस्ट' हा प्रकार प्रसिद्ध आहे, मात्र ती फुटाण्याची चटणी असते. नुकतीच बनवलेली लसणाची चटणी अमूल बटर लावून पॅनमध्ये पाव कडक होईपर्यंत भाजून हा 'चटणी टोस्ट' कमाल लागेल, असे वाटतेय. मात्र ह्या चटणीची सर्वात कातिल चव वडापावबरोबर लागेल. पुढच्या वेळी हा विषय करून बघितला पाहिजे.
~ सरनौबत
विशेष टिपा -
कढईत दोन मिनिटे परतल्यावर गॅस बंद करून चटणी लगेच दुसऱ्या भांड्यात काढून घ्यावी, अन्यथा कढईच्या उष्णेतेने कोरडी होते.
कांदा असल्याने ही चटणी तीन-चार दिवसच टिकते, त्यामुळे त्या प्रमाणातच करावी.
प्रतिक्रिया
31 Oct 2024 - 3:08 pm | पाषाणभेद
चटणी छान झालेली दिसते आहे.
31 Oct 2024 - 5:42 pm | कंजूस
झणझणीत.