दिवाळी अंक २०२४ - आमचं स्टेकेशन

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in दिवाळी अंक
31 Oct 2024 - 6:00 am

अचानक एक दिवस गृहमंत्र्यांनी सूचित केलं की स्वयंपाक घरात मोठी डागडुजी व फेरबदल करणं आवश्यक आहे. एकदा एक विषय बायकांच्या डोक्यात आला की तो सहसा विसरला जात नाही. मग एक दिवस आमच्या आंतरसजावटकार वजा कंत्राटदाराला पाचारण केलं. किरकोळ दुरुस्तीमध्ये कुणाला फारसा रस नसतो, मात्र तोडफोड नूतनीकरणासाठी सगळे एका पायावर तयार.

साहेब दुसऱ्या दिवशी हजर झाले. उत्साहाने गृहमंत्र्यांनी स्वयंपाकघराची चर्चा सुरू केली. बराच वेळ चर्चा आणि मोजमापं झाल्यावर साहेब म्हणाले, "करायचं तर सगळ्या ट्रॉल्या नव्या करता येतील, काही खणांमध्ये फेरबदल करता येईल." मग त्या हुशार इसमाने माझ्या बायकोच्या सूचनांची तारीफ करत हळूच सूतोवाच केलं की असं अर्धवट काम करण्यात मजा नाही, पैसा खर्च होईलच, पण तरी चकाचक दिसणार नाही आणि जर नंतर पुनर्रचना करायची, तर आत्ता केलेला खर्च वाया जाईल. त्यापेक्षा एकदाच सगळे ओटे पाडून लाकूडकाम तोडून सगळं नवीन करणं हेच इष्ट!

तो गेला आणि आम्ही समजून चुकलो की किमान एखाद-दीड महिना तरी जाणार. पाठोपाठ लक्षात आलं की बेडरूममध्ये, बाथरूममध्ये नूतनीकरणासाठी आपण त्रास सहन केला, पण बिऱ्हाड हलवायला लागलं नव्हतं. खर्चापरी खर्च आणि वर गैरसोय. आता स्वयंपाकघर सगळं उचकटून पुन्हा बांधायचं म्हणजे इथे राहता येणार नाही! हे जरा कठीण होतं. सगळा बाडबिस्तरा बांधायचा, हलवायचा, दुसरीकडे लावायचा आणि काम संपल्यावर तोच सगळा उपद्व्याप पुन्हा करायचा. पुन्हा दुसरीकडे जायचं तरी इथे खेटे घालावे लागतीलच. त्यापेक्षा नकोच तो उपद्व्याप.
काय करावं असा विचार करत असताना अचानक आठवलं की आमच्याच इमारतीत पहिल्या मजल्यावर एक फ्लॅट आहे, जो बहुतेक बंदच असतो. त्या सद्गृहस्थांनी भाडेकरू ठेवले नव्हते. मालक ओळखीचे होते, आमच्याच संकुलात राहत असल्यामुळे ओळख होतीच. मग त्यांना भेटून गळ घातली. त्यांनी अल्पकाळ गरज आहे म्हणताना जागा देऊ केली. हे बरं झालं, फार हलवाहलवी नाही, शिवाय काम सुरू झाल्यावर घरी रोज चार चकरा सहज मारता येतील.चला, आता बांधाबांध आली.

जायचं म्हणताना डोक्यात पोपटांचा आणि चिमण्यांचा विचार आला. त्या रोजच्या पाहुण्यांना मुकावं लागणार होतं. काय करणार? नाइलाज होता.

पोपट सकाळी काचा सरकवायची वाट पाहत उभे असायचे आणि एकीकडे आरडाओरड सुरू करायचे.

पाठोपाठ चिमण्यांचा चिवचिवाट.

गंमत म्हणजे पोपटांनी फोडलेल्या सूर्यफुलाच्या बिया खायला ते जाताच चिमण्या यायच्या आणि चिमण्यांचे तांदूळ पोपट खायचे. पोपटांचा डबा कठड्याच्या बाहेर, तर चिमण्यांची छोटी वाटी आतल्या बाजूला. कबुतरं येऊ नयेत म्हणून कठड्याला जाळी लावली होती. चिमण्या सहज उडून आत यायच्या, पण पोपट वा कबुतरं इतकी धीट नव्हती. मग हुशार पोपटांनी ती जाळी बरोबर वाटीच्या जवळ कुरतडून, खाण्यासाठी डोकं आत घालायला मार्ग केला होता.

कंत्राटदाराची घाई सुरू झाली, 'आत्ता सगळी माणसं हातात आहेत, एकदा गणपती बाप्पा गेले की दसरा-दिवाळीची कामं सुरू होतील, मग कारागिरांना भाव चढतो, फुरसत नसते..' अखेर आम्ही सामानाची बांधाबांध सुरू केली आणि खाली पहिल्या मजल्यावर दाखल झालो. सामान उचलायला माणसं असली, तरी आमची दगदग झाली. सगळं सामान पसरलं होतं, ते लागेपर्यंत रात्री साडेबारा वाजून गेले. जागा नवीन असली तरी पटकन झोप लागली.

सकाळी उठून चहा घेताना बाहेरचा पडदा सरकवून काचा उघडल्या आणि बघतो तर समोरचं लाल तुऱ्याच्या फुलांचं झाड (पावडर पफ - मराठी नाव सापडलं नाही) चिमण्यांनी बहरलं होतं.

Tree

चिवचिवाट जोरदार होता. मला फार आनंद झाला. वरच्या मजल्यावरून पक्षी बघणं आणि इतक्या जवळून बघणं यात फरक होता. मग त्या चिमण्या आणि त्यांच्या हालचाली बघत बसायचा छंद जडला. जबरदस्त टाइमपास.

कधी अनेक चिमण्या जा-ये करताना दिसायच्या. कधी त्या विखुरलेल्या असायच्या, तर कधी सभेला आल्यागत, तर कधी गहन चर्चा करत असल्यासारख्या.

meeting

मात्र सतत चळवळ सुरू. सकाळी उठून आळस झटकून अंग फुलवून पिसारा सारखा करताना पाहायला मजा यायची. आजकाल सर्वत्र चिमण्या कमी झाल्याचं वाचायला, ऐकायला मिळतं. पण या बाबतीत मी भाग्यवान. तशा चिमण्या रोजच येतात, पण तांदूळ टिपायला जा-ये करतात. इथे मात्र बराच वेळ चिमण्या वावरत असायच्या. कधी चिमण्या एकत्र जमायच्या आणि मध्येच एकसाथ सगळ्या उडून जायच्या.

चिमण्या जवळच्या वाटायचं एक कारण म्हणजे लहानपणी ऐकलेल्या कथांमध्ये रंगवलेली चिऊताईची प्रतिमा - सालस, भोळी, प्रसन्न, कुणाला त्रास न देणारी अशी. कुतूहलापोटी मी एकदा भारतात कुठल्या प्रकारच्या चिमण्या आढळतात याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मिळालेल्या माहितीनुसार भारतात हाउसहोल्ड स्पॅरो, स्पॅनिश स्पॅरो, सिंद स्पॅरो, युरेशियन स्पॅरो या जातींच्या चिमण्या आढळून येतात. जरा बारकाईने पाहिल्यावर लक्षात आलं की माझ्या परिसरात असलेल्या बऱ्याचशा चिमण्या या घरगुती चिमण्या होत्या, तर काही युरेशियन चिमण्या होत्या.

जागा नवीन, त्यात पुन्हा बरेच दिवस वावर नाही त्यामुळे इलेक्ट्रिशिअन, इंटरनेटवाला, प्लंबर यांचा पाठलाग आणि कामं करून घेणं चालूच होतं. शिवाय स्वयंपाकघरातील वस्तू आणि पदार्थ नेहमीपेक्षा अगदीच वेगळ्या जागी म्हणताना मेमरी गेम खेळावा लागत होता. पण या गोंधळात चिमण्या हा मोठा विरंगुळा होता. कुणाला हा आचरटपणा किंवा नादिष्टपणा वाटेल, पण रोज दिसत असलेल्या चिमण्या पाहायला मला आवडतं. काही जण रोज बटाट्याची भाजी खातात, तसं. या चिमण्यांची अनेक रूपं दिसली.

arch

कधी एखादी चिऊ कुणाचीतरी वाट पाहत असल्यासारखी दिसायची.

wait

लहानपणी गवताच्या टोकाला आलेल्या बियांना 'चिमणीचे पोहे' म्हणायचो. एकदा चिमण्यांचा थवा तारेच्या कुंपणावर चिमणीचे पोहे खाताना दिसला.

एकदा चार-पाच चिमण्या जणू सीसॉ खेळत असल्यासारख्या दिसल्या.

एकदा चिमण्यांनी फांद्या भरलेल्या असताना अचानक सोसाट्याचा वारा आला आणि चिमण्यांची तारांबळ उडाली.

पावसाचे दिवस होते, आषाढ-श्रावणाचा कालखंड. मध्येच दणकून पाऊस यायचा. चिमण्या काही वेळ तशाच पावसात झाडावर बसून राहायच्या, जोर वाढला की उडून जायच्या. भिजून झालं की फांदीवर बसून फडफडाट करून मान भिरभिर फिरवून अंग कोरडं करायच्या. आधी पोपटांना पावसात भिजताना पाहिलं होतं, पण चिमण्यादेखील आवडीने पाऊस अंगावर घेतात, हे पाहिलं नव्हतं.

असा पाऊस पडून गेल्यावर पानावरचे जलबिंदू हिऱ्या-मोत्यांगत लखलखायचे.

pearls


pearls



red

एकदा बुलबुल आणि चिऊ एकत्र खेळताना दिसले पोपटांना

शहरातील गजबजाटात आणि दाटीवाटीने उभ्या राहिलेल्या इमारतीच्या तटबंदीत पक्षी वसतील अशी जागा दुरापास्त. पण कुणीतरी कुठेतरी पाचपन्नास वर्षांपूर्वी लावलेली झाडं उंच वाढतात, डेरेदार होतात आणि अनेक पक्षी तिथे मजेत राहतात. आमच्या परिसरात खंड्या, हळद्या, वेडा राघू, तांबट, दयाळ, शिंपी, बुलबुल, कोतवाल, कोकीळ, देवकावळा, पोपट, पहाडी पोपट असे अनेक पक्षी दिसतात. काही रोज, तर काही अधूनमधून, तर काही मोसमानुसार. मात्र चिमण्यांसारखा त्यांचा वावर नसतो. याला अपवाद पोपटांचा. मी चिमण्यांच्या संदर्भात लाल तुऱ्याच्या फुलांच्या झाडाचा (powder puffचा) उल्लेख केला, तेव्हा पोपटांचा वावर अनिवार्य. चिमण्यांना न जुमानता पोपट महाशय त्यांची आवडती फुलं खायला आवर्जून येतात.

या चिमण्यांच्या अनेक छब्या टिपल्या

school



meditation


bachce



riding the wiper


grace



ascending


framed



gaze


focussed


हळूहळू घराचं काम संपत आलं होतं. पुन्हा आवराआवर, बांधाबांध. परत घरी जायची ओढ होती, पण चिमण्यांचा दंगा असा पाहायला मिळणार नाही, याची चुटपुट लागून राहिली होती. नाइलाज म्हणून दुसऱ्या जागेत राहायला आलो होतो, पण आता तेही आपलं वाटायला लागलं होतं. दोन महिने कसे गेले समजलं नाही. आणि अचानक डोक्यात आलं की हे तर चक्क स्टेकेशन! नाही तर काय? घरात नाही, पण घरापासून दूर नाही. बघण्यासारखं खूप काही बघायला मिळालं. प्रत्येकाला आयुष्यात कधीतरी थोडा बदल लागतो आणि तो अनपेक्षितपणे मिळाला. असं स्टेकेशन प्लॅन करूनही कदाचित जमलं नसतं.

जागा सोडून परत आपल्या घरात आलो. अवजड सामान ठेवून कामगार निघून गेले. येऊन पडलेल्या खोक्यांवर आणि सामानावर नजर गेली आणि आम्ही खळखळून हसलो.. उद्यापासून काही दिवस पुन्हा मेमरी गेम खेळायचा आहे!

प्रतिक्रिया

चौकस२१२'s picture

31 Oct 2024 - 12:52 pm | चौकस२१२

हे तर चक्क स्टेकेशन!?
ओह..... म्हणजे वेगळ्या जागी "रात्र ( किंवा दिव शी ) "गेम खेळता" आले म्हणून जी काय खुमारी आली असेल ती होय?
बाकी शहरातील पक्षांबद्दल माहिती चांगली मिळाली