दिवाळी अंक २०२४ - महत्त्व शृंगार साहित्यातील 'ती'च्या 'पूर्वानुमती'चे

माहितगार's picture
माहितगार in दिवाळी अंक
31 Oct 2024 - 6:00 am

महत्त्व शृंगार साहित्यातील 'ती'च्या 'पूर्वानुमती'चे

साहित्य आणि गायन-नाट्यादी कलाक्षेत्राबरोबरच शृंगार हा प्रत्यक्ष मानवी जीवनातील एक अनन्यसाधारण महत्त्वाचा रस आहे. साहित्य आणि कला मानवी जीवनाचा आरसा असतात. वास्तव आणि काल्पनिक मृगजळ या दोन्हीचीही साहित्यिकाकडून निर्मिती होत असते. प्रणय आणि कामुक साहित्याला सरसकट विरोध आहे असा अर्थ नाही. माझ्याही 'सजणूक दे फुलोर्‍याची' किंवा इतर कविता मिपावर आहेतच. अभिव्यक्तिस्वातंत्र्य सर्वसाधारणपणे अधिकतम असावे, असेच माझे मत आहे.

साहित्यातील काल्पनिक मृगजळाचा मानवी मनांवरील प्रभाव प्रशिक्षित मार्केटिंगला मागे टाकेल एवढा प्रबळ असल्याचे असंख्य वेळा दिसून येते. या काल्पनिक मृगजळात साहित्यिकांनी उभ्या केलेल्या शृंगाराचाही किती मोठा वाटा आहे, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही.

एखादी स्त्री लाजते, हसते, अमुक-तमुक प्रकारे सजते किंवा कपडे परिधान करते, म्हणजे तिची प्रणय-शृंगाराला किंवा लैंगिक संबंधांना आपोआप अनुमती आहे, अशा स्वरूपाचे बरेच साहित्य प्राचीन काळ ते अद्याप प्रसवले गेले आहे. एखादी स्त्री लाजते, हसते, अमुक-तमुक प्रकारे सजते किंवा कपडे परिधान करते, ती तसे स्वतःला बरे वाटावे किंवा ती ज्याच्यासाठी सजली आहे ते तुम्ही आहात हे गृहीत धरणे बरोबर नाही, याचा साहित्यातून उल्लेख करण्याचे बहुतेकदा राहून जाते. आपल्याला आवडलेल्या स्त्रीच्या आनंदात आनंद आणि तिचा नकारही तिचा आनंद म्हणून पचवण्याचे सामर्थ्य असलेला समर्थ पुरुष साहित्याने उभा केल्यास मानवी जीवन दिवाळीच्या दिव्याप्रमाणे उजळून जाऊ शकते.

पूर्वानुमती नसलेला शृंगार हा शृंगार या व्याख्येस पात्र असतो की 'जबरदस्ती' या व्याख्येस पात्र असतो? पण अगदी प्राचीन साहित्य ते सद्य साहित्यात कथित शृंगार रंगवताना बर्‍याच वेळा रंगवलेल्या पात्राची केवळ शृंगारास पूर्वानुमती दाखवण्याचे राहून जाते असे नाही, तर अनुमती नसलेल्या कथित शृंगाराचे (जबरदस्तीचे) सामान्यीकरण आणि उदात्तीकरणही होताना दिसते. पूर्वीच्या साहित्यात झाले ते झाले; पण सद्य साहित्यातही केवळ पुरुष लेखकांकडूनच नव्हे, तर स्त्री साहित्यिकांकडूनही या मुद्द्याकडे दुर्लक्ष होताना दिसते, अगदी मिसळपाववरचे काही साहित्य या गटात मोडू शकेल. बरेच काही कामुक लेखन हे काठावरचे असते, यात प्रणयरत पात्राची पूर्वानुमती आहे किंवा नाही हे सांगणे कठीण असते. साहित्यिकांनी केवळ प्रबोधनपूरक साहित्य लिहावे असे नाही. त्यांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा आदर आहेच. पण आपले स्वतःचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य महत्त्वाचे असते, तसे स्त्रियांचेही अभिव्यक्तिस्वातंत्र्य महत्त्वाचे असते, हा संस्कार साहित्यिकांनी स्वतःवर केला, तर तो त्यांच्या साहित्यातही नैसर्गिकपणे उमटू शकेल.

ज्या शॄंगार साहित्याने पूर्वानुमती असल्याचे दाखवले नाही किंवा अनुमती नसलेल्या शृंगाराचे सामान्यीकरण किंवा उदात्तीकरण केले, त्यावर लगेच बंदी आणावी असे नाही, कारण बंदी आणलेले साहित्य लपूनछपून वाचण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. कोणत्याही साहित्यावर बंदी आणण्यापेक्षा कोणत्याही साहित्याबद्दलची टीका त्या साहित्याबरोबरच प्रकाशित करण्याचे बंधन अधिक श्रेयस्कर असावे, जेणेकरून साहित्याच्या शक्य मर्यादांबद्दल वाचक सजग राहून अधिक चांगला समाज घडवण्यात साहित्यिकांना सहभाग नोंदवता येईल. या मुद्द्याबद्दल साहित्यिकांबरोबरच साहित्य समीक्षक, प्रसार माध्यमे आणि प्रतिसादकर्ते यांच्यामध्येही जागरूकता आणली, तर समाज अधिक जागरूक आणि सुऱक्षित करणे कठीण नसावे.

समस्त मिपा लेखक, वाचक संपादक आणि मिपा मालक महोदयास दीपावलीच्या आणि नूतन वर्षाच्या खूप शुभेच्छा!

प्रतिक्रिया

जरा नीरस झालाय. थोडी उदाहरणे दिली असती तर आणखी रोचक झाला असता लेख.

बाकी, साहित्यावर बंदी हे तर अमान्यच आहे पण त्या साहित्याची टीका त्यासोबत प्रकाशित करावी हे बंधन सुद्धा अमान्य आहे. असे केल्यास सेन्सरशिप फोफावण्यास वेळ लागणार नाही.

शृंगार साहित्यात माफक रंगवणं थोडं अवघडच.

कधी अती होतं तर कधी सपक. सर्व लेखकांना सर्व रस सहज पिता येत नाहीत. काहींच्या मानगुटीवर अगोदरच सेन्सॉरचे भूत बसवून घेतलेलं असतं.

प्रसाद गोडबोले's picture

31 Oct 2024 - 6:07 pm | प्रसाद गोडबोले

कसलं बाष्कळ आणि भंपक लिहिलं आहे हे . श्या .

आपल्याला आवडलेल्या स्त्रीच्या आनंदात आनंद आणि तिचा नकारही तिचा आनंद म्हणून पचवण्याचे सामर्थ्य असलेला समर्थ पुरुष साहित्याने उभा केल्यास मानवी जीवन दिवाळीच्या दिव्याप्रमाणे उजळून जाऊ शकते.

बेकार हसतोय. =))))

तुम्हाला शृंगार प्रणय मधील काहीतरी अ ब क ड तरी कळत असावे का अशी शंका यायला लागली आहे !

असो. बाकी दिवाळीच्या सणाच्या मुहुर्तावर जास्त बोलत नाही.

हॅप्पी दिवाली.