दिवाळी अंक २०२४ - माझ्या मराठीचे बोल कौतुके

भूषण सहदेव तांबे's picture
भूषण सहदेव तांबे in दिवाळी अंक
31 Oct 2024 - 6:00 am

माझ्या मराठीचे बोल कौतुके

ओळखलेत ना मला? होय, मी मराठी बोलतेय. तुमचीच मायबोली, महाराष्ट्राची पारंपरिक भाषा. ज्या भाषेवर सर्वच मराठी भाषक तसेच अमराठी भाषक लोकांनीसुद्धा आजवर भरभरून प्रेम केले. श्रेष्ठ-कनिष्ठ, कलाकार-क्रीडापटू, साहित्यिक-शिक्षक, अधिकारी-कामगार, विद्यार्थी-तरुण, राजकारणी-समाजसेवक या सर्वच स्तरांवरून माझ्यावर आजवर जे प्रेम केले, त्याबद्दल तुम्हां सर्वांचे खूप खूप आभार.

'मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्रधर्म वाढवावा'
'आहे तितुके जतन करावे, पुढे आणिक मेळवावे'
'महाराष्ट्र राज्य करावे जिकडेतिकडे'

ही वाक्ये जरी ऐकली, तरी अंगावर काटा येतो, एवढे शक्तिवान आणि सामर्थ्यवान माझे शब्द आहेत आणि हे सर्व शक्य आहे ते फक्त आणि फक्त तुमच्या प्रेमामुळे आणि तुमच्या आदरामुळे. रामदास स्वामी शिवकाळात महाराष्ट्राला मिळालेले थोर संत. वर्तमानाचा व भविष्याचा वेध घेऊन आपले मत परखडपणे मांडणारे संत. इतर संत फक्त भक्ती व अहिंसक मार्गावरून चालणारे होते. पंरतु रामदासांनी परिस्थितीप्रमाणे कसे वागावे हे शिकवले. मराठी भाषा आणि मराठी माणसे यांची नाळ जोडली गेली ती फार वर्षांपूर्वीच. संत, शिवकालीन काळ, साहित्यिक काळ या सर्व काळांपासून मराठी भाषा आजही प्रगतिपथावर आहे आणि त्यासाठी ऐतिहासिक वारसा हा एक भक्कम पुरावा आहे. आजवर मराठी भाषक महान व्यक्तिमत्त्वांनी वेगवेगळ्या स्तरांवर आपले अमूल्य योगदान दिले आणि स्वतःबरोबरच मला (मराठीला) एका उच्च स्तरावर नेऊन ठेवले. त्यापैकी काही निवडक उदाहरणे पुढीलप्रमाणे -

१. स्वराज्याची स्थापना करणारे पहिले शूरवीर - छत्रपती शिवाजी महाराज
२. भारताची राज्यघटना लिहिणारे महामानव - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
३. पहिली शाळा काढणारे थोर समाजसुधारक - महात्मा जोतिबा फुले
४. पहिली महिला शिक्षिका - सावित्रीबाई फुले
५. पहिली महिला राष्ट्रपती - प्रतिभाताई पाटील
६. पहिली महिला सुप्रसिद्ध गायिका - लता मंगेशकर
७. पहिले महासंगणक निर्माते - डॉ. विजय भटकर
८. पहिला चित्रपट निर्माते - दादासाहेब फाळके
९. क्रिकेटमध्ये १० हजार धावा करणारा पहिला खेळाडू - सुनील गावसकर
१०. पहिली महिला चिकित्सक - डॉ. आनंदीबाई जोशी

खरेच, खूप अभिमान वाटतो मला, जेव्हा यांसारखे दिग्गज लोक आपले नाव मोठे करतात, त्याबरोबरच मराठी संस्कृतीलासुद्धा त्या उच्च स्तरावर नेतात. त्यांच्या कर्तृत्वाचे नक्कीच माझ्या मनामध्ये नेहमीच कौतुक असेल.

बाकी उरले ते म्हणजे काही कडवट अनुभव. प्रत्येक गोष्टीला सकारात्मक तसेच नकारात्मक दृष्टीकोन असतात, तसेच माझ्याही बाबतीत आहे. खूप दिवसांपासून मनामध्ये एक खंत आहे, ती म्हणजे काही लोक मराठी भाषक असूनसुद्धा हिंदीत किंवा इंग्लिशमध्येच संवाद साधतात. फक्त त्यांचे स्टेटस जपण्यासाठी आणि स्वतःचा मान समाजात स्थिर राखण्यासाठी. असो. आणखी एक गोष्ट म्हणजे एका मुलीला हिंदी चित्रपटसृष्टीत चित्रपटासाठी ऑडिशन द्यायची होती. ऑडिशनच्या आधी तिने तिचे नाव बदलले. कारण जर तिने स्वतःचे आडनाव आगरकर असे सांगितले असते, तर समोरच्या डायरेक्टरला लगेच कळेल असते की ही मराठी भाषक आहे आणि त्यामुळे तिचा अभिनय सुंदर असूनदेखील तो तिला रिजेक्ट करू शकला असता. याच एका भीतीने तिने चक्क स्वतःचे आडनाव आगरकरवरून शाह असे करून घेतले. किती दुर्दैवाची बाब आहे ही ? एका चित्रपटात काम मिळावे म्हणून स्वतःचे आडनाव बदलून घेणे!

बाकीच्या राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात कोणत्याच भाषेची सक्ती केली जात नाही. कारण येथे सर्व धर्म-पंथांचे लोक वास्तव करत असतात. पण, बाकीच्या राज्यांमध्ये मात्र राज्यभाषेची सक्ती केली जाते आणि जर याचे कोणी पालन केले नाही, तर त्यास वाईट वागणूक दिली जाते. काही लोक महाराष्ट्रात राहूनही दुकानाच्या पाट्या इंग्लिशमध्ये किंवा हिंदीमध्येच लिहितात. फार क्वचित असतील, जे मराठी भाषेचा उपयोग करताना दिसतात. आश्चर्याची आणखी एक गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातील मराठी माणूस स्वतःच आपल्या पाल्याला मराठी शाळेत न घालता इंग्लिश माध्यमातून त्यास शिक्षण देतो. ही फार चिंताजनक बाब आहे आणि त्यामुळेच आज सर्व मराठी शाळा ओसाड पडू लागल्या आहेत. तरीही मला खूप अभिमान आहे की तुम्ही सर्व जण जो मान देता, त्यामुळेच आज मराठी भाषा फक्त महाराष्ट्रातच नाही, तर सातासमुद्रापलीकडे पाश्चिमात्य देशांत सर्वत्र जगभर पसरली आहे. तुमचे हे माझ्यावरचे अफाट प्रेम आणि आदर असेच सदैव राहू दे.

जाता-जाता फक्त एक गोष्ट सांगते, ती म्हणजे सर्वत्र असे म्हणतात की मराठी माणूसच मराठी माणसाचे पाय ओढतो आणि त्याची प्रगती थांबवतो. माझी तुम्हां सर्वांना एक कळकळीची विनंती आहे की काहीही झाले तरीही कोणीही आपापसात वादविवाद करू नये, उलट एकमेकांस सहकार्य करावे. ‘एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ’ या संत तुकाराम महाराजांच्या सुंदर वचनाप्रमाणे गरजूंना आपणाकडून जी जी शक्य होईल, ती ती मदत आपण सर्वांनी केली पाहिजे. आपली सर्वांची एकजूट हीच आपली खरी ताकद असेल आणि आपले हेच सामर्थ्य मराठी माणसाच्या विकासासाठी अतिशय पोषक ठरेल.

प्रतिक्रिया

अमरेंद्र बाहुबली's picture

31 Oct 2024 - 9:21 pm | अमरेंद्र बाहुबली

जाता-जाता फक्त एक गोष्ट सांगते, ती म्हणजे सर्वत्र असे म्हणतात की मराठी माणूसच मराठी माणसाचे पाय ओढतो आणि त्याची प्रगती थांबवतो. सहमत. उत्तम लेख.