मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वतीः समाः ।
यत्क्रौंचमिथुनादेकमवधीः काममोहितम् ॥
हे निषादा, तुला आयुष्यात कधीहि शांती मिळणार नाही, कारण काममोहित झालेल्या क्रौंचाच्या जोडीमधील एकाची तू हत्या केली आहेस.
निषादाने क्रौंचाच्या जोडीतील नराची केलेली हत्या पाहून वाल्मिकींच्या तोंडून नकळत हा श्लोक बाहेर पडला आणि वाल्मिकी रामायणाचा प्रारंभ झाला. हा श्लोक काव्यमय होता. चार चरणांनी मिळून बनलेल्या ह्या श्लोकात प्रत्येक चरण चार अक्षरी होता व वीणेवरही गाण्यास हा श्लोक योग्य होता. अनुष्टुभ छंदातील ह्या रचनेवरच पुढे वाल्मिकींनी रामायणाची रसाळ निर्मिती केली. वास्तविक रामायणाची असंख्य संस्करणे आहेत. आनंद रामायण, भावार्थ रामायण, जैन रामायण, योग वासिष्ठ रामायण, रामविजय, अद्भुत रामायण, रामचरितमानस, मोरोपंतांची रामायणे, खुद्द महाभारतातही रामकथा एकदा विस्तारपूर्वक, दोनदा संक्षेपाने अशी तीन वेळा येते. महाभारतातील आणि वाल्मिकी रामायणातील तपशिलांत थोडा फरकही आहे. महाभारतात रामकथा येणे हेच रामाच्या प्राचीनत्वाचे गमक मानले पाहिजे. मात्र वाल्मिकी रामायण हे खचित प्राचीन नव्हे. त्याची निर्मिती झाली असावी ती इसवी सनपूर्व २-३ शतकांच्या आसपास. ह्याला खुद्द रामायणातील श्लोकांचाच आधार आहे. इतर सर्व रामायणांत सर्वाधिक बृहद, सर्वाधिक रसाळ आणि जवळपास एकसंध असे आहे ते वाल्मिकी रामायणच. महाभारत तसे विसकळीत, सातत्याने भर पडत गेलेले. पण वाल्मिकी रामायणाचे तसे नव्हे. ते बर्यापैकी सातत्यपूर्ण आहे. अर्थात बालकाण्डाचा सुरुवातीचा भाग आणि शेवटचे उत्तरकाण्ड निर्विवादपणे प्रक्षिप्त आहे, असे मानता यावे. शिवाय अध्येमध्ये काही प्रक्षिप्त सर्गदेखील आहेत - उदा., खर-दूषणांच्या संहारानंतर अकंपनाच्या सल्ल्याने रावणाचे सीताहरणासाठी जाणे, किंवा बालकाण्डातील एक सर्ग थोड्याफार फरकाने आधीच्याच सर्गाप्रमाणे असणे. जाणकारांना हे प्रक्षिप्त सर्ग सहज ओळखता यावेत. मात्र असे काही सोडले, तर वाल्मिकी रामायण वाचणे हा एक विलक्षण अनुभव ठरतो तो त्यातील सौंदर्यामुळे. तत्कालीन समाजरचना, इतिहास, जीवनपद्धती यांचेही मनोज्ञ दर्शन ह्या श्लोकांद्वारे होते, तर काही श्लोक वाल्मिकी रामायणाचे इसवीसनपूर्व दुसर्या-तिसर्या शतकातील अर्वाचीनत्व आपल्याला सांगत असतात. ह्यातीलच काही श्लोक आपण पाहू.
व्याकरणाविषयी आलेला हा बालकाण्डातला हा श्लोक पाहा. अर्थात हा वाल्मिकींच्या शिष्यांनी रचला असावा, असे मानता यावे.
तदुपगतसमाससंधियोगं सममधुरोपनतार्थवाक्यबद्धम् ।
रघुवरकरितं मुनिप्रणीतं दशशिरसश्च वधं निशामयध्वम् ॥
मुनींनी रचलेल्या ह्या महाकाव्यात तत्पुरुष आदी समास, दीर्घगुण इत्यादी संधी आणि प्रकृती प्रत्यय ह्यांच्या संबंधाचा ऊहापोह झालेला आहे. पदांत माधुर्य असलेल्या काव्यात प्रासादिक गुण आहेत. श्रीरामांच्या चरित्राचा आणि दशाननाच्या वधाचा हा प्रसंग लक्षपूर्वक ऐका.
वाल्मिकी रामायणातील तैत्तिरीय शाखेचा उल्लेख.
कौसल्यां च य आशीर्भिर्भक्तः पर्युपतिष्ठति।
आचार्यस्तैत्तिरीयाणामभिरूपश्च वेदवित्।।
तस्य यानं च दासीश्च सौमित्रे सम्प्रदापय।
कौशेयानि च वस्त्राणि यावत्तुष्यति स द्विजः।।
हे लक्ष्मणा, जे तैत्तिरीय शाखेचे अध्ययन करणारे आहेत आणि जे वेदपारंगत आहेत आणि कौसल्येप्रति आदर ठेवणारे आहेत, त्या द्विजांना वाहने, दासदासी, वस्त्रे आणि धन देऊन संतुष्ट करा.
ह्याच्याच पुढे कठोपनिषदाचा उल्लेख येतो.
ये चेमे कठकालापा बहवो दण्डमाणवाः ॥
नित्यस्वाध्यायशीलत्वान्नान्यत् कुर्वन्ति किञ्चन ।
अलसाः स्वादुकामाश्च महतां चापि सम्मताः ॥
तेषामशीतियानानि रत्नपूर्णानि दापय ।
शालिवाहसहस्रं च द्वे शते भद्रकांस्तथा ॥
व्यञ्जनार्थं च सौमित्रे गोसहस्रमुपाकुरु।
माझ्याशी संबंध ठेवणारे जे कठशाखेचे आणि कलाप शाखेचे अध्येता, बरेच दण्डधारी ब्रह्मचारी आहेत, ते सदा स्वाध्यायातच संलग्न राहत असल्याने दुसरे काही कार्य करू शकत नाहीत. भिक्षा मागण्यात आळशी आहेत, पण स्वादिष्ट अन्न खाण्याची इच्छा ठेवतात. महान पुरुषही त्यांचा सन्मान करतात, त्यांच्यासाठी रत्नांच्या ओझ्यांनी लादलेले ऐंशी गाड्या, तांदळाचा भार वाहणारे हजार बैल व भद्रक नामक धान्यांचा भार घेतलेले दोनशे बैल आणखी द्यावेत.
रामकथा प्राचीन, मात्र वाल्मिकी रामायण हे नंतरचे असे दर्शवणारे श्लोक आता पाहू.
महाभारतात आणि इतर अधिक प्राचीन साहित्यांत मंदिरांचे उल्लेख नाहीत. महाभारतात एक-दोन ठिकाणी अल्पस्वप उल्लेख आलेत, मात्र ते अलीकडचे आहेत. नात्र वाल्मिकी रामायणात मंदिरांचे उल्लेख पुष्कळ आलेत.
समित्कुशपवित्राणि वेद्यश्चायतनानि च ।
स्थण्डिलानि च विप्राणां शैला वृक्षाः क्षुपा ह्रदाः ।
पतङ्गाः पन्नगाः सिंहास्त्वां रक्षन्तु नरोत्तम ॥
देवस्थानांमध्ये आणि मंदिरात जाऊन तू ज्यांना प्रणाम करतोस, त्या सर्व देवता महर्षींच्या सह वनामध्ये तुमचे रक्षण करोत. हे नरोत्तमा, समिधा, कुशा, पवित्रा, वेदी, मंदिरे, ब्राह्मणांची देवपूजनसंबंधी स्थाने, पर्वत, वृक्ष, क्षुप (झुडूप - लहान असणारे वृक्ष), जलाशय, पक्षी, सर्प आणि सिंह वनात तुमचे रक्षण करोत.
नाराजके जनपदे माल्यमोदकदक्षिणाः ।
देवताभ्यर्चनार्थाय कल्प्यन्ते नियतैर्जनैः ॥
जेथे अराजक माजलेले असते, त्या जनपदात मनाला अधीन ठेवणारे लोक देवतांच्या पूजेसाठी फुले, मिष्टान्न आणि दक्षिणा यांची व्यवस्था करीत नाहीत.
येथे जनपदाचा स्पष्ट असा उल्लेख आलेला आहे, तसेच पूजेसाठी फुले, दक्षिणा, प्रसादाचा उल्लेख आलेला आहे. यज्ञीय संस्कृतीतील 'हवि'चा उल्लेख येथे नाही.
सार्थवाहांचा उल्लेख.
वाल्मिकी रामायणात किष्किंधाकाण्डात एका श्लोकात सार्थवाहांचा उल्लेख येतो. हे सार्थवाह म्हणजे श्रमण, व्यापारी लोक. हे तांड्यासह प्रवास करत. बुद्धोत्तरकालीन साहित्यात सार्थवाहांचे पुष्कळ उल्लेख येतात.
स तु वाली प्रचलितस्सालताडनविह्वलः।
गुरुभारसमाक्रान्तो नौ सार्थ इव सागरे।।
त्या आघातामुळे विव्हल झालेला वाली, सार्थवाहांचा जथा चढल्यामुळे त्या प्रचंड वजनाने दबून जाऊन समुद्रात डगमगणाऱ्या नावेसारखा कापू लागला.
स्वस्तिक चिन्हाचा उल्लेख.
स्वस्तिक चिन्ह जरी प्राचीन असले, तरी आर्ष साहित्यात त्याचा उल्लेख अगदी अपवादानेच येतो. सुंदरकाण्डात स्वतिक चिन्हाचा एक श्लोक येतो, तो असा -
शिरोभिः पृथुभिः सर्पा व्यक्तस्वस्तिकलक्षणैः।
वमन्तः पावकं घोरं ददंशुर्दशनैः शिलाः।।
ज्यावरील स्वस्तिक चिन्ह स्पष्ट दिसून येत होते, अशा विशाल फण्यातून विषाची भयंकर आग बाहेर टाकीत सर्प आपल्या दातांनी शिलांना दंश करू लागले.
वाल्मिकी रामायणाची लिखित संहिता बुद्धोत्तरकालीन असल्याचे आणखी एक कारण म्हणजे त्यात असलेला तथागतांचा आणि लोकायतांचा उल्लेख.
तथागतांचा उल्लेख हा श्रीराम-जाबाली संवाद, आस्तिक-नास्तिक मतांच्या चर्चेच्या अनुषंगाने येतो.
यथा हि चोरः स तथा हि बुद्धस्तथागतं नास्तिकमत्र विद्धि ।
तस्माद्धि यः शङ्क्यतमः प्रजानां न नास्तिके नाभिमुखो बुधः स्यात् ॥
चोरांप्रमाणेच बौद्धमतवादीही दण्डनीय आहेत. तथागत आणि नास्तिक एकाच कोटीचे आहेत आणि म्हणून प्रजेवर अनुग्रह करताना ह्यांना दंड देण्यात यावा आणि अशा नास्तिकांच्या मुखी कोणी लागू नये.
लोकायत मतही चार्वाकवादीच, नास्तिक्यांचा संप्रदाय असलेले. ज्यांना कुणाला लोकायतांबद्द्ल तपशीलवार जाणून घ्यायचे आहे, त्यांनी स.रा. गाडगीळ ह्यांचे 'लोकायत' हे पुस्तक अवश्य वाचावे.
अयोध्याकाण्डात चित्रकूट पर्वतावर राम भरताला राजनीतीचा उपदेश करण्याच्या प्रसंगी हे श्लोक आलेले आहेत. महाभारतातल्या नारद-युधिष्ठिर संवाद असलेल्या कश्चिद अध्यायाची ह्या सर्गावर दाट छाया आहे किंबहुना हे सर्व थोडाफार बदल करून त्यातूनच घेतले असावेत, असे स्पष्ट दिसते.
कच्चिन्न लोकायतिकान् ब्राह्मणांस्तात सेवसे ।
अनर्थकुशला ह्येते बालाः पण्डितमानिनः ॥
धर्मशास्त्रेषु मुख्येषु विद्यमानेषु दुर्बुधाः ।
बुद्धिमान्वीक्षिकीं प्राप्य निरर्थं प्रवदन्ति ते ॥
तू कधी नास्तिक ब्राह्मणांचा संग तर करीत नाही ना ? कारण की ते बुद्धीला परमार्थाकडून विचलित करण्यात कुशल असतात. तसेच वास्तविक अज्ञानी असूनही आपल्याला फार मोठे पंडित मानत असतात. त्यांचे ज्ञान वेदविरोधी असल्यामुळे दूषित असते आणि ते प्रमुख धर्मशास्त्रांचे असूनही तार्किक बुद्धीचा आश्रय घेऊन व्यर्थ वाद करीत असतात.
संस्कृत प्राकृत भाषांचा उल्लेख.
आरण्यकाण्डात अगस्त्यमहिम्याच्या श्लोकांत संस्कृत भाषेचा अगदी सुस्पष्ट असा उल्लेख येतो. तो पुढीलप्रमाणे -
धारयन् ब्राह्मणं रूपमिल्वलः संस्कृतं वदन् ।
आमन्त्रयति विप्रान् स्म श्राद्धमुद्दिश्य निर्घृणः ॥
भ्रातरं संस्कृतं कृत्वा ततस्तं मेषरूपिणम् ।
तान् द्विजान् भोजयामास श्राद्धदृष्टेन कर्मणा ॥
दुष्ट इल्वल राक्षस संस्कृत भाषेत बोलत असे आणि ब्राह्मणांना श्राद्धासाठी निमंत्रण देऊन येत असे. नंतर मेषाचे - म्हणजे मेंढ्याचे रूप धारण केलेल्या आपल्या भावाचा - वातापीचा संस्कार करून श्राद्धाच्या विधीप्रमाणे ब्राह्मणांना खाऊ घालीत असे.
वरिल श्लोकांत संस्कृत ही जनसामान्यांची भाषा न राहता केवळ ब्राह्मणांची भाषा म्हणून राहिली होती, हेही सहज कळते.
संस्कृताचे वर्णन असलेला, तसेच वेदांतील व्याकरणांचा उल्लेख असलेले अतिशय सुंदर श्लोक किष्किंधाकाण्डात राम+हनुमान भेटीच्या प्रथम प्रसंगी येतात. हनुमानाचे वर्णन करताना रामाच्या मुखी वाल्मिकींनी पेरलेले श्लोक अतिशय रसाळ आहेत.
नानृग्वेदविनीतस्य नायजुर्वेद्धारिणः।
नासामवेदविदुषश्शक्यमेवं विभाषितुम्।।
नूनं व्याकरणं कृत्स्नमनेन बहुधा श्रुतम्।
बहु व्याहरताऽनेन न किञ्चिदपशब्दितम्।।
न मुखे नेत्रयोर्वापि ललाटे च भ्रुवोस्तथा।
अन्येष्वपि च गात्रेषु दोषस्संविदितः क्वचित्।।
अविस्तरमसन्दिग्धमविलम्बितमद्रुतम्।
उरस्थं कण्ठगं वाक्यं वर्तते मध्यमे स्वरे।।
संस्कारक्रमसम्पन्नामद्रुतामविलम्बिताम्।
उच्चारयति कल्याणीं वाचं हृदयहारिणीम्।।
अनया चित्रया वाचा त्रिस्थानव्यञ्जनस्थया।
कस्य नाराध्यते चित्तमुद्यतासेररेरपि।।
एवं विधो यस्य दूतो न भवेत्पार्थिवस्य तु।
सिद्ध्यन्ति हि कथं तस्य कार्याणां गतियोऽनघ।।
एवं गुणगणैर्युक्ता यस्य स्युः कार्यसाधकाः।
तस्य सिध्यन्ति सर्वाऽर्था दूतवाक्यप्रचोदिताः।।
ज्याला ऋग्वेदाचं शिक्षण मिळालेलं नाही, ज्याने यजुर्वेदाचा अभ्यास केलेला नाही, जो सामवेदाचा विद्वान नाही, तो या प्रकारे सुंदर भाषेत वार्तालाप करू शकणार नाही. निश्चितच या हनुमानाने सर्व व्याकरणाचा अनेक वेळा बारकाईने अभ्यास केला आहे. कारण इतका वेळ बोलत असूनही त्याच्या तोंडातून कोणताही अशुद्ध बोल बाहेर पडला नाही. संभाषणाच्या वेळी याचं मुख, डोळे, कपाळ, भुवई यांतून, तसंच अन्य सर्व अंगांमधूनही एखादा दोष प्रकट झालेला आहे असं मला दिसलं नाही. याने थोडक्यात पण स्पष्टपणे आपलं म्हणणं मांडलं आहे. ते समजण्यास निःसंदिग्ध होतं. थांबून थांबून किंवा शब्द आणि अक्षरं तोडून मोडून त्याने कुठलंही वाक्य उच्चारलं नाही. कुठलंही वाक्य कर्णकटू वाटलं नाही. त्याची वाणी हृदयात मध्यमारूपाने स्थिर झालेली आहे आणि कंठातून वैखरीरूपाने प्रकट होते आहे. बोलताना याचा आवाज फार बारीकही येत नाही आणि फार वरही जात नाही. मध्यम आवाजात त्याने सर्व काही सांगितलं आहे. हृदय, कंठ आणि मूर्धा या तीन स्थानांकडून स्पष्टरूपाने अभिव्यक्त होणारी याची ही चित्रवतवाणी ऐकून कुणाचं चित्त प्रसन्न होणार नाही? वध करण्यासाठी म्हणून तलवार उचललेल्या शत्रूचं हृदयदेखील या अद्भुत वाणीने बदलू शकेल. निष्पाप लक्ष्मणा, ज्या राजांपाशी याच्यासारखे दूत नसतील, त्यांची कार्यसिद्धी कशी होऊ शकेल? ज्याचं कार्य साधणारे दूत अशा उत्तम गुणांनी युक्त असतील, त्याचे सर्व मनोरथ दूताच्या संभाषणचातुर्याने सिद्धीस जाऊ शकतात.
संस्कृत आणि प्राकृताचा उल्लेख असलेले काही सुंदर श्लोक हनुमानाच्या स्वगतात येतात. येथे हनुमान सीतेशी कशा पद्धतीने प्रथम संभाषण करावे ह्या विचाराने चिंताक्रांत झालेला आहे.
अहं ह्यतितनुश्चैव वानरश्च विशेषतः ।
वाचं चोदाहरिष्यामि मानुषीमिह संस्कृताम् ॥
यदि वाचं प्रदास्यामि द्विजातिरिव संस्कृताम् ।
रावणं मन्यमाना मां सीता भीता भविष्यति ॥
अवश्यमेव वक्तव्यं मानुषं वाक्यमर्थवत् ।
मया सान्त्वयितुं शक्या नान्यथेयमनिन्दिता ॥
सेयमालोक्य मे रूपं जानकी भाषितं तथा ।
रक्षोभिस्त्रासिता पूर्वं भूयस्त्रासं उपैष्यति ॥
ततो जातपरित्रासा शब्दं कुर्यान्मनस्विनी ।
जानाना मां विशालाक्षी रावणं कामरूपिणम् ॥
एक तर माझं शरीर अत्यंत सूक्ष्म आहे आणि दुसरं म्हणजे मी वानरयोनीचा आहे. वानर असूनही मी इथे मानवोचित संस्कृत भाषेत बोलेन. परंतु असं करण्यात एक अडचण आहे. जर मी ब्राह्मणाप्रमाणे संस्कृतवाणीचा प्रयोग करीन, तर सीता मलाच रावण समजून भयभीत होईल. अशा अवस्थेत मला व्यवहारातल्या भाषेचाच (प्राकृतचाच) उपयोग केला पाहिजे. अयोध्येच्या आसपासची सर्वसामान्य जनता बोलते, ती बोलीभाषा वापरणं योग्य ठरेल. अन्यथा या सतीसाध्वी सीतेला योग्य प्रकारे आश्वासन देता येणार नाही. जर मी समोर गेलो, तर माझ्या या वानररूपास पाहून सीता आणखीच घाबरेल. माझ्या मुखातून मानवी भाषा ऐकून जिला राक्षसांनी भयभीत केलं आहे, ती आधीच घाबरलेली सीता आणखीच घाबरेल. मनात भय उत्पन्न झाल्यावर ही विशाललोचना मनस्विनी सीता मलाही इच्छेला येईल ते रूप धारण करणारा रावण समजून जोरजोरात किंचाळू लागेल.
वाल्मिकी रामायणात अयोध्येच्या नागरी जीवनाचे वर्णन करणारे श्लोक आलेले आहेत. ह्या श्लोकांतून तत्कालीन नागरजीवनाचे पूर्ण प्रतिबिंब समोर येते. महाभारतात सभापर्वाच्या सुरुवातीला नारद-युधिष्ठिर संवादाच्या कश्चिद् अध्यायात तत्कालीन नागर, ग्रामीण किंवा प्रशासकीय पद्धतींच्या उल्लेखांचे विस्तारपूर्वक वर्णन आले आहे, जिज्ञासूंनी तो अध्याय मुळातून अवश्य वाचून पाहावा. येथे इतके बृहद जरी नसले, तरी अयोध्या हे जनपद पूर्णंपणे नागरी होते, हे सहज समजते.
अयोध्येतून श्रीराम वनवासाला निघून गेल्यावर झालेल्या अयोध्यानगरीच्या दुरवस्थेचे हे चित्रण पाहा.
सम्मूढनिगमां सर्वां संक्षिप्तविपणापणाम् ।
प्रच्छन्नशशिनक्षत्रां द्यामिवाम्बुधरैर्वृताम् ॥
क्षीणपानोत्तमैर्भग्नैः शरावैरभिसंवृताम् ।
हतशौण्डामिव ध्वस्तां पानभूमिमसंस्कृताम् ॥
वृक्णभूमितलां निम्नां वृक्णपात्रैः समावृताम् ।
उपयुक्तोदकां भग्नां प्रपां निपतितामिव ॥
वारुणीमदगन्धश्च माल्यगन्धश्च मूर्च्छितः ।
चन्दनागुरुगन्धश्च न प्रवाति समन्ततः ।।
बाजारहाट, दुकाने खूपच कमी प्रमाणात उघडली होती. ज्याप्रमाणे आकाशात ढगांची दाटी व्हावी आणि त्यांनी चंद्रास झाकून टाकावे, त्याप्रमाणे सारी नगरी झाकोळून गेली. ती नगरी उजाड झालेल्या पानभूमी (मद्यगृह)प्रमाणे श्रीहीन दिसत होती. तिची सफाई केलेली नव्हती. मद्याचे प्याले खाली पडले आहेत आणि तेथे येऊन पिणारेही नष्ट झाले आहेत. त्या नगरीची दशा अशा पाणपोईसारखी झाली होती की, जिचे खांब तुटलेले आहेत, जी ढासळून गेली आहे, जिचा चबुतरा छिन्नभिन्न झाला आहे, भूमी उखडून गेली आहे, पाणी संपून गेले आहे. जलपात्र फुटून तुटून त्याचे तुकडे इकडेतिकडे विखुरलेले आहेत.आता चारही बाजूंनी वारुणीचा मादक गंध, व्याप्त झालेला फुलांचा सुगंध तसेच चंदनाचा आणि अगुराचा पवित्र गंध पसरत नाही.
अयोध्यानगरीतील विविध व्यावसायिकांचे वर्णन पुढील श्लोकांत आलेले दिसते. तत्कालीन नागर संस्कृतीत विविध व्यवसाय कसे भरभराटीला आले होते, हे येथे समजते.
मणिकाराश्च ये केचित् कुम्भकाराश्च शोभनाः ।
सूत्रकर्मविशेषज्ञा ये च शस्त्रोपजीविनः ॥
मायूरकाः क्राकचिका वेधका रोचकास्तथा ।
दन्तकाराः सुधाकारा ये च गन्धोपजीविनः ॥
सुवर्णकाराः प्रख्यातास्तथा कम्बलकारकाः ।
स्नापकोष्णोदका वैद्या धूपकाः शौण्डिकास्तथा ॥
रजकास्तुन्नवायाश्च ग्रामघोषमहत्तराः ।
शैलूषाश्च सह स्त्रीभिर्यान्ति कैवर्तकास्तथा ॥
समाहिता वेदविदो ब्राह्मणा वृत्तसम्मताः ।
गोरथैर्भरतं यान्तमनुजग्मुः सहस्रशः ॥
जे कोणी मणिकार (मण्यांना पैलू पाडणारे), चांगले कुंभार, सुतापासून वस्त्र विणण्याच्या कलेतील विशेषज्ञ, शस्त्रे निर्माण करून जीविका चालविणारे, मायूरक (मोरपंखांपासून छत्र चामरे आदी बनविणारे), आर्यानी चंदन आदी लाकडे कापणारे सुतार, मण्यांना छिद्रे पाडून माळा बनवणारे रोचक, दंतकार (हस्तिदंतापासून नाना प्रकारच्या वस्तू बनविणारे), सुधाकार (चुना बनविणारे), गंधी, सोनार, कांबळी आणि गालिचे बनविणारे, गरम जलाने स्नान घालण्याचे काम करणारे, वैद्य, धूपक (धूपदीप करणारे), शौण्डिक (मद्यविक्रेते) धोबी, शिंपी, गावाचे आणि गोशाळेचे रक्षण करणारे गावचे पुढारी, स्त्रियांसहित नट, नावाडी, तसेच वेदवेत्ते हजारो ब्राह्मण बैलगाड्यांवर चढून वनाची यात्रा करणार्या भरताच्या पाठोपाठ निघाले.
भरत श्रीरामांस वनवासातून परत आणण्यासाठी मोठा लवाजमा घेऊन निघाला, तेव्हा रस्ते तयार करण्याचे वर्णन अगदी विस्तारपूर्वक आले आहे.
अथ भूमिप्रदेशज्ञाः सूत्रकर्मविशारदाः ।
स्वकर्माभिरताः शूराः खनका यन्त्रकास्तथा ॥
कर्मान्तिकाः स्थपतयः पुरुषा यन्त्रकोविदाः ।
तथा वर्धकयश्चैव मार्गिणो वृक्षतक्षकाः ॥
सूपकाराः सुधाकारा वंशकर्मकृतस्तथा ।
समर्था ये च द्रष्टारः पुरतस्ते प्रतस्थिरे ॥
त्यानंतर उंच-सखल, तसेच सजल-निर्जल भूमीचे ज्ञान असणारे सूत्रकर्मा, मार्गाचे रक्षण करणारे सदैव सावध राहणारे शूरवीर, भूमी खोदणारे किंवा सुरुंग इत्यादी बनविणारे, नदी पार करण्यासाठी तत्काळ साधन उपस्थित करणारे अथवा जलाचा प्रवाह रोखणारे वेतनभोगी कारागीर, गवंडी, रथ आणि यंत्र आदी बनविणारे पुरुष, सुतार, मार्गरक्षक, झाडे तोडणारे, आचारी, चुन्यांनी लिंपणे आदी काम करणारे, रूळकापासून चटई, सूप वगैरे बनविणारे, चामड्यापासून खोगीर वगैरे बनविणारे, तसेच रस्त्याची विशेष माहिती ठेवणारे सामर्थ्यशाली पुरुष यांनी प्रथम प्रस्थान केले.
हे विविध कारागीर कशा प्रकारे मार्ग बनवू लागले, ह्याचे वर्णन पाहा +-
लता वल्लीश्च गुल्मांश्च स्थाणूनश्मन एव च ।
जनास्ते चक्रिरे मार्गं छिन्दन्तो विविधान् द्रुमान् ॥
ते मार्ग निर्माण करण्यात निपुण असणारे कारागीर आपापल्या दलासह अनेक प्रकारच्या वृक्षांना, वेलींना तोडून मार्ग तयार करू लागले.
अवृक्षेषु च देशेषु केचिद् वृक्षानरोपयन् ।
केचित् कुठारैष्टङ्कैश्च दात्रैश्छिन्दन् क्वचित् क्वचित् ॥
ज्या स्थानी वृक्ष नव्हते, तेथे काही लोकांनी वृक्षही लावले. काही कारागीरांनी कुर्हाडींनी, छिन्नीने, दगड फोडण्याच्या अवजारांनी, तसेच विळ्या-कोयत्याने कोठे कोठे वृक्ष आणि गवत कापून रस्ता साफ केला.
अपरे वीरणस्तम्बान् बलिनो बलवत्तराः ।
विधमन्ति स्म दुर्गाणि स्थलानि च ततस्ततः ॥
अपरेऽपूरयन् कूपान् पांसुभिः श्वभ्रमायतम् ।
निम्नभागांस्तथैवाशु समांश्चक्रुः समन्ततः ॥
अन्य वीर मनुष्यांनी ज्यांची मुळे जमिनीत घट्ट रुजलेली होती, अशी झुडपे हातांनीच उपटून फेकून दिली. ते जेथे तेथे उंच-सखल दुर्गम स्थानांना खोदून बरोबर करीत होते. दुसरे काही लोक विहिरीत लांबरुंद खड्डे मातीने भरून काढीत होते. जे स्थान खोलगट असेल, तेथे सर्व बाजूंनी मातीची भर घालून ते त्या स्थानाला समतल करून टाकत होते.
बबन्धुर्बन्धनीयांश्च क्षोद्यान् सञ्चुक्षुदुस्तथा ।
बिभिदुर्भेदनीयांश्च तांस्तान् देशान् नरास्तदा ॥
त्यांनी जेथे पूल बांधण्यायोग्य जागा आहे असे पाहिले, तेथे पूल बांधले, जेथे खडकाळ जमीन दिसली तेथे तिला ठोकून ठोकून मुलायम केले आणि जेथे पाणी वाहून जाण्यासाठी मार्ग बनविणे आवश्यक वाटले, तेथील बांध फोडून टाकले.. असे योग्य ते कार्य त्या प्रदेशात केले.
निर्जलेषु च देशेषु खानयामासुरुत्तमान् ।
उदपानान् बहुविधान् वेदिकापरिमण्डितान् ॥
निर्जल स्थानावर नाना प्रकारच्या चांगल्या विहिरी आणि कूप पाण्याचे साठे बनविले, जे आसपास बांधलेल्या वेदिकांमुळे अलंकृत झाले होते.
ससुधाकुट्टिमतलः प्रपुष्पितमहीरुहः ।
मत्तोद्घुष्टद्विजगणः पताकाभिरलङ्कृतः ॥
चन्दनोदकसंसिक्तो नानाकुसुमभूषितः ।
बह्वशोभत सेनायाः पन्थाः सुरपथोपमः ॥
प्रकारे सेनेचा तो मार्ग देवतांच्या मार्गाप्रमाणे अधिक शोभून दिसू लागला. त्याच्या जमिनीवर माती, चुना इत्यादी पसरवून त्याला ठोकून ठोकून पक्का बनविला होता. त्याच्या किनार्यावर फुलांनी सुशोभित वृक्ष लावले गेले होते. तेथील वृक्षांवर पक्षी किलबिलाट करीत होते. सर्व मार्गास पताकांनी सुशोभित केले होते, त्यावर चंदनमिश्रित जलाचा शिडकावा केला गेला होता, तसेच अनेक प्रकारच्या फुलांनी तो मार्ग सजविला गेला होता.
आता वाल्मिकी रामायणातील काही वेगळे श्लोक पाहू या.
रामायणातील पिंजर्यातील पक्ष्यांचा उल्लेख
तेन शब्देन विहगाः प्रतिबुद्धा विसस्वनुः |
शाखास्थाः पञ्जरस्थाश्च ये राजकुलगोचराः ||
त्या शब्दांनी वृक्षांच्या शाखांवर बसलेले आणि राजकुलातच संचार करून पिंजऱ्यांत बंद झालेले शुकादिक पक्षी जागे होऊन चिवचिवाट करू लागले.
रामायणातील क्लिबांचा (हिजड्यांचा) उल्लेख.
महाभारतात क्लिबांचा उल्लेख तसा आहे, बृहन्नडा (अर्जुनाचे अज्ञातवासातील रूप) किंवा शिखंडी (येथे शिखंडी हा क्लिब असा स्पष्ट उल्लेख नाही, मात्र तो पूर्वजन्मातील अंबा ह्या जन्मात भीष्मवधासाठी शिखंडी रूपाने उत्पन्न झाली, असा येतो. रामायणात मात्र दरबारातील क्लिबांचा उल्लेख येतो.
ततः शुचि समाचाराः पर्युपस्थान कोविदः |
स्त्री वर्ष वर भूयिष्ठाउपतस्थुर् यथा पुरम् ||
त्यानंतर सदाचारी आणि परिचर्याकुशल सेवक, ज्यांत स्त्रिया व हिजडे यांची संख्या अधिक होती, असे पहिल्याप्रमाणेच त्या दिवशी राजभवनात उपस्थित झाले.
रामायणातील देवतांच्या नैवेद्यांचा उल्लेख.
माणूस जे अन्न खातो, त्याच अन्नाचा नैवेद्य देवतांना अर्पित करतो. उदा., शाकाहारी लोक शाकाहारी नैवेद्यच ठेवणार, तर पशुबळी अर्पण करणारे लोक तोच बळी स्वतः ग्रहण करणार. ह्याच अर्थाचे अगदी दोन श्लोक दशरथाच्या श्रीरामाने केलेल्या श्राद्धाच्या अनुषंगाने येतात.
इदं भुङ्क्ष्व महाराज प्रीतो यदशना वयम् ।
यदन्नः पुरुषो भवति तदन्नास्तस्य देवताः ॥
महाराज! प्रसन्नतापूर्वक हे भोजन स्वीकारावे. कारण की आजकाल हाच आमचा आहार आहे. मनुष्य स्वतः जे अन्न खातो, तेच त्याच्या देवताही भक्षण करतात.
श्रुतिस्तु खल्वियं सत्या लौकिकी प्रतिभाति मे ।
यदन्नः पुरुषो भवति तदन्नास्तस्य देवताः ॥
ही लौकिक श्रुती निश्चितच मला सत्य वाटत आहे की मनुष्य स्वतः जे अन्न खातो, त्याच्या देवताही तेच अन्न ग्रहण करतात.
रामायणातील भुतांचा उल्लेख.
महाभारतात भुतांचा - म्हणजे पिशाच्चांच्या अनुषंगाने उल्लेख नाही, रामायण नंतर लिहिले गेले असल्याने येथे मात्र भुतांचा उल्लेख आढळतो, तो असा -
कैकेयी-दशरथ संवाद
भूतोपहतचित्तेव ब्रुवन्ती मां न लज्जसे ।
शीलव्यसनमेतत् ते नाभिजानाम्यहं पुरा ॥
असे कळून येत आहे की तुझे चित्त कुणा भुताच्या आवेशाने दूषित झालेले आहे. पिशाच्चग्रस्त स्त्रीप्रमाणे माझ्या समोर अशा गोष्टी बोलत असता तू लज्जित कशी होत नाहीस? मला प्रथम हे माहीत नव्हते की तुझे शील या प्रकारे नष्ट झालेले आहे.
सीतेच्या अवस्थेचे वर्णन
जानकी तु महाराज निःश्वसन्ती तपस्विनी ।
भूतोपहतचित्तेव विष्ठिता विस्मृता स्थिता ॥
महाराज! तपस्विनी जानकी तर दीर्घ श्वास घेत अशा प्रकारे निश्चेष्ट उभी होती की जणू तिच्यात कुणा भुताचा आवेश झाला आहे. तिची शुद्ध जणू हरपली होती.
सीतेने रामाला (आपल्यासोबत वनवासास न्यावे म्हणून) कठोर वाक्ताडन केल्याचे फारसे कुणाला माहीत नाही, मात्र तेही रामायणात आहे.
किम् त्वा अमन्यत वैदेहः पिता मे मिथिला अधिपः ।
राम जामातरम् प्राप्य स्त्रियम् पुरुष विग्रहम् ॥
श्रीरामा, मिथिलाधिप जनकांनी आपल्याला जावयाच्या रूपात मिळवून काय हेच समजले होते की तुम्ही पुरुषाच्या रूपातील स्त्रीच आहात.
स्वयम् तु भार्याम् कौमारीम् चिरम् अध्युषिताम् सतीम् |
शैलूषैव माम् राम परेभ्यो दातुम् इच्चसि ||
जिचा कुमारावस्थेतच आपल्याशी विवाह झालेला आहे आणि जी चिरकालपर्यंत आपल्याबरोबर राहिली आहे, अशा सती पत्नीला तुम्ही (बाईची कमाई खाणाऱ्या) एका नटाप्रमाणे दुसऱ्यांच्या हाती देऊन टाकू इच्छिता.
हीच सीता रावणाच्या कैदेत असताना रावणाची अगदी कठोर शब्दांत नालस्ती करते. हे श्लोक मुळातूनच वाचण्यासारखे आहेत.
पूर्णचन्द्राननं रामं राजवत्सं जितेन्द्रियम्।
पृथुकीर्तिं महात्मानमहं राममनुव्रता।।
त्वं पुनर्जम्बुकस्सिंहीं मामिच्छसि सुदुर्लभाम्।
नाहं शक्या त्वया स्प्रष्टुमादित्यस्य प्रभा यथा।।
पादपान्काञ्चनान्नूनं बहून्पश्यसि मन्दभाक्।
राघपस्य प्रियां भार्यां यस्त्वमिच्छसि रावण।।
क्षुधितस्य हि सिंहस्य मृगशत्रोस्तरस्विनः।
आशीविषस्य मुखाद्दंष्ट्रामादातुमिच्छसि।।
मन्दरं पर्वतश्रेष्ठं पाणिना हर्तुमिच्छसि।
कालकूटं विषं पीत्वा स्वस्तिमान्गन्तुमिच्छसि।।
अक्षि सूच्या प्रमृजसि जिह्वया लेक्षि च क्षुरम्।
राघवस्य प्रियां भार्यां योऽधिगन्तुं त्वमिच्छसि।।
अवसज्य शिलां कण्ठे समुद्रं तर्तुमिच्छसि।
सूर्याचन्द्रमसौ चोभौ पाणिभ्यां हर्तुमिच्छसि।।
यो रामस्य प्रियां भार्यां प्रधर्षयितुमिच्छसि।
अग्निं प्रज्वलितं दृष्ट्वा वस्त्रेणाहर्तुमिच्छसि।।
काल्याणवृत्तां रामस्य यो भार्यांहर्तुमिच्छसि।
अयोमुखानां शूलानामग्रे चरितुमिच्छसि।।
रामस्य सदृशीं भार्यां योऽधिगन्तुं त्वमिच्छसि।
यदन्तरं सिंहशृगालयोर्वने यदन्तरं स्यन्दिनिका समुद्रयोः।
सुराग्र्य सौवीरकयोर्यदन्तरं तदन्तरं वै तव राघवस्य च।।
यदन्तरं काञ्चनसीसलोहयोर्यदन्तरं चन्दनवारिपङ्कयोः।
यदन्तरं हस्तिबिडालयोर्वने तदन्तरं दाशरथेस्तवैव च।।
यदन्तरं वायसवैनतेययोर्यदन्तरं मद्गुमयूरयोरपि।
यदन्तरं सारसगृध्रयोर्वने तदन्तरं दाशरथेस्तवैव च।।
तस्मिन्सहस्राक्षसमप्रभावे रामे स्थिते कार्मुकबाणपाणौ।
हृतापि तेहं न जरां गमिष्ये वज्रं यथा मक्षिकयावगीर्णम्।।
इतीव तद्वाक्यमदुष्टभावा सुदुष्टमुक्त्वा रजनीचरं तम्।
गात्रप्रकम्पाद्व्यथिता बभूव वातोद्धता सा कदलीव तन्वी।।
राजकुमार श्रीरामांचं मुख पूर्णचंद्रासारखं सुंदर आहे. ते जितेंद्रिय आणि मोठा नावलौकिक असलेले आहेत. मी दृढपणाने त्यांच्या ठिकाणी चित्त ठेवणारी त्यांची अनुव्रता आहे.
पापी निशाचरा, तू कोल्हा आहेस आणि मी सिंहीण आहे. माझी प्राप्ती तुला केवळ अशक्य आहे. तू मला प्राप्त करण्याची कामना करतोस? अरे, ज्याप्रमाणे सूर्याच्या प्रभेला कुणी हात लावू शकत नाही, त्याचप्रमाणे तू मला स्पर्शही करू शकणार नाहीस. अभागी राक्षसा, तुझं हे धाडस? तू श्रीरघुनाथांच्या प्रिय पत्नीचं अपहरण करू इच्छितोस? निश्चितच तुला खूपसे सुवर्णवृक्ष दिसू लागलेले आहेत आणि तू मृत्यूच्या जवळ जाऊन पोहोचला आहेस. तू श्रीरामांच्या प्रिय पत्नीला हस्तगत करू इच्छितोस. जणू तू अत्यंत वेगवान मृगशत्रू असलेल्या भुकेल्या सिंहाच्या आणि अत्यंत विषारी सापांच्या तोंडातून त्यांचे दात तोडून घेऊ इच्छितोस. जणू पर्वतश्रेष्ठ मंदर हाताने उचलून घेऊन जाण्याची इच्छा धरतोस. जणू कालकूट विष प्राशन करून सुखरूप परत जाण्याची अभिलाषा ठेवतोस. जणू डोळे सुयांनी पुसतोस, जणू सुरी जिभेने चाटतोस.
'काय आपल्या गळ्यात शिळा बांधून तू समुद्र पार करण्याची इच्छा बाळगतोस? का तू सूर्य आणि चंद्र दोघांनाही आपल्या दोन्ही हातांनी तोडून आणू इच्छितोस? श्रीरामांच्या प्रिय पत्नीवर बलात्कार करायला सज्ज होणं त्याप्रमाणेच आहे. जर तू कल्याणमय आचरण करणाऱ्या श्रीरामपत्नीचं अपहरण करू इच्छित असशील, तर तू पेटलेला अग्नी उघड्या डोळ्यांनी पाहूनही त्याला कपड्यांत वांधून घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो आहेस. श्रीरामांची ही पत्नी केवळ त्यांनाच साजेशी आहे. तिला हस्तगत करण्याचा हा तुझा प्रयत्न निश्चितच लोहमुखी सुळांच्या टोकांवरून चालण्याच्या प्रयत्नांपैकी आहे. वनात राहाणारा सिंह आणि कोल्हा, समुद्र आणि छोटा ओढा , अमृत आणि पेज यांच्यामध्ये जे अंतर आहे, तेच अंतर दशरथपुत्र श्रीरामांत आणि तुझ्यात आहे. सोने आणि शिसे, चंदनयुक्त जल आणि चिखल, तसेच वनात राहणारा हत्ती आणि मांजर यांच्यांत जेवढा फरक आहे, तोच फरक दाशरथींत आणि तुझ्यात आहे. गरुड आणि कावळा, मोर आणि जलकाक, तसेच हंस आणि गिधाड यांच्यात जे अंतर आहे, तेच अंतर दशरथसुत श्रीरामांत आणि तुझ्यात आहे.
'ज्या वेळी सहस्रनेत्रधारी इंद्रासारखे प्रभावशाली राम हातात धनुष्यबाण धारण करून युद्धाला उभे ठाकतील, त्या वेळी तू माझं अपहरण करूनही मला पचवू शकणार नाहीस. माशीने तूप प्राशन केलं, तरी तिला ते पचत नाही, तसंच तुला मला पचविता येणार नाही.'
सीतेच्या मनात कोणताही दुष्टभाव नव्हता, तरी त्या राक्षसाशी इतका वेळ बोलण्यामुळे सीतेला दुःख अनावर झाले आणि ती संतापाने थरथर काप्पू लागली. कृशांगी सीता एखाद्या वाऱ्याने हेलपाटणाऱ्या कर्दळीसारखी दिसत होती. सीतेला कंपित झालेली पाहून मृत्यूसारखा प्रभाव असलेला तो रावण तिच्या मनात भय उत्पन्न करण्यासाठी आपले कुल, बल, नाव आणि कर्तृत्व यांची माहिती सांगू लागला.
आता रामायणातील काही नितांतसुंदर श्लोक पाहू या.
श्रीरामांच्या वनात जाण्याने विव्हळ झालेली जनताच हे गायन करत आहे.
वनं नगरमेवास्तु येन गच्छति राघवः ।
अस्माभिश्च परित्यक्तं पुरं सम्पद्यतां वनम् ॥
जेथे पोहोचण्यासाठी राघव जात आहेत, ते वनच नगर होऊन जाईल आणि आम्ही सोडून गेल्यावर हे नगरच वनाच्या रूपात परिणत होईल.
भरताला परत पाठवून दंडकारण्यात प्रवेश करण्याच्या आधी राम भरताला आज्ञा देतात, ती अशी -
अयोध्यां गच्छ भरत प्रकृतीरनुरञ्जय ।
शत्रुघ्नसहितो वीर सह सर्वैर्द्विजातिभिः ॥
प्रवेक्ष्ये दण्डकारण्यमहमप्यविलम्बयन् ।
आभ्यां तु सहितो राजन् वैदेह्या लक्ष्मणेन च ॥
त्वं राजा भरत भव स्वयं नराणां
वन्यानामहमपि राजराण्मृगाणाम् ।
गच्छत्वं पुरवरमद्य सम्प्रहृष्टः
संहृष्टस्त्वहमपि दण्डकान् प्रवेक्ष्ये ॥
छायां ते दिनकरभाः प्रबाधमानं
वर्षत्रं भरत करोतु मूर्ध्नि शीताम् ।
एतेषामहमपि काननद्रुमाणां
छायां तामतिशयिनीं शनैः श्रयिष्ये ॥
शत्रुघ्नस्त्वतुलमतिस्तु ते सहायः
सौमित्रिर्मम विदितः प्रधानमित्रम् ।
चत्वारस्तनयवरा वयं नरेन्द्रं
सत्यस्थं भरत चराम मा विषीद ॥
हे भरता, तू आता शत्रुघ्नासह अयोध्येस परत जा, मीही लक्ष्मण आणि सीतेसह शीघ्रच दंडकारण्यात प्रवेश करेन. भरता, तू स्वतः मनुष्यांचा राजा हो आणि मी वन्य पशूंचा राजा होईल. आता तुम्ही अत्यंत हर्षपूर्वक श्रेष्ठ नगरी अयोध्येस जा आणि मीही प्रसन्नतापूर्वक दंडक वनात प्रवेश करीन.
भरता, सूर्याच्या प्रभेसमान करणारे छत्र तुझ्या मस्तकावर शीतल छाया धारण करो. मीही हळूहळू या जंगली वृक्षांच्या घनदाट छायेचा आश्रय घेईन.
अतुल बुद्धी असणारा शत्रुघ्न तुझ्या साहाय्याला राहील आणि सौमित्र लक्ष्मण माझा प्रधानमित्र होईल. आपण चारही पुत्र आपले पिता राजा दशरथ यांच्या सत्यवचनाचे रक्षण करू या. तुम्ही विषाद करू नका.
अयोध्याकाण्डात दशरथाला झालेल्या श्लोकाचे अनुपम वर्णन आलेले आहे. वास्तविक अशी वर्णने हे महाभारताचे वैशिष्ट्य, मात्र वाल्मिकीदेखील त्या वर्णनांनी प्रेरित झाले होते असे मानणे तर्काधिष्ठित होईल.
रामशोकमहावेगः सीताविरहपारगः ।
श्वसितोर्मिमहावर्तो बाष्पवेगजलाविलः ॥
बाहुविक्षेपमीनोऽसौ विक्रन्दितमहास्वनः ।
प्रकीर्णकेशशैवालः कैकेयीवडवामुखः ॥
ममाश्रुवेगप्रभवः कुब्जावाक्यमहाग्रहः ।
वरवेलो नृशंसाया रामप्रव्राजनायतः ॥
यस्मिन् बत निमग्नोऽहं कौसल्ये राघवं विना ।
दुस्तरो जीवता देवि मयायं शोकसागरः ॥
राजा या दुःखाने अत्यंत अचेत झाला होता. परम दुर्लघ्य शोकसमुद्रात निमग्न होऊन तो म्हणाला, "देवी कौसल्ये, मी श्रीरामांशिवाय ज्या शोकसमुद्रात बुडालो आहे, जिवंत असताना तो पार करणं मला अत्यंत कठीण वाटत आहे. श्रीरामांच्या शोकाच्या समुद्राचा वेग फार महान आहे. सीतेचा विरह त्याचं दुसरं टोक आहे. लांब लांब श्वास त्याच्या लाटा आणि भोवरे आहेत. अश्रूचा वेगपूर्वक निर्माण झालेला प्रवाहच त्यास मिळणारा जलप्रवाह आहे. माझं हात आपटणं हा त्यातील मत्स्यांचा क्रीडाविलास आहे. करुण क्रंदनच त्याची महान गर्जना आहे. हे विखुरलेले केसच त्यात निर्माण झालेलं शेवाळ आहे. कैकेयी वडवानल आहे. हा शोकसमुद्र माझ्या वेगपूर्वक होणाऱ्या अश्रुवर्षावाच्या उत्पत्तीचं मूलकारण आहे. मंथरेची कुटिलतापूर्वक वचनंही या समुद्रातील मोठे नक्र आहेत. क्रूर कैकेयीने मागितलेले दोन वर हे त्याचे दोन तट आहेत. आणि श्रीरामांचा वनवास हाच या शोकसागराचा महान विस्तार आहे.
आता शेवटचा श्रीरामाचा प्रभाव वर्णन करणारा नितांतसुंदर श्लोक देऊन हा लेख संपवतो.
रामापासून असलेल्या भयाचे वर्णन करताना मारिच हा भयाकुल होऊन रावणाला म्हणतो,
शरेण मुक्तो रामस्य कथंचित् प्राप्यजीवितम् |
इह प्रव्राजितो युक्तः तापसो अहम् समाहितः ||
वृक्षे वृक्षे हि पश्यामि चीर कृष्ण अजिन अंबरम् |
गृहीत धनुषम् रामम् पाश हस्तम् इव अंतकम् ||
अपि राम सहस्राणि भीतः पश्यामि रावण |
राम भूतम् इदम् सर्वम् अरण्यम् प्रतिभाति मे ||
रामम् एव हि पश्यामि रहिते राक्षसेश्वर |
दृष्ट्वा स्वप्न गतम् रामम् उद् भ्रमामि विचेतनः ||
रकारादीनि नामानि राम त्रस्तस्य रावण |
रत्नानि च रथाश्चैव वित्रासं जनयन्ति मे ||
'या वेळीही श्रोरामांच्या बाणांपासून कशी तरी सुटका करून घेऊन मी पुन्हा जीवदान मिळवलं आणि तेव्हापासूनच संन्यास घेऊन सर्व दुष्कर्मांचा परित्याग करून स्वस्थचित्ताने योगाभ्यासपूर्वक तपस्या सुरू केली. आता मला कोणताही वृक्ष दृष्टीस पडला, तरी त्यात चीरवस्त्र, काळं मृगचर्म आणि धनुष्यधारी श्रीरामच दृष्टीस पडतात. मला ते एखाद्या पाशधारी यमासारखे भासतात. रावणा, मी भयभीत होऊन जातो. मला वाटतं, एकाच वेळी चारही दिशांनी हजारो राम माझ्यासमोर उभे ठाकले आहेत. हे सारं वन राममय होऊन गेल्यासारखं मला वाटतं. राक्षसराज, जेव्हा मी एकांती बसतो, तेव्हा मला श्रीरामांचंच दर्शन होतं. स्वप्नातसुद्धा श्रीरामच मला दर्शन देतात आणि मग मी भ्रमिष्ट आणि अर्धमेला होऊन जातो. रावणा, रामाची मला इतकी भीती बसली आहे की, रत्नं, रथ आदी जी सर्व रकारापासून सुरू होणारी नामं आहेत, तीदेखील कानांवर पडताच माझ्या मनाचा भीतीने थरकाप होतो.
प्रतिक्रिया
31 Oct 2024 - 8:18 am | कंजूस
खूप प्रकाश टाकला आहे रामायणातील श्लोकांवर.
याविषयी काहीच वाचन केलेलं नाही. रामायण वाचण्याबाबत वाचकांची उत्कंठा वाढवेल असा अभ्यासपूर्ण लेख आवडला. रामायण घडलं कधी आणि लिहीलं कधी यावर विद्वानांत वाद आहेतच.
31 Oct 2024 - 8:42 am | कॉमी
खुप छान लेख.
31 Oct 2024 - 11:44 am | नूतन
खूपच अभ्यासपूर्ण लेख. नीट समजून घेण्यासाठी पुन्हा वाचणार.
31 Oct 2024 - 12:47 pm | अमरेंद्र बाहुबली
लेख आवडला.
31 Oct 2024 - 2:38 pm | Bhakti
खुपच उत्तम लेख!
31 Oct 2024 - 3:05 pm | पाषाणभेद
अभ्यासपूर्ण लेखन. लिहीतांना खूप खूप कष्ट घेतलेले जाणवत आहेत.