दिवाळी अंक २०२४ - भक्तीच्या फुलांचा गोड तो सुवास

भटकीभिंगरी's picture
भटकीभिंगरी in दिवाळी अंक
31 Oct 2024 - 6:00 am

भक्तीच्या फुलांचा गोड तो सुवास

देवादिकांमध्ये श्रीकृष्ण हे सर्वजनांत अतिशय प्रिय असे दैवत आहे. अर्जुनाचा परममित्र, आपल्या लाडक्या बहिणीचा - सुभद्रेचा अर्जुनाशी विवाह करणारा भाऊ, सुदामा या गरीब ब्राह्मणाचा मित्र, संकटात द्रौपदीच्या कायम पाठीशी असणारा तिचा सखा, नरकासुराच्या तुरुंगातून हजारो स्त्रियांना मुक्त करून त्यांना निवारा देणारा सुहृद.. कृष्णाचे बालरूप तर इतके मोहक आहे की आजवर त्याची मोहिनी सर्वांवर तशीच कायम आहे. त्याची असंख्य रूपे, मूर्ती, चित्रे, त्याच्यावर अनेक भाषांमध्ये रचलेली गीते भारतात जागोजागी आपल्याला दिसतात, ऐकायला मिळतात. बालपणीचा लोभस, खट्याळ, लाघवी कन्हैया पुढे योगेश्वर कृष्ण झाला. जगताचा गुरू झाला. 'कृष्णम् वंदे जगद्गुरू' या पदाला पोहोचला.

याचे कारण कृष्ण अन्यायाविरुद्ध लढणारा, दुष्टांचे निर्दालन करणारा, संतांचा कैवारी, सज्जनांचे रक्षण करणारा असा दुर्बलांचा आधारस्तंभ होता.

कृष्णाने अनेक राज्ये जिंकली. पण ती इतरांना देऊन टाकली. स्वतः त्याचा उपभोग घेतला नाही. नरकासुराचा पराभव करून त्याच्या मुलाला ते राज्य दिले. जरासंधाचा वध करून त्याचा मुलगा सहदेव यास ते राज्य दिले. कंसाचा वध करून त्याचा पिता उग्रसेन यास त्याचे राज्य दिले. द्वारका नगरी वसवली. त्याचे राजेपदही बलरामास दिले. त्याने कधीही कुठलेही राजेपद स्वीकारले नाही.

'भक्तांच्या या सेवेसाठी,
साधूंच्या हो प्रेमासाठी!
सोडली मी लाज रे..'

वरील उक्तीस साजेसा होता गोपाळकृष्ण. महाभारताच्या युद्धात तो अर्जुनाचा सारथी झाला. रथाचे घोडेही त्याने धुतले. "तू ही कामे का करतोस?" असे त्याला कोणी विचारले, तर "कोणतेही कर्म क्षुल्लक नसते" हे त्याचे उत्तर ठरलेले.

भक्तांवर अपार मायेची पाखर घालणारा हा भक्तवत्सल राणा पुढे विठ्ठलाच्या रूपात भक्तांसाठी पंढरीस आला आणि त्याने आपल्याभोवती भक्तांची मांदियाळीच उभी केली. त्याने भक्तांचे दळण दळिले, धुणे धुतले, गाई राखल्या, भक्तांसाठी मार खाल्ला, स्वतःला कोंडून, बांधून घेतले.. असा हा भावाचा भुकेला श्रीहरी!

नंद-यशोदेच्या राजवाड्यात अनेक दासी होत्या. या दासींमध्ये एक अतिशय कुरूप दासी होती. तिचे नाव जानकी. काळा रंग, ठेंगणी, नकटे नाक, तिरळे डोळे.. एकही अवयव सुरेख म्हणवा असा नाही. त्यामुळे लहानपणापासूनच सगळ्यांकडून कुचेष्टा, अवहेलना, तुच्छताच तिच्या वाट्याला आली. कोणी तिला बरोबर खेळायला घेत नसे. तिला कोणी मैत्रीण नव्हती. त्यामुळे ती कधीच कोणात मिसळत नसे. साऱ्यांपासून दूर, कोणाच्याही नजरेस पडणार नाही अशी दूर दूर राही. कोणाशी फार बोलतही नसे.

अशी ही जानकी अतिशय समंजस होती. अबोल होती, मात्र तिचा आवाज गोड होता. कुठलेही काम चोख, व्यवस्थित करायची. सांगितलेले काम मन लावून, नीटनेटके करायची. रूप नव्हते, पण गुणांनी त्याची भरपाई केली होती. पण गुणांपेक्षा रूपालाच फार महत्त्व दिले जाते, हेच खरे.

पुढे मोठी झाल्यावर ती यशोदेकडे काम करू लागली. यशोदेने जानकीला बागेतून फुले आणणे, कृष्णासाठी गंध उगाळणे, अंघोळ झाल्यावर नेसायची वस्त्रे तयार ठेवणे इत्यादी कामे दिली. यशोदामैय्या जानकीशी सहानुभूतीने वागे. तिने कधी तिचा तिरस्कार केला नाही. बाकीच्यांच्या ती थाऱ्यालाही राहत नसे. तिचा कामातला नीटनेटकेपणा पाहूनच यशोदेने तिला कृष्णासाठी गंध उगाळण्याचे काम दिले होते. इथे काम करायला लागल्यापासून ती खूश होती. कोणी तिच्याशी सलगी करत नसे, पण कोणी कधी चेष्टाही करत नव्हते. जानकीला तसेही एकटे राहायची सवय झाली होती. आपले काम ती मनोभावे करी. यशोदा क्वचित कधीतरी येता-जाता तिला भेटली, तर आपलेपणाने तिची चौकशी करी. काही हवे-नकॊ ते विचारी.

कोणाच्या नजरेस पडू नये, म्हणून जानकी भल्या पहाटे गोकुळ साखरझोपेत असताना यमुनेत स्नान करायला जाई. स्नान झाल्यावर आपल्या झोपडीत जाई. गावाच्या एका टोकाला तिची झोपडी होती. मग आवरून सारे जागे व्हायच्या आता ती राजवाड्यात येई. सहाणेवर गंध उगाळून ताम्हणात काढून ठेवी. कपड्यांच्या घड्या करी. बागेतून फुले आणी. सफासफाई करी. नित्याची इतर कामे करी. हा तिचा नियम कधीच चुकला नाही. आपले सगळे काम झाले की मग ती घरी जाई. इतर सगळ्यांप्रमाणेच जानकीही कृष्णाची भक्त होती. त्याची सारी कामे ती मनापासून करी. कामे झाली की बाजूला होई. ती कधीच कृष्णाच्या समोर जात नसे. मात्र दुरून ती कृष्णाला डोळे भरून पाही. त्याचे रूप मनात साठवून ठेवी. तो तिचा आनंदाचा ठेवा होता.

संध्यासमयी घरी जाताना कधीतरी रानातून कृष्णाच्या बासरीचे सूर ऐकू आले, तर कुठेतरी आडोशाला उभे राहून भान हरपून ऐकत राही. ज्याची इतकी आस होती, त्याच्यासमोर मात्र कटाक्षाने कधी गेली नाही. अशी ही विलक्षण भक्ती.

भक्ती गाजावाजा करीत करा किंवा शांतपणे करा.. थाटामाटात करा किंवा साधेपणाने करा.. मात्र मनापासून केलेली भक्ती देवापर्यंत पोहोचतेच.

एके दिवशी पहाटे नित्याप्रमाणे यमुनेत स्नान करीत असताना अचानक पैलतिरावरून बासरीचे सूर येऊ लागले. आज अशा अवेळी, सारे गोकुळ झोपेत असताना कृष्ण बासरी का वाजवीत आहे? अजून सारे गोप झोपेत आहेत.. गोपिका निजल्या आहेत.. गाईगुरे निजली आहेत.. मग ही बासरी कोणासाठी वाजवली जात आहे? आणि जानकीला जाणवले.. कळले.. ही बासरी माझ्यासाठी वाजत आहे. माझ्यासाठी? होय नक्कीच.. तिला नेहमी वाटे की कधीतरी कृष्णाने आपल्यासाठीही बासरी वाजवावी. पण तिने आपली इच्छा मनातच ठेवली होती. आज तिची मनीषा पुरी झाली. देव भक्ताच्या इच्छा पुऱ्या करतोच.. जानकी भारावली, सुखावली. डोळ्यातून ते सुख वाहू लागले. यमुनेने ते अलगद झेलले.

जानकीच्या अनोख्या तपश्चर्येची साक्षीदार होती यमुना.

प्रतिक्रिया

कंजूस's picture

31 Oct 2024 - 11:24 am | कंजूस

पहाटेची बासरी.