घर सोडून आता तब्बल अठ्ठावीस तास उलटले होते. तीन लांबलचक विमानप्रवास आणि वीट आणणारे त्यातले स्टॉप ओव्हर्स सोसून हातपाय दगड झाले होते. अडीच-तीन तासांचा बस प्रवास अजूनही शिल्लक होता. पुराणकाळात नारद-मुनिंना अवगत असलेल्या टेलीपोर्टेशनचा शोध अजून का बरं कुणाला लावता येऊ नये. “नारायण-नारायण!!!” म्हणत अगदी तिन्ही लोकांत नाही तरी निदान पृथ्वीलोकांत कुठेही लीलया जाऊ शकण्याची किमया विज्ञानाला लवकरच साधता यायला हवी.
तिकिटाच्या रांगेत माझ्या मागे उभा असलेला एक मोरक्कन आणि त्याच्यामागच्या दोन जॅपनीज तरुणी यांचीही गत माझ्यापेक्षा फार काही वेगळी नाही हे त्यांचेही थकले भागले चेहरे स्पष्टच सांगत होते. पण चेहरे बोलके असून काडीचाही उपयोग नव्हता. मराठी, मोरक्कन किंवा जॅपनीज मूक भावना सुद्धा तिकिट खिडकीपलीकडे बसलेल्या स्पॅनिश युवतीच्या आकलनापलीकडल्या होत्या. कदाचित अशा “दीन-चर्या” बघणे हाही तिच्या दिनचर्येचाच भाग असावा. माझ्यापुढच्या दोन-एक प्रवाशांची तिकिटे यथावकाश निघेपर्यंत एक बस डोळ्यादेखत निघून गेली. परिस्थिति ओळखून मोरोक्कन पुढे आला. सफाईदार स्पॅनिश बोलून त्याने झटपट आम्हा चौघांचीही तिकीटे तर मिळवलीच आणि वर भाव खाऊन दोन नविन जॅपनीज मैत्रिणी सुद्धा खिशात घातल्या. भाषा हे विनिमयाचे किती प्रभावी साधन आहे याचा प्रत्यय पुढच्या काही दिवसांत मला सतत येणार होता.
सकाळचे साडे दहा वाजले होते. पुढची बस सुटायला आता थोडा अवकाश होता. आटोपशीर विमानतळापलीकडच्या अवाढव्य लागो अर्जेंटिनो वरून येणारा गार आल्हाददायक वारा, शिणलेल्या शरीराला तजेला मिळवून देत होता. रंगीबेरंगी बस थोडी जुन्या ढंगाची पण आरामशीर होती त्यामुळे आधीच जड झालेल्या डोळ्यांवर जरा झापड आली.
विमानतळाबाहेर हमरस्त्याला लागताना बसने गर्रकन काटकोनात वळून “उठ आता” म्हणत मानेला जोराचा हिसका दिला. पुढच्या अडीच-तीन तासांत निळाशार लागो अर्जेंटिनो, लागो विद्मा आणि त्यापलीकडे लांबच लांब पसरत गेलेल्या अँडीज पर्वतरांगांनी साधी डुलकी सुद्धा लागू दिली नाही.
बहुतांश लोकांना अर्जेंटिना म्हटलं की सर्वप्रथम फुटबॉल मधले ऑल टाईम ग्रेट मॅरेडोना किंवा मेस्सी आठवतील (माझा एक मित्र टेनिस ग्लॅम गर्ल ग्रॅब्रिएला सॅबॅतिनीच्या आठवणीत हरवून जातो), कुणाच्या डोळ्यांसमोर तिथे उगम पावलेला "टँगो डान्स" येईल. एखाद्या दर्दी खवय्याची भूक तिथले सुप्रसिद्ध अर्जेंटेनियन स्टेक्स आणि वाईन आठवून चाळवेल. क्युबन क्रांतिकारक फिडेल कॅस्ट्रोच्या खांद्याला खांदा लावून लढणारा चे गुवेरा अर्जेंटिनाचाच. ओठात सिगार धरलेला, तारांकित बॅरेट हॅट मधला उमदा "चे" आजही बऱ्याच तरुणांच्या टी-शर्ट्स वर दिसेल.
मला मात्र आठवतो तो (कदाचित) ऐंशी-नव्वदच्या दशकातला एक जुना नॅशनल जिऑग्राफिकचा अंक आणि त्यातला बघताक्षणीच भुरळ पाडणारा "माउंट फिट्झ रॉय". जगातल्या या सर्वात लांब पर्वतरांगांमधला फिट्झ रॉय म्हणजे अँडीजचा लखलखता मुकुटमणीच.
एल चॅल्टेनला पोहचेस्तोवर सूर्य पश्चिमेकडे कलला होता. हॉटेलचे आगाऊ आरक्षण न करण्याच्या आगाऊपणाची शिक्षा दोन चार ठिकाणी धक्के खाऊन मिळाल्यावर एकदाची अंग टाकण्याची सोय झाली. गलित गात्रांच्या कुरकुरीला न जुमानता गरम पाण्याने सचैल स्नान केले आणि गाव भटकायला बाहेर पडलो. डोंगरांच्या कुशीतले हे चिमुकले गाव म्हणजे अर्जेंटिनाची गिर्यारोहण पंढरी. अपेक्षेप्रमाणेच हे गाव एकदम “तरूण” होते कारण इतक्या आडबाजूच्या या लहानश्या गावात गिर्यारोहणासाठी म्हणून यायला कमाल वय हा मुद्दा तसा गौण असला तरी धडधाकट शरीर ही किमान अट होती. हॉटेल्स, बॅग-पॅकर्स हॉस्टेलस्, कॅफेज, बेकरीज, रेस्टॉरंट्स् आणि दैनंदिनी लागणाऱ्या सामानाच्या दुकानांची रेलचेल होती. कुणी थकून भागून, दिवसभराची रपेट संपवून परतत होते, कुणी पाठीवरच्या जड सॅक सांभाळत संध्याकाळची एल कलाफातेला जाणारी शेवटची बस पकडायला लगबगीने निघाले होते, काही उद्याच्या भ्रमंतीसाठी आवश्यक असलेली खरेदी करण्यात गुंतले होते तर बरेच जण कॅफेज किंवा बार मध्ये गप्पात रंगले होते. एका रेस्टॉरंटमध्ये अर्जेंटिनियन बियर, मॅलबेक वाईन आणि स्टेकचा आस्वाद घेऊन पोटाची आणि डोक्याची कुरकुर एकदाची थांबवली. दिवस मावळतीकडे झुकला.
स्थानिक पातागोनियन जमातींच्या Tehuelche भाषेत chalten चा शब्दशः अर्थ म्हणजे "स्मोकींग माउंटन". आपल्या गावचे नाव सार्थ करत एकीकडे फिट्झ रॉय शांतपणे ढगात डोकं खुपसून बसला होता आणि दुसऱ्या बाजूला Las Vueltas नदी सकाळच्याच उत्साहाने खळाळत होती.
माझ्यातली मात्र उरलीसुरली राखीव उर्जासुद्धा आता आटली होती. गादीवर पाठ टेकताच काही क्षणांतच गाढ झोप लागली.
ब्राम्हमुहूर्तावर उठून सकाळची आम्ह्निकं उरकली आणि “लगुना दे लॉस त्रेस” च्या मोहिमेवर निघालो. सोसाट्याचा बोचरा वारा, अंधारून आलेले आभाळ आणि पावसाचे हलके तुषार उडवत फिट्झ रॉयने "वॉर्म वेलकम" केले.
रिओ इलेक्ट्रिको नदीवरच्या एका छोट्या पुलावरून सुरू होणारी ही पाऊलवाट गावापासून थोडी दूर आणि (या मोसमात तरी) फार राबता नसलेली होती. पानगळीचा ऋतू नुकताच सुरू झाला होता. इतरत्र कुठेही न आढळणारे बीच लेंगा, बीच निर्रे सारखे उंच वृक्ष तसेच बरबेरिज, ग्वानाको बुश आणि इतर नाना जातींच्या, चटक रंगाच्या खुरट्या झाडा-झुडूपांनी लॉस ग्लेशिअर्स नॅशनल पार्कचे अरण्य गजबजून गेले होते. पांढऱ्या खडीच्या पाऊलवाटेवर वाळक्या काटक्यांनी ठिकठिकाणी सुंदर नक्षी चितारली होती. रिओ ब्लांको नदीच्या बाजूबाजूने मिराडोर ग्लेशियरला नेणारी ही वाट बरोबर आहे याची हमी भरणारे दिशादर्शक अधून मधून दिसत होते. मधूनच उंच लेंगा वृक्षांच्या दाट राईमागून सकाळच्या उन्हात उजळून निघालेले निमुळते पॉइन्सनॉट शिखर डोकावले. फिट्झ रॉय मात्र अजूनही ढगातच होता.
एक गिरकी घेऊन रिओ ब्लँको बाजूच्या डोंगरामागे गडप झाली. आतापर्यंत सहज ओळखू येणारी पाऊलवाट नक्षिदार होत होत शेवटी तिला सामील झाली. दिशादर्शक दिसेनासे झाले. पाण्याचा जोर बघता नदी ओलांडण्याचा प्रश्नच नव्हता. त्यातल्या त्यात एक समाधानाची बाब म्हणजे इथे तरी भाषेची अडचण नव्हती. ना स्पॅनिश मधले फलक वाचायला होते ना कुणी स्पॅनिश वाटाड्या. आजवर केलेल्या भटकंतीत नद्या - नाले, डोंगर, पायवाटा यांची भाषा थोडीफार कळू लागलीय. त्यावर भरवसा ठेऊन गच्च रानातल्या झाडा - झुडूपांशी धक्काबुक्की करत ओढ्याच्या उजव्या बाजूचा डोंगर चढू लागलो. बराच वेळ नसलेली वाट तुडवल्यावर उंचावरचा हवा असलेला व्हॅन्टेज पॉइंट मिळाला. निसर्गपुत्र थोरोही अशाच कुठल्याश्या अनुभवानंतर म्हणाला असेल… “I took a walk through the woods and came out taller than the trees”.
निळ्या स्फटिकांची मिराडोर ग्लेशियर आणि तिच्या पायथ्याचे छोटेसे तळे इथून स्पष्ट दिसू लागले. डोंगराच्या या निमुळत्या धारेखाली एकीकडे मुसंडी मारून आलो ते गर्द रान होतं तर दुसऱ्या बाजूला मोठमोठ्या दगड धोंड्यांचा चाळीस-पंचेचाळीस अंशांचा तीव्र उतार. तोही इतका भुसभुशीत की उतरंडीवरून किती धोंडे निखळून माझ्या सोबतीने उतरतील याचा नेम नव्हता. खाली दरीतल्या प्रचंड शिळा त्याची साक्ष देत होत्या. शेवटी मन घट्ट केलं आणि पाय त्याहीपेक्षा घट्ट रोवत कुठेही न धडपडता सुखरूप पायउतार झालो.
मिराडोर ग्लेशियरच्या थंडगार तळ्यात जरा वेळापूर्वी दरदरून सुटलेला घाम धुतला. निळे स्फटिक वितळून वाहणारा तो चवदार अर्क घोटभर पिऊन तृप्त झालो आणि थोडा वेळ शांतपणे या सुंदर हिमनदीचे दृश्य डोळ्यांत आणि कॅमेरात साठवत बसलो.
जास्त रेंगाळण्याची मात्र इथे मुभा नव्हती. अजूनही बराच लांबचा पल्ला गाठायचा होता. परत एकदा त्या भल्या-थोरल्या शिळांच्या दाटीवाटीमधून माग काढत एका पाऊलवाटेला लागलो.
घड्याळ साडेअकरा दाखवत होते. तुरळक ठिकाणी चिखल-पाण्याचे किरकोळ अडथळे सोडल्यास निसर्गाने पुढच्या वाटचालीत फारसा हस्तक्षेप केला नाही. दुरून आता लोकांचा क्षीण कोलाहल ऐकू येऊ लागला. रांगेने कुठेतरी निघालेल्या मुंग्या अचानक कसल्याशा अडथळ्याने परत फिराव्यात तद्वत एका छोट्या पुलापासून लोकं परत फिरताना दिसत होती. जवळ जातो तो हिरव्या गणवेशातल्या एका फॉरेस्ट गार्डने अडवले. फिट्झ रॉयच्या पायथ्याला असलेल्या लगुना दे लॉस त्रेस तळ्याकडे जाणारी शेवटची पाऊण एक किलोमीटरची, सरळसोट चढणीची वाट अपघात होऊ नये म्हणून या मोसमात बंद केली होती. अर्थात ही आडकाठी मुख्य रुळलेल्या वाटेवरून येणाऱ्या-जाणाऱ्यांना लागू होती. पण या विरुद्ध आडबाजूने कुणी येईल याची त्या बिचाऱ्याने कल्पनाच केली नसावी.
लगुना दे लॉस त्रेसचे दर्शन तर आता शक्य नव्हते. एका पाणथळीशेजारच्या टेकाडावर बसून आदल्या संध्याकाळी एका बेकरीमधून बांधून घेतलेले भूकलाडू काढले. आपल्याकडच्या करंजी सारखा “एम्पनाडास” इथला लोकप्रिय पदार्थ. आतले सारण फक्त आपल्याला हवे तसे सामिष किंवा निरामिष. दोन एम्पनाडास रिचवून एका सपाट पाषाणावर जरा कलंडलो. या वाटेवर पर्यटकांची बऱ्यापैकी वर्दळ असली तरी “शोल्डर सीझन” असल्यामुळे सध्या फिट्झ रॉयच्या शोल्डर्स वर जास्त भार नव्हता. त्यातही स्थानिक अर्जेंटेनियन पर्यटकांच्या तुलनेत परदेशी पर्यटक नगण्य होते. आदल्या दिवशी बसमध्ये भेटलेल्या जॅपनीज पोरी तेवढ्यात गोड हसून हाय हॅलो करून गेल्या. त्यामुळे असेल किंवा पोटात गेलेल्या एम्पनाडासमुळे असेल, थोडी तरतरी आली आणि पाय परत एल चॅल्टेनच्या दिशेला असलेल्या लगुना काप्री कडे चालू लागले. मागे वळून बघतो तो फिट्झ रॉय अजूनही डोक्यातून धूर काढत बसला होता.
लगुना काप्रिला पोहचेस्तोवर थकलेल्या पायांनी माझ्यापुढे हात टेकले. त्यांनी पूर्णपणे असहकार पुकारण्या अगोदर मीच तळ्याकाठच्या गुबगुबीत हिरव्या गादीवर आडवा झालो. पाठीवरच्या सॅकची उशी केली. तळ्यापलिकडे फिट्झ रॉय आता ढगातून मस्तक बाहेर काढून येणाऱ्या-जाणाऱ्या अभ्यागतांकडे बघत होता. फार कुणी महत्वाचं नाही असं लक्षात आल्यावर परत ढगांमागे गडप झाला. समोर पसरलेला तो सुंदर जलाशय, मधूनच झुळुकेसरशी त्यावर उमटणाऱ्या रेघोट्या, त्यामागे मेघ-मंथन करणारा धिप्पाड फिट्झ रॉय आणि त्याच्या अंगाखांद्यावरून ओघळणाऱ्या हिमनद्या बघत इथंच तासन् तास पडून रहावं असं वाटू लागलं. दिवसभर राबून हतबल झालेल्या हाता-पायांचा अर्थातच या कल्पनेला बिनशर्त पाठींबा होता.
उन्हं कलली आणि डोंगरावरची बहुतेक पावलं आता गावाकडे परतू लागली. मीही स्वतःच स्वतःला थोडा धाक, थोडी सायंकाळच्या मेजवानीची लालूच दाखवली आणि अंधार पडायच्या आत गावात पोहोचेन अशा बेतानं डोंगर उतरू लागलो. गावाची वेस अजूनही दीड दोन तास लांब होती. क्षितिजावर लागो विद्मा आरामात ऐसपैस पसरला होता. डावीकडच्या दरीतून Las Vueltas नदी सतत सोबत करत होती. स्थिर न राहता, न थकता, सतत प्रवाही असणं हाच तिचा स्थायीभाव होता.
दिवसभरात उणेपुरे वीस बावीस किमी. पायपीट झाली होती. पहाटे पोटात गेलेले घोटभर प्रोटीन शेक आणि दुपारचे दोन एम्पनाडास एवढ्या तोकड्या भांडवलावर आज बरेच काही कमावले होते. पण आता मात्र सडकून भूक लागली होती.
वाटेवरच्या झाडांच्या बेचक्यातून गावातली रंगीबेरंगी घरटी दिसू लागली. थोड्याच वेळात गावाची वेस लागली. रस्त्याकडेच्या एका छोट्या रेस्टोबार मधून जॅझचे हलकेसे स्वर कानावर येत होते. थकलेले पाय नकळतच तिकडे वळले. बार काऊंटर वर बसताच कोरड पडलेल्या घशातून मला ज्ञात असलेले परवलीचे एकमेव स्पॅनिश वाक्य बाहेर पडले… “उना सर्वेजा पोर फवोर !!!”
क्रमशः
प्रतिक्रिया
6 Jul 2024 - 7:35 am | मिसळपाव
किल्लेदारा, तुला साष्टांग दंडवत रे बाबा. कधी कॅलगरी काय, आता एकदम पॅटॅगोनिया काय, धन्य आहेस. ही सगळी ठीकाणं मी बीबीसीच्या फिल्म्समधे बघतो आणि तू प्रत्यक्ष जाउन आलायस. आणि काय अप्रतिम छायाचित्रं आणि प्रवासवर्णन केलं आहेस - बहोत खूब, बहोत खूब. वाचनखूण साठवली आहे. या सगळ्याचा एक झकास ब्लॉग कर की.
-------------------------------------------------------------
टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.
6 Jul 2024 - 9:25 am | प्रचेतस
आहा....!!!!
जबरदस्त, सर्वच अतिशय सुरेख. एकदम वेगळे, कधीही न पाहिलेले.
6 Jul 2024 - 9:44 am | गवि
अतिशय सुंदर जागा दिसते आहे. रंगांचे वैविध्य तर खूपच. बाकी सर्व देखील आमच्यासाठी अगदी नवीन आणि रुळलेल्या वाटेबाहेरचे आहे.
अर्जेंटिना देश आणखी एका गोष्टीसाठी प्रसिध्द आहे. तो कुप्रसिध्द अँडिज प्लेन क्रॅश. सत्तर दिवस.
6 Jul 2024 - 10:23 am | अनन्त्_यात्री
पुभाप्र
6 Jul 2024 - 10:55 am | Bhakti
स्वर्गीय अनवट वाटा
रंगांच्या ओढून रेषा|
हिम लयीत ओघळती
नीरसंवाद तृप्त भाषा||
-भक्ती
6 Jul 2024 - 1:13 pm | श्रीगणेशा
सुंदर फोटो, रंगांची मुक्त उधळण करणारे!
अन् त्याहून सुंदर शब्दरचना!
6 Jul 2024 - 4:55 pm | मुक्त विहारि
पुभाप्र
7 Jul 2024 - 9:22 am | टर्मीनेटर
वर्णन, फोटोज सर्वच एकदम भारी 👍
सभोवतालच्या अप्रतिम निसर्गात तो छोटासा मानवनिर्मीत पुल पण कसला क्लासिक दिसतोय, एक्सेलेंते!
ग्रासीआस, एस्पेरांदो एल प्रोक्सिमो पार्ते 😀
7 Jul 2024 - 3:31 pm | चित्रगुप्त
खूपच सुंदर आहेत सगळी दृष्ये. ओघवते वर्णन पण खूप छान.
7 Jul 2024 - 6:02 pm | किल्लेदार
7 Jul 2024 - 6:02 pm | किल्लेदार
मिसळपाव - इतकं लिहितांनाच दमछाक होते. ब्लॉग काय लिहिणार. तरीही प्रयत्न जरूर करेन.
प्रचेतस, अनंतयात्री, मुक्तविहारी, श्रीगणेशा, चित्रगुप्त - फार वेगळा प्रदेश आहे हा. जिकडे कॅमेरा फिरवाल तिकडे नवीनच काहीतरी मिळते.
गवि - यावर उत्तम चित्रपट पण आला आहे. "सोसायटी ऑफ द स्नो"
भक्ती - क्या बात! चार ओळीतच सारांश लिहिलात.
टर्मिनेटर - जाऊन या एकदा. स्पॅनिश माझ्यापेक्षा नक्कीच जास्त येतेय तुम्हाला :)
10 Jul 2024 - 4:32 pm | टर्मीनेटर
जायला नक्कीच आवडेल पण, गिर्यारोहणाची आता बिलकुल आवड राहिली नसल्याने 'रॉय'ला दुरुनच सॅल्युट मारुन परत यावे लागेल 😀
छे हो, कुठलं काय! इथे तिथे भेटलेल्या काही स्पॅनिश व्यक्ती आणि चार-पाच मित्रांच्या कृपेने थोडेफार स्पॅनिश शब्द माहिती झाले होते. 'नार्कोस' ही वेबसिरीज पहिल्यांदी पाहिली होती तेव्हा त्यातले बरेचसे संवाद स्पॅनिशमध्ये असल्याने ती खुप आवडली असली तरी काहीसा रसभंग झाला होता. मग तिची पारायणे करताना ते संवाद समजुन घेण्यासाठी स्पॅनिश शिकण्याचा अल्पकाळ प्रामाणिक प्रयत्नही केला होता ज्यातुन आणखीन काही शब्द (आणि शिव्या 😀) मुखोद्गत झाल्या होत्या. समोरचा 'पाब्लो एस्कोबार' सारख्या लहेजात बोलत असेल तर चार वाक्यांपैकी एक-दोन वाक्यांचा अर्थबोध होतो पण बरेचसे डोक्यावरुन जाते. आणि शब्द माहिती असले तरी वाक्यरचना काही जमत नाही बुवा, त्यासाठी इंग्लिश - टु - स्पॅनिश ची जालिय मदत घ्यावीच लागते 😂
12 Jul 2024 - 12:02 am | किल्लेदार
:)
8 Jul 2024 - 9:59 am | गोरगावलेकर
फोटो नेहमीप्रमाणेच जबरदस्त
8 Jul 2024 - 10:17 am | कांदा लिंबू
किल्लेदार,
फोटो व निवेदन अप्रतिम.
हे तुमच्या सगळ्याच धाग्यांतील फोटो व निवेदनांना लागू आहे!
8 Jul 2024 - 1:48 pm | चांदणे संदीप
अर्जेन्टिना नुसतं मॅप वरच पाहिलंय. अधुन मधून गुगल मॅप वरून चक्कर मारून येतो.
सर्वंच छायाचित्रे पाहून डोळ्यांचे पारणे फिटले. लेखनसुद्धा सुरेख.
सं - दी - प
8 Jul 2024 - 2:24 pm | बिपीन सुरेश सांगळे
अप्रतिम जबरदस्त !
8 Jul 2024 - 6:40 pm | स्वधर्म
खूप आवडले.
9 Jul 2024 - 2:00 pm | नि३सोलपुरकर
जबरदस्त .
_/\_.
9 Jul 2024 - 7:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फ़ोटो, वर्णन, सगळं नंबर वन.
पैकीच्या पैकी गुण दिले जात आहेत.
-दिलीप बिरुटे
10 Jul 2024 - 12:52 am | रामचंद्र
अद्भुत!
12 Jul 2024 - 12:07 am | किल्लेदार
गोरगावलेकर, कांदा लिंबू, बिपीन सुरेश सांगळे, स्वधर्म, नि३सोलपुरकर, प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, रामचंद्र - धन्यवाद.
चांदणे संदीप - गूगल मॅप सारखा विरंगुळा नाही. मी गूगल मॅप वर पडीक असतो. सर्व ठिकाणी प्रत्यक्ष जाता येईलच असे नाही.
12 Jul 2024 - 8:19 am | अथांग आकाश
अप्रतिम लेख आणि छायाचित्रे! पुभाप्र!!
17 Jul 2024 - 8:25 pm | किल्लेदार
:)
30 Jul 2024 - 3:23 pm | चोपदार
हे खरे प्रवास वर्णन ! फोटो तर अगदिच कातिल आहेत. एका सुन्दर स्वप्नासारख वाटल वाचुन . मस्तच
30 Jul 2024 - 7:26 pm | कंजूस
अगदी छान देश आहे हा.
वर्णन आणि फोटो सुंदरच.
30 Jul 2024 - 7:54 pm | श्वेता२४
नावावरून हे प्रवास वर्णन आहे हे आधी वाटलेच नाही. त्यामुळे बहुदा माझ्याकडून आधी वाचले गेले नसेल. काय सुरेख वर्णन केले आहे हो तुम्ही!!! फोटो तर काय वर्णावे!!! खरोखर ही जागा स्वर्गीय आहे. कधी जायला मिळेल असे वाटत तर नाही. तुमच्यामुळे या जागेची सुंदर भ्रमंती करून आल्यासारखे वाटले.....सुंदर
31 Jul 2024 - 9:42 pm | नठ्यारा
किल्लेदार,
प्रत्ययी वर्णन आहे. वर म्हटलंय तसं स्वत:च गेल्याचा भास होतो. खुसखुशीत लेखनशैलीही विशेषकरून आवडली. लिहिते राहा.
आ.न.,
-नाठाळ नठ्या
2 Aug 2024 - 6:17 am | किल्लेदार
चोपदार, कंजूस, नठ्याऱ्या, श्वेता - धन्यवाद.
श्वेता - कधी जायला मिळेल असे वाटत नाही म्हणू नका. उलट आता प्रत्यक्ष जायची इच्छा ठेवा :)
नठ्याऱ्या - मलाही अजून कधीतरी तिथेच असल्याचा भास होतो ;)
2 Aug 2024 - 6:47 am | गवि
अगदी सकारात्मक बोललात.
पण आमचे पर्यटन (मी स्वतः पुरते बोलू शकतो पण ते प्रातिनिधिक असावे) हे अनेक गोष्टींनी मर्यादित असू शकते.
सुट्टी, बजेट याची सोय केली समजा, तरीही एकूण किती वेळा परदेशात टूर करता येईल याची संख्या मर्यादित असते हे सत्यच. अशा वेळी ठिकाणांच्या यादीत अर्जेंटिना किंवा पेरू किंवा ग्वाटेमाला हे देश सुरुवातीच्या नंबरांत ठेवणे शक्य होत नाही. ते बकेट लिस्टमध्ये टाकले तरी त्या आधी खूप यादी असते, तीच पूर्ण होणे अवघड. उदा. इथिओपिया, टुवालू , सामोआ पर्यंत पोचणे अवघड.
अशा अर्थाने वर कोणी म्हटले असावे की जाणे अवघड आहे किंवा जमेल असे वाटत नाही.
अशी अनवट ठिकाणे आम्ही तुमच्या नजरेतून (आणि पॅसेंजर परमवीर किंवा तत्सम भटक्या लोकांच्या व्हिडीओत) पाहू शकतो हे आनंदाचे आहे. धन्यवाद.
3 Aug 2024 - 12:12 pm | सरनौबत
बकेट लिस्टमध्ये अनेक आहेत ...त्यातल्या 'बजेट लिस्ट' मध्ये जेवढ्या बसतात तेवढ्याच करता येतात
3 Aug 2024 - 2:43 am | राघव
सुंदर फोटो आणि लेख! _/\_
3 Aug 2024 - 3:27 am | किल्लेदार
गवि - खरंय. सर्व ठिकाणी प्रत्यक्ष जाता येईलच असे नाही. माझीही इच्छा आणि इच्छापूर्ती यामध्ये वीस - पंचवीस वर्षांचा काळ लोटलाच. पण इच्छा ठेवायलाच हवी ;)
राघव - धन्यवाद
3 Aug 2024 - 12:10 pm | सरनौबत
कमाल किल्लेदार !!! अतिशय सुरेख वर्णन आणि फोटो
5 Aug 2024 - 10:35 am | मार्गी
केवढं भयानक अप्रतिम आहे हे!!! अँडीज पर्वत!! तो ट्रेक, फोटो, निसर्ग सर्वच फार फार भयाण आहे हो.
19 Aug 2024 - 5:47 pm | अभिजीत अवलिया
अप्रतिम आहे…
22 Aug 2024 - 6:44 am | किल्लेदार
:)
22 Aug 2024 - 6:46 am | किल्लेदार
:) सरनौबत, मार्गी, अभिजित - धन्यवाद