मी खऱ्याखुऱ्या भिंतिविषयी बोलतो आहे. आभासी नव्हे. भिंत हा एक भारी प्रकार आहे. भिंतीविषयी उगाच एक नकारात्मक भावना जोडलेली आहे. भिंतीवर कितीतरी सुंदर गोष्टी सुद्धा असतात. म्हणजे छानशा पेंटिंग्ज, देवाचा फोटो, एकत्र कुटुंबाचा फोटो, वगैरे. ह्या भिंतीविषयी सुचण्याचे कारण म्हणजे, आज बाजारात फिरत असताना रस्त्यावर पोस्टर विकणारी एक बाई दिसली. कधी काळी मला हे पोस्टर्स फार आवडायचे. माझ्या रूम मध्ये वाकुल्या दाखवणाऱ्या tom च एक पोस्टर होतं. त्यानंतर एका रूम मध्ये आधी राहणाऱ्या एका मुलाने काही अप्रतिम म्हणावेत असे ऐश्वर्या रॉयचे फोटो लावले होते. काही महाभाग फारच शौकीन असायचे. ह्याबाबतीत वृत्तीने स्वदेशी नसल्यामुळे विदेशी नट्या त्यांच्या भिंतीवर असायच्या. त्यांचें (म्हणजे नट्यांचे) चेहरे लक्षात असायचं एकही कारण तेव्हाही नव्हतं आणि आता तर प्रश्नच नाही. काही वृत्तीने धार्मिक असणारे मित्र पण होते म्हणजे राजू रस्तोगी टाईप. अशा एखाद्या मित्रामुळे रूमवर नाईलाजाने का होईना सेन्सॉर असायचा. कारण हनुमानाच्या फॉटोसमोर फक्त निरुपा रॉय किंवा सुलोचना दीदी ह्या दोघींचे फोटो लावता आले असते. आमच्या एका मित्राला एक हिरोईन आवडायची, कीर्ती रेड्डी नावाची. तिला स्वतः ला सुद्धा आठवत नसेल की आपण हिरोईन होतो म्हणून. तर त्याची एक क्रश होती जी त्याला कीर्ती रेड्डी वाटायची. त्या खऱ्या कीर्तीच्या बापाला हे कळलं असतं तर त्याने आमच्या मित्राला थेट जंगलात नेऊन सोडलं असतं. तर ह्या मित्राने कुठून तरी कीर्ती चा एक फोटो आणून दुसऱ्या एका मित्राच्या रूमवर लावला होता कारण तो लोकल होता आणि घरच्यांनी लई धुतला होता त्याला बारावीला हे बघतो म्हणून. आम्ही पण मग त्याला वाईट वाटू नये म्हणून रोज तो फोटो बघायचो. बारावीला भावना फार तीव्र असतात, काय करणार?
अजून एक फोटो मात्र नक्की असायचा तो म्हणजे अरनॉल्ड शिवाजीनगरचा! त्याच्या सारखी बॉडी बनवण्याच स्वप्न प्रत्येक मुलानं किमान एकदा तरी पाहिलेलं असतं. क्वचित एखाद्या कडे सिल्वेस्टरचा rambo असायचा किंवा ब्रुस ली सुद्धा. ह्याजोडीला काही क्रीडाप्रेमी असायचे. त्यातही शंभरात 95 वेळेला सचिनचं असावा असा काही नियम होता. काही बंडखोर मुद्दाम हून गांगुली किंवा धोनीचा फोटो आणून लावायचे. एकाने उगाच तो काहीतरी वेगळा आहे असं दाखवण्यासाठी कुठल्यातरी फुटबॉल प्लेअरचा फोटो आणून लावला होता पण कोणीही त्याला त्याबाबतीत विचारलं नाही. राजकारण्यांपैकी मी फक्त बाळासाहेब ठाकरे ह्यांचेच फोटो भिंतीवर पाहिले आहेत. मोठे स्वप्न बघणारा एक वर्ग असायचा, ते थोडे सुखवस्तू घरातले असायचे. ते आवर्जून कारचे पोस्टर लावायचे. ह्या कार अर्थातच त्यांनी इंग्रजी सिनेमा मध्ये पाहिलेल्या असायच्या. त्यांना त्याविषयी बोलायला फार आवडायचं.
मुलींच्या रूम मध्ये कोणाचे पोस्टर्स असतील हे जाणून घ्यायची फार उत्सुकता असायची पण त्यांच्या हॉस्टेल वर जाणं शक्य नव्हतं. ज्या मुली हॉस्टेल वर राहत नसतं त्यांच्याकडे गेल्यावर मात्र (कशासाठी?) निराशाच पदरी पडत असे (म्हणजे पोस्टर्सच्या बाबतीत). एका मैत्रिणीकडे मी हृतिक रोशन च पोस्टर पाहिलं होतं असं अंधुक आठवतं. एक तर त्यांची खोली अगदी टापटीप. आम्हाला असं राहायची सवय नसायची. त्यामुळे इतकं लक्ष कोण देणार?
एका मित्राने एक भारी पोस्टर आणलं होतं. ज्यात My room my rules अशा मथळ्याखाली बरेच मजेशीर नियम लिहिले होते. आणि प्रचंड अस्ताव्यस्त म्हणता येईल अशा रूमचे चित्र होते आणि त्यात एकदम आनंदी असणारा असा मुलगा होता. रूम मध्ये आला आहात तर कुठल्याही गोष्टीची तक्रार चालणार नाही अशी सक्त धमकी त्यात दिली होती. एक मठ्ठ मित्राने "मी प्रत्येक दिवशी प्रत्येक बाबतीत जास्तीत जास्त सुधारत आहे" हे वाक्य मोठ्या छान अक्षरात लिहिले होते. ज्याची आम्ही फुल्ल उडवायचो (काय ते समजून घ्या).
आज विचार आला की आज जर बॅचलर आयुष्यात असतो तर मी कुठलं पोस्टर घेतलं असतं. टॉम सारखं आयुष्य रोज वाकुल्या दाखवतं, ते नको. अरनॉल्ड पण आता म्हातारा झाला आहे. ऐश्वर्या रॉय संसारात रमली आहे. सचिन सुद्धा निवृत्त झाला आहे. आणि लग्न झाल्यामुळे My room my rules असं फक्त मनातच म्हणू शकतो. त्यामुळे पर्याय सुद्धा नाहीत. बघू कधीतरी सापडेल साजेसे पोस्टर. फक्त भिंत कोरी राहायला नको.
अमोल कुलकर्णी
प्रतिक्रिया
25 Jun 2024 - 7:36 am | चित्रगुप्त
आता शौकीन लोकांच्या मदतीला कृबु हात जोडून उभी आहे. अगदी अलादीनच्या राक्षसासारखी आज्ञाधारक. नुस्ता हुकूम करा की हवे ते लगेच समोर येते. लागा उद्योगाला.
भिंती भरुन टाका प्रिंटौट काढून.
25 Jun 2024 - 7:55 am | चित्रगुप्त
रमलचित्रांबद्दलचे आमचे दोन लेख बघितले का ?
25 Jun 2024 - 11:02 pm | चौथा कोनाडा
मस्त !
26 Jun 2024 - 11:37 am | कांदा लिंबू
आवडलं मुक्तक.
+१