सह्याद्रीच्या बाजूबाजूने एक रोडट्रिप

प्रचेतस's picture
प्रचेतस in भटकंती
16 May 2024 - 10:55 am

बर्‍याच महिन्यात आम्हा तिघा मित्रांची निखळ अशी रोडट्रिप केली नव्हती, तो योग अचानक आला. मित्राने नवी कोरी इनोव्हा हायक्रॉस हायब्रीड घेतली होती, पण त्यातून आमचं फिरणं झालं नव्हतं. सरता पावसाळा होता. १६ सप्टेंबरची रात्र. मित्राचा रात्री साडेअकराला फोन आला. मी नेहमीप्रमाणेच लवकर झोपत असल्याने झोपेतच फोन घेतला. "अरे आपल्याला उद्या पहाटे पाच साडेपाचला माळशेजला जाण्यासाठी निघायचंय, तेव्हा तयार राहा, 'दुसराही येतोय" बरं म्हणालो. मी रोजच तसाही पहाटे पाचलाच उठत असल्याने गजर लावायची गरज नव्हती. साडेचार पावणेपाचला उठलो, आवरत होतोच तितक्यात पहिल्याचा फोन आला. "अरे आपल्याला मुक्काम करायचाय आणि उद्या संध्याकाळी परत येऊ", मी म्हणालो, अरे त्या दुसर्‍याला रविवारी एका दहाव्याला जायचंय तेव्हा तो मुक्काम करायचा नाही", पहिला बघू म्हणाला. नेमके माझ्याकडे त्या पहाटे कधी नव्हे ती वीज गेलेली. अंधारात कपडे शोधणे महमुश्किल काम असतं, तसंच आवरलं आणि मुक्कामाच्या कपड्यांचा सेट सॅकमध्ये टाकला, तेव्हढ्यात पहिला पोहोचलाच. वाटेत त्याने दुसर्‍याला फोन करुन कपड्यांचा एक्स्ट्रा सेट घेऊन ठेव असे सांगितलेच होते. पावणेसहापर्यंत दुसर्‍याच्या घरापर्यंत पोहोचलो. तो मुक्कामाला यायला तयार नव्हता पण त्याला आम्ही बोललो, " तू इतरांच्या दहाव्याला जातोस पण तुझ्या दहाव्याला आम्हीच येणार आहोत तेव्हा गुपचूप चल" असे बोलून त्याला सेंटी केला आणि आम्ही निघालो.

आठ वाजेपर्यंत आकाशला पोहोचलो. मस्तपैकी नाष्टा केला आणि आळेफाट्यावरुन माळशेज घाटाच्या दिशेने निघालो. पाऊस अजिबात नव्हता मात्र वातावरण एकदम ढगाळ, मस्त होते. ओतूर गेल्यावर सह्याद्रीची सुरेख रांग दिसू लागते. उजवीकडे हटकेश्वर तर डावीकडे पिंपळगाव जोगा धरणाचा जलाशय. हटकेश्वराच्या माथ्याभोवती ढगांवर फेर धरला होता. करंजाळे, जिथून शिंदोळा दिसतो, तिथपर्यंत रस्ता अगदी मख्खन होता. मात्र वेळ खिंडीपासून पुढचा रस्ता प्रचंड खराब, खड्डेयुक्त. खिंड पार करुन अगदी हळूहळू पुढे सरकत होतो. आता उजवीकडे मात्र ढग मात्र धरणावर उतरले होते, पावसाला सुरुवात झाली होती. माळशेजला जाण्याआधी खुबीच्या अलीकडे खिरेश्वरला वळून नागेश्वर मंदिर आणि तिथले लेणे आम्हाला बघायचे होते. मात्र धुक्याचा लपेटा इतका वाढला होता की खिरेश्वर फाटा अजिबातच दिसला नाही. तसेही एव्हढ्या गडद धुक्यात तिथे जाण्यातही काही पॉईंट नव्हता. आता धरणाचा फुगवटा तर धुक्यात पूर्णपणे दिसेनासा झाला होता. बाजूलाच मस्त गवताळ खडकाळ मैदान दिसत होते. साईडला गाडी थांबवली आणि निसर्गाचे विभ्रम बघत बसलो.

a

मध्येच एक चिखलभरली वाट अज्ञाताकडे जात होती

a

सगळीकडं हिरवंगार झालं होतं.

a

इथून माळशेज घाट अगदी जवळ. मुक्कामासाठी माळशेज एमटीडीसीसारखी उत्तम जागा इतरत्र नाही. वाटलं होतं, आज आख्ख्या पर्यटक निवासात आम्हीच असू, अगदी आतमध्ये शिरल्यावर देखील कोणीच दिसत नाही. बुकिंग काऊंटरवर खोलीची चौकशी केली तर सगळं फुल. म्हटलं ठिके, हरकत नाही, इथं नाही तर दुसरीकडे बघू. एमटीडीसी मात्र सह्याद्रीच्या मुख्य धारेला लागूनच असल्याने दरी बघण्यासाठी येथेच पाठच्या बाजूला आलो. आलो तर काय सगळंच धुकटात बुडून गेलेलं. धुकटंही वर वर चढू लागलेलं, इतकं की परतीची वाट हरवून जावी.

a

a

सप्टेंबरचे दिवस असल्याने पाऊस उणावला होता, सोनकी फुलायला लागली होती.

a

गाडी काढून घाट रस्त्याला लागलो. वाटेत मुक्कामाची शोधली, त्यात कशेळेनजीकचं एक फार्म हाऊस उपलब्ध दिसलं ते बुक करुन टाकलं. घाटात अजिबात पाऊस नव्हता, धबधब्यांना अगदी बारीक पाणी होतं, गर्दीही नव्हती. ढग मात्र अगदी ओथंबून आले होते.

a

घाट पूर्ण उतरल्यावर काही विशिष्ट ठिकाणांवरुन सह्याद्रीची अप्रतिम धार दिसते. मात्र ढगांमुळे ती आज लुप्त झाली होती. एका हॉटेलवर चहा घेण्यासाठी थांबलो. तिथून सह्याद्री अतिशय सुंदर दिसत होता.

a

इथले खरे आकर्षण म्हणजे भैरवगडाच्या सुळक्याचे जो येथून अप्रतिम दिसतो पण तो ढगांच्या बुरख्याआड पूर्णपणे झाकला गेला होता. ढगांची चादर हटावी म्हणून थोडी प्रतिक्षा केली आणि त्याने हलकेच दर्शन दिले.

ढगांआड झाकलेला भैरवगड

a

ढगांचा पडदा हटल्यावर त्याचे झालेले रौद्र दर्शन

a

काय ती देखणी कातळभिंत

a

भैरवगड पाहून पुढे निघालो, नानाचा अंगठा मात्र झाकलेलाच राहिला, तिकडच्या ढगांनी त्याला काही डोके वर काढू दिले नाही. रस्त्याच्या आजूबाजूला हिरवे हिरवे गार गालिचे सर्वत्र पसरलेले दिसत होते.

a

a

येथून जाताना सह्याद्रीची आहुपे घाटाकडील बाजू दिसते, आहुपे घाट, सिद्धगड अगदीच जवळ दिसतो. सह्याद्रीची आडवी पसरलेली कातळभिंत सतत आपल्या डावीकडे दिसत असते.

a

आहुपे घाट, सिद्धगड, गोरखगड

a

गोरखगड आणि मच्छिंद्र सुळक्याचे अगदी जवळून वेधक दर्शन होते.

a

बेलाग सह्याद्री

a

वाटेत निसर्गाने परत सामावून घेतलेले एक टुमदार पण पडिक घर दिसले.

a

कशेळे गावातून फार्महाऊसला आलो, दुपारचे जेवण केले आणि गप्पा मारत बसलो. अधून मधून जोरदार सरी बरसत होत्याच. येथून कोथळीगडाच्या पायथ्याची आंबिवली सताठ किमीवर, रात्री अंधारात थेथे जाऊन फेरफटका मारुन आलो. . दुसर्‍या दिवशी येथे उजेडात यायचेच होते. रात्री निवांत गप्पा मारून सकाळी परत भटकायला निघालो.

आंबिवलीच्या वाटेवरुन पदरगडाचे जबरदस्त दर्शन होते.

a

तर उजवीकडे कोथळीगड दिसत राहतो.

a

समोर तर आख्खी भीमाशंकराची रांग दिसत राहते. येथे सोलनपाडा नावाचे लहानसे धरण आहे. ऐन पावसाळ्यात येथे तुफ्फान गर्दी असते, पण आता सरत्या पावसाळ्यात येथे फक्त आम्हीच होतो. विलक्षण सुंदर असे ठिकाण. धरणाच्या मुख्य बांधाच्या खाली विविध पातळ्यांवर पायर्‍यांसारखे लहान लहान बांध आहेत, त्यावरुन पाणी फेसाळत वाहात असते. तर ह्याच्याच अगदी पुढ्यात भीमाशंकर डोंगररांगेची अजस्त्र भिंत

a

सोलनपाड्याच्या इथून दिसणारा पदरगड आणि भीमाशंकरची रांग

a

सोलनपाडा धरण

a

सोलनपाड्याच्या पाठीमागील भीमाशंकर रांगेत आहे खेतोबा आणि येथून जवळच वाजंत्री घाटाने भीमाशंकरास जाता येते.

भीमाशंकर रांग

a

भीमाशंकर रांग

a

तर उजव्या अंगाला कोथळीगडाचे दर्शन सतत होत राहते.

a

सोलनपाड्यावरुन परत माघारी फिरलो. येथे आंबिवली गावाच्या जवळच आहेत आंबिवली लेणी. मुख्य रस्त्यापासून थोड्या आतल्या बाजूला नदीच्या काठावरील डोंगरातील खडकात हे बौद्ध शैलगृह खोदले गेले आहे. येथे चैत्य नसून केवळ एक विहार आहे. व्हरांड्यात असलेले पर्सिपोलिटन धर्तीचे स्तंभ, आतमध्ये एक मोठा विहार आणि विहारात असलेले विश्रांतीकक्ष अशी याची रचना. ओसरीतील स्तंभांवर एक ब्राह्मी लिपीतला शिलालेख आहे, ज्याची अक्षरे पुसट झाल्याने ह्याचे वाचन नीट करता येत नाही. स्तंभांवर कसलेली कोरीव काम नाही. चौरसाकार तळखडा, त्यावर अष्टकोनी स्तंभ, त्यावर उपडा घट, त्याच्यावर आमलक आणि त्यावर हर्मिकेसारख्या उतरत्या पायर्‍यांची रचना. असे एकूण चार स्तंभ येथील छताला आधार देत आहेत.

आंबिवली लेणी

a

प्रवेशद्वाराच्या दोन्ही मुख्य स्तंभांच्या तळखड्याच्या चौकटीत दोन द्वारपाल कोरलेले आढळतात.

a

एका स्तंभावर एक शिलालेख कोरलेला आढळतो.

a

विहारांतील विश्रांतीकक्षात नंतरच्या काळात हिंदू देवतांच्या मूर्ती स्थापन केलेल्या आढळतात.

a

विहार

a

एकंदर स्थापत्यशैलीवरुन आंबिवलीचे हे बौद्धलेणे इसवी सनातल्या दुसर्‍या/ तिसर्‍या शतकातले असावे असे वाटते.

a

लेणीच्या पुढ्यातच वाहती नदी आहे. उन्हाळ्यात ही सुकून जात असणार.

a

a

आंबिवली लेणी पाहून आम्ही परतीचा प्रवास सुरु केला आणि कर्जत खोपोली मार्गाने जुन्या मुंबई पुणे महामार्गाने परत आलो. माळशेज घाटाने उतरुन बोरघाटाने वरती आल्यामुळे वाटेत सह्याद्रीच्या डोंगररांगा, कडे, सुळके, किल्ले, लेणी, नद्या, झाडी अशा विविधांगांचे सुरेख दर्शन झाले.

प्रतिक्रिया

प्रसाद गोडबोले's picture

16 May 2024 - 12:15 pm | प्रसाद गोडबोले

अहाहा .

सुंदर प्रचि. वल्ली सर !

असे हे हिरवेगार फोटो पाहुन भर उन्हाळ्यात गार गार वाटलं !

लिहित रहा :)

असे हे हिरवेगार फोटो पाहुन भर उन्हाळ्यात गार गार वाटलं !

अगदी हेच म्हणते. वर्णन धावत वाचलं, फोटोंतली हिरवाई मात्र डोळ्यात भरून घेतली. :)
स्नेहा

Bhakti's picture

16 May 2024 - 12:26 pm | Bhakti

क्या बात है!
गडांची नावे कशी घडाघडा सांगता/लिहिता+१
आम्ही तर "काय डोंगर,काय झाडी,काय होटेल सगळी काही ओक्के" इतकंच वर्णन केलं असतं.

चौथा कोनाडा's picture

16 May 2024 - 12:50 pm | चौथा कोनाडा

वाह, क्या बात हैं !

Lovethree123

ऐन कडक उन्हात डोळ्यांना जबरदस्त गारवा !
प्रचि .... भन्नाट ... पण दरवेळी किती कौतुक करणार ?

बाकी म्हंजे.. माळशेज तुफान स्पॉट आहे ... पावसाळ्यात तर डोळ्यांचं पारणं फिटतं !
एमटीडीसी रिसॉर्ट आन मागचा परिसर एक नंबर !
हिरवा कंच निसर्ग, पाण्याचे वाहते प्रवाह, त्यांचं संगीतकल्लोळ, डोंगरावर उतरलेले ढग... सगळंच अवर्णनीय !
ढगांच्या धुक्यात हरवून जायची मजाच वेगळी !

आता या पावसाळ्यात जायलाच पाहिजे !
धन्यवाद, प्रचेतस !

आंबिवली लेणी येथेच कट्टा(कशेळे कट्टा) झाला होता.

गोरगावलेकर's picture

16 May 2024 - 1:01 pm | गोरगावलेकर

ऐन उन्हाळ्यात पावसाळी भटकंतीचे फोटो टाकून गारेगार केले.

सगळेच फारच सुंदर. मला निष्पर्ण वृक्ष, अज्ञाताकडे जाणारी चिखलभरी वाट, आणि पडके घर फारच भावले.
ब्राम्ही लिपी आणि पर्सिपोलिटन स्तंभ यासंबंधी थोडी माहिती द्यावी ही विनंती. असेच भटकत रहा आणि लिहीत रहा.
धार जवळच्या बाघ गुफांच्या डोंगरावरील झाडी कापली गेल्याने त्या गुफा नष्ट झाल्या असे पन्नास वर्षांपूर्वी मांडवच्या विश्वनाथ शर्मा यांनी सांगितले होते, ते आठवले. फार अद्भुत होते वृद्ध शर्माजी. यावेळी मांडवला गेलो होतो तेंव्हा त्यांच्या घराची झालेली पडझड बघून फार वाईट वाटले होते. आम्ही त्याकाळी मांडवला गेलो की त्यांच्याकडे रहायचो. त्याकाळी मांडवमधे शंभर रुपयात प्लॉट मिळायचा. शर्माजी म्हणायचे की तू एक प्लॉट घे, त्यावर मी झोपडी/स्टूडियो बांधून देईन. पण तेंव्हा शंभर रुपये पण माझ्याकडे नव्हते.

आत्ताच 'पर्सिपोलिस' आणि 'ब्राम्ही'बद्दल शोध घेता खालील प्रतिमा सापडल्या:
.
"The Burning of Persepolis", led by Thaïs, 1890, by Georges-Antoine Rochegrosse

.
याच चित्रकाराचे एक आगळे वेगळे युद्ध-चित्र. The Battle of Macar.

.

.
.

.
इ.स. ३००-५०० काळातील एक ब्राम्ही लिपीतील शिलालेख.

प्रचेतस's picture

17 May 2024 - 9:06 am | प्रचेतस

धन्यवाद काका.

ब्राम्ही लिपी आणि पर्सिपोलिटन स्तंभ यासंबंधी थोडी माहिती द्यावी ही विनंती.

ब्राह्मी लिपी: प्राचीन भारतात लिहिण्यासाठी ही लिपी प्रामुख्याने वापरली जायची. इसवी सनपूर्व तिसर्‍या/ चौथ्या शतकापासून इस ६ व्या/७ व्या शतकापर्यंत तिचा काळ गणला जातो. प्राकृत, संस्कृत, पाली, अर्धमागधी, शौरसेनी अशा विविध भाषांमधील लिखाण ब्राह्मीतच केले जायचे. जेम्स प्रिन्सेपने ब्राह्मी लिपी डिकोड केल्यावर आख्ख्या भारतातील ब्राह्मी लेखांच्या अर्थांचा खजिनाच सर्वांसमोर उघडा झाला.

पर्सिपोलिटन स्तंभ: पर्शिया (आताचा इराण) मधील हे प्राची शहर. एकदम कलासंपन्न. येथील स्तंभांवर काल्पनिक पशूपक्ष्यांची रचना असे. सातवाहनांच्या ग्रीक, पर्शियनांमधील व्यापारामुळे कलेचेही आदानप्रदान झाले. तिकडील धर्तीचे स्तंभांचे कोरीव काम इकडील लेण्यांत करण्यात आले. उपरोक्त आंबिवली लेणीतील स्तंभ अस्सल पर्सिपोलिटन धर्तीचे असे म्हणता येणार नाही कारण त्यावर पशूपक्ष्यांची जोडी नाही. ते साधेच आहेत, फक्त एकंदर चना त्यासम आहे. मात्र बेडसे लेणी, नाशिक लेणीतील स्तंभ त्या धर्तीचे आहेत असे निर्विवादपणे म्हणता यावे.

प्राकृत, संस्कृत, पाली, अर्धमागधी, शौरसेनी अशा विविध भाषांमधील लिखाण ब्राह्मीतच केले जायचे. जेम्स प्रिन्सेपने ब्राह्मी लिपी डिकोड केल्यावर आख्ख्या भारतातील ब्राह्मी लेखांच्या अर्थांचा खजिनाच सर्वांसमोर उघडा झाला.

--- म्हणजे बघा . एका इंग्रजाने एवढे अवघड कार्य तडीस नेले त्यामुळे किती फायदा झाला. उठसूट इंग्रजांना शिव्या घालण्याची अनेकांची मनोवृत्ती असणारांनी अशीही उदाहरणे बघावीत
प्रचेतस भौ, तुम्ही 'इंग्रज्/पाश्चात्यांचे भारतीय संस्कृती संबंधित योगदान' असा एक लेख लिहावा ही विनंती.

मार्गी's picture

16 May 2024 - 3:33 pm | मार्गी

निव्वळ अप्रतिम!!!!!!

चांगला धागा आणि छायाचित्रे.

सस्नेह's picture

16 May 2024 - 4:58 pm | सस्नेह

आय्डी हॅक झालाय काय ..

चान चान असे तर नाही ना म्हटले? :-D

अमर विश्वास's picture

16 May 2024 - 5:13 pm | अमर विश्वास

लय भारी फोटो आणि वर्णन ..

पण मोसम चुकला का हो PL ?

ऐन उन्हात धुके बघून चिडचिड होते :)

विंजिनेर's picture

17 May 2024 - 2:25 am | विंजिनेर

नशिबवान आहात. फोटोतून गारवा आणि वास अगदी जाणवला!

अहिरावण's picture

17 May 2024 - 7:30 am | अहिरावण

जबरा !

सौंदाळा's picture

17 May 2024 - 12:21 pm | सौंदाळा

सुंदर.
पावसाळ्याची चाहूल लागलीच आहे पण मिपावर या मोसमातला वळवाचा पाऊस मात्र या लेखातून आला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 May 2024 - 9:29 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भर उन्हाळ्यात हिरवागार परिसर सुखावून गेला. नानाचा अंगठा, लेणी, विहार, लेणीसमोरील वाहती नदी. छायाचित्र सुंदर आली आहेत. प्रोसेस करुन टाकली की काय असे वाटून गेले. बाकी, लिहिते राहा. पुलेशु.

-दिलीप बिरुटे

अथांग आकाश's picture

22 May 2024 - 11:46 am | अथांग आकाश

सुंदर लेख!!

वाजंत्री घाटाने भीमाशंकरास जाता येते

गाडीरस्ता आहे कि पायवाट?

प्रचेतस's picture

22 May 2024 - 11:47 am | प्रचेतस

अर्थातच पायवाट. जामरुंग ते खेतोबा मंदिराकडे जाणारी.

अथांग आकाश's picture

22 May 2024 - 12:27 pm | अथांग आकाश

धन्यवाद! बरेच दिवसांपसुन भिमाशंकरास जायचा विचार आहे. बरोबर काही वयस्कर लोक आहेत त्यामुळे पायवाट नको. ठाण्याहुन जायचे झाल्यास बोरघाट आणि माळशेजपैकी कुठला रस्ता चांगला आहे?

प्रचेतस's picture

22 May 2024 - 12:56 pm | प्रचेतस

माळशेज चांगला आहे शिवाय ठाण्याहून जवळ पडेल. घाट चढल्यावर जुन्नर फाट्याने जुन्नर गाठून जुन्नर-घोडेगाव मार्गे भीमाशंकर गाठता येईल.

अथांग आकाश's picture

22 May 2024 - 1:02 pm | अथांग आकाश

ओक्के! आभारी आहे!!

किल्लेदार's picture

24 May 2024 - 8:55 pm | किल्लेदार

गार वाटलं :)

राजेंद्र मेहेंदळे's picture

29 May 2024 - 11:56 am | राजेंद्र मेहेंदळे

वर सर्वांनी म्हटल्याप्रमाणे--उन्हाच्या काहीलि मधे असे वर्णन आणि फोटो पाहुन गारेगार वाटले. कधीकाळी केलेल्या पदरगड्,भीमाशंकर्,भैरवगड, गोरखगड, नाणेघाट, कोथळीगड अशा अनेकानेक ट्रेक्स च्या आठवणी उफाळुन आल्या. दिल ढुंढता हे फिर वही फुरसतके रातदिन अशी अवस्था झाली लेख वाचुन.
पुलेशु.

डोळ्याच्या कडा पाणावल्या :(

वल्ली शेठ ला धन्यवाद द्यावेत तेव्हढे कमिच.

भागो's picture

3 Jun 2024 - 9:14 am | भागो

अवांतर
हे ठिकाण कुणी बघितले आहे का?
https://www.discovermh.com/zakoba-temple-kothrud/
वाचण्यासारखी वेबसाईट.

चौथा कोनाडा's picture

3 Jun 2024 - 5:51 pm | चौथा कोनाडा

मी नाही बघितलं.

पण या मंदिरा बद्दल आंजा फेसबुक वर बरंच वाचलंय !

प्रचेतस's picture

3 Jun 2024 - 6:25 pm | प्रचेतस

धन्यवाद ह्या मंदिराच्या माहितीबद्दल पहिल्यांदाच समजले. आता जाऊन येईन.

श्रीकृष्ण भुवन नावाचे अप्रतिम साऊथ इंडियन पदार्थ मिळणारे ठिकाण आहे. त्याच्या बाजूलाच नक्की जाऊन येशील मंदिर बघून झाल्यावर..मी पुण्यात असतो तर आपण कट्टा केला असता तिकडे .

प्रचेतस's picture

18 Jun 2024 - 8:04 am | प्रचेतस

आता तर जायलाच पाहिजे तिथं.

MipaPremiYogesh's picture

18 Jun 2024 - 12:36 am | MipaPremiYogesh

होय हे मंदिर बऱ्याच वेळा बघितले आहे..त्याच्या बाजूलाच श्रीकृष्ण भुवन नावाचे अप्रतिम साऊथ इंडियन पदार्थ मिळणारे ठिकाण आहे...

टर्मीनेटर's picture

7 Jun 2024 - 8:01 pm | टर्मीनेटर

लेख आला त्या दिवशीच वाचला होता पण त्यावेळी 'काही कारणाने' प्रतिसाद देता नव्हता आला! आज बाहेर मस्त रिमझिम पाउस पडत असताना पुन्हा वाचनात आला आणि सुंदर फोटोज पुन्हा पाहुन मन प्रफुल्लीत झाले 👍

MipaPremiYogesh's picture

18 Jun 2024 - 12:35 am | MipaPremiYogesh

वाह वाह प्रचेतस भाऊ..कमाल लिखाण आणि सुंदर फोटो. अप्रतिम एकदम

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

18 Jun 2024 - 2:35 am | हणमंतअण्णा शंकर...

फोटो पाहून मन भरले इतके सुंदर आहेत. प्रत्यक्षात जाणे शक्य होईल का ते माहीत नाही मात्र तुमच्यामुळे तो योग असा आभासी का होईना ते आला!

किसन शिंदे's picture

18 Jun 2024 - 11:53 am | किसन शिंदे

या ट्रिपच्या गूगल मॅपचा फोटो पण टाक की.

हो,गूगल मॅपचा फोटो टाका.यंदा माळशेज १००% करणारच :)

प्रचेतस's picture

20 Jun 2024 - 9:08 am | प्रचेतस

मिपाचं एचटीएमएल गंडलेलं असल्यामुळे नकाशा येथे थेट अंतर्भूत करता येत नाहीये मात्र खालील लिंकवर जाऊन सर्व रूट पाहू शकता.

https://maps.app.goo.gl/zYndJm7YDpCvCHWJ7