वासोटा जंगल ट्रेक

चक्कर_बंडा's picture
चक्कर_बंडा in भटकंती
5 Apr 2024 - 5:20 pm

जानेवारी २६, २०२४

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातंर्गातील, सातारा जिल्ह्यातील कोयना अभयारण्यात वसलेला वासोटा हा एक पुरातन वनदुर्ग, पुर्वी घनदाट जंगलाने वेढलेला तर कोयनेवर बांधलेल्या धरणामुळे आता पाण्यानेही वेढला गेल्याने अधिकच दुर्गम झालेल्या या किल्ल्यावर शिवसागर जलाशयाच्या कडेला वसलेल्या बामणोली गावातून स्वयंचलित लाँचसेवेच्या मदतीने पोहोचता येते.

Chandra

कोकणातूनही एक वाट चिपळूण तालुक्यातील चोरवणे गावातून, नागेश्वर सुळक्यापासून वासोट्याकडे येते पण बामणोली मार्गच उत्तम कारण किल्ला परिसर हा अभयारण्य हद्दीत असल्याने अनेक निर्बंध तथा परवानग्यांचा सोपस्कार ट्रेक चालू करण्यापुर्वीचं उरकणे अनिवार्य आहे.

Killa

वासोटा ट्रेकसाठी आम्ही २६ जानेवारी, सातारामार्गे बामणोली ला मुक्कामी पोहोचलो. बामणोलीमधून सकाळी साधारण आठ वाजता लाँच मिळते, ३७००/- रुपयांमध्ये लाँच व लाँचचा ड्रायव्हर हाचं आपला गाईड बनून सोबत येतो व वनखात्याच्या परवानग्या मिळविण्यास ही मदत करतो. बामनोली येथून लॉन्चने वासोट्याच्या पायथ्याच्या वन खात्याच्या चेक पोस्ट पर्यंत तासाभराचा प्रवास हा शिवसागर जलाशयातून होतो.

shala

वासोटा किल्ल्याच्या पायथ्याला पुर्वी मेट इंदवली हे गाव होतं जे आता तिथं नाही. त्या जुन्या गावच्या परिसरातच सध्याचं वनखात्याच कार्यालय आहे. वनखात्याच्या परवानगीसाठी साधारणपणे माणसी १३०/- रुपये लागतात, याशिवाय प्लास्टिक वस्तूंची नोंद करून प्रति ग्रुप ५०० रुपये अनामत रक्कम जमा करून परत येताना सर्व प्लास्टिक वस्तू दाखवून ती रक्कम परत मिळवता येते. नेटवर्क नसल्याने रोख पैसे जवळ ठेवणे गरजेचे आहे.

Launch

मेट इंदवली चेक पोस्टवर सर्व सोपस्कार पार पाडून साधारण पावणे-दहाच्या सुमारास ट्रेक सुरू झाला. वनखात्याच्या चेकपोस्टपासून खड्या चढाईने दोन तासांत वासोट्याच्या माथ्यावर आपण पोहचू शकतो. गडाकडे जाणारी पायवाट चांगली असून या वाटेने दाट जंगलातून प्रवास करावा लागतो. चेकपोस्ट पासून काही अंतर चालून गेल्यानंतर वाटेत एक ओढा लागतो या ठिकाणी मारुतीरायाचे उघड्यावरील मंदीर आहे. इथेच मेट इंदवली गावाची बहुतांश वस्ती असावी अशा खुणा पाहायला मिळतात.

marutimandir

या ओढ्यापासूनच पुढे किल्ल्याची चढण सुरू होते.

Odha

संपुर्ण प्रवास घनदाट जंगलाने वेढलेला असल्याने नितांत सुंदर आणि आनंददायी आहे. ऐंशी टक्के मार्ग हा झाडांच्या दाट सावलीतून जातो. पुरातन, जाडजूड वेली, अनेकानेक प्रकारची वृक्षराजी सभोवती दिसत राहते. नशीब चांगलं असेल तर प्राणीदर्शन ही होऊ शकतं. वासोट्याची प्रशस्त केलेली पायवाट व विकएंडला ट्रेकर्सची असणारी वर्दळ यामुळे प्राणीदर्शन अंमळ अवघड असलं तरी त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा मात्र दिसत राहतात. वाघ शेवटचा दिसल्याची नोंद ही चार वर्षांपुर्वीची आहे. बिबट, अस्वल, गवा, शेकरू, ससे, रानडुक्कर हे प्राणी जंगलात आहेत. सरपटणारे प्राणी ही मोठ्या संख्येने आहेत. तीन बाजूनी पाणी आणि एका बाजुस उंच कडे अशा दुर्गमतेमुळे माणसाचा हस्तक्षेप कमी आहे ही सध्याची समाधानाची बाब.

vaat1

साधारण निम्मा किल्ला चढून गेल्यावर नागेश्वरकडे जाणारा फाटा दिसतो. या वाटेने नागेश्वर सुळक्याकडे जाता येते. या सुळक्याच्या पोटात असलेल्या गुहेत नागेश्वर महादेवाचे ठाणे आहे. नागेश्वर सुळका व वासोटा ही दोन्ही ठिकाणे एका दिवसात करणे थोडं जिकीरीचं होत कारण संध्याकाळी अंधार पडायच्या आत बामणोली गाठणे वनखात्याच्या नियमानुसार बंधनकारक आहे. त्यामुळे सर्वसाधारण वकुबाच्या ट्रेकर्स नी एकाचीच निवड करणे उत्तम. आम्ही ही फक्त वासोटा ट्रेकची निवड केली.

vat2

नागेश्वर फाट्याच्या थोड्या अलीकडे, काही समाधीसदृश्य अवशेष दिसतात. तसेच जुन्या चौकीचे अवशेष ही दिसतात. नागेश्वर फाटा उजव्या हाताला ठेवत सरळ जाणाऱ्या मार्गाने जंगलातून चालत आपण माथ्याच्या झाडे नसलेल्या मोकळ्या जागेत पोहोचतो, तुटक्या पायऱ्या, भग्न तटबंदी व दरवाजा असलेल्या फक्त काही खुणा याठिकाणी आपल्याला पाहता येतात. येथून एक खडी चढण चढून अजून एका भग्न दरवाजातून आपण मुख्य किल्ल्यावर पोहोचतो.

avshesh1

गडाचा विस्तार साधारण दहा एकर भरावा. अर्धा भाग दाट झाडीने व्यापला आहे. शाबूत म्हणावं असं कुठलंही बांधकाम वा तटबंदी, बुरुज, इमारती असं काहीच शिल्लक राहिलेलं नाहीये. दिसतात ते फक्त भग्न अवशेष व फोटो-रिल्ससाठी मटेरियल मिळवणे या एकमेव उद्देशाने आलेली उथळ पर्यटक-ट्रेकर्सची धडकी भरवणारी गर्दी.
असो... गडावर प्रवेश करताच डाव्या बाजूला जांभ्या दगडात बांधलेले छोटेसे देवीचे मंदिर व पाण्याचे टाके पाहायला मिळते. या ठिकाणाहून शिवसागर जलाशयाचे विहंगम दृश्य व कोयना अभयारण्याचा विस्तार दृष्टीक्षेपात येतो.

paanitaake

इथून पुढे गेल्यावर, वाटेत छप्पर नसलेले मारुती मंदिर, किल्लेदार वाड्याचे भग्नावशेष, व पुरातन शंकर महादेव मंदिर पाहायला मिळते. पुरातन शिवपिंड भंगलेली असल्याने तिथे अजून एक अलीकडील काळातील पिंडी ठेवलेली आहे. उत्तर बाजूच्या दूरवर पसरलेल्या सुळक्याला काळकाईचे ठाणे म्हणतात. या ठिकाणावरून नागेश्वर सुळक्याचे व दूरवर पसरलेल्या डोंगर-दऱ्यांचे दर्शन होते.

nachappar

दक्षिण बाजूला वैशिष्टयपुर्ण असा बाबू कडा आहे जिथुन कोकणात कोसळणारे अजस्त्र कडे व समोर जुन्या वासोट्याची टेकडी पाहता येते. जुन्या वासोट्याबद्दल विशेष माहिती मिळत नाही, पुर्वी वासोट्याचाच जोडकिल्ला म्हणून तो अस्तित्वात असावा पण आता तिकडे जायची वाटही शिल्लक नाही. बाबुकड्यावर समोरील कड्यावर आदळून येणाऱ्या आवाजाचा प्रतिध्वनी ऐकण्याचा प्रयोग ही करता येतो. बाबुकड्याकडे जायच्या रस्त्यावर एक चुन्याचा घाणा व पाण्याचे टाके ही पाहायला मिळते.

chunaghana

चढणीच्या रस्त्यावर वनखात्याने लावलेल्या फलकावर वासोटा किल्ल्याच्या नावाबद्दल कथा देण्यात आलीय त्यानुसार वसिष्ठ ऋषींचा एक शिष्य या डोंगरावर वास्तव्यास होता. त्याने या डोंगराला वशिष्ठ हे आपल्या गुरुचे नाव दिले. कालांतराने वशिष्ठचा अपभ्रंश होऊन वासोटा असे नाव पडले असावे.

nageshwar

किल्ल्याची मूळ बांधणी शिलाहारकालीन आहे. वासोटा, सोळाव्या शतकाच्या मध्यापर्यंत जावळीच्या मोरे या आदिलशाही मांडलिकाच्या ताब्यात होता. शिवरायांनी जावळीच्या चंद्रराव मोरेचा इ.स.१६५५ मध्ये निर्णायक पराभव करून जावळीचा सारा मुलुख स्वराज्यात सामील करून घेतला त्याच वेळी वासोटा ही स्वराज्यात आला असावा. किल्ल्याचे नाव स्वतः महाराजांनी बदलून व्याघ्रगड ठेवले असे सांगितले जाते. या नावाचा संबंध हा या भागात त्याकाळी मोठ्या संख्येने असलेल्या वाघांशी जोडला जातो.

mandir

शिवकाळात किल्ल्याचा मुख्य उपयोग तुरुंग म्हणून करण्यात येत होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी राजापूरच्या बंदरावर हल्ला केला त्यावेळी त्या ठिकाणी पकडलेले काही इंग्रज वासोटा किल्ल्यावर बंदी बनवून ठेवले. इ.स.वि. सन १६६९ मध्ये या किल्ल्यावर काही प्रमाणात संपत्ती सापडल्याच्या नोंदीही आहेत.

पेशवाईच्या काळामध्ये हा किल्ला पंतप्रतिनिधींच्या ताब्यात होता. प्रतिनिधींच्या वतीने ताई तेलिण नामक स्त्रीचा या किल्ल्यावर ताबा होता. दुसऱ्या बाजीराव पेशव्यांने सेनापती बापू गोखल्यांना वासोटा घेण्यासाठी पाठवले. सात-आठ महिने बापू गोखले वासोटासाठी ताई तेलिणी बरोबर लढत होते. ताई तेलिणीने पेशव्यांच्या सेनेला चिवट लढा देऊन जेरीस आणले. अखेर बापू गोखले यांनी जुन्या वासोटा टेकडीवर तोफा चढवून मारा केला. ताई तेलिणीचा यामध्ये पराभव होऊन तिला अखेर किल्ला सोडावा लागला.

babukada

मराठेशाहीच्या शेवटच्या कालखंडात, बाजीराव पेशव्याने छत्रपती प्रतापसिंह महाराज व त्यांच्या परिवारास सातारामधून आणून काही काळ वासोट्यावर ठेवले होते. इंग्रज अधिकारी प्रिन्सलर याने १८१८ मध्ये वासोट्यावर चढाई करून वासोटा ईस्ट इंडिया कंपनीच्या आधिपत्याखाली आणला.

jalashay2

कोयना अभयारण्यातील संरक्षित क्षेत्रांमध्ये वासोटा किल्ला येत असल्याने किल्ल्यावर कॅम्पिंग किंवा मुक्काम करण्यासाठी बंदी असून सायंकाळी पाच वाजेपर्यंत किल्ला उतरून खाली येणे आवश्यक आहे. साधारण तास-दीड तासात किल्ला पाहून झाल्यावर , किल्लेदार वाड्याच्या शिल्लक जोत्यावर सावलीत जेवण करून आम्ही लगेच परतीची वाट धरली व साडेतीनच्या सुमारास पुन्हा मेट इंदवली चेक पोस्ट वर आलो, इथून लाँचने परतीचा प्रवास सुरु केला. वाटेत, वाट थोडी वाकडी करून शेंबडी मठ या ठिकाणी भगवान शंकर, गणपती व दत्तगुरु मंदिरात दर्शन घेतले व तिथे थोडा वेळ घालवून पुन्हा लाँचने साडेपाचच्या सुमारास बामणोली गाठली.

Jalashay

बामणोलीमध्ये शिवसागर जलाशयाच्या काठावर मुक्कामासाठी व्यवस्था आहे. मुक्कामाच्या सोयीसाठी अलीकडील काळात टेंटस कॅम्पिंगचे पेव फुटले आहे. काठाने उघड्यावर व काही ठिकाणी खाजगी मालकीच्या जागेत टेंट्स लावले जातात, जेवण, नाश्त्याची सोयही होते. दुर्दैवाने बहुतांश टेंट साईट्सवर रात्री मोठया आवाजातील नाचगाणी व हुल्लडबाजी चालते. पुर्वीची शांत बामणोली यात हरवून गेली आहे. काही निवडक घरगुती होम स्टे मात्र त्याला अपवाद आहेत. त्यांच्याकडे मुक्काम व जेवणाची उत्तम सोय होते.

nawa

बामणोलीचं सौंदर्य व तिथलं सुशेगात वास्तव्य, आजूबाजूची ठिकाणं हा खरंतर वेगळ्याचं लेखाचा विषय !! बामणोलीतील दोन दिवसांचा मुक्काम आटोपुन २८ जानेवारीला महाबळेश्वरमार्गे, देव श्रीमहाबळेश्वराचे दर्शन घेऊन पंचगंगेच्या उगमस्थानी थोडा वेळ घालवला. महाबळेश्वर मार्केटची ही थोडी सैर झाली. तिथून मॅप्रो गार्डनला थोडा वेळ थांबून परतीचा मार्ग पकडला. पसरणी घाटातून वाईत उतरलो. वाईमधील S.T. स्टँडसमोर नाश्ता करून पुण्याचा रस्ता जवळ केला. शिरवळजवळ लागलेल्या ट्रॅफिक मधून वाट काढीत रात्री नऊच्या सुमारास घरी पोहोचलो.

ful

असो..जंगलभ्रमंती, वन्यजीवदर्शनाची असलेली शक्यता, नौकाविहाराचा आनंद, ऐतिहासिक गडाची सफर, देवदर्शन आणि बामणोलीचे शिवसागर जलाशयाकाठाचे वास्तव्य व तेथील अनुपम निसर्गसौंदर्य या भटक्यांना भुरळ पडणाऱ्या गोष्टींसाठी बामणोलीमार्गे वासोट्याला भेट द्यायलाच हवी.....

suryast

प्रतिक्रिया

सुंदर फोटो आणि मोजके नेमके वर्णन. जंगली जयगड म्हणजेच जुना वासोटा असावा. इथे बंदींना ठेवत असत.
वासोट्याची भूरळ पडून तिथे जाण्याचे ठरवले होते. एका मित्राने नागेश्वर सुचवलं. खेड (६६ किमी)चिपळुणकडून(२६किमी ) चोरवणे गावाअगोदरच्या उतेकर वाडीतून सहज जाता येते कळलं. त्या प्रमाणे एकटाच गेलो होतो. पण गाववाल्यांनी एकटे जाऊ नको सांगितलं आणि एक गाववाला बरोबर दिला. इकडून परवाने वगैरे काही लागत नाही. (महाशिवरात्रीच्या अगोदर गेल्यास भाविक सोबतीला असतात. त्यांचेबरोबर वाट न चुकता बाबुकडा, वासोटा ही भटकंती सहज होते ही माहिती कळली.) दुपारी तीनला निघून नागेश्वर पाहून साडे आठला गावात परतलो होतो. वासोटा पाहिला नाही परंतू विनासायास तेवढ्याच उंचीवरचे एक शिखर पाहता आले यावर मला आनंद झाला.
कोकणाकडच्या उतारावर ची झाडे आणि कोयनेच्या उतारावरच्या झाडीत खूपच वेगळेपणा आहे.
गवे आणि अस्वले दिसली नाहीत.
एकूण जागा चांगली आहे.

चक्कर_बंडा's picture

5 Apr 2024 - 7:45 pm | चक्कर_बंडा

जंगली जयगड हा वेगळा किल्ला आहे. जुना वासोट्याची टेकडी म्हणजे बाबु कड्यासमोरचा डोंगर. आताचा वासोटा आणि जुना वासोटा यामध्ये एक खिंड आहे, या खिंडीत प्रचंड रान माजल्याने जुन्या वासोट्यावर जाण्यास मार्ग राहिलेला नाही.

नागेश्वर देवस्थान पुर्वी पाहिलेलं आहे. खूप सुंदर परिसर आहे.

कोकणाकडच्या उतारावर ची झाडे आणि कोयनेच्या उतारावरच्या झाडीत खूपच वेगळेपणा आहे.
काय वेगळेपण होते ? कोकण बाजूला पाऊस जास्त असावा त्यामुळे काय? उत्सुकता कि दुसऱ्या बाजूला मानव निर्मित पाणी वाटपामुळे ? विचारण्याचे कारण असे कि सांगली कऱ्हाड च्या मध्ये एक हरीण अभयारण्य आहे डोंगरवार ( ताकारी रेल्वेस्टेशन च्या समोरचा डोंगर ) ते थून असेच एका बाजूल वैराण आणि एका बाजूला हिरवेगार असे दिसले होते ( कदाचित एका बाजूला जमीन खडकाळ असेल आणि दुसऱ्या बाजुला मानव निर्मित पाणी पुरवठा असेल म्हणून हि !)

कर्नलतपस्वी's picture

5 Apr 2024 - 7:45 pm | कर्नलतपस्वी

श्रीमंत पंत प्रतिनिधी यांचा किल्ला अजिंक्य वासोटा ॥
तेलिण मारी सोटा । बापु गोखल्या संभाळ कांसोटा ॥ १ ।

असे बापूंना सबोंधत, किवंदती, पण माणूस खुप जिगरबाज होता. एक सैनिक म्हणून मला त्यांचा खुप आदर आहे.

चक्कर_बंडा's picture

6 Apr 2024 - 12:22 pm | चक्कर_बंडा

बापू आणि प्रतिनिधी यांच्यातील झगडा तीन चार वर्षे चालला बहुतेक, त्याचा शेवट वासोटा ताब्यात घेऊन झाला. बापूंनी त्याकाळात हत्ती वापरून वासोट्याकडे जायचा मार्ग प्रशस्त केला असे सांगितले जाते तसेच जुन्या वासोट्यावर तोफा चढवण्यात त्यांना यश आले व त्यामुळे पुर्ण किल्ला माऱ्याच्या टप्प्यात आल्यावर ताई तेलीणीच्या हालचालींवर मर्यादा येऊन रसद संपुष्टात आल्याने तिने किल्ला ताब्यात दिला.

या मोहिमेत बापूंसारख्या सेनापतीला भरपूर कष्ट उपसायला लागल्यामुळे "त्या" ओळी पुढे प्रसिद्धी पावल्या असाव्यात....

त्या" ओळी लहान मुलांच्या गोळ्यांच्या खेळातल्या गाण्यातही आहेत. .....एकदम खाजा, दुब्बी राजा.....शेवटी चौदाव्या फटक्याला बापू मराठा..चौदा हात लंगोटा.

गोरगावलेकर's picture

7 Apr 2024 - 4:40 pm | गोरगावलेकर

फोटो आणि वर्णन दोन्ही आवडले

राजेंद्र मेहेंदळे's picture

7 Apr 2024 - 8:07 pm | राजेंद्र मेहेंदळे

फार पुर्वीपासुन वासोटा, जंगली जयगड, तिथली ती बांबुच्या शिडीने कोकणात उतरायची वाट शिंदी गाव वगैरे ऐकुन आहे. पुस्तकातही वाचले आहे. फोटो पाहीलेत.
मात्र ईथे जायचा योग अजुन आला नाही. शिवाय वनखात्याची परवानगी वगैरे लागत असल्याने मोठ्या ग्रुप बरोबर जाणेच योग्य वाटते. लेखातील वर्णन ऐकुन पुन्हा एकदा तिकडे जायची ईच्छा प्रबळ झाली.

रच्याकने- काही गोष्टी सांगाव्याश्या वाटले--श्री. महाबळेश्वर --देवाचे नाव असल्याने श्री च्या पुढे टिंब देत नाहीत. (उदा. श्री.काळे)
शंकराची पिंडी म्हणतात पिंड म्हणजे जे दहाव्या दिवशी कावळ्याला ठेवतात ते भाताचे गोळे

चक्कर_बंडा's picture

8 Apr 2024 - 4:07 pm | चक्कर_बंडा

लवकरात लवकर जाऊन या, वनखात्याचे सोपस्कार अगदी चालता बोलता पुर्ण करता येतात, अजिबात वेळखाऊ प्रकार नाही....

श्रीदेवमहाबळेश्वर उल्लेखासंबंधी दुरुस्ती केली आहे, लक्षात आणून दिल्याबद्दल आभार...

जुइ's picture

16 Apr 2024 - 7:59 pm | जुइ

वेगळ्या वाटेवरच्या ट्रेकचे फोटो आणि वर्णन आवडले.