दुसऱ्या दिवशी सकाळी ट्रेनिंगला गेलो. ट्रेनर ने आज खाण्यासाठी सँडविच मागवले होते त्यात काही वेज होते तर काहीत पोर्क होतं. ह्या एकाच कारणामूळे रिझवानने आणी आमच्या बाॅसने वेज सॅंडवीचही खाण्यास नकार दिला. मी आणी विकासने ते वेज सँडविच खाल्ले. रिजवानने एका इराकी दुकानातून चिकन शोरमा आणलं होतं मी त्यातून एक घास खाल्ला, आवडलं. त्याला मी दुसऱ्या दिवशी माझ्यासाठी एक आणण्यास सांगितलं, विकास बोलला माझी बायको म्हणते “सात समुद्र पार केले की धर्म बुडतोच.”
ट्रेनिंग संपल्यावर साधारण चार वाजता आम्ही बाहेर आलो पाऊस पडत होता आम्ही टॅक्सीची वाट पाहत पेट्रोल पंपावर उभे राहिलो तिथे मी पाहिलं की पेट्रोल भरायला कोणीही नव्हतं लोक यायचे कोड वगैरे टाकून कार्ड स्वाईप करायचे आणि पेट्रोल भरून घ्यायचे. आमच्या ट्रेनर पैकी एक मेक्सीकन होता तोही तिथे आला होता, मी त्याच्याशी ट्रंपतात्यांनी बांधलेली भिंत ते मेक्सीकोचे जंगल वगैरे ह्यावर गप्पा मारत ऊभो होतो. टॅक्सी आली, टॅक्सीचा ड्रायव्हर पाकिस्तानी होता लाहोरचा होता त्याला पंजाबी आणि उर्दू मिश्रित हिंदी यायची त्याची बोलण्याची स्टाईल पाहून मी त्याला विचारले तर तो बोलला माझे गुरु लखनऊचे होते. आम्ही एका मॉलला आलो मॉलमध्ये बरीच गर्दी होती तिथे आम्ही परफ्युम विकत घेतले. तिथे एका रेस्टॉरंट मध्ये भारतीय पदार्थ होते मी एक चिकन बसंती नावाची डिश घेतली.
त्यात चिकन राईस आणि सलाड होतं. मला ती डिश आवडली रेस्टॉरंट मध्ये एक बांगलादेशी काका कामाला होते जेवण झाल्यावर त्यांच्याशी गप्पा मारू लागलो, आजची मॅच पाहिली का बोलले, मी बोललो मी क्रिकेट वगैरे पाहत नाही. ते काका 37 वर्षापासून स्वीडनला होते, मुलं इथेच मोठे झाले शफिक नाव होतं त्यांचं. मला देशाची आठवण येते बोलले, डोळ्यात पाणी होतं. त्यांचे वडील कलकत्त्यात राहायचे, फाळणीनंतर बांग्लादेशात आले. आम्ही मॉल फिरू लागलो मला काही घ्यायचं नव्हतं त्यामुळे मी एका दुकानात गेलो तिथे थोडा टाईमपास केला तिथल्या मुलीकडून मी स्विडीश भाषेतले दोन शब्द शिकून घेतले, हाय ला हेज म्हणायचं तर बाय-बाय ला हेडो म्हणायचं. रात्री रूमवर आलो मिपाकर सरिता बांदेकरांचा मेसेज होता सकाळी चार वाजता उठून नोर्थन लाईट बघ असं त्या सांगत होत्या. सकाळी चारचा अलार्म लावून झोपलो. अलार्मच्या आवाजाने ऊठलो. खिडकीतून बाहेर पाहिले उत्तरेला, पण काहीही दिसलं नाही रूमचा दरवाजा उघडून बाहेर पाहिलं खूप अंधार होता. भीती वाटली म्हणून बाहेर गेलो नाही. परत झोपलो सकाळी सव्वासातला उठलो. ट्रेनिंग सेंटरला गेलो आजच्या आमच्या ट्रेनर ने आम्हाला तो बाहेर जेवायला नेईल असं सांगितलं. तो आम्हाला एका व्हेज इंडियन रेस्टॉरंट ला घेऊन गेला. मी ट्रेनर बरोबर गप्पा मारत होतो, तो जर्मनीचा होता, रेस्टॉरंटला त्याच्याच गाडीने निघालो होतो. तो आणि मी बऱ्याच गप्पा मारत होतो मी त्याच्याशी “हिटलरचा रशियावर हल्ला करण्याचा चुकलेला निर्णय ते सध्या युक्रेन युद्धामुळे जर्मनीत वाढलेले गॅसचे भाव” अशा अनेक विषयांवर गप्पा मारल्या. तो बोलला की “युनो टू मच.” आमच्या दोघांच्या गप्पा सोबतचे दोघे ऐकत होते. विकासने माझं नाव “चालता फिरता विकिपीडिया” ठेवलं. ज्या देशाचा माणूस भेटला त्या देशाच्या विषयावर सुरू होतो बोलला, एवढं जर मशीन बद्दल वाचलं असतंस तर आज तू एक्सपर्ट म्हणून डिक्लेर असतास असंही बोलला. आम्ही रेस्टॉरंट पोहोचलो. एक बडोद्याची मुलगी ते रेस्टॉरंट चालवत होती सोबतचे दोघे तिच्याशी गुजरातीत बोलले, तीला आनंदं झाला. जेवायला लसग्न आणि दाळ होती सलाद आणि भजे पण होते. जेवण नावालाच भारतीय होतं, आम्ही तीला विचारलं तर ती बोलली का ह्या लोकांना असंच आवडतं, भारतीय जेवन दिलं तर ते परत माझ्याकडे येणार नाहीत. आम्ही ट्रेनिंग सेंटरला आलो ट्रेनरला आम्ही बिस्कीट ऑफर केले तो बोलला की मी साखर असलेलं काहीही खात नाही.
आणखी दोन मुली ट्रेनिंग सेंटरमध्ये आलेल्या होत्या. त्यातली एक इंडोनेशियाची होती तिने हिजाब घातला होता. ट्रेंनींग संपवून आम्ही हॉटेलला आलो. विक्टोरिया दोन दिवसापासून दिसली नाही म्हणून मी तिच्याबद्दल एंजेलाला विचारलं तर ती तीरसटपणे बोलली “ती एक्स्ट्रा म्हणून काम करते, ती फक्त त्या दिवसासाठीच होती, काही महत्त्वाचं काम होतं का? मला सांग मी करते.”
ट्रेनिंगचा पाचवा दिवस उजाडला होता आणि ट्रेनिंग दुपारी संपली, आम्ही सर्वांच्या भेटीगाठी घेऊन फोटो वगैरे काढून तिघेजण पुन्हा संध्याकाळी रेल्वेने कोपनहेगन जायला निघालो. कोपनहेगनला पोहोचलो, विकास बोलला “आपलं” कोपनहेगन आलं, त्याला खूप आनंद झाला, अर्बन हाऊस ला पुन्हा बॅग आपटल्या. संध्याकाळी आम्ही पुन्हा खालच्या बारमध्ये आलो तिथे बरेच लोक जमलेले होते तिथे टेबल फुटबॉलची टूर्नामेंट भरली होती, मी आणि विकास आमची जोडी बनवून खेळू लागलो आम्ही दोघेही पहिल्यांदाच खेळत होतो तरीही आम्ही ऑस्ट्रेलिया आणि एका अमेरिकन मुलींच्या जोडीला हरवलं आम्ही दोघं जिंकलो, त्या मूलींबरोबर आम्ही फोटो वगैरे काढले, बारवाल्यानेही त्याच्या बार मध्ये लावायला काढले. मी जिंकलेली बिअर प्यायलो नाही मी त्या अमेरिकन मुलीतल्या एकीला दिली, विकास त्याची बियर प्यायला.
दुसऱ्या दिवशी आमचा बॉस कोपनहेगन वरून थेट मुंबईला गेला. आता मी आणि विकास उरलो होतो सकाळी चार वाजता उठलो. तयार होऊन पाच सात ची कोपनहेगन सेंट्रल ते कोपनहेगन एअरपोर्ट तीस युरो देऊन पकडली. एअरपोर्ट वरच्या मॉल वरून डेन्मार्कची आठवण म्हणून एक प्रतिकृती विकत घेतली. आम्ही पॅरिस जाणार होतो. पॅरिस जाण्यासाठी आमची फ्लाईट पहाटे सहा वाजता होती, विकास आणि मी रेल्वेने एअरपोर्टला पोहोचलो एखाद्या मॉलमध्ये असावं असं ते एअरपोर्ट होतं तिथे सिक्युरीटी चेकिन करताना माझ्याकडे असलेली पाणी बॉटल तिथल्या स्त्री सिक्युरिटी गार्डने जमा केली आणि ती मला बोलली की तू भरलेली बॉटल नेऊ शकत नाहीस तुला रिकामी बॉटल न्यावी लागेल, मी तिला विचारलं की बॉटल कुठे रिकामी करू? तर ती बोलली की झाकण उघडून दे मी आत जाऊन रिकामी करून आणून देते. मी झाकण उघडलं तर अर्ध पाणी तिच्या अंगावर आणि अर्ध पाणी माझ्या अंगावर उडालं ते कार्बोनेटेड वॉटर होतं मला वाटलं आता ही माझ्यावर खूप ओरडेल मी तिला सॉरी बोललो, पण ती फक्त “इट्स ओके” बोलली आणि आत जाऊन उरलेले पाणी फेकून मला बॉटल आणून दिली. विकासला माहीत होतं की पाणी कार्बोनेटेड वॉटर आहे पण त्याला माझी मजा पहायची होती म्हणून त्याने मला सांगितलं नाही. नंतर माझ्यावर हसत होता. याचा बदला म्हणून मी त्याला त्याचं ७०० रूपयात विकत घेतलेलं सिगरेट पेटवायचं लाइटर फेकायला सांगितलं. नाही फेकलंस तर तुला धरतील असं बोललो. त्याने पटकन लाईटर फेकलं पण लाईटर फ्लाईट मध्ये अलाऊड होतं , नंतर मी त्याला सांगितलं आणि त्याच्यावर हसलो. आमच्या फ्लाईटला बराच वेळ असल्याने आम्ही गेटवर टाइमपास करत होतो विकास डोक्याखाली बॅग ठेवून तिथल्या बेंचेस वर पाय पसरून झोपला. असा विदेशात हा भारतात रेल्वे स्टेशनला झोपतो तसा झोपलाय हे विचित्र वाटत होतं. मला वाटत होतं कुणीतरी येऊन आम्हाला टोकेल. पण त्यानंतर तिथे थोड्यावेळाने काही मुली आल्या, त्याही ह्याच्या सारख्याच आडव्या झाल्या. फ्लाईटची वेळ झाल्यावर मी त्याला लाथा मारून ऊठवू लागलो तर एका मूलीने माझ्यावर डोळे वटारले. स्कॅन्डेनेवीयन एअरलाइन्सने आम्ही पॅरिस पोहोचलो.
एअरपोर्टच्या बाहेर येताच मी तिथे एका उभ्या कृष्णवर्णीय सिक्यूरीटी गार्डला होटेल कसं जायचं हे विचारलं.
त्याने मला नीट समजावून सांगीतलं, ते मी लिहून घेतलं. तिथे मी माझे तीन तिकीट माझ्या कार्डने काढले, विकासला त्याचे तिकीट त्याच्या कार्डने काढायला लावले हे पाहून तो सिक्युरीटी गार्ड हसला. विकास त्याला बोलला की “ही इज नोट माय
गूड फ्रेंड”. मी त्याला सांगीतलं का “मनी इज माय ओन्ली फ्रेंड” हे ऐकून तो अजून जोरजोरात हसत होता. बस ट्रेन बस असं करत “बेस्ट वेस्टर्न” होटेलला आलो.
83 युरो दिवसाचे पे केले. मॅनेजर येमेन देशाचा वालिदने आम्हाला आम्ही पहिल्यांदा पॅरिसला आलोय आणि त्याची बायको इंडो पाक मिक्स ब्रिडची असल्याने ज्या रूम मधून आयफेल टॉवर दिसेल ती रूम आम्हाला दिली. त्याचे तो दहा युरो जास्त घेतो पण आमच्याकडून घेतले नाही असं बोलला. हे विकासला काही कळालं नाही मी त्याला सांगितलं की तू त्याच्या सासुरवाडीचा आहेस म्हणून त्याने तुला आयफेल टावर रूम मधून दिसेल असा रूम दिला. विकासची नी त्याची मैत्री झाली. रूम लहान होता.
आम्ही जेवण्यासाठी खाली एका इंडियन रेस्टॉरंटला गेलो पण तिथे जेवण खूप महाग होते. मग आम्ही कोपऱ्यावरच्या पिझ्झा हटला गेलो तिथे एक बडोद्याचा मुलगा कामाला होता आणि एक कृष्णवर्णीय होता विकासने त्याला विचारलं की तू की तू कुठल्या देशाचा आहेस? त्याचा चेहरा ऊतरला तो बोलला की मी फ्रेंच आहे. मी विकासला बोललो की परत काळा दिसला तर त्याला देश विचारू नकोस. तो बोलली की “इधर सब कलूटोका राज चल रहा है” दुपारचे दोन वाजले होते आम्ही हॉटेलमधून एक मॅप घेतला. आणि त्या मॅपच्या साह्याने कुठे कुठे फिरायचं ते ठरवून निघालो. रस्त्यात सूंदर सूंदर ईमारती नी लोक दिसत होते.
पहिले आम्ही चार्स दी गाॅल गेटला जाणार होतो, तिथे पोहोचलो तर दिसलं की काहीतरी कार्यक्रम सुरू होता फ्रान्सचा झेंडा फडकवला जात होता, बहुतेक चार्ल्स दी गाॅल दहा अकरा नोव्हेंबरच्या आसपासच खपला असावा. फ्रान्सचे पोलीस आपल्या इथल्या मुंबईच्या डबेवाल्यांच्या टोप्यांसारखे टोप्या घालून तिथे उभे होते.
मी बॅरिकेट्स लावले होते तिथे उभा राहिलो पण विकास पुढे पुढे जाऊ लागला तिथल्या एका पोलिसाने त्याच्यावर बंदूक रोखून बंदुकीच्या इशाऱ्यानेच त्याला परत जायला सांगितलं. गेट पाहता आला नाही पण मग तिथून आम्ही दोन किमी वरचा आयफेल टॉवर कडे पायी जाऊ लागलो.
सातेक वाजचा पोहोचलो. आयफेल टॉवर खूप मस्त चमकत होता. तिथे पोचल्यावर मी घरी व्हिडिओ कॉल करून आयफेल टॉवर दाखवला. खूप फोटोस घेतले तिथे काही भारतीय हरियाणातील मुले बादलीत बियर आणि पाण्याची बॉटल विकत होते विकास साठी दोन युरोची बियर आणि माझ्यासाठी दोन युरोची पाण्याची बाटली घेऊन आम्ही त्यांच्याशी गप्पा मारत उभे राहिलो मी त्यांना विचारलं की तुम्हाला फ्रेंच बोलता येते का मग त्याने मला दाखवलं. दोन मुली जात होत्या त्यांच्याशी तो फ्रेंच मध्ये हे “ब्युटीफुल लेडी सिगारेट्टा?? नी वरून दोनेक शब्द असं काहीतरी बोलला. त्या मूलांनी मला बोंज्यूर आणी मेस्सी हे दोन फ्रेंच शब्द शिकवले. आम्ही टॉवरच्या खाली पोहोचलो. 30 युरो खालून वर जाण्यासाठी लिफ्ट होती आणि 21 युरो देऊन मध्यभागातून लिफ्ट होती पण आम्ही नऊ युरो वाचवण्यासाठी दुसऱ्या मजल्यावरचं तिकीट घेतलं दुसरा मधला खूपच उंच होता. जात जात खूप थकलो शेवटी पोहोचलो. टाॅवरच्या मध्ये एक दोन ठिकाणा रेस्टोरंट पण होते. संग्रहालय वगैरे पण होतं. वर पोहोचलो. वरून पॅरिस खूप म्हणजे खूपच सुंदर दिसत होतं. बराच वेळ थांबून आम्ही पाहिलं, पॅरिस डोळ्यात मावत नव्हतं.
ऊतरून यायची इच्छाच होत नव्हती. रात्री साडेअकरा पर्यंत आम्ही वर आयफेल टॉवरवर होतो.
तिथून खाली आलो खाली एक भारतीय विक्रेता पावात चिकन पीस टाकून विकत होता, प्रत्येकी पाच युरो. आम्ही त्याच्याकडून दोन घेतले आणि खाता खाता मी त्याला बोललो की आज दिवाळी आहे आणि तू आम्हाला चिकन खाऊ घालतोयस?? तो बोलला की “पाप फक्त भारतात लागतं विदेशात आल्यावर पाप लागत नाही. खा अजून” असं म्हणून त्याने दोघांच्या प्लेट मध्ये दोन दोन पीस टाकले. आम्ही आमच्या हॉटेलला जाण्यासाठी मेट्रोच्या बोगद्यात आलो बोगद्यात दोन कृष्णवर्णीय गिटार वाजवत “काल्म डाऊन” गाणं म्हणत होते, येणारे जाणारे नाचत होते. खूप मस्त नी आनंदी वातावरण होतं. आम्ही मेट्रो पकडून हॉटेलला एक वाजता पोहोचलो. तिथे कृष्णवर्णीय रिस्प्शनीस्ट होता तेयााल आम्ही फ्राॅस मध्ये इतके काळे लोक कसे विचारलं तेव्हा त्याने अनेक आफ्रीकन देशांची अधिकृत भाषा फ्रेंच आहे असं सांगीतलं, नी तिथून लोक मग ईकडे येतात हे सांगीतले, अनेक आफ्रीकन देशात इंग्रजी ऐवजी फ्रेंच शिकवली जाते हे मलाही माहीत नव्हते. मला वाटलं होतं फ्रेंचही इंग्रजाळलेले असतील पण तंस नव्हतं. फ्रेंच ही खुप ताकदवान भाषाय हे कळालं.
दुसर्या दिवशी विकासला परत भारतात जायचं होतं. त्याचा विसा संपला होता. मी एकटा पॅरिस मध्ये पुढच्या पाच दिवसांसाठी राहनार होतो, मोकळा असनार होतो, मिपाकर चित्रगूप्तकाका जे पॅरीसचा कानाकोपरा फिरलेत त्यांनी मला काय काय पहायचं ह्याचा प्लॅन आखून दिला होता. तो अंमलात आणायचा होता. एकंदरीत खूप मजा येणार होती.
प्रतिक्रिया
20 Feb 2024 - 7:32 pm | अहिरावण
फोटु छान आहेत
20 Feb 2024 - 8:08 pm | अमरेंद्र बाहुबली
धन्यवाद.
20 Feb 2024 - 10:06 pm | राजेंद्र मेहेंदळे
चला!! ट्रेनिंग संपले एकदाचे!! आता बॉसही बरोबर नाही. तेव्हा जीवाचे पॅरिस होणार पुढच्या भागांमध्ये :)
फोटो टाकायचे तंत्र जमले आहे, फोटो जास्त येऊंद्या.
रच्याकने--सुरुवातीला परदेशात "आपले" (म्हणजे भारतीय्,पाकीस्तानी,बांगलादेशी वगैरे) लोक दिसले की बोलायची उत्सुकता असते. एकदा निर्ढावलो की मग मात्र गोरेच बरे वाटु लागतात. मिपाकरांचे काय अनुभव?
21 Feb 2024 - 9:18 am | अमरेंद्र बाहुबली
चला!! ट्रेनिंग संपले एकदाचे!! आता बॉसही बरोबर नाही. तेव्हा जीवाचे पॅरिस होणार पुढच्या भागांमध्ये :)
होना. वैतागवाडी होती नूसती, आपण कुणाशी बोलायला लागलो तर म्हणायचा पहले मुझे पुछ. कशाला?? आम्ही लोकांशी बोलायचंचं नाही व्हय?? काहीही करायचं असेल, कुणाशी साधे दोन शब्द बोलायचे असतील तरी त्याला रिपोर्ट करावं लागायचं. :( ह्या मुळे अनेक शिकार माझ्या तावडीतून गेल्या.रच्याकने--सुरुवातीला परदेशात "आपले" (म्हणजे भारतीय्,पाकीस्तानी,बांगलादेशी वगैरे) लोक दिसले की बोलायची उत्सुकता असते. एकदा निर्ढावलो की मग मात्र गोरेच बरे वाटु लागतात. मिपाकरांचे काय अनुभव?
मला हे भारतीय ऊपखंडातले लोक तिथे भेटलेले आजिबात नाही आवडले, ह्यांनाच भेटायचं तर इथे काय कमी आहेत?? गोर्यांच्या देशात मी जास्त गोर्यांशीच बोलायचो.20 Feb 2024 - 11:06 pm | चित्रगुप्त
वा छान. हा भाग उत्सुकता वाढवणारा झाला आहे. गूगल voice typing उत्तम काम करते आहे, हे बघून आनंद वाटला. आता मराठी लिहायची ही छान सोय झालेली आहे, त्यामुळे विनासायास लिहीणे सोपे झालेले आहे.
पॅरिसमधल्या भटकंतीविषयी वाचायची उत्सुकता आहे. भरपूर फोटो आणि नकाशे पण द्यावेत.
मला पॅरिसमधे प्लॅटफॉर्मवर भेटलेल्या एका तरुणाने मुद्दाम माझ्याशी ओळख करून घेतली, त्याचे लहानसे हॉटेल होते तिथे नेऊन चहा-समोसा खाऊ घातला, माझा नंबर घेऊन रोज मेसेज करू लागला, पण नंतर त्याचा हेतु समजल्यावर मी त्याला ब्लॉक करून संपर्क संपवला. माझ्यासारख्या सत्तरीतल्या माणसाशी ओळख करून घेऊन आपल्या जाळ्यात ओढण्याच्या त्याच्या प्रयत्नाचे मला फार आश्चर्य वाटले. (बरे झाले मी त्याला घरचा पत्ता वगैरे दिला नव्हता) तो बांगलादेशी मुसलमान होता.
-- यावरून कळले की परदेशात आपण अनोळखी लोकांशी ओळख करून घ्यायचा प्रयत्न केला तर त्यापैकी काही लोक का टाळत असावेत ते.
मात्र पॅरिसात अशीच प्लॅटफॉर्मवर आपले मिपामालक प्रशांत यांचेशी पण ओळख झाली होती. इतरही काही खूप चांगल्या भारतीय लोकांशी ओळखी झालेल्या आहेत, त्यांचे घरी येणे - जाणे पण होत रहाते. एक अगदी फ्रेंच वाटणारा माणूस अस्खलीत मराठी बोलू लागल्याचे बघून अश्चर्यचकित झालो होतो. तो तर अगदी चांगला मित्र झाला होता. तो उत्तम पियानोवादक आणि हौशी चित्रकार होता.
तसेच एका श्वेतवर्णी फ्रेंच माणसाने पुण्यात राहून वारकरी संप्रदायाबद्दल विषय घेऊन मराठीत प्रबंध लिहून पीएचडी केलेलेही ठाऊक आहे.
--- त्या बांगलादेशीचा एकमात्र वाईट अनुभव. परदेशात (म्हणजे मुंबई-दिल्ली- कलकत्ता वगैरेत सुद्धा.) 'सावधपण सर्वविषयी' हे लक्षात ठेऊन वागणे बरे.
21 Feb 2024 - 9:24 am | अमरेंद्र बाहुबली
मला असा प्रत्यक्ष समोर कुणी भेटला नाही पण ओनलाईन एकीने प्रयत्न केले. इंस्टाग्रामवर मी फोटो टाकला आयफेल टावर ला टॅग करून लगेच एका मुलीचा मॅसेज होता, गप्पा मारून झाल्यावर भेटायला बोलवत होती, अचानक तिला पैशांची गरज भासली, १०० युरो दे बोलली. म्हटलं वाट बघ.
21 Feb 2024 - 1:49 am | कंजूस
पुन्हा जाण्याचा योग आहे का?
फिरा भरपूर आणि लिहा. साधं सोपं छान लिहिता.
21 Feb 2024 - 9:24 am | अमरेंद्र बाहुबली
शक्यता कमीय, पण प्रयत्न चाललेत.
21 Feb 2024 - 12:42 pm | नावातकायआहे
फिरा भरपूर आणि लिहा. साधं सोपं छान लिहिता.
बाडिस
21 Feb 2024 - 1:25 pm | अमरेंद्र बाहुबली
धन्यवाद कंकाका नी नाकाआ.
21 Feb 2024 - 7:24 am | नचिकेत जवखेडकर
मस्त वर्णन आणि फोटो!
21 Feb 2024 - 9:25 am | अमरेंद्र बाहुबली
धन्यवाद नचिकेत.
21 Feb 2024 - 12:14 pm | गोरगावलेकर
वर्णन आणि फोटो दोन्ही आवडले
21 Feb 2024 - 1:26 pm | अमरेंद्र बाहुबली
धन्यवाद.
21 Feb 2024 - 2:18 pm | श्वेता व्यास
तुमची भटकंती वाचायला मजा येतेय.
छान फोटो आहेत. पुभाप्र
21 Feb 2024 - 2:22 pm | अमरेंद्र बाहुबली
धन्यवाद :)
23 Feb 2024 - 4:58 pm | विवेकपटाईत
प्रवास वर्णन आवडले.
23 Feb 2024 - 5:45 pm | अमरेंद्र बाहुबली
धन्यवाद.
25 Feb 2024 - 8:38 pm | श्वेता२४
तुमची वर्णन शैली थोडी वेगळी आहे. समोरच्याशी बोलताना आपण जसे बोलतो तसे तुम्ही लिहिता. अतिशय मनोरंजक लिखाण आहे .छान वाटलं.
25 Feb 2024 - 8:59 pm | अमरेंद्र बाहुबली
धन्यवाद. :)
25 Feb 2024 - 8:42 pm | श्वेता२४
छान लेखमाला झाली ऐवजी चाललीय असे वाचावे व्हॉइस टायपिंग मिस्टेक:))
25 Feb 2024 - 9:55 pm | मुक्त विहारि
मस्त,
मनापासुन लिहीत आहात...