कोपनहेगनच्या रॅडीसन कलेक्शन समोर दिसलेली एक अलिशान गाडी.
सकाळी लवकर जाग आली. आज कोपनहेगनला आल्याचा तिसरा दिवस होता. इथे एक गोष्ट मस्त झाली. वेळेच्या फरकामुळे मला पहाटेच जाग यायला लागली. नाश्ता करून मी ज्यूस घेतले, ते बिन साखरेचे होते. काल मासा बनवणारा आफ्रीकन दिसला, बोलला तू अजून इथंच आहेस? मी सांगीतलं - “नाही, आज आम्ही जाणार”. चेक आऊट करून आम्ही हॉटेलच्या लॉकरमध्ये बॅग्स ठेवल्या (१५ डॅनीश क्रोन्स - तीनेक तासाचे) वॉशरूममध्ये एक टिकली लावलेली सफाई कर्मचारी दिसली, तिला विचारलं, इंडीयन ? “नाही, नेपाळी आहे” म्हणाली. मागे दोन नेपाळी मुली कामाला आहेत सांगीतल्यावर म्हणाली की मी त्यांना ओळखते. कोपनहेगनचा शॉपिंग स्ट्रीट रविवारमूळे बंदं होतं, आम्ही बाजूलाच रेल्वे स्टेशनवरच्या एका मेकप सामानाच्या दुकानात गेलो. माझं नेट बंदं होतं म्हणून मी तिथेच मॅकडोनाल्ड्सच्या वायफायला मोबाईल जोडला नी घरी फोन करून काय हवंय ते विचारलं. आधी बर्याच गोष्टी सिलेक्ट झाल्या पण नंतर किंमत ऐकून सर्व खरेदी रद्द झाली. पुढे आम्ही तिथल्या बाजारात फिरायला गेलो. तिथे बरेच फोटो काढले.
मला डेन्मार्कचा झेंडा फार आवडला, कळालं की जगातील सर्वात जुना झेंडा डेन्मार्कचा आहे. १२ व्या शतकापासून एकच झेंडा आहे डेन्मार्कचा.
आम्ही हॉटेलला आलो. जवळच कबाबजी म्हणून एक चिकनवाला होता, तुर्की लोक होते. तिथे तळलेला लेगपीस मस्त मिळायचा. १७ डॅनीश क्रोन्सचे (२०० रूपये) दोन खाऊन आलो, नी सामान घेऊन रेल्वे स्टेशनला आलो, तिथून मग आम्ही ओरेंडसूंड पुलाने स्विडनच्या मालमोला आलो. हा पूल समुद्राखालून आहे, पण रेल्वेतून काही कळालंच नाही. मालमोच्या जवळच्याच एका गावात आमचं ट्रेनिंग होतं. कंपनीचं हेड ऑफिस स्टॉकहोमला होतं.
मालमोला एक हिंदी बोलणारा व्यक्ती भेटला, अफगाणी होता.
रॅडीसन ब्लू ला चेक-इन केलं. विक्टोरिया नावाची रिसेप्शनिस्ट होती. तिने पासपोर्ट जमा करून रूम दिले. ४ वाजताच अंधार पडला होता. मी खाली येऊन विक्टोरीयाकडून वायफाय जोडून घेतलं. तिच्याकडून हॉटेलची सायकल मागीतली. तिने फॉर्म भरून घेतला - चोरी वगैरे गेली तर पैसे भरून घेतले जातील. इथे चोरी होते ? मला आश्चर्य वाटले, तिला विचारलं तर ती म्हणाली अजून तरी झाली नाहीये. तिच्याकडून कुलूप लावणं - उघडणं , रस्त्याचे नियम, ट्राफीक वगैरे सर्व समजून घेतलं. तिला टाटा बायबाय करून केएफसीच्या दिशेने सायकलवर निघालो. ५ किमी होतं. बऱ्याच वर्षांनी सायकल चालवत असल्याने मला तीनेक किलोमीटर गेल्यावर दम लागला. भर थंडीत घामाघूम झालो. जॅकेट - टोपी काढून बास्केट मध्ये ठेवली. केएफसी पोहोचलो. तिथे सायकल कुठे पार्क करायची कळत नव्हतं. कुठेही लावली तर दंड लागतो म्हणे. तेवढ्यात एक जोडपं बाहेर आलं, वाटलं ह्यांना विचारू, बाहेरच ते एकमेकांना चिकटले.
मी तोपर्यंत केएफसीला एक प्रदक्षिणा मारून आलो. तेवढ्यात त्यांचं आटोपलं होतं, मी त्याला विचारलं “व्हेअर कॅन आय पार्क बाईक?” तो खांदे उडवत म्हणाला -. “आय डोंट नो ” प्रदक्षिणा वाया गेली. आत जाऊन मी ७० डॅनीश क्रोन्सचं जेवण घेतलं, बाहेर आलो तर लक्षात आलं टोपी हरवलीय. मी जायला निघालो. परत घामाघूम झालो. रस्त्यात पाऊस लागला, थोड्याच वेळात बराच पडला. मी भिजलो पण बरं वाटत होतं. घाम येत नव्हता. थोड्या वेळाने थंडी वाजायला लागली. पुढे बास्केटमधलं जॅकेट ओलंचिंब झालं होतं. पाऊस चालू होता, रस्त्यात टोपी सापडली. आनंद झाला कारण टोपी घ्यायला दोनेक हजार रुपये गेले असते. पाऊस चालू असल्याने चष्म्यातून काही दिसायचं नाही, काढला तरी दिसायचं नाही. माझा फोन डिस्चार्ज होऊन बंदं झाला होता, मला रस्ता सापडत नव्हता, सर्व घरं बंदं होती बाहेर कुत्रं, माणूस, गाय काहीही दिसंना. हॉलिवूड हॉरर सिनेमात दाखवतात तसं वातावरण होतं.
मला भिती वाटायला लागली. प्रचंड थंडी पण वाजत होती. ओला चिंब झालो होतो. रस्त्यात एक माणूस खांबांचे बल्ब बदलताना दिसला. त्याला रॅडीसन ब्लूचा पत्ता विचारला त्याने गूगल मॅप पाहून कसं जायचं ते सांगीतलं. मी निघालो आणि पोहोचलो. हॉटेलला आलो तर माझी अवस्था पाहून विक्टोरीयाने मला कॉफी दिली. ती पिऊन बरं वाटलं. हॉटेल मधील इतर लोकही माझ्याकडे आश्चर्याने पाहत होते. मला वाटलं होतं माझा फोन लागत नाही म्हणून माझे दोन सहकारी चिंतेत असतील पण ते घोडे विकून झोपले होते. रिसेप्शनला चेकीन करनारी एक मुलगी दिसली ती तोंडावळीवरून भारतीय वाटत होती, ती पुण्यातली निघाली.
दुसऱ्या दिवशी ट्रेनींग सेंटरला पोहोचलो. ट्रेनर्स यायच्या आधी माघरेब वाला रिझवान भेटला. मोरोक्कोचा होता. त्याच्याशी गप्पा मारत होतो. बरीच ओळख झाली. तो बोलला की भारत बराच मोठाय. ह्या दोघांनी सांगितलं की “वी आर फ्रोम द रीजन ऑफ गांधी” - रिझवानला मी सांगीतलं की “ॲंड आयम फ्रॉम द रीजन ओफ किलर ऑफ गांधी” हे ऐकून तो पोट धरून हसू लागला. नंतर ट्रेनींग सुरू झालं. दुपारी जेवायला गेलो, तिथलं वेज विकासला गेलं नाही. मी चिकन घेतलं, फक्त उकडलेलं होतं पण खूपच चविष्ट लागलं. संध्याकाळी हॉटेलला आलो. विक्टोरीया नव्हती, एंजेला होती. मी सायकल घेऊन केएफसीकजे जायला निघालो, आज विकासही माझ्या सोबत आला. मी काल फिरून आलो असल्याने त्याला रस्त्यांचे नियम सांगत होतो. तिथे रस्ता क्रॉस करायचा असेल तर खांबावरचं बटण दाबावं लागायचं. मग सिग्नल आल्यावरच जायचं. माझे बरेच नियम पाठ झाले होते. काल मी बराच चुकलो होतो, पण आज व्यवस्थित जात होतो. रस्त्यात आम्ही एका छोट्याशा माॅलला थांबलो. विकासला रम हवी होती, रिसेप्शनवरच्या माणसाला इंग्रजी येईना, मग एका मुलीने मदत केली. ती बोलली की इथे रम मिळणार नाही. तिने फोन मध्ये रम - दुकानाचा पत्ता टाकून दिला. मी तिच्याशी गप्पा मारल्या, तिची आई नायजेरीयन होती आणि बाप स्वीडिश. जाताना मी रिसेप्शनवरच्या माणसाला गूगल ट्रांसलेट वरून सांगीतलं की “तू तुझी भाषा जपतोयस, हे चांगलं काम करतोय.” त्याला आनंद झाला. आम्ही बऱ्याच छोट्या गल्ल्या ओलांडून दारू दूकानात पोहोचलो. विकासने एक छोटी बाटली घेतली. मग केएफसी पोहोचलो. विकासनेही चिकन खाल्लं. (कुणाला सांगू नको बोलला). जाताना मी केएफसीचा काऊंटरवरच्या मुलीशी १५ मिनीटे गप्पा मारल्या. ती लिथूएनीया देशाची होती, ताशी १०० स्वीडीश क्रोन्स तिचा पगार होता. ती शिकत होती, कामही करत होती. रुम - भाडं महीना ५००० क्रोन्स (४० हजार भारतीय रूपये) होतं, जास्त चांगलं घेतलं तर ११००० क्रोन्स. तेवढ्यात तिथे विकास आला, तिने गप्पा आवरत्या घेतल्या. विकासचं इंग्रजी जेमतेम होतं. त्याने मला विचारलं “कुछ हुआ?” मी त्याच्याकडे संतापाने पाहीलं. मग हॉटेलला पोहोचलो.
प्रतिक्रिया
11 Feb 2024 - 10:23 pm | चित्रगुप्त
आत्ता मी इथे फक्त रुंदी ६०० लिहिले आहे.
तुमच्या फोटोत लांबी - रुंदीचे प्रमाण चुकलेले दिसतेय.
12 Feb 2024 - 12:50 am | टर्मीनेटर
माफ करा पण आधी मला तुमचे म्हणणे पटले नव्हते, पण बारकाईने बघता ते पटले! मुळात फोटो टाकताना धागा लेखक लांबी - रुंदी का देतात हेच कळत नाही.
12 Feb 2024 - 1:30 am | अमरेंद्र बाहुबली
द्यायची गरज नसते का?? माहीत नव्हते.
12 Feb 2024 - 1:50 am | टर्मीनेटर
पूर्वी असायची, आता मोबाईल फर्स्ट (सारखी फालतुगिरी 😀) वाढल्या पासून तसे करायची गरज उरली नाहीये.
11 Feb 2024 - 11:00 pm | रामचंद्र
वा, आधीच्या युरोप भेटीमुळे यात चांगले सरावलेले दिसता. आता ट्रेनिंगची मजा (असल्यास) येऊ द्या.
12 Feb 2024 - 12:16 pm | राजेंद्र मेहेंदळे
विकास म्हणाला "कुछ हुवा?" :) मेन विल् बी मेन
12 Feb 2024 - 12:41 pm | कर्नलतपस्वी
मोबाईल बंद पडणे ते सुद्धा अनोळखी परदेशात या सारखे मोठ्ठे संकट दुसरे कोणतेच नसावे. मी सुद्धा भोगल्या.
12 Feb 2024 - 1:03 pm | Bhakti
हो परदेशात सायकलींना मुक्त वावर असतो... मस्त वाटतं ते
18 Feb 2024 - 4:07 am | nutanm
छान। वर्णन.
19 Feb 2024 - 3:26 pm | MeghaSK
Copenhagen मध्ये बाकी काहीही चोरी झाल्याचं ऐकल नाहीय पण सायकल ( इथे बाईक म्हणतात सर्वजण तिला) हमखास चोरीला जाते. दुकानाबाहेर उभी केली असता भाजी घेऊन परत येपर्यंत गायब अशी परिस्थीती एका परीiचतांची झालेली. बाकी बस मध्ये विसरलेला फोन , टोप्या, स्कार्फ, दुकानाबाहेर किंवा शाळेबाहेर ठेवलेली मुलांची stroller मात्र कुठेही जात नाही. बस प्रवास अती महाग असल्याकारणाने लोकं सायकल ने जाणं पसंत करतात
Copenhagen मध्ये नेपाळी बरेच दिसतात, अगदी साडी नेसलेल्या, सण साजरे करणाऱ्या बायका पण पाहिल्यात.
इथे बऱ्याच ( तरुण व मध्यमवयीन) जनतेला चांगले इंग्लिश येते, तरीही ते डॅनिश मध्येच सुरुवात करतात!
शिकता शिकता पार्ट टाईम जॉब बरेच जण करतात,काहीकाही नोकऱ्या विद्त्यांार्थ्यांसाठी असतात, तया ना student jobs असं म्हणतात
19 Feb 2024 - 6:20 pm | अमरेंद्र बाहुबली
मोबाईल फोन वगैरे नाही, पण बाईक्स चोरी जातात, आश्चर्य आहे.