राजमा गस्सी

Bhakti's picture
Bhakti in पाककृती
28 Dec 2023 - 11:37 am

गस्सी
गुगलला विचारले असता त्याने गस्सी म्हणजे "थिक करी" असं सांगितलं आहे :)
तर दक्षिण भारतात इडली, डोशासाठी वापरल्या जाणाऱ्या पोडीची तर मी फॅन झालेच आहे. अगदी डबा भरून ठेवते, लेकीला भातावर कधी चटणी तेल म्हणूनही आवडते. यात डाळी वापरल्या जातात, हे आवडतं. त्याचाच एक पुढचा पदार्थ समजला, गस्सी भाजी. यात मसाला ताजा बनवून वापरल्या गेल्याने चविष्ट पदार्थ होतो. मी राजमा वापरला. गस्सीसाठी हरभरे, वाटाणे, चवळी असे भिजवून, शिजवून वापरले जाऊ शकतात.
साहित्य -
१ वाटी आठ तास भिजवलेला राजमा
१/२ वाटी चिरलेला बटाटा
१/२ वाटी चिरलेले गाजर
मसाला -
२ चमचे धने
२-२ चमचे उडीद डाळ,हरभरा डाळ
१ चमचा तीळ, जिरे
१/२ चमचे मेथी दाणे
१ वाटी ओले वा सुके खोबरे
३-४ लाल मिरच्या
चिंच-गूळ कोळ छोटी १/२ वाटी
चिरलेला कांदा आणि टोमॅटो -१/२ वाटी प्रत्येकी

कृती-

१.राजमा आणि बटाटा-गाजर स्वतंत्र मीठ आणि हळद टाकून कुकर मध्ये शिजवून घ्यायचे(कमीच शिट्ट्या कारण राजमा,भाज्या गाळ होऊ नये).
२.मसाला - धने व इतर सर्व मसाल्याचे पदार्थ एक चमचा तेलात परतून घ्यायचे. व परतलेला कांदा टोमॅटो, कोथिंबीर टाकून बारीक वाटायचा. खोबरे सुकं असेल तर किंचित पाणी टाकावं, सरभरीत होण्यासाठी.
३.मोहरी व कडीपत्ता फोडणीनंतर भाज्या परतून घ्याव्यात. मग मसाला टाकून परतून घ्याव्यात.
४.चिंच-गुळ कोळ टाकावा.
५. १/२ वा १ फुलपात्र पाणी टाकून १० मिनिटे गस्सी शिजू द्यावी.
खोबऱ्याचा आणि चिंच गुळाचा स्वाद इतका फ्रेश लागतो की क्या बात है! :)
पोळी वा डोसा वा अप्पे वा घावण बरोबर गस्सी करी फस्त करा!
-भक्ती

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

28 Dec 2023 - 3:55 pm | प्रचेतस

भारीच झालीय की गस्सी. मात्र ह्यात श्रावणघेवडा असतोच आणि त्याने अजून भारी चव येते.

श्रावण घेवडा वाळल्यावर राजमाच होतो ना :)
धन्यवाद!

पण तो हिरवा शेंगेचा अजून भारी

काय झटपट पदार्थ होत आहेत!!
नवीन प्रयोग आवडला.
बाकी राजमा वेगळा आणि श्रावण घेवडा वेगळा. गस्सी प्रकार विडिओतून कळला परंतू मला कडधान्ये उसळ स्वरुपातच फार आवडतात. त्यात त्यांचा खमंगपणा खुलतो. सिंधी पदार्थ 'दाल पकवान' मधली दाल ( चणाडाळ किंवा मूग उसळ) पाहा.
राजमा उसळ जेव्हा हिमाचल प्रदेश किंवा काश्मिरी पद्धतीने होते ती अप्रतिम लागते. त्या उसळीत राजमाच चालतो इतर डाळी चालणार नाहीत. एकदा का असा राजमा भात खाल्लात तर पुन्हा कधी राजमा इतर भाज्यांत घालणार नाहीत.
पुरी,पोळी,याबरोबर खाण्याची दक्षिणेकडची भाजी म्हणजे नारळाचे दूध घालून केलेली रस्सा भाजी. होस्पेटला खाल्ली होती.

या गस्सीबद्ल पुन्हा शाबासकी.

नवीन वर्षासाठी एक गोड पदार्थ(स्वीट डिश)करून पाहा.

१) सुके जरदाळू आणि सुके अंजिर (चार चार किंवा सहा सहा घेणे.)
२) थोड्या पाण्यात थोडीच साखर टाकून सहा तास भिजवणे. मऊ झाले पाहिजेत.
३) जरदाळूंना एक काप देऊन बीबदाम बाजूला काढून अंजिरांसह त्याच पाण्यात दहा मिनीटे शिजवणे. पाणी आटले तर उत्तम. गार करणे.
४)दूध आणि पाण्यात कस्टर्ड पावडर (मक्याचे पीठ असते सुवासिक पिवळे) लावून शिजवून तयार करणे. साखर फार घालायची नाही.
५)एका डिशमध्ये दोन दोन जरदाळू,अंजीर ठेवून त्यावर तयार झाले कस्टर्ड टाकून खायला देणे.
( साखर फार घालून जरदाळू/अंजिरांचा मूळ गोडवा घालवायचा नाही.)
[ ही डिश आमच्या ऑफिस कॅन्टिनला अधुनमधून देत असत जेवणाच्या थाळी बरोबर अनलिमिटेड].

Bhakti's picture

28 Dec 2023 - 7:34 pm | Bhakti

मस्तच! नक्की बनवेल.

अगदी अगदी. मी हेच म्हणणार होतो.

काश्मिरातील चावल राजमा ,पृथ्वीवरील स्वर्गातले स्वर्गीय जेवण.
आता मिस करतो. त्याच्या जागी आता महाराष्ट्रात मिसळपाव शोधतो.

श्वेता व्यास's picture

29 Dec 2023 - 11:26 am | श्वेता व्यास

वाह गस्सी आवडली.
मी अशाच रेसिपीने बऱ्याच रसभाज्या बनवते पण यामध्ये गाजर आणि उडीद-हरभरा डाळ जास्तीची आहे.
सेम असंच करून बघेन आता.

विवेकपटाईत's picture

29 Dec 2023 - 3:29 pm | विवेकपटाईत

राजमा बनविण्याची नवी पद्धत आवडली.

यश राज's picture

1 Jan 2024 - 3:22 pm | यश राज

लवकरच करून बघेल

टर्मीनेटर's picture

1 Jan 2024 - 4:25 pm | टर्मीनेटर

राजमा गस्सी भारी दिसत आहे.
राजमा मी कधीतरी खातो पण त्याचा विशेष चाहता नाही. मसाल्यात

१/२ चमचे मेथी दाणे

वाचल्यावर पदर्थाला थोडी कडवट चव येइल की काय असा प्रश्न पडला...

प्रमाण कमी करूया किंवा नाही वापरले तरी चालेल :)