प्रारब्ध - ४

साहना's picture
साहना in जनातलं, मनातलं
8 Dec 2023 - 4:21 am

हयग्रीव ला जाग आली तेंव्हा कदाचित अंधार होता किंवा त्याच्या डोळ्यांना काळोख दिसत असावा. पण नाही, आकाशांत चांदणे दिसत होते. सर्वांग ठणकत होते. कुठेतरी बाजूला आग असावी कारण त्यातून उडालेल्या ठिणग्या हवेतून जात होत्या. तो जमिनीवर पडला असावा. इतक्यांत त्याला एक चेहेरा दिसला. नाही, त्याची छकुली नव्हती, पोरगा नव्हता. कुणीतरी दुसराच. काळे कपडे घातलेला थोडासा उग्र. हयग्रीव ने उठायचा प्रयत्न कला पण त्याला जमले नाही.

आधी त्याला वाटले कि मेलो असावो आणि नरकांत असू पण अचानक त्याची छकुली पळत आली आणि तिचा चेहेरा समोर येताच त्याला समजले कि हा नरक असणे शक्यच नाही. त्याचा मुलगा सुद्धा जवळ आला. आपल्या वडिलांना जाग आली हे पाहून दोंघांनाही प्रचंड आनंद झाला होता. तो उग्र वाटणारा चेहेरा कदाचित कुणा साधूचा असावा पण तसेच अनेक चेहरे त्याच्या आजूबाजूला गोळा झाले आणि अचानक पांगापांग सुद्धा झाली.

त्यानंतर त्याच्या पुढे आला तो भल्लूकनाथांचा चेहेरा. अर्थांत हयग्रीव त्यांना ओळखत नव्हता.

"काय हयग्रीव, जाग आली का ?" त्यांनी खणखणीत आवाजांत विचारले.

"बाबा बाबा, हे ना खूप छान छान गोष्टी सांगतात. त्यांनी बघा मला काय दिले ? म्हणून तिने आपला एक छोटासा ताईत हयग्रीव ला दाखवला."

भल्लूकनाथानी आपल्या हातातील चिलीम हयग्रीवाच्या तोंडाला लावली. त्याने भला मोठा झुरका घेतला. त्यातल्या अफिम ने त्याच्या वेदना कमी झाल्या.

"चला मुलांनो. बाबा आता ठीक होतील. तुम्ही खाऊन घ्या" म्हणून त्यांनी दोन्ही मुलांना शेकोटीकडे पाठवले.

"तुम्ही कोण आहात ? आणि मी तुम्हाला कसा सापडलो ? आणि तो वाटसरू कुठे आहे ? "

"तो वाटसरू आपल्या वाटेने गेला. त्याला मार पडला असला तरी तो तरुण होता. त्यामुळे त्याच्या जखमा लवकर भरल्या. तू इथे मागील ३ दिवस बेशुद्ध होतास. "

"ती दिवस ?"

"होय. घाबरू नकोस. पहिल्यांदाच तुला असा नाही आम्ही पहिला, मागच्या वेळी तुला आम्ही एक मुलगी दिली होती. ठाऊक आहे ? त्या वेळी निपुणिका म्हणाली होती कि हा नाहीं कितीसा जगेल. तिला काय ठाऊक ? मागच्या वर्षी ती हिवतापाचे निम्मित होऊन कैलासास गेली. आणि तू इथे एकाचे तीन होऊन बसला आहेस. "

"का ? "

"काय का ? "

"मी का जिवंत आहे ? मला तुम्ही एक मुलगी दिली ? का ? मला तिथे मरायला सोडला असता तर ? "

"तिच्या ललाटावर स्पष्ट लिहिले होते. कि तिचे जीवन तुझ्या सोबत आहे. ह्या दोन मुलांना ह्या जगांत यायचे होते. मी तुला नाही दिली, भैरव बाबाची इच्छा. मी निमित्त मात्र".

"पण का ?"

"नाही मला ठाऊक आणि फरक पडत नाही. जो पर्यंत तुझे श्वास उसने आहेत तो पर्यंत ते फेडायचे. "

अफिम चा असा झाला होता आणि हयग्रीव बऱ्यापैकी उठून बसू शकत होता. मुका मार बराच असला तरी हाडे मोडली नव्हती. रक्त विशेष गेले नव्हते.

"तुम्ही मला हयग्रीव म्हणून हाक मारली ? तुम्हाला माझे नाव कसे माहित ? " हयग्रीव ने त्यांना विचारले.

"अनेक वर्षे आधी ७ वर्षांच्या एका लहान पोराला अवंती शहराच्या शस्त्रविद्यालयात मी तलवार चालविताना पहिले. गांधार देशाचा पेहेराव घालून आपल्या लाकडी तलवारीने तो लहान मुलगा आपल्या पेक्षा दुप्पट वयाच्या मुलांना सहज धूळ चारत होता. तेंव्हाच माझ्या तोंडून उद्गार गेले कि हा कोण आहे ? त्यावेळी मी अत्यंत साधारण संन्यासी होतो. बुरुजावर राहून आम्ही तुला पाहत होतो आणि गुरूंच्या चेहेऱ्यावर तुला पाहून एक भय निर्माण झाले होते. ह्याच्या मागे एक यमदूत उभा आहे. ह्याच्या हातून असंख्य लोकांचे प्राण जाणार असे असे उद्गार त्यांच्या तोडून आले. माझे गुरु म्हणजे कैवल्यनाथ. त्यांना कुणीही कधीही भ्यायलेले पहिले नाही. पण त्या वेळी त्यांच्या चेहेऱ्यावर भय आणि व्याकुळता दोन्हीही काही क्षणासाठी का होईना पण दिसली होती. तेंव्हापासून मला तुझे नाव ठाऊक आहे."

हयग्रीव ने भल्लूकनाथांच्या चेहेऱ्याकडे पहिले. त्यांची बळकट शरीरयष्टी पाहून ते इतके वृद्ध असतील असे वाटत नव्हते पण हयग्रीव त्या शहरांत प्रशिक्षण घेता होता हि माहिती असलेले काहीच लोक जिवंत असण्याची शक्यता होती. हयग्रीव चे मुख्य शिक्षक त्याच्यासोबतच गांधार देशातून आले होते. त्यांचे नाव मत्स्यकेतू होते. शेकडो वर्षे आधी सम्राट विक्रमादित्याने म्लेच्छांचा संहार करून आर्यावर्तातल्या पश्चिम प्रदेशांत १४ किल्ल्यांची स्थापना केली. पश्चिमेकडून होणाऱ्या आक्रमणांना आधीच रोखणे हा हेतू होता आणि ह्या किल्ल्यांची जबाबदार १४ मोठ्या घराण्यांना दिली होती. गांधार प्रदेशांत जात पाणी नव्हते किंवा काही पिकत सुद्धा नसे. त्या प्रदेशांत किल्ले निर्माण करून अर्थव्यवस्थेची घडी घालून त्यातून जो कर येईल त्यातून हे किल्ले चालवावे अशी मनीषा सम्राटांची होती. बराच काळ हा प्रदेश गरीब असला तरी युद्धजन्य होता. हळू हळू युद्धे कमी झाली आणि शस्त्रास्त्रांत प्राविण्य मिळालेल्या लोकांचे तेथील महत्व कमी झाले आणि व्यापार वाढला. त्यामुळे इतर देशांनी ह्या १४ किल्ल्याना रद्दबातल करून त्याजागी आपली सत्ता स्थापन केली आणि त्याचमुळे हयग्रीव च्या वडिलांना किल्ला सोडून निर्वासित म्हणून अवंतीत यावे लागले. दरबारांत चांगले स्थान मिळावे अशी त्यांच्या वडिलांची धडपड होती पण हयग्रीव ला फक्त तलवारीची ओढ होती.

भल्लूकनाथानी आपला भूतकाळ काढला आणि अफिम च्या नशेने का होईना बराच वेळ हयग्रीव त्या भूतकाळांत हरवला.

"साधू महाराज, माझ्या मुलांचे काय होईल ? मला काही झाले तर ह्यांचा कोण ? "

"हाच विचार इतर लोकांना मारताना कधी डोक्यांत आला होता काय ? तू ज्यांना मारले त्यांच्या मुलांचे काय ? तो वाटसरू जो इतका वेळ तुझ्यासोबत होता त्याला तूच अनाथ केला होतास ना ? त्याची हालत बघ काय झालीय. कदाचित तीच तुझ्या मुलांची होईल. कदाचित नाही, कदाचित हा समाज ज्या हिंसेवर उभा आहे कदाचित हिंसा कमी होऊन इथे समृद्धी येईल. कदाचित त्या समृद्धीचा पाया हिंसेवर निर्माण झालेला असेल. कुणास ठाऊक ? शेवटी भैरव बाबाची मर्जी. "

हयग्रीव बराच वेळ खिन्न झाला.

"महाराज, आम्ही जेंव्हा ह्या प्रदेशांत आलो तेंव्हा माझ्या वडिलांची इच्छा होती कि आम्ही शौर्य आणि क्षात्रधर्म सोडून, सरकार दरबारी कारकून बनावे. राजकारण शिकावे, तलवारबाजी नाही. त्यांच्या मते तो काळ ह्या प्रदेशांत संपला होता. पण मला जगातील सर्वोकृष्ट योद्धा बनायचे होते. दिवसाला ६ तास प्रशिक्षण घेऊन मी स्वतःला अजेय योद्धा बनवत होतो. वडील मला लिहायला वाचायला लावायचे पण मी पळ काढून मैदानात घुसायचो. शेवटी वडिलांनी नाद सोडला आणि मला सैन्यात अधिकारी बनवले. "

"मी असंख्य लोकांना मारले पण सर्वप्रथम ज्याला मारले त्याची मला आज सुद्धा आठवण आहे. कूर्मावती नगराच्या मागचे प्रचंड निबिड अरण्य होते आणि आम्ही ४ सैनिक एका मोठ्या रानडुक्कराला मारून शिजवण्यास बसलो होतो. आमची शस्त्रें खाली होती. हल्ल्याची अपेक्षा सुद्धा नव्हती. तरी सुद्धा ३-४ सैनिक आजूबाजूला पहारा देत होते. अचानक कुठून तरी तिर आले आणि पहाऱ्याला असलेले सैनिक कोसळले. ३ भिल्ल अचानक कुठून तरी उपस्थित झाले, त्याच्या हातात परशु होता. माझे सैनिक आपली तलवार उचलण्यासाठी गेले तो पर्यंत शत्रूच्या परशुनि त्यांची मस्तके धडावेगळी केली होती. प्रशिक्षणात तलवार चालवणे वेगळे आणि त्या परिस्थितीत तलवार चालवणे वेगळे. मी तिथे थिजून राहिलो होतो. ज्या लोकांनी माझ्या सोबत अनेक वर्षे प्रशिक्षण घेतले होते ते काही क्षणात ठार झाले होते. "

"एक तरुण पोरगा आपला परशु सरसावत माझ्याकडे वेगाने पळत आला. मी माझी तलवार उचलण्यास वाकलो नाही कारण शत्रू अतिशय चपळ होता. मी नेहमीच कामरपट्ट्यांत एक छोटी सूरी ठेवायचो ती मी काढून थेट त्याच्या नरड्यावर मारली तो काही फूट अंतरावर कोसळला."

"एक तरुण पोरगा आपला परशु सरसावत माझ्याकडे वेगाने पळत आला. मी माझी तलवार उचलण्यास वाकलो नाही कारण शत्रू अतिशय चपळ होता. मी निव्वळ हातानेच त्याच्या प्रहाराला थांबवले. तो पोरगा चपळ असला तरी त्याच्याकडे प्रशिक्षण नव्हते. त्याच्या हातातून परशु घेऊन मी त्याच्याच मानेवर घाव केला. त्याच वेळी दुसऱ्या एका भिल्लाने माझ्या दिशेने एक बाण मारला. साधणार एक वित कानापासून दूर तो गेला असेल. त्याचा वेग आणि आवाज माझ्या कानात कैद झाला. समाजा त्या बाणाने आपली दिशा थोडी जरी बदलली असती तर मी तिथेच गतप्राण झालो असतो."

"त्या वेळी मी जास्त विचार केला नाही. मी फक्त शत्रुंना कापून काढले. पण हळू हळू वर्षे गेली तेंव्हा लक्षांत आले कि मी जिवंत आहे ह्याचे कारण मी जास्त चांगला योद्धा आहे हे नसून माझे नशीब चांगले आहे हे आहे. आजतागायत असंख्य बाण माझ्या कानाच्या जवळून गेले आहेत. असंख्य घाव केसाच्या अंतराने चुकले आहेत. प्रत्येक युद्धांत मी माझा गर्व घेऊन गेलो नाही तर मी त्यातून जिवंत येणार नाही हीच भावना घेऊन गेलो. हळू हळू माझे जवळचे मित्र मारले गेले, माझे वडील वृद्धापकाळाने गेले. माझे गांधार प्रदेशांतील घर नष्ट झाल्याची बातमी आली. जिवंत राहण्याचे कारणच नव्हते त्यामुळे मी प्रत्येक युद्ध माझे शेवटचे असो म्हणून भाग घेत होतो. भैरव बाबा असो किंवा आणखीन कुणी, मला जिवंत त्याने ठेवले असेल तर कदाचित काही कारण असेल ? किंवा कदाचित माझे नशीब खरोखरच चांगले होते ? "

"इतकी वर्षे मृत्यू म्हणजे सुटका असे असे मला वाटत होते, पण ह्या दोन मुलांकडे पाहतो आणि आशेची बेडी पायांत बांधली आहे असे वाटते. सर्वप्रथम मृत्यू नकोसा वाटतो."

भल्लूकनाथांच्या चेहेऱ्यावर एक प्रसन्नता आली. मुले म्हणजे देवघराची फुले. त्याच्यात एक निष्पाप पणा असतो. होय, तुझे पापी आयुष्य पाहता अशी दोन फुले देवाने तुला द्यावीत ह्यांत खरेच तो आभारी असले पाहिजे.

"एक काम कर, उद्या सकाळी तू इथून दक्षिणेस जा. साधारण एक कोस पोचल्यावर तिथे एक तलाव आहे आणि त्याच्या बाजूला एक लाकडी झोपडी ज्यांत एक लंगडा वैद्य राहतो. तो तुझी मलमपट्टी करेलच पण त्याच्याकडे काही चांगले घोडे आहेत. त्यातील एक तो तुला देईल. ते घे आणि इथे परत ये. मुलांना इथेच राहू देत. नंतर दोन्ही मुलांना घेऊन आमच्या सोबत ये. साधारण महिन्याने आम्ही शैव लोकांच्या मोठ्या मार्तंड पिठांत जाणार आहोत तिथे मी तुझी आणि तुझ्या मुलांची काही व्यवस्था करू शकतो . त्यांना माणसांची गरज आहे. आणि तुझ्या दोन्ही मुलांना शिक्षण सुद्धा मिळेल. पण तू आता घाई करणे आवश्यक आहे. कारण उद्या परवा महाराजांची एक विशेष स्वारी मोठ्या सैन्यासह ह्या मार्गाने जाणार आहे. त्यासाठीच त्यांनी आधी एक पथकाला पुठे पाठवले होते ज्यांच्याशी तुझे भांडण झाले. हे सैन्य येण्यापूर्वी परत ये कारण हि मंडळी वाटेवर खूप धिंगाणा घालतात आणि त्यांना रोखणारा कुणीच नाही."

"घोडा मिळाल्या नंतर तू आपल्या घरी जाऊन इतर सामान आणू शकशील आणि तुझ्या जनावरांची सुद्धा योग्य ती व्यवस्था करू शकशील. "

"खरेच ? माझ्या मुलांना असे भविष्य मिळणे शक्य आहे ? तर मी नक्कीच जाईन "

हयग्रीव च्या मनात सर्व काही जुळून येत होते. भल्लूकनाथ आणि त्याचा संबंध कदाचित ह्या साठीच नियतीने घडवून आणला होता.

पण भल्लूकनाथ त्याच वेळी हयग्रीव च्या चेहेऱ्याकडे गांभीर्याने पाहत होते. त्यांच्या मनात आणखीन वेगळाच काही प्रश्न होता.

kathaa