रस्त्यावरची कुत्री, पाळीव प्राणी आणि भटकलेली माणसे !

kvponkshe's picture
kvponkshe in काथ्याकूट
18 Nov 2023 - 9:32 am
गाभा: 

रस्त्यावरची कुत्री, पाळीव प्राणी आणि भटकलेली माणसे !

(लेख रीपोस्ट आहे. काही लोकांनी मूळ लेखातील काही शब्दांवर आक्षेप घेतल्याने हा सेन्सॉर्ड लेख पुन्हा टाकत आहे.)

सात आठ वर्षांपूर्वी चा प्रसंग.

माझ्या मित्रासाठी काही पुस्तके कुरियर करण्यासाठी मी पुण्यातील मार्केटयार्ड रोड वरील एका कुरियर कंपनीत गेलेलो होतो.सध्या जिथे बँक ऑफ महाराष्ट्र आहे त्या पुनम प्लाझात ते ऑफिस होते.आत ऑफिसात गेलो, पार्सल handover करून रिसीट घेऊन बाहेर आलो. बाईकचा साईड स्टँड काढून स्टार्टर मारतोय तोच मागून एका कुत्र्याचा भुंकण्याचा आणि एका लहान मुलीच्या किंचाळ्या ऐकू आल्या. एक 5वी - 6वी तील मुलगी शाळेच्या पोशाखात कुठेशी चालली होती. बहुदा शाळेतून तिच्या आईकडे, जी तिथेच कोणाकडे तरी घरकाम करत असावी. त्या मुलीच्या अंगावर ते कुत्रे धावून भुंकून जात होते.काही सेकंदातच अचानक 6 ते 8 कुत्री तिथे जमली आणि त्या मुलीला त्यांनी घेरून तिच्यावर हल्ला करू पाहू लागली. मुलगी बिचारी जोर जोरात ओरडू लागली. ते ऐकून मी साईड स्टँड परत लावला आणि जोरात ओरडत त्या कुत्र्यांचा अंगावर धावून गेलो. एक दगड सापडला तो एका हातात, दुसऱ्या हाताने sag फिरविली. पण कुत्री अजिबात हटेनात. मध्ये मी आणि ती मुलगी , दोघंही भेदरलेले असे ओरडू लागलो.

मग आमचा आरडाओरडा ऐकून त्या कुरियर कंपनी मधील आणि इतर एक दोघे हातात काही काठी वगैरे घेऊन आले आणि आमची त्या कुत्र्यांपासून सुटका केली. त्या मुलीला एक जण ओळखत होता तो तिच्याबरोबर तिला सोडायला गेला.मी घरी आलो पण नंतर कितीतरी वेळ छाती धडधडत होती.
हे आज आठवण्याचे कारण म्हणजे नुकताच झालेला पराग देसाई यांचा ब्रेन हॅमरेज ने झालेला मृत्यू. हॉस्पिटलच्या रिपोर्ट वर त्यांच्या मृत्यूचे कारण ब्रेन हॅमरेज आहे. ब्रेन हॅमरेज होण्याचे कारण ते रस्त्यावरच्या कुत्र्यांच्या हल्ल्यापासून स्वतःला वाचवत असताना पडले आणि डोक्याला मार लागून ब्रेन हॅमरेज मुळे मरण पावले.

जेव्हा पहिल्यांदा ही बातमी आली तेव्हा भटकी कुत्री न आवडणारे त्वेषाने भटक्या कुत्र्यांना दोष देऊ लागले. पण जसा हॉस्पिटल चा रिपोर्ट आला तसा भटके कुत्रे प्रेमींना आवेश चढला आणि त्यांनी भटक्या कुत्र्यांची निर्दोष मुक्तता केली. (येथे खरं तर मी भटकी कुत्री हा शब्द न वापरता "माझ्या बाळा" किंवा "माझ्या सोन्या" असे शब्द वापरायला हवेत, पण अजून भटक्या कुत्र्यांना "भटकी कुत्री" म्हटले तरी निदान कुत्र्यांच्या भावना दुखावल्या जात नाहीत म्हणून मी सरळ भटकी कुत्री हा शब्द वापरायचे धाडस केलंय.)

अगदी महिन्या पूर्वी भटक्या कुत्र्यांच्या चाव्याने रेबीज होऊन मुलाने वडिलांच्या मांडीवर तळमळत प्राण सोडले ही बातमी आलेली होती. आता या केस मध्ये भटक्या कुत्र्यांना निर्दोष कसे सिद्ध करणार?

पण थांबा , याचीही सोय आहे. ......

ज्यावेळी कुत्रे त्या दुर्दैवी मुलाला चावले, त्याने घाबरून त्याच्या पालकांना ते सांगितलेच नाही. काही दिवसांनी त्या मुलात रेबीज सदृश लक्षणे दिसू लागली तेव्हा त्याला हॉस्पिटल मध्ये नेले, पण उशीर झालेला होता. रेबीज एकदा झाला की तडफडत मृत्यू हे अटळ आहे आणि तेच या मुलाच्या बाबतीत घडले. जर त्या मुलाने वेळीच पालकांना सांगितले असते तर त्याला वेळीच लस मिळाली असती आणि तो वाचला असता.
(त्याने घाबरून चावा लपवला आणि तो मेला यात बिचार्या भटक्या कुत्र्यांचा काय दोष नाही का ?)
असो .
भटक्या कुत्र्यांनी नागरिकांवर हल्ला केल्याच्या बातम्या अधून मधून येतच असतात.
दुसरा असाच एक व्हिडीओ आहे ज्यात अशा रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांपासून स्वतःला वाचवत असताना दुचाकी वरील महिला कारला धडकल्या आणि जखमी झाल्यात.

आमच्या सोसायटीतच धुणं भांडी करणाऱ्या मोलकरणींना , सुतार, प्लम्बर यांना आमच्या सोसायटीतल्या भटक्या कुत्र्यांनी अनेकदा चावा घेतला आहे.

एकदा मी पिझ्झा मागवलेला घरी. ४० मिनिटांनी पिझ्झा बॉय पिझ्झा घेऊन आला, पूर्ण घाबरलेला, अंगावर जखमा असलेला. मी त्याला पाणी दिले आणि काय झाले म्हणून विचारले. त्याच्यावर सोसायटीतील भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून त्याला पाडले आणि चावा घेतला. नंतर मला डॉमिनोज मधून फोन आला की तो माझा कुत्रा आहे का? ते माझ्यावर गुन्हा दाखल करायला निघाले होते. मी निक्षून सांगितले की माझ्याकडे कुत्रा नाही तेव्हा मग त्यांनी माझी सोसायटी डिलिव्हरी साठी ब्लॅक लिस्ट केली आणि यानंतर आमच्या सोसायटीत कोणालाही डिलिव्हरी रस्त्यावर येऊन घ्यावी लागते.

अनेक सोसायट्यातून "भटके श्वान" प्रेमी असतात. पेटाच्या नियम नुसार अशा भटक्या कुत्र्यांना सोसायटीमध्ये आत येण्या पासून रोखणे हा गुन्हा आहे (पेटा कलम ९ क). अशा श्वान प्रेमींच्या मागे ही कुत्री सोसायटीत येऊ जाऊ लागतात. सोसायटीच्या जिने, लिफ्ट अशा जागा त्यांचे नैसर्गिक विधी (पावसाळ्यात विशेषकरून) करण्याचे हक्काचे स्थान बनते.

इतर वेळी अशा कुत्र्यांना खायला घालणारे, या कुत्र्यांनी केलेली घाण स्वच्छ करायला उत्साही असतात?
याबरोबर सोसायटीत येणाऱ्या अनोळखी माणसांवर गुरगुरणे, त्यांच्यावर धावून जाणे , प्रसंगी चावणे असे प्रकार घडतात. मग श्वान प्रेमी एका बाजूला आणि इतर लोक दुसऱ्या बाजूला असे वाद , अनेकदा मारामाऱ्या होतात.

अजून एक वादाचा मुद्दा की अशा कुत्र्यांना खायला देणे. पेटा प्रमाणे अशा कुत्र्यांना खायला देण्यापासून कोणाला रोखणे कायद्याने गुन्हा आहे.

थोडा विषयांतराचा दोष पत्करून एक ऐकलेला अनुभव सांगतो. एका चिकन तंदूर विकणाऱ्या हातगाडीचा किस्सा आहे. तिचा मालक उरलेले चिकन चे तुकडे त्याच्या हातगाडीच्या टपावर टाकत असे. ते तुकडे खाण्यासाठी कावळे घरी त्या हातगाडीच्या टपावर गर्दी करीत असत. एकदा काही कारणाने ती हातगाडी काही दिवस बंद ठेवावी लागली होती. साहजिकच कावळे , घरी याना जी रोजचे आयते अन्न मिळायची सवय झाली होती ते मिळेनासे झाले. मग चवताळलेल्या त्या कावळे घारींनी आजू बाजूने जाणाऱ्या लोकांना टोची मारायला सुरुवात केली. लोक हैराण झाले.

आपली संपत्ती वाढावी, पुण्य लाभावे म्हणून कबुतरांना, कुत्र्यांना खायला देणारे पण खूप आहेत. काहींची तर या जन्मात कबुतरांना खायला दिले तर पुढल्या जन्मात आपण उपाशी राहणार नाही अशी श्रद्धा आहे.

एकीकडे पुरोगामित्वाच्या आरोळ्या ठोकायच्या आणि दुसरीकडे असल्या पुनर्जन्म, पाप पुण्य वगैरे अवैज्ञानिक गोष्टींवर विश्वास ठेवायचा. याचे समर्थन कसे करणार ?

यावर अनेक मत मतांतरे आहेत. एक पक्ष म्हणतो की असे आयते खायला दिल्याने प्राण्यांची अन्न शोधून खायची क्षमता संपते. त्यांना भरपूर मोकळा वेळ मिळतो आणि मग त्या मोकळ्या वेळाचे रूपांतर वाढलेल्या प्रजननात होते.
दुसरा पक्ष म्हणतो की सिमेंटीकरणाने या प्राणी पक्ष्यांचे नैसर्गिक अन्न कमी झालाय म्हणून आम्ही त्यांना खायला देतो.

आता थोडी दुसरी बाजू.
केवळ असुरी आनंद मिळवण्यासाठी प्राणांना त्रास देणारेही आहेतच. यात मुद्दामहून कुत्रे मांजर यांच्या अंगावर गाडी घालणे, त्यांच्या गुप्तांगावर पेट्रोल टाकून त्यांची तडफड बघून आनंद घेणे, काम वासनेत अडकलेल्या कुत्र्यांना दगडी मारणे, कुत्रा, मांजर यांच्या शेपटीला फटाके लावून त्यांची होणारी दैना पाहून आनंद घेणे, पेढे मिठाई यातून त्यांना विष देऊन मारून टाकणे या आणि अशा अनेक गोष्टी करणारे लोक आहेतच.

बाकी मांसाहार करताना प्राणी प्रेम कुठे जातं आणि वनस्पती, फळे या पासून बनलेला शाकाहार खाताना झाडे , वेळी फुलं प्रेम कुठे जाते हा प्रश्न जेव्हा रिकामा वेळ असेल तेव्हा बोलूया.

आता दोन्ही बाजूने ढोल बडवून झाल्यावर या वर काही मध्यम मार्ग निघेल का ते बघूया.

१. सगळ्यात प्रथम प्राणीप्रेमी ज्या आर्टिकल ५१ A - g चा आधार घेऊन प्राणीप्रेमी असल्याचे उर बडवून सांगतात त्यांच्या साठी:
आर्टिकल ५१ A हा भारतीय नागरिकांची मूलभूत कर्तव्ये काय आहेत याबाबत भाष्य करतो. या ५१ A मध्ये a ते k अशी ११ उपमुद्द्ये आहेत आणि त्यातल्या g या मुद्याचे विश्लेषण करणे आवश्यक आहे. ५१ A - g चे मूळ टेक्स्ट खालील प्रमाणे आहे.
"To protect and improve the natural environment including forests, lakes, rivers and wild life, and to have compassion for living creatures."
याचा मराठी शब्दशः अनुवाद खालील प्रमाणे आहे.
"जंगले, तलाव, नद्या आणि वन्य जीवांसह नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण आणि सुधारणा करणे आणि सजीव प्राण्यांबद्दल सहानुभूती बाळगणे."

आता या आर्टिकल चा काढू तसा अर्थ निघतो.
१. कोणी म्हणेल की पर्यावरणाचे संरक्षण करणे म्हणजे झाडे, पाने , फळे न कापणे आणि त्यामुळे शाकाहार व्यर्ज करणे.
२. कोणी म्हणेल की जंगले, तलाव, नद्या आणि वन्य जीवांसह नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण करणे म्हणजे नदीवर धरणे न बांधणे, तलावातील पाणी न पिणे. आणि.....याचिंच एक आवृत्ती ,म्हणजे :

३. भटक्या कुत्रे प्रेमींनी काढलेला अर्थ असा की प्राण्यांबद्दल सहानुभूती बाळगणे म्हणजेच भटक्या कुत्र्यांना खायला घालणे.

असो.

१. मानव हा मुळात एक प्राणी आहे पण बुद्धीच्या जोरावर त्याने गेली अनेक शतके निसर्गाचे नियंत्रण स्वतःच्या हातात घेतले आहे. याच बुद्धीचा वापर करून त्याने सगळे नियम बनवले आहेत. हे सगळे नियम मग त्यांना कायदे म्हणा, आर्टिकल म्हणा किंवा ऍक्ट म्हणा , मानवाला इतर कोणावर अन्याय होऊ न देता समाजात चांगल्या पद्धतीने सहिष्णू तेने राहता यावे म्हणून बनवलेले आहेत. शाळेत नागरिक शास्त्र शिकताना आपल्या वागणुकीमुळे इतरांना त्रास होणार नाही याचे भान ठेवण्याची जबाबदारी एक जबाबदार नागरिक म्हणून सगळ्यांची आहे हे आपण शिकलो आहोत. आता हे सगळे नियम अगदी डिटेल मध्ये लिहिणे अशक्य नसले तरी अवघड काम आहे. त्यामुळे माणसाने आपली सद्सद् विवेक बुद्धी वापरून वागावे अशी अपेक्षा करणे यात वावगे काही नाही. आपल्या कृतीमुळे इतरांना त्रास होत नाहीये ना इतका विचार मानवाने करावा अशी शुल्लक अपेक्षा आपण मानव एकमेकांपासून नक्कीच ठेऊ शकतो.
२. आपल्या मुलांना रेबीज बाबत माहिती देणे. कोणत्याही प्राण्याने चावा घेतला तर त्वरित त्यानी पालकांना सांगणे किती आवश्यक आहे हे त्यांना समजावून सांगणं. शाळेत याबाबत एक सेशन ठेवावे किंवा अभ्यासक्रमात हा एक धडा ठेवावा. याच धड्यात मुलांना प्राणीप्रेमी असणे आणि त्या प्रेमा - बरोबर येणाऱ्या जबाबदाऱ्या सुद्धा शिकवाव्यात.
३. रेबीज ची लस सहज आणि स्वस्तात सगळीकडे उपलब्ध असणे याकडे सरकार ने लक्ष द्यावे.
४. होमिओपॅथी , आयुर्वेद या डॉक्टरना सुद्धा रेबीज लस देण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना ती लस द्यायची परवानगी सरकारने द्यावी. सध्या अशी परवानगी आहे की नाही माहित नाही. नसेल तर सरकारने ती द्यावी.
५. स्ट्रे डॉग फीडर्स यांची अधिकृत नोंदणी व्हावी. त्यांना तसेही पेटा कायद्याचे संरक्षण आहेच. पण हक्कांबरोबर जबाबदारी ही घ्यावीच लागते. म्हणून या स्ट्रेट डॉग फीडर्स ला जबाबदारी द्यावी की त्यांनी त्यांच्या परिसरातील भटक्या कुत्र्यांची नोंद ठेवावी. त्या प्रत्येक भटक्या कुत्र्यांना दत्तक घ्यावे. अशा प्रत्येक दत्तक घेतलेल्या कृत्र्याच्या गळ्यात पट्टा लावून त्यावर त्याच्या दत्तक पालकाची माहिती आणि संपर्क लिहिलेला असावा. त्या पालकाने (मी आता इथे मुद्दाम डॉग फीडर हा शब्द न वापरता पालक हा शब्द वापरलाय) त्या कुत्र्याच्या लसीकरणाची, त्याच्या न्यूट्ररिंग ची जबाबदारी घ्यावी आणि त्याची सर्व कागदपत्रे जपून ठेवावीत. अशा कुत्र्यांपैकी कोणत्याही कुत्र्याने कोणास चावा घेतला तर त्याची जबाबदारी त्या पालकाची मानावी. चावा घेतलेल्याच्या उपचारांचा खर्च या पालकाने करावा.
शिवाय अशा स्ट्रे डॉग फीडर्स नी त्यांच्या "पाल्याकडे" कायम लक्ष ठेऊन असावे. त्यात रेबीज ची लक्षणे नाहीत ना, त्याला स्किन इन्फेक्शन नाही ना याकडे लक्ष देऊन स्व खर्चाने त्यांच्यावर उपचार करावेत. (ज्यांना कुत्र्यांना गुड डे ची बिस्किटे द्यायला परवडते त्यांना हा उपचाराचा खर्च सुद्धा परवडायला हरकत नाही. )
६. अशा भटक्या कुत्र्यांना सोसायटीमध्ये प्रवेश नाकारता येत नाही. पण मग यांच्या दत्तक पालकांनी या कुत्र्यांनी केलेली घाण साफ करायची जबाबदारी घ्यावी. किंवा आपापल्या घरात डॉग लिटर आणून त्यांच्या स्वच्छता गृहाची सोय स्वतःच्या घरातच करावी.
मी अनेक कुत्री पाळणारे पाहिले आहेत की जे त्यांची कुत्री बाहेर फिरायला नेताना त्यांच्या बरोबर पॉट घेऊन फिरतात. कुत्र्यांना गरज पडली की ते लोक त्यांच्या कुत्र्यांना पॉट देतात. समजा काही घाण रस्त्यावर पडली तर ते स्वतः साफ करतात. अशा प्राणी प्रेमींचे मला खूप कौतुक आहे. कारण त्यांना त्यांच्या आर्टिकल ५१ A (g) च्या हक्कांप्रमाणे त्यांच्या समाजाबद्दल असलेल्या कर्तव्याची जाणीव पण आहे.
७. ज्यांनी पाळीव कुत्री मांजरी किंवा पशु पक्षी , कासवे वगैरे पाळली आहेत त्यांनी त्या त्या प्राणी किंवा पक्ष्यांची नीट काळजी घेतली पाहिजे. त्यांचे वेळोवेळी लसीकरण, त्यांचे न्यूटरिंग करणे , औषोधोपचार केले पाहिजे. आपल्या प्राणी प्रेमामुळे आपण समाजातील इतर मानवाना त्रास देत नाही ना याची जबाबदारी स्वीकारायलाच पाहिजे.
८. ज्यांनी आपल्ह्या घरी पाळीव कुत्री मांजरी किंवा पशु पक्षी , कासवे वगैरे पाळली आहेत त्यांनी आपल्याकडे येणाऱ्या पाहुण्यांना याबाबत आधीच कल्पना देऊन ठेवावी. अनेक लोकांना प्राण्यांच्या केसाची, वासाची तीव्र ऍलर्जी असते. घरी आल्यावर सरप्राईझ पाहुणचारात ऍलर्जीचे गिफ्ट पाहुण्यांना देण्यापेक्षा सरळ बाहेर भेटावे.
पाहुणे येणार असले तर आपले पाळीव प्राणी घरात अशा ठिकाणी ठेवावे की पाहुण्यांना त्याचा त्रास होणार नाही.

किंवा.....

ज्यांना पाहुण्यांपेक्षा आपले पेट प्रिय आहे त्यांनी पाहुण्यालाच अशा ठिकाणी ठेवावे की आपल्या पाळीव प्राण्याला पाहुण्यांचा त्रास होणार नाही .

९. सगळ्या अधिकृत कुत्रे मालकांनी लक्षात ठेवावे की त्यांच्या कुत्र्याने जर कोणाचा चावा घेतला तर IPC ३३८ अंतर्गत तुम्हाला शिक्षा होऊ शकते.
१०. ज्यांना प्राणी आवडत नाहीत त्यांनी किमान आर्टिकल ५१ A g चा सन्मान करावा. प्राण्यांना कोणत्याही प्रकारे त्रास देणे हा पेटा अंतर्गत गुन्हा आहे.
११. वर प्राण्यांना खायला देणे याबाबत मी व्यक्त झालेलो आहेच. पण तरीसुद्धा कुणाला अजून पटलेले नसेल आणि प्राण्यांना खायला द्यायचे असेल तर त्यांनी ते अशा ठिकाणी द्यावे की समाजातील इतरांना त्याचा त्रास होणार नाही. याशिवाय मी वर मुद्दा ५ मध्ये जे सांगितलंय ते ही मान्य करावे.
१२. सगळ्या प्राणी मालकांची आणि प्राणी दत्तक पालकांची पालिकेत नोंद ठेवावी आणि त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांची जाणीव असल्याचे प्रतिज्ञा पत्र त्यांचे कडून लिहून घ्यावे.
१३. प्राणी पक्षि यांच्या मदतीसाठी साठी एक मदत खिडकी २४ तास सुरु ठेवावी. तिचा उपयोग जखमी, अडकलेले प्राणी पक्षी, याना मदत करणे, कोणी त्यांना त्रास देत असेल त्याला प्रतिबंध करणे किंवा त्यांच्यावर उपचार करण्यासाठी होईल.

मला सुचेल तो मध्यम मार्ग मी वर सुचवलाय. यात अनेक ऍडिशन्स करता येतील. मूळ मुद्दा असा की मानवाने आपण मानव आहोत आणि प्राण्यांपेक्षा वेगळे आणि प्रगल्भ आहोत हे कायम लक्षात ठेवावे. आपल्या कोणत्याही कृतीचा त्रास इतरांना (प्राणी-पक्षी धरून) होणार नाही याकडे लक्ष देऊन वागले तर सगळ्यांनाच बरे पडेल.

आणि तसंही आमच्या रत्नागिरीच्या अंतूशेट बर्व्यानी नाहीतरी सांगितले आहेच की

"रामायणात देखील मारुतीचे शेपूट उपटून रामानं आपल्या पाठीस नाही जोडले, राम नरच राहिला आणि मारुती वानरच राहिला!"

कौस्तुभ पोंक्षे

प्रतिक्रिया

सोसायटीच्या आवारालगतच्या मोकळ्या जागेत किमान १५ तरी भटके कुत्रे फिरतात. हेच १५ भटके कुत्रे पायी जाणाऱ्यांना व दुचाकीवरून जाणाऱ्यांना भुंकतात, कधी कधी चावा घेतात. रात्र भर मोठ्याने भुंकत राहतात, रडत राहतात आणि यशस्वीरीत्या झोपमोड करतात. दिवसा फक्त हाड म्हणण्याने पळून जाणाऱ्या या भटक्या कुत्र्यांची रात्री एवढी दहशत असते की जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून जावे लागते. माझे मत असे आहे की सर्व भटके कुत्रे हे कोंडवाडासम सरकारी बंदिस्त जागेत स्थानांतरित करावेत जेणेकरून नागरिकांचा त्रास कमी होईल.

नठ्यारा's picture

18 Nov 2023 - 3:54 pm | नठ्यारा

अगदी संतुलित लेख आहे. विशेषत: सुचवलेले उपाय तर्कशुद्ध आहेत. हा लेख समयोचित अशासाठी की हे उपाय वाचल्यावर एका वेगळ्या समूहाची आठवण आली. तो समूह म्हणजे भटकी डुकरे होय. नागपुरात यांचा बराच उपद्रव आहे म्हणे : https://indianexpress.com/article/cities/mumbai/out-to-catch-stray-pigs-...

-नाठाळ नठ्या

अमरेंद्र बाहुबली's picture

18 Nov 2023 - 4:03 pm | अमरेंद्र बाहुबली

मी लहान असताना बहुतेक तीसरीत असताना रिक्षा मला एका फाट्यावर सोडायची नी तिथून मला ५०० मीटर चालत वडीलांना गाठावं लागायचं. रस्त्यात एक पेट्रोल पंपं लागायचा, रोज मी जीव मूठीत धरून जायचो, एका दिवशी कुत्र्यांनी हल्ला केलाच. पण वाचलो कारण बाजूला कुणीतरी होतं. कुत्र्यांच्या अनेक हल्ल्यांना तोंड दिलंय, दोन वेळा कुत्रं चावलंय, पहील्या वेळेस ९ वर्षांचा असताना, तेव्हा सरकारी दवाखान्यात रोज सकाळी जाऊन पोटात इंजेक्शन घ्यावं लागायचं, सलग १० दिवस घेतलं. नंतर १४ वर्षांचा असताना आणखी एकदा चावलं होतं तेव्हा एकाच इंजेक्शन मध्ये काम आटोपलं होतं. खरं तर मी देखील भितीने कुत्रा चावलाय हा बाह लपवनार होतो पण आमचा एक नातेवाईक रेबीज झालेया मूळे कुत्र्यासारखं करायचा हे मी ऐकलं होतं त्यामुळे मला रेहीज हा प्रकार माहीत होता.
इतर कुठल्याही पाळीव प्राण्याचा त्रास नसतो, असतो तो फक्त कुत्रा नी डूक्कर ह्यांचा. डूकरे कमी झालीत नी अन्न म्हणून वापर होत असल्याने संख्या ही मर्यादीत आहे, मांजर कधी चावत नाही, हल्ला वगैरेही करत नाही पण कुत्रे हा प्रकार भयानक आहे, मानवी वस्तीत घुसलेलं हिंस्र श्वापद. मी लहान असताना पाहीलंय की कुत्र्यांची तक्रार पालिकेला केली की सकाळी येऊन पालिकेचे लोक कुत्र्यांना विषारी पेढा खाऊ घालायचे नी दुपारी मेलेल्या कुत्र्यांना गाडीत टाकून न्यायचे. नंतर हा प्रकार बंदं झाला असावा. आता नगरपालिका कुत्रे पकडतात पण शहराबाहेर दुसर्या भागात सोडतात, आपली ब्याद दुसर्याच्या माथी मारतात. हायवेला कितीतरी अपघात हे रस्त्यावर आलेले कुत्रे वाचवण्यामुळे होतात नी कितीतरी लोक आपला जीव गमावतात. महापालिकेने सर्व भटके कुत्रे एकतर मारून टाकावेत किंवा शेल्टर हाऊस मध्ये ठेवावेत. कुत्रे पाळणार्यांसाठी कडक नियम हवेत.

कपिलमुनी's picture

18 Nov 2023 - 10:33 pm | कपिलमुनी

कुत्रे , प्राणी प्रेमी आणि मी हा लघु कादंबरीचा विषय आहे .

लास्ट लोकल ने आल्यामुळे चालत घरी येताना कुत्री मागे लागायची.. मग एके रविवारी खिळे मारलेला बांबू घेऊन बाईक वर मित्रांना घेऊन कुत्र्यांना व्यवस्थित प्रसाद दिला ..असे युद्ध काही रविवार चालले .. मग कुत्र्यांनी मागे लागणे बंद केले.

पुढे शहरात आल्यावर काही जबरदस्त प्राणीप्रेमी भेटले त्यात कोर्टाची धमकी ,पोलीस तक्रार वगैरे प्रकार पाहिले पण अनुभवले नाही.. इथे गनिमी काव्याने काम केले. एकदा कुत्रे २-३ फुटावर असताना स्ट्रेफिडर ला स्कूटर हळूच धडकली आणि कुत्र्यावर आळ घेतला..वरतून आपण दोघे जाऊन पालिकेत तक्रार करू वगैरे मदत करायची इच्छा प्रदर्शित केली.

३ रा प्रकार मात्र गंभीर होता , माझ्या ३ वर्षाचा मुलावर सोसायटीतील कुत्रा धावून आला तो त्या बाईला कंट्रोल होत नव्हता , मुलगा खूप घाबरला, सोबत आजी होती म्हणून काही झाले नाही..
मग त्या कुत्रा मालकांना प्रेमाने गचांडी पकडून सांगितले , केस कर नाही तर काही कर, पुन्हा कुत्रा दिसला तर दोघानाही बेदम मारेन.. अशीही केस तशीही केस .. जीवावर आल्यास केसला कोण घाबरतो .. मग त्या माणसाने घर सोडले ..( कुत्रे सोडले नाही हे मात्र विशेष )

एका पामेरियन ला पहिल्या मजल्यावरून उडी मारायला उद्युक्त केले होते ते नंतर कधीतरी .

खटासी असावे खट हे ध्यानी धरावे..

कोर्ट वगैरे प्रकार पुणेकर मानत नाहीत ( हेल्मेट वगैरे ) हे मनी असावे

Bhakti's picture

28 Nov 2023 - 11:20 am | Bhakti

ऋतूचक्र यांचेही.....
भाद्रपदने आपला कर्मयोग साधला असून भरपूर गर्भार,काही नुकत्याच व्यालेल्या भटक्या भू भू णी दिसत आहेत.जो तो आपल्या दारातून यांना हाकलून देतो आहे.
यातली एक आमच्याकडे रोज यायची सुरूवातीला चांगली वाटायची पण नंतर खुप गलिच्छ होत गेली.तिच्यासाठी गेट बंद केले.नंतर बरेच दिवस आली नाही.चार दिवसांपासून ती रोज आत यायची , हाकलून लावायचो.आज सकाळी समोर रस्त्यावर ती पिलांबरोबर होती तेव्हा समजलं ती आसरा शोधत होती.चांगली पाच सहा पिल्ले आहेत.ती पण भटकणार...यांची लोकसंख्या आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना पाहिजे नाहीतर भूभू रायझेस सिनेमा होईल,माणसं असुरक्षित!