दिवाळी अंक २०२३ - अवकाशाशी जडले नाते कुबेरपुत्रांचे

शेखर मोघे's picture
शेखर मोघे in दिवाळी अंक
12 Nov 2023 - 12:00 am
1

हे प्रवासवर्णन एकदम वेगळेच आहे. जर त्याचा आपल्याला माहीत असलेल्या प्रवासाच्या आणि प्रवासवर्णनाच्या धर्तीवरचा नमुना हवा असेल, तर तो साधारणतः असा असेल - '.... गाडीने शिट्टी फुंकली होती, गार्डाने हिरवा झेंडा दाखवलेला होता आणि फलाटावरच्या चहावाल्यांनी पैसे गोळा करण्याकरता एकाच कल्ला सुरू केला होता. फलाटावरचे आणि गाडीतले इच्छुक प्रवासी, फलाटावरून डोकावून गाडीत बघणारे आणि निरोप द्यायला आलेले हे सगळेच मालदार आसामी होते. हिऱ्याचे शिरपेच, माणकांच्या कंठ्या अशा सगळ्यांचा झगमगाट तर सगळीकडे होताच, तसेच कुठे कुणाचे चार हुजरे रत्नजडित पानदान आणि हुक्का घेऊन आदबीने उभे होते, तर कुठे कुणाला निरोप देण्यासाठी आलेली मंडळी आपापल्या हत्तीवर स्वार होत चांदीच्या अंबारीत स्थिरस्थावर होत होती. सगळ्यांनाच माहीत होते की ही गाडी फक्त यार्डाच्या बाहेरपर्यंत जाऊन परत फलाटावर येणार होती. पण त्यातून एक चक्कर मारण्याचा मान मिळवण्याकरता अनेकांनी इंजीन ड्रायव्हर, स्टेशन मास्तर, हमाल, गार्ड अशा जमेल त्यांचे पाय पकडून, मागेल ती किंमत मोजून आपली जागा राखून ठेवण्याचा प्रयत्न केला होता...'

मी लिहितो आहे 'बिन-सरकारी अवकाश प्रवास' याबद्दल. म्हणजे जिथे अवकाशवहन प्रणालीसाठी सरकारी पैसा वापरला गेला नाही किंवा प्रवाशांचा खर्चही सरकारने केलेला नाही, अशा अवकाश प्रवासाचे. आणि त्यामुळेच सध्यातरी या प्रवासाशी संलग्न असलेले सगळेच कुबेरपुत्र आहेत - ज्यांना अशा प्रवासाची व्यावसायिक उपलब्धता करून देण्याकरता अब्जावधींची गुंतवणूक करणे सहज जमते किंवा एखाद्याच वेळच्या प्रवासासाठी काही कोटींचा खर्च करणे सहज परवडते.

आपण जेव्हा कुठेतरी सायकलवरून प्रवासाचा विचार करतो, तेव्हा (रुपयातील) खर्चाचा अंदाज शेकड्यात किंवा फारच फार हजारात करतो. आंतरराष्ट्रीय विमानाने कराव्या लागणाऱ्या प्रवासासाठी हाच अंदाज लाखात करावा लागतो. त्याच चढत्या श्रेणीत अवकाशातील प्रवासासाठी एका वेळच्या खर्चाचा अंदाजदेखील कोटींच्या घरात नक्कीच जाईल, खरे ना ?

पृथ्वीच्या भोवतालचे वातावरण आणि वायुपटल जसजसे भूतलावरून वर जावे, तसे विरळ होत जाते. पण एकदम नाहीसे न होता वेगवेगळ्या ठिकाणच्या समुद्रसपाटीपासूनच्या उंचीनुसार कमी-अधिक दाट किंवा विरळ होत असल्यामुळे पृथ्वीची 'मर्यादा' संपून अवकाशाची - Space - सुरुवात नक्की कुठून होते, हे ठरवणे अवघड आहे. प्रचलित आंतरराष्ट्रीय विचारसरणीनुसार पृथ्वीवरील सरासरी समुद्रसपाटीपासून ६२ मैल किंवा १०० किलोमीटर या अंतरापलीकडे - ज्याला Kerman Line म्हणतात - अवकाशाची - Space - सुरुवात होते. या लेखासाठी 'अवकाश, अंतरिक्ष किंवा अंतराळ हे समानार्थी शब्द मानले आहे.

युरी गागारिन या रशियन अवकाश प्रवाशाने १२ एप्रिल १९६१ रोजी पृथ्वीच्या वातावरणाच्या पलीकडे जाऊन अवकाशमार्गाने पृथ्वीप्रदक्षिणा करून अवकाश प्रवासाची सुरुवात केली. त्याच्या काही वर्षे आधी (सोव्हिएट रशियाने अवकाशात उपग्रह पाठवल्यानंतर) सुरू झालेल्या अमेरिका आणि सोव्हिएट रशिया यांच्यातील स्पर्धेतून प्रक्षेपणासाठी लागणारी ऊर्जा मिळवण्यासाठी अनेक वेगवेगळ्या पद्धतीची अग्न्यस्त्रे (rockets) तसेच अवकाशयाने आणि त्यांच्यासाठी काटेकोर नियंत्रणपद्धती विकसित झाल्याने अवकाश प्रवासाचे अनेक नवीन नवीन विक्रम प्रस्थापित झाले आणि मोडलेही गेले. हे करताना अनेक वेळा शून्यापासून सुरुवात करून अनेक तऱ्हेची पूर्णपणे नवीन माहिती, मोजमापे, साधने आणि उपकरणे शोधणे, मिळवणे, बनवणे, अजमावणे आणि त्यातील सगळ्या तऱ्हेचा धोका शक्य तेवढा कमी करणे या सगळ्याचकरता प्रचंड वेळखाऊ संशोधन, खर्च आणि उठाठेवी कराव्या लागल्या. सहाजिकच अवकाश प्रवासाच्या सुरुवातीच्या काळातील खर्च पेलण्याची क्षमता फक्त भरभक्कम सरकारी तिजोरीचीच होती.

अमेरिका आणि सोव्हिएट रशिया यांच्यात १९६१नंतर (युरी गागारिनच्या अवकाशमार्गाने केलेल्या पहिल्या पृथ्वीप्रदक्षिणेनंतर) सुरू झालेल्या स्पर्धेतून प्रक्षेपणासाठी वेगवेगळ्या पद्धतीची अग्न्यस्त्रे (rockets) तसेच अवकाशयाने आणि त्यांच्यासाठी काटेकोर नियंत्रणपद्धती विकसित झाल्या. त्यामुळे अवकाश प्रवासाचे अनेक नवीन नवीन विक्रम प्रस्थापित झाले आणि मोडलेही गेले. हे साध्य करताना अनेक वेळा शून्यापासून सुरुवात करून अनेक तऱ्हेची पूर्णपणे नवीन माहिती, मोजमापे, साधने आणि उपकरणे शोधणे, मिळवणे, बनवणे, अजमावणे आणि त्यातील सगळ्या तऱ्हेचा धोका शक्य तेवढा कमी करणे या सगळ्याचकरता प्रचंड वेळखाऊ संशोधन, खर्च आणि उठाठेवी कराव्या लागल्या. सहाजिकच अवकाशप्रवासाच्या सुरुवातीच्या काळातील अवाढव्य खर्च (ज्यातून फारसा परतावा मिळणे शक्य नव्हते) पेलण्याची क्षमता फक्त भरभक्कम सरकारी तिजोरीचीच होती.

NASA या अमेरिकन अवकाश संशोधन संस्थेने १९७३पर्यंतच्या आपल्या 'अपोलो' कार्यक्रमात सुमारे २५४० कोटी अमेरिकन डॉलर्स (म्हणजे सध्याचे सुमारे १५,००० कोटी अमेरिकन डॉलर्स किंवा रु. १२०,००० कोटी) खर्च करून २४ अंतराळवीरांना अवकाशप्रवास घडवून परत आणले. त्यातले १२ चंद्रापर्यंत पोहोचले, तर इतर वेगेवेगळ्या तऱ्हेने - पृथ्वीभोवती काही वेळा प्रदक्षिणा - अवकाशात फिरले. या २४ अंतराळवीरांखेरीज आणखीही १०-१२ जण 'राखीव गडी' म्हणून प्रशिक्षण देऊन तयार ठेवले गेले. म्हणजे सरासरी माणशी खर्च किती झाला, याचा अगदीच कच्चा आकडादेखील होईल सुमारे १०० कोटी अमेरिकन डॉलर्स (म्हणजे सध्याचे सुमारे ६०० कोटी अमेरिकन डॉलर्स किंवा रु. ५,००० कोटी) अशी अतिप्रचंड रक्कम!

गंमत अशी की तरीही काही कुबेरपुत्रांना अवकाश प्रवास - त्या वेळी फक्त अब्जाधीशांच्या खिशाला परवडणारा असला तरी - व्यापारी तत्त्वावरसुद्धा भविष्यकाळात आकर्षक ठरेल असे वाटले. त्यांनी पुढाकार घेऊन अवकाश प्रवास हा 'सामान्य' लोकांनादेखील - म्हणजे ज्यांना काही कोटी (रुपये) खर्च करणे हे, सुरुवातीला तरी, फारसे अवघड वाटत नाही अशांना - कसा करता येईल यावर विचार, संशोधन, खर्च, गुंतवणूक आणि प्रयोग सुरू केले. NASAने साधलेल्या प्रगतीनंतर, तसेच काही जर त्यानंतर करायचे म्हटले, तर बऱ्याच बाबींकरिता शून्यापासून सुरुवात करण्याची जरूर नसल्यामुळे त्यांचा खर्च NASAपेक्षा बराच कमी होईल, याची त्यांना खातरी होती. सुमारे १५-२० वर्षांच्या तयारीतून त्यांनी अवकाश प्रवासासाठी लागणारी अवकाशयाने, अग्न्यस्त्रे, नियंत्रण कक्ष, उड्डाणस्थळे अशा अनेक तऱ्हेच्या व्यवस्थेसाठी कधी पूर्ण नवीन (आणि स्वस्त) प्रणाली, तर कधी काहीतरी 'जुगाड' अशा अनेक प्रकारांनी 'सामान्यांसाठी' अवकाश प्रवास साध्य करून दाखवला.

सध्या काही काळ उपलब्ध असलेल्या व्यापारी तत्त्वावरच्या अवकाश प्रवासाची यंत्रणा वापरून सुमारे ५०-६० अवकाश प्रवासी अवकाश उड्डाण करून सुखरूप परतही आलेले आहेत. या प्रवाशांपैकी सुमारे अर्ध्या लोकांनी स्वतःचा खर्च स्वतः केला तर बाकीचे चालक किंवा मालक (किंवा त्यांचे मित्र) असल्यामुळे त्यांचा खर्च 'अवकाश प्रवास व्यवस्थेसाठी चाचण्या' या सदरात नोंदला गेला असावा. तिकिटासाठी पैसे घेऊन अवकाश प्रवास सुरू होण्याआधी झालेल्या चाचणी उड्डाणात काही मृत्यूही झालेले आहेत.

पहिल्या अवकाश प्रवासाच्या आधी आणि नंतर किमान चार अब्जाधीश (त्यातील एक सध्या हयात नाही) सुमारे १५-२० वर्षे करत असलेली पूर्वतयारी आणि त्यानंतरच्या काही महत्त्वाच्या यशस्वी व्यापारी ('तिकीट' विकत घेणाऱ्या प्रवाशांसाठी केलेल्या) अवकाश सफरी यांचे हे थोडक्यात प्रवासवर्णन!

अवकाश प्रवास किंवा विमान प्रवास यांच्या प्रगतीचा आलेख पाहताना दोन्हीही तऱ्हेच्या प्रवासाच्या सुरुवातीच्या काळात अशा प्रवासासाठी जाहीर झालेले एक प्रख्यात (आणि घसघशीत) बक्षीस आणि त्यासाठीच्या अटी पाळून ते मिळवण्यासाठी अनेकांनी केलेली धाडसी धडपड आणि त्यातून तयार झालेल्या प्रसिद्धीतून मिळालेले प्रवासाला मिळालेले उत्तेजन हा भाग बऱ्याच प्रमाणात सारखा वाटतो.

न्यूयॉर्क ते पॅरिस (किंवा उलट) विमान प्रवास - म्हणजेच अटलांटिक महासागराच्या एका तटावरून दुसऱ्या तटावर पोहोचणे, ज्यासाठी सुमारे ३,६०० मैल (५,८०० कि.मी) उड्डाण जरूर असेल - न थांबता करण्यासाठी १९१९ साली २५,००० अमेरिकन डॉलर्सचे (सध्याचे सुमारे ५००,००० अमेरिकन डॉलर्स किंवा रु. ४ कोटीपेक्षा जास्त) ) एक पारितोषिक जाहीर झाले. त्या आधी विमान प्रवासदेखील (सध्याच्या अवकाश प्रवासारखाच) साधारण जनतेत - खर्चीक आणि धोक्याचा वाटणारा म्हणून - फारसा रुळला नव्हता. हे पारितोषिक मिळवण्यासाठी तयारी करत असलेल्या अनेक स्पर्धकांवर मात करून चार्ल्स लिंडबर्गने १९२७ साली प्रथम न्यूयॉर्क ते पॅरिस हा विमानप्रवास ३३.१/२ तासांत कुठेही न थांबता करून हे पारितोषिक जिंकले. या स्पर्धेतील धाडसी स्पर्धकांच्या उपक्रमांना आणि त्यानंतर लिंडबर्गने मिळवलेल्या विजयाला जी जगभर प्रसिद्धी मिळत गेली आणि त्यामुळे विमान प्रवासाबद्दलचे कुतुहूल आणि त्याच्या सुरक्षिततेबद्दल खातरी जी वाढली, त्यामुळे १९२६ ते १९२८ या काळात अमेरिकेतील विमान प्रवासी ५,७८२पासून १७३,४०५पर्यंत - म्हणजे सुमारे ३० पट वाढले!

लिंडबर्गने वापरलेल्या धाडसी (आणि विजयी) पर्यायातील एक नमुनेदार पर्याय होता - इतर सगळे स्पर्धक त्यांच्या विमानांसाठी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून दोन किंवा तीन इंजिने वापरत असताना लिंडबर्गने आपल्या विमानासाठी फक्त एकच इंजीन वापरले होते. त्यामुळे विमानाचे वजन आणि वापरायला जरूर असलेले इंधन कमी झाले आणि म्हणून बरोबर घेतलेल्या इंधनातून त्याला जास्तीत जास्त अंतर कापता आले.

मे १९९६मध्ये जाहीर झालेल्या एका बक्षिसाचादेखील अवकाश प्रवासावर असाच काहीसा परिणाम झाला. 'X Prize Foundation' या संस्थेने 'बिन-सरकारी' अवकाश प्रवासासाठी (म्हणजे जिथे कुठल्याही सरकारी मदतीखेरीज सगळी प्रणाली तयार केली आहे, म्हणजेच NASAसारखी संस्था स्पर्धेसाठी अपात्र असेल) १ कोटी अमेरिकन डॉलर्सचे (सध्याचे सुमारे २ कोटी अमेरिकन डॉलर्स किंवा रु. १६० कोटी) पारितोषिक जाहीर केले होते. या पारितोषिकाचे नाव मे २००४मध्ये 'अन्सारी पारितोषिक' असे बदलण्यात आले. हे पारितोषिक जिंकण्यासाठी अवकाश प्रवासाकरता वापरले जाणारे अवकाशयान पुन्हा वापरता येईल, असे (reusable) असायला हवे होते, त्यात किमान एक वैमानिक व त्याखेरीज इतर दोन साहाय्यक किंवा दोन माणसांइतके वजन असायला हवे होते आणि यशस्वी अवकाशयानाने दोन आठवड्यांच्या काळात दोनदा यशस्वी अवकाश प्रवास करणे आवश्यक होते.

नवी नवी तंत्रे वापरून अनेक तऱ्हेची विमाने बनवणारा तज्ज्ञ बर्ट रुटन (Burt Rutan) आणि पॉल अ‍ॅलन (Paul Allen) यांच्या संयुक्त व्यवसायाला त्यांनी बनवलेल्या 'SpaceShipOne'च्या यशस्वी उड्डाणांमुळे २००४ साली हे पारितोषिक मिळाले.

जरी या पारितोषिकाकरता आणखी २५ इच्छुक काम करत होते, तरी बर्ट रुटन (Burt Rutan) आणि पॉल अ‍ॅलन (Paul Allen) यांना ते पारितोषिक मिळवण्यात यश आल्यामुळे त्यांनी हा सगळाच 'प्रवास' (त्या पारितोषिकाच्या अटी पाळून) कसा साध्य केला, हे पाहण्यासारखे आहे.

हे पारितोषिक जिंकण्यासाठी लागणारे काही कळीचे मुद्दे होते -

- ज्या संचातून उड्डाण होईल, तोच संच पुन्हा वापरता येईल असा असणे (reusable). याचाच अर्थ NASAच्या पद्धतीने अवकाशात यान आणि प्रवासी प्रक्षेपित करणे आणि नंतर त्यातला बराचसा भाग जळून जाऊन फक्त माणसे असलेला भाग भूतलावर परत मिळवला जाणे हे टाळायला हवे होते (आणि अशा एकापेक्षा जास्त वेळी वापरता येणाऱ्या संचांमुळे प्रत्येक उड्डाणाचा खर्चदेखील कमी झाल्याने भविष्यकाळात असा प्रवास उत्तरोत्तर आणखीनच 'परवडणारा' ठरला असता.)

- जरी या प्रवासाकरता माणसांना अवकाशात पाठवून परत आणायचे होते, तरी त्यात पृथ्वीप्रदक्षिणा करण्याची जरूर नव्हती.

म्हणजे अगदी ढोबळमानाने म्हणायचे, तर काही माणसे (एक किंवा अनेक) एखाद्या चेंडूसारखी किंवा चेंडूमधून 'अवकाशात' उडवून परत आणता आली की हे पारितोषिक मिळवण्याचे काम फत्ते होणार होते. फक्त हा 'चेंडू' पृथ्वीपासून किमान १०० कि.मी. दूर (म्हणजेच अवकाशात) 'फेकला' जायला हवा, त्यातील माणसांसकट तो पृथ्वीवर पुन्हा परत यायला हवा आणि पुन्हा हेच सगळे आणखी एका वेळा दोन आठवड्यांच्या आत साध्य व्हायला हवे .

बर्ट रुटन (Burt Rutan) आणि पॉल अ‍ॅलन (Paul Allen) यांना अन्सारी पारितोषिक मिळवण्यासाठी काय काय करावे लागेल याबद्दलच्या उपयोगी कल्पना अमेरिकन विमानदल आणि NASA यांनी आधी काही काळ बनवलेल्या आणि अनेक तऱ्हेच्या चाचणी परीक्षा पास केलेल्या X-15 तऱ्हेच्या 'विमान + अग्नियान' (aircraft + rocket plane) यातून मिळेल, असे वाटत होते. या प्रणालीत एक 'वाहक विमान' (carrier plane) पंखाखाली एक 'अग्नियान' (rocket plane म्हणजे ज्यांत विमानाकरता लागणारी ऊर्जा आणि दिशा अग्न्यस्त्रातून मिळते) घेऊन सुमारे ८ ते १० मैल उंची गाठेपर्यंत उडत असे. त्यानंतर अग्नियान सुटे होऊन, थोडेसे तरंगून त्यातील इंधनाचा स्फोट करत जवळजवळ सरळ वर उड्डाण करून अवकाशात प्रवेश केल्यावर मग नियंत्रित वेगाने पुन्हा पृथ्वीवर परतत असे. अवकाशात प्रवेश करताना आणि मागे वळून वातावरणात प्रवेश केल्यावर वेगवेगळ्या वेळचा इंधनाचा स्फोट मुख्यतः वेगनियंत्रण करण्याकरता असल्यामुळे हे अग्नियान बराच काळ हवेत तरंगत (gliding) पृथ्वीवर परत येत असे. वाहकाकरता इंधन किंवा वेगनियंत्रण याकरता अस्तित्वात असलेल्या तंत्रज्ञाच्या पलीकडे कुठल्याच वेगळ्या तऱ्हेच्या प्रणालीची जरूर नव्हती. अग्नियान पुन्हा वातावरणात प्रवेश करतानाचा वेग बराच कमी केला गेल्यामुळे त्याकरता वेगळ्या (आणि महागड्या) अग्निरोधक कवचाची जरूर लागत नसे.

१९६८पर्यंत या वाहकाची आणि यानाची १९९ उड्डाणे झाली. त्याकरता वाहक विमान म्हणून मुख्यतः B५२ जातीचे विमान वापरले गेले. त्यातील काही उड्डाणे पृथ्वीपासून १०० कि.मी.पेक्षा जास्तदेखील झाली. नील आर्मस्ट्राँग (ज्याने चंद्रावर पहिले पाऊल टाकले) हादेखील या यानाच्या चाचणी उड्डाणांसाठी वापरलेल्या 'चालकां'पैकी एक होता. NASAला ही प्रणाली वापरून आणखी बरेच काही करायचे होते. पण १९६७ साली झालेल्या एका उड्डाणात पृथ्वीवर परतत असताना या यानावरचे नियंत्रण गडबडले, यानावरचा गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव अनियंत्रित प्रमाणात वाढला आणि यानाची शकले होऊन त्यातील 'चालक' मायकेल अ‍ॅडॅम्स याचा मृत्यू झाला. या पृथ्वीवर परतत असताना शक्य होणाऱ्या अडचणींवर NASAला खातरीशीर उपाय शोधून काढता न आल्याने हा सगळाच कार्यक्रम बासनात गुंडाळून ठेवला गेला.

अन्सारी पारितोषिकासाठी पॉल अ‍ॅलन (Paul Allen)बरोबर प्रयत्न सुरू करताना बर्ट रुटनच्या नावे हवाई उड्डाण क्षेत्रातील अनेक पेटंट आणि प्रशंसनीय तांत्रिक सुधारणा जमा होत्या. त्याने बनवलेल्या Rutan Model 76 Voyager या विमानाने सर्वप्रथम कुठेही न थांबता सुमारे ९ दिवसांत जगप्रदक्षिणा केली होती. पॉल अ‍ॅलन जरी विमानविद्येच्या क्षेत्रात नवखाच असला, तरी बिल गेट्सबरोबर मायक्रोसॉफ्ट कंपनीची स्थापना करणारा, आपल्या काळातील जगातल्या सगळ्यात जास्त धनवान लोकांपैकी एक, वैयक्तिक मालमत्ता सुमारे २० अब्ज अमेरिकन डॉलर्स (२०१८ साली मृत्यूच्या वेळी) असलेला 'मातबर' असामी तर होताच, त्याचबरोबर या बक्षिसाच्या पाठलागासाठी आवश्यक असलेल्या पैशांच्या तरतुदीखेरीज या प्रकल्पाला बहुमोल व्यवस्थापकीय मदतही देत होता.

बर्ट रुटनने काही वर्षे खटाटोप करून १७ नोव्हेंबर २००३ला (राईट बंधूंच्या पहिल्या यशस्वी विमान उड्डाणानंतर बरोबर शंभर वर्ष) चाचणी उड्डाणासाठी तयार केलेला संच असा होता -

१. वाहक विमान (आकृती १): Scaled Composites Model 318, ज्याचे नाव ठेवले होते White Knight जर एकमेकांशेजारी ठेवलेल्या दोन 'साध्या' विमानाचे पुढचे आणि मागचे पंख एकमेकांना चिकटले, तर त्या दोन्ही विमानांच्या मध्ये एक पुढचा आणि एक मागचा असे दोन 'साध्या' विमानाच्या पंखांच्या लांबीच्या दुप्पट लांबी असलेले पंख तयार होतील. त्याखेरीज अशा '(जुळ्या) विमानाचे' प्रत्येकी पुढे एक आणि मागे एक असे दोन 'बाहेरचे' पंख डावीकडे आणि तसेच दोन 'बाहेरचे' पंखे उजवीकडे असतील. अशा 'चिकटलेल्या' विमानांच्या प्रवासी आणि वैमानिकांसाठी असलेल्या जागा (cabin and cockpit) दोन वेगवेगळ्या ठेवण्याऐवजी त्याही एकत्र करून तो दंडगोल सगळ्याच्या मध्यभागी आणल्यास जसा आकार होईल तशा तऱ्हेचे हे वाहक विमान होते. त्याकरता तीन Boeing ७४७ विमानांचे वेगवेगळे भाग वापरले होते. बरेच भाग एकमेकांशी मिळतेजुळते ठेवल्याने वाहक विमान आणि अवकाशात जाणारे विमान या दोन्ही विमानांच्या 'चालकांचे' प्रशिक्षण दोन्हीपैकी कुठल्याही विमानावर होऊ शकत होते. अशा 'बरेचसे पंख आणि थोडेसेच अंग' या रचनेमुळे वाहक विमानाला अवकाशात उड्डाण करणाऱ्या विमानासकट खूप उंचीपर्यंत उड्डाण करणे शक्य झाले होते. अन्सारी पारितोषिकासाठी या विमानाचे काम 'अवकाश प्रवासी नेणाऱ्या विमानाला' पुढील टप्प्यावर जाण्याकरता पुरेशा उंचीवर नेऊन पोहोचवणे एवढेच होते, तरी त्याचा इतरही उपयोग केला गेला.

1
आकृती १ : Photograph by Don Ramey Logan, CC BY-SA 3.0, via Wikimedia Commons

२. प्रत्यक्ष अवकाश प्रवास करणारे विमान (आकृती २) : Scaled Composites Model 316 ज्याचे नाव ठेवले होते SpaceShipOne, या विमानाचे काम कसे चालत होते त्याची माहिती मिळाल्यावर ते त्या पद्धतीने चालण्याकरता काय काय भाग/यंत्रणा त्याकरता कार्यरत होण्याची जरुरी होती, हे समजणे सोपे जाईल. वाहक विमानाच्या ऊर्जेवर हे विमान (वाहक विमानाच्या 'पोटाला चिकटून') सुमारे १५ किलोमीटर उंची गाठेपर्यंत, तीन माणसांना (एक चालक आणि इतर दोन साहाय्यक किंवा प्रवासी ) घेऊन उडत असे. या पातळीवर वाहक विमानापासून मोकळे झाल्यावर, हे विमान थोडेसे तरंगून मग अग्निबाणा(rocket)च्या प्रज्वलनामुळे प्रचंड झटक्यासकट जवळजवळ ९० अंशांचा दिशाबदल करून सरळ वर झेपावून अवकाशात शिरून (म्हणजेच भूतलापासून १०० किलोमीटरच्या पुढे जाऊन) पुन्हा उलटे वातावरणात प्रवेश करत टप्प्याटप्प्यात पुन्हा सपाट जमिनीवर इतर 'साध्या' विमानांसारखेच धावपट्टीवर पोहोचून थांबत असे. या सगळ्याच प्रायोगिक उड्डाणांमध्ये सगळ्याच बाबतीत कठीण आणि धोक्याचा ठरलेला टप्पा म्हणजे अवकाश प्रवेशानंतर परत वळून 'वातावरणात पुनःप्रवेश' (जिथे तोपर्यंत निर्माण झालेली गतिजन्य ऊर्जा - kinetic energy - जर अत्यल्प काळात गमावली नाही, तर तिचे घर्षणात किंवा जास्तीच्या गुरुत्वाकर्षणात रूपांतर होऊन यान आणि प्रवासी दोन्हीही नष्ट होऊ शकतात). यासाठी बर्ट रुटन आणि त्याच्या साहाय्यकांनी एक अशी प्रणाली तयार केली, की वातावरणांत पुनःप्रवेश करताना काही कळी दाबून या विमानाचे पंख दुमडले आणि उंचावले जाऊन विमानाच्या दोन्ही बाजूंना आडवे पसरण्याऐवजी तेच पंख विमानावर Vचा आकार तयार करून विमानाच्या गतिरोधकाचे काम करत. याला त्यांनी 'feathering' हे नाव दिले. गतिरोधकाचे काम आटोपल्यावर पुन्हा काही कळी दाबून हे feathered पंख पुन्हा पूर्ववत होऊन धावपट्टीवर विमान उतरायला मदत करायचे.

2
आकृती २ : Photograph by Don Ramey Logan, CC BY-SA 3.0, via Wikimedia Commons

या सगळ्या उड्डाण प्रणालीमध्ये योग्य वेळी अवकाश प्रवास करणारे विमानवाहक विमानापासून वेगळे करणे, तसेच अवकाश प्रवासी विमानाचे अग्न्यस्त्र संच प्रज्वलित करून 'feathering'करता गतिरोधक कळी दाबून तसेच पुन्हा feathered पंख पुन्हा पूर्ववत करून धावपट्टीवर उतरेपर्यंत विमानाचे नियंत्रण करण्यासाठी लढाऊ विमाने उडवण्याचे प्रशिक्षण मिळालेले (ज्यांना दिशा आणि वेगातील जलद बदल होत असतानाही विमान नियंत्रित ठेवण्याचे प्रशिक्षण मिळालेले असते) वैमानिक मिळवले गेले. चाचणी उड्डाणांच्या अनुभवातून जरूर ते यांत्रिक बदलही केले गेले.

सुमारे वर्षभरातल्या १४ चाचणी उड्डाणांनंतर २१ जून २००४ रोजी केलेले White Knight आणि SpaceShipOne यांचे उड्डाण अन्सारी पारितोषिकाच्या अटींची पूर्तता करणारे ठरले. यात जरी १०० कि.मी.पेक्षा जास्त उंची पार झाली, जरी हे 'यश' अगदी जेमतेमच होते, कारण या उड्डाणाची उंची हव्या असलेल्या उंचीपेक्षा फक्त १५० मीटर जास्त होती.

त्यानंतरच्या पुढील दोन उड्डाणांनंतर अन्सारी पारितोषिकाच्या अटींची नियमबद्ध पूर्तता झाली.

- २९ सप्टेंबर २००४ला माईक मेल्व्हील याने सारथ्य केलेले विमान १०२.९ कि.मी. उंच जाऊन परतले.

- ४ ऑक्टोबर २००४ला ब्रायन बिनी याने सारथ्य करून परतलेले विमान ११२ कि.मी. उंच गेले.

White Knight आणि SpaceShipOne यांनी २१ जून २००४ रोजी केलेल्या यशस्वी उड्डाणामुळे आणखी एक अब्जाधीश रिचर्ड ब्रॅन्सन (Richard Branson) या सगळ्यानेच इतका प्रभावित झाला की त्याने त्याच्या Virgin Atlantic या विमान कंपनीची बोधचिन्हे White Knight आणि SpaceShipOneवर त्यांच्या विजयी उड्डाणांच्या वेळी लावून Virgin Atlanticची जाहिरात करण्यासाठी १० लाख अमेरिकन डॉलर्स दिले.

पॉल अ‍ॅलनला जरी विमाने, अग्निबाण आणि अवकाश प्रवास यांत काही तरी पुढे करण्याची २००४पर्यंत इच्छा असली, तरी त्याने या सगळ्याच प्रकल्पातील जमवलेले तंत्रज्ञान रिचर्ड ब्रॅन्सनच्या Virgin Galactic या कंपनीला विकले. पॉल अ‍ॅलनने त्याच्या Idea Man या पुस्तकातील माहितीनुसार अन्सारी पारितोषिकामधून मिळालेले पैसे, तंत्रज्ञानाची विक्री तसेच ती सगळीच यंत्रसामग्री Smithsonian Institute या संस्थेला लोकप्रदर्शनासाठी दान केल्याने मिळालेल्या करावरील सवलती या सगळ्यातून स्वतः गुंतवलेले सुमारे २.६ कोटी अमेरिकन डॉलर्स थोड्याशा नफ्यासकट पूर्णपणे वसूलही केले.

रिचर्ड ब्रॅन्सनच्या (वैयक्तिक संपत्ती सुमारे ३ अब्ज अमेरिकन डॉलर्स) Virgin Groupचा विमान प्रवास, संगीत, हॉटेल्स, जाहिराती अशा अनेक तऱ्हेच्या अनेक यशस्वी उद्योगांत हात होता. त्याखेरीज तो स्वतःदेखील अनेक तऱ्हेची धाडसे करण्यात यशस्वी (उदा., बलूनमधून केलेल्या काही नावाजलेल्या आणि विक्रमी सफरी) झाला होता. रिचर्ड ब्रॅन्सनला त्याच्या Virgin Galactic या कंपनीमार्फत त्याचा चालू असलेला विमान प्रवासाचा उद्योग अवकाश प्रवासाच्या दिशेने वाढवायचा होता.

अन्सारी पारितोषिक मिळवण्याकरता जे काही साध्य करायचे होते, त्यात साधारण तीन माणसे (चालक' धरून) सुमारे १०-१२ मिनिटांचा प्रवास करत आणि त्यातील सुमारे ४ मिनिटे वजनरहित अवस्थेतली असत. रिचर्ड ब्रॅन्सनने बर्ट रुटन बरोबर (जो पुन्हा तांत्रिक बाबी सांभाळणार होता) SpaceShipOne तसेच White Knight या दोन्हींची जास्त वजन नेणारी आणि प्रत्येक उड्डाणात जास्त काळ प्रवास करू शकणारी सुधारित आवृत्ती तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

१० जानेवारी २०१४पर्यंतच्या तीन उड्डाणांत - ज्यात दोन वैमानिक आणि सहा प्रवासी यांची क्षमता असणार होती - SpaceShipला फक्त २२ कि.मी.पर्यंतची उंची गाठता आली. पण ३१ ऑक्टोबर २०१४ला केलेल्या चाचणी उड्डाणात, वातावरणाच्या बाहेर पडण्याच्या आधीच featheringची सुरुवात झाल्याने अनपेक्षित अनियंत्रित गुरुत्वाकर्षणामुळे 'SpaceShipTwo' (ज्याचे अधिकृत नाव होते VSS Enterprise)चा स्फोट होऊन त्यात साहाय्यक वैमानिक मायकेल आल्सबरीचा मृत्यू झाला आणि मुख्य वैमानिक पीटर सिबोल्ड गंभीररित्या जखमी झाला. शोधतपासाअंती हा अपघात 'pilot error'मुळे झाला असावा असे जरी ठरले, तरी काही काळ नव्या 'SpaceShipTwo' (ज्याचे अधिकृत नाव होते VSS Unity)च्या चाचण्या पूर्ण होई पर्यंत नवीन उड्डाणे पुढे ढकलली गेली. ११ जुलै २०२१च्या यशस्वी - परंतु फक्त ८६ कि.मी. इतकीच उंची गाठलेल्या - उड्डाणांतल्या प्रवाशांत स्वतः रिचर्ड ब्रॅन्सनदेखील होता.

रिचर्ड ब्रॅन्सन आणि बर्ट रुटन या जोडीच्या तांत्रिक यशाबद्दल काहीही म्हणण्याआधी रिचर्ड ब्रॅन्सनच्या धंद्याच्या आडाख्याची तारीफ करणे जरूर आहे. त्या वेळपर्यंतच्या 'अवकाश प्रवासाच्या' आणि शक्याशक्यतेच्या अनुमानानुसार रिचर्ड ब्रॅन्सनने 'अवकाश प्रवासासाठी' तिकीट विक्री सुरू केली. पहिली काही तिकिटे २००,००० अमेरिकन डॉलर्सना विकली जात आहेत हे पाहिल्यावर नंतर किंमत वाढून २५०,००० अमेरिकन डॉलर्स झाली. ११ जुलै २०२१च्या 'यशस्वी' उड्डाणानंतर तीच किंमत ४५०,००० अमेरिकन डॉलर्स (जवळजवळ रु. साडेतीन कोटी)पर्यंत वाढली. जरी रिचर्ड ब्रॅन्सनने तिकिटे विकत घेणाऱ्या प्रवाशांसाठी उड्डाणाची तारीखही नक्की केलेली नाही, तरीही एकूण सुमारे ६०० ते ७५० लोकांनी आतापर्यंत तिकिटे खरेदी केली आहेत. या कार्यक्रमात आणखी कमी अनिश्चितता असती, तर आणखीही लोक तिकिटे खरीदण्याकरता तयार झाले असते. VSS Unityच्या अजूनपर्यंतच्या उड्डाणांमधून ज्या काही मोजक्या 'प्रवाशांना अवकाशात नेण्यात आले आहे, त्यांनाही लॉटरीतून त्यांची नावे निघाल्यामुळे त्यांची वर्णी लागली.

आंतरराष्ट्रीय विचारसरणीनुसार पृथ्वीवरील सरासरी समुद्रसपाटीपासून ६२ मैल (१०० किलोमीटर( या अंतरापलीकडे अवकाशाची सुरुवात होते. पण अमेरिकेतील सरकारी व्याख्येनुसार अवकाशाची सुरुवात ५० मैलापासून होते. त्यामुळे जरी रिचर्ड ब्रॅन्सन प्रवासी म्हणून हजर असलेले VSS Unityचे उड्डाण फक्त ८६ कि.मी. (५३ मैलच) उंच उडाले होते, तरी अमेरिकेतील व्याख्येनुसार ते अवकाशातील उड्डाण होते. त्याआधी व्यावसायिक तत्त्वावर अवकाश प्रवास सुरू करू पाहणाऱ्या अब्जाधीशांपैकी कोणीच 'अवकाश उड्डाण' करू शकला नव्हता. त्यामुळे बराच काळ रिचर्ड ब्रॅन्सन आपले जाहिरातबाजीचे कौशल्य वापरून 'अवकाशाची वारी करणारा पहिला अब्जाधीश' अशी स्वतःची आंतरराष्ट्रीय प्रतिमा बनवू आणि वाढवू शकला. तसेच VSS Unityच्या अजूनपर्यंतच्या उड्डाणांतले सर्वोच्च उड्डाण ८९.९ कि. मी. एवढेच असले, तरी Virgin Galactic अमेरिकन व्याख्येनुसार त्यांची सगळीच उड्डाणे अवकाशातील असल्याचे सांगते. SpaceShipOne काळातील १०-१२ मिनिटांची उड्डाणे मात्र वाढून SpaceShipTwoची उड्डाणे एक तासापेक्षा जास्त काळाची असतात, पण त्यातील वजनरहित काळ काही मिनिटांचाच असतो.

Virgin Groupला मागील काही वर्षांत काही उद्योग बंद करावे लागले (उदा., Virgin Australia). एकूणच तंगीच्या परिस्थितीमुळे रिचर्ड ब्रॅन्सन आपले 'सर्व सुखसोयींनी सुसज्ज' असे एक वैयक्तिक मालकीचे बेट विक्रीला काढत असल्याचे बोलले जाते. Virgin Galactic मागील काही वर्षांत public listed company झाल्यामुळे Vanguard Group Inc, BlackRock Inc., State Street Corp अशा इतर अनेक मोठ्या कंपन्या आता भागधारक आहेत. परंतु मागच्या दोन वर्षांत शेअरची किंमत सुमारे ९७% घसरल्यामुळे भागधारक एकूणच नाखूश आहेत. या पार्श्वभूमीवर Virgin Groupची भविष्यातील व्यावसायिक उड्डाणे, तसेच अवकाश प्रवासाचा विस्तार (उदा., अवकाशातून पृथ्वीप्रदक्षिणा किंवा अवकाशातून अतिदूरचा पण अतिजलद प्रवास) याबद्दल अंदाज बांधणे कठीण आहे. Virgin Groupचे अवकाश प्रवासामधील स्वारस्य हे 'साध्या' विमान प्रवासाला एक जास्त वेगवान (आणि अर्थातच जास्त महागडा) पर्याय उपलब्ध करून देणे हा आहे. सुमारे २० वर्षांपूर्वी बंद पडलेल्या Concorde विमानांनादेखील याच तत्त्वावर (जलद पण महागडा प्रवास) बरीच वर्षें आपली उड्डाणे चालू ठेवता आली होती, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

जेफ बेझोस (अ‍ॅमेझॉनचा संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत माणसांपैकी एक - सध्याची वैयक्तिक संपत्ती सुमारे १५० अब्ज अमेरिकन डॉलर्स) यालाही वातावरणाच्या पलीकडे जाऊन केलेल्या अवकाश प्रवासातून 'साध्या' विमान प्रवासाला एक जास्त वेगवान (आणि अर्थातच जास्त महागडा) पर्याय उपलब्ध करून देण्यात असेच स्वारस्य आहे. मात्र त्याच्या Blue Origin या कंपनीने वाहक विमानाचा पर्याय वापरण्याऐवजी अवकाशयानाच्या प्रक्षेपणाचे काम आटोपून पुन्हा पृथ्वीवर परतू शकणारी आणि म्हणून नवीन इंधन भरून पुन्हा वापरता येतील अशी अग्न्यस्त्रे (rockets) तयार करण्यावर आणि वापरण्यावर आपले लक्ष केंद्रित केले आहे (आकृती ३मध्ये उड्डाणाचा एक नमुना चित्रित).

3
चित्र सौजन्य : techcrunch.com

या कंपनीच्या New Shepard (१९६१ साली अवकाशात जाणाऱ्या पहिल्या अमेरिकन अंतराळवीराच्या स्मरणार्थ दिलेले नाव) या अग्न्यस्त्राने २०१५पासून केलेल्या २३ उड्डाणांपैकी २२ उड्डाणे यशस्वी झाली होती आणि जवळजवळ सगळी १०० कि.मी.पेक्षा जास्त उंचीवर (Karman Line पलीकडे) पोहोचली होती. सध्या ही कंपनी New Glenn (१९६२ साली अवकाशात पहिली पृथ्वीप्रदक्षिणा करणाऱ्या पहिल्या अमेरिकन अंतराळवीराच्या स्मरणार्थ दिलेले नाव) हे अग्न्यास्त्र विकसित करत आहे, ज्यातून प्रवासी किंवा यंत्रसामग्री असे सुमारे ४५ टन वजन Karman Lineच्या पलीकडे किंवा १३.५ टन वजन अंतरिक्षात सध्या ४०० कि.मी. उंचीवर असलेल्या International Space Stationसारख्या एखाद्या थांब्यापर्यंत (पुढे वापरण्याकरता) पोहोचवता येईल.

Blue Originने २० जुलै २०२१च्या आपल्या अवकाशातल्या पहिल्या 'Public' उड्डाणाकरता पहिले तिकीट लिलावाने २.८ कोटी अमेरिकन डॉलर्स या (Virgin Galacticपेक्षाही अनेक पटीने चढ्या) किमतीत विकले, यावरून त्यांच्या या व्यवसायातील कौशल्याची आणि/किंवा 'ग्राहकांच्या' जेफ बेझोसच्या वरच्या विश्वासाची कल्पना यावी. पहिल्या 'Public' उड्डाणाकरता विकलेली इतर काही तिकीटे १०-१२ लाख अमेरिकन डॉलर्स किमतीची होती, असे बोलले जाते. या कंपनीनेही उड्डाणाची तारीख निश्चित नसतानाही सुमारे १० कोटी अमेरिकन डॉलर्सची तिकिटे प्रवाशांना विकली आहेत. जेफ बेझोसने मात्र यशस्वी व्यावसायिक प्रवासी अवकाश उड्डाणे यापलीकडे जाऊन आपल्याला अवकाशात तेथील (नसलेल्या) वातावरणाचा फायदा घेऊन संशोधन, उत्पादन असे इतरही बरेच काही करायचे आहे असे सूचित केले आहे.

इलॉन मस्क या अब्जाधीशानेही २००२पासून अवकाशाशी संबंधित संशोधनात लक्ष घालून अवकाशयानाच्या प्रक्षेपणासाठी पुन्हा वापरता येतील अशी अग्न्यस्त्रे विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले. या अब्जाधिशाने (सध्याची वैयक्तिक संपत्ती सुमारे २२५ अब्ज अमेरिकन डॉलर) वेगवेगळ्या धंद्यातून बरेच पैसे मिळवल्यावर Tesla Cars बनवणारी कंपनी सुरू केली. इलॉन मस्कने अवकाशाशी संबंधित संशोधन आणि व्यवसायाची सुरुवात जरी स्वतः संस्थापक असलेल्या SpaceX या कंपनीद्वारे केली, तरी नंतर वेळोवेळी इतर उद्योजकांकडूनही गुंतवणूक स्वीकारली. SpaceX या कंपनीने Falcon, Dragon अशा विविध तऱ्हेची इतर सगळ्यांपेक्षा शक्तिशाली अग्न्यस्त्रे बनवली असून सध्या ही कंपनी इतरांसाठीही अवकाशयानाच्या प्रक्षेपणाचे कामही करते. SpaceXच्या सध्याच्याच अग्न्यस्त्रांचा पल्ला ३६३ मैल उंची गाठण्यास पुरेसा असल्यामुळे NASA आणि इतर अवकाश संशोधन संस्था पृथ्वीपासून २४८ मैल (४०० कि.मी.) अंतरावर फिरणाऱ्या International Space Stationवर आपले अंतराळवीर नेण्या-आणण्यासाठी SpaceXची मदत घेतात. SpaceXच्या पुढील काळातल्या योजनांचा रोख मंगळावर जाणाऱ्या योजनांच्या करता अग्न्यस्त्रे विकसित करण्याचा आहे.

Blue Origin आणि SpaceX या दोन्हीही कंपन्यांना NASAकडून वेगवेगळ्या प्रणाली विकसित करण्याकरता मोठमोठी कंत्राटे मिळाली आहेत.

१६ सप्टेंबर २०२१ रोजी SpaceX कंपनीने पहिली (आणि) एकमेव पूर्णतः खाजगी क्षेत्रातील प्रवाशांची अवकाशातील पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.

Blue Origin आणि SpaceX या दोन्हीही कंपन्यांनी आपण विकसित केलेली अग्न्यस्त्रे वापरून अवकाशस्थित उपग्रहांची मालिका प्रस्थापित करण्याचे कामही सुरू केले आहे. SpaceX या कंपनीने इलॉन मस्कच्याच मालकीच्या StarLink या कंपनीबरोबर अवकाशात २,००० उपग्रह पाठवले आहेत आणि त्यांना आणखी १२,००० उपग्रह पाठवायचे आहेत. Blue Originला जेफ बेझोसनेच प्रस्थापित केलेल्या Amazonबरोबर अवकाशात ३,२३६ उपग्रह पाठवायचे आहेत. अमेरिकन सरकार निम-शहरी आणि अविकसित भागातल्या नागरिकांकरता Internet आणि Communicationच्या सोयी मिळाव्यात यासाठी जो खर्च करते, त्यावर SpaceX + StarLink यांचा डोळा आहे. Blue Origin +Amazonला Amazonच्या Communication + Data या क्षेत्रातील नव्या संधींचा फायदा घ्यायचा आहे.

एवंच Blue Origin आणि SpaceX या दोन्हीही कंपन्यांना अवकाश प्रवास विकसित करण्याखेरीज इतरही अनेक तऱ्हेच्या व्यवसायात पुढे जाण्याच्या खटपटीत आहेत. इलॉन मस्कला सध्या नवीनच मालकी मिळवलेल्या Twitter (सध्याचे नाव X)मध्ये जास्त लक्ष द्यावे लागणार असल्यामुळे (एक वर्षात या कंपनीची शेअर बाजारातील किंमत ४४ अब्ज अमेरिकन डॉलर्सपासून १९ अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत घसरली आहे) कदाचित काही काळाकरता अवकाश प्रवास आणि अवकाशातील उद्योग यांच्यामधले त्याचे लक्ष विचलित होऊ शकेल.

Space Adventures या (अमेरिकन मालकीच्या) कंपनीने २००१ ते २००९ या काळात वेगवेगळ्या देशातल्या, पैसे देऊन अंतराळवारी करण्यास उत्सुक असणाऱ्या ८ प्रवाशांना (प्रत्येकी २ ते ३ कोटी अमेरिकन डॉलर्स द्यायला लावून) International Space Stationची ८ ते १० दिवसांची अंतराळवारी करवून परत आणले. रशियन प्रणालीचा उपयोग करून ही वारी झाली होती आणि त्यात निवडल्या गेलेल्या प्रवाशांना प्रशिक्षण, शारीरिक क्षमता इ.इ. चाळण्यादेखील लावल्या होत्या. २००९नंतर अशा वाऱ्या झाल्या नाहीत आणि त्याआधीदेखील ज्या होत्या, त्या फक्त '(बरेचसे) पैसे द्या आणि अंतराळात चला' अशा 'खुल्या' अंतराळवाऱ्या नसल्यामुळे या लेखात त्यांच्याबद्दल काहीच लिहिलेले नाही.

एकूणच काय - लिओनार्डो डा व्हिंची याच्या 'पक्षासारखे माणसाला कसे उडता येईल' यावरच्या १६व्या शतकातील कल्पनांमधून प्रत्यक्ष (विमानातून) माणसाला उडण्यासाठी सुमारे ४०० वर्षे जावी लागली. पण दुसऱ्या महायुद्धातल्या जर्मन अग्निबाणांच्या (rockets) वापरानंतर पुढील २०-२५ वर्षांत त्याच अग्निबाणांची शक्ती (आणि सुरुवातीच्या काळात ते विकसित करणाऱ्या व्हॉन ब्राऊन या जर्मन संशोधकाचे डोके) वापरून, अमेरिकेतील NASAने अवकाशाचा आणि त्यानंतर चंद्राचा प्रवास शक्य केला. १५ वर्षांत SpaceShipOne (१ चालक + २ प्रवासी)पासून SpaceShipTwo (१ चालक + ५ प्रवासी)पर्यंत अवकाश प्रवासात प्रगती होत आहे. २० वर्षांत Blue Origin आणि SpaceX या दोन्ही कंपन्या NASAला वेगवेगळ्या क्षेत्रांत व्यावसायिक तत्त्वावर मदत करत आहेत.

याच आलेखावरून भविष्यात डोकावायचे म्हटले, तर पुढील काही दशकांत अवकाश प्रवास नक्कीच आणखीनच प्रगत, स्वस्त आणि जास्तच लोकाभिमुख व्हायला हवा.

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

12 Nov 2023 - 11:22 am | कुमार१

अभ्यासपूर्ण व रंजक लेखन आवडले....

अभ्यासपूर्ण लेख. बरीच नवीन माहिती मिळाली. विशेषतः B५२ बद्दल. हे माझ्यासाठी नवीन होते.
धन्यवाद!

लेख वाचून असे वाटले की भविष्यात विणा वर्ल्ड किवां कसरी सारख्या प्रवासी व्यवसायीक कंपन्या चंद्र, मंगळ वर पाच दिवस, दहा दिवस आशी टुर पॅकेजेस उपलब्ध करतील.

एके काळी स्वप्नवत असलेला परदेशी प्रवास आज सहज शक्य आहे तसेच काहीतरी.

लेख आवडला हे वेगळे सांगावयास नको.

मुक्त विहारि's picture

14 Nov 2023 - 9:17 pm | मुक्त विहारि

+१

टर्मीनेटर's picture

13 Nov 2023 - 11:14 pm | टर्मीनेटर

जबरदस्त माहितीपुर्ण लेख!
खुप छान 👍

तुषार काळभोर's picture

14 Nov 2023 - 12:08 pm | तुषार काळभोर

गंतव्य स्थानी पोहचण्यासाठी याआधीची सर्वात मोठा बदल म्हणजे विमान. त्याचा शोध लागला आणि लष्करी, हेरगिरी, मालवाहतूक, हौस, साहस, कामानिमित्त प्रवास असा सर्व प्रकारे उपयोग सुरू झाला. पण केवळ पर्यटन म्हणून एखाद्या ठिकाणी फिरायला जाणे, यासाठी विमानप्रवास, ही उपयुक्तता सगळ्यात शेवटी घडली.
नौकाप्रवासाचे साधारण तसेच . आधी नजरेच्या टप्प्यापलीकडील जगाचा धांडोळा, मग कामानिमित्त प्रवास, मालवाहतुक. मग लष्करी उपयोग. आणि मनोरंजन किंवा हौस म्हणून समुद्रात काही दिवस फिरून येणे सर्वात शेवटी.
अवकाशप्रवासाची सुरुवात केवळ 'करून दाखवलं' या जिद्दीतून झाली. आणि एकदा करून दाखवल्यावर मग आधी ऑर्बिट, मग चंद्रावर काही तास, मग चंद्रावर काही दिवस. मग अवकाशाच्या हद्दीवर काही दिवस राहणे, काही महिने राहणे अशी प्रगती होत राहिली. १९६१ मध्ये युरी गागरिन १०८ मिनिटे अवकाशात राहून आला तेथून पहिलं निवासी अवकाशयान रशियाने दहा वर्षात सोडलं आणि माणसाने २४ दिवस अवकाशात वास्तव्य केलं. १९९८ मध्ये इंटरनॅशनल स्पेस स्टेशनची निर्मिती सुरू झाली आणि २००० मध्ये तिथे वास्तव्य सुरू झाले. सलग २३ वर्षे तिथे मानवी वास्तव्य आहे. पण हे काम अतिप्रचंड खर्चिक असल्याने अवकाशप्रवासाचं निमित्त/जस्टीफिकेशन नेहमीच विज्ञान हेच राहिलं.
सध्याचा अवकाशप्रवासाचा खर्च १६-२४ कोटी रुपये आहे. ८०-१०० किमी वर प्रवास. एकूण प्रवास कालावधी १ तास. तीन महिने तयारी आणि दोन आठवडे १०० किमी पेक्षा अधिक उंचीवर राहणं यासाठी ४००-८०० कोटी रुपये खर्च. एवढा खर्च मनोरंजन, हौस किंवा प्रसिद्धीसाठी करणं अगदी मोजक्या लोकांच्या आवाक्यात आहे. शिवाय एक-दोन लोकांच्या हौसेखातर होणार्‍या प्रदूषण आणि साधनसंपत्तीच्या वापराला विरोध होऊ शकतो.

आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे सुरक्षिततेचा. अवकाश प्रवासाच्या ६२ वर्षात ६७६ लोकांनी अवकाशप्रवास केला आहे. आणि अशा प्रवासासंबंधित अपघातातील मृत्यू आहेत १९.
२.८%
विमानप्रवासाविषयी विकीवर ही नोंद आहे - By 2019, fatal accidents per million flights decreased 12 fold since 1970, from 6.35 to 0.51, and fatalities per trillion revenue passenger kilometre (RPK) decreased 81 fold from 3,218 to 40.
अवकाश प्रवासातील शेवटचा प्राणघातक अपघात झाला, त्याला आता २० वर्षे उलटून गेली आहेत, पण अवकाश 'पर्यटन' करू इच्छिणार्‍या प्रवाशांचा आर्थिक वर्ग आणि एकूण समाज/अर्थव्यवस्था/उद्योग यातील स्थान असे आहे, की अवकाशप्रवास शंभरेक पटींनी अधिक सुरक्षित होणे गरजेचे आहे.

शेखरमोघे's picture

16 Nov 2023 - 7:46 am | शेखरमोघे

कुमार१, मुक्त विहारि, भागो - प्रतिसादाबद्दल धन्यवाद
कर्नलतपस्वी - एके काळचा स्वप्नवत परदेशी प्रवास शक्य होण्यासाठी अनेक दशकान्चा काळ जावा लागला. तसाच अवकाश प्रवास शक्य होण्यासाठी किती काळ लागेल हा अन्दाज करणे सध्या तरी कठीण आहे. पण कुठलीही सध्या असाध्य वाटणारी गोष्ट शक्य करण्यासाठी जी तन्त्रज्ञानाची "हनुमान उडी" जरूर आहे त्याची झलक काही वेळा तरी दिसली आहे.
टर्मीनेटर, तुषार काळभोर - "मिपा दिवाळी अन्क २०२३" च्या सजावटीचे अन्ग पहाणार्‍या चमूचे आभार, अवकाश प्रवास आणि पैशाचे असलेले घट्ट सम्बन्ध एकाच चित्रात छान साधले आहेत.

अथांग आकाश's picture

16 Nov 2023 - 9:36 pm | अथांग आकाश

माहितीपूर्ण रंजक लेख आवडला!

अमरेंद्र बाहुबली's picture

17 Nov 2023 - 11:26 am | अमरेंद्र बाहुबली

लेख आवडला.

सौंदाळा's picture

23 Nov 2023 - 6:54 pm | सौंदाळा

लेख आवडला.
अवकाश प्रवास सर्वसामान्यांच्या (किंवा उच्च मध्यम्वर्गीय, श्रीमंत म्हणा) आवाक्यात येत्या ५० वर्षात येईल का सांगता येत नाही. या क्षेत्रात खूपच वेगवान प्रगती होत आहे त्यामुळे येईलसुद्धा कदाचित. पण हा प्रवास करण्यासाठी नुसता पैसा असून उपयोग नाही तर साहसाचे वेड पण पाहिजे. भारतीय श्रीमंतांची मनोवृत्ती बघता भारतात हे रुजायला वेळ लागेल असे वाटते, युरोप, अमेरीकेनंतर कदाचित आपला नंबर लागेल.
रच्याकने मी डोळे मिटायच्या आत परग्रहावर जीवसृष्टी असल्याचा सज्ज्ड पुरावा (किंबहुना एखाचा फोटोच) मिळावा असे फार वाटते.

सोत्रि's picture

25 Nov 2023 - 2:37 am | सोत्रि

ज ब र द स्त!

दिवाळी अंकाला ‘चार चांद‘ लावणारा लेख आहे हा!!

- (अवकाश प्रवासोत्सुक) सोकाजी

खुपच रंजक लेख. लेखकाबद्दल आदर वाटला.
असेच लिहीत रहा.

श्वेता व्यास's picture

22 Dec 2023 - 5:28 pm | श्वेता व्यास

खूप छान माहिती आणि अभ्यासपूर्ण लेख.