दिवाळी अंक २०२३ - माझे मित्र

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in दिवाळी अंक
12 Nov 2023 - 12:00 am
1

मिपाच्या प्रवास विशेषांकानिमित्त मी 'घर ते हापिस बसचा स्टॉप या माझ्या प्रवासादरम्यान मला भेटलेल्या वल्लींची तुम्हाला ओळख करून देणार आहे.

रोज साधारण सकाळी पावणेसात ते सातच्या दरम्यान मी हापिसात जाण्याकरता घर सोडतो. या वेळी रस्त्यावर फारशी वर्दळ नसते. त्यामुळे रोज दिसणारे चेहरे आता ओळखीचे झाले आहेत. त्यातल्या बऱ्याच लोकांची नावे माहीत नाहीत, ते कुठे राहतात, त्यांची सामाजिक-आर्थिक स्थिती याबद्दल काहीच माहीत नाही. पण हे सगळे लोक माझे मित्र झाले आहेत आणि मी आज तुम्हाला याच मित्र-मैत्रिणींची ओळख करून देणार आहे. आता तुमच्या मनात विचार येईल की मला जर या लोकांची नावेसुद्धा माहीत नाहीत, तर अशांची मी ओळख तरी कशी करून देणार? तर हे लोक मला जसे दिसले, जसे वाटले, तशी त्यांची ओळख करून देणार आहे.

रोज सकाळी बाहेर पडलो की माझी नजर शोधत असते ती चोरकाकांना. यांना मी चोरकाका म्हणतो, कारण सकाळी सकाळी हे फुले गोळा करत फिरत असतात. यांच्या हातात एक काठी असते, तिचा उपयोग ते आधारापेक्षा झाडाच्या फांद्या खाली ओढण्याकरता जास्त करतात. मी दिसलो की मला "सुप्रभात" असे म्हणून परत आपले चौर्यकर्म सुरू करतात. सोसायट्यांच्या किंवा बंगल्यांच्या कुंपण-भिंतींबाहेर डोकावणारी झाडे वाकवत फुले गोळा करत असतात. फुलांनी पिशवी भरली असली, तरी नवीन झाड दिसले की हे त्याच्या फांद्या वाकवून फुले ओरबाडत असतात. यांच्या घरी किती देव आहेत.. देव जाणे!

नंतर थोडा पुढे आलो की भैय्या दिसतो. खरे तर हा भैय्या मराठी माणूसच आहे. सोसायट्यांच्या वॉचमनशी तो मराठीत बोलत असतो. पण तो दूध घालतो, म्हणून त्याचे नाव भैय्या. यांच्याकडे अजूनही एक जुनी एमएटी आहे, जिला सर्व बाजूंनी मोठमोठ्या ताडपत्रीच्या पिशव्या लटकवलेल्या असतात आणि त्या दुधाच्या पिशव्यांनी गच्च भरलेल्या असतात. मी पाहतो, तेव्हा रोजचे साधारण शंभर लीटर दूध तरी त्याच्या गाडीवर लादलेले असते. मला दिसायच्या आधी तो किती ठिकाणी दूध घालून येतो त्याचा काही अंदाज नाही. बऱ्याच वेळा भैय्या मला प्रत्यक्ष दिसत नाही, पण त्याच्या गाडीवरून तो आजूबाजूला आहे हे मला समजते. सोसायट्यांच्या दरवाजासमोर गाडी उभी करून तो आत दूध घालायला गेलेला असतो. दिसला तरी तो धावतानाच दिसतो. आजूबाजूला पाहायला त्याला अजिबात वेळ नसतो. वेळ वाचवण्याकरता तो गाडी बंदसुद्धा करत नाही, तशीच सुरू ठेवून तो सोसायटीत दूध घालत फिरत असतो.

२
मग दिसतात ते जोशी पेपरवाले, फुटपाथवर किंवा पाऊस असेल तेव्हा एका दुकानाच्या शेडमध्ये रोज सकाळी जोशीकाका पेपरच्या ढिगाऱ्यामध्ये बसलेले असतात आणि मुख्य पेपर आणि पुरवण्या एकत्र करायचे काम करत असतात. कधीकधी पुरवण्यांबरोबर हँडबिलांचे गठ्ठे सोडवून ते पेपरात खुपसण्याचे काम ते मोठ्या वेगाने करत असतात. हे काम करत असतानाच एकीकडे ते पेपरचे गठ्ठेही करत असतात, म्हणजे एखादा पेपर टाकणारा मुलगा समोर आला की त्याला ते सांगतात, "हा आलास का? तो तुझा गठ्ठा, चल, उचल आणि पळ लवकर, त्या कुंजीर आजोबांना पेपरची तहान लागली आहे. सकाळपासून तीन फोन झाले आहेत, अजून पेपर आला नाही म्हणून." जोशीकाकांचा असा तोंडाचा पट्टाही एकीकडे सुरू असतो.

चोरकाका, भैय्या, जोशी पेपरवाले ही वरची किंवा यापुढे येणारी नावे ही काही या लोकांची खरी नावे नाहीत. ही मी मनातल्या मनात त्यांना दिलेली नावे आहेत.

पुढे गेलो की दिसतो कोंबडा. माझ्यासारखाच हासुद्धा ऑफिसला निघालेला असतो, पण याची बस त्याच्या घरासमोरच येते. बसची वाट बघत हा तिथल्या तिथे घुटमळत चालत असतो - म्हणजे पाच पावले चालतो, परत मागे वळतो, पुन्हा स्टॉपवर येऊन उभा राहतो, पुन्हा पाच-दहा पावले विरुद्ध दिशेला चालतो, पुन्हा स्टॉपवर येतो. बहुधा हा जर त्या विशिष्ठ ठिकाणी उभा नसेल, तर आपली बस थांबणार नाही याची त्याला भीती असावी, कारण त्या पाच-दहा फुटांपलीकडे हा कधी जाताना दिसत नाही. असे हे पाच-दहा फुटात लगबगीने चालताना त्याची हालचाल कोंबड्यासारखी होत असते, म्हणून त्याचे नाव 'कोंबडा'. बऱ्याच वेळा कोंबडीचे पिल्लूही याच्याबरोबर उभे असते, आपल्या शाळेच्या बसची वाट बघत. जर कोंबड्याची बस आधी आली, तर मग कोंबडी घाईघाईने घरातून बाहेर येते आणि पिल्लाजवळ उभी राहते आणि मग दोघी मिळून कोंबड्याला टाटा करतात.

थोडा पुढे अंतू उभा असतो. आपल्या मित्रांची वाट बघत. अंतू चौकात उभे राहून मित्रांना मोबाइलवरून फोन करत असतो. "अरे, ऊठ लवकर, सहा वाजून गेले, तो झम्प्या आलासुद्धा, चल लवकर." फोनवर असे डायलॉग मारत तो आपल्या प्रभातफेरीचे भिडू गोळा करत असतो. यातले झम्प्या हे नाव मात्र खरे असावे. कारण हा झम्प्या चालताना पुढे-मागे झाला की बाकीचे म्हातारे त्याच्यावर ओरडतात, "अरे झम्प्या, जरा माणसात चाल." हा झम्प्या, म्हणून त्यांच्यातल्या सर्वात म्हाताऱ्याचे नाव अंतू झाले. या ग्रूपमध्ये एक अण्णू गोगटा आहे, बापू हेगिष्टे आहे, गोविंद भट आहे आणि परांजप्यासुद्धा आहे. ही सगळी सत्तरी-पंचाहत्तरीदरम्यान आलेली दोस्त मंडळी जवळच एका बागेत मॉर्निंग वॉकला जातात. मी कितीही लवकर किंवा कितीही उशिरा हापिसाला निघालो, तरी या ग्रूपमधला किमान एखादा गडी तरी मला रोज भेटतोच.

देवसेनाही मला जवळजवळ रोज भेटते. बाहुबली सिनेमात देवसेना कशी पाठीला बाणाचा भाता बांधून युद्ध करत असते, तशी ह्या देवसेनेच्या पाठीवर योगामॅट असते. देवसेनेला ओव्हरटेक केलेला आवडत नाही. कारण ती लगेचच आपला चालण्याचा वेगा वाढवून तुमच्या पुढे जायचा प्रयत्न करते. एका योगशाळेजवळ या रेसचा शेवट होतो आणि देवसेना विजयी मुद्रेने योगशाळेत प्रवेशकर्ती होते.

Devsena
कधीकधी अवंतिका, शिवगामी यादेखील लगबगीने योगशाळेत जाताना दिसतात. पण त्यांच्यात देवसेनेसारखी युद्धाची खुमखुमी नाही. आपली योगामॅट हातात धरून त्या रस्त्याने निवांत चालत असतात. यातली शिवगामी मात्र कुत्र्यांना भयंकर घाबरते. कुत्र्यापासून साधारण पाच फूट अंतर राखत योगमार्गावर चालत असते व जवळ येणाऱ्या कुत्र्यांना ती योगामॅटने दूर हाकलत असते.


कुत्र्यावरून आठवले - बरेच दिवसात बोझो दिसला नाही. एका अर्धचड्डित इसमाला बरोबर घेऊन बोझो मोठ्या थाटात रस्त्यावर फिरत असतो. त्याला पाहिजे तिकडे तो शी करतो आणि मग त्याचा तो अर्धचड्डित नोकर फावड्यासारख्या एका हत्याराने बोझोची शी मोठ्या आदराने एका पिशवीत भरून घेतो.
dog
या बोझोला लहान मुले खूप आवडतात. कोंबडीचे पिल्लू दिसले की तो धावत धावत तिच्याकडे जातो आणि मग तीसुद्धा मोठ्या प्रेमाने त्याला मिठ्या मारते. कोंबडीला हा प्रसंग मुळीच आवडत नाही. मग ती बोझोच्या अर्धचड्डित नोकराला म्हणते, "बघा ना, आता ही अशीच दिवसभर शाळेत बसणार, त्याचा हाताने डबा खाणार." मग तो नोकर काही सांत्वनपर शब्द बोलतो. रस्त्यात कोणी दुसरा कुत्रा दिसला की या बोझोला आणि त्याच्या नोकराला खूप राग येतो. बोझोआधी त्याचा नोकरच या कुत्र्यावर छू होतो आणि त्यांना बोझोच्या वाटेतून हाकलून द्यायचा प्रयत्न करतो.


मी थोडा पुढे आलो की मला धावणारे गांधी दिसतात. या इसमाच्या डोक्याचा तुळतुळीत चकोट आहे आणि हा मला नेहमी धावताना दिसतो, म्हणून हा धावणारा गांधी. या गांधीबाबांना मॅरेथॉन धावायची खूप आवड असावी, कारण रोज त्यांच्या अंगात वेगवेगळ्या मॅरेथॉनची जाहिरात करणारे टीशर्ट असतात. ऊन, पाऊस, वारा यांची पर्वा न करता गांधीजी फक्त धावत असतात.

धावणाऱ्या गांधींसारखे बॅरिस्टर गांधी आणि दांडीवाले गांधीसुद्धा आहेत. बॅरिस्टर गांधी नेहमी सूट-बुटात हातात बॅग घेऊन कोणत्या तरी गाडीची वाट पाहात उभे असतात. ते दर अर्ध्या मिनिटाने आपल्या रिस्ट वॉचात टाइम बघत असतात आणि इतर वेळी रस्त्यावरच्या लोकांकडे तुच्छतेने कटाक्ष टाकत असतात. दांडीवाले गांधी हातात एक काठी घेऊन रस्त्याने मंदपणे चालत असतात. त्यांच्यासोबत गरिबांचा शहारुकही असतो. दोघे जण निवांत गप्पा मारत अर्धा फुटपाथ अडवत एकमेकांशी गुजराथी भाषेत मोठमोठ्याने बोलत चालत असतात. रस्त्यावरच्या लोकांची यांना मुळीच पर्वा नसते. कर्कश मोठ्या आवाजात ते एकमेकांशी बोलत मंदपणे चालत असतात.

मला रोज सकाळी एक श्रीमंत कचरेवालीसुद्धा दिसते. ह्या बाईच्या खांद्याला एका भलेमोठे पिशवी-कम-पोते लटकवलेले असते आणि ती रस्त्याने प्लॅस्टिक गोळा करत फिरत असते. मला जेव्हा ती दिसते, तेव्हा तिची पिशवी नेहमी गच्चपेक्षा जास्त भरलेली असते. त्यात कमीत कमी २० ते २५ किलो तरी कचरा जमवलेला असतो. पाण्याच्या बाटल्या, रिकामे डबे, पिशव्या असे जे काही दिसेल ते गोळा करत ती मोठ्या थाटात रस्त्याने फिरत असते. बाटल्यांमधले पाणी रस्त्यावर ओतून देत रिकाम्या बाटल्या गोळा करत रस्त्यावर शोधक नजर फिरवत ती चालत असते. कधी एखादा लोखंडाचा तुकडा किंवा तत्सम वस्तू दिसली की तिच्या चेहऱ्यावर विशेष भाव असतात. काचेची अखंड बाटली असेल तरच ती रस्त्यावरून उचलते. लोखंड, काचेच्या बाटल्या, दूध पिशव्या ठेवण्याकरता तिच्याकडे वेगवेगळ्या पिशव्या असतात. पण सर्वात जास्त भरलेले असते ते तिचे प्लॅस्टिकचे पोते. या तीन-चार गोष्टी सोडून रस्त्यावरच्या इतर कोणत्याही कचऱ्याला ती हात लावत नाही.

1
बापू चहावाल्यांचे पातेले कायमच उकळत असते. म्हणजे मी संध्याकाळी हापिसातून घरी परत येतानासुद्धा बापू चहा उकळतच असतात. सकाळी जाताना त्यांच्या बाजूला स्टीलचे एक मोठे पिंप भरून दुधाच्या पिशव्या ठेवलेल्या असतात. संध्याकाळपर्यंत हे पिंप रिकामे झालेले असते, तर चहाच्या रिकाम्या ग्लासांनी कचऱ्याची बादली भरलेली असते. कधीकधी शहारुक आणि दांडीवाले गांधी बापूंकडे चहा पिताना दिसतात. श्रीमंत कचरेवालीचाही हा अड्डा असावा, बऱ्याच वेळा ती 'चा आणि किरीम रोल'ची ऑर्डर देत बापूंच्या टपरीशेजारी टेकलेली दिसते.


माझ्या बस स्टॉपजवळच फ्रँकीचासुद्धा बस स्टॉप आहे. माझ्यानंतर दोन-अडीच मिनिटांत फ्रँकीही तिकडे पोहोचते. ती जवळच कुठेतरी राहत असावी, कारण स्टॉपवर पोहोचली, तरी तिचा मेकअप किंचतही हललेला नसतो. फ्रँकी गावठी अँजेलिना जोलीसारखी दिसते. फ्रॅंकीचा फोन सतत सुरू असतो आणि सगळ्यांशी ती फ्रँकली बोलत असते - म्हणजे प्रत्येक दोन-तीन वाक्यांनंतर तिच्या तोंडात "मी तुला फ्रँकली सांगते" असे शब्द असतात. बसमध्ये बसेपर्यंत आणि बहुतेक त्यानंतरही बराच वेळ फ्रॅंकीचा फोन सुरूच असतो.
फ्रँकी

फ्रँकीबरोबरच स्टॉपवर उभी असते ती ठळकबाई. ठळकबाईला तिचा नवरा रोज सोडायला येतो आणि बस सुटेपर्यंत स्टॉपवर उभा असतो. बस गेली की तो तिथेच एक सिगारेट पेटवतो, संपवतो आणि मगच गाडीवर बसून निघून जातो. ठळकबाई नवऱ्यापेक्षा बरीच उंच आहे आणि तिच्या नवऱ्याच्या पल्सरवर ती मागे बसून ती सहज पुढचे पाहत असते. गाडीवरून लांबून येतानासुद्धा ती मागे बसलेली ठळकपणे दिसते, म्हणून ती ठळकबाई. कधीकधी लाडात आली की ती नवऱ्याच्या गळ्यात मागून हात घालून बसते, तेव्हा मला ती विक्रम-वेताळची जोडीच वाटते.

ठळकबाई आणि फ्रँकीची बस गेली की लतीफची बस येते. या लतीफला मी कधी स्टॉपवर उभा राहिलेला पाहिला नाही. कायम बस आली की हा कुठून तरी धावत येतो. बऱ्याच वेळा लतीफ मला लांबून हात करून बस थांबवायला सांगतो. त्याच्या बस ड्रायव्हरलाही आता ते माहीत झाले आहे. लतीफ नसला की तो मला खुणेने विचारतो लतीफ कुठे दिसतो आहे का ते. आठवड्यातून एकदा तरी लतीफची बस चुकतेच. मग लतीफ परत मागे जातो आणि बाइक घेऊन कामाला जातो. एकदा तर गडबडीत लतीफ चुकून माझ्या बसमध्ये चढला होता.

या यादीत आणखीही अनेक जण आहेत. पण आजसाठी इतकेच पुरे.

माझ्या या मित्रांची ओळख तुम्हाला आवडली असेल, अशी अपेक्षा करतो. तुम्हालाही जर असे कोणी अनामिक मित्र-मैत्रिणी असतील, तर प्रतिसादात त्यांच्याबद्दल नक्की सांगा.

प्रतिक्रिया

गवि's picture

12 Nov 2023 - 10:58 am | गवि

एक वेगळाच प्रवास. रूटीनमध्येसुद्धा किती काय टिपता येते हे लेखातून जाणवते. संवेदनशील मन असेल तरच असे शक्य होते. रोजचा प्रवास हेही एक पर्यटन ठरू शकते.

लेख आवडला. धन्यवाद.

कर्नलतपस्वी's picture

12 Nov 2023 - 5:12 pm | कर्नलतपस्वी

एक निश्चित रुटीन असले की अशा व्यक्ती अपसुकच मनात घर करतात.

असेच काहीसे पक्षांचे आहे. मी सकाळी नित्य भेटणाऱ्या पक्षांचे नामकरण केले आहे. ते मला दररोज एका विशिष्ट जागेवरच दिसतात.
घार- मोहम्मदवाडीची राणी ,कोतवाल- घाशीराम, कावळा-चोंबडा इत्यादी.

आपले निरीक्षण आणी संवेदनशील स्वभावाला शतःशा प्रणाम.

सरिता बांदेकर's picture

12 Nov 2023 - 7:59 pm | सरिता बांदेकर

खरंच रोज दिसणारे लोक लक्शात रहातातच आणि त्यांच्या सवयीसुद्धा.
कधी कुणी दिसलं नाही तर दिवसभर मनाला चाळा लागून रहातो.
आम्हा मैत्रीणींना एक सवय होती, लोकांच्या पिशवीतून डोकावणाऱया भाज्या, फळं बघून अंदाज लावायचा. ही भाजी डब्याला नेणार कि घरासाठी.चार, पाच प्रकारची फळं दिसली कि कापून खाणार र्फूट सॅलड करणार.

अनन्त्_यात्री's picture

12 Nov 2023 - 9:44 pm | अनन्त्_यात्री

त्यांच्या परीचयासाठी वापरलेली सर्व विशेषणे लाजबाब!

अथांग आकाश's picture

12 Nov 2023 - 10:06 pm | अथांग आकाश

मस्त मजेशीर लेख!

सौंदाळा's picture

13 Nov 2023 - 9:22 am | सौंदाळा

सूक्ष्म निरीक्षण आहे बुवा तुमचे. आणि तेच लेखातून उतरले आहे.
लेख भारीच.

मुक्त विहारि's picture

14 Nov 2023 - 7:59 pm | मुक्त विहारि

+१

शशिकांत ओक's picture

11 Dec 2023 - 1:36 am | शशिकांत ओक

भट्टी जमवली आहेत ज्ञानोबा...

तुषार काळभोर's picture

13 Nov 2023 - 2:54 pm | तुषार काळभोर

माझा सकाळचा घर ते स्टॉप प्रवास असाच १०-१२ मिनिटांचा आहे. सहा पन्नासला घरातून निघालो की, कोपऱ्यावर मित्राचं किराणा दुकान आहे. तो त्यावेळी छोटा हत्तीमधून दुधाचे क्रेट उतरवून घेत असतो. एकमेकांना 🤘 असा हात दाखवून पुढे गेलो की तीन चार महिन्यांपूर्वी (बहुतेक ३१ मे या दिवशी. १ जूनला निम्म्या जगाचा वाढदिवस असतो आमच्याकडे) निवृत्त झालेले एक काका मॉर्निंग वॉक घेऊन परत येताना दिसतात. पावसाळयात चालणं सुरू केल्याने रोज त्यांनी मफलर गुंडाळलेला असतो. शर्ट पँट आणि पायात स्निकर्स. तिथेच एक चौथी पाचवीच्या मुलांचा ग्रुप शाळेत चाललेला असतो. (शाळेत चालत जाणारी मुले हेच एक आश्चर्य वाटतं. आई स्वतःच्या पाठीला दप्तर अडकवून सोडवायला जाणे, आई किंवा बाबा दुचाकी किंवा चारचाकी मधून सोडवायला जाणं किंवा रिक्षा/व्हॅन/बसने शाळेत जाणं हेच प्रकार मागील काही वर्षे दिसतात.) त्यांच्या गप्पा, खोड्या आणि भाषा ऐकून काळ बदलला असल्याचं जाणवत नाही.
पुढच्या चौकात पोहोचलो की चार शाळकरी मुले आणि मुली आपापल्या आयांना घेऊन त्यांच्या बसची वाट बघत उभ्या असतात. या चौकातून डावीकडे आमच्या येथील सगळ्यात मोठं शैक्षणिक संकुल आहे. त्यामुळे सोडवायला येणाऱ्या पालकांच्या गाड्या, रिक्षा, बस यांची गर्दी असते. अशावेळी नेमकी एखादी बस एका विद्यार्थ्याची वाट बघत थांबली तर, काही सेकंदात मागे रांग लागून जाते.
त्या चौकातून एक काकू अतिशय वेगाने चालत जातात. खांद्याला मोठ्ठी पर्स असते. पन्नास मीटर गेल्या की दहा पांढरा पावले धावतात, पुन्हा वेगात चालतात. कदाचित कामाच्या ठिकाणी पोचायला उशीर होत असेल. काय माहिती!
अधून मधून स्कुटरवर शिक्षिका जाताना दिसतात. आमच्यावेळी सगळ्या शिक्षिका नवऱ्याच्या स्कूटरवर शाळेत येत. आता स्वतः चालवत येतात. काळाचा महिमा! पुढच्या चौकातून मी उजवीकडे वळतो, त्याआधी एक ब्लिंकिट सारखं एक वितरण केंद्र आहे. तिथे आठ दहा तरुण दुचाक्यांवर चौकोनी पेट्यांत सामान भारत असतात. सुपरवायजरच्या सतत सूचना सुरू असतात. रोहित, विष्णू अपार्टमेंटमध्ये दोन मिनिटात पोचला पाहिजेस. अक्ष्या, कामधेनूमध्ये अजून व्हेजिटेबलची डिलिव्हरी केली नाहीस. पळ पटकन!
उजवीकडे वळलो, की एक मंदिर संकुल आहे. इथे गणपती, महादेव, लक्ष्मी, शितळादेवी, दत्त, तुळजाभवानी, मारुती अशी सगळ्या देवांची मंदिरे आहेत. तिथे सकाळी सहापासून भक्तांची लगबग असते. वारानुसार वेगवेगळ्या देवासमोर रांग असते. श्रावणी सोमवार, अंगारकी, आषाढातील मंगळवार आणि शुक्रवार, नवरात्र, महाशिवरात्र, हनुमान जयंती अशा दिवशी सकाळी सकाळी इथे गर्दी ओसंडून वाहते.
आता हायवेवर पोचलो, की पलीकडे माझा स्टॉप. तोच रिक्षावाल्यांचाही स्टॉप आहे, त्यामुळे तेथील रस्त्याचा रंग विटकरी लाल झाला आहे.
शेजारी अमृततुल्य आहे. कधी कधी व्हॉट्सॲपवर बस उशिरा येणार असल्याचा निरोप आला, की आम्ही तिथे चा अन क्रीमरोल खायला जातो.
.
स्टॉपवर सगळे जण आपापल्या मोबईलात बोटं आणि डोके आणि कानात इयरफोन खुपसून उभे असतात. बस आलेली कळत नाही. मग ड्रायवर कचकचून हॉर्न वाजवत राहतो.
...
बसमधील पुढील प्रवास हादेखील एक स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकतो. एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे दैनंदिन बसप्रवास करणाऱ्यांनी मनावर घ्यावे.

रामचंद्र's picture

14 Nov 2023 - 11:56 am | रामचंद्र

छानच!

"ज्ञानोबाच्या पैजारे रचिला पाया... संत तुकाशेठ झालासे कळस ।"

वा... वा... वा...
काय तो पैजारबुवा लिखित उच्च कोटीच्या विनोदी अंगाने जाणारा व्यक्तिचित्रणपर लेखाचा भक्कम पाया आणि काय तो त्यावर तुकाशेठनी चढवलेला 'सेल्फ-एक्सप्लेनेटरी' चित्रांचा कळस...
झकासच एकदम !

चित्रांतील 'बोझो आणि त्याचा अर्धचड्डीत नोकर', 'देवसेना' आणि 'फ्रँकी' अगदी समर्पक, तर अन्य तीन चित्रे म्हणजे "A picture is worth a thousand words" चे अप्रतिम उदाहरण!

प्रथमदर्शनी ती चित्रे तयार करताना AI गंडलंय कि काय वाटू शकते, पण बारकाईने बघता शब्दांकन टाळून त्या चित्रांच्या माध्यमातून काही गोष्टी सूचित करण्याचा केलेला प्रयत्न जाणवतो. उदाहरणार्थ...

त्या दूधवाल्या भैयाची अनेक वैशिष्ट्ये तुम्ही शब्दांकित केली आहेत पण 'धावणारे गांधी', 'बॅरिस्टर गांधी' आणि 'दांडीवाले गांधी' ह्यांच्याप्रमाणेच त्याच्याही डोक्याचा तुळतुळीत चकोट आहे आणि कधी कधी टक्कल झाकण्यासाठी तो डोक्यावर मुंडासे बांधतो हे पहिल्या दोन चित्रांतून समजले.
तसेच "आजूबाजूला पाहायला त्याला अजिबात वेळ नसतो. वेळ वाचवण्याकरता तो गाडी बंदसुद्धा करत नाही, तशीच सुरू ठेवून तो सोसायटीत दूध घालत फिरत असतो." हे तुम्ही सांगितलेत पण त्या भैयाचे खांद्यावर भला मोठा दुधाचा कॅन तोलून गाडी चालवण्याचे विलक्षण कौशल्य आणि आजूबाजूला पाहायला वेळ नसलेल्या भैयाने पुढेही न पाहता, उलटे बसून गाडी चालवण्याचे आत्मसात केलेले अलौकिक तंत्र हे देखील तुम्ही न सांगता केवळ चित्र पाहूनच आम्हाला समजले 😀

तसेच तुम्हाला नियमितपणे दिसणाऱ्या मित्र मंडळींमध्ये जोशी काकांप्रमाणे अजून दोन पेपरवाले असून त्यांच्याकडे भौतिकशास्त्राला आव्हान देणारी अजीबोगरीब दुचाकी/तीन चाकी वाहने आहेत आणि एक तीन पायांची बाई आहे जी कॅरिअर वर बसून सायकल चालवते असे लिहिले असते तर त्यावर कोणी विश्वास ठेवला नसता, पण तिचे अस्तित्व असे चित्रातून सिद्ध करण्याची तुम्ही आपल्या AI चित्रकाराला दिलेली सूचनाही प्रशंसनीय आहे 😂

पाचव्या चित्रातील बापू चहावाल्याकडे चहा पिणाऱ्या दोघा इसमांपैकी, एक हात खिशात तर दुसरा हात समोर करून त्यात धरलेल्या अदृश्य मोबाईलकडे पाहात डायरेक्ट कप ओठांत धरून चहा पिणाऱ्या माणसाची ती अद्भुत "हॅंड्स फ्री" शैली तर प्रचंड आवडली बुवा 😂 😂

असो, आता फाजीलपणा आवरतो आणि मूळ विषयावर येतो. लेख खूपच छान उतरला आहे आणि त्यातले प्रत्येक पात्र वाचकांच्या डोळ्यांसमोर उभे राहील इतका तो चित्रदर्शी झाला असल्याने त्याला खरेतर चित्रांची जोड देण्याची गरजच नव्हती, पण तुमच्या लेखाची खुमारी आणखीन वाढवण्याच्या उद्देशाने अर्धी समर्पक आणि अर्धी विनोद निर्मिती करणारी चित्रे मुद्दामहून निवडण्याचा जो आगाऊपणा आम्ही केलाय त्यासाठी तुम्ही मोठ्या मनाने आम्हाला क्षमा कराल ह्याची खात्रीही आहे!

अर्थात विनोद निर्मिती बरोबरच AI चित्रनिर्मिती मधल्या काही त्रुटी दाखवून देण्याचा उद्देशही त्यामागे होताच. भारतीय संस्कृती, भाषा, भौगोलिक स्थाने आणि पेहराव-वेशभूषा विषयीचे तपशीलातले घोळ वगैरे गोष्टी ठीक आहेत, त्या "AI अजून बाल्यावस्थेत आहे... शिकेल हळूहळू" वगैरे सबबीखाली एकवेळ आपण दुर्लक्षित करू शकतो, पण मानवी अवयव दर्शवतानाही त्यात इतक्या गंभीर चुका होतात हे पाहून आश्चर्य वाटते.

ह्या दिवाळी अंकातल्या लेखांसाठी AI तंत्रज्ञान वापरून जेवढी चित्रे निर्माण करण्यात आली त्यापैकी पाच टक्केही प्रत्यक्षात वापरलेली नाहीत, कारण त्यातल्या बहुसंख्य चित्रांमध्ये मानवी हालचाली आणि अवयव दर्शवण्यात असंख्य चुका होत्या. उदा. तीन पायांची बाई, दोन डावे हात असलेली बाई, कपाळापासून सुरु होणारी पुरुषाची लांब दाढी, गालावरती किंवा संपूर्ण ओठ झाकून टाकतील अशा मिशा वगैरे वगैरे...

पुन्हा असो, पण जे काही मर्यादित AI चित्रनिर्मिती तंत्रज्ञान सध्या आपल्यासाठी उपलब्ध आहे त्याचा बऱ्यापैकी वापर ह्या अंकासाठी करता आला आहे त्यामुळे नजीकच्या भविष्यात त्यात चांगल्या सुधारणा होतील ह्यासाठी आपल्याला आशावादी राहण्यातही काही गैर नाही!

एमएटीवरच्या दूधवाल्याचं चित्र बघून चांगलाच बुचकळ्यात पडलो होतो. आपल्या टिपणीमुळे बोध झाला!

ज्ञानोबाचे पैजार's picture

14 Nov 2023 - 5:36 pm | ज्ञानोबाचे पैजार

ए आय आपल्या जागा कडे कसे बघते तेच या चित्रांमधून दिसते,
आम्हीही हा प्रयोग खाजगीत करून पाहिला होता, पण ती चित्रे इकडे डकवायचे आम्ही धाडस करू शकणार नाही

पैजारबुवा,

अनामिक मित्र-मैत्रिणींची ओळख मस्तच !
लेख एकदम खुसखुशीत झाला आहे.

फ्रँकी गावठी अँजेलिना जोलीसारखी दिसते.

प्रचंड हसले या वाक्याला :)

तुम्हालाही जर असे कोणी अनामिक मित्र-मैत्रिणी असतील, तर प्रतिसादात त्यांच्याबद्दल नक्की सांगा.

माझ्या रोजच्या प्रवासांत, कदाचित काही मिनिटांतच फ्रीवेवर जात असल्यामुळे असे लोक दिसत नाहीत, हे लक्षांत आले. मॉर्निंग वॉक घेणारे, भू-भूंना फिरवणारे, पळणारे कित्येक दिसतात, पण रोज तेच तेच दिसत नाहीत. क्वचित शाळेच्या वेळेत बाहेर पडले तर 4-Way Stopवर क्रॉसिंग गार्ड हाच त्यातला त्यात ओळखीचा चेहरा !
फॅमिली ट्रीप्समध्ये, मित्र-मैत्रिणींबरोबर केलेल्या भटकंती अशा प्रवासांतील मात्र बरेच अनामिक लोक कायम स्मरणांत राहिले आहेत. त्यांच्याबद्दल लिहिले तर चालेल का ?

सोत्रि's picture

14 Nov 2023 - 5:19 am | सोत्रि

मस्त पैजारबुवा, एकदम खुसखुशीत लेख!

- (प्रवासातले अनामिक मित्र आठवलेला) सोकाजी

कहर लेख आहे एकदम. एकदम मजेशीर, चित्रेही एकदम समर्पक.
व्यक्तिचित्रण आणि एकेका व्यक्तींना पाडलेली नावे लै म्हणजे लैच आवडली माऊली.

बसस्टॉपपर्यंतच्या प्रवासातली ही गंमत तर पुढच्या किंवा लांबच्या प्रवासात किती वल्ली दिसत असतील!

ज्ञानोबाचे पैजार's picture

14 Nov 2023 - 5:39 pm | ज्ञानोबाचे पैजार

बस मध्ये बसलो की आम्ही जे डोळे मिटतो ते थेट कंपनीत पोचल्यावर उघडतो

आणि परत येताना आम्हाला उठवण्या करता चार लोक ठेवले आहेत

पैजारबुवा,

अमरेंद्र बाहुबली's picture

21 Nov 2023 - 10:27 pm | अमरेंद्र बाहुबली

अतिशय क्वालीटी लेख झालाय पैजारबूवा. कुठल्या चौकातून बस पकडता ते कळवा. हे सर्व ह्याची देही ह्याची डोळा पहावेसे वाटतेय.

राजेंद्र मेहेंदळे's picture

22 Nov 2023 - 12:14 am | राजेंद्र मेहेंदळे

लेख वाचुन मलाही संध्याकाळी दिसणारा असाच एक धावरा दादा, टेकडीवर दिसणारी हसरी आज्जी, झाडे लावणारे आणि गवत पेटवणारे रणगाडे काका(ते डी आर डी ओ मध्ये रणगाड्यांचे टेस्टिंग करत), बागेतले दंगा करणारे काका वगैरे आठवले.

पाषाणभेद's picture

30 Nov 2023 - 5:13 pm | पाषाणभेद

चित्रं अशी काय दिसत आहेत? त्या बाईचे पाय चक्क उलटे आहेत!
बाकी तुमची निरक्षण शक्ती जबर दिसते आहे. चांगला टाईम पास आहे रस्त्याच्या रहदारीकडे बघणे.

शशिकांत ओक's picture

5 Dec 2023 - 12:37 pm | शशिकांत ओक

पैजार जी,
आपल्या लेखातून साकार चोरकाका आणि देवसेना आम्हालाही भेटतात.
परस्परं समर्पयामि!
ते झाड आपण लावले नाही. ते कुणाच्या तरी कुंपणापलिकडे. त्याची फांदी रस्त्यावर, लांब छडी लांब करून फुले पाडायला फांद्यांवर मारा करून फुले तोडून प्लास्टिक पिशवीत. देव्हाराभर सुकलेल्या माळा. मुर्तीला प्रार्थना की माझे चांगले होऊ दे. म्हणून चोरलेली सुवासिक फुले वाहून पुण्य पदरात पाडून घेणारे काका! डोळ्याला खुपतात. फुले त्या त्या झाडांची शान आहेत. त्यातून मिळणारा सुगंध, नयनसुख सार्वजनिक आहे. ते ओरबाडणारा मी कोण?
दप्तराच्या ओझ्याखाली देवसेना लगबगीने रस्ता ओलांडत असताना दिसतात.
आपण निर्माण केलेली शब्द चित्रे भावतात. रंगित फोटो मस्त आहेत.

Bhakti's picture

5 Dec 2023 - 3:12 pm | Bhakti

मस्त मस्त!
एक एक मित्र कमाल!एकदम क्लास लिहिले आहे.ते AI चित्रं...तीन पायाची बाई,खांद्यावरची किटली,बाईक उलटी चालवणारा,चहावाला चक्क पंजाबी,हवेतला का दातात पकडलेला कप...हा हा... हसुन हसुन पुरेवाट झाली.

मित्रहो's picture

8 Dec 2023 - 5:46 pm | मित्रहो

वाह काय खूप सुंदर निरीक्षण आणि त्यांचे वर्णन. मला तुम्ही दिलेली नावे तर फार आवडली. देवसेना नाव तर प्रचंड आवडले. हो अशा देवसेना दिसतात आणि त्यांना ओव्हरटेक केलेले आवडत नाही. आता यापलीकडे बऱ्याच मंडळींना मी यातली नावे देऊ शकेन.

सुंदर चित्रे आणि व्यक्ती विशेष.

श्वेता व्यास's picture

22 Dec 2023 - 1:47 pm | श्वेता व्यास

खूपच छान निरीक्षण आहे तुमचं.
अशी ठराविक वेळी दिसणारी आणि नंतर आठवणीतून विरून जाणारी माणसे रोज दिसतात खरी, पण त्यांना अशी नावं नाही सुचली कधी मला.
आता हा एक नाद लागला, यांना काय नाव द्यावं :)