दिवाळी अंक २०२३ - अभ्यंगस्नान ते कावळ्याची आंघोळ

आजी's picture
आजी in दिवाळी अंक
12 Nov 2023 - 12:00 am
kaavalaa

'बेंदूर, बेंदूर सणाचं लागलं लेंढुर आणि दिवाळी दिवाळी सारे सण ओवाळी' असा वाक्प्रचार रूढ आहे. बेंदूर ते दिवाळी या कालावधीतच हिंदू वर्षातले सारे सण येऊन जातात. दिवाळीनंतर त्या वर्षातले फारसे सण उरत नाहीत.

दिवाळी हा अनेक सणांचा समूह आहे. वसुबारसपासून ती सुरू होते. धनतेरसला म्हणजे धनत्रयोदशीला बायकांच्या आंघोळी असतात. नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे घरातल्या सगळ्यांच्या आंघोळी असतात. ही आंघोळ करायची ती सूर्योदयापूर्वी. सूर्योदयानंतर जो आंघोळ करतो तो नरकात जातो, अशी समजूत आहे. (हल्ली नरकचतुर्दशीलासुद्धा ऑफिसला सुट्टी नसते. त्यामुळे कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये तरी ती साजरी होतच नाही. ज्यांना सुट्टी आहे, ते विचार करतात की रोज अति लवकर उठून, सर्व आवरून कामावर पळायचंच असतं, आज जरा उशिराच ऊठू, सावकाश ब्रेकफस्ट करू. काही जण आंघोळीला चक्क दांडी मारतात.)

मला माझ्या लहानपणीचं धनत्रयोदशीला केलेलं अभ्यंगस्नान आठवतं.

सारवलेल्या जमिनीवर किंवा फरशीवर रांगोळीने स्वस्तिक काढून त्यावर हळदकुंकू टाकायचं. हळदकुंकवाशिवाय नुसती रांगोळी नाही. ती अशुभ मानली जायची. स्वस्तिकाच्या रांगोळीवर पाट ठेवायचा. (कधी चौरंग.) पाटाशेजारी सुगंधी तेलाची चांदीची वाटी. शेजारी दुसऱ्या चांदीच्या वाटीत उटणं. त्या वेळी दिवाळीत खूपच थंडी पडायची. आता पडत नाही. ऋतुचक्र बदललं आहे, असं अनुभवायला येतंय खरं! तर मी रंगीत पाटावर बसायची. माझी मोठी बहीण आणि आई माझ्या डोक्याला सुगंधी तेल लावून मालिश करायच्या. हे तेल दिवाळीसाठी खासकरून विकत आणलेलं असायचं. पणत्यांच्या मंद,शांत उजेडात डोळे निवांत व्हायचे. डोक्याला मालिश करताना गुंगी यायची. पहाटे उठलेली असायची. घरचे पुरुष उठायच्या आत बायकांची अभ्यंगस्नानं आटोपून घ्यायची. डोक्याला मालिश झालं की पाठीला, पोटाला, छातीला, हातापायांना आई चोळून तेल लावायची. तेलावर उटणं लावायची. इतका मस्त सुगंध यायचा तेलाचा आणि उटण्याचा की नासिका तृप्त व्हायची. "हल्लीच्या उटण्याला तसा वास येत नाही बाई" असं म्हणण्याइतपत म्हातारी मी झालेली आहे. मग शाही आंघोळ! पेटीकोटात दुमडून ठेवलेला फ्राॅक फेकत मी उठायची. न्हाणीघरात जायची. आई पाठोपाठ यायची. मला नाहायला घालायला. अंगाला लावायला मोती साबण. चंदनाच्या वासाचा. माझी पहिली आंघोळ म्हणून मीच त्याला पहिल्यांदा स्पर्श करायची. भरपूर वाफाळतं पाणी. घरी कुटलेली सुगंधित शिकेकाई, आईच्या हातातल्या बांगड्यांचा किणकिणाट. आई केसांवर, अंगावर मनसोक्त गरम पाणी घालायची. बाहेर चुलवणावर हंड्यात पाणी गरम होत असायचं. त्यात मधूनमधून लाकडं सारायची आणि फुंकणीने फुंकर मारायची. जाळ उसळायचा. गरम गरम पाणी घेतल्यानंतर अंग पिसासारखं हलकं व्हायचं. स्वर्गीय सुख! ती मजा आता नाही. नाही म्हणजे नाही. आईच्या हातातल्या बांगड्यांचा किणकिणाट आठवला की डोळ्यांत पाणी येतं.

abhyang snaan

अभ्यंगस्नान असं मस्त असतं. अभ्यंगस्नान भारतात फार प्राचीन काळापासून चालत आलेलं आहे. अभि+अंग अशी त्याची फोड आहे. अभि = परित: = सर्व बाजूंनी. अंग म्हणजे अवयव.. म्हणजेच सर्व बाजूंनी केलेलं स्नान. अभ्यंगस्नान हे श्रम आणि पाप यांना नष्ट करणारं असं चरक संहितेत म्हटलंय. या स्नानाने मानसिक ताणही नष्ट होतो, असंही म्हटलं आहे. अभ्यंगस्नानाने श्रमशमन, संतापशमन, पित्तशमन होतं, असं मत्स्य पुराणात सांगितलं आहे. आपल्या शास्त्रात अंतरंग आणि भावनिक शुद्धी महत्त्वाची मानली आहेच, त्याचबरोबर शरीरशुद्धीसाठी अभ्यंगस्नान हे सर्वश्रेष्ठ मानलं आहे.

नंतर येते नरकचतुर्दशी. घरातील पुरुषांच्या अभ्यंगस्नानाचा दिवस. पहाटे उठायचं. वडिलांना, भावांना आम्ही तेल लावायचो. उटणं लावायचो. दादाला मी ओरडून सांगायची, "पाणी तापलंय रे." तोही ओरडून उत्तर द्यायचा."मग पाणी काढ." भाऊबीजेच्या दिवशीची त्याची गिफ्ट आठवून मीही बंधुराजांसाठी हंड्यातून तांब्याने बादलीत पाणी काढून द्यायची. तो म्हणायचा, "पाठीवर पाणी घाल." मी घालायची. पण एकदा मजा म्हणून मधेच एक तांब्या गार ढोण पाणी त्याच्या अंगावर घातलं. अस्सा ओरडलाय. चांगला कुडकुडत होता. मी जाम हसत सुटले. पण मला कुणीच रागावलं नाही. उलट सगळेच हसत सुटले.

नरकचतुर्दशीच्या दिवशी अभ्यंगस्नान झाल्यावर आम्ही सगळे देवाला नमस्कार करायला देवळात जायचो. मग फराळ. आईच्या हातचे फराळाचे पदार्थ देवाला नैवेद्य दाखवल्यावरच खायला मिळायचे. ते पोटभर खाऊन मी तर झोपूनच जायची. कुणालाही जेवायला नको असायचं.

आंघोळ कशी करावी? उघड्यावर करावी लागत असेल तर कमीतकमी कपड्यात करावी. पण बंद स्नानगृह असेल तर निर्वस्त्र होऊन करावी. आंघोळ बेताच्या गरम पाण्याने करावी. सुरुवातीला सर्व अंग पाणी ओतून नुसतंच चोळून घ्यावं. चोळल्याने अंगावरचा मळ निघून जातो आणि रक्तप्रवाह सुधारतो. मग साबण वापरावा. सर्वात आधी गुह्य अवयव नीट स्वच्छ करावेत. तिकडे बहुतेक दुर्लक्ष होतं. नंतर छातीला, पोटाला, पाठीला साबण लावावा. पाठीची स्वच्छता महत्त्वाची, कारण तिथे आपला हात पोहोचत नाही. पाठीवर दोऱ्या असलेला स्क्रबर घेऊन पाठ चांगली घासावी. पाठीकडे बहुतेकांचे दुर्लक्ष होतं. मग पाय धुवावेत. गुडघ्याची मागची बाजू दुर्लक्षित राहते. बोटांच्या पेरांचे बेचके, टाचा, तळपाय स्वच्छ करावेत. अनेकांचे तळपाय अस्वच्छ असतात. पुरुष रोज डोकं धुतात. बायका आठवड्यातून एकदा धुतात. केस आखूड असतील काही बायकाही रोज केस धुतात. गुह्यांगाच्या स्वच्छतेनंतर लगेचच डोकं स्वच्छ धुवावं. कानांची स्वच्छता महत्त्वाची. कान मागून-पुढून नीट धुवावेत. नाक आंघोळीच्या वेळी नीट शिंकरून अगदी साफ करावं. नंतर दिवसभर नाकात बोटं घालून नाक साफ करू नये. ते अतिशय वाईट दिसतं. इतरांना किळस वाटते. लोक दुरावतात. भल्याभल्यांना ही सवय असते.

तुम्ही म्हणाल, यात काय नवीन सांगितलं आजी? आम्ही रोज नीट आंघोळ करतोच. असं म्हणता? तसं असेल तर व्हेरी गुडच!

लहानपणी आंघोळीचा कंटाळा आला की आम्ही आंघोळीला चक्क दांडी मारायचो. आईला संशय येऊ नये म्हणून साबण ओला करून ठेवायचा आणि बाथरूममध्ये पाणी ओतून ती ओली करायची. पण आजोबांच्या ते लगेच लक्षात यायचं. ते विचारायचे, "एवढ्यात आलीस पण बाहेर? आज काय आंघोळीची गोळी घेतलीस वाटतं?" काही जण अंगावर एक-दोन तांब्ये पाणी घेतल्यासारखं करतात आणि तीन मिनिटांत आंघोळ उरकतात. यालाच 'कावळ्याची आंघोळ' म्हणतात.

आपण अनेक पक्षी पाहतो. झूमध्ये तर पाहतोच, रोजच्या व्यवहारातही पाहतो. कावळा, चिमणी, पोपट, साळुंकी, बदक, बगळे इत्यादी. त्यातले काही आकाशगामी असतात - म्हणजे चिमणी, पोपट, बुलबुल इ. हे पक्षी लहान पाणवठ्यावर पाणी प्यायला जातात. काही पाणपक्षी असतात - उदा., बदकं, बगळे, ते पाण्यातच राहणं पसंत करतात. पण कावळा हा जमिनीवर राहणारा पक्षी आहे. त्याला पाणी फारसं आवडत नाही. तो फक्त पाणी पिण्यासाठी पाण्याजवळ जातो. इतर पक्षी भरपूर पाण्यात आंघोळ करतात. कावळा मात्र पाण्याचे दोन-चार थेंबच अंगावर घेतो, की झाली त्याची आंघोळ. म्हणून अशा प्रकारे कमी पाण्यात केलेल्या आंघोळीला 'कावळ्याची आंघोळ' म्हणतात.

अर्थात नीट, धड आंघोळ कित्येकांच्या नशीबी नसते. जिथे पाण्याची टंचाई आहे, तिथे आंघोळीला बुट्टी मारावीच लागते. काही जणांना उघड्यावर आंघोळ करावी लागते. बायकांची तर अशा वेळी फारच पंचाईत होते. त्यांना उभं लावणं नेसूनच आंघोळ करावी लागते. कुणी पाहू नये म्हणून ती चटकन उरकावी लागते. कुठे कुठे तरट लावून आडोसा केलेला असतो. काही ठिकाणी दुष्काळ असतो. दोन, तीन किलोमीटर अंतरावर चालत जाऊन पाणी आणावं लागतं, तिथं आंघोळ कशी करणार? प्यायला पाणी नाही, आंघोळीला कुठून?

मूळ मुद्दा बाजूला सारला गेला. नरकचतुर्दशीनंतर असतो पाडवा आणि भाऊबीज. या दोन्ही दिवशी अभ्यंगस्नान असतं. पाडव्याला पत्नी पतीला अभ्यंगस्नान घालते आणि ओवाळते. काही ठिकाणी जावयाला सासू ओवाळते. मुलांना आई ओवाळते. मनुस्मृतीत तर म्हटलंय - या ओवाळणीत स्त्रियांना दागिने भेट म्हणून द्यावेत.

भाऊबीजेला बहीण भावाला अभ्यंगस्नान घालते. त्याला ओवाळते. भाऊ तिला भेटवस्तू देतो. भावाबहिणीच्या प्रेमावर अनेक नाटकं,सिनेमे आहेत. त्यातली गाणी टीव्ही वर धुमाकूळ घालत असतात.

सिनेमातही खूप आंघोळी आहेत. या आंघोळी कधी नेत्रसुखद, तर कधी आंबटशौक पुरवणाऱ्या असतात. आठवते ती रेखाची 'उत्सव'मधली आंघोळ. अभ्यंगस्नानच ते! मोठमोठी घंगाळं, हंडे, गरम पाणी. समोर 'रेखा'असूनही अंगावर बऱ्यापैकी कपडे. कुठंही अश्लीलता नाही. देबू देवधरची सुरेख रंगसंगती.

नंतर आठवते स्मिता पाटीलची आंघोळ. तिच्या अभिनयाबद्दल पूर्ण आदर व्यक्त करून नमूद करते की तिची ती आंघोळ बघून एका पाक्षिकात चित्रपट परीक्षण लिहिणाऱ्या एका पत्रकाराने खट्याळपणे लिहिलं होतं की 'स्मिता पाटीलची आंघोळ बघितली काय आणि रणजीतची आंघोळ बघितली काय! सारखंच!' अर्थातच हा जरा जास्तच अनावश्यक उल्लेख होता. पण तो लक्षात राहिला हेही खरं.

नंतर आठवते बाजीराव मस्तानीमधली रणवीर सिंग आणि प्रियांका चोप्राची आंघोळ. अतिशय शृंगारिक पण बटबटीत नसलेली, अश्लीलतेचा मागमूसही नसलेली आंघोळ.

सायरा बानोने सिनेमात दोनदा आंघोळ केलीय. आंघोळ म्हणजे टबबाथ. तीही मोठ्या कौशल्याने चित्रित केली आहे. सायरा सुंदर आहेच. साबणाच्या भरपूर फेसाखाली तिचं गोरं अंग लपवत दाखवत नेलं आहे. 'नौ दो ग्यारह'मध्ये देवानंदची कोरडी आंघोळ दिसते, तर 'सौदागर'मध्ये पद्मा खन्नाची 'सजना है' म्हणत केलेली नदीतली आंघोळ दिसते. 'मुनीमजी'मध्ये 'पानी में जले मोरा गोरा बदन' म्हणत हिरोइन आंघोळ करते. 'टारझन'मधली किमी काटकरची आंघोळही अनेकांच्या ल‌क्षात आहे. 'करण अर्जुन'मध्ये सुडाने पेटलेली राखी उभ्याने बादल्यामागून बादल्या डोक्यावर ओतून घेते. ते दृश्य परिणामकारक झालं आहे. सई परांजपेने तर एका सिनेमात नाना पाटेकरलाही आंघोळ करायला लावलीय.

'ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए' या गाण्यात संजीवकुमारला चट्टेरीपट्टेरी अर्ध्या चड्डीत बघवत नाही, पण विद्या सिन्हा पूर्ण साडीत शाॅवरखाली उभी राहते आणि डोळे निवतात.

बाकी राजकपूर ज्यांचा अग्रणी शोभेल अशा कित्येक निर्मात्यांनी आपल्या नायिकांना पाण्यात, टबात, धबधब्याखाली, नदीत, समुद्रात, पावसात कितीदा भिजवून 'दाखवलंय', याची साक्ष मंदाकिनी, मुमताज, झीनत अशा असंख्य नायिका देतीलच.

पावसाळा असो की हिवाळा की उन्हाळा. कोणत्याही ऋतूत आंघोळ केल्यावर फ्रेश वाटतं. गरम पाण्याने भरलेली बादली असावी.. मस्त सुगंधी साबण असावा.. अंगावर हलके हलके पाणी घ्यावं आणि मग ओठांवर एखादं खास आवडतं गाणं यावं की समजावं.. आंघोळ सुफळ संपूर्ण झाली.

प्रतिक्रिया

दिवाळीत अभ्यंगस्नानाच्या निमित्ताने खरी साग्रसंगीत आंघोळ घडते. एरवी रोजच्या धबडग्यात आंघोळ ही तशी झटपट उरकण्याची गोष्ट. दिवाळीत लहानपणी लवकर उठून तेल उटणे लावून केलेल्या आंघोळी नॉस्टॅल्जियाचा भाग आहेत. त्यात फक्त आंघोळ नाही. आईने किंवा बहिणींपैकी कोणी अंगाला तेल लावताना होणारा मायेचा स्पर्श. मग त्याला पूरक असा गरम पाण्याचा स्पर्श, उटण्याचा खरखरीत पण सुगंधी स्पर्श, खास आणलेला मोती साबण, बंबातील लाकडांच्या धुराचा वास, आसपासच्या फटाक्यांच्या कानठळ्या.
असे बरेच काही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Nov 2023 - 3:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आजी पुन्हा एकदा उत्तम आणि वेगळा लेख. दिवाळी सुरु झाली की विविध गोष्टी इतकंच या अभ्यंगस्नानाची चर्चा होते. सणासुदीच्या दिवसात स्नानात वेगळं काही नसतं पण थोड़ा वाढवून वेळ द्यावा इतकं दिवाळीत महत्व नक्की येतं. मोती साबणाच्या गोष्टी तर मनोरंजकच. आंघोळीला सुरुवात कुठून करावी आणि संपवावी कुठे याचंही शास्त्र नक्की असेल असे मला वाटते तुम्हीही निगुतीने सांगितलं आहे सगळं. लहानपणी दगडावर बसून भडंभडं तांब्याने पाणी ओतून घेतलं की झालं.

माझे एक शेजारी वयस्कर आजोबा वर्षानुवर्ष अधुन मधून दिसत असतात. दगडावर घ्ंगाळ्यात पाणी घेवून बराच वेळ स्नान करीत गंगे च यमुने चैव गोदावरि सरस्वति । नर्मदे सिंधु कावेरि जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु म्हणत सूर्यनारायणाच्या दिशेला कल्पून नामस्मरण करीत निवांत चाललेलं असतं सगळं.

लेख भारी आणि असं बरंच आठवत जातं. आजी लिहिते राहा.

-दिलीप बिरुटे

खूप ओळख आणि विश्वास असल्याशिवाय ज्या गोष्टींची आपण चर्चा करीत नाही अशा गोष्टी आणि विषय कसे हाताळावेत ते शिकावे तर आजींकडून. मराठी विषयासाठी वस्तुपाठ म्हणून बोट दाखवावं अशी लिखाण शैली.

त्याच बरोबर आयुष्य नेहमी टवटवीत राहावं म्हणून लागणारी निरागसता देखील आजींकडे भरपूर आहे. आजी तुम्हाला प्रणाम!

कर्नलतपस्वी's picture

12 Nov 2023 - 4:57 pm | कर्नलतपस्वी

सर्वात भारी.

साठच्या दशकातील आठवणी.

छान लिहिलय.

टर्मीनेटर's picture

16 Nov 2023 - 11:28 am | टर्मीनेटर

आजी रॉक्स 🤘
आजींच्या लेखांतुन ऐंशीच्या दशकात जन्मलेल्या पिढीचे प्रतिनिधी असलेल्या माझ्यासारख्या कित्येकांना अगदी अल्पावधीसाठी बघायला / अनुभवायला मिळालेल्या पण कालौघात विस्मृतीत गेलेल्या काही गोष्टींची उजळणी होऊन पुन्हा त्या मनःपटलावर येतात तर अनेक बघायला / अनुभवायला न मिळालेल्या गोष्टींबद्दल नव्यानेच समजते.

नठ्यारा's picture

16 Nov 2023 - 7:33 pm | नठ्यारा

आजीबाय, गो तू जुन्या आठवणींचा खजिना उघडलास बघ. गरम पाणी, बांगड्यांची किणकिण अगदी हुबेहूब. फक्त गरम पाणी गीझरचं होतं. मी लहान असतांना उटणं लावून घ्यायला खळखळ करायचो. थोडा मोठा झाल्यावर युक्तिवाद कराचो की नरकासुरास ठार मारल्याने श्रीकृष्णाच्या अंगाला घाण सुटली होती. म्हणून बायकांनी त्यास सुगंधी उटणं लावून आंघोळ घातली. मी तसा काही पराक्रम कुठे केलाय. मात्र असं असलं तरी चिराटं फोडायला मजा यायची. तेव्हढाच आपला नकली नरकासुराचा वध. पण मग त्यासाठी चिराटं अंघोळीच्या अगोदर फोडायला हवं ना? तरीपण आई सांगेल त्याच क्रमाने सोहळा साजरा व्हायचा.

-नाठाळ नठ्या

अथांग आकाश's picture

16 Nov 2023 - 9:18 pm | अथांग आकाश

आजीचा नेहमीप्रमाणेच सदाबहार लेख!

पियुशा's picture

17 Nov 2023 - 7:29 pm | पियुशा

क्या बात है !

सुबोध खरे's picture

17 Nov 2023 - 8:08 pm | सुबोध खरे

सदाबहार लेख!

अभ्यंग स्नान करण्याचा आनंद फारच छान असतो.

पूर्वी आई आणि आता बायको छानपैकी अंगाला तेल लावून मालिश करून देते. त्यानंतर उत्तम सुगंधित साबण लावून इलेक्ट्रिक गिझर खाली उभे राहून पाहिजे तितके वेळ गरम पाण्याचा आनंद घेत स्नान करणे हा परमानंद आहे.

एके काळी पाच मिनिटात तीन जणांनी अंघोळ "उरकुन घ्यायला" लागत असे त्याची आठवण झाली.

https://www.misalpav.com/node/24674

तेही दिवस सुखाचेच होते कारण विमानवाहू नौकेवर असल्याने आम्ही रोज दोन वेळेस अंघोळ करू शकत होतो. तर आमच्या पाणबुडीतील मित्रांना बिचार्यांना महिना महिना अंघोळीविना राहायला लागत असे.

शेवटी दुसऱ्यापेक्षा आपण जास्त आरामात आणि सुखात जगात आहोत हि कल्पना सुद्धा सुख देणारी असते.

मस्तच आजी.अगदी मायेच्या स्पर्शाचे अभ्यंगस्नान ते सिनेमातील ग्लॅमर स्नान ते आळशांची अंघोळ सर्व खुबीने लिहिले आहे.
मी लहानपणी सूर्यवंशी होते त्यामुळे अभ्यंग स्नान -पहाटे अर्धवट झोपेत का स्नान करायचे असा प्रश्न पडत असे.तरी सगळ्यांना तेल उटणे लावून अभ्यंगस्नान घालण्याची जबाबदारी माझ्यावरच असे!
नवीन नव्या लग्नानंतर ते आजपर्यंत नवरा तेल उटणे लावतांना मलाच पहिल्यांदा हैपी दिवाळी म्हणतो;) असं वाटतं याला रोजच असं अभ्यंगस्नान घालावं ,पण वेळ कुठंय :-)
तोंडभर कौतुक करून हिच्याकडून तेल उटणे लावून घ्या अशी मुद्दाम कौतुकास्पद जाहिरात घरच्यांना करतो (हा हा).

मिपा दिवाळी अंकातील माझ्या या लेखाला भरपूर वाचने आणि प्रतिसाद आपण सर्वांनी दिलात, त्याबद्दल मी तुम्हां सर्वांचे मनापासून आभार मानते. दिवाळी सुखाची गेली आहे. पुढचं वर्षही सुखाचं जावो. मिपाचा दिवाळी अंक अतिशय आवडला. सर्वच लेख, कविता,कथा दर्जेदार आहेत.

विजुभाऊ's picture

25 Nov 2023 - 12:22 pm | विजुभाऊ

मस्त लेख झालाय आज्जे.
सिनेमामधली आंघोळ लक्षात राहीली ती रेखाची " उत्सव सिनेमातली" खूपच कलात्मक घेतली आहे ती.

चौथा कोनाडा's picture

26 Nov 2023 - 2:52 pm | चौथा कोनाडा

प्रसन्न टवटवी देणारा मस्त झकास लेख !
Beauty8765nhbvc
माझ्या बालपणातली दिवाळीची आंघोळ आठवली ... अन आख्खं बालपण डोळ्यांसमोरून झरझर फिरत राहिलं !
त्या अंधार्‍या पहाटेच्या एखाद दुसर्‍या मिणमिणत्या पणतीतल्या प्रकाशात केलेल्या दिवाळीच्या आंघोळ पुन्हा कधीच येणे नाही !

गुटगुटीत बाळाच्या आंघोळीचे चित्र एकदम गोंडस !
सिनेमा आंघोळींचा मागोवा देखिल भारी !
वाह आजी !

श्वेता व्यास's picture

20 Dec 2023 - 6:06 pm | श्वेता व्यास

अभ्यंगस्नान छान उतरले आहे तुमच्या लेखणीमधून.
आई तेल-उटणं लावून घालायची तेच खरं अभ्यंगस्नान!
जुने दिवस आठवले.