श्रीगणेश लेखमाला २०२३ - भिंतीवरील चेहरा

मनस्विता's picture
मनस्विता in लेखमाला
28 Sep 2023 - 8:46 am

भिंतीवरील चेहरा

रात्रीची जेवणंखाणं उरकून गावातली तमाम मंडळी त्यांच्या नेहमीच्या पारावर येऊन गप्पा मारत बसली होती. आदल्याच दिवशी झालेल्या अमावास्येमुळे विषय अर्थातच भुताखेतांवर न गेला, तरंच नवल होतं. अज्याने त्याच्या मामाने पाहिलेल्या भुताचा काहीतरी एक किस्सा सांगितला, तर सच्याने त्याच्या आजीची गोष्ट सांगितली. तिला एका अमावास्येच्या रात्री विहिरीत उडी टाकून गेलेली त्यांच्या गावची पाटलीण दिसली होती.

असं प्रत्येकाचं काही ना काही सांगून झालं होतं. त्यामुळे गप्पांचा जोर कमी होत आला होता. तसं राजूचं लक्ष पाराच्या पलीकडे एका दगडावर बसलेल्या माणसाकडे गेलं. गडी गावचा नाही, हे सहज लक्षात येत होतं. “काय पाव्हणं, कोणाकडे आला?” असं म्हणत राजूने त्याची चौकशी सुरू केली. तशा सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या. “मागच्या आळीतल्या वसंताकडे आलोय’ असं त्याने उत्तर दिलं. “मग नाव काय म्हणालात? अन कुठल्या गावचे म्हणायचे तुम्ही?” वसंताचा पाहुणा म्हटला, तशा राजूच्या पुढच्या चौकश्या सुरू झाल्या. “मी मुकुंद. आजच पुण्याहून आलो. वसंता गेलाय शेतावर पाणी द्यायला. घरी बसून काय करायचं, म्हणून थोडं पाय मोकळे करायला बाहेर पडलो.” पाहुण्यानेही पुढे येऊ घातलेल्या प्रश्नांची उत्तरं आधीच देऊन टाकली.

पण एवढ्यावर थांबेल तो राजू कसला! मुकुंदनेही एखादा किस्सा सांगावा अशी त्याने त्याला गळ घातली. तसा मुकुंद क्षणभर विचार करून म्हणाला,”अलीकडेच माझ्या आयुष्यात एक घटना घडली आहे. तुम्ही सांगितलेल्या गोष्टींसारखी भुताखेतांची नाही, पण विलक्षण आहे. आपल्याला माहीत असलेल्या तर्काच्या किंवा विज्ञानाच्या कसोटीवर लावून तिचा अर्थ लावणं जरा कठीणच. आणि कमालीचा योगयोग म्हणजे एक प्रकारे आजच दुपारी त्या घटनेला पूर्णविराम मिळाला आहे.” मुकुंदने केलेलं हे वर्णन ऐकताच सगळ्यांची उत्सुकता ताणली गेली. सगळे जण त्याने ती घटना सविस्तर सांगावी ह्याचा त्याला आग्रह करू लागले.

“ह्या गोष्टीची सुरुवात साधारण ३ महिन्यांपूर्वी झाली” असं सांगत त्याने कथन सुरू केलं. ”मी भांडारकर रोडला असलेल्या एका बंगल्यातील खोलीत भाड्याने राहतो. बंगला बराच जुना आहे. मालकांनी तशी २-३ वर्षांपूर्वीच रंगरंगोटी करून घेतली आहे.पण यंदा खूप पाऊस झाल्याने भिंतींना जागोजागी ओल आली आहे.
असंच एके सकाळी जाग आली, तरी अंथरुणात लोळत असताना त्यातल्याच एका पट्ट्याकडे लक्ष गेलं. जसजसं निरीक्षण करत गेलो, तसतसा त्यात एका चेहऱ्याचा भास होऊ लागला. जरा जास्त वेळ पाहिलं, तसं दोन डोळे, नाक आणि जिवणी दिसू लागले. भास असेल असा विचार करून उठलो आणि नेहमीच्या कामाला लागलो. पण त्यानंतर त्या पट्ट्याचं निरीक्षण करायचा जणू नादच लागला. जसजसे दिवस जाऊ लागले, तसतसे नाक-डोळे ठसठशीत दिसू लागले.असं वाटायला लागलं की ह्या चेहऱ्याच्या व्यक्तीला मी ओळखतो.” दम खाण्यासाठी मुकुंद जरा थांबला आणि सभोवती एक नजर फिरवली. ऐकणाऱ्या मंडळींच्या चेहऱ्यावर पुढे काय होणार ह्याची उत्सुकता दिसत होती.

त्यामुळे मुकुंदने पुढे बोलायला लगेचच सुरुवात केली. “असं वाटायला लागलं की ह्या माणसाला पूर्वी आपण कधी तरी भेटलो आहोत. पुन्हा कधीतरी ती व्यक्ती भेटेल किंवा दिसेल ह्या आशेने रस्त्यावरून चालताना आजूबाजूला चालणाऱ्या पुरुषांचे चेहरे न्याहाळू लागलो. भिंतीवरचा तो चेहरा पुरुषाचाच असल्याने बायकांकडे मात्र चुकूनही पाहत नव्हतो. भर चौकात उभं राहून येणाऱ्याजाणाऱ्यांकडे पाहू लागलो. माझ्या ह्या कृतीने लोक माझ्याकडे चमत्कारिक नजरेने पाहत असत. पण मला त्याची फिकीरच नव्हती. कारण मला तो चेहरा असलेला माणूस शोधायचा ध्यास लागला होता.

असंच एके दिवशी सकाळी चहा प्यायला डेक्कनवर गेलो होतो. तर सिग्नलला उभ्या असलेल्या एका अतिशय आलिशान गाडीत मला तो दिसला. तोच, ज्याचा चेहरा मला गेले कित्येक दिवस माझ्या खोलीच्या भिंतीवर दिसत होता. माझ्या मनात पुढील काही विचार यायच्या आत सिग्नल सुटला आणि त्याची गाडी निघाली. मी गडबडीने रस्त्यावर आलो आणि एका रिक्षात बसून त्या गाडीचा पाठलाग करायला सांगितलं. रिक्षावाल्यानेही सगळ्या गाड्यांमधून वाट काढत त्या कारचा माग काढला. ती कार स्टेशनजवळच्या एका पंचतारांकित हॉटेलच्या गेटमधून आत शिरली. नाइलाजाने मला रिक्षा बाहेरच थांबवावी लागली. रिक्षाचे पैसे चुकते करेपर्यंत ती कार आणि कारमधला माणूस दिसेनासे झाले होते. काय करावे न सुचून हॉटेलच्या बाहेरच काही वाट पाहायची असं ठरवलं. साधारण दोन-तीन तास उलटून गेले, तरी त्या माणसाचा पत्ता नव्हता. मग तसाच हताश होऊन मी तिथून निघालो. त्या माणसाची गाठ तर पडलीच नाही अन कामावर अर्ध्या दिवसाची सुट्टी लागली, तो भाग वेगळाच.” मुकुंदच्या चेहऱ्यावर आताही तेवढेच हताश भाव दिसत होते.

"दुसऱ्या दिवशी उठून डेक्कनवरच्या त्याच सिग्नलपाशी जाऊन थांबलो. आज परत तो दिसेल ह्या आशेपायी तिथेच काही काळ उभा राहिलो. पण त्या दिवशी ना ती गाडी दिसली, ना तो माणूस. कामावर वेळेत पोहोचलो नाही, तर शिव्या खाव्या लागायच्या ह्या विचाराने तिथून निघालो. मनाशी खूणगाठ बांधली की दुसऱ्या दिवशी प्रयत्न करून पाहू.

दुसऱ्या दिवशी त्याच जागी जाऊन थांबलो. आणि नशिबाने ती गाडी व गाडीत बसलेला तो माणूस दिसला. परत एकदा त्याचा पाठलाग करावा ह्या विचारात असतानाच, ती गाडी जवळच्याच एका हॉटेलपाशी जाऊन थांबली आणि तो माणूस त्या हॉटेलच्या आत शिरला. आज त्याला गाठायचंच, असा विचार करून मीसुद्धा त्या हॉटेलात शिरलो. तेच नाक-डोळे, तोच चेहरा. अंगावर भारी कपडे, हातात किमती घड्याळ आणि चेहऱ्यावरचं तेज तो गर्भश्रीमंत असल्याची साक्ष देत होतं. एका टेबलावर कोणाची तरी वाट बघत असेलला तो दिसला.

त्याच्या टेबलापाशी जाऊन, त्याच्याशी बोलायचं धाडस करत म्हटलं, “नमस्कार, तुमच्याकडे माझं काही महत्त्वाचं काम आहे. तर मला तुमचं व्हिजिटिंग कार्ड मिळू शकेल का?” तो काहीसा गोंधळून आश्चर्यचकित झाला. कोण कुठला अनोळखी माणूस येतो काय आणि थेट आपलं व्हिजिटिंग कार्ड मागतो काय.. असे भाव त्याच्या चेहर्‍यावर तरळले. पण फार नादी लागायला नको, असा विचार करून बहुधा त्याने त्याच्या खिशातील पाकिटातून त्याचं कार्ड काढून दिलं. नेमकं त्याच वेळी तो ज्याची वाट पाहत होता, तो माणूस आल्याने त्याने त्याला हात केला व मान दुसरीकडे वळवली.

मीही ते कार्ड घेऊन गडबडीने बाहेर आलो आणि अधीरतेने त्याचं नाव व पत्ता वाचू लागलो. त्याचं नाव कुमार भांडारकर होतं आणि पत्ता दिल्लीचा. हे वाचून डोक्यात काय गरगरलं कोणास ठाऊक आणि शुद्धच हरपली. काही वेळाने भानावर आलो, तेव्हा जाणवलं की लोकांनी रस्त्याच्या कडेला मला एका खुर्चीत बसवून प्यायला पाणी दिलं होतं. लोकांचे आभार मानले आणि पुढे काय करायचं हे न सुचल्याने तसाच खोलीवर आलो आणि दिवसभर विश्रांती घेतली.
दुसऱ्या दिवशी जरा हुशारी आल्यावर काही माहिती मिळाली तर काढावी, असा विचार केला. ओळखीतल्या त्यातल्या त्यात उच्च्पदस्थ लोकांकडे कुमार भांडारकरबद्दल चौकशी केली. तेव्हा कळलेली माहिती अशी की भांडारकर हे मूळचं पुण्याचं व अतिशय सधन कुटुंब. पण काही वर्षांपूर्वी कुमार भांडारकरने त्याचं बस्तान दिल्लीला हलवलं होतं. तिथेच त्याचा मोठा व्यवसाय असल्याचं कळलं.

हे ऐकून आणखीनच चक्रावल्यासारखं झालं. कारण मी आजतागायत दिल्लीला गेलो नव्हतो आणि इतक्या श्रीमंत माणसांशी माझा दूरान्वयाने काही संबंध येणं शक्य नव्हतं. मग मला खोलीच्या भिंतीवर तो चेहरा का दिसावा? हे कोडं काही उलगडत नव्हतं.

जिवाची अशीच उलाघाल होत अजून दोन-चार दिवस गेले. मानसिक थकवा आल्याने असेल म्हणा पण परवा रात्री जरा लवकरच झोप लागली. त्यामुळे काल पहाटे जरा लवकरच जाग आली. उठल्यावर सवयीने आपसूकच भिंतीवरच्या त्या चेहऱ्याकडे लक्ष गेलं. आणि काय आश्चर्य! परवा रात्रीपर्यंत ठळक असलेला तो चेहरा अचानक फिकुटला होता. इतके दिवस स्वतःच्या अस्तित्वाची कायम जाणीव करून देणारा तो चेहरा अचानक धूसर झाला होता.

तशाच गोंधळलेल्या मनःस्थितीत उठून चहापाण्याची बाहेर गेलो. बाहेर पेपर विकायला आले होते. आणि पेपरमध्ये ठळक बातमी होती की 'दिल्लीस्थित बडे उद्योजक कुमार भांडारकर यांच्या गाडीला भीषण अपघात.’ तुम्ही सर्वांनीही वाचलीच असेल ना ती पेपरमधील बातमी? घाईघाईत पेपर विकत घेतला आणि अधाशासारखी पूर्ण बातमी वाचून काढली. महाबळेश्वरच्या रस्त्यावर वेगाने जाणाऱ्या त्यांच्या गाडीला ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात भांडारकर गंभीर जखमी झाले होते.
भांबावलेल्या स्थितीत तसाच खोलीवर परतलो. पुन्हा एकवार त्या भिंतीकडे पाहिलं, तर आणखी एक धक्का बसला. इतके दिवस स्पष्ट दिसत असलेला तो चेहरा आता पूर्णपणे नाहीसा झाला होता. नंतरच्या बातम्यांमध्ये अर्थातच कळलं की भांडारकर यांचा सकाळी मृत्यू झाला होता. भिंतीवरचा चेहरा नाहीसा होण्यासाठी जणू त्यांच्या मृत्यूची वेळ गाठली होती.”

एवढं बोलून झाल्यावर मुकुंद शांत झाला होता. आजूबाजूची माणसंही दिङ्मूढ झाली. अचानक जागृत झाल्यासारखे सर्व जण बोलू लागले. हा अनुभव अगदीच अमानवी आणि विलक्षण असल्याबद्दल सगळ्यांचं एकमत झालं.

“खरंच, ह्या घटनेबाबत आपण तीन विलक्षण बाबी नोंदवू शकतो. एक तर कुठे दिल्लीला राहणाऱ्या इसमाचा चेहरा माझ्या खोलीतील भिंतीवर उमटावा आणि त्याची प्रत्यक्ष आयुष्यात गाठ पडावी. दुसरी म्हणजे त्या माणसाच्या नकळत शहराच्या ज्या भागात ही घटना घडत होती, त्या भागाचं आणि त्या व्यक्तीचं नामसाधर्म्य.”
मुकुंदच्या ह्या वक्तव्यामुळे भुतंखेतं, पारलौकिक अनुभव यांच्या सगळ्यांच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं. सगळे पुन्हा गप्पांमध्ये गुंगलेले असताना मुकुंद सर्वांचा निरोप घेऊन तिथून निघाला.

तेवढ्यात राजूच्या काहीतरी लक्षात आलं आणि त्याने मुकुंदाला हाक मारली. “अहो पाव्हणं, पण तुम्ही तर तीन बाबी म्हणाला होता. तिसरी तर राहूनच गेली ना!” राजू म्हणाला.

“अरेच्चा, विसरूनच गेलो. तिसरी सर्वात विलक्षण बाब म्हणजे ही गोष्ट अर्ध्या तासापूर्वीच मी माझ्या मनात रचली आहे. चला, येतो तर” म्हणत मुकुंद तिथून निघून गेला.

- मनस्विता

(The Face on the Wall By Edward Verrall Lucas वर आधारित)

श्रीगणेश लेखमाला

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

28 Sep 2023 - 8:05 pm | मुक्त विहारि

कथा आवडली ...

वाचली. आवडली. पण शेवट अजून धक्कादायक करता आला असता. उदा. मुकुंदाच भांडारकर असतो असे काहीतरी.

कर्नलतपस्वी's picture

28 Sep 2023 - 8:27 pm | कर्नलतपस्वी

शेवटचे वळण आवडले.

फुगा फुगवून त्याचे तोंड मोकळे सोडल्यावर तो जसा फुस्स होतो आगदी तसेच वाटले.

सौंदाळा's picture

28 Sep 2023 - 8:57 pm | सौंदाळा

मस्तच जमली आहे कथा

स्नेहा.K.'s picture

28 Sep 2023 - 9:06 pm | स्नेहा.K.

लहानपणी संध्याकाळी अंधार पडल्यावर, अंगणात भावंडांसोबत अशाच ऐकलेल्या, वाचलेल्या, रचलेल्या गोष्टी सांगितल्या आणि ऐकल्या जायच्या. अगदी तश्शीच गोष्ट! खूप आवडली.

रंगीला रतन's picture

29 Sep 2023 - 4:59 pm | रंगीला रतन

कथा आवडली.

अहिरावण's picture

29 Sep 2023 - 7:49 pm | अहिरावण

मस्त कथा

१.५ शहाणा's picture

2 Oct 2023 - 7:22 pm | १.५ शहाणा

या प्रकारची एक गोष्ट दूरदर्शन वर खूप वर्ष पूर्वी पहिली होती त्यात नायका शेजारी एक चित्रकार रोज एका व्यक्ती चे चित्रा काढीत व ती व्यक्ती दुसर्या दिवशी मरत , एका दिवशी त्याला त्याचेच चित्रा काढलेले दिसते , तेथेच कथा संपवली होती . मला वाटते "दि पोट्रेट " असे कथेचे नाव होते

जुइ's picture

3 Oct 2023 - 3:36 am | जुइ

लिहित राहा.

मनस्विता's picture

15 Mar 2024 - 2:58 pm | मनस्विता

सर्व प्रतिसाद्कर्त्यांचे मनःपूर्वक आभार.

माझे लेखन गणेश लेखमालेत कधी प्रकाशित होते ह्याची खूप आतुरतेने वाट पाहत होते. गणपतीच्या सर्वात शेवटच्या दिवशी प्रकाशित झाले. त्यानंतर प्रतिसादांना उत्तर देऊ असा विचार करत राहूनच गेले.

त्यात मला मिसळपावचे लॉगिन पासवर्ड आठवावे लागतात. प्रत्येकवेळी लॉगिन करताना पहिले एक दोन प्रयत्न देवाला असतात. त्यामुळे पासवर्ड आठवण्याचा आळस केला. असो.

तुम्ही सर्वांनी आवर्जून कथा वाचून प्रतिसाद दिला त्याकरता पुन्हा एकदा आभारी आहे. पुन्हा कधी कथा प्रकार लिहायला जमेल माहित नाही.

- मनस्विता