श्रीगणेश लेखमाला २०२३ - पधारो म्हारे देश - ताल छापर अभयारण्य, राजस्थान भटकंती

MipaPremiYogesh's picture
MipaPremiYogesh in लेखमाला
25 Sep 2023 - 10:22 am

पधारो म्हारे देश - ताल छापर अभयारण्य, राजस्थान भटकंती

नवीन कॅमेरा आणि लेन्स घेतल्याने उत्साह एकदम दणदणीत होता, त्यामुळे कुठेतरी ट्रिपला जायचं आयोजन चाललं होतं. त्याच वेळेस एका मित्राने विचारलं की “आम्ही ताल छापर या ठिकाणी जाणार आहोत, तुला यायचंय का?” मग काय, बायकोची परवानगी घेतली, बायकोसुद्धा डीडीएलजेसारखं ‘जा सिमरन, जी ले अपनी जिंदगी’ या प्रकारे म्हणाली की “जा, जाऊन ये. त्या निमित्ताने नवीन कॅमेराही वापरता येईल.” तर अशा प्रकारे परवानगी मिळाली आणि मी तिकीट काढायला सुरुवात केली. पुण्यातून तिकीट खूप महाग होतं, म्हणून आम्ही मुंबईहून तिकीट काढलं - मुंबई ते जयपूर. दिवस होते थंडीचे, ख्रिसमसच्या सुट्ट्या. आम्ही पुण्यातून रात्री अकरा वाजता निघालो, कारण मुंबई एअरपोर्टवरून आमचं सकाळचं विमान होतं. मुंबई एअरपोर्टवर आमचं जे गेट होतं, ते इतक्या लांब होतं की चालत चालत आता अ‍ॅटलीस्ट लोणावळापर्यंत तरी पोहोचू, असा फालतू जोक करूनही झालेला. तिकडे जाऊन एअरपोर्टवर सगळ्यांच्या ओळखी झाल्या आणि आम्ही एकदाचे सुटलो. जयपूर एअरपोर्टवर उतरलो.

1

उतरल्यावर आम्हाला घ्यायला आम्ही दोन टॅक्सी बोलावल्या होत्या, कारण आम्ही सहा जण होतो. दुसरी टॅक्सी दिसली, पण तिच्यावर ‘राजस्थान सरकार’असं लिहिलं होतं. आम्ही म्हटलं, वा! कोणीतरी मोठा माणूसही विमानात आपल्याबरोबर आला आहे बहुतेक. आम्ही आपले दुसऱ्या टॅक्सीची वाट बघत थांबलेलो, तेवढ्यात पहिला टॅक्सीवाला म्हणाला, “बैठो वो गाडी में|” आम्ही आपलं बघायला लागलो कुठे आहे गाडी ते. तेवढ्यात जी दुसरी टॅक्सी होती राजस्थान सरकारची, त्याचा ड्रायव्हर आला व म्हणाला, "पधारो म्हारो देस|" आम्ही एकदम आश्चर्यचकित झालो! म्हटलं, ठीक आहे, बसावं.. कधी नव्हे ते आपल्याला सरकारी गाडीत बसायला मिळतं आहे. मस्त पडदे वगैरे लावलेली, पांढरं कव्हर घातलेली अशी गाडी होती.

2

गाडीत बसून निघालो, एअरपोर्टवर कुठेही कोणीही आम्हाला अडवलं नाही. त्याला पहिल्यांदा म्हटलं, “बाबा, आम्हाला गजक घ्यायची आहे.” थंडीचे दिवस असल्याने जिकडेतिकडे सगळीकडे शाही गजकची दुकानं. शेवटी एका ठिकाणी थांबून आम्ही गजक घेतली. काही लोकांना गजक माहीत नव्हती. पण जेव्हा आम्ही ती खाल्ली, तेव्हा सगळे जण एकदम खूश झाले. मग पुढे गेल्यावर ब्रेकफस्ट करायचा, असं ठरवलं. त्याला म्हटलं की “मस्तपैकी एखाद्या खाण्याच्या ठिकाणी गाडी थांबव.” हा पठ्ठ्या काही गाडी थांबवायला तयारच नव्हता, शेवटी एका ठिकाणी त्याने गाडी थांबवली आणि म्हणाला, “इथे पराठे चांगले मिळतात.” सगळ्यांना भुका लागलेल्या आणि त्यातून थंडीचे दिवस, मग काय, एक से एक पराठे यायला लागले. पनीर पराठा, आलू पराठा,आलू ऑनियन, मिक्स पराठा असे सगळ्या प्रकारचे जवळपास एकावर एक-दोन-तीन-चार.. किती पराठे खाल्ले, याला काही लिमिटच नाही.

3

पुढे जाताना ड्रायव्हरला बोलतं केलं. विचारलं की “ती सरकारी गाडी ही काय भानगड आहे?” तो म्हणाला की “माझा भाऊ सरकारी कंपनीमध्ये मोठ्या पोस्टवर आहे आणि ही गाडी आम्ही वापरतो. शक्यतो आम्ही जयपूरमध्येच फिरवतो. पहिल्यांदा बाहेर नेत आहोत.” जाताना सगळीकडे टोलवर आम्हाला माफी होती, कारण सरकारी गाडी. एका ठिकाणी मात्र आम्हाला थांबवलं आणि विचारलं की “गाडीत कोण आहे?” तर हा ड्रायव्हर म्हणाला की “आयएएस ऑफिसर आहेत.” तो म्हणाला, “कोण आहेत ऑफिसर?” ड्रायव्हरने आधी कार्ड दाखवलं आणि मागे माझ्याकडे बोट दाखवून म्हणाला की “हे साहेब आहेत.” टोलवरच्या माणसाने खाली वाकून माझ्याकडे बघितलं, “नमस्कार साहेब” असं म्हणाला आणि आम्हाला म्हणाला की “तुम्ही गाडी पुढे घेऊ शकता.” म्हटलं, हा काय किस्सा आहे.. असो. आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी आपल्याला साहेब म्हणालं आहे, तर असू द्यावं. त्या ड्रायव्हरला विचारलं की “कोण आहे ऑफिसर?” तो म्हणाला की “मघाशी जे म्हणालो, माझा भाऊ, त्यांचा मुलगा आणि त्याची बायको पुण्यात ऑफिसर आहे.” आम्हीही खूप हसायला लागलो.

रस्ता एकदम गुळगुळीत आणि अप्रतिम होता. पुढे आम्हाला खाटू श्यामजी यांचं मंदिर लागलं. आजूबाजूला मस्त हिरवीगार शेती आणि मख्खन रस्ते.. दिल एकदम खूश झालं. साधारणपणे तीन-साडेतीन तासांनी आम्ही ताल छापर या ठिकाणी पोहोचलो. ताल छापर म्हणजे ब्लॅकबक म्हणजेच काळवीट अभयारण्य आहे. आम्ही जिथे उतरलो, ती जागा बघून तर आम्ही एकदम खूश झालो, कारण तो एक होम स्टे होता आणि एकदम त्या अभयारण्याला लागून होता. एकदम नॅचरल वातावरण, लांबवर गाव आणि बाजूला जंगल, अप्रतिम अशी जागा. पटापट बॅगा टाकल्या आणि आजूबाजूला बघायला सुरुवात केली. लगेचच आम्हाला ब्लॅकबक म्हणजे काळवीट चरताना दिसले. म्हटलं, सुरुवात तर चांगली झाली.

4

आम्ही तिथे सेटल झालो. संध्याकाळी मस्तपैकी त्यांनी पोहे आणि भुजिया वगैरे आणले, एकदम मोठ्ठं भांडं भरून भुजिया. राजस्थानमध्ये आल्यामुळे बिकानेरी भुजिया आणि सगळे नमकीन पदार्थ.

5

ते खाल्ल्यावर थोडीफार फोटोग्राफी झाली, संध्याकाळी तो म्हणाला की “मी घरचं जेवण घेऊन येतो, मस्तपैकी बाजरीची भाकरी आणि वेगवेगळ्या राजस्थानी भाज्या.”

6

त्याच्यावर ताव मारून झोपलो, कारण दुसऱ्या दिवशी लवकर उठून आम्हाला पक्षिनिरीक्षण आणि फोटोग्राफी करायची होती. पहाटे उठलो साडेपाच वाजता आणि बाहेर येऊन बघतो तर अशक्य प्रचंड थंडी - म्हणजे चार वगैरे तापमान. तशी रात्रीही थंडी होतीच, उन्हाळ्यात प्रचंड ऊन आणि थंडीत अशक्य थंडी असल्याने घराला खिडक्या नव्हत्या. पण साधारणतः मोठा चौकोनी ओपन एरिया होता प्रत्येक खोलीच्या वरती, जेणेकरून हवा खेळती राहावी. पण त्यामुळे खूप थंडी वाजते. पाणीही प्रचंड गार होतं. अंघोळ तर काय, दात घासणं म्हणजे जिवावर आलेलं. बाहेर आलो तर प्रचंड धुकं, धुक्यामध्ये फोटो काढणं शक्यच नाही. मग काय, मस्तपैकी गरम गरम चहा (तीन कप, कारण आमच्या मंडळींना तीन कप चहा लागतो :)) घेतला, गप्पा मारत बसलो.

7

साधारणत: साडेनऊ-दहा वाजता धुकं कमी झालं आणि आम्ही अभयारण्यात जायला लागलो. त्यांच्या दोन बोलेरो गाड्यांमधून निघालो, साधारण पाच किलोमीटरवर अभयारण्य आहे.

8

आतमध्ये गेलो. एकदम मोकळी जागा आहे माळरान, आम्हाला तिथे वेगवेगळे पक्षी दिसायला लागले, वेगवेगळ्या प्रकारचे शिकारी पक्षी - आम्हाला ईगल दिसले आणि मग काही कापशी घारी दिसल्या. एकूण खूप सुंदर वातावरण होतं. भरपूर फोटोग्राफी केली.

9 10

जेवण वगैरे करून परत संध्याकाळी गेलो आणि भरपूर फोटो काढले. आम्हाला त्या दिवशी हजारोंच्या संख्येने काळवीट दिसले आणि त्यांचे टिपिकल फोटो काढले - उंच उड्या मारताना, सनसेटच्या पार्श्वभूमीवर काळवीट, त्यांची शिंगं वगैरे.

11

12

13

दुसऱ्या दिवशी सकाळी परत आम्हाला जायचं होतं बिकानेरला. बिकानेरजवळ जोरबीड नावाची एक जागा आहे, जिथे गिधाड या पक्ष्याचं संवर्धन केलं जातं. गिधाडांचं अभयारण्य आहे आणि इतरही शिकारी पक्षी तिकडे असतात. साधारणतः दोन तासांवर ती जागा होती. पहाटे उठून बघितलं तर प्रचंड धुकं, पण तिकडे जायचं असल्याने आम्ही निघालो. रस्ताही दिसत नव्हता, लाइट लावला तरी काही दिसत नव्हतं गाडीच्या प्रकाशात. आमची गाडी जवळपास २०-३०च्या स्पीडने चालू होती आणि जुनी बोलेरो असल्याने जोरात पळवताही येत नव्हती. मग थोड्या वेळाने आम्हाला ओव्हरटेक करून एक होंडा सिटी गाडी गेली आणि त्यांनी त्यांचे पार्किंग लाइट लावले होते. आम्ही आमच्या ड्रायव्हरला म्हणालो की “हाच चान्स आहे, पूर्णतः त्याच्या लाइटवर भरोसा ठेवून गाडी हाणायला सुरुवात कर.” गाडीमध्ये मस्त गप्पा झाल्या, क्लासिकल गाणी (ओरिजिनल रेकॉर्डिंग केलेली) ऐकली आणि आम्ही जोरबीडला सुखरूप पोहोचलो. बोला पंढरीनाथ महाराज की जय..

तिथे पोहोचलो आणि आमचं स्वागत केलं परत धुक्याने. मग तिथला गाइड म्हणाला की “आपण ब्रेकफस्ट वगैरे करून घेऊ.” आम्ही बाजूला मस्त नॅचरल एन्व्हायरमेंटमध्ये गाडीच्या टपावर आणलेला सगळा ब्रेकफस्ट ठेवून ब्रेकफस्ट केला आणि अभयारण्यात एंट्री घेतली.

14

15

सुरुवातीलाच बघितलं, तर एका झाडावर साधारणत: पाच ते सहा गिधाडं बसलेली. गिधाड हा पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. पूर्वी आपल्या आजूबाजूला भरपूर दिसायची, पण काही स्पेसिफिक वेदनाशामक औषधांमुळे त्यांच्या पुनरुत्पादनाच्या मार्गात अडथळा निर्माण झाल्याने त्यांची नवीन पिढी जन्माला येत नाही आणि म्हणून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे इथे त्यांचं संवर्धन केलं जातं आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर गिधाडं दिसतात. ही गिधाडं बघून आम्ही एकदम हरखून गेलो. पुढे गेलो एका ठिकाणी तर एका झाडावर गिधाड आणि गरुड असे दोन मोठे शिकारी पक्षी दिसले.

16

वेगवेगळ्या प्रकारची गिधाडं होती. सगळ्यात छोट्या गिधाडांपासून egyptian vulture ते युरोपियन ग्रिफन vulture, इंडियन ग्रिफन vulture आणि सगळ्यात मोठं Cinereous Vulture अशी गिधाडं दिसतात. त्या दोन गिधाडांमध्ये इतका फरक होता की एक अक्षरशः त्याचं छोटं पिल्लू दिसेल की काय एवढं मोठं गिधाड.

17

18

जसंजसं आम्ही आत जायला लागलो, तसंतसं तो भाग बघून आम्ही अक्षरशः नाक मुठीत धरायला सुरुवात केली, कारण की त्या एरियामध्ये मेलेली जनावरं टाकतात आणि त्यांच्या हाडांच्या सापळ्यांचे ढीग पडलेले असतात. हाडांचे तीन-चार मनोरे आणि त्याच्यावर गिधाडं खात बसलेली, असं एकदम डेंजर वातावरण होतं. आम्ही त्याच्यातून गाडी काढत होतो. काही वेळेस आम्ही खाली झोपूनही फोटो काढले, पण एकूणच फारच डेंजर प्रकार होता सगळा. तिथे खूप सुंदर वेगवेगळे पक्षी दिसले. पाकिस्तानमधून एक प्रकारचं कबूतर (पिवळ्या डोळ्याचं) येतं, तेही बघायला मिळालं.

19

एकूण आम्हाला सगळ्यांचे छान वेगवेगळ्या अँगलमधून फोटो मिळाले, त्यांचं वर्तन बघायला मिळालं आणि आम्ही दिवसभर तिथे थांबून संध्याकाळी परत ताल छापरला आलो.

तिसऱ्या दिवशी आमचा शेवटचा दिवस होता. त्या दिवशी आम्हाला काही स्पेसिफिक पक्षी बघायचे होते, त्याच्यातला एक म्हणजे स्पॉटेड क्रीपर, तो फक्त तिथेच आढळतो. तसंच लग्गार फाल्कन हासुद्धा बऱ्यापैकी तिथे रेसिडेंट आहे आणि आम्हाला डेझर्ट कॅटसुद्धा बघायची होती.

20

जवळ एक सॉल्ट लेक आहे, तिथे सकाळी आम्ही गेलो, खूप मस्त वातावरण होतं सगळीकडे. बर्फाचं सरोवर होतं की काय, असं वाटत होतं, पण ते मिठागर होतं. तिथे आम्ही काही प्रकारचे पक्षी बघितले. पुढे गेल्यावर आम्हाला खूप छान असा डेझर्ट फॉक्स बघायला मिळाला.

21

तिकडून येताना आम्हाला एक वेगळीच अशी रचना दिसली. एकदम वेगळं आर्किटेक्चर होतं, त्रिकोणी छप्पर होतं. आधी आम्हाला कळलंच नाही काय आहे ते. आमचा गाइड म्हणाला की हे खूप चांगलं स्मशान आहे आणि ते बघायला खूप लांबून लोक येतात. एकूण त्यांची कंडिशन आणि स्ट्रक्चर खूपच छान होतं, पण म्हटलं, हे नंतर बघू, आधी आपण आपला पक्षी बघायला जाऊ. तिथे गोशाळा म्हणून एक जागा आहे, जिथे गाईंना अभयदान दिलेलं आहे. खूप मोठ्या प्रमाणावर रिकामी चराऊ जमीन आहे आणि तिकडे काही स्पेसिफिक झाडं आहेत, त्या झाडांवरच स्पॉटेड क्रीपर हा पक्षी दिसतो. त्या पक्ष्याच्या शोधात आम्ही निघालो,

22

बऱ्यापैकी ऊन होतं. जवळपास दीड-दोन तास आम्ही शोधत होतो आणि तेवढ्यात गाइडने आम्हाला हाक मारली. तो म्हणाला की “या झाडाच्या मागे पक्षी आहे,” आम्ही पटापट धावत पळत तिकडे पोहोचलो आणि तो पक्षी तिथे बघायला मिळाला. त्याचे फोटो काढले आणि मग आम्ही तृप्त मनाने परत आलो.

23

आता आमचं नेक्स्ट टार्गेट होतं डेझर्ट कॅट म्हणजेच वाळवंटातली मांजर. आम्ही एका डेनपाशी जाऊन बघितलं, त्या घराच्या इथे आम्ही बराच वेळ गाडी लावून थांबलो, खूप वेळ झाला काहीच हालचाल दिसली नाही. मग आम्ही एका दुसऱ्या डेनकडे गेलो. तिथे जाऊन बराच वेळ थांबलो. आता संध्याकाळ होत आली होती. आमच्या या ट्रिपमधली शेवटची सफारी होती. सगळे एकदम कंटाळले होते. डोळे मिटून बसलो होतो.

अचानक मला जाग आली आणि कॅमेर्‍यातून बघितलं, तर एक छोटुसा चेहरा त्या घरातून डोकावला. सगळ्यांना पटापट तयार केलं आणि फोटो काढायला सुरुवात केली. फारच गोड दिसत होतं ते मांजरीचं पिल्लू, आधी थोडंसं डोकं बाहेर काढलं, मग थोडं आणखी बाहेर येऊन त्याने आम्हाला छान पोझेस दिल्या.

24

आम्ही तृप्त मनाने घरी आलो. गाइडने आमच्यासाठी खास वेगवेगळे स्वीट लाडू आणि भरपूर राजस्थानी पदार्थ आणले होते, कारण शेवटचा दिवस होता.

25

वेगवेगळे पक्षी, प्राणी बघितले, पदार्थ खाल्ले आणि वेगवेगळ्या लोकांशी गप्पा झाल्या.

26

संध्याकाळी मस्त वातावरण झालेलं, सनसेट एकदम सुंदर - अप्रतिम गुलाबी लाइट पडलेला आणि ते सगळं बघून तीन दिवसांच्या सफारीसाठी घेतलेलं कष्ट एकदम विसरून गेलो.

27

आम्ही तिथून निघालो पुढच्या ट्रिपच्या तयारीने...

28

श्रीगणेश लेखमाला

प्रतिक्रिया

सौंदाळा's picture

25 Sep 2023 - 12:13 pm | सौंदाळा

मस्तच
पशु-पक्षी आणि खाणे दोन्हीचे फोटो एका आड एक बघून चलबिचल झाली आहे.
डेझर्ट फोक्सचे फोटो नाही मिळाले का? (रच्याकने डेझर्ट फोक्स रोमेलचे टोपण नाव होते ना?)

डेझर्ट फोक्स रोमेलचे टोपण नाव होते ना?

हो 😀
शत्रुसैन्याकडुन ही आदरयुक्त बिरुदावली मिळवली होती ह्या नाझी जनरलने!

राजेंद्र मेहेंदळे's picture

25 Sep 2023 - 12:29 pm | राजेंद्र मेहेंदळे

सुंदर भटकंती आणि फोटो. फोटो एकदम कातील आले आहेत असे घिसेपीटे वाक्य वापरायचे जीवावर आले आहे. पण दुसरे सुचत नाहीये :)

विशेष करुन ४/९/११ आणि तो माउचा फोटो आवडला.

डेझर्ट फॉक्स -हा फोटो डकव ना.

स्वगत- जा सिमरन जीले अपनी जिंदगी :). मजा आहे बुवा एका माणसाची.

टर्मीनेटर's picture

25 Sep 2023 - 12:51 pm | टर्मीनेटर

सुरेख वर्णन आणि अप्रतिम फोटोज...
मजा आली वाचायला/बघायला 👍

कर्नलतपस्वी's picture

25 Sep 2023 - 1:07 pm | कर्नलतपस्वी

उतारवयात योगेश भौं यांना गुरू माऊली कडून पेर्णा घेऊन आम्हीं आमच्या बाल्कनी मधून प्रशिक्षणास एकलव्या सारखी सुरुवात केली आहे.

मुनिया

श्वेता२४'s picture

25 Sep 2023 - 1:12 pm | श्वेता२४

फोटो नेहमीप्रमाणेच एक से बढकर एक आहेत

कुमार१'s picture

25 Sep 2023 - 8:07 pm | कुमार१

. फोटो एकदम कातील आले आहेत

>>>> +१११

लेख छान आहे.
पण सरकारी अधिकारी कसा सरकारी संपत्तीचा दुरुपयोग करतात त्याचे ढळढळीत उदाहरण आणि निर्लज्ज समर्थन काही शोभनीय नाही. असो.
भारत का मागे पडतो ह्याचे अजुन एक कारण.

विजुभाऊ's picture

26 Sep 2023 - 11:44 am | विजुभाऊ

सहाव्या फोटोमधे जी भाजी आहे तीचे नाव केरसांग्री की सब्जी.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Sep 2023 - 12:50 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वर्णनाबरोबर सर्वच फोटो लंबर एक आले आहेत. आवडले. आता क्यामेरा आणि लेन्स तपशील पण सांगावे. धन्यवाद.

-दिलीप बिरुटे

चौथा कोनाडा's picture

26 Sep 2023 - 1:34 pm | चौथा कोनाडा

व्वा, सुंदर भटकंती वर्णन आणि अप्रतिम फोटो !

"गिद्ध संरक्षण क्षेत्र" वाचून मी लिहिलेल्या एका लेखातील बंगळूरू जवळील रामनगरा मध्ये असलेलं "गिधाड अभयारण्य" आठवलं :

https://www.misalpav.com/comment/1027369#comment-1027369

विवेकपटाईत's picture

26 Sep 2023 - 2:09 pm | विवेकपटाईत

फोटो आणि वर्णन दोन्ही मस्त.

कंजूस's picture

26 Sep 2023 - 6:09 pm | कंजूस

एकूण सुंदर मेजवानी.

सगळे फोटो आणि वर्णन आवडले‌.
छपरताल जागा आवडली.

-------
कर्नलांची मुनिया आवडली. आमच्या बाल्कनीत यांनी घर केलं आहे गुलाबांत.

प्रचेतस's picture

27 Sep 2023 - 6:28 am | प्रचेतस

अहाहा, काय एकापेक्षा एक सरस फोटोंआहेत आणि तितकंच बहारदार वर्णन. मजा आली.
एक भाजी केर सांगरी दिसतेय, एकदम मस्त लागले चवीला.
गिधाड आणि गरुडाचा एकत्र फोटो विशेष उल्लेखनीय. गिधाडे आधी अगदी पिंपरी चिंचवडला देखील दिसत पण इथून तर नामशेषच झालीत, मध्यंतरी नाशिकजवळ ब्रह्मगिरीच्या कडयांच्यांकपारीत गिधाडे होती, तिथंच त्यांचं सवंर्धन केंद्र करायचं पण चाललं होतं.

पुढच्या ट्रिपबद्दलही लवकर लिहा आणि आम्हाला मेजवानी द्या.

झकास फोटो... अन् मस्त वर्णन

वाह! अभयारण्ये छान आहेत.

पण काही स्पेसिफिक वेदनाशामक औषधांमुळे त्यांच्या पुनरुत्पादनाच्या मार्गात अडथळा निर्माण झाल्याने त्यांची नवीन पिढी जन्माला येत नाही आणि म्हणून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

हे माहित नव्हते.फारच भयानक आहे हे.आता 'गिधाड निसर्गाचा समतोल राखतो असं पुस्तकी वाक्य काहीच अर्थाचे नाही.'

सुधीर कांदळकर's picture

29 Sep 2023 - 1:12 pm | सुधीर कांदळकर

अप्रतिम फोतो आणि सुरेख वर्णन. लेख आवडला. धन्यवाद.

जुइ's picture

29 Sep 2023 - 9:17 pm | जुइ

अतिशय सुंदर प्रची आणि वर्णन. गिधाडांच्या अभय अरंण्याबाबत प्रथमच कळले.

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Sep 2023 - 7:45 pm | अमरेंद्र बाहुबली

छान छान फोटो नी त्या सोबत अभयारण्याचा सुंदर प्रवास घडवल्याबद्दल मिपाप्रेमी योगेश ह्यांचे माहीष्मती साम्राज्याकडून आभार.

आमोद's picture

15 Oct 2023 - 10:53 am | आमोद

आवड्ल

आमोद's picture

15 Oct 2023 - 11:51 am | आमोद

कॅमेरा कोणता ते कृपया सांगावे..