श्रीगणेश लेखमाला २०२३ - "मी धनंजय माने, आणि हा माझा बायको पार्वती"

टर्मीनेटर's picture
टर्मीनेटर in लेखमाला
23 Sep 2023 - 9:53 pm

एखाद्या झोपलेल्या मराठी माणसाच्या कानावर जरी हे शब्द पडले तरी त्याच्या चेहऱ्यावर हास्याचे भाव उमटतील आणि मनःचक्षूंसमोर 'अशी हि बनवा बनवी' ह्या चित्रपटातील 'धनंजय माने' नामक भाडेकरू त्याची नवीन घरमालकीण 'लीलाबाई काळभोर' ह्यांना आपली बायको 'पार्वती' ची ओळख करून देतानाचा प्रसंग उभा राहील ह्यात तिळमात्र शंका नाही!

२३ सप्टेंबर १९८८ रोजी प्रदर्शित झालेल्या आणि मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातले 'सोनेरी पान' असा लौकिक प्राप्त झालेलया 'अशी हि बनवा बनवी' ह्या चित्रपटाला आज दिनांक २३ सप्टेंबर २०२३ रोजी ३५ वर्षे पूर्ण झाली आहेत.

विश्वजीत आणि मेहमूदची प्रमुख भूमिका असलेल्या हृषीकेश मुखर्जींच्या 'बीवी और मकान' ह्या १९६६ सालच्या चित्रपटाचा रिमेक असलेला 'अशी हि बनवा बनवी' हा चित्रपट गेली साडेतीन दशके प्रेक्षकांना खळखळून हसवत आहे आणि पुढेही हसवत राहील ह्याविषयी विनोदी चित्रपट रसिकांच्यात दुमत नसावे. एखाद्या गाजलेल्या चित्रपटाचा अन्य भाषेत केला गेलेला रिमेक मूळ चित्रपटाप्रमाणे यशस्वी होईलच ह्याची कोणतीही खात्री नसते परंतु अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर, सुधीर जोशी अशा दिग्गज कलाकारांचा अफलातून अभिनय आणि त्यांची जबरदस्त संवादफेक, त्याला मिळालेली अन्य कलाकारांची उत्तम साथ, एक से एक भन्नाट संवाद आणि दमदार संगीताची जोड अशा सर्व गोष्टींच्या एकत्रित परिणामामुळे ह्या चित्रपटाला दणदणीत यश तर मिळालेच पण पुढे त्याचे तेलगु, कन्नड़, हिंदी, पंजाबी आणि बंगाली भाषेत रिमेकही झाले.

ह्या चित्रपटाची कथा, कलाकारांचा अभिनय, संवाद, संगीत, त्याची केलेली कित्येक पारायणे, सोशल मीडियावर त्यातल्या प्रसंग/संवादांचा वापर करून मोठ्या संख्येने तयार करण्यात येणारे आणि व्हायरल होणारे मिम्स ह्यावर गेल्या ३५ वर्षांत अनेकांनी समीक्षण / परीक्षण / रसग्रहणात्मक लेखन करून झालेले आहे. सदर लेखाचा उद्देश त्याच गोष्टींची पुनरावृत्ती करण्याचा नसून बनवा बनवीच्या पस्तिसाव्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत त्यातले निवडक संवाद आणि प्रसंगांच्या व्हिडीओ क्लिप्सच्या आधारे ह्या चित्रपटात आपल्या बहारदार अभिनयाच्या बळावर रंगत आणणारे 'विश्वास सरपोतदार' नामक घरमालकाची भूमिका साकारणारे दिवंगत अभिनेते स्व. सुधीर जोशी आणि परशुराम उर्फ 'परशा' व 'पार्वती' हे स्त्री पात्र अशा दोन भूमिका साकारून प्रेक्षकांची धमाल करमणूक करणारे दिवंगत अभिनेते स्व. लक्ष्मीकांत बेर्डे ह्या दोन महान कलाकारांना मानवंदना देण्याचा आहे!

चला तर मग आता सुरुवात करूयात अशोक सराफ, स्व. लक्ष्मीकांत बेर्डे आणि स्व. सुधीर जोशी ह्यांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळणाऱ्या ह्या धमाल विनोदी प्रसंगा पासून...

१) "धनंजय माने इथेच राहतात का? ठक ठक... "

धनंजय माने इथेच राहतात का?  ठक ठक...

सकाळी सकाळी घरमालक विश्वास सरपोतदारांनी दार ठोठावल्यावर त्यांच्या नकळत धनंजय मानेंसोबत राहाणाऱ्या परशाचं दरवाजामागे लपणं, मग हळूंच तिथून बाहेर पडणं आणि अचानक मालकांचं लक्ष त्याच्याकडे लक्ष गेल्यावर जणू काही आत्ताच आलाय अशा अविर्भावात दरवाजावर ठकठक करत "धनंजय माने इथेच राहतात का? ठक ठक... " असे विचारणे काय, चार कपबशा पाहिल्यावर त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आणि 'इस्रायलला जाणाऱ्या' परशुरामची ओळख करून देतानाच त्याची वीस रुपयांची निकड पूर्ण करण्यासाठी धनंजय मानेंनी केलेली थापेबाजी काय आणि सुधीर जोशींच्या क्षणाक्षणाला बदलणाऱ्या भावमुद्रा काय... सगळंच अफलातून!

२) "माने तुम्ही हरामखोर आहात हो!"

माने तुम्ही हरामखोर आहात हो

रात्री दारूच्या नशेत आपली खोली समजून मालकांच्या घरात शिरलेल्या धनंजय माने, सुधीर आणि परशाने विश्वासरावांना टकलू, कुत्रा म्हणत चापट्या, टपला मारत घातलेला गोंधळ अविस्मरणीय आहे 😀

३) "तुम्ही ते सत्तर रुपये माझ्या औषधासाठी घेतले होते, परत द्या... परत द्या! "

तुम्ही ते सत्तर रुपये माझ्या औषधासाठी घेतले होते, परत द्या...  परत द्या

रात्री दारू पिऊन ह्या त्रिकुटाने घातलेल्या गोंधळामुळे संतप्त झालेले विश्वासराव चार दिवसात खोली खाली करण्याचा इशारा द्यायला आले असताना पुन्हा परशाचे दरवाज्यामागे लपणे आणि बाहेर पडून दरवाजावर ठकठक करत "धनंजय माने इथेच राहतात का?" असे विचारणे, त्यावर भडकलेल्या मालकांनी त्याला शिव्या देत मारलेला फटका आणि इस्रायलहून डायबेटिसचे औषध आणण्यासाठी दिलेले 'सत्तर रुपये' परत मागणे वगैरे सगळंच मजेशीर 😀

४) "आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे"

आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे

धनंजय माने आणि कंपनी आज खोली सोडून जाणार म्हणून आनंदित झालेल्या विश्वासरावांनी "आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे" गाणे म्हणत त्यावर केलेला नाच आणि "हि पीडा गेल्यानंतर सगळं घर गोमूत्र शिंपडून स्वच्छ करून घ्या" , "तुम्हाला लग्नाचं आमंत्रण द्यायला तुम्ही आमचे कोण...काका कि मामा?" , "आमचे खण, नारळ आणि तांदूळ वर आलेले नाहीत" वगैरे संवाद असलेला हा धमाल प्रसंग 😂

५) "त्याच्याबरोबर तुम्ही दिलेले सत्तर रुपये सुद्धा वारले"

त्याच्याबरोबर तुम्ही दिलेले सत्तर रुपये सुद्धा वारले

खोली सोडून निघालेल्या धनंजय मानेंच्या मागे "मिस्टर माने निघालात कुठे..निघालात कुठे? डायबेटिसच्या औषधासाठी घेतलेले सत्तर रुपये टाका अगोदर" म्हणत फाटकापर्यंत आलेल्या विश्वासरावांना "काय झालं माहित्ये... मी तुम्हाला तो माझा मित्र म्हंटला होता ना, तो इस्त्रायल मधला मित्र... तो परवा अपघातात वारला हो! त्याच्याबरोबर तुम्ही दिलेले सत्तर रुपये सुद्धा वारले" हे धनंजय मानेंनी दिलेले भन्नाट उत्तर 😂

ह्या प्रसंगानंतर चित्रपटातली सुधीर जोशींची भूमिका संपली असली तरी पुढे 'पार्वती' बनलेल्या परशाने चित्रपटाचा संपूर्ण ताबा घेत हसवणुकीत अजिबात खंड पडू दिला नाही. एखाद्या 'कॅरॅक्टर मध्ये घुसणं' म्हणजे काय असतं ह्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणावे अशी 'पार्वतीची' भूमिका लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांनी साकारली आहे!

६) "मी धनंजय माने, आणि हा माझा बायको पार्वती"

मी धनंजय माने, आणि हा माझा बायको पार्वती

धनंजय माने आपल्या नवीन घरमालकीण 'लीलाबाई काळभोर' ह्यांना आपली बायको 'पार्वती' ची ओळख करून देतानाचा हा अजरामर प्रसंग 😂
हा संवाद म्हणताना अशोक सराफ ह्यांनी 'हि माझी बायको पार्वती' ऐवजी चुकून 'हा माझा बायको पार्वती' असे म्हंटले होते, पण ती चूक न सुधारता सचिन ह्यांनी तो संवाद मुद्दाम तसाच ठेवल्याचे कुठेतरी वाचले होते. खरे खोटे माहित नाही, पण त्यांच्या अपेक्षेप्रमाणे हा संवाद प्रचंड लोकप्रिय झाला!

७) "देवपूजा झाल्याशिवाय मी कोणाला शिवू देत नाही"

देवपूजा झाल्याशिवाय मी कोणाला शिवू देत नाही

"तुझं एक बरं आहे रे, तुझी बायको निदान दिसायला तरी बरी आहे. मला ह्या रानरेड्याशी संसार करावा लागणार आहे", "आणि मला गेंड्या बरोबर करावा लागणार तो..", "भाऊजी... तुम्ही सांगा ना नाव घ्यायला", "धनी... मी टाटा करायला आले होते","देवपूजा झाल्याशिवाय मी कोणाला शिवू देत नाही" असे संवाद असलेल्या ह्या प्रसंगात पार्वतीचा खट्याळपणा आणि नखरे बघायचे आणि मजा घ्यायची 😀

८) "तुझ्यासाठी निरंजन बाबांकडून प्रसादाचा आंबा आणायला सांगितला होता मी तानूला"

तुझ्यासाठी निरंजन बाबांकडून प्रसादाचा आंबा आणायला सांगितला होता मी तानूला

खोलीत विग मांडीवर ठेऊन विडी ओढत पडलेल्या पार्वतीची अचानक लीला मावशींनी दार ठोठावल्याने उडालेली तारांबळ आणि त्यांनी तिला मूल होण्यासाठी 'निरंजन बाबांकडून मागवलेला प्रसादाचा आंबा' खाताना तिच्या चेहऱ्यावरचे भाव बघण्याची मजाच न्यारी!

९) "नवऱ्यानं टाकलंय तिला..."

नवऱ्यानं टाकलंय तिला

बाटल्यांना लेबलं लावायचे काम मिळवण्यासाठी कारखान्यात आलेल्या पार्वतीची हि आपली शेजारी राहात असून' नवऱ्यानं टाकलंय तिला' अशी धनंजय मानेंनी व्यवस्थापकाला करून दिलेली ओळख आणि 'पुरुष प्रसाधनगृहात' शिरणाऱ्या पार्वतीला हटकणाऱ्या मुलीचा धमाल प्रसंग 😂

१०) "लहानपणी मी कोल्हापूरला असताना मुलांच्या बरोबर कुस्त्या खेळायची"

लहानपणी मी कोल्हापूरला असताना मुलांच्या बरोबर कुस्त्या खेळायची

लीला मावशींचा पुतण्या 'बळीशी' मारामारी केल्यावर त्यांना आपल्या लहानपणीचे किस्से सांगणारी 'पैलवान' पार्वती वहिनी 😀

११) "अगं बया बया बया बया... केवढी मोठी झाली गं तूं"

अगं बया बया बया बया... केवढी मोठी झाली गं तूं

छबुरावाचा तमाशा पुण्यात आल्याची बातमी वाचून आपली प्रेयसी कमळीला भेटायला पार्वतीच्या वेषात गेलेला परशा 😂

१२) "लाल धागा बिडी दे रे... जल्दी दे रे देखताए क्या रे... "

लाल धागा बिडी दे रे... जल्दी दे रे देखताए क्या रे

टपरीवाल्याकडे बिडी मागतानाच्या ह्या प्रसंगात ते ज्या आवाजात "लाल धागा बिडी दे रे... जल्दी दे रे देखताए क्या रे... " हे पहिले वाक्य म्हणतात तो आवाज चित्रपटातील परशाचाही नाही आणि पार्वतीचाही नाही. इथे लक्ष्मीकांत बेर्डेंनी आपल्या खास ठेवणीतल्या आवाजाचा वापर केला आहे.

माझ्या एका मित्राच्या वडिलांचे पूर्वी कुर्ल्याला वाईन शॉप होते आणि लक्ष्मीकांत बेर्डे त्यांच्या धाकट्या भावाचे वर्गमित्र असल्याने त्यांचे वैयक्तिक संबंध खूप चांगले होते. चित्रपटसृष्टीत यश मिळाल्यावरही त्यांनी रंगभूमीशी फारकत घेतली नव्हती त्यामुळे मुंबई बाहेर त्यांच्या नाटकाचे प्रयोग असतील त्यावेळी त्यांना परतायला रात्री बराच उशीर व्हायचा, कित्येकदा मध्यरात्र व्हायची तेव्हा मुंबईतले बार / वाईन शॉप्स बंद झालेले असायचे. अशा आडनिड्या वेळी त्यांना बिअर मिळण्याचे हक्काचे ठिकाण म्हणजे ह्या मित्राच्या वडिलांचे वाईन शॉप!

अनेकदा लक्ष्मीकांत बेर्डे नाटक मंडळींची बस घेऊन मध्यरात्री ह्या ठिकाणी येत असत. खाली दुकान वरती घर असे त्यांच्या एक मजली घराचे स्वरूप होते, खालून हाका मारून ते वरती घरात झोपलेल्या मंडळींना उठवून दुकान उघडायला लावत. झोपमोड झालेले मित्राचे वडील किंवा काका बाहेर व्हरांड्यात येऊन खालून हाका मारणाऱ्या लक्ष्मीकांत बेर्डेंकडे मुद्दाम त्रासिक दृष्टिक्षेप टाकत काही वेळ उभे रहात असत. मग आपल्या ह्या खास ठेवणीतल्या आवाजात लक्ष्मीकांत बेर्डे "एक क्रेट बिअर दे रे... लवकर दे रे, बघतो काय रे" असे त्यांच्यावर डाफरले कि मगच ते खाली येऊन दुकान उघडून त्यांची मागणी पूर्ण करत 😀

चित्रपटातला हा प्रसंग मला त्यात वापरलेल्या 'त्या' विशिष्ट टोन मुळे आधीही आवडत होताच पण हा किस्सा मित्राच्या वडिलांकडून कळल्यानंतर तो जास्तच आवडू लागला. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे हि महान कलावंत मंडळी आपल्या इम्प्रोवायजेशन साठी प्रसिद्ध आहेतच पण ते करताना कुठल्या गोष्टीचा वापर कुठे करायचा ह्याची त्यांना असलेली जाण किती विलक्षण आहे / होती हे अशा सध्यासुध्या गोष्टींतूनही जाणवते.
"लाल धागा बिडी दे रे... जल्दी दे रे देखताए क्या रे... " हे पहिले वाक्य वेगळ्या आवाजात उच्चारल्या नंतर लगेच पुन्हा पार्वतीचे बेअरिंग पकडत "बघतो बघ मेला कसा... बाई कधी बघितलीचं नाही मेल्यानं" म्हणत त्यांनी ह्या प्रसंगात रंगत आणली आहे.

१३) "डोहाळे लागलेत हो, डोहाळे... गेले दोन दिवस सारखी विड्याचं ओढत्ये"

डोहाळे लागलेत हो, डोहाळे

पलंगावर बसून मस्तपैकी विडी ओढत बसलेल्या पार्वतीला पाहून अचानक खोलीत आलेल्या लीला मावशी चक्रवतात त्यावेळी धनंजय माने "डोहाळे लागलेत हो, डोहाळे... गेले दोन दिवस सारखी विड्याचं ओढत्ये" असे सांगत सारवासारव करतात तो हा भन्नाट प्रसंग...

१४) "कुणीतरी येणारं येणारं गं"

कुणीतरी येणारं येणारं गं

श्रवणीयच नाही तर प्रेक्षणीय असे हे गाणे ह्या चित्रपटाचा 'कळसबिंदु' आहे असे म्हंटले तर वावगे नाही ठरणार! पार्वतीची भुमिका साकारताना लक्ष्मीकांत बेर्डेंनी तिच्या डोहाळजेवणाचा कार्यक्रम मनसोक्त एंजॉय केलाय हे चांगलंच जाणवतं आणि सुधाच्या भूमिकेत सचिन ह्यांनी कमाल नृत्य केले आहे.

१५) "जाऊ बाई... नका बाई इतक्यात जाऊ... "

जाऊ बाई... नका बाई इतक्यात जाऊ...

पार्वती आणि सुधा ह्या स्त्रिया नसून पुरुष आहेत हे बिंग फुटायच्या आधीच्या ह्या प्रसंगात प्रेक्षकांच्या सर्वात जास्त लक्षात राहिलेल्या संवादांपैकी "जाऊ बाई... नका बाई इतक्यात जाऊ..." आणि "गेल्या वाटतं... नाही अजून नाही... " हे दोन इथे पाहायला मिळतात.

ज्याच्याविषयी बोलताना 'सर्वात जास्ती पाहिला गेलेला मराठी चित्रपट' आणि 'असा एकही मराठी माणूस नसेल ज्याने हा चित्रपट पहिला नसेल' असे गौरवोद्गार काढले जाण्याचे भाग्य लाभलेला 'अशी हि बनवा बनवी' हा चित्रपट आपल्यापैकी सर्वांनीच पाहिला असणार आणि कित्येकांनी माझ्याप्रमाणे त्याची परायणेही केली असतील ह्यात मलातरी शंका नाही. 'अशी हि बनवा बनवी' हा केवळ चित्रपट नसून 'कल्ट' आहे असे म्हंटले जाते ते हि मला बरोबरच वाटते आणि ह्या कल्टची म्हणजेच पंथाची दीक्षा मलाही मिळाली असल्याने त्याच्या पस्तिसाव्या वर्धापनदिनी आमच्या ह्या पंथाच्या प्रचार आणि प्रसाराचे पुण्य पदरी पडावे म्हणून केलेला हा लेखनप्रपंच इथल्या अन्य 'दीक्षितांच्या' पसंतीस उतरेल अशी आशा बाळगतो.

सर्व मिपाकरांना गणेशोत्सव आणि मिपाच्या १७ व्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
जय हिंद! जय महाराष्ट्र!

तळटीप: सध्या काही तांत्रिक समस्येमुळे लेखात व्हिडीओ एम्बेड करण्यात अडचण येत असल्याने सर्व व्हिडीओ क्लिप्सच्या लिंक्स दिल्या आहेत तसेच रसिकांच्या सोयीसाठी 'वरील पंधरा व्हिडीओ क्लिप्स एम्बेड केलेल्या एका पानाचा बाह्य दुवा' देत आहे.

प्रतिक्रिया

रंगीला रतन's picture

23 Sep 2023 - 10:14 pm | रंगीला रतन

मी पयला. आता वाचतो :=)

श्वेता२४'s picture

23 Sep 2023 - 10:39 pm | श्वेता२४

आतापर्यंत कित्येक वेळा पाहिला तरीही पुन्हा पुन्हा पहावा वाटतो.

तुषार काळभोर's picture

24 Sep 2023 - 7:23 am | तुषार काळभोर

मीम्स, शॉर्ट्स, सीन्स सगळ्या बाबतीत हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पहिल्या तीन क्रमांकावर आहे. बाकी सगळे चारपासून पुढे!
हे सगळे डायलॉग्ज सगळ्या गप्पांमध्ये - घरात, मित्रांमध्ये, बसलेलो असताना, ऑफिसमध्ये - येतातच. सत्तर, लिंबू, इस्राएल, डोहाळे हे विषय बनवाबनवीच्या संदर्भानेच उल्लेख केले जातात.
अगदी मागच्या वर्षी नेत्यानाहू भारतात आले, तेव्हाही सत्तर रुपयाच्या मीम्सना उधाण आलं होतं!

अशी कल्ट मान्यता असलेले मराठी संवाद मोजकेच. पण अख्खा चित्रपट आणि त्यातील संवाद कल्ट बनण्याचा मान याचाच.

तुषार काळभोर's picture

24 Sep 2023 - 9:01 am | तुषार काळभोर

आमच्या आज्जी श्रीमती लीलाबाई काळभोर यांना भावपूर्ण आदरांजली!

मागच्या वर्षी नेत्यानाहू भारतात आले, तेव्हाही

+१
तसा ह्या चित्रपटातील प्रसंग आणि संवादांवर मिम्स येण्याचा मौसम वर्षभर सुरु असतो, पण काही विशिष्ट प्रसंगी त्यांना अक्षरशः उधाण येते 😂
नोटबंदीच्या वेळी ५०० आणि १००० च्या नोटा वारल्याचे मिम्स पण भारी होते...

कर्नलतपस्वी's picture

24 Sep 2023 - 8:16 am | कर्नलतपस्वी

काही कलाकृती सार्वकालिक असतात.

शेक्सपियर यांच्या काॅमेडी ऑफ एरर्स वरचा गुलजार यांनी दिग्दर्शित केलेला अंगुर हा चित्रपट देवेन वर्मा,मौसमी आणी संजीव कुमार. आणी वैभव मांगले,बबन कडू विशाखा सुभेदार या टिम चे एक डाव भटाचा, असेच सार्वकालिक भावतात.

कुमार१'s picture

24 Sep 2023 - 8:26 am | कुमार१

धमाल चित्रपटाचा अभ्यासपूर्ण व रंजक परिचय आवडला !

माझ्या मुलाला बनवाबनवी केवळ आवडतोच असं नाही, तर तो लिंबाच्या लोणच्याला लिंबाचं मटण म्हणतो! एकेका सीनवर एकेक लेख लिहिता येईल.

अवांतर - सचिनच्या बहुतेक चित्रपटातील उद्योगपतींचं नाव सरपोतदार असायचं. येथे उद्योगपती नाही, पण घरमालक विश्वासराव सरपोतदार होते.

हा अगदी कल्ट सिनेमाच ठरला. मराठीत असे सिनेमे कमीच. अजूनही सत्तर रुपये वारले किंवा धनंजय माने इथेच राहतात का? हे शब्दप्रयोग कुठून उद्भवले हे मध्यमवयीन लोकांना सांगावे लागत नाही. किंबहुना अशाच सामुदायिक संदर्भातून आपल्याला एकत्र असल्याचा खूप आधार मिळत असतो.

पुलंची अनेक वाक्ये अशीच आहेत. भले अनेक लोक त्यांना सामान्य, मध्यमवर्गीय लेखक म्हणून का हीन लेखेनात. कुठेतरी दुर्बोध काही दिसलं तर "तुम्ही इन ट्यून विथ द ट्यून वाचलं आहे की नाही?", असं कुठेही लिहा. प्रतिसादात "वाचलंय? ह्य ह्य ह्य, मीच लिहिलंय" असं उत्तर येतंच.

हिंदीत अंदाज अपना अपना हा असाच सिनेमा होऊन गेला. एक आख्खी पिढी अजून देखील "मैं तेजा हूं, मार्क इधर है" किंवा "मोगांबो का भतीजा क्राईम मास्टर गोगो" किंवा "ब्रेड का बादशाह, ऑमलेट का राजा, हमारा बजाज" हे सर्व सहज बोलते आणि लिहिते.

अशी ही बनवाबनवी हा चित्रपट आता नव्याने पाहू गेल्यास तो दर्जेदार वाटेल असे मुळीच नाही. खूप कालबाह्य आणि एकूणच त्रुटी जाणवतील. अगदी सुधीर जोशींचे काही संवाद देखील थोडे इतरांशी synch न होता बोललेले वाटतील. अनेक प्रसंग अगदीच ओढून ताणून आणलेले वाटतील पण त्या काळी या चित्रपटांच्या लाटेने मराठी सिनेमात कॉमेडीचं नवीन युग सुरू केलं होतं हे खरंच. त्याबद्दल सचिन आणि कोठारे या दोन निर्मिती गृहांचे आभार.

पुलंची अनेक वाक्ये अशीच आहेत. भले अनेक लोक त्यांना सामान्य, मध्यमवर्गीय लेखक म्हणून का हीन लेखेनात.

+१०००
एखाद्या गोष्टीचे आकलन होण्यासाठी ज्या प्रमाणे विशिष्ट/किमान आय.क्यु. असणे आवश्यक असते त्याच धर्तीवर पुलंच्या वाक्या वाक्यात दडलेला विनोद समजण्यास विशिष्ट/किमान एच.क्यु. (ह्युमर कोशंट) असणे आवश्यक असावे असे मला वाटते 😂 'असा मी असामी' आणि 'बटाट्याची चाळ' हे दोन्ही जवळ जवळ अगदी तोंडपाठ होण्याइतके वेळा वाचुन आणि ऐकुन झालंय, पण तरी त्यातली गोडी काही कमी होत नाही....

हिंदीत अंदाज अपना अपना हा असाच सिनेमा होऊन गेला.

क ह र सिनेमा आहे हा... आजतागायत कितीवेळा बघीतला असेल ह्याची मोजदात नाही. ह्यातले सर्वच प्रसंग आणि संवाद अजरामर आहेत 😀 घायल आणि दामिनी सारख्या अ‍ॅक्शन पॅक्ड चित्रपटांनंतर 'अंदाज अपना अपना' सारखा आउट अ‍ॅंड आउट कॉमेडी चित्रपट सादर करुन राजकुमार संतोषींनी त्यावेळी अनपेक्षीत धक्का दिला होता.

अशी ही बनवाबनवी हा चित्रपट आता नव्याने पाहू गेल्यास तो दर्जेदार वाटेल असे मुळीच नाही. खूप कालबाह्य आणि एकूणच त्रुटी जाणवतील.

खरं आहे! आता पहाताना त्यातले कित्येक तांत्रिक दोष प्रकर्षाने जाणवतात, पण ह्या विनोदी चित्रपटांच्या लाटेने (जवळपास सगळे कुठल्या ना कुठल्या हिंदी/इंग्रजी चित्रपटाचे रिमेक असले तरी) त्यावेळी खरंच मजा आणली होती, अन्यथा आमचे बालपण त्या रडक्या बायका आणि तमाशे बघण्यात वाया गेले असते 😂

वामन देशमुख's picture

24 Sep 2023 - 9:48 am | वामन देशमुख

लेख आवडला,
शक्य झाल्यास अजून असेच लेख येऊ द्या.

अमरेंद्र बाहुबली's picture

24 Sep 2023 - 9:53 am | अमरेंद्र बाहुबली

मोदींनी पुन्हा मेट्रोमार्गाचं ऊद्घाटन केल्यावर मी “सारखऱ सारखऱ त्याच मेट्रो मार्गाचं ऊद्घाटन काय?” असं मीम बनवलं होतं तेयाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता.
दुसरं मी ३ फेस पावर सप्लाय वर बनवलं होतं, तीन कपबश्या वोल्ट्स म्हणून होत्या, २२०,२२०, २२० नी विश्वासराव सरपोतदार विचारतात तूम्ही तिघे राहता ईथे मग ४४० वोल्ट्स कसे?

Bhakti's picture

24 Sep 2023 - 10:18 am | Bhakti

लहानपणीचे रविवारचे चार वाजले आहेत आणि खळखळून हसतेय असा भास 'अशी ही बनवाबनवी' सिनेमाचं नाव जरी घेतलं तरी होतो... निव्वळ निखळ आनंद म्हणजे हा चित्रपट⁠ ⁠♡

ज्ञानोबाचे पैजार's picture

24 Sep 2023 - 5:17 pm | ज्ञानोबाचे पैजार

बनवाबनवी रिमेक होता हे माहीत नव्हते, आज पर्यंत कितीतरी वेळा पाहिला असेल, प्रत्येक वेळी तेवढाच आवडतो
लेख मस्त झाला आहे पण थोडक्यात आटोपला आहे, सवड काढून विस्ताराने लिहा ही नम्र विनंती

पैजारबुवा,

ये है आम जिंदगी और ये है मेंटॉस लाईफ या जाहिरातींच्या मालिकेत हे "धनंजय माने इथेच राहतात का?" फिट्ट बसलं असतं.

चौथा कोनाडा's picture

24 Sep 2023 - 5:39 pm | चौथा कोनाडा

कल्ट सिनेमाचं एक नंबर रसग्रहण !

माझा अत्यंत आवडता धुमाकुळपट ! सगळ्यांचीच कामे भन्नाट झालीयत !
सर्वच गाणी सुपर्ब !
प्रत्येक सीन एकसे बढकर एक !
सर्व प्रकारची भट्टी जमलेला कल्ट पिक्चर !
जय "अशी ही बनवाबनवी"

सर्वात जास्ती पाहिला गेलेला मराठी चित्रपट' आणि 'असा एकही मराठी माणूस नसेल ज्याने हा चित्रपट पहिला नसेल'

हूं.

हा लेखनप्रपंच इथल्या अन्य 'दीक्षितांच्या' पसंतीस उतरेल अशी आशा बाळगतो.

हूं.

-----------
सुरेख लेखन प्रपंच. सुधीर जोशी मस्तच वाटायचे पुणेरी पुणेकर मालिकेत.
साडी नेसलेल्या पुरुष बायका मराठी प्रेक्षकांना आवडतात हे खरंच.

😀

>>>साडी नेसलेल्या पुरुष बायका मराठी प्रेक्षकांना आवडतात हे खरंच.

बालगंधर्व इफेक्ट

आंद्रे वडापाव's picture

25 Sep 2023 - 9:11 am | आंद्रे वडापाव

लेख छान !

अशोक सराफ ह्यांनी 'हि माझी बायको पार्वती' ऐवजी चुकून 'हा माझा बायको पार्वती' असे म्हंटले होते, पण ती चूक न सुधारता सचिन ह्यांनी तो संवाद मुद्दाम तसाच ठेवल्याचे कुठेतरी वाचले होते. खरे खोटे माहित नाही

"चुकून" नाही , तर मुद्दाम बाय डिझाईन , अशोक सराफ यांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर ... घेतलेली ऍडीशन होती ...

कारण पुढच्याच संवादात , "ही सुधा .. शंतनुचा बायको " असा उल्लेख आहे ...

आंद्रे वडापाव's picture

25 Sep 2023 - 9:14 am | आंद्रे वडापाव

लीला मावशींचा पुतण्या 'बळीशी' मारामारी केल्यावर त्यांना आपल्या लहानपणीचे किस्से सांगणारी 'पैलवान' पार्वती वहिनी

इतकी मर्द असशील पार्वती असं वाटलं नाही गं ! थांब तुझी द्रुष्ट काढते ...

सौंदाळा's picture

25 Sep 2023 - 11:11 am | सौंदाळा

भारीच
लिंबू कलरची साडी, लिंबाचे मटण, फाईलीत शिरलेले झुरळ आणि त्यावरुन अश्विनी भावेला घाबरवून अशोक सराफनी मारलेली मिठी - त्या दुकानतले सर्वच प्रसंग अफलातून आहेत.
'सारखे सारखे त्याच झाडाच्या मागे' हे तर कहर

प्रचेतस's picture

25 Sep 2023 - 11:28 am | प्रचेतस

धमाल आणलीत राव.
कहर आहे हा सिनेमा म्हणजे, कित्येकदा बघितला तरीही कंटाळाच येत नाही.
तुम्ही लेखात दिलेले सर्वच प्रसंग अगदी डोळ्यांसमोरुन गेले. लैच भारी.

मुक्त विहारि's picture

25 Sep 2023 - 6:05 pm | मुक्त विहारि

मस्तच

MipaPremiYogesh's picture

25 Sep 2023 - 7:38 pm | MipaPremiYogesh

हा हा.. हा... भन्नाट म्हणजे एकदम ७० रुपये वसूल सिनेमा आहे हा कितीही पारायणं केली तरी बघणं कमी होत नाही ..लेख मस्तच जमलाय..

वामन देशमुख's picture

25 Sep 2023 - 8:42 pm | वामन देशमुख

या धाग्यावरून गविंचा हा एक धागा आठवला -

निशाणा..तुला दिसला ना..?

चौथा कोनाडा's picture

26 Sep 2023 - 1:14 pm | चौथा कोनाडा

यातली अशोक सराफ अन अश्विनी भावे यांची लव्ह स्टोरी म्हणजे एक वेगळीच गुलाबी केमिस्ट्री आहे, लई ग्वॉड !

श्वेता व्यास's picture

26 Sep 2023 - 2:07 pm | श्वेता व्यास

वाह, सर्वकाळ आवडता आणि ताजा सिनेमा आणि तितकाच फर्मास लेख!

चांदणे संदीप's picture

26 Sep 2023 - 2:41 pm | चांदणे संदीप

धमाल सिनेमाविषयीचं धमाल लेखन. थोडक्यात पारायण झालंच.

अजून काही विनोद अ‍ॅडवायचे राहिलेत का?

आपल्या ऑफिसात झुरळं जरा कमीच आहेत...
ही साडी तुम्हाला छान दिसेल.
तुमचं प्रेम म्हणजे दमदार होतं... म्हणजे वरून दम... वगैरे.

सं - दी - प

आज पुन्हा एकदा बघणार. ह्या लेखाचा परिणाम!
"माझा पती करोडपती" येऊ द्या ह्यावर एक लेख.

तुषार काळभोर's picture

28 Sep 2023 - 10:33 pm | तुषार काळभोर

कल्ट दर्जा नसला तरी हा पिक्चर पण तुफान मनोरंजक आहे. पुन्हा एकदा अशोक सराफ. अनपेक्षितपणे सौ सचिन यांनी त्यांना तोडीस तोड साथ दिली आहे.
सौदामिनी, आधी कुंकू लाव!!

गवि's picture

28 Sep 2023 - 10:44 pm | गवि

पडदे शिवा..
पडदे शिवा तुम्ही पडदे शिवा तुमच्या खिडक्यांना छान छान, तुम्ही पडदे शिवा...
('परदेसिया'च्या चालीवर)
..
सर्वांची पाठ फिरताच अशा ओळी गात (एरवी दुःखी अभागी विधवा इ इ बेअरिंग घेतलेल्या) सुप्रिया यांचा बेडवर धिंगाणा नाच.

कटी पतंग यावर आधारित आहे का हा सिनेमा..?

सौदामिनी मात्र नक्कीच आशा पारेखची आठवण करून देते.

आंद्रे वडापाव's picture

29 Sep 2023 - 10:46 am | आंद्रे वडापाव

ती मला प्रेमाने बैलोबा म्हणायची, गध्या म्हणायची ..

पण आज ती मला रागानं काय म्हणाली माहितीये !

खुट्र्या ... खुतरा म्हणाली ...

पुन्हा एकदा अशोक सराफ. अनपेक्षितपणे सौ सचिन यांनी त्यांना तोडीस तोड साथ दिली आहे.

+१०००
श्री व सौ सचिन दोघेही मला कायम ओव्हर अ‍ॅक्टींगची दुकाने वाटत आली असली तरी एकाच वर्षी प्रदर्शित झालेले त्यांचे हे दोन्ही सिनेमे (माझा पती करोडपती - जानेवारी १९८८ आणि अशी हि बनवा बनवी सप्टेंबर १९८८) मात्र मला फार आवडले होते. अशोक सराफ ह्यांनी तर कमालच केली होती दोन्ही चित्रपटांत...

माझा पती करोडपती मधले काय ते एक एक संवाद 😂
"तुम्हाला बघून कोणीही बेशुद्ध पडेल... "
"अरे वा! काळ्या वाटाण्याचं सूप दिसतंय... "
"कुंकू लावलं नाही अजून? आधी कुंकू लाव, आधी कुंकू लाव... "
"गेलं दीड वर्ष माझा डावा हात प्लॅस्टरमध्ये होता, त्यामुळे डाव्या हातानी जेवण्याची माझी सवयच मोडल्ये... अजूनही माझं हे बोट एवढंच हलतंय, पहिल्यांदी एवढं हलायचं, आता एवढंच हलतंय... "
"मी म्हणतो लुकतुके, हे सहावं बोट तुम्ही आणलंत कुठून?"
"तुमच्यामुळं मी माझ्या प्रेयसीला गमावून बसलो 'यु गोबरगॅस' .... "
"डोन्ट कॉल मी कॅप्टन 'यु ओल्ड मॅन वॉटरगेट'... "

कहर सिनेमा होता हा पण...

'अशी हि बनवा बनवी' वर मनापासून प्रेम करणाऱ्या सर्व रसिक प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार 🙏

सविता००१'s picture

1 Oct 2023 - 12:11 pm | सविता००१

सगळ्यांनी लिहिल्याप्रमाणे मलाहि कहर आवडतो हा सिनेमा.
याची अजुन एक आठवण. माझीच. मी माहेरची सरपोतदार आहे. मराठी सिनेदिग्दर्शक विश्वास सरपोतदार हे माझे लांबचे - तेही चुलत काका.पण रहायला जवळ म्हणून छान संबंध. सचिन च्या सगळ्या सिनेमांमध्ये त्यांचं नाव यायचं. यात खडूस घरमालकाचं नाव विश्वास सरपोतदार. मी काकांना विचारलं, तुम्ही एकाच क्षेत्रात आहात. कितीतरी वेळा भेटता, तुम्हाला राग नाही येत? तेव्हा शाळेत होते मी. ते हसायलाच लागले. म्हणाले नावावर कॉपीराईट आहे की काय माझा? सचिन ना सरपोतदार आडनाव नक्की लाभी आहे. म्हणून असतं ते सिनेमात.
अर्थातच खरं खोटं माहित नाही. पण माझ्या आडनावामुळे एक सिनेमा यशस्वी होतो याचा भलताच अभिमान वाटला होता तेव्हा

सिरुसेरि's picture

2 Oct 2023 - 8:44 pm | सिरुसेरि

छान आठवणी . सचिन यांचे किंवा / यांनी दिग्दर्शीत केलेले अनेक चित्रपट खुप गाजले आहेत . मराठी प्रेक्षकांनाही ते खुप आवडले आहेत . ( अष्टविनायक , नवरी मिळे नव-याला , माझा पती करोडपती , आत्मविश्वास , गंमत जंमत , अशी हि बनवा बनवी , आयत्या घरात घरोबा , आयडीयाची कल्पना इत्यादी ) .

कलाकारांची अचुक निवड , मस्त संवाद यामुळे हे चित्रपट परत परत पाहावेसे वाटतात . या चित्रपटांमधील गाणीही खुप श्रवणीय आहेत . ( अलबेला आला जयराम आला , हि नवरी असली , मी आले निघाले , अरे मनमोहना , निशाणा तुला दिसला ना ) .

वरील चित्रपटांच्याही आधी सचिन यांनी दिग्दर्शीत केलेले २ चित्रपट खुप गाजले होते .

१. मायबाप - यामधे सचिन ने रिक्षा चालकाची भुमिका केली होती .

२. सव्वाशेर - या मधे अशोक सराफ यांनी सुष्ट आणी दुष्ट अशा दोन भुमिका साकारल्या होत्या. या चित्रपटाचा शेवट धक्कादायक आहे . हा चित्रपट मुळ संजीवकुमार यांच्या एका चित्रपटावर आधारीत आहे .

तुषार काळभोर's picture

2 Oct 2023 - 10:23 pm | तुषार काळभोर

सचिनच्या पिक्चर मधील गाणी ऐकली की अनिल - अरुण, अशोक पत्की, शांताराम नांदगावकर, सुबल सरकार हे नावे लगेच डोळ्यांसमोर येतात.

मायबाप - पिक्चर पाहिलेला नाही, पण प्यार एक रोग हे गाणं खूप वर्षांपासून आवडतं.

रीडर's picture

3 Oct 2023 - 12:18 am | रीडर

कितीही वेळा पाहिला तरी कंटाळा न येणारा चित्रपट...
अशोक सराफ, लक्ष्या, सुधीर जोशी कमाल..

बघितलंत, हे असे भामटे घरात शिरतात
तुम्ही असताना
काय??
घरात... घरात...
चोऱ्या करून निघून जातात
आता बघा महंजे झालं
मला माळी म्हणाला
माळी म्हणाल, तुमच्या तोंडावर माळी म्हणाला??
पुरे...
हां

जबरदस्त timing...

आम्ही वर्षातून एकदा तरी घरातील सगळे बसून हा सिनेमा पाहतो. कितीहीवेळा पाहिला तरी तेवढीच मजा येते बघताना. तुमचा लेख उत्तम.