श्रीगणेश लेखमाला २०२३ - हळूहळू सवय होईल - रिलोडेड

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in लेखमाला
20 Sep 2023 - 1:15 pm

तंत्रज्ञानाने जग इतकं छोटं झालंय की अंतर्देशीय व तार यंत्राच्या जमान्यातला मी स्काइप आणि कायप्पावर मुलीला प्रत्यक्ष बघताना अचंबित झालो होतो. अर्थात याचीही हळूहळू सवय होत गेली. आता सकाळ-संध्याकाळ मोबाइलवर बोलणं दररोजचा दिनक्रम झाला. आता तिचं नसणं आंगवळणी पडलं. पुढे शिक्षण झालं, मनासारखा साथीदार मिळाला. आता एफडीवरचं व्याज मिळण्याची वेळ आली आणि आमची परदेशी जाण्याची बारी आली.

पहिलटकरणीसारखी मन:स्थिती, काय होईल कसं होईल.. पण मुलांनी सूत्रं हाती घेतली आणी दे मेड इट पॉसिबल....
(अम्रीकेत जायचं म्हणजे थोडी प्रॅक्टिस नको!)

बाकी...

जाईन विचारीत रानफुला...

हे होतंच ना. सर्व काही व्यवस्थित पार पडलं.

पॅरिसला पोहोचल्यावर मात्र मन पुन्हा एकदा जोरात भूतकाळात गेलं. शम्मी कपूरच्या 'अ‍ॅन इव्हनिंग इन पॅरिस' या चित्रपटाची आठवण आली. बालगंधर्वच्या कट्ट्यावर चकाट्या पिटताना शम्मी, शर्मिला, प्राण, सिनेमातली गाणी, रोमान्स हे विषय जरूर चघळले जायचे. शर्मिलाचा झुबी झुबी झलेम्बू... हेलनच्या टक्करचा कॅब्रे.....

https://youtu.be/ruZXd7zrD1U?si=syzJa942aiyi8Nrp

हायला.. म्हातारपणी मन आसं भिरकटतयं बघा. मूळ विषय बाजूलाच राहतो.

असो, नवीन अनुभव, मुलांचं कौतुक आणि 'सोन्या'चं आगमन. पंख लावल्यासारखे दिवस उडून गेले. परत येताना मिश्र फिलिंग होतं. सहा महिने झाले होते.
____________________________>>>>>>

आमच्या परदेशवारीचा पहिला वाढदिवस आणि 'सोन्या'चासुद्धा. जायलाच हवं. पण या वेळेस मात्र वेगळंच वाटत होतं. पहिलटकरणीची हुरहुर, उत्सुकता नव्हती, तर किती पैसे लागतील, काय काय घेऊन जायचं याबद्दलची कुरकुर, धुसफुस होती. आणि यातूनच एका कवितेचा ञन्म झाला.

अहो, काय सांगू, एकटं जाता येत नाही....

एकटं जाता येत नाही, दोघांना जावं लागतं

सोपं नाही परदेशी जाणं, बॅक खातं खाली करावं लागतं

अंबावडी, बुंदीच्या लाडू (साठी!!!) सोबत 'लक्ष्मीनारायणा'ला जावं लागतं

शुगर फ्री बरोबर, गुडघ्याच्या मालिशकरता तेलसुद्धा न्यावं लागतं

एव्हढं मोठं ओझं घेऊन, सिक्युरिटीचं जंगल पार करावं लागतं

चल रे भोपळ्या टुणूक टुणूक.. म्हणत तासंतास पाय आखडून बसावं लागतं

इमिग्रेशनच्या दबावाखाली धडधड वाढते

कोरड्या पावाचे तुकडे चघळून पोट दुखाया लागते

काय बाईं!... तुमचं तर लईच्च भारी!!!,.
सारखी सारखी परदेशवारी.. कुजकं पाद्रं ऐकावं लागतं

पदरमोड करून शेजारणीसाठी काहीबाही आणावं लागतं

जाताना तरी जरा बरं, 'देखणे ते चेहरे प्राजळांचे' बघायचं सुख असतं

येताना मात्र गळ्यातले आवंढे अन् डोळ्यातलं पाणी बघा, काही केल्या खळतं नसतं
भरलेल्या ब्यागा अन् बरोबर रिकामं पाकीट असतं

अहो, काय सांगू, परदेशी जाणं वाटतं तितकं सोप नसतं..

वर्षातून एकदाच मुलांकडे जायचं म्हणजे मोठ्या गॅसवर दूध कसं उतू जातं, तसंच प्रेमहीण उतू जायला लागतं. मगं चितळे, लक्ष्मीनारायण, कल्याण भेळ.. सर्व काही जे पुण्यात प्रसिद्ध आहे आणि तिथेसुद्धा मिळतं, गोळा करण्यात दिवस जातात. जावईबापूंचा पोशाख, मग एवढ्या लांब जायचं एकच कसा, हासुद्धा त्यांना चांगला दिसेल.. मुलीने मागच्याच वेळेस दिलेली यादी पुन्हा अपडेट होते मग डी मार्ट, पीएनजी, चितळे इ.खेपा सुरू होतात.

मुलं लांब राहतात, सणवार होत नाहीत, मग एखादं सोन्याचं काहीतरी आणि आता सोन्यासुद्धा आलाय, जसा एफडीवरच्या व्याजावर इनकम टॅक्स, तसा. पहिला वाढदिवस, नाही म्हटलं तरी ग्रॅम-दोन ग्रॅमची चार-पाच वळी, एखादी पाच ग्रामची साखळी, काही पारंपरिक ड्रेस, तिकडे मुलांचे कपडे फार महाग हो, इथून पाच-सात घेऊन जाऊ. एवढंच, तरी गेला बाजार लाख-दीड लाखभर कुठं गेले नाहीत.

बाकी, दोघांचं विमानाचं भाडं व इतर खर्च मिळून दोन लाख.

म्हातारा-म्हातारीचे कपडे प्रत्येकी सहा किलो, बाकी ऐंशी किलो आवांतर. काॅमेंट कानी पडते.. मग, तिकिटावर प्रत्येकी सेहेचाळीस किलो ऑथराइज्ड आहे, एवढे पैसे दिलेत, वसूल नको करायला! (जास्त सामान नेल्यास पैसे कसे वसूल होतात? - एक न उलगडणारं कोडं.)

"अम्रिकेत पोहोचलो की जावईबापूच सर्व खर्च करत आहेत, तुम्हाला थोडा करायला काय हरकत आहे? जेवतोचं ना आपण पण.." इती..सौ.भुंगा कानात भुणभूणायला लागतो.

दिवस हळूहळू जातात.

जायची वेळ येते. इतके दिवस केलेली अवांतर खरेदी समेटायला सुरवात होते. घरातून निघताना, कायप्पावर आलेल्या 'काय कशी चाललीय अम्रिकेची वारी', आपुलकीने (खोटी खोटी?) विचारपूस करताना हळूच कानावर टाकलेल्या सामानाची यादी, अशी सर्व (डिमांड लिस्ट) बाहेर पडायला सुरुवात होते. शेवटचे काही दिवस बहुतेक काॅस्को, क्रोगर, आयक्या व तत्सम महा-दुकानात जातात. प्रथम नाॅन पेरिशेबल आणि नंतर पेरिशेबल सामान जमा व्हायला सुरुवात होते. अम्रिकेतून यायचम म्हणजे चॉकलेट्स अनिवार्य, आणि भरपूर क्वांटिटीमध्ये खरेदी केला जाणारा पदार्थ. कशाला? विचारलं की "सगळ्यांना द्यायला नको? आणि आल्यागेल्याच्या हातवर पण तर टेकवावा लागेल!" चॉकलेट्सचे हे सर्व ब्रँड भारतात उपलब्ध आहेत, अगदी फरेरो रोशेससुद्धा. पण अम्रिकेची चाॅकलेटं भारतात आल्यावर अधिकच चविष्ट लागत असावीत!

"हा ड्रेस छान आहे, सुमीला आवडेल, सुशीला छान दिसेल" (आता भारतापेक्षा अम्रिकेत कपडे स्वस्त मिळतात असा शोध लागलेला असतो.) असं करून भरपूर कपड्यांची खरेदी होते. शेजारच्या 'व्हिस्की'लासुद्धा (शेजारणीच्या कुत्र्याचं नाव) चघळण्याची हाडं घेतली जातात.

असं बघा, सबका साथ सबका विकास, सगळ्यांच्या आवडीनिवडी आठवतात. पुन्हा एकदा ऐंशी किलो कधी होतं, कळत नाही. (परत जायच्या आगोदरची खरेदी.) सूटकेसेस काठोकाठ भरून जातात. आता काठोकाठवरून आठवलं..

काठोकाठ भरू द्या पेला, फेस भराभर उसळू द्या!

प्राशन करिता रंग जगाचे क्षणोक्षणी ते बदलू द्या!

यांच्या सर्व खरेदीत, म्हातार्‍याला एक ड्युटी फ्री ठेवायलासुद्धा जागा राहत नाही. म्हटलं, तर उत्तर मिळतं, "आपल्या देशात काय दुष्काळ पडलाय का?" (चॉकलेट्सचा दुष्काळ आहे वाटतं), ( मनातल्या मनात) आता बोला, मित्रांना काय तोंड दाखवायचं!

जायच्या दोन दिवस आगोदर गोड बातमी येते - आऊचा काऊ कुणाचातरी चुलत मामे भाऊ एकशे वीस मार्क्स घेऊन शीईटी, निट्ट पास झालाय. आता कालेजात जाणार, लॅपटॉप अती आवश्यक आहे, तव्हां एक एप्पलचा लॅपटॉप आणा. हायला, जसं काही हडपसर मंडईतून शेपूची आणि करडईची जुडी आणा..

म्हातार - पैशे संपले, जमणार नाही.

म्हातारी - नेला नाही तर काय म्हणतील?

म्हातारा - अगं, पैसे संपलेत, कुठून घेऊ?

म्हातारी - तरी म्हटलं होतं, 'बाहेर पडलो तर चार पैसे लागतात, थोडे जास्त बरोबर असावेत.

(आता सांगा, चार पैशात कुठं लॅपटॉप येतो का?) (पुन्हा मनातल्या मनात.)

"दोन एफड्यापण मोडल्यान, आता आणखीन कुठून आणू?"

काकुळतीला आलेला अनुभवी म्हातारा सरतेशेवटी ब्रह्मास्त्र काढतो.

"आपण जावईबापूंकडून घ्यायचे का?"

संजीवनी बुटी लागू पडते.

"नाही हो, तिर्‍हाईतासाठी आपल्याच जावयाला कशाला तसदी?" वगैरे..गाडी अचानक गियर बदलते.

तुम्हीच काही तरी युक्ती काढा. सांगा इमिग्रेशन, एक्साइज.. आसंच काहीतरी.

तर मित्रांनो, (यात मैत्रिणीसुद्धा सामील आहेत) मला सांगा, परदेशवारी काय सोप्पी हाय व्हयं?

एक सेवानिवृत्त म्हातारा.

श्रीगणेश लेखमाला २०२२

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

20 Sep 2023 - 1:44 pm | कर्नलतपस्वी

हळूहळू सवय होईल हा लेख दिवाळी अंक २०२२मधे लिहीला होता त्याचा पुढील भाग

https://www.misalpav.com/node/50752

दूरवरून शांताबाईंचे शब्द आणि पं. वसंतरावांचे स्वर हवेवर तरंगत आले.
...पुन्हा एकदा डोळ्यांनी धीर सोडला.

"दाटून कंठ येतो, ओठात येई गाणे.."

होईल....

...हळूहळू सवय होईल...

-क्रमश:

दिवाळी अंकातील हळूहळू सवय होईल हे मुक्तक चार आकडी मिपाकरांनी वाचलं. प्रतीसाद मिळाले यावरून निष्कर्ष हा की आवडले असावे.

आता पुढे.....

माझा अनुभव अगदी ताजा नसला तरी खूप जुना नाही झालेला.
अगदी अस्साच आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

20 Sep 2023 - 3:31 pm | अमरेंद्र बाहुबली

मस्त लिहीलंय कर्नलसाहेब. परदेशवारी दिसते तेवढी सोपी नाही हे कळाले. लाखोंचा चुराडा, त्यात अख्खा इंडीया फिरून होईल.
पण असं तोंडाने लोक लॅपटाॅप कसा गिफ्ट मागतात? तो पण ॲपलचा? बापरे.

कुमार१'s picture

20 Sep 2023 - 5:09 pm | कुमार१

छान लिहिले आहे.

ज्ञानोबाचे पैजार's picture

20 Sep 2023 - 5:48 pm | ज्ञानोबाचे पैजार

ऍपल मागणाऱ्या कडे सरळ पैसे का नाही मागितले, मग तो म्हणाला असता इकडे भारतात स्वस्त मिळेल म्हणून

पैजारबुवा,

भारीच ! परदेशी गिफ्ट हक्काने मागवलेच जातात ;)
तुम्हीच काही तरी युक्ती काढा. सांगा इमिग्रेशन, एक्साइज.. आसंच काहीतरी.
समजली की सांगा!

कंजूस's picture

20 Sep 2023 - 7:16 pm | कंजूस

हौसेला मोल नाही.
करा मजा.

प्रचेतस's picture

20 Sep 2023 - 7:59 pm | प्रचेतस

मस्त एकदम.
येऊ द्यात अजूनही असेच परदेशवारीचे अनुभव.

शीर्षक ते शेवट संपूर्ण लेख फारच भारी झालाय. आपल्या व्यथा आणि कथा अत्यंत समर्पक शब्दात आणि संवादात वाचताना मजा आली..

कर्नलतपस्वी's picture

20 Sep 2023 - 8:02 pm | कर्नलतपस्वी

लॅपटॉप का मागवतात....

तर भारतात टॅक्स वाचेल.
विदेशातले सामान लई भारी असा खुळा समज.

आपल्या धोतरा पेक्षा दुसर्‍या च्या धोतरात जास्त सामान आहे असे नेहमीच वाटते.(पुर्वी सामाना करता पिशव्या नसायच्या,धोतराच्या सोग्यात छोटं मोठं सामान आणायचे. उगाच वाईट अर्थ काढू नये.)

मित्रांवर शानपत्ती.....

पण नुकसान किती....

आफ्टर सेल्स सेवा नाही.

खुदा न खास्था खराब निघाला किवां रंग,रूप, काया आवडली नाही तर आयुष्यभर ऐकावयास मिळणार ,पितृपक्षातही आठवण काढतील याची शक्यता नाकारता येत नाही.

EMI ऑप्शन आहे का विचारणा आणी पैसे कधी किती मिळतील या बद्दल धाकधूक.

मुंबईतल्या विमानतळ पार करणे हे धरमतरची
खाडी पार करण्या इतकेच कठीण.

लास्ट बट नाॅट लिस्ट, आणला म्हणून काय झालं,कुठून स्वता: उचलून आणलायं वगैरे मुक्ताफळे..

नको रे बाबा,म्हातारपणात एवढा लोड कशाला घ्यायचा.

प्रचेतस's picture

20 Sep 2023 - 8:15 pm | प्रचेतस

खरा दर्दी मात्र फक्त ड्युटीफ्रीच मागवतो. अगदी पैसे देऊन घ्यायची पण तयारी असते त्याची. कुणीतरी बाहेरून येत आहे असं कळताच लिटर्सची कॅल्क्युलेशन्स सुरू झालेली असतात :)

विजुभाऊ's picture

21 Sep 2023 - 3:12 pm | विजुभाऊ

पाईंटाचा मुद्दा काढलात बघा

हा प्रतिसाद लेखाइतकाच खुसखुशीत आणि मस्त..

एकीकडे भारताचे गुणगान करायच दुसरीकडे परदेशाकडे डोळे लावून बसायंच अशी मानसिकता असलेल्या ममवची ससेहोलपट

कर्नलतपस्वी's picture

21 Sep 2023 - 11:42 am | कर्नलतपस्वी

भारताचे गुणगान आणी परदेशवारी सुतराम संबंध नाही.

अहिरावण's picture

21 Sep 2023 - 2:34 pm | अहिरावण

खुलाशाबद्दल धन्यवाद !

राजेंद्र मेहेंदळे's picture

21 Sep 2023 - 11:18 am | राजेंद्र मेहेंदळे

वाक्यावाक्याशी सहमत.
अरे वा! अमेरिका वारी का? थोडी जागा असेल ब्यागेत तर आमच्या बंडीसाठी बेसनाचे लाडू घेउन जाता का? जास्त नाही.फार फार तर १ किलो होतील.
थोडे सामान पाठवायचे होते हो मन्यासाठी. बिचार्‍याला पाव खाउन दिवस काढावे लागतात, तिथे मिळत नाही ना आपल्यासारखे?
सूनबाईला पैठणी आणि संक्रांतीचे वाण पाठवायचे होते, घेउन जाता का जरा?

ईस्ट कोस्ट्/वेस्ट कोस्ट काही काही माहित नसताना(किवा माहित असून दुर्लक्ष करतात) लोक काय काय देत बसतात. आपणही भिडेपायी घेत राहतो. शेवटी १०-१५ किलो यातच खर्च होतात. जणु काय कुरियर असल्याची भावना होते अशावेळी. पुन्हा ईथे गॉसिप करताना-"कसले काय? ईतके छान पॅकिंग करुन पाठवले होते, तेही धड नेता आले नाही यांना. पोचले तेव्हा लाडू फुटलेले" हे पण बोलतात.

विजुभाऊ's picture

21 Sep 2023 - 3:15 pm | विजुभाऊ

एक तंबोरा , दोन लाल मातीचे माठ ( तिकडे मिळत नाहीत हो) , दोन मोठे फणस आणि तीन कलिंगडे ( आमच्या पनवेलकडची कलिंगडे म्हणजे ना.....) पाठवायचे आहे कोणालातरी .
सूड घ्यायचा आहे एकाचा....

राजेंद्र मेहेंदळे's picture

25 Sep 2023 - 12:18 pm | राजेंद्र मेहेंदळे

माझ्या बरोबर एका महाभागाने मसाला आहे असे सांगुन गायछाप ची पाकीटे पाठवली होती. बायकोला संशय आला म्हणुन उघडुन पाहीले आणि टाकुन दिली, नैतर गेलो असतो १२ च्या भावात.

MipaPremiYogesh's picture

21 Sep 2023 - 11:38 am | MipaPremiYogesh

वाह काका , जमलाय लेख ..एकदम बरोब्बर बोलला आहात बरं ते लॅपटॉप च काय झालं ..पुढील वेळी येतांना कॅमेरा घेऊन या मला :)

भागो's picture

21 Sep 2023 - 1:14 pm | भागो

कर्नल साहेब,
लेख अगदी फर्मास जमलाय. मला काही अनुभव नाही. पण अनेकांकडून ऐकले आहे.
तुमच्या पुढच्या परदेश यात्रेला शुभेच्छा. आता काळजी घ्या.

पर्णिका's picture

22 Sep 2023 - 11:16 pm | पर्णिका

फार आवडला लेख , कर्नल काका ! आई-वडिलांच्या दृष्टिकोनातून अमेरिका वारी अनुभवता आली.
दिवाळी अंकातील लेखाच्या लिंकसाठी धन्यवाद ... अजून वाचला नाही, निवांत वाचते लवकरच !

मुक्त विहारि's picture

23 Sep 2023 - 6:02 pm | मुक्त विहारि

हे कधीच डोक्यात आले नाही

मनसोक्त सामान आणायचो

रंगीला रतन's picture

23 Sep 2023 - 9:51 pm | रंगीला रतन

+२३०९२०२३
लेख आवडला.

लईच भारी लिहीलेत राव. थोड्याफार फरकाने सगळ्यांचे अनुभव असेच असतात, असे म्हणता येईल.
पूर्वी एकदोनदा अमेरिकेतून कोणतीतरी इलेक्ट्रॉनिक वस्तू आणण्याबद्दल फर्माईश झाल्यावर तुम्ही ऑनलाईन निवड/ ऑर्डर करून आमच्या अमेरिकेतल्या पत्त्यावर मागवा, आम्ही येताना ते घेऊन येऊ असे सांगितल्यावर काही उत्तरच आले नाही. आता अशा फर्माइशी येत नाहीत.
आणखी एक किस्सा म्हणजे मुलांची वापरात नसलेली जाकिटे, जीन्स, सुनेचे कपडे वगैरे "हे कॉलनीच्या चौकीदारासाठी नेऊ, बिचारा थंडीत कुडकुडत रात्रभर बसतो" "हे कामावल्या बाईच्या मुलीसाठी घेऊन जाऊ" अशा सौ. च्या आग्रहाखातर एक-दोन जड ब्यागा भारतात आणाव्या लागायच्या. त्या उचलल्याने मला महिनाभर कंबरदुखी व्हायची. शेवटी आता असे काहीही न्यायचे नाही असे निक्षून सांगितल्यावर तिला ते पटले (होते)
-- आता याच आठवड्यात भारतात परत यायचे असल्याने सौ.ने एक बॅग तसल्या सामानाने भरलीच आहे. राजहट्ट, स्त्रीहट्ट आणि बालहट्ट यापुढे सगळे शहाणपण व्यर्थ ठरते हेच खरे.

कर्नलतपस्वी's picture

25 Sep 2023 - 6:53 am | कर्नलतपस्वी

पूर्वी एकदोनदा अमेरिकेतून कोणतीतरी इलेक्ट्रॉनिक वस्तू आणण्याबद्दल फर्माईश झाल्यावर तुम्ही ऑनलाईन निवड/ ऑर्डर करून आमच्या अमेरिकेतल्या पत्त्यावर मागवा, आम्ही येताना ते घेऊन येऊ असे सांगितल्यावर काही उत्तरच आले नाही.

मला चाणाक्ष म्हणायचंय, मला का नाही सुचलं.....

कदाचित मी साधी माणसं या कॅटॅगरीत मोडत असेल.

टर्मीनेटर's picture

25 Sep 2023 - 12:10 pm | टर्मीनेटर

झकास लिहिलंय!

म्हातारपणी मन आसं भिरकटतयं बघा.

होता हैं... चलता हैं... दुनिया हैं 😀

बाकी लेखातले अनेक अनुभव घेतलेले असल्याने छान रिलेट होता आले. मजा आली वचायला 👍

श्वेता व्यास's picture

25 Sep 2023 - 2:33 pm | श्वेता व्यास

लेख आवडलाच, काहीबाही मागवायचे आणि पाठवायचे या प्रकारच्या लोकांपासून कशी सुटका करून घ्यायची याच्या युक्त्या शोधाव्या लागणार आता तुम्हाला :)

चौथा कोनाडा's picture

26 Sep 2023 - 1:25 pm | चौथा कोनाडा

मस्त डेंजर लेख ! दु:खावरची खपली काढणारा.

"जया नशिबी परदेश वारी, तया यातना कठीण" हेच खरे !

स्वराजित's picture

26 Sep 2023 - 3:35 pm | स्वराजित

काका खुप छान लेख.