भारताकडून व्हिएतनामला ‘कृपाण’ची भेट

पराग१२२६३'s picture
पराग१२२६३ in काथ्याकूट
11 Aug 2023 - 4:00 pm
गाभा: 

INS Kirpan

“आजचा हस्तांतर सोहळा भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील खोलवर रुजलेल्या मैत्रीचे आणि धोरणात्मक भागीदारीचे प्रतीक आहे. यातील आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारताने कोणत्याही मित्रदेशाला आपल्या नौदलातील पूर्ण-कार्यक्षम क्षेपणास्त्रवाहू नौका भेट म्हणून देण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे.” – नौदलप्रमुख ॲडमिरल आर. हरी कुमार.

भारतीय नौसेना पोत कृपाणची (INS Kirpan) भारतीय नौदलातून निवृत्ती आणि व्हिएतनाम पीपल्स नेव्हीमधील (Vietnam People’s Navy/VPN) सामिलीकरणाच्या समारंभाच्यावेळी नौदलप्रमुखांनी वरील वक्तव्य केलं होतं. 19 जून 2023 ला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय नौदलात कार्यरत असलेली एक क्षेपणास्त्रवाहू नौका व्हिएतनामला भेट म्हणून देण्याची घोषणा केली होती.

दहा दिवसांच्या प्रवासानंतर ‘कृपाण’ 8 जुलैला व्हिएतनामच्या काम रान्ह तळावर पोहोचली. तरीही ‘कृपाण’ अजूनही अधिकृतरित्या भारतीय नौदलाचाच भाग होती. त्यामुळं तिच्यावर अजूनही तिरंगा आणि भारतीय नौदलाचा ध्वज डौलानं फडकत होते. ‘कृपाण’ची भारतीय नौदलातून अधिकृत निवृत्ती आणि VPN मधील सामिलीकरणाचा समारंभ 22 जुलैला नौदलप्रमुख ॲडमिरल हरी कुमार यांच्या उपस्थितीत काम ऱ्हान इथं पार पडला. त्या समारंभाला VPN चे उपकमांडर-इन-चीफ आणि चीफ ऑफ स्टाफ, रिअर ॲडमिरल फाम मान्ह हुंग उपस्थित होते.

समारंभाच्या दिवशी ‘कृपाण’ नाविक परंपरेनुसार विविध ध्वजांनी सजलेली होती. सुर्यास्ताला रिट्रीटच्या धुनवर ‘कृपाण’वरचा राष्ट्रध्वज, नौदलाचा ध्वज सन्मानानं उतरवण्यात आला. त्यानंतर दोन्ही देशांच्या नौदलांमध्ये युद्धनौका हस्तांतरासंबंधीच्या कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या झाल्यावर ‘कृपाण’वर व्हिएतनामी नौदलाचा ध्वज फडकवण्यात आला.

‘कृपाण’ भारतीय नौदलाच्या पूर्व ताफ्याचा (Eastern Fleet) अविभाज्य भाग होती. गेल्या 32 वर्षांत अनेक मोहिमांमध्ये तिनं भाग घेतला होता. 90 मीटर लांब आणि 10.45 मीटर रुंदीच्या या नौकेवर सुमारे 12 अधिकारी आणि 100 खलाशी असत. तिचं जास्तीत जास्त विस्थापन 1450 टन आहे. ही नौका संपूर्ण शस्त्रास्त्रांसह व्हिएतनाम पीपल्स नेव्हीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. ‘कृपाण’ स्वदेशी बनावटीची खुकरी वर्गातील तिसरी क्षेपणास्त्रवाहू नौका होती. भारतीय नौदलात असताना या नौकेनं विविध व्यूहात्मक आणि मानवतावादी मोहिमांमध्ये भाग घेतला होता.

भारतीय नौदलाच्या मते, व्हिएतनाम पीपल्स नेव्हीकडे ‘कृपाण’चं हस्तांतरण हे भारतीय नौदलाच्या हिंद महासागर क्षेत्रातील ‘प्राधान्य सुरक्षा भागीदार’ (Preferred Security partner) होण्याच्या स्थितीचे प्रतीक आहे. त्यामुळे ‘कृपाण’ची भेट दोन्ही नौदलांमधील विद्यमान द्विपक्षीय संबंध वाढवण्यासाठी निश्चितच लाभदायक ठरेल. सागरी क्षेत्रामध्ये, भारतीय आणि व्हिएतनामी नौदलं वारंवार मोहिमाविषयक परस्परसंवाद, संरचित नियमित संवाद आणि माहितीची देवाणघेवाण यंत्रणा याद्वारे एकमेकांच्या संपर्कात असतात. नौदल ते नौदल सहकार्यामध्ये क्षमता वाढवण्याच्या उद्देशाने अनेक उपक्रमांचा समावेश आहे, ज्यामध्ये सुटे सामानांचा पुरवठा, जहाजांची दुरुस्ती, प्रशिक्षकांची प्रतिनियुक्ती, नौदल जहाजे आणि शिष्टमंडळांच्या नियमित सदिच्छा भेटी यांचा समावेश आहे.

भारतीय नौदलानं असेंही म्हटलं आहे की, व्हिएतनाम पीपल्स नेव्हीकडे ‘कृपाण’चे हस्तांतरण, हे समविचारी भागीदारांची क्षमता वाढवण्यासाठी मदत करण्याची भारताची वचनबद्धता दर्शवते. आयएनएस कृपाणचे व्हिएतनामला हस्तांतर भारताच्या ‘क्षेत्रातील सर्वांसाठी सुरक्षा आणि विकास (SAGAR)’ या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे.

भारत आणि व्हिएतनाम यांच्यात ऐतिहासिक संबंध आहेत. नवी दिल्ली आणि हानोई यांच्यातील विद्यमान संबंध मजबूत, बहुआयामी, सांस्कृतिक आणि आर्थिक पायांवर उभे आहेत. सप्टेंबर 2016 मध्ये दोन्ही देशांमधील संबंध धोरणात्मक भागीदारीवरून सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीमध्ये विस्तारित करण्यात आले आहेत. हे संबंध संरक्षण क्षेत्रात सहकार्य, परस्पर धोरणात्मक हितसंबंधांवर आधारित आहेत. प्रादेशिक स्थिरतेसाठी सामायिक दृष्टिकोन आणि नियमांवर आधारित आंतरराष्ट्रीय सुव्यवस्था राखणे हे दोन्ही देशांचं लक्ष्य आहे. नोव्हेंबर 2009 मध्ये दोन्ही देशांनी संरक्षण सहकार्यावर सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्यानंतर, गेल्या दशकात द्वीपक्षीय संबंध वाढले आहेत. जून 2022 मध्ये, दोन्ही संरक्षण मंत्र्यांनी 2030 च्या दिशेने भारत-व्हिएतनाम संरक्षण भागीदारीवरील संयुक्त व्हिजन स्टेटमेंटवरही स्वाक्षरी केली आहे.

लिन्क
https://avateebhavatee.blogspot.com/2023/08/blog-post.html

प्रतिक्रिया

सौंदाळा's picture

11 Aug 2023 - 5:21 pm | सौंदाळा

छान माहिती.
भारताने हिंदी महासागरावर प्राबल्य ठेवायच्या दृष्टीने चांगली घटना.

सुरिया's picture

11 Aug 2023 - 8:52 pm | सुरिया

मस्त.
वियेतनाम म्हणजे अम्रिकेला गुरिल्ला वॉर खेळून दमवलेला ना देश.
भारी. भौगोलिक स्थान आणि त्यांचा विजिगिषु इतिहास बघता छान खेळी.

वियेतनाम म्हणजे अम्रिकेला गुरिल्ला वॉर खेळून दमवलेला देश अशी जरी त्यांची ओळख असली तरी भारताची ही खेळी चीन विरोधात मित्र तयार करणे ह्या हेतूने असावी. चीन आणी वियेतनाम मधे जवळपास एक दशकाचा युद्धाचा इतिहास होता. आता जरी समेट झाला असला तरी ताणतणाव आहेच. चीन आणि पाकिस्तान हे दोन्ही देश म्हणजे जगाच्या नकाशावरील "असून अडचण नसून खो़ळंबा" पद्धतीचे आहेत.

निनाद's picture

17 Aug 2023 - 9:29 am | निनाद

२०१६ पासून दोन्ही देशांची धोरणात्मक भागीदारी आहे. गेल्या वर्षीपासून झालेल्या लष्करी लॉजिस्टिक करारा पासून अशा गोस्टींना गती मिळाली आहे.
या करारानुसार भारत आणि व्हेतनामचे सैन्य एकमेकांच्या तळांचा वापर दुरुस्ती आणि पुरवठ्यासाठी करू शकतील. यामुळे युद्धनौका, लष्करी विमाने आणि कर्मचारी एकमेकांच्या किनाऱ्यावर येऊ जाऊ शकतील. भारताने गेल्या जूनमध्ये व्हिएतनामला १२ हाय-स्पीड गार्ड बोटी देखील दिल्या आहेत.

भारतीय लष्करी प्रशिक्षण संस्थांमध्ये ६० जागा व्हिएतनामसाठी राखीव आहेत. व्हिएतनामच्या विनंतीनंतर ही संख्या लवकरच वाढण्याची शक्यता आहे. भारताने व्हीपीएन खलाशांना त्याच्या सहा किलो-श्रेणीच्या पाणबुड्या चालवण्यासाठी प्रशिक्षित केले आहे आणि व्हिएतनामच्या Su-30 च्या ताफ्यासाठी वैमानिकांनाही प्रशिक्षण दिले आहे.

व्हिएतनामसोबत संरक्षण सहकार्य वाढवणे हा भारत-प्रशांत महासागर प्रदेशात स्थिरता राखण्यासाठी प्रयत्नांचा एक भाग आहे. गेल्या काही महिन्यात, चीनी सर्वेक्षण जहाज आणि कोस्ट गार्ड जहाज व्हिएतनामच्या सागरी हद्दीत घुसून ठाण मांदून बसले होते. व्हिएतनामने ही जहाजे मागे घेण्याचे आवाहन केले होते पण त्याला चीन ने प्रतिसाद दिला नव्हता. जवळपास महिनाभर ऑपरेशन करून ते निघून गेले. कोणताही देश बीजिंगच्या विरोधात एकट्याने स्वतःचा बचाव करू शकत नाही.
अशा काळात भारताने व्हिएतनामला मदत देणे महत्त्वाचे आहे.

व्हिएतनामची सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी असलेल्या तीन देशांपैकी भारत एक आहे, पण इतर दोन देश रशिया आणि चीन आहेत. त्यामुळे हे असे व्य्वहार व्हिएतनाम ला आपल्या बाजूला खेचण्यासाठी आवश्यक आहेत.