NHI च्या अस्तित्त्वाचा खल करण्यासाठी आपण सहा पातळ्यांचे एक फ्रेमवर्क मांडले आहे. मी पूर्वीच सांगितल्या प्रमाणे या पातळ्या चढत्या भाजणीने अविश्वसनीय होत जातात. मी या पातळ्यांची माझ्या सोयीसाठी तीन विभागात विभागणी करतो.
.
.
१. उठकळ : जागे होण्यास प्रवृत्त करणारी, विदाबहुल पातळी. उठकळ हा शब्द दाते-कर्वे मधून घेतला आहे.
२. अटकळ: स्पेक्यूलेटिव्ह, अंदाजपंची परंतु साधार किंवा संदिग्ध अशी पातळी.
३. पोकळ: कायच्या काय दावे करणारी पातळी. सर्व अफाट थेऱ्या सामावून घेणारी ‘वूssssss’ छाप पातळी.
.
.
तर त्या पातळ्या पुन्हा मांडू आणि कोणता भाग कोणत्या पातळीसाठी आहे याचेही कोष्टक मांडू. हा भाग कोणत्या पातळीसाठी आहे हेही नीट पाहू.
०. विश्वात आपण (म्हणजे पृथ्वीवासीय प्रगत जीव) एकटेच नाही आहोत. [उठकळ, भाग १]
१. अनोळखी उडत्या वस्तू (UFO) किंवा अनोळखी विसंगत घटित (Unidentified Anomalous Phenomenon म्हणजेच UAP) अस्तित्वात असून मानवी आकलनापलीकडे आचरण करतात. [उठकळ, भाग १, २]
२. अमेरिकन सरकार कडे पडलेल्या किंवा पाडलेल्या UAP आहेत. (कदाचित ते चालविणाऱ्या जीवांचे मृतदेह देखील असावेत) [उठकळ, भाग २, ३]
३. UFO पुराणातल्या बऱ्याच दंतकथा खऱ्या असू शकतात. [अटकळ : भाग ४]
४. अमानवी प्रगत जीव आणि मानव यांच्यात संवाद आहे. [अटकळ : भाग ५]
५. आकाशगंगेचे किंवा त्याहून मोठ्या वैश्वीक भागाचे फेडरेशन आहे. [पोकळ : भाग ६]
.
आपण दुसर्या पातळीकडे सविस्तर वळू.
.
२. अमेरिकन सरकार कडे पडलेल्या किंवा पाडलेल्या UAP आहेत. (कदाचित ते चालविणाऱ्या जीवांचे मृतदेह देखील असावेत)
.
आपण गेल्या काही ८० वर्षांत घडलेल्या काही प्रमुख घटना आधी मांडू. पुन्हा एकदा : विदा आधी निष्कर्ष निवांत.
.
.
8 जुलै, 1947: रोझवेल घटना - रोझवेल, न्यू मेक्सिको इथे एका शेतावर एक अज्ञात वस्तू कोसळली. यू.एस. सैन्याने त्या वस्तूचा ताबा घेतला. अगदी सुरुवातीला त्यांनी घोषणा केली की ती एक "फ्लाइंग डिस्क" होती. परंतु काही दिवसातच ते स्पष्टीकरण बदलून ती वस्तू हवामान बलून आहे असे जाहीर केले. रोज्वेल आजही चर्चिली जाणारी सर्वात लोकप्रिय आयकॉनिक घटना आहे.
.
.
1940 ते 1950 च्या दशकाच्या उत्तरार्धापर्यंत: यूएफओ साईटिंग सर्ज - दुसऱ्या महायुद्धानंतर, जगभरात यूएफओ पाहण्यात वाढ झाली. विविध देशांतून अनेक अहवाल आले, अनेक घटनांची नोंद झाली. विस्तारभयास्तव खोलात जाणे टाळतो.
.
.
1952: वॉशिंग्टन, डी.सी. यूएफओ फ्लॅप - वॉशिंग्टन, डी.सी येथे वर रडारवर अनेक यूएफओ ट्रॅक केले गेले, या घटनेला वॉशिंग्टन, डी.सी. यूएफओ फ्लॅप म्हणून ओळखले जाते. युएफओ अगदी व्हाईट हाऊस वरती फिरल्या.
.
.
1954: गोरमन डॉगफाइट - यूएस वायुसेनेचा पायलट, लेफ्टनंट जॉर्ज गोरमन, फार्गो, नॉर्थ डकोटा, यूएसए येथे यूएफओशी डॉगफाइटमध्ये गुंतला. घट्नेचे एक काल्पनिक चित्रिकरण.
.
.
1957: लेव्हलँड यूएफओ केस - लेव्हलँड, टेक्सास, यूएसए मधील अनेक साक्षीदारांनी अज्ञात वस्तू पाहिल्याचा दावा केला. त्यात काही सरकारी अधिकारीही होते.
.
.
1966: मिशिगन यूएफओ साइटिंग्ज.
.
.
1967: शॅग हार्बर घटना - नोव्हा स्कॉटिया, कॅनडात, एक UFO शॅग हार्बरच्या पाण्यात कोसळल्याची नोंद झाली. या घटनेची तपासणी आजही सुरु आहे.
.
.
1973: Pascagoula अपहरण - अमेरिकेतील मिसिसिपीमधील पासकागुला येथील दोन मच्छिमारांनी मासेमारी करताना एलियन्सनी अपहरण केल्याचा दावा केला. तिथल्या पोलिसांनी दोघांना एका खोलीत डांबले. त्यांना कळू न देता त्यांचे नैसर्गिक संभाषण रेकॉर्ड केले. हे संभाषण त्या दोघांच्या अनुभवाची सत्यता मांडायला पुरेसे असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. त्या संभाषणाचा संपूर्ण मसुदा इथे.
.
.
1976: तेहरान - इराणी हवाई दलाच्या जेट विमानांची तेहरान, इराणवर यूएफओशी झटापट झाली.
.
.
1980: रेंडलशॅम फॉरेस्ट घटना - इंग्लंडमधील RAF बेंटवॉटर्स येथे तैनात असलेल्या अनेक यूएस लष्करी कर्मचाऱ्यांनी रेंडलशॅम फॉरेस्टमध्ये यूएफओशी चकमकी झाल्याचा अहवाल दिला, ज्याला ब्रिटनचे रोसवेल म्हणून संबोधले जाते.
.
.
1997: फिनिक्स लाइट्स - अॅरिझोना, यूएसए मधील हजारो साक्षीदारांनी आकाशात दिवे असलेली मोठ्या व्ही-आकाराची वस्तू पहिल्याच्या तक्रारी दिल्या.
.
.
1999: बेल्जियन यूएफओ वेव्ह - बेल्जियममध्ये शेकडो लोकांनी यूएफओ पाहिल्याच्या नोंदी केल्या. ज्यात पोलीस अधिकारी आणि लष्करी कर्मचारीही आहेत. अनेकांनी मोठ्या, त्रिकोणी-आकाराच्या वस्तूंचे वर्णन केले आहे.
.
.
2004: यूएसएस निमित्झ घटना - यूएसएस निमित्झ या विमानवाहू युद्धनौकेवर एका प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान अज्ञात उडणाऱ्या वस्तूंचा सामना अनेक पायलट करतात. अत्यंत असामान्य उड्डाण वैशिष्ट्ये प्रदर्शित करणार्या टिक-टॅक-आकाराच्या वस्तू पाहिल्याचा अहवाल पायलट देतात.
.
.
2006: ओ'हारे आंतरराष्ट्रीय विमानतळ - युनायटेड एअरलाइन्सच्या कर्मचार्यांसह अनेक साक्षीदारांनी, शिकागोच्या आंतरराष्ट्रीय विमानतळ, यूएसए वर घिरट्या घालत असलेली धातूच्या डिस्कच्या आकाराची वस्तू नोंदवली. या व्हिडिओत वस्तू काल्पनिक आहे, ऑडिओ मात्र मूळचा उचलला आहे.
.
.
मार्च 2009: यूएसएस ओमाहा घटना - यूएसएस ओमाहा या युद्धनौकेवर समुद्रात गायब होणाऱ्या वस्तूंचे निरीक्षण केले गेले. यापैकी एक व्हिडीओ जाहीर केला गेला आहे.
.
.
2011: जेरुसलेम यूएफओ घटना - जेरुसलेम, इस्रायलमधील डोम ऑफ द रॉकवर यूएफओ पाहिल्याची घटना अनेक लोकांनी नोंदवली आहे. त्या घटनेचा चार वेगवेगळ्या लोकेशनवरून लोकांनी घेतलेले व्हिडीओ इथे पाहता येईल. हा व्हिडिओ चार वेगळ्या वेगळ्या व्हिडिओंचा आहे. ते वेळेनुसार एकत्र केलेले आहेत. हा जबरदस्त व्हिडिओ मला खूप आवडतो. या व्हिडिओचे खंडन करून पाहा.
.
.
2014-2015: चिली नौदलाचा UFO व्हिडिओ - चिलीच्या नौदलाने चिलीच्या किनार्यावरील समुद्रावर UFO उडताना दाखवणारा व्हिडिओ प्रसिद्ध केला.
.
.
16 डिसेंबर 2017: द न्यूयॉर्क टाइम्सने हेलेन कूपर, राल्फ ब्लुमेंथल आणि लेस्ली कीन यांचा "ग्लोइंग ऑरास अँड 'ब्लॅक मनी': पेंटॅगॉनचा गुप्त UFO कार्यक्रम" या शीर्षकाचा लेख प्रकाशित केला. लेख एका प्रगत 'एरोस्पेस थ्रेट आयडेंटिफिकेशन प्रोग्राम (एएटीआयपी)' चे अस्तित्व उघड करतो. UFO दृश्यांची तपासणी करणारा हा एक गुप्त पेंटागॉन प्रोग्राम होता.
.
.
16 डिसेंबर 2017: लेखासोबतच, न्यूयॉर्क टाइम्सने यू.एस. नेव्ही वैमानिकांनी रेकॉर्ड केलेले दोन व्हिडिओ जाहीर केले. हे व्हिडीओ प्रशिक्षण मोहिमेदरम्यान घडलेल्या UAP आहेत. व्हिडिओ पूर्वी बंदिस्त (classified ) होते परंतु नंतर सार्वजनिक प्रकाशनासाठी जाहीर केले गेले.
.
.
9 मार्च, 2018: न्यूयॉर्क टाइम्सने "Flir1" नावाचा UFO चकमकीचा तिसरा व्हिडिओ रिलीज केला, ज्यामध्ये यूएस नेव्ही वैमानिक एका अज्ञात वस्तूचा मागोवा घेत असल्याचे दाखवले आहे.
.
.
मे 26, 2019: द न्यूयॉर्क टाइम्सने हेलेन कूपर, राल्फ ब्लुमेन्थल आणि लेस्ली कीन यांचा "'वाउ, व्हॉट इज दॅट?’: नेव्ही पायलट्स रिपोर्ट अनएक्सप्लेन्ड फ्लाइंग ऑब्जेक्ट्स" शीर्षकाचा दुसरा लेख प्रकाशित केला. लेखात यूएस नेव्ही वैमानिक आणि अज्ञात हवाई घटनांमधील अतिरिक्त चकमकींची चर्चा केली आहे आणि अशा घटनांची तक्रार नोंदवण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे विकसित करण्यासाठी नौदलाने केलेल्या प्रयत्नाचा आढावा घेतला आहे.
.
.
18 सप्टेंबर 2019: यू.एस. नेव्हीने न्यूयॉर्क टाईम्सने जाहीर केलेल्या व्हिडिओंच्या सत्यतेची खातरजमा केली आणि व्हिडिओमध्ये चित्रित केलेल्या चकमकी अजूनही "अज्ञात" राहिल्याचा दावा केला.
.
.
एप्रिल 27, 2020: पेंटागॉनने औपचारिकपणे यूएस नेव्ही वैमानिकांनी कॅप्चर केलेले तीन UFO व्हिडिओ जाहीर केले आणि त्यांचे अस्तित्व मान्य केले.
.
.
4 ऑगस्ट 2020: पेंटागॉनने अनआयडेंटिफाइड एरियल फेनोमेना टास्क फोर्स (UAPTF) ची स्थापना केली, हा लष्करी कर्मचार्यांना आढळलेल्या अज्ञात हवाई घटनांचे स्वरूप आणि त्यांचे मूळ शोधण्याचा आणि समजून घेण्याचा एक प्रयत्न आहे.
.
.
8 जानेवारी, 2021: जॉन रॅटक्लिफ, नॅशनल इंटेलिजन्सचे माजी संचालक म्हणाले की आणखी बऱ्याच UFO घटना आहेत ज्या सार्वजनिक केलेल्या नाहीत आणि काही घटनांचे स्पष्टीकरण करणे शक्य नाही.
.
२५ जून २०२१: Preliminary Assessment: Unidentified Aerial Phenomena 2021 काँग्रेसला सादर केला गेला.
.
.
जुलै-डिसेंबर 2022. गेल्या वर्षी काँग्रेसने सरकारपुरस्कृत छुप्या कार्यक्रमांबद्दलचे व्हिसलब्लोअर कायदे बदलले. यामुळे काही व्यक्तींना पुढे येऊन काँग्रेससमोर साक्ष देण्यासाठी एनडीए तोडण्याची संधी मिळाली. कृपया लक्षात घ्या राष्ट्रीय सुरक्षेचा कोणताही एनडीए तोडला तर मृत्यूदंड किंवा आजन्म कारावास होऊ शकतो. हा मसुदा तयार करण्यात डेव्हिड गृश या गुप्तचर अधिकाऱ्याचाही हात होता. त्याच्याबद्दल पुढे.
.
.
फेब्रुवारी २०२३: अमेरिकेने चार ऑब्जेक्ट पाडले. त्यापैकी दोन चायनीज बलून असल्याची बतावणी केली गेली. पुन्हा दुसरीच बतावणी केली गेली. हा सगळा सावळा गोंधळ न्यू यॉर्क टाइम्स ने पुन्हा सविस्तर टिपला आहे.
.
.
मे २०२३: नासाने UAP बद्दल त्यांचा रिपोर्ट जाहीर करण्या आधी एक पब्लिक मीटिंग घेतली.
.
.
मे २०२३. वरील कायदेबदलामुळे डेव्हिड गृश नावाचा एक गुप्तचर अधिकारी पुढे आला आणि त्याने दावा केला की त्याला संसदेपासून पूर्णपणे लपवलेल्या छुप्या कार्यक्रमांची ‘सेकंड हॅन्ड’ माहिती आहे. (कारण अशी सेकंड हॅन्ड माहिती मिळ्वणे हाच त्याच्या कामाचा भाग होता). त्यातली काही माहिती सार्वजनिक करण्यासाठी त्याने संबंधित विभागांची परवानगी मिळवली आहे. जनहितार्थ ही माहिती टप्प्याटप्प्याने जाहीर होणे गरजेचे आहे. कारण ज्या संस्था, जे लोक (सरकारी व खाजगी) या कार्यक्रमांचा गैरवापर करत आहेत त्याबद्दल संसद पर्यायाने जनता अनभिज्ञ आहे. हा जनतेचा आणि मानवजातीचा विश्वासघात असून निदान संसदेने तरी जितकी माहिती गोळा करायला हवी तितकी करावी. राष्ट्रीय सुरक्षेचा विचार करता, सगळी माहिती जनजाहीर होणे गरजेचे नाही, तथापि काही माहिती बंद लिफाफ्यात ( बंद दाराआड ) ठराविक द्विपक्षीय काँग्रेस सदस्यांना तरी कळली पाहिजे म्हणून गृशने कोणताही कायदा न तोडता पूर्णपणे कायदेशीर मार्गाने काही दावे केले. त्याने न्यूजनेशनला दिलेली मुलाखत रॉस कोल्टहार्ट या प्रख्यात पत्रकाराने घेतली.
ते दावे प्रामुख्याने असे होते:
- १. अमेरिकन सरकारने पडलेले किंवा पाडलेले UFO ताब्यात घेऊन रिव्हर्स इंजिनियरिंग करण्यासाठी दशकव्याप्त अत्यंत गुप्त कार्यक्रम राबवलेले आहेत. या कार्यक्रमांत केवळ सरकारीच नव्हे तर खाजगी व्यक्तींचाही समावेश आहे.
- २. हे कार्यक्रम सैन्यदलांपासूनही लपवले गेलेले आहेत. हे कार्यक्रम अतिशय कप्पेकरण केलेले आहेत.
- ३. या कार्यक्रमांची आणि कार्यक्रमातील अनेक गोष्टींची गोपनीयता राखली जावी म्हणून प्रसंगी जीवितहानीही झाली आहे. ही जीवित हानी मानवांनी देखील केली आहे.
- ४. या कार्यक्रमांत गोळा केलेल्या वस्तू कुठे आहेत, कशा आहेत, त्या कुणी गोळा केल्या या सर्व बाबींची माहिती गृशने मौखिक, लिखित रित्या गोळा केलेली आहे. ही माहिती त्याने त्याच्या सरकारी कामाचा अधिकृत भाग म्हणून गोळा केलेली आहे.
- ५. केवळ ऑब्जेक्टच नव्हेत तर काही व्यक्तींनी बायोलॉजिकल्स सुद्धा हाताळले आहेत.
- ६. या कार्यक्रमांनी केवळ वस्तूच गोळा केल्या असं नव्हे तर जनतेमध्ये जाणीवपूर्वक संभ्रम पसरवला. जनतेची दिशाभूल केली. खोटी माहिती पसरवण्यासाठी कॅम्पेन चालवली, जनतेला हे प्रश्न गंभीर वाटू नयेत यासाठी हा विषयच अत्यंत हास्यास्पद ठरेल, किंबहुना लोक या विषयाभोवती जाणूनबुजून कॉन्स्पिरसी तयार करतील, ज्या लोकांना या अनुभवांना/घटनांना सामोरे जावे लागले आहे त्या लोकांना हास्यस्पद ठरवून क्रॅकपॉटही ठरवले जाईल अशा पद्धतीचे मिसइन्फर्मेशन कॅम्पेन चालवले गेले.
.
डेव्हिड चार्ल्स गृश बद्दल थोडेसे : हा सध्या 36 वर्षांचा आहे. याने 2016 ते 2021 पर्यंत वरिष्ठ गुप्तचर अधिकारी म्हणून नॅशनल रिकॉनिसन्स ऑफिसमध्ये काम केले आहे.. तो युनायटेड स्टेट्सच्या अध्यक्षांना दिले जाणारे दैनंदिन इंटेलिजन्स ब्रीफिंग तयार आणि वितरित करत असे. त्याने 2019 ते 2021 पर्यंत UAP टास्क फोर्समध्ये हेरगिरी कार्यालयाचा प्रतिनिधी म्हणून काम केले आहे. 2021 च्या उत्तरार्धात जुलै 2022 पर्यंत, तो UAP विश्लेषणासाठी राष्ट्रीय भूस्थानिक-गुप्तचर एजन्सीचा लीडर आणि संरक्षण विभागातील टास्क फोर्सचा प्रतिनिधी होता (नौदल). UAP टास्क फोर्सचा विश्लेषक म्हणून, त्याच्याकडे सेन्सिटिव्ह कंपार्टमेंटेड इन्फॉर्मेशन (SCI) सुरक्षा मंजुरी आणि 2000 हून अधिक "विशेष" कार्यक्रमांमध्ये प्रवेशपरवाना होता.म्हणजे काही महत्त्वाचे क्लिअरन्सेस त्याच्याकडे होते. गृश चे काम काय होते? उच्च-स्तरीय गुप्तचर अधिकार्यांच्या विस्तृत मुलाखती घेणे. त्यापैकी काही अधिकारी थेट UAP कार्यक्रमांमध्ये गुंतलेले होते. त्यामुळे त्याने प्रचंड माहिती प्रोसेस केली आहे. अनेक उच्च स्तरीय अधिकारी ‘क्रॅश रिट्रिव्हल’ म्हणजेच पडलेल्या UFO गोळा करण्याच्या गुप्त कार्यक्रमांमध्ये प्रत्यक्ष कार्यरत होते.
या सगळ्या प्रयत्नांचे सार त्याने 21 ऑक्टोबर 2019 रोजी सिनेट आर्म्ड सर्व्हिसेस कमिटीच्या स्टाफ सदस्यांना आणि दोन दिवसांनंतर सिनेट इंटेलिजेंस कमिटीच्या स्टाफ सदस्यांना ब्रीफिंगच्या स्वरूपात दिले आहे. (बंद दाराआड, शपथेखाली)
राष्ट्रीय गुप्तचर संचालक चार्ल्स मॅककुल III यांच्या अखत्यारीत येणाऱ्या जबाबदार गुप्तचर अधिकाऱ्यांविरुद्ध आणि काही अधिकाऱ्यांसहित त्याने अमेरिकन महानिरीक्षकांकडे औपचारिक व्हिसलब्लोअर तक्रार केली आहे .या तक्रारीत ‘जनतेपासून हा डेटा रोखणे आणि कॉंग्रेसपासून जाणीवपूर्वक लपवणे’ हे आरोप आहेत. कार्यक्रमात सहभागी अनेक सक्रिय सदस्यांनी महानिरीक्षक कार्यालयात गृशने प्रदान केलेल्या माहितीची खातरजमा केली आहे. (बंद दाराआड, शपथेखाली)
गृशचे समर्थन करणारे त्याचे सहकारी म्हणाले की त्याची माहिती अत्यंत संवेदनशील आहे. अनेक गैर-मानवी/एलियन वस्तू अत्यंत गुप्त ब्लॅक प्रोग्राम्सच्या ताब्यात आहेत. ती हस्तगत केलेली स्थाने, कार्यक्रमाची नावे आणि इतर विशिष्ट डेटा क्लासिफाईड असला तरी, महानिरीक्षक आणि गुप्तचर समितीच्या कर्मचार्यांना हे तपशील दिले गेले. (बंद दाराआड, शपथेखाली)
हे सगळे आरोप आणि तक्रारपत्रे तपासल्यावर इंटेलिजेंस कम्युनिटी इन्स्पेक्टर जनरल यांना जुलै २०२२ मध्ये ती “विश्वासार्ह आणि तातडीची” वाटली. गृशच्या म्हणण्यानुसार, राष्ट्रीय गुप्तचर विभागाचे संचालक एव्हरिल हेन्स यांना ताबडतोब सारांश सादर करण्यात आला. (बंद दाराआड, शपथेखाली)
यानंतर गृशने गृह गुप्तचर समिती तसेच सिनेट गुप्तचर समितीच्या सुनावणीत साक्ष दिली. साक्षीचे काही तपशील नियमित कॉंग्रेस सदस्य आणि कर्मचारी यांच्या मंजुरी पातळीपेक्षा उच्च होते. त्यामुळे अर्थातच या साक्षी बंद दाराआड, शपथेखाली झाल्या. ही सुनावणी 11 तासांहून अधिक काळ चालली आणि शेकडो पानांचे रिपोर्ट तयार केले गेले.
गृशच्या म्हणण्यानुसार, त्यांनी सर्व संबंधित माहिती या समित्यांना पाठवली आहे. त्याने त्यांना हे ऑब्जेक्ट ठेवलेली, जतन केलेली स्थळे, हे करण्यात गुंतलेल्या लोकांची नावे, या सगळ्या प्रकल्पाची कोड नावे, गुंतलेल्या एरोस्पेस कंपन्या आणि पुढील तपास कोठे करायचा याचा “रोड मॅप” असे सर्व काही पुरवले आहे. अर्थातच बंद दाराआड, शपथेखाली.
गुप्तचर विभागाचा उच्च-स्तरीय अधिकारी म्हणून गृशला, अशी सरकारी माहिती प्रकाशित करण्यापूर्वी संरक्षण कार्यालय प्री-पब्लिकेशन्स सिक्युरिटी रिव्ह्यू (DOPSR) द्वारे मंजूर करून घेणे बंधनकारक आहे. DOPSR अधिकृततेचा अर्थ असा आहे ही सगळी माहिती राष्ट्रीय सुरक्षेचा भंग करत नाही. जी माहिती राष्ट्रीय सुरक्षेचा भंग करते ती माहिती बंद दाराआड द्यावी लागते. शिवाय ती कोणालाही देता येत नाही. काँग्रेस सदस्यांपैकी आठ जणांना ज्यांना असे उच्चस्तरीय सुरक्षा परवाने आहेत त्यांनाच ती देता येते. त्यांना गॅंग ऑफ ८ असे अनौपचारिक रित्या म्हंटले जाते.
त्याच्या तपासाचा परिणाम म्हणून, 2021 पासून गृशला अनेक महिने अनेक अधिकाऱ्यांचा सूड सहन करावा लागला. कारण ही कृत्ये केवळ बेकायदेशीरच नव्हे तर सरळ सरळ राजद्रोह करणारी आणि गुन्हेगारी स्वरूपाची आहेत.त्याचा परिणाम म्हणून अनेक आतल्या अधिकाऱ्यांना जबर शिक्षा होऊ शकते. या सूडाच्या प्रयत्नांची चौकशी अजूनही चालू आहे.
गृशने 7 एप्रिल 2023 रोजी सरकारी पद सोडले. त्याला गुप्तचर वर्तुळात चांगलाच पाठिंबा आहे आणि असंख्य स्त्रोतांनी त्याच्या विश्वासार्हतेची खात्री दिली आहे.
.
.
जून २०२३. काही आठवड्यांनंतर मार्को रुबिओ (गॅंग ऑफ एट मधला एक) ने एका मुलाखतीत गृशने दिलेल्या साक्षीची पुष्टता केली. शिवाय या माहितीच्या आधारे मार्को रुबिओने, पडलेले आणि पाडलेले UFO ज्यांनी प्रत्यक्ष हाताळले आहेत अशा व्यक्तींशी प्रत्यक्ष चर्चा केल्याचीही खातरजमा केली.
.
.
जुलै २०२३: काही आठवड्यांनंतर, अशा गुप्त कार्यक्रमांना नष्ट करण्यासाठी आणि त्यांच्या ताब्यात असलेली सगळी सामग्री काँग्रेसकडे सुपूर्द करण्यास भाग पाडण्यासाठी, 2024 IAA चा मसुदा तयार केला गेला.
.
.
जुलै 2023: अज्ञात विसंगत घटना प्रकटीकरण कायदा २०२३ (UNIDENTIFIED ANOMALOUS PHENOMENA DISCLOSURE ACT OF 2023) प्रस्तावित करण्यात आला.
.
.
२६ जुलै २०२३: गॅंग ऑफ ८ समोर झालेली सुनावणी ही बंद दाराआड होती. त्यामुळे एक ऐतिहासिक जनसुनावणी काँग्रेस सदस्यांनी घेतली. न भूतो अशी ती सुनावणी कदाचित मानवी इतिहासातील खूप महत्त्वाची सुनावणी ठरावी. ही सुनावणी डेव्हिड गृश, माजी नेव्ही पायलट रायन ग्रेव्ह्ज, आणि डेव्हिड फ्रेव्हर या तीन व्यक्तीची झाली. पुन्हा एकदा सांगावेसे वाटते, ही सुनावणी जरी सार्वजनिक असली तरी ती शपथेखाली होते. याचा अर्थ कोणताही वेडावाकडा खोटा शब्द जरी गेला तर त्याचे परिणाम खूप गंभीर असतात. या सुनावणीत काय सांगितले गेले हे एकवार मांडू.
डावीकडून रायन ग्रेव्ह्ज, डेव्हिड गृश आणि डेव्हिड फ्रेव्हर सुनावणीपूर्वी शपथ घेताना.
- IRAD चा दुरुपयोग - संरक्षण कंत्राटदार सरकारी संगनमताने निधीचा गैरवापर करतात. "स्व-निधी" चा उल्लेख.
- गृशने आयजींना स्थानांची नावे प्रदान केली आहेत.
- यूएस सरकार / खाजगी कंत्राटदारांकडे NH क्राफ्ट आणि गैरमानवी जीवके आहेत. (US govt / contractors have craft and non-human biologics).
- यूएस सरकार / कंत्राटदारांनी व्हिसलब्लोअर्सना धमकावले आहे, इजा केली आहे आणि संभाव्य व्हिसलब्लोअर्सची हत्या देखील केली आहे.
- जबाबदार व्यक्ती करियरी लष्करी उच्चपदस्थ अधिकारी आणि संरक्षण कंत्राटदार कंपन्यांमधले वरिष्ठ कार्यकारी अधिकारी आहेत. हे अधिकारी अनिर्वाचीत आहेत.
- क्रॅश, चाचण्या, क्रॅश पुनर्प्राप्तीच्या उपग्रह प्रतिमा अस्तित्वात आहेत.
- या क्रॅश मधून रिव्हर्स इंजिनीअरिंग केलेले प्रगत तंत्रज्ञान यूएस सरकार/कंत्राटदारांकडे असू शकते.
- गृश आणि त्याच्या पत्नीला त्रासदायक मार्गाने धमकावले गेले.
- गृशने फोटो आणि कागदपत्रे पाहिली आहेत.
- Gaetz या काँग्रेस सदस्याने Eglin AFB नामक एका खाजगी कंपनीच्या वैमानिकाकडे असलेला अत्यंत भीतीदायक UAP चा फोटो आणि इतर रडार डेटा पाहिला.
- Gaetz, Eglin AFB कडून हा फोटो आणि रडार डेटा subpoena करू इच्छितो.
- गृशने शूटडाउनचे फुटेज पाहिले आहे आणि म्हटले की क्राफ्ट मानवेतर बनावटीचे आहे.
- हे आंतरमिती होलोग्राफीक प्रोजेक्शन असणे देखील शक्य आहे असे गृश चे एक सैद्धांतिक विश्लेषण आहे. (गृश स्वतः फिजिक्सचा विद्यार्थी आहे तरीही हा प्रकार त्याच्या आकलनापेक्षा अधिक सखोल असू शकतो असे त्याने मान्य केले).
- यूएफओ लेगसी रिव्हर्स इंजिनीअरिंग प्रोग्रामवर काम करताना लोक जखमी झाले आहेत आणि NHI यांनी देखील मानवांना इजा पोचवली आहे.
- गृश कॉंग्रेसला SCIF मध्ये त्यांना जाणून घ्यायच्या असलेल्या वर्गीकृत सर्व गोष्टी सांगेल. (SCIF: Sensitive compartmented information facility)
- गृश सुनावणीनंतर पॅनेल सदस्यांना सहभागी व्यक्तींची यादी देईल.
- गृशच्या म्हणण्यानुसार, AARO च्या डॉ. किर्कपॅट्रिक यांनी केलेले ‘परग्रहवासी भेटीचा कोणताही पुरावा नाही’ हे विधान निखालस चुकीचे आहे - गृश शपथेखाली आहे, किर्कपॅट्रिक नव्हते.
- NHI शी केलेल्या संवादाविषयी विचारले असता, गृशने सांगितले की ते केवळ वर्गीकृत सेटिंगमध्ये याबद्दल बोलू शकतात (SCIF मध्ये).
- बोइंग कंपनी वेंडरबर्ग AFB वरील १०० यार्ड लांब लाल चौकोन UAP प्रकरणात गुंतली आहे असा दावा करणाऱ्या एका लष्करी अधिकाऱ्याला ओळखतो असं ग्रेव्ह्ज म्हणाला- कागदपत्रे आहेत.
- गृश UAP रिवर्स इंजिनियरिंग प्रकरणात अणु ऊर्जा विभागाच्या सहभागाची खातरजमा करू शकत नाही किंवा नाकारूही शकत नाही.
- UAP पाहिलेल्या पायलट साक्षीदारांना त्यांच्या व्यावसायिक विमान वाहतूक कंपन्यांकडून धमक्या दिल्या गेल्या आहेत.
- गृश सध्या रिव्हर्स इंजिनीअरिंग प्रोग्राममध्ये गुंतलेल्या काही व्यक्तींना ओळखतो. या व्यक्ती काही आश्वासने आणि संरक्षण दिले गेल्यास बंद दाराआड साक्ष देण्यास राजी आहेत.
- UAP च्या तांत्रिक क्षमते विरूद्ध बचाव केला जाऊ शकत नाही यावर तिन्ही साक्षीदार सहमत आहेत.
- पुढील सुनावणीसाठी SCIF मध्ये प्रवेश न दिल्यास लोकांना कामावरून काढून टाकले जाईल किंवा पगारात कपात केली जाईल - होल्मन नियम लागू केला जाईल.
काही रोचक गोष्टी:
१. रायन ग्रेव्ह्ज ने ज्या UAP चा उल्लेख केला तिचे एक ३डी रेंडरिंग-
UAP रडार सिग्नल ब्लॉक करतात असे पायलट सांगतात. आता एक गमंतीशीर योगायोग. कुणीतरी माहितीच्या अधिकाराखाली शोधलेले हे सुपर सिक्रेट रडार ब्लॉकिंग डिव्हाईसचे पेटंट.
अजून एक गमंतीशीर योगागोग.
त्रिकोणी यु.ए.पी पाहिल्याचा दावा अनेकांनी केला आहे. अमेरिकन नौदलाने २०१७ ला फाईल केलेले एक पेटंट. या मध्ये एक नवीनच प्रोपल्शन सिस्टिम डिझाईन केलेली आहे. आता गृशचे सगळे दावे तपासा आणि या योगायोगाचे कारण शोधा!!
प्रतिक्रिया
28 Jul 2023 - 6:24 am | विवेकपटाईत
अधिकांश उदाहरणे न्यूयॉर्क टाइम्सचे आहेत. त्या वर्तमान पत्राची विश्वसनीता ही शून्य आहे.
28 Jul 2023 - 7:45 am | गवि
या बाबतीत तपशीलवार मुद्दे संग्राहित करून त्याचे दस्तावेजीकरण करण्याच्या तुमच्या प्रयत्नांचे कौतुक वाटते
मांडणी आणि उद्देश स्तुत्य आहेत. माहिती रोचक आहे. अजूनही ती असंख्य किंतु परंतु आणि शपथा बंद दारे यांनी बांधलेली असल्यामुळे आणि प्रत्यक्ष जाहीर म्हणून हे काही व्हिडिओ दिलेत ते मिणमिणता अति अति धूसर आकार यापलीकडे काही नसल्याने दुर्दैवाने ती एक आडाखा / न समजलेली वस्तू याखेरीज व्हॅल्यू ॲडीशन करू शकलेली नाही.
(उदा. दुरून जंगलात दिसलेली एक आकृती, हिमालयातील यती सदृश आकाराचे अति अती दुरून केलेले अति ब्लर चित्रण आणि बाकी अनेक मौखिक शपथा) काहीतरी तेव्हा स्पष्ट कळले नाही इतकेच त्यातून दिसते आणि तितके मान्य.
पण तुमच्या विस्तृत उहापोहामुळे यापुढे आणखी उकल होऊ शकेल याबद्दल काहीशी शक्यता प्रकट होते आहे. किमान दाबून ठेवला गेलेला ऐवज बराच मोठा असण्याची शक्यता तरी या सर्व मुद्द्यांतून दिसली. धन्यवाद.
28 Jul 2023 - 8:16 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
या बाबतीत तपशीलवार मुद्दे संग्राहित करून त्याचे दस्तावेजीकरण करण्याच्या तुमच्या प्रयत्नांचे कौतुक वाटते
सहमत. बाकी लिहिते राहा. वाचत आहे.
-दिलीप बिरुटे
28 Jul 2023 - 4:40 pm | हणमंतअण्णा शंकर...
हिमालयातील यतींचा छडा (हिमालयच का, रॉकी घ्या अँडी घ्या, किलिमांजारो घ्या, गेलाबाजार आपला फुजी घ्या) लावण्यासाठी किंवा यतींचे बायोलॉजिक्स सरकारदफ्तरी जमा करण्यासाठी संसद बील प्रस्तावित करत नाही. यावर हिमालयातील यती किती गांभीर्याने घेत आहोत हे लक्षात येईल.
यु.ए.पी ने कॉन्स्पिरसी थेअरीचा टप्पा केव्हाच ओलांडला आहे. तिथून ती आता कायद्याच्या भाषेच्या प्रांगणात आलेली आहे.
इव्हिडन्सबद्दल :
अतिस्पष्ट, ५०के इमेज किंवा फुटेज यायची तेव्हा येईल, तेव्हाही अशा इमेजेस सेकंदाला हजारोंनी तयार करणारे पॉवरफुल ए.आय. असतील, ती सुद्धा किती क्रेडिबल असेल कुणास ठाऊक?
शपथेवर टेस्टिमनी देणारे तेव्हाही सगळ्यात मह्त्त्वाचे असतील आणि आताही.
जर एखाद्याला फासावर लटकवायला मानवी साक्ष देखील पुरेशी असते, तर किमान काहीतरी गौडबंगाल आहे एवढं मानायला पुरेशी असावी.
दाबून ठेवलेला ऐवज बराच मोठा नाही, तर पचायला जडही असू शकतो.
मौखिक शपथांना काहीच किंमत नसती तर आपल्या देशातल्या दिखावू लोकशाहीतही मंत्र्यासुंत्र्यांना गोपनीयतेच्या शपथा दिल्या गेल्या नसत्या. त्यामुळे मला वाटतं, त्यांना ड्यू क्रेडिट द्यावे. अमेरिकेत लोकशाहीचे सर्वोच्च आविष्कार आहेत असं म्हणत नाही, पण यात जराजरी विसंगती आढळली तर धडाधड कोर्ट केसेस पडतात. प्रचंड.
शेवटी आपल्यासारख्या व्यक्तीच्या हातात घटनांचे अन्वयार्थ लावून स्पेक्युलेशन करणे याशिवाय काहीही नाही.
अनेक बिलीव्हर्स सरकारवर काडीचाही विश्वास ठेवत नाहीत. गोरमिंट आंटी सारखे सरकारलाच एक नंबरचा शत्रू मानतात.
कदाचित जगभरातले सर्वात प्रतिष्ठित दैनिक न्यू यॉर्क टाईम्सला देखील अविश्वसनीय ठरवून एका वाक्यात वासलात लावलंय लोकांनी. लोल.
मला फक्त एकच भीती आहे : 'तुम तो ठहरे परग्रहवासी, साथ क्या निभाओगे' असं म्हणायला वाव राहू नये याची.
त्यामुळे मी स्पेक्युलेशन करतानाही शक्यतोवर लॉजिकल तरी करावं या हेतूने लिहित आहे.
28 Jul 2023 - 9:17 pm | तुषार काळभोर
एकेक किस्सा वाचताना MIB आणि इंडिपेंडन्स डे मधील एकेक दृश्य डोळ्यांसमोरून जात होते.
बाकी परग्रहवासियांविषयी माझी मते काहीशी अशी आहेत :
मला सगळ्यात जास्त वाटणारी शक्यता : भविष्यातील मानवच भूतकाळात म्हणजे आताच्या काळात येऊन जातोय.
अमेरिका किंवा कुठल्याही सरकारी यंत्रणेला एवढं मोठं रहस्य इतका मोठा काळ दाबून ठेवता येणे कर्मकठीण आहे. त्यातही इतर स्पर्धक किंवा शत्रू देश प्रत्येक हालचालीवर आणि संदेशावर बारकाईने नजर ठेवून असताना. म्हणजे अमेरिकेत या सगळ्या गोष्टी एखाद्या यंत्रणेला माहिती आहेत, त्यांनी त्याचे पुरावे जमून ठेवलेले आहेत, असे जर असेल तर चीन किंवा गेला बाजार रशिया यांना त्याची अजिबात खबर लागणार नाही, हे कितपत शक्य आहे?
विश्वातील वस्तू, ग्रह, सूर्यमाला, आकाशगंगा इतक्या दूरदूर आहेत की अगदी प्रकाशाच्या वेगाने प्रवास शक्य झाला तरी हा प्रवास शेकडो, हजारो, लाखो वर्षे चालू शकतो. एका दिशेने. मोजण्याच्या पलीकडे ऊर्जा आणि वेळ लागेल. यातील ऊर्जेचा विचार थोडा बाजूला ठेवू. वेळेच्या बाबतीत एक कल्पना अशी आहे, की काळाचं परस्पेक्टिव्ह जर अगदीच वेगळं असेल तर हे शक्य आहे. उदाहरणार्थ एखाद्या मुंगीला एका चौकातून दुसऱ्या चौकात जाणं हे कदाचित तिच्या आयुष्याचा एक मोठा काळ व्यापणार असू शकतं. पण माणसासाठी ती एक किंवा दोन मिनिटाची रपेट असू शकते. तसेच जर कुठले परग्रही जीव असे असतील ज्यांचं काळाचं परस्पेक्टिव्ह लक्षावधी वर्षांच्या प्रमाणात आहे त्यांच्यासाठी अशा प्रवासात लागणारा वेळ ही फार मोठी गोष्ट नाही.
31 Jul 2023 - 12:56 pm | आनन्दा
Reverse engineering ची पेटंट कशी काय चालतात?
म्हणजे माझा प्रश्न असा आहे की भविष्यात जर हे reverse engineered आहे असे सिद्ध झाले तर पेटंट revoke होते का?
14 Sep 2023 - 6:56 pm | चांदणे संदीप
मेक्सिकोच्या संसदेत म्हणे एलियन्सच्या मम्या जाहीर करायचा कार्यक्रम पार पडला. त्याबद्दल डिट्टेलवार लिहावे ही विनंती.
सं - दी - प