वॉलेट, युपिआई कॅशलेस पेमेंट आणि सुरक्षितता
___________________________
जुना चर्चा धागा मनी वॉलेट आणि add money to wallet
___________________________
एप्रिल २०२० चा आहे पण आता सोयी,पद्धती होत्या त्यात सरकारी नियम, कर यात बदल झाले आहेत. त्यावर चर्चेसाठी हा नवीन धागा.
नवीन बदल काय झाले आहेत?
या पेमेंट apps मधून पेमेंट करतेवेळी एक OTP येतो. तो चार आकडी नंबर sms मध्ये आलेला ते app स्वतःच घेऊन पेमेंट करून टाकत असे ते आता बंद केलं आहे. त्याऐवजी बँक अकाऊंटला आपण एक UPIPIN नंबर आपणच जोडायचा असतो तोच दिल्यावर पेमेंट होते. समजा चुकला तर तीन वेळा चुकीच्या प्रयत्नानंतर त्या app मधून त्या दिवशी पेमेंट करता येत नाही.
२) मनी वॉलेट मधून पेमेंट केल्यास त्यावर १८%(?) जीएसटी लागेल. तो घेणाऱ्याने भरायचा आहे. घेणाऱ्याने देणाऱ्याकडून घ्यायचा का नाही हे त्यावर सोपवले आहे.
UPI व्यवहारात एक लाखापर्यंत जीएसटी नाही.अनुभव -मुंबई लोकलचे तिकिट ओनलाइन UTS app मधून काढण्यासाठी 'freecharge' हे वॉलेट वापरले तर जीएसटीसह पेमेंट झाले. 'अमेझोन पे' या वॉलेटचा वापर करून फोन रिचार्ज केले तर जीएसटी लागला नाही.
३) पेमेंट apps कशी काम करतात -
तुमच्या बँक अकाऊंटला एक फोन नंबर (RMN) जोडलेला असला पाहिजे, नेट बँकिंग सोय घेतलेली असली पाहिजे किंवा एटिएम डेबिट कार्ड जोडलेले हवे. App सुरू केल्यावर फोनमधल्या (RMN) नंबराने app विविध बँकेत खाते आहे का पाहते आणि दाखवते. त्यातील एक कोणतेतरी अकाउंट निवडले की एटीएम कार्ड डिटेल्स द्यावे लागतात. आता UPI पेमेंटसाठी ते app ready झाले.
कुठे पेमेंट करायचे असेल तेव्हा हे app तिथे दाखवत असेल तर ते उघडायचे, UPIPIN नंबर भरायचा आणि पेमेंट होते.
-----------------
अडचणी
१) app च्या माहितीमध्ये
"The data can not be deleted"
असे लिहिलेले असते तेव्हा त्या appमधून तुमचे एटीएम कार्ड डीटेल्स, बँक अकाऊंट नंबर आणि त्याला जोडलेला फोन नंबर काढता येणार नाही. उदाहरणार्थ सरकारी BHIM app .
PayTm_ से _UPI या app मध्ये
"You can request that data be deleted" असे दिसते. म्हणून मी तपासायचे ठरवले. प्रथम हे app download करून एटीएम कार्ड डीटेल्स भरून एक पेमेंट केले. त्यानंतर app मधील cache, आणि Data delete केला. नंतर app uninstall केले. म्हणजे सर्व डीटेल्स गेली असणार. आता परत ते Paytm app download केले तेव्हा ते रेडी दाखवत होते. म्हणजे एटीएम कार्ड,बँक अकाऊंट नंबर आणि फोन नंबर (RMN) त्या app मधून गेला नव्हता. याला म्हणतात सुरक्षितता?
२) ओनलाइन पेमेंट्स प्रकारात दोन प्रकार आहेत. एक -UPI Payment. जे बँक अकाऊंटमधून त्याक्षणी पैसे काढून दिले जातात. यासाठी एटीएम कार्डाच्या डिटेल्सचा वापर केला जातो. बँक बॅलन्स कमी होतो.एन्ट्रीज वाढत जातात. कोरोना काळात या पेमेंटचा उपयोग झाला असला तरी पासबुक प्रिंटींग डोकेदुखी आणि खर्चिक झाले आहे. बऱ्याच बँकांनी फेब्रुवारीपासून पासबुक प्रिंटींग बंद केलं आहे. अजून सामान्य खातेदार डिजिटल पासबुकाकडे वळलेला नाही.
दुसरा प्रकार मनी वॉलेटसचा . यामध्ये तुमचा आधार कार्ड नंबर/ आणि pan द्यावा लागतो. मगच बँक अकाऊंटमधून वॉलेटमध्ये पैसे पाठवता (add money) येतात. निरनिराळ्या वॉलेट्सची अधिकतम पैसे ठेवण्याची क्षमता वेगळी आहे. पाच ते दहा हजार रु आहे. यातून पेमेंट केल्यास वॉलेट मधला बॅलन्स कमी होत जातो व बँक अकाऊंटला एन्ट्री येत नाही. हे चांगलेच आहे. पण ... आता या व्यवहारांवर १८%(?) जीएसटी लावला आहे.
३) app उघडणे.
BHIM UPI app उघडायचे असल्यास आपण दिलेला/ठेवलेला चार आकडी PASSCODE भरावा लागतो. तसे Paytm appमध्ये आता तरी PASSCODE सुविधा नाही. म्हणजे ही अधिकची सुरक्षा झाली.
प्रथम फोनचा स्क्रीन लॉक उघडणे,मग passcode देणे, आणि नंतर UPIPIN देणे. तीन पायऱ्या.
४) UPIPIN बदलणे/ सुरक्षितता.
समजा RMN असलेला फोन आणि एटीएम कार्ड एकत्र हरवले तर ? स्क्रीन लॉक नसेल तर कुणीही UPIPIN एटीएम कार्डाचे नंबर देऊन बदलून पेमेंट करू शकते.
हल्ली मोबाईल चोरीची प्रकरणे वाढली आहेत. कारण? चोरलेले मोबाईल एका सॉफ्टवेरने
स्क्रीन लॉक काढून उघडता येतात. पुढचं काम तो बदलून मोबाईल विकणे.
एकूण ओनलाइन पेमेंट सोयी वाढत आहेत पण धोकेही वाढत आहेत.
५) वॉलेट वापरण्यासाठी कोणता फोन!
Freecharge wallet आणि Amazon Pay wallet वापरण्यासाठी RMN नंबरवालाच फोन हँडसेट वापरावा लागत नाही. BHIM आणि Paytmसाठी RMN वालाच फोन वापरावा लागतो. आपल्याकडे असणारे वॉलेट payment gatewayमध्ये नसले तर वॉलेट वापरता येत नाही.
माझे अनुभव आणि थोडी नेट माहिती लिहीली आहे. अपूर्ण आणि चुकीची माहिती असू शकते. सुधारणांचे स्वागत.
प्रतिक्रिया
20 May 2023 - 2:13 pm | कुमार१
योग्य कृती !
खातेदारांनी शिस्तीत नेट बँकिंग घ्यावे. आयकर आणि अन्य कामांसाठी घरबसल्या संपूर्ण वर्षाचे किंवा हव्या त्या कालावधीचे स्टेटमेंट मिळते. रांगेत उभे राहून पासबुक भरणे या गोष्टी आता मनातून आणि जनातून - निदान सुशिक्षित वर्गाच्या- गेल्या पाहिजेत.
20 May 2023 - 2:41 pm | तुषार काळभोर
स्मार्टफोन वापरून व्हाट्सअप विद्यापीठातून विद्यावाचस्पती झालेल्या आबालवृद्धांना जर आला मेसेज की कर फॉरवर्ड, दवाखान्याच्या रांगेत उभे असताना मोठ्या आवाजात व्हाट्सअपचे स्टेटस बघणे, फेसबुक/युट्यूबवर मोठ्या आवाजात व्हिडिओ बघणे जर जमत असेल, आणि 'पासबुकात डोके दुखेल इतक्या एण्ट्रीज होतील इतक्या वेळा ऑनलाईन पेमेंट करणे' जमत असेल तर, इ-स्टेटमेंट्/नेटबँकिंग वापरून सर्व देवाणघेवाणीच्या प्रवेशिका पाहणे, तितकेसे अवघड नसावे.
20 May 2023 - 2:55 pm | तुषार काळभोर
>> "The data can not be deleted" = डेटा काढता येणार नाही.
"You can request that data be deleted" = डेटा काढून टाकावा, अशी विनंती तुम्ही करू शकता.
>> यामध्ये कोठेही आपला डेटा डिलीट करण्याची विनंती केलेली दिसत नाही.
अवांतर : हा जो काही डेटा डिलीट करता येत नाही/करता येतो, तो त्या त्या बँकेकडे/वित्तीय संस्थेकडे/अॅप बनवणार्या कंपनीकडे असणार्या सर्वर (वा तत्सम मध्यवर्ती डेटाबेस) मधील डेटा. आपण app मधील cache, आणि Data delete केला. नंतर app uninstall केले, तरी मूळ डेटा तसाच राहतो व पुन्हा अॅप इन्स्टॉल केल्यावर तो त्यामध्ये असतोच. कारण आपले जे काही डिटेल्स आहेत, ते त्या फोनवर नाही, तर त्या अॅपशी संबंधित आपल्या खात्याचे असतात व ते एखाद्या मध्यवर्ती ठिकाणी असतात.
जोपर्यंत तो फोन, ते सिम, आणि पिन्/पासवर्ड्स आपल्याकडे आहेत (आणि फोनला पुरेशा सुरक्षेचे पिन्/पासवर्ड स्क्रीनलॉक संरक्षण आहे) तोपर्यंत त्या वॉलेटला/आपल्या त्यातील खात्याला/आपल्या बँक खात्याला कसलाही धोका नाही.
20 May 2023 - 2:54 pm | कुमार१
थोडेसे अवांतर आहे पण लिहितोच.
आता ई- व्यवहारांमुळे आपल्या बँकेच्या शाखेत (जर कर्ज नको असेल तर ) सहसा पायरी चढायची वेळ येत नाही. कधीतरी पाच वर्षातून त्यांना केवायसी ची लहर आली की तेवढे एकदा जावे लागते आहे.
अजून एका कामासाठी बँकेत प्रत्यक्ष जाणे थांबवता आल्यास बँकांनी विचार करावा.
तो मुद्दा आहे पीपीएफ खात्यासंबंधीचा. गेल्या काही वर्षांपासून आपण त्या खात्यात आपल्या नेहमीच्या खात्यांमधून पैसे ऑनलाईन घरबसल्या जमा करू शकतो हे बरोबर.
परंतु वर्षाखेरीस पीपीएफ खात्यामध्ये किती व्याज जमा झाले आहे आणि एकूण शिल्लक किती हे ऑनलाईन बघण्याची सोय नाही. ती ॲपवर आहे असे ऐकून आहे; कुणाला अनुभव असल्यास सांगावे.
दुसरे म्हणजे, दर पाच वर्षांनी पीपीएफ चे नूतनीकरण करावे लागते तेव्हा स्वतः बँकेत जावे लागते. तो एप्रिलचा महिना गर्दीचाच व सुट्ट्यांची खैरात असलेला असतो. तेव्हा अर्ज भरणे वगैरे असली जुनी पद्धत अद्याप आहेच. आणि ते नूतनीकरण झाल्याची नोंद पासबुक वर देण्यासाठी ते अजून एक हेलपाटा मारायला लावतात. आपल्या अर्जात आपण फोन नंबर लिहिलेला असताना त्यांना नूतनीकरण झाल्याचा एक एसएमएस करणे का बरे जड जावे?
हे नूतनीकरण देखील ऑनलाइन करता येणे अवघड आहे काय ?
थोडक्यात, पीपीएफ खात्याला ऑनलाइन सुविधा देणे परंतु त्यातून कधीही पैसे काढण्याची सोय वजा करणे, असे त्यांना काहीतरी करावे लागेल. असे तांत्रिकदृष्ट्या करता येते का ?
20 May 2023 - 3:33 pm | राजेंद्र मेहेंदळे
कधी नाही तरी वर्षातुन एकदा पी पी एफ साठी बँकेची पायरी चढावी लागायची. (बँक ऑफ महाराष्ट्र). १५ वर्षे पूर्ण झाली आणि खाते बंद केले.
मग ऑन्लाईन एच डी एफ सी मधे उघडले. आता कट्कट नाही. दर महीन्याला ठराविक रक्कम बचत खात्यातुन पी पी एफ ला जाते(ऑटो पेमेंट). नेट बँकिंग मधे स्टेट्मेंट ऑनलाईन दिसते.
20 May 2023 - 3:49 pm | कुमार१
हे माहीत नव्हते.
म्हणजे खाजगी बँकांनाही पीपीएफची परवानगी दिलेली आहे असे दिसते. अर्थात तिथे बचत खाते उघडण्यापासून सुरुवात करावी लागेल ना ?
20 May 2023 - 4:48 pm | कंजूस
बँक ओफ महाराष्ट्रमधून एचडीएफसीला?
एका ठिकाणाहून बंद करून दुसरीकडे नवीन उघडणे म्हणजे पीपीएफच्या योजनेलाच फाटा देणे. निरर्थक करणे.(Defeating it's purpose). पीपीएफ शिल्लक ही संचित असते. दर वर्षी ती वाढवत असतो. अचानक पाच सहा लाख रुपये आणून टाकता येत नाहीत.
20 May 2023 - 5:01 pm | राजेंद्र मेहेंदळे
१. कुमारसर-- खाजगी /सरकारी कुठल्याहि बँकेत पी पी एफ उघडता येते.
२. कंजूस काका- १५ वर्षे पूर्ण झाल्याने खाते बंद केले. पैसे काढुन घेतले. ५ वर्षे मुदत वाढ घेण्या ऐवजी खाते दुसरीकडे उघडले.
20 May 2023 - 6:19 pm | कानडाऊ योगेशु
इथे तुम्हाला खात पुन्हा मिनिमम रक्कम जी १.५ लाख आहे त्यापासुन पुन्हा सुरु करावे लागले असेल. जर खाते कंटिन्यु केले असते तर १५ वर्षात जेवढी रक्कम जमा झाली त्यावर ८.५ टक्के व्याज मिळत राहिले असते.
20 May 2023 - 6:50 pm | कंजूस
तुमच्याकडे चांगले रिटर्न देणारे पर्याय माहीत असल्याने ते पैसे तिकडे गुंतवलेत हे मान्य.
तर असे पर्याय असणाऱ्यांनी हीच योजना करावी. याबाबत दुमत नाही.
23 May 2023 - 9:13 pm | प्रचेतस
पीपीएफ अकाउंट बंद न करता ट्रान्सफर करता येतेच, नुकसान काहीच होत नाहीच, आधीची शिल्लक, त्यावरील व्याज जशेच्या तसेच राहते मात्र ट्रान्सफर करणे जरा किचकट आहे, बँकेत प्रत्यक्ष जाऊन अर्ज वगैरे करत बसावे लागते, खाजगी बँका सहकार्य करतात मात्र सरकारी बँका खूप वेळ लावतात.
23 May 2023 - 10:51 pm | कंजूस
जुन्या ब्रांचला पासबुक जमा करायचे. ती सरकारी बँक पोस्टाच्या 'स्पीड पोस्ट' कुरिअरने नवीन ब्रांचला पाठवते. पंधरा दिवस लागतात.
20 May 2023 - 4:16 pm | कंजूस
एकाच बँकेत(sbi) दोन खाती आहेत. Savings आणि ppf. दोघांनाही एकच फोन नंबर दिला आहे. सेविंग्ज अकाउंटला नेट बँकिंग घेतलं आहे.
घरी बसून sbi साईटला लॉगिन करून पीपीएफ अकाउंटचेही स्टेटमेंट पाहून pdfडाउनलोड करता येते. करतो. आणि तेच रीटन फाइलिंगसाठी वापरतो.
सबस्क्रिप्शन हे कोणत्याही दुसऱ्या बँकेतून NEFT करतो. (तिथे अकाउंटला आपलं नाव पहिलं असावे.)
आता yono lite app वापरून SBI साठी हे सर्व करता येते. इतर बँकांनीही अशी apps काढली आहेत.
सेंट्रल बँक ओफ इंडिया बँकेने दोन तीन वेगळी apps काढली आहेत. फक्त पासबुक बघण्याचे वेगळे आहे.
------------
पीपीएफ खात्याला ऑनलाइन सुविधा देणे परंतु त्यातून कधीही पैसे काढण्याची सोय वजा करणे,
याबाबत सांगायचे म्हणजे सरकार हे अकाउंट सुरक्षित ठेवू इच्छिते. २०१५ पर्यंत तर पीपीफ पासबुकाला प्रिंटिंगचा बारकोडही लावायला बँक तयार नव्हती.
------------------
दर पाच वर्षांनी पीपीएफ चे नूतनीकरण करावे लागते तेव्हा स्वतः बँकेत जावे लागते. तो एप्रिलचा महिना गर्दीचाच व सुट्ट्यांची खैरात असलेला असतो.
मी एकदा मुद्दामच जानेवारीत जाऊन विनंती केली की नूतनीकरण करून द्या.
"तुमच्या अकाउंटची मुदत संपल्यावरच पुढचे पर्याय संगणकात/नोंदवहीत उघडतात. - मुदत वाढवणे/पैसे परत घेणे इत्यादी."
"त्या तारखेनंतर कधीही या आणि नुतनीकरण करून घ्या,व्याज चालू राहते."
"पण नूतनीकरण झाल्याशिवाय subscription भरू नका." ही. उत्तरं मिळाल्याने निश्चिंत असतो.
कधीही पैसे काढण्याची सोय
यास ppf withdrawal म्हणतात ते वर्षांत एकदाच करता येते. त्यासाठी स्टँप पेपरवर अर्ज असतो. दर महिन्याला जाऊन पैसे काढता येत नाहीत. समजा दीड लाख मंजूर झालेत withdrawalसाठी तर ते एकरकमी काढून सेविंग्ज अकाउंटला ठेवायचे व तिथून हवे तसे काढा.
20 May 2023 - 3:07 pm | तुषार काळभोर
वर एका प्रतिसादात लिहिले आहे. पुनरावृत्ती टाळतो.
नक्की? म्हणजे मी (उदाहरणार्थ) पेटीएमचा वॉलेट बॅलन्स वापरून एखाद्या दुकानातून दहा रुपयांचा बिस्कीटचा पुडा घेतला किंवा तीस हजाराचा टीव्ही घेतला (दोन्ही वस्तूंच्या किंमती जीएसटीसहित) तर मला अनुक्रमे ११.८० रुपये आणि रुपये ३५,४०० द्यावे लागतील? म्हणजे मूळ वस्तूवर ५-१२-१८-२८% जीएसटी आणी त्या किमतीवर परत १८% (किंवा काय असेल तो दर) जीएसटी द्यावा लागेल?
20 May 2023 - 3:27 pm | कंजूस
मुंबई लोकलचे तिकिट ओनलाइन UTS app मधून काढण्यासाठी 'freecharge' हे वॉलेट वापरले तर जीएसटीसह पेमेंट झाले.
१)जीएसटीचा दर नक्की कळला नाही,२) घेणाऱ्याने तो कर देणाऱ्याकडे सरकावयचा का हे सरकारने घेणाऱ्यांवर सोडलंय.* ३) UTS ticket app सरकारी असल्याने बहुधा तिकिट अधिक कर मला लागू केला. पाच रुपयांचे तिकिट घेण्यासाठी पाच रु अकरा पैसे लावले.
#*"Tax on wallet transactions" search मारल्यावर ही माहिती येते. आणि ती अनुभवास आली.
तुमचा मुद्दा "डबल टॅक्स लागणार का?" बरोबर आहे. वस्तू विकत घेताना आणि मनी ट्रान्स्फर सर्विस असे दोन टॅक्स झाले.
21 May 2023 - 4:59 pm | आनन्दा
Wallet मधून पैसे ट्रान्स्फर करताना जो service charge घेतात त्याचा टॅक्स असेल हा..
20 May 2023 - 3:16 pm | तुषार काळभोर
मी भीम अॅप वापरलेले नाही. पण दोन किंवा तीन वेळा पिन टाकावा लागणे, ही अडचण वाटत नाही. (बहुतेक स्मार्टफोनमध्ये - ८०% हून अधिक असतील, माझ्याकडे डेटा नाही - बोटांचे ठसे/चेहरा पाहून स्क्रीन लॉक उघडता येते.) गुगल पेमधून पेमेंट करताना (माझ्याकडे सध्या हे एकच युपीय अॅप आहे), मला स्क्रीन लॉक उघडावं लागतं (बोटाने/चेहर्याने), त्यानंतर गुगल पे उघडताना पुन्हा बोट/चेहरा वापरून उघडते, मग एक पिन टाकतो आणि पेमेंट होतं. बहुतेक सगळ्या अॅपमध्ये अशीच प्रक्रिया असावी. यात कोणताही टप्पा अडचणीचा वाटत नाही. यातील एखादा टप्पा कमी झाला तर, सुरक्षा तेवढ्या प्रमाणात कमी होईल.
20 May 2023 - 4:40 pm | कंजूस
पण Paytm appला app lock नाही. भिमला आहे.
20 May 2023 - 3:48 pm | राजेंद्र मेहेंदळे
सहसा यु पी आय च्या पाठी बचत खाते लावावे लागते , आणि १०-२० रुपयाची सुद्धा एंट्रि होत राहते. रुपे क्रेडिट कार्ड असेल तर युपीआय च्या पाठी ते लिंक करु शकता, म्हणजे रोज वापरा अणि एकदाच पैसे भरा. (बहुतेक हा पर्याय फक्त अँड्रॉईड फोन मधे दिसतो)
मी शक्यतो कुठलेही वॉलेट वापरत नाही. पैसे अडकुन पडतात, अपवाद फास्ट टॅग चा. तिथे वॉलेट नेहमी भरलेले ठेवतो कारण १-२ वेळा टोल नाक्यावर लो बॅलन्स मुळे मनस्ताप झालाय.
मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन(mfa) अर्थात पासवर्ड्/ सी व्हि व्हि+ओ टी पी-- आर्थिक व्यवहारास हे फार जरुरी आहे, त्यामुळे कंटाळा करु नये.
वॉलेट अॅप वरील डेटा डिलीट करणे--कोणतेही अॅप ईतके साधे सरळ नाही. तुमचा डेटा गोळा करणे/चोरणे हाच त्यांचा मुख्य उद्देश आहे.म्हणुनच अॅप डाउन्लोड करताना ते हजार परवानग्या मागतात (मायक्रोफोन्/कॅमेरा/कॉन्टॅक्ट लिस्ट) आणि आपण नकळत देउन टाकतो. त्यामुळे तुमचा डेटा फोनवरुन डिलिट झाला काय किवा अकाउंट डिलिट केले काय, त्यांच्याकडे तो असतोच. तेव्हा यावर उपाय नाही.
अवांतर--
तसेही सामान्य लोकांना यु पी आयची सवय झाली आहे. कॅश बाळगणे कमी/बंद झाले आहे. त्यात आता २ हजारच्या नोटा बंद होणार आहेत, त्यामुळे माझ्या मते सरकारने यु पी आय पेमेंट वरील चार्जेस सरसकट माफ करावेत. एन पी सी आय ने पैसे कमवायचे काहीतरी वेगळे मॉडेल विचारात घ्यावे. बाकी क्रेडिट कार्ड वगैरेवर लुटत आहेत ते चालु द्या.(नवीन बातमी -परदेशात ७ लाख रुपयाच्या वर व्यवहार केल्यास २०% कर)
20 May 2023 - 4:36 pm | कंजूस
यु पी आय पेमेंट वर चार्जेस नाहीत हो.
वॉलेट वर लागू केले आहेत.
डेटा पूर्णपणे डिलिट करता आला पाहिजे ही आमची मागणी आहे. छोट्या छोट्या रकमांचे पेमेंट करून बँक अकाऊंटचे कॅश बॉक्स बनवायची इच्छा नाही.
Amazon Pay wallet चांगले आहे. साईट लॉगिन करून पेमेंट करता येते. Android/IOS apps घेणे,ती अपडेट करणे ही कटकटच नाही. बँक अकाऊंट जोडण्यासाठी (add money) RBIच्या नियमानुसार KYC करावे लागते. त्यांनी pan/aadhaar/voter ID काहीही चालेल सांगितले. मी वोटर आइडी दिला. काम झाले. त्यांनी नेट बँकिंगचे पेज उघडून दिले. लॉगिन करून फंड ट्रान्स्फर केला. म्हणजे अमेझोनला माझी बँक,तिथला अकाउंट नंबर, एटीएम, जोडलेला RMN phone no काहीही माहिती नाही.
फक्त अडचण ही आहे की बऱ्याच ठिकाणी अमेझोन पे'चा पेमेंट गेटवे नसतो . QR code scan and pay नाही.
20 May 2023 - 5:04 pm | राजेंद्र मेहेंदळे
२ लाखाच्या वर चार्जेस आहेत ना? चु.भु.द्या.घ्या.
27 May 2023 - 6:33 pm | सस्नेह
UPI payment वर charges आहेत हो.
एकदम वर्षाचे लावतात बॅंका.
21 May 2023 - 10:46 am | कर्नलतपस्वी
कुठले अॅप चांगले आहे म्हणजे जमताराकरां पासून सुरक्षित आहे.
21 May 2023 - 6:21 pm | कंजूस
App वापरण्याची जी पद्धत असते त्यात कुठे चोरांना शिरायला जागा राहिली की त्याचा गैरवापर होतो.
पूर्वी पेमेंट अधिकृत करण्यासाठी ओटीपी नंबर sms मध्ये येत असे आणि app ला sms वाचण्याची परवानगी दिलेली असल्याने तो नंबर घेऊन पेमेंट 'झटकन' केले जायचे.
तर चोरांनी प्रोग्राम बनवून तो ओटीपी मिळवण्यात यशस्वी झाले.
तर यात सुधारणा केली आणि ओटीपी प्रकरण काढले.
UPIPIN नवीन सुरू केला आहे. तर यातही डल्ला मारता येतो का हे मी तपासले.
समजा एटीएम कार्ड आणि RMN वाला फोन चोराच्या हाती लागले आणि फोनचे स्क्रीन लॉक काढता येते.
तर
१)उदाहरणार्थ पेटिएम app उघडले आणि "forgot UPIPIN वर क्लिक केले.
२) "To reset UPIPIN" Enter ATM card details. कार्ड हाताशीच असल्याने ते केले आणि नवीन UPIPIN सेट केला.
३)तो वापरून पेमेंट केले हव्या त्या अकाउंटला.
उदाहरण दुसरे BHIM APP आहे.
या app ला passcode आहे आणि तो चोराला मिळणार नाही आणि पुढे बंदच.
उदाहरण तिसरे Amazon pay wallet.
पेमेंट करण्यासाठी app ची गरज नाही. Amazon page उघडून येते त्यात युजर नेम पासवर्ड टाकून लॉगिन झाल्यावरच wallet open होते आणि पेमेंट करता येते. कोणत्याही डिवाईसमधून चालते. सेफ. पण एक सावधानता बाळगणे जरूरी. पेमेंट झाल्यावर त्या साइटवरून पेमेंट गेटवेतून Amazon pay default set झालेले असते ते काढून टाकावे. नाहीतर wallet ready राहाते.
अर्थात ही पद्धत छोटी पेमेंटस जलद करण्यासाठी नाहीत. कुठे ओनलाइन फी भरणे, ओनलाइन खरेदीसाठी वापरता येतील. तात्पुरते लॉगिन करून काम करणे.
22 May 2023 - 10:57 am | कर्नलतपस्वी
जास्त सुरक्षित वाटते.
युपीआय पकारण आर एम एन व डेबिट कार्ड एकत्र मिळून त्याचा गैरवापर करणे याची शक्यता खुपच कमी वाटते.
कंजूस भौ धन्यवाद.
22 May 2023 - 1:02 pm | चौथा कोनाडा
आता पर्यंत २ वेळा PPF खाते १५ वर्षानंतर वाढवले आहे, शाखेत जाऊन. काहीही अडचण आली नाही.
PPF चे व्याज ऑनलाईन खात्यात दिसते असे आठवते., सेव्हिंग खात्याच्या लॉग इन मध्येच.
22 May 2023 - 2:27 pm | कंजूस
आमचा टॅक्स कन्सल्टंट पूर्वी सांगायचा की ( म्हणजे पैसै भरल्यावर एक शिक्कावाले चलन मिळणे बंद झाले तेव्हा) पासबुकच्या त्या वर्षीच्या पानांच्या फोटो कॉपी रिबेटसाठी लावा. आणि सबस्क्राईब केलेली रक्कम मोठी/दीड लाख असली तर त्या फोटोकॉपीवर बँकेचा शिक्का मारून घ्या. फक्त अकाउंट चालू ठेवायला पाचशे/हजार रु भरले असतील तर साधी फोटो कॉपी/ स्टेटमेंट प्रिंटाउट चालेल.
23 May 2023 - 8:51 am | प्रचेतस
धन्यवाद.
धाग्यातून आणि प्रतिसादांमधूनही उत्तम माहिती मिळत आहे.
23 May 2023 - 1:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चांगली माहितीपूर्ण चर्चा.
फ्लीपकार्टच्या वॉलेटमधून मधून बँक खात्यात पैसे ढकलायची काही सोपी आयडिया आहे का ? परत केलेल्या वस्तूचे पैसे तिथेच गुंतले आहेत. आणि सध्या काही खरेदी करायचा मूड नाही.
फ्लीप्कार्टचं एक शॉप्सी अॅप आहे त्यावर काही गीफ्ट करा मग अकाउंट अॅड करा असे कुटाने दिसले ते सोडून दिलं.
-दिलीप बिरुटे
23 May 2023 - 5:49 pm | कंजूस
//Minimum KYC User
As a minimum KYC user, you cannot withdraw your wallet balance to your bank account under current RBI guidelines. Instead, you can make payments from the PhonePe app using your wallet balance. If you still want to withdraw your wallet balance, you can do so by closing the wallet and withdrawing the balance//
23 May 2023 - 4:27 pm | वामन देशमुख
१. मी (पेटीएम् सारखे) कोणतेही पेमेंट् वॉलेट् अॅप् वापरत नाही.
२. जीपे हे केवळ एकच यूपीआइ अॅप् वापरतो.
३. जीपे हे अॅप् केवळ एकाच बँक खात्याशी जोडलेले आहे.
४. त्या बँक खात्यात केवळ एक-दोन दिवसांच्या खर्चासाठी लागणारी रक्कम ठेवतो.
26 May 2023 - 10:37 am | टर्मीनेटर
१ एप्रिल २०२३ पासून National Payments Corporation of India (NPCI) द्वारे वॉलेट, युपिआई च्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांवर Interchange Fee, Wallet Loading Service Charge अशी शुल्के आकारण्यास सुरुवात केली आहे.
कुठल्याही वस्तू, सेवांवर कर/शुल्क आकारणी करण्याचा सरकारला अधिकार असल्याने उद्या मानवी शरीराकडून 'ड' जीवनसत्वाच्या निर्मितीसाठी होणाऱ्या सूर्यप्रकाशाच्या वापरावर आणि श्वासोच्छवासाच्या प्रक्रियेत हवेतून घेतल्या जाणाऱ्या ऑक्सिजनवर कर/शुल्क तसेच उत्सर्जित होणाऱ्या कार्बन डायऑक्साइड साठी दंड आकारायला सुरुवात केली तरी आश्चर्य वाटणार नाही 😀
अनेक नवीन नियम/धोरण/कायद्यांच्या अंमलबजावणीत विद्यमान सरकारकडून होणारी घिसाडघाई आता नवीन नाही. २४ मार्च २०२३ रोजी NPCI ने परिपत्रक काढून १ एप्रिल २०२३ पासून वॉलेट, युपिआई संबंधित लागू केलेल्या नव्या नियमावलीच्या बाबतीतही तोच प्रकार बघायला मिळतोय. GST च्या दर निश्चितीच्या बाबतीत सुरुवातीला जशी परिस्थिती होती तशीच संभ्रमाची परिस्थिती आता प्रीपेड वॉलेट, पोस्टपेड, युपिआई वरील Interchange Fee बाबतीत आहे.
पेटीएम, गुगल पे, फोन पे, अमेझॉन पे, मोबिक्विक आणि तत्सम प्रीपेड वॉलेट वरून केलेल्या सर्व आणि युपिआई वरून केलेल्या २००० रुपयांच्या वरच्या पेमेंट वर विक्रेता/सेवादात्यांना ०. ५ % ते १. १% (+GST) असा Interchange Fee चा दर आहे. इंधन, शैक्षणिक, कृषी आणि अत्यावश्यक प्रकारात मोडणाऱ्या वस्तू/सेवांसाठी ०. ५% तर अन्य प्रकारच्या वस्तू/सेवांसाठी केलेल्या पेमेंट साठी १. १%. पोस्टपेड साठी हा दर अजून जास्ती असावा, गेल्या महिन्यात मी पेटीएम पोस्टपेड वरून १२०० आणि ४२०० रुपयांची दोन पेमेंट्स केली होती त्यावर व्हेंडरला अनुक्रमे २९ आणि ९८. ५० (Rounded off) रुपये कापून उर्वरित रक्कम प्राप्त झाल्याचे त्याने नंतर कळवले.
अर्थात सध्यातरी Interchange Fee हि वरील प्रकारात मोडणाऱ्या 'मर्चंट्स' साठी लागू असून नातेवाईक किंवा मित्रमंडळींना पाठवलेल्या पैशांवर लागू नाही. तसेच ज्यांना महिन्याला ५०,००० रुपये किंवा त्यापेक्षा कमी रक्कम युपिआई वरून प्राप्त होते अशा छोट्या विक्रेते आणि सेवादात्यांनाही हे शुल्क लागू होणार नाही वगैरे गुंतागुंतही ह्यात समाविष्ट आहे.
एकंदरीत ह्या नव्या नियमावलीत कुठलीही सुस्पष्टता/सुटसुटीतपणा नसल्याचे वरकरणी दिसून येत आहे. त्यात व्य्सवस्थित पूर्वकल्पना न देता परिपत्रक काढल्यापासून केवळ आठ दिवसांत हे नियम लागू करण्यात आल्याने आता महिन्याच्या शेवटी एकूण किती पैसे कापले गेलेत हे बँक स्टेटमेंटमध्ये तपासून पाहिल्यावर व्हेंडर्स/मर्चंट्स मध्ये हळूहळू नाराजी वाढताना दिसून येत आहे.
सध्यातरी हा सर्व भार मर्चंट्सवर पडत असला तरी उद्या ते तो भर ग्राहकांवर टाकण्याची शक्यता बरीच आहे (काही ठिकाणी त्याला सुरुवातही झाली आहे हे तुम्ही दिलेल्या UTS च्या उदाहरणावरून लक्षात येतंय!) तसेच सध्या प्रीपेड वॉलेट मध्ये पैसे भरताना आता ०. १५% Wallet Loading Service Charge वॉलेट सेवादात्यांना (वापरकर्त्याच्या) बँकेला द्यावा लागतोय तो हि ते वापरकर्त्यांकडून वसूल करण्याची किंवा प्रीपेड वॉलेट हा प्रकारच इतिहासजमा होण्याची शक्यता आहे.
26 May 2023 - 10:50 am | कुमार१
हे भारीच !
यावरून जॉर्ज हरिसन यांचे हे दीर्घ वाक्य प्रसिद्ध आहे :
26 May 2023 - 10:57 am | टर्मीनेटर
जॉर्ज हरिसन रॉक्स... 😀
26 May 2023 - 12:20 pm | टर्मीनेटर
वॉलेट, युपिआई ह्या पर्यायांकडे मी केवळ झटपट डिजिटल पेमेंट करण्यासाठी आणि स्वीकारण्यासाठीची एक उत्तम 'सोय' म्हणून पहातो आणि त्यांचा उपयोग दैनंदिन जीवनात बऱ्यापैकी होत असल्याने त्यांच्या वापराचा माझ्यासाठी सोयीस्कर असा खालीलप्रमाणे एक पॅटर्न मी तयार केला आहे.
वॉलेट प्रकारात फक्त 'पेटीएम वॉलेट' चा उपयोग पूर्वी करत असे. लॉकडाऊन काळात Paytm Payments Bank आणि कोटक महिंद्र बँकेचे प्रत्येकी एक झिरो बॅलन्स अकाउंट घरबसल्या (ऑनलाईन/व्हिडीओ KYC होत असल्याने) उघडले होते. आता वॉलेटचा वापर शून्य असून अँड्रॉइड फोनवर 'पेटीएम से UPI' आणि 'पेटीएम पोस्टपेड' चा वापर करतो, त्याला पेटीएम पेमेंट्स बँकेचे झिरो बॅलन्स सेविंग अकाउंट लिंक्ड आहे तर (गुगलच्या सर्वच उत्पादनांच्या वापरात गोपनीयता शून्य असल्याने) आयफोनवर सर्व परवानग्या नाकारून इन्स्टॉल केलेले 'गुगल पे' वापरतो, त्याला कोटक बँकेचे '८११' हे झिरो बॅलन्स सेविंग अकाउंट लिंक्ड आहे. ह्याचा फायदा असा कि वॉलेटमध्ये पैसे अडकवून ठेवण्यापेक्षा आवश्यकते नुसार ह्या दोन झिरो बॅलन्स सेविंग अकाउंट मध्ये पैसे ट्रान्सफर करता येतात (त्यात शिल्लक राहिलेल्या रकमेवर महिनाअखेरीस किरकोळ व्याजही मिळते 😀), app मध्ये बॅलन्स चेक करता येतो आणि त्वरित मेसेजही येतो त्यामुळे महिन्याभरात त्यावर केलेल्या देवाणघेवाणीचा कितीही एंट्री झाल्या तरी काही फरक पडत नाही. ज्याठिकाणी पेटीएमचा QR कोड असेल तिथे पेटीएम पोस्टपेड वरून केलेल्या पेमेंट्सचे बिल पुढच्या महिन्याच्या १ तारखेला जनरेट होते आणि ७ तारखेला ते भरायचे असल्याने माफक Convenience fee च्या बदल्यात हि चांगली सुविधा मिळते. अन्य QR कोड असतील तिथे गुगल पे वपरतो!
29 May 2023 - 8:38 pm | कंजूस
१) पेटीएमसाठी (डिजिटल अकाऊंटसाठी) प्रयत्न केला पण आता "no more new accounts requests accepted" संदेश आला. सोडलं.
२) मग कोटक ८११ कडे गेलो. ते उघडले.
२-१) KYC अत्यावश्यक आहे. त्यासाठी दोन पर्याय दिले आहेत. कोटक बँकेची भेट ठरवून KYC ची पत्रके सादर करणे किंवा व्हिडिओ वेरिफिकेशन. तर विचार केला की बँक फार दूर नाही तरीही डिजिटल ओनलाइन खात्याचे सर्वच ओनलाइन करूया. दुसऱ्या पर्यायाची दिलेली तयारी करून ते केले. PAN कार्ड दाखवणे,सही दाखवणे,सेल्फी फोटो घेऊ देणे इत्यादी.
३) ते झाल्यावर थोड्या वेळाने संदेश आला की full KYC completed. Get your ATM/credit cards वगैरे.
४) ATM card "virtual debit card" किंवा physical मिळते. virtual डेबिट कार्ड फ्री आहे ते app मध्येच दिसते. डिटेल्स लिहून घेतले. डिसेंबर २०२९ पर्यंत valid.
५) तर या कार्डाने पेटिएम युपिआइ जोडले.
६) दुसऱ्या एका पेटिएममधून या अकाउंटला फंड वाढवला.
७) चाचणी. रेल्वेच्या लोकल तिकिटाच्या UTS app वर यातून UPI pamentने तिकिट घेतले. सर्विस चार्ज नाही लागला.
यशस्वी.
26 May 2023 - 6:22 pm | कंजूस
१) UTS हे रेल्वेचे मुंबई लोकल ट्रेनचे तिकिट काढण्यासाठीचे app. विविध अडचणी आहेत पण इथे सांगायचे म्हणजे तिकिट UPI पद्धतीने खरेदी केल्यास टॅक्स नाही. पण वॉलेट मधून खरेदी केल्यास निरनिराळे सर्विस चार्जेस लागणार हे तिथे दिले आहे. ("Charges as applicable" ) screen shot निघत नाही पण दुसऱ्या फोनचे फोटो निघतो. तर मुख्य गोष्ट म्हणजे पाच रुपयाच्या तिकिटावरही अधिक पैसे लागत आहेत. UPI ने प्रत्येक पाच,दहा,पंधरा रुपयांची एन्ट्री बँक पासबुकाला होणार ती नको आहे.
२) "Paytm से upi" नावाचे Android app आहे पण "Paytm Wallet" नावाचे वेगळे app नसून ते "Paytm से upi" या app मध्येच दडवलेले आहे. त्यामुळे नक्की कोणत्या प्रकारे पेमेंट होत आहे हे लक्ष ठेवावे लागेल.(यावर प्रकाश टाकावा) कारण चार्जेस लागणार/ बँक एन्ट्री होणार.
३) सुरक्षितता
CNBC AWAAZया चानेलचा 'Tech Guru' कार्यक्रम मोबाईलसाठी असतो. यामध्ये विविध सिक्युरिटी एक्सपर्टसना मुलाखतीसाठी बोलवत. ते नेहमी सांगत की नेट बँकिंग किंवा डायरेक्ट कार्ड पेमेंट टाळा. पेमेंट वॉलेट वापरा. कारण धोका झाला तर फक्त वॉलेट्सचा बॅलन्स,शिल्लक उडेल पण अकाउंटला धोका नाही. परंतू आता 'घी देखा लेकिन बडगा नहीं देखा' ही परिस्थिती उद्भवली.
४)मी युपिआइ/किंवा वॉलेटसच्या वापराच्या खटाटोपीत का पडलो? अगोदर काय करत होतो?
पूर्वी विविध ओनलाइन खरेदी, फोन रीचार्ज/डीटीएच रीचार्ज वगैरे यासाठी पेमेंट गेटवेमध्ये sbi net banking पर्याय असे तो सर्वांनी काढून टाकायला सुरू केलंय. (देशातल्या सर्व बँका असतात पण State Bankचे नाव नसते!?) काहीतरी कट शिजतो आहे. वॉलेट मध्ये 'Amazon Pay' नसते. ( विकिचे डोनेशन पेज उघडून पाहा.)मग दुसरे पर्याय शोधावे लागले. पेमेंट गेटवेमध्ये ध्रुवीकरण होत आहे.(श्रेय- @शाम भागवत काका)
५) एक नवीन गोष्ट कळली.
कोणत्याही फोनमधून ओनलाइन खरेदी करायची मग पेमेंट गेटवेमध्ये "Enter UPI I'd" दिसेल तिथे तो टाकायचा. (Paytm /BHIMवगैरे.) ते app दुसऱ्याच फोनमध्ये ठेवले आहे आहे तिथे मेसेज येतो. तिथे लॉगिन करून "पे" क्लिक केल्यावर काम होते.
26 May 2023 - 10:15 pm | शाम भागवत
😁
27 May 2023 - 6:17 pm | टर्मीनेटर
१)
लोकल ट्रेनचा प्रवास फारच कमी वेळा होत असल्याने UTS अॅप कधी वापरले नाही त्यामुळे त्याबद्दल विशेष काही माहिती नाही. कधी वेळ आलीच तर तिकीट काढण्यासाठी स्टेशन वरील ATVM चा वापर करतो. त्यावर QR कोड स्कॅन करून UPI ने पेमेंट करता येत असल्याने ते सोयीचे पडते.
अशा कॅशलेस व्यवहारांसाठी 'वॉलेट' ऐवजी एक पेपरलेस झिरो बॅलन्स 'मोबाईल फर्स्ट' अकाउंट उघडणे हा चांगला सुरक्षित पर्याय आहे. त्यासाठी संपूर्ण ऑनलाईन प्रक्रिया असल्याने घरबसल्या काही मिनिटांत अकाउंट उघडता येते. वॉलेट लोड करण्याऐवजी तेच पैसे ह्या अकाउंट मध्ये ठेवायचे. त्यात पाच,दहा,पंधरा रुपयांच्या कितीही एन्ट्री आल्या तरी काय फरक पडतो, कुठे पासबुक प्रिंट करून आणायचंय 😀 गरज भासल्यास ऑनलाईन स्टेटमेंट तपासता येते!
अशा झिरो बॅलन्स मोबाईल फर्स्ट अकाउंट्स साठी "Paytm Payments Bank*", "Airtel Payments Bank", "Jio Payment Bank" आणि "Kotak 811 Digital Savings Account" हे चांगले पर्याय आहेत. ह्या अकाउंट बरोबर व्हर्चुअल डेबिट कार्डही मिळते ज्याचा उपयोग ऑनलाईन खरेदीसाठी करता येतो.
(*Paytm वापरकर्त्याने आधी KYC प्रक्रिया पूर्ण केली नसल्यास KYC appointment बुक करावी किंवा जवळच्या KYC पॉइंटला भेट द्यावी.)
२)
त्यासाठीच तर मला पेटिएम जास्त आवडते, वेगवेगळी अॅप्स इन्स्टॉल करावी लागत नाहीत. वॉलेट, UPI, त्यांचे बँक अकाउंट, पेटीएम पोस्टपेड सर्व एकाच अॅप मध्ये मिळते. त्यातल्या वॉलेट मध्ये पैसेच ठेवले नसतील तर जे पेमेंट होईल ते बँक अकाउंट मधूनच होणार त्यामुळे चार्जेस लागण्याचा प्रश्नच येत नाही.
३)
वर उल्लेख केल्या प्रमाणे वॉलेट ऐवजी एखाद्या 'मोबाईल फर्स्ट' अकाउंटचा वापर केला तर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे 'धोका झालाच तर' फक्त त्या दुय्यम अकाउंटचा बॅलन्स, शिल्लक उडेल पण तुमच्या मुख्य बँक अकाउंटला धोका नाही!
४)
कट वगैरे काही शिजत नाहीये हो 😀
मागे (मला वाटतं मनीकंट्रोल डॉट कॉमवर) त्याविषयी एक छान अभ्यासपूर्ण असा विश्लेषणात्मक लेख वाचला होता. त्यातले काही मुद्दे आठवतात ते असे,
भारतात प्रतिदिन UPI / PPI (Prepaid Payment Instruments-वॉलेट ह्या प्रकारात मोडतात) द्वारे होणाऱ्या ट्रान्झॅक्शन्स पैकी ५०% व्यवहार हे २०० रुपयांपेक्षा कमी रकमेचे असतात ज्यात पाच-दहा रुपयांपासून शंभर रुपयांपर्यंचे व्यवहार बहुसंख्य असतात. तांत्रिकदृष्ट्या ट्रान्झॅक्शन किती रकमेचे आहे हे महत्वाचे नाही पण दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या नेट बँकिंग आणि अन्य डिजिटल पेमेंट्सच्या संख्येमुळे कोअर बँकिंग सिस्टीमवरचा ताण वाढत आहे, परिणामी Failed Transactions चे प्रमाणही वाढत आहे. अशा अयशस्वी व्यवहारांतून देणाऱ्याच्या खात्यातून पैसे डेबिट होणे पण घेणाऱ्याच्या खात्यात क्रेडिट न होणे वगैरे प्रकार अनेकदा होतात. मग ते गेलेले पैसे पुन्हा आपल्या अकाउंटला येण्यासाठी मर्चंट कडे आणि बँकेकडे तक्रार करणे, त्याचा पाठपुरावा करणे अशा गोष्टी कराव्या लागतात. अशा Failed Transactions च्या घटनांमध्ये तिच्या प्रचंड मोठ्या खातेदारांच्या संख्येमुळे SBI चा वाटा अर्थातच सर्वाधिक आहे.
असे अयशस्वी व्यवहार मग तो पैसे देणारा असो कि घेणारा, दोघांसाठीही तापदायक असतात. वारंवार असे अनुभव येत असतील तर घेणाऱ्याने त्यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या SBI ला आपल्या पेमेंट साठीच्या पर्यायांमधून डच्चू देणे स्वाभाविक आहे 😀
उलट माझ्या मते त्यात चांगली स्पर्धा निर्माण झाली आहे. (खरंतर हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे)
पूर्वी पेमेंट गेटवेसाठी PayPal, ICICI, HDFC, Axis Bank असे मर्यादित पर्याय उपलब्ध होते पण आता CCAvenue, Instamojo, PayU, Razorpay, Cashfree Payments, JusPay, Paytm आणि अन्य दहा-बारा चांगले पर्याय उपलब्ध असल्याने भारतीय ईकॉमर्स क्षेत्रात एकप्रकारे क्रांती झाली आहे. पूर्वी खर्चिक असल्याने मूठभर लोकांना परवडणारा हा प्रकार आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात आल्याने हजारो लहानमोठ्या उद्योजक/व्यापारी/उत्पादक/व्यावसायिकांना e-commerce क्षेत्रात प्रवेश करता आला.
५)
ऑनलाईन खरेदी करताना असा UPI आयडी किंवा VPA (Virtual Payment Address) टाकल्यावर आपल्याला आलेली पेमेंट रिक्वेस्ट अॅक्सेप्ट करून पेमेंट करण्याचा हा पर्याय मला सर्वात सुरक्षित वाटतो. काही कारणाने ती खरेदी रद्द करण्याचा विचार मनात आला तर त्यासाठी मिळणारा काही मिनिटांचा हा अतिरिक्त वेळ फायदेशीर ठरु शकतो 😀
27 May 2023 - 8:35 pm | धर्मराजमुटके
आपल्या माहितीसाठी :
पेटीएम पेमेंट बँकेला साधारण एक वर्षापासून नवीन बचत खाती उघडायला बंदी केली आहे. आहे तीच अकाऊंट चालविली जाऊ शकतात.
27 May 2023 - 11:40 pm | टर्मीनेटर
मार्च २०२२ मध्ये KYC आणि IT ऑडिट विषयक कारणांसाठी घातलेली बंदी संबंधित compliance पूर्ण केल्यावर उठवली असावी. त्यांच्या वेबसाईटवर बघता नविन सेविंग अकाउंट साठी app उघडून खाते कसे उघडावे ह्याची माहिती दिली आहे तर नविन करंट अकाउंट उघडण्यासाठीचा फॉर्मही उपलब्ध आहे.
तरी खात्री करून घेण्यासाठी दुसऱ्या फोनवर नवीन खाते उघडण्यासाठी फॉर्म भरला तेव्हा KYC प्रक्रियेपर्यंत निर्विघ्नपणे पोचलो (माझे एक खाते तिथे असल्याने अर्थातच KYC प्रक्रिया पूर्ण केली नाही) त्याचा स्क्रिनशॉट सुरक्षिततेच्या कारणास्तव घेता येत नसला तरी दुसऱ्या फोनवरून काढलेला फोटो खाली देत आहे.
पेटीएमच्या वेबसाईटवरील (१ फेब्रुवारी २०२३ रोजी अद्ययावत केलेली) हि ब्लॉग पोस्ट पाहता सर्व काही सुरळीत झाले असावे असं वाटतंय. ज्यांचे तिथे खाते नाही अशांपैकी कोणी प्रयत्न करून पाहिल्यास नक्की काय स्टेटस आहे ते कळू शकेल.
29 May 2023 - 11:49 pm | कंजूस
तसाच मेसेज आला होता.
27 May 2023 - 9:13 pm | कंजूस
फार पूर्वी कोणत्यातरी बँकेचं अकाउंट गंमत म्हणून उघडलं होतं. पण ते आठवत नाही. कोटक असावं.
______________________
UTS app ची गरज का भासली? अडचणी काय आहेत?
(हे या धाग्याच्या विषयाला धरून नाही तरी मांडतो.)
समजा प्रवासी पुणे मुंबई जाणाऱ्या गाडीने पुणे ते कल्याण तिकिट रिझर्व्ह करून जात आहे. त्याला कल्याणला उतरून कसाराकडे जाणारी लोकल रेल्वे पकडायची आहे तर कल्याणला उतरून बाहेर जाऊन तिकिट काढून आत यावे लागते. जड सामान बरोबर असेल तर हा खटाटोप होतो. यासाठी लोकल तिकिट काढण्याचे app म्हणून UTS वापरू म्हणेल तर निराशाच होते. भंपक app आहे. तो भंपकपणा ट्विटरवर रेल्वेला कळवला आहे. बघू काय होतं.
27 May 2023 - 9:29 pm | धर्मराजमुटके
प्रवाशाने ट्रेन च्या प्लॅटफॉर्मवर प्रवेश करायच्या अगोदर तिकिट घेणे आवश्यक आहे अन्यथा तो विनातिकिट मानला जातो. या नियमामुळेच युटीएस अॅप प्लॅटफॉर्मवर किंवा चालू गाडीत तिकिट काढू देत नाही. शिवाय बरेच फुकटे टीसी दिसला तरच पटकन अॅप उघडून तिकिट काढतील अन्यथा विनातिकीट प्रवास करतील ते टाळण्यासाठी ह्या मर्यादा असाव्यात असे वाटते. मात्र इतर भंपकपणा बद्द्ल सहमत आहे. माझा फोन एकदा फॉरमॅट केला तर पुन्हा अॅप टाकायला अडचणी येत आहेत. कस्टमर केअर ला फोन करा म्हणतात पण त्या अॅपमधे दिलेल्या क्रमांकावर एकतर कोणी फोन उचलत नाही किंवा बहुतेक लागतच नाही. कंटाळून तो नाद सोडून दिला आणि गपगुमान मासिक पास काढला.
रेल्वेचे "यात्री अॅप" पण असेच गंडलेले आहे. त्यापेक्षा "एम-इंडिकेटर" खूपच चांगले आहे.
29 May 2023 - 10:36 pm | Trump
धन्यवाद. चांगला पर्याय आहे.
27 May 2023 - 9:07 pm | धर्मराजमुटके
खरे तर युपीआय अॅप साठी आणि बँकींग साठी वेगवेगळा मोबाईल क्रमांक असला तरी ते एक वापरता यायला हवे अशी काहीतरी सुविधा असावी.
27 May 2023 - 9:33 pm | धर्मराजमुटके
आधार साठी एक क्रमांक, बँक खात्यासाठी दुसरा आणी वॉलेट साठी तिसराच मोबाईल क्रमांक आहे आणि तरीही युपीआय वॉलेट वाले खाते उघडणे शक्य झाले पाहिजे.
इंडियन पोस्ट पेमेंट बँक आणि एन.एस.डी.एल. चे पेमेंट बँक सुविधा वापरणारे कोणी इथे आहे काय ? सेवा कशी आहे ?
28 May 2023 - 5:55 am | कंजूस
मागच्या आठवड्यात hotstar ची वर्गणी भरली.
मोबाईलसाठी (एका) रु १४९/- तीन महिने आहे. ज्या मैबाईलमध्ये पाहायचे आहे त्यात Paytm नाही. पण upiid टाकला. जिथे ज्या फोनमध्ये तो आहे तिथून पेमेंट केले.