आज डलहौसीहून मुक्काम हलवून खज्जियारला जायचे होते. आतापर्यंचा गीतांजली हॉटेलचा अनुभव खुपच चांगला होता. येथील खोल्या, अतिथ्यशील कर्मचारी, जेवण सर्वच चांगले. नाश्ता वगैरे आटोपून बिल भरण्यासाठी काउंटरला पोहचलो. हिमाचल प्रदेश पर्यटन मंडळाच्या हॉटेलचे ऑनलाईन बुकिंगची सोय आहे व तिचा फायदा आम्ही घेतला होता. बुकिंग करतांना एकाच वेळी अनेक खोल्यांचे एकत्र बुकिंग करता येते. ऐनवेळी आमच्या सहलीतील काही जण कमी झाल्याने आठ दिवस आधी आम्ही दोन खोल्या रद्द करण्याचे ठरविले. पण मंडळाच्या साईटवर आपल्या आरक्षणातील एक किंवा काही खोल्या रद्द करण्याचा पर्यायच नाही. एका तिकिटावरचे सर्व आरक्षणच रद्द होते. तसे झाले तर आर्थिक फटकाही बसला असता आणि ऐनवेळी नवीन आरक्षणही मिळाले नसते. शिमल्याच्या मुख्य कार्यालयात ई मेलवर संपर्क साधून खोल्या रद्द झाल्या पण परताव्याच्या रकमेची वजावट हॉटेलमधील जेवण खर्चात केली जाईल असे आम्हाला कळविण्यात आले. काउंटरवर मात्र आम्हाला असे काहीच कळविण्यात आलेले नाही असे सांगण्यात आले. आम्हाला आलेला ई मेल दाखविल्यावर संगणकात काहीतरी खुडबुड केल्यावर अखेर त्यांना तो मेल मिळाला व आमच्या बिलाचा मार्ग मोकळा झाला. वास्तविक पर्यटन व्यवसायात अशी अडचण नेहमीच येत असणार तरी सुधारणा का नाही? सरकारी यंत्रणा इतकी सुस्त का? वेळोवेळी सॉफ्टवेअर अपडेट करणे इतके अवघड आहे का? बुकिंग करताना पैसे आगाऊ घेतले जातात. ज्या खात्यातून पैसे आले तेथेच परतावा लगेच का मिळू नये? अनेक प्रश्न आहेत पण बाकी अनुभव खूप चांगले असल्याने काही गोष्टींकडे दुर्लक्ष केले.
डलहौसी ते खज्जियार अंतर फक्त २० किमी किंवा एक तास. पण वाटेतील ठिकाणे पाहत तेथे पोहचायला आम्हाला संध्याकाळ होणार होती. डलहौसीत राहूनही सर्व ठिकाणे करता येण्यासारखी आहेत पण पूर्वी म्हटल्याप्रमाणे एका वेगळ्या ठिकाणी राहण्याचा अनुभव घेण्याचा दृष्टीने आम्ही मुक्काम हलविण्याचे ठरवले होते.
आजचे पहिले ठिकाण डलहौसीतीलच 'पंचपूला"
काही साहसी खेळ, आणि काही ट्रेकचा सुरवातीचा पॉईंट याकरिता हे ठिकाण प्रसिद्ध. उंडोंगरातून खाली येणार झरा, हिरवीगार झाडी असे शांत व रमणीय वातावरण. अनेक झऱ्यांचे पाणी येथे एकत्रीत होते जो डलहौसीच्या काही भागांसाठी पाण्याचा स्रोत आहे.
स्वातंत्र्य सैनिक सरदार अजितसिंग यांचे स्मारकही येथे आहे.
झऱ्याच्या बाजूने थोडेसे वर जाऊन फोटोग्राफी केली व परत फिरलो. पायथ्याशी भेटवस्तू, गरम कपड्यांची बरीच छोटी छोटी दुकाने आहेत. घरासाठी लाकडी फळीवर अगदी ५-१० मिनिटात नाव लिहून देणारे अनेक चित्रकारही येथे आहेत. अशा वेगवेगळ्या नेम प्लेट बनवायची थोडीशी आवड मुलीला असल्याने तिने वेगवेगळ्या आकाराच्या काही फळ्याच तेव्हड्या विकत घेतल्या.
डलहौसी ते खज्जियार रस्ता खूप सुंदर आहे. डलहौसीतून बाहेर पडता पडता दिसणाऱ्या
रहिवाशी शाळा, त्यांची रंगसंगती, त्यांच्या बाजूचे कुंपण व त्यांनी राखलेले सुंदर बगीचे यामुळे येथून प्रवास करायला खूपच छान वाटते. त्यापुढे गेल्यावर दिसणारे लांबपर्यंतचे डोंगर, दऱ्या यामुळे खज्जियारपर्यंचा छोटासा प्रवास खूपच हवाहवासा वाटणारा. डलहौसी पब्लिक स्कुलच्या आवारातील बीजी'स पार्क (Beeji's Park) हे असेच एक सुंदर ठिकाण. भारतमातेच्या सेवेसाठी आपल्या मुलांना पाठविणाऱ्या सर्व आईंना हे ठिकाण समर्पित. युद्धासाठी वापरात आलेली काही आयुधे, त्यांच्या प्रतिकृती येथे ठेवण्यात आल्या आहेत. १०-१५ मिनिट येथे थांबून फोटोग्राफीसाठी हे एक सुंदर ठिकाण.
येथून थोड्याच वेळात आम्ही लक्कड मंडी भागात पोहचलो. येथून डलहौसी भागातील सर्वात उंच शिखर 'दैनकुंड' साठी ट्रेकची सुरुवात होते. झाडीतून सळाळत वाहणाऱ्या वाऱ्यामुळे संगीतमय आवाज निर्माण होतात त्यामुळे हे ठिकाण 'सिंगिंग हिल्स' म्हणूनही ओळखले जाते.
बेस कॅम्प पासून ४ किमीचा हा ट्रेक अगदी अवघड नसला तरी बऱ्यापैकी थकवणारा आहे. शिखरापर्यंत जाण्यासाठी काही ठिकाणी काँक्रिटच्या पायऱ्या (दिड-दोन किमी) तर काही ठिकाणी चढ उताराचा कच्चा रस्ता (दिड-दोन किमी) आहे. चढायला सुरुवात केल्यावर उजव्या बाजूस दूरपर्यंत पसरलेली लष्करी वायू दल तळाची जागा दिसते.
जसजसे उंच जावे तसे डोंगर-दऱ्या यांचे नजारे अधिकच सुंदर भासू लागतात. सुरुवातीला काही पायऱ्या चढल्यावर ग्रुपमधील काही जण थांबायचा विचार करत होते परंतु इतके सुंदर वातावरण व दृश्य पाहून हळू हळू का होईना पण वरपर्यंत पोहचायचेच असा सगळ्यांनी निर्धार केला.
शिखर. शिखराहून ३६० अंशात या भागाचा सुंदर नजारा दिसतो.
शिखराच्या मागे पोहलाना देवीचे सुंदर मंदिर आहे.
येथून कैलास पर्वताचे दर्शन होते.
येथील स्टॉलवर चहापाणी झाले.
थोडे थांबून उतरायला सुरुवात केली. बारा वाजता चढायला सुरुवात केलेला हा ट्रेक संपवून आमही दोन वाजता परत खाली पोहचलो होतो.
येथून पुढच्या १०-१५ मिनिटात 'काला टॉप' अभयारण्यात जाणाऱ्या रस्त्याच्या तोंडाशी पोहचलो. (परत लक्कड मंडी येथूनच) रस्ता दगड धोंड्यांचा असल्याने आपली गाडी येथेच सोडलेली बरी. देवदारच्या घनदाट जंगलातून पुढे तीन किमी चालत जाण्यास खूप आवडले असते पण नुकतेच दैनकुंडचा ट्रेक केल्याने चालायची ताकत नव्हती. येथून सहा आसनी छोट्या गाड्या भाड्याने मिळतात त्यापैकी दोन ठरवल्या, यांचे निश्चित असे दर नाहीत. जाऊन-येऊन एका गाडीचे रु.१०००/- दिले. कालाटॉप साठी प्रत्येकी प्रवेश फी नाही परंतु प्रति गाडी २५०/- भरावे लागतात ते आमच्या गाडी भाड्यात (म्हणजेच एक हजारात) समाविष्ट आहेत असे सांगण्यात आले. तिकीट नाही मिळाले. अडीचशे रुपये कोणाच्या खिशात गेले माहित नाही.
ओक,पाईन ,देवदार वृक्षांनी नटलेली हिरवाई व त्यामधून नजरेस पडणाऱ्या पर्वतरांगा. दरी-खोरी हे येथील वैशिष्ठ. अभयारण्यात अस्वल, बिबट्या, कोल्हे, वानर यांचा वावर आहे. जाताजाता अनेक ठिकाणी उन्मळून पडलेले मोठेमोठे देवदार वृक्षही दिसत होते.
अशाच एका आडव्या पडलेल्या देवदार वृक्षाच्या लांबच लांब बुंध्यावर चढून परिसराचा आनंद उपभोगणाऱ्या आम्ही सर्व जणी
सन १९२५ मध्ये बांधलेले वन विभाग विश्रामगृह(समुद्रसपाटीपासून उंची ८००० फूट).याचे बुकिंग बहुतेक वनविभागाच्या मुख्य कार्यालयातूनच केल्या जाते. (डलहौसी किंवा चंबा असावे)
येथून दिसणारी दरी व पर्वत रांगा. दरीतून हळूहळू वर येणाऱ्या ढगांचे विलोभनीय दृश्य
थंड वातावरणात मिळालेली गरमागरम भजी.
साडे चार वाजले होते.विश्रामगृहाच्या हिरवळीवर बसून थोडा आराम केला व निघालो. एकही प्राणी नजरेस पडला नाही पण येथील हिरवाई, डोंगर पाहून मन तृप्त झाले होते.
आणि पुढील फक्त पाऊण तासात आम्ही 'मिनी स्वित्झर्लंड अर्थात खज्जियार' या ठिकाणाला पोहचलो.
धुक्यात हरवलेले आमचे हिमाचल प्रदेश पर्यटन विभागाचे हॉटेल 'देवदार"
तळमजल्यावरील चार जणांसाठीची सुंदर खोली
क्रमश:
पुढील व अंतिम भाग लवकरच
प्रतिक्रिया
14 Feb 2023 - 3:17 pm | प्रचेतस
निसर्गसौंदर्याने परिपूर्ण असलेला हा भाग आवडला. खज्जियारबद्द्ल प्रथमच ऐकलं. हॉटेल देवदारचं प्रथम दर्शन जबरदस्त एकदम.
14 Feb 2023 - 7:18 pm | Bhakti
पाईन ,देवदार वृक्षांनी नटलेली हिरवाई व त्यामधून नजरेस पडणाऱ्या पर्वतरांगा. दरी-खोरी हे येथील वैशिष्ठ. वाह,Gymnosperm झाडांचे सौंदर्य :)
खज्जियार उर्फ मिनी मिनी स्वित्झर्लंड बद्दल उत्सुकता!
15 Feb 2023 - 12:27 pm | अनिंद्य
सुंदर निसर्ग !
BTW , तिकडे सगळीकडे मॅगीच खातात का ? (भजी आहेत फोटोत तरी सर्वांचेच हिमाचलातले वृत्तांत मॅगीयुक्त असतात म्हणून विचारले) :-)
15 Feb 2023 - 11:45 pm | टर्मीनेटर
तिथल्या थंड हवेत (पटकन बनवून मिळणारा) गरमागरम पदार्थ म्हणून बरेचसे (सो कॉल्ड हेल्थ कॉन्शस) पर्यटक 'मॅगी' खातात. वास्तविक हिमाचल प्रदेश मध्ये जेवण आणि अल्पोपाहारासाठी अन्य पदार्थही उपलब्ध असतात.
कुलू मध्ये काबुली चण्यांची उसळ (छोले), विविध चटण्या आणि दही घातलेले 'समोसा चाट' एकदम वर्ल्ड फेमस, मनाली आणि सिमल्यात तर जे आवडीचे ते छान चवीचे मिळेल अशी परिस्थिती (बटाट्याचे पदार्थ सोडून, कारण तिथले बटाटे चवीला खूपच गोड असतात, त्यामुळे मलातरी आवडत नाहीत.).
खज्जियार आणि सिमल्यातल्या ('ऐतिहासिक सिमला करार' ज्या बंगल्यात झाला होता त्या) परिसरात मिळणारा 'आलू पराठा' थोडा वेगळाच भासला! तव्यावर भाजलेला 'आलू पराठा' आक्खाच्या अक्खा मोठया कढईत तळून मग सर्व्ह करतात. मी हेल्थ कॉन्शस वगैरे प्रकारात मोडणारा नसलो तरी हा प्रकार पूर्णपणे खाऊन संपवणे माझ्या आवाक्या बाहेरचे आहे 😀
अर्थात वर उल्लेखिलेले पदार्थ हे 'स्ट्रीट फूड' प्रकारात मोडणारे आहेत, हॉटेल्स आणि रेस्टोरंटस मध्ये दर्जेदार खाद्यपदार्थ मिळतात ह्याची नोंद जरूर घ्यावी! बाकी आड वाटेवर / तिबेटी लोकांचे प्राबल्य असलेल्या ठिकाणी 'मोमो'ज आणि वाशाळ 'चाउमिन' पेक्षा मॅगी खाण्याला प्राधान्यक्रम देणे अनिवार्य ठरते 😂
16 Feb 2023 - 10:10 am | गोरगावलेकर
माझ्यावतीने परस्पर खुप चांगली माहिती दिलीत जी मलाही सांगता आली नसती! धन्यवाद. संपूर्ण सहलीत पराठे व सोबत दही खूप हादडले आहे.
16 Feb 2023 - 10:03 am | गोरगावलेकर
आपण म्हणतात ते खरंय पण हि.प्र.किंवा इतर कुठल्याही ठिकाणचा ट्रेक म्हटलं तर हीच परिस्थिती असू शकते. कल्पना करा, आपण सकाळी नऊला हॉटेल सोडले आहे. ट्रेकिंग करत वस्तीपासून खूप दूरवर आलो आहोत, दुपारचे दोन वाजले आहेत, आपण खूप दमलो आहोत, भूकही सडकून लागली आहे, खाण्यासाठी पर्यायही नाहीत, थंड वातावरण आहे, अशात गरमागरम मॅगी पुढ्यात आली तर काय होईल? अहाहा!
16 Feb 2023 - 10:08 am | गोरगावलेकर
हा प्रतिसाद अनिंद्य यांच्यासाठी होता
16 Feb 2023 - 12:17 pm | अनिंद्य
जय हो !
मला मॅगी आणि त्यासारखे गिळगिळीत / स्लायमी टेक्सचरचे कोणतेच पदार्थ आवडत नाहीत, त्यामुळे हा प्रश्न होता :-)
बाकीही सर्व मिळतंय म्हणता मग तर बेस्टच :-)
15 Feb 2023 - 11:09 pm | टर्मीनेटर
छान भाग! आता अंतिम भागाच्या प्रतिक्षेत...
16 Feb 2023 - 9:58 am | गोरगावलेकर
प्रचेतस, Bhakti, अनिंद्य, टर्मीनेटर प्रतिसादाबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार.