आज पालमपूरचे हॉटेल सोडून डलहौसीला मुक्कामी जायचे होते त्यामुळे सकाळी उठून बाहेर फेरफटका मारायचा विचार रद्द केला. आमच्या फॅमिली कॉटेजला आतूनच लाकडी जिना असलेली व छपराच्या तिरक्या भागात अजून एक खोली होती ज्यात ३-४ जणांची झोपण्याची व्यवस्था सहज होऊ शकेल. या खोलीच्या खिडकीतूनच सूर्योदय व हॉटेलच्या मागील डोंगरावरील उतरणीवरचे चहाचे मळे दिसत होते.
'रुपायन 'होम स्टे ' बद्दल थोडक्यात सांगायचे झाल्यास:
* वाजवी दरात राहण्याची व खाण्याची सुंदर व्यवस्था. फक्त आपलाच ग्रुप असेल तर अधिक छान.
* नाश्ता/जेवण उत्कृष्ठ . व्हेज-नॉनव्हेज दोन्ही उपलब्ध. जेवणासाठी काय पाहिजे ते मात्र आधी सांगून ठेवावे लागते.
* आम्हा महिलांसाठी एक खूपच सोयीची सुविधा मिळाली ती म्हणजे वॉशिंग मशीन. सगळ्यांनी गेल्या ४-५ दिवसातील साठलेले कपडे धुण्यासाठी याचा पुरेपूर फायदा घेतला.
* विनयशील कर्मचारी वर्ग
* एकच आवडले नाही ते म्हणजे बाथरूमसाठी देण्यात आलेले टॉवेल. अगदी कळकट व उबट वास. आम्ही स्वत:कडचे वापरले. व्यवस्थापिकेकडे तक्रारही दिली व नवीन आणण्याविषयी सुचवले.
* स्वतःचे वाहन असेल तरच सोईचे. महामार्गापासून बरेच आतमध्ये.
सकाळी दहाच्या सुमारास नाश्ता आटोपून व सगळे बिल वगैरे देऊन हॉटेल सोडले.
आजच्या पालमपूर -डलहौसी प्रवासातील पहिले ठिकाण होते कांगडा येथील शक्तीपीठ वज्रेश्वरी किंवा बज्रेश्वरी मंदिर. प्रवास साधारण एक तासाचा व अंतर ३३ किमी.
कांगडा शहरातच स्टेशनपासून ३ किमीवरील हे मंदिर एका उंच टेकडीवर आहे.शहरातच असल्याने व धार्मिक महत्त्वामुळे हे अतिशय गर्दीचे ठिकाण.
असे मानल्या जाते कि सतीचे जळालेले स्तन येथे पडल्याने ५१ शक्तिपीठांपैकी हे एक शक्तीपीठ मानल्या जाते. स्तनांची पिंडी स्वरूपात (पिंडी म्हणजे असा नैसर्गिक दगड ज्याला कोणताही विशेष आकार नाही) पूजा केली जाते,
एक अशीही आख्यायिका आहे कि महिषासुराशी झालेल्या युद्धात देवीला अनेक जखमा झाल्या होत्या ज्या या ठिकाणी लोणी लावून बऱ्या झाल्या. अजूनही दर मकर संक्रान्तीला मूर्तीवर विधिपूर्वक लोणी लावून ही परंपरा साजरी केली जाते.
असेही मानतात की महाभारताच्या काळात पांडव वनवासात असतांना देवीने त्यांना दृष्टांत देऊन या ठिकाणी मंदिर बांधण्यास सांगिले. त्यानुसार एका रात्रीत त्यांनी येथे (नगरकोट:आजचे कांगडा)) हे मंदिर बांधले.
मंदिराची पुनर्बांधणी संसारचंद प्रथम यांनी इ.स. 1440 मध्ये केल्याचे वाचनात आले आहे. १९०५ च्या भूकंपात मंदिराची पडझड झाली होती परंतु पुरातत्व खात्यातर्फे याची परत बांधणी करण्यात आली.
पार्किंगमध्ये गाडी लावल्यावर काही अंतर आपणास पायी चालत जावे लागते. उंचावर चढत जाण्याऱ्या रस्त्यावर दुतर्फा पूजाविषयक सामग्रीच्या दुकानांची रांग आहे. रांग, गर्दी यामुळे मंदिरात फोटो काढता आले नाहीत. जे दोन चार फोटो मिळाले ते येथे देत आहे.
पाठीमागच्या बाजूने मात्र मंदिराचा एक बऱ्यापैकी फोटो मिळाला.
येथून पुढे डलहौसीला जायचे होते पण थोडे फेऱ्याने गेले तर वाटेत 'मसरूर रॉक टेम्पल' म्हणून एक चांगले ठिकाण पाहण्यास मिळणार होते. गाडीचा चालक नाही म्हणाला कारण त्याला तशा सूचना नव्हत्या. गाडीच्या मालकाला फोन लावला. खूप फेरा पडेल, वेळ होईल, डलहौसीला जाण्यासाठी मुख्य रस्ताच चांगला आहे वगैरे कारणे सांगून झाली. वेळ झाला तरी चालेल पण आम्हाला हे ठिकाण बघायचेच आहे म्हटल्यावर त्याने चालकाला तशी सूचना दिली व आमची गाडी मसरूर मंदिराच्या दिशेने निघाली. आजूबाजूचा डोंगराळ परिसर खूपच रम्य वाटत होता. वाटेत १५ किमीवरच डावीकडचा एक फाटा "ज्वालामुखी मंदिर" या शक्तिपीठाकडे जात होता. येथून मंदिर फक्त २० किमी इतक्या अंतरावर होते. मंदिर कालीमातेला समर्पित असून मंदिरात मातेची मूर्ती नाही. असे मानतात कि सती मातेची जीभ या ठिकाणी पडली होती. अखंड तेवत असलेल्या ज्वालेच्या स्वरूपात या ठिकाणी मातेची पूजा केली जाते. खडकाच्या कपारीतून निघणाऱ्या ज्वालामुखीच्या वायूमुळे हि ज्वाला अखंड तेवत राहते. आमच्याकडे वेळ कमी असल्याने हे ठिकाण न बघताच आम्ही पुढे निघालो.
कांगड्यापासून साधारण दीड तासात ३६ किमीचे अंतर पार करून आम्ही मसरूर येथे पोहचलो.
शैल मूर्तिकला मंदिर किंवा मसरूर रॉक कट टेम्पल
व्यास नदी असलेल्या कांगडा खोऱ्यातील एका छोट्याशा टेकडीवर हे मंदिर उभे आहे. वाळुकाश्म खडकांमध्ये कोरलेले एक मंदिर संकुलच येथे आहे. मूळ १९ मंदिरे येथे असावीत पण सध्या त्यातील काहीच मंदिरे शिल्लक आहेत. मंदिर कधी निर्माण केले त्याचा कालावधी निश्चित नसला तरी आठव्या -नवव्या शतकातील असावे असे मानतात. १९०५ च्या भूकंपात याची पडझड झाल्याचा खुणा दिसतात. मंदिराच्या देखभालीचे काम सध्या पुरातत्व खात्याकडे आहे.
एकोणीस मंदिरांपैकी १६ मंदिरे एकाच खडकात कोरीव काम करून घडवलेली आहेत. मंदिरे कैलास लेण्यांप्रमाणे आधी कळस व नंतर पाया याप्रमाणे घडवण्यात आल्याचेही सांगितले जाते. सध्या दिसत आलेल्या १५ मंदिरांपकी फक्त मध्यभागी असलेले मुख्य मंदिरच आतून कोरलेले आहे. बाकी सर्व मंदिरांचा फक्त बाह्य भाग सुंदर शिल्पानी नटलेला आहे. मंदिर निर्माण होत असतानाच ठिसूळ खडकांमुळे शिल्प कोरण्यास अडचण येत असावी ज्यामुळे काम अर्धवट सोडण्यात आले असावे असाही एक अंदाज.
स्थानिक भाषेत मुख्य मंदिर "ठाकूरद्वारा' म्हणून ओळखले जाते. प्रवेशद्वार, सभामंडप, गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. प्रवेशद्वारावर असलेल्या शंकराच्या प्रतिमेवरुन हे मंदिर शिवाला समर्पित असावे. गर्भगृहात राम ,सीता, लक्ष्मण यांच्या काळ्या दगडातील सुंदर मूर्ती आहेत ज्या बहुदा नंतरच्या काळात येथे स्थापित करण्यात आल्या असाव्यात.
आमचा एक ग्रुप फोटो
धौलाधर पर्वत रंगाच्या दिशेने म्हणजेच पूर्वोत्तर दिशेने मंदिराचे प्रवेशद्वार असून समोरच आयताकृती असे पाण्याचे भव्य कुंड आहे. बाह्य भिंतींवर विष्णू, दिक्पाल, सूर्य, अग्नी, शिव, पार्वती, स्कंध -कार्तिकेय, यांच्या प्रतिमा आहेत तसेच कमल, कल्पवृक्ष, कल्पलता इ. रचना दिसतात.
पडझड झाल्याच्या किंवा खचल्याच्या खुणा. निश्चित कधीच्या असाव्यात ते सांगता येत नाही.
मंदिर संकुल बघत शेवट्पर्यंत आल्यावर एक छोटीशी वाट टेकडीवर जाते.
टेकडीवर गेल्यावर मंदिर, तलाव व धवलधार पर्वतरांगांचे अप्रतिम दृश्य दिसते.
येथेच एका खोलीत गजांच्या आड ठेवलेल्या भग्न मूर्ती, शिल्पाचे अवशेष पाहावयास मिळतात.
खाली उतरून तलावाच्या बाजूने फेरफटका मारला. तलावात मंदिराचे सुंदर प्रतिबिंब दिसते.
एक छोटीशी टपरी होती व समोरच लाकडी फळकुट टाकलेले एक टेबल होते त्यावर बसून मस्तपैकी गरमागरम मॅगी, चहा-नाश्ता झाला.
जवळपासच्या लोकांना एक दिवसाच्या पिकनिकसाठी हे एक खूप सुंदर ठिकाण आहे तर शिल्प प्रेमींसाठी हे न चुकवण्याजोगे ठिकाण.
संकुलाच्या बाहेर येऊन आमच्या गाडीजवळ पोहचलो. येथे दोघेजण एका छोट्या टेम्पोत सफरचंदाच्या पेट्या विकत होत. सुरवातीला मिळालेली मोसंबीची गोनी संपत आली होती म्हणून काहीतरी नवीन हवेच होते. येथे आसपास कुठेही सफरचंदाच्या बागा नाहीत. टेम्पो शिमल्याहून आला होता. सहाशे रुपयाला १६ किलोची पेटी सांगताबरोबर आम्ही खुशीत खरेदी केली. पैसे देऊन झाले आणि इतकावेळ गम्मत पाहणाऱ्या आमच्या अबोल चालकाने तोंड उघडले 'आपने बहोत पैसे दे दिये, इसका तो पाँचसौ भी ज्यादा था '.
दुपारचे तीन वाजून गेले होते. थोड्याच वेळात गाडी डलहौसीच्या दिशेने धावायला लागली . अजून जवळपास सव्वाशे किमीचा प्रवास करायचा होता. कांगडा जिल्ह्यातील किंवा कांगडा खोऱ्यातील भटकंती संपवून अंधार पडत पडता आम्ही चंबा जिल्ह्यात /चंबा खोऱ्यात प्रवेश करणार होतो.
क्रमश:
प्रतिक्रिया
3 Feb 2023 - 10:38 pm | प्रचेतस
चालक, मालक यांचे न ऐकता तुम्ही मसरूरचे अश्म मंदिर बघितल्याबद्दल तुमचे अभिनंदन. एक हटके ठिकाण तुमच्यामुळे आम्हालाही पाहायला मिळालं. उत्तर भारतीय नागर पद्धतीचे हे शैलमंदिर अतिशय सुरेख दिसते आहे.
तुम्ही ज्वाला मंदिरही बघायला हवे होते असे वाटते. हिमालयात काही ठिकाणी अशी मंदिरे आहेत, वरकरणी अगदी साधी दिसली तरी हे ज्योत म्हणजे एक नैसर्गिक नवलच आहे.
हा भागही आवडला, तपशीलवार लेखनामुळे ही लेखमाला अधिकाधिक आकर्षक होते आहे.
6 Feb 2023 - 11:27 am | गोरगावलेकर
तुम्ही ज्वाला मंदिरही बघायला हवे होते असे वाटते.
मंदिर २० किमी वरच असले तरी डोंगराळ भागात इतके अंतर जाऊन परत यायचे म्हटले तर तीन तास तरी लागले असते आणि इतका वेळ आमच्याकडे नव्हता. योग असेल तर मिळेल बघायला कधीतरी.
3 Feb 2023 - 11:05 pm | टर्मीनेटर
मसरूर रॉक कट टेम्पल थोडे अनफीनिश्ड वाटत असले तरी छान आहे 👍
पुढील भागाच्या प्रतिक्षेत...
6 Feb 2023 - 11:28 am | गोरगावलेकर
धन्यवाद. थोडा वेळ लागतोय पण येईल पुढचा भाग लवकरच