३) भारतीय विचार –विवेक, वैराग्य आणि श्रद्धा

अभिजीत's picture
अभिजीत in काथ्याकूट
7 Jan 2023 - 8:08 pm
गाभा: 

आत्मा, ब्रह्म, ईश्वर, मोक्ष आणि ज्ञान या मूळ संकल्पना समजल्यावर पुढची पायरी आहे ती ही सगळं मानवी आयुष्यात कसं साध्य होणार, यावर विचार करू. सामान्यपणे हे केवळ शब्दखेळ आहेत आणि वास्तविक जीवनात या भ्रामक कल्पनांमुळे आधुनिक विवेक दृष्टीला बाधा येते, किंबहुना या भ्रामक कल्पनांमुळेच हिंदू धर्मात भौतिक जगाबद्दल उदासीनता निर्माण झाली आणि आपण लौकिक जगात मागे पडलो असा विचार प्रबळ झालेला आहे. यासाठी प्रथम वेदांतमतानुसार विवेक, वैराग्य आणि श्रद्धा यांचा विचार करू.

विवेक – मागच्या भागातील सत्य-मिथ्या यांच्या व्याख्या समजल्या की मग विवेक या शब्दाची व्याख्या करता येते. विवेक म्हणजे – नित्यानित्यवस्तु विवेक: - नित्य आणि अनित्य वस्तूंमध्ये फरक ओळखण्याची क्षमता म्हणजे विवेक. नित्य वस्तु म्हणजे जी कायमच अस्तित्वात असते म्हणजेच सत्य म्हणजेच ब्रह्म! आणि अनित्य वस्तु म्हणजे जिच्यात स्थल-काळानुसार बदल होतो आणि जी नित्यवस्तूवर अवलंबून असते म्हणजे मिथ्या वस्तु. सर्व सृष्टी मिथ्या आणि ब्रह्म हे सत्य. मागे ‘ब्रह्म सत्य, जगत् मिथ्या’ याचं विवेचन करताना मिथ्या या शब्दाचा प्रचलित अर्थ आणि वेदांताला अपेक्षित असलेला अर्थ यांत किती फरक आहे ही आपण पाहिले. हा फरक न समजल्यामुळे ‘हिंदू विचार व्यावहारिक जगाला आणि त्यातल्या व्यवहाराला तुच्छ समजतो आणि यातूनच निष्क्रियतेची भावना निर्माण होते’ हे गृहीतक निर्माण झाले आहे. विवेक म्हणजे मनाची क्षमता ज्याचा वापर करून मनुष्य रोजच्या व्यवहारात पुरुषार्थ साधतो. धर्म-अर्थ-काम-मोक्ष ही चार पुरुषार्थ ज्या मानसिक क्षमतेने साध्य होतात त्याला ‘विवेक’ म्हणतात.

वैराग्य – एकदा बुद्धीला सत्य-मिथ्या हा विवेक कसं करावा ही समजले की पूर्णत्व आणि अपूर्णत्व यातला भेद नव्यानं समजायला लागतो. विवेक-वैराग्य यांची समज नसताना गरज आणि चैन यातला फरक करणे अतिशय अवघड असते. लौकिक नैतिकतेच्या चौकटीत आपल्यावर बंधनं येतात आणि आपण त्याच परिघात शिकत जातो. मानवी मनात इच्छा (कामना, desire) निर्माण होतात आणि मनुष्य त्या पूर्ण करण्यासाठी घडपड करतो. यशस्वी आणि सुखमय जीवन जगण्यासाठी या इच्छा पूर्ण करणे गरजेचेच आहे. परंतु जर या इच्छा पूर्ण करणे जर बंधनकारक झाले तर तिथे दु:खाची निर्मिती होते. मनाला विवेकाने विचार करायची क्षमता प्राप्त झाली की त्यातून मन जास्तीत जास्त वस्तुनिष्ठपणे विचार करू लागते आणि त्यातूनच वैराग्याची निर्मिती होते. वैराग्य हा शब्द वि-राग मधून येतो. ‘राग’ म्हणजे ‘काहीतरी हवे असणे किंवा इच्छा’. वि-राग म्हणजे अशी इच्छा जी बंधनकार नाही. एकदा विवेकाचा अग्नि पेटला की वैराग्य पाठोपाठ निर्माण होते.

श्रद्धा - लौकिक अर्थानं ‘श्रद्धा’ या शब्दाचा अर्थ आपण faith किंवा belief असा घेतो. अब्राहमीक धर्मांमधून ‘श्रद्धा’ म्हणजे faith असा अर्थ प्रचलित झाला आहे. आपण त्याच अर्थाने भारतीय दर्शनांचा विचार करतो. पण वेदांतात ‘श्रद्धा’ या शब्दाला विशिष्ट अर्थ आहे. ‘श्रद्धा’ म्हणजे
(१)वेदवाक्यप्रमाण,
(२)गुरुवाक्यप्रमाण आणि
(३)स्वतःच्या बुद्धीने वेदवाक्य आणि गुरुवाक्य पडताळून स्वत:साठी प्रमाण निर्माण करणे (श्रद्धा - pending verification).
हे प्रमाण हिंदू धर्माला अपेक्षित असणारी ‘श्रद्धा’ आंधळी नाही. उपनिषदातलं महावाक्य ‘तत् त्वम असि’, हे याचं सर्वोच्च उदाहरण आहे. स्वतःची ओळख करून देणारे हे महावाक्य स्पष्टपणे म्हणतंय, ’ते तू (आधीच) आहेस’. इथं ‘ते’ म्हणजे ‘ब्रह्म’ - सत्य! आपल्याला लगेच प्रश्न पडतो की ‘जर मी ब्रह्म आहे तर मला माझ्या आयुष्यात अपूर्णता का जाणवते? दु:ख (suffering) का भोगावे लागते?’ योग्य गुरु या वेदप्रामाण्याची उकल करून देतो पण केवळ वेदपठण आणि योग्य गुरु यातून ज्ञानाची निर्मिती होत नाही. त्यासाठी हे महावाक्य आपल्या बुद्धीला पटलं पाहिजे आणि त्या बुद्धीतून ज्ञाननिर्मिती झाली पाहिजे. नेमकी इथं बुद्धीला विवेकाची गरज भासते. सत्य व असत्य यातील भेद बुद्धीला उमजला की विचार करू शकणारं बुद्धिवादी मन, जे वेदवाक्य आणि गुरुवाक्य शिकताना स्वतः:शी वाद-प्रतिवाद करून स्वतः:साठी प्रमाण (evidence, proof) निर्माण करेल. याप्रकारे ‘श्रद्धा’ संकल्पनेचा विचार केला तर असं लक्षात येतं की इथे श्रद्धा faith किंवा belief याअर्थी नाही. वेदांताची ही संकल्पना समजली नाही तर अब्राहमीक धर्मांमध्ये ज्याला faith किंवा belief म्हणतात तसा अर्थ घेतला जातो आणि श्रद्धेवर विज्ञान की अंधश्रद्धा असा वाद निर्माण होतो.

ईश्वराचे स्वरूप – तैतरिय उपनिषद ब्रह्मवल्ली खंडामध्ये म्हणते, ‘ब्रह्मविदाप्नोति परम् | सत्यं ज्ञानमनन्तं ब्रह्म | यो वेद निहितं गुहायां परमे व्योमन् | सोऽश्नुते सर्वान् कामान् सह । ब्रह्मणा विपश्चितेति |’ अर्थात, ‘ब्रह्म जाणणाऱ्यास परम सुखाची (आनंदाची) प्राप्ती होते. ब्रह्म हे सत्य, ज्ञान आणि अनंत आहे. ज्याच्या स्व:तच्या बुद्धीने ज्याने आपल्या मनात प्रमाण निर्माण करून ब्रह्म जाणले आहे, त्याला सर्व सुखांचा सर्वकाळ उपभोग घेता येतो.’ इथे सुख, उपभोग असे शब्द आल्यावर असा प्रश्न मनात येतो की हे साक्षात्कार वगैरे गूढ आणि वैयक्तिक अनुभवाबद्दल चर्चा सुरू आहे आणि आधुनिकतेच्या विचारातून पाहताना यांत थोतांड, भ्रम वाटू शकतो. आनंद या शब्दाचा अर्थ बोलीभाषेत अनुभवात्मक असल्यामुळे इथे गडबड होते. पण ब्रह्म अनंत आहे म्हणजे अपरिमित आणि सर्वव्यापी आहे व त्यामुळे तेच पूर्णत्व आहे. पूर्णत्व म्हणजे कशाचीही उणीव नाही आणि त्यामुळे दु:ख नाही व चिरंतन सुख (आनंद) आहे. अर्थात, याचा अर्थ जो भुकेला आहे, गरीब आहे त्याने आहे त्यातच आनंद मानावा असा नाही. भारतीय विचार धर्म आणि मोक्ष यांच्या चौकटीत अर्थ व काम असा चार पुरुषार्थांचा विचार करतो. त्यामुळे ब्रह्मप्राप्ती म्हणजे निष्क्रियता किंवा संन्यास असा प्रचलित अर्थ चुकीचा आहे.
आता पुढील भागात भारतीय विचार परंपरा आणि सुधारक (progressive) विचार यावर विचार करू.