आजपर्यंत गड-किल्ल्यांच्या वाटा तुडवताना सह्याद्रीची बरीच भटकंती केली होती. सह्याद्रीतील जंगलांचा प्रकारच वेगळा. सरळसोट अजस्त्र कातळकडे असलेले डोंगर, डोंगरांच्या बुंध्यात गच्च हिरवी, डोंगरउतारावर खुरट्या गवताळ झुडुपांची, माथ्यावर काट्याकुट्यांची ही जंगले. अन्न साखळीतील वरच्या वर्गात असणाऱ्या वन्य प्राण्यांचा वावर जवळपास नाही म्हणावा की काय इतका तोकडा......त्यात किती ही दुर्गम भागात गेलो तरी दिसणारी पंचतारांकित रिसॉर्टसची अजस्त्र बांधकामे. गाड्यांची, माणसांची गर्दी....
अशा सर्व परिस्थितीत मग वाघाचं जंगल पहायचं म्हणजे विदर्भ गाठण्याशिवाय पर्याय नाही. त्यातही व्यावसायिक बजबजपुरीपासून लांब राहून अजूनही आपलं वेगळेपण टिकवून ठेवलेला मेळघाट परिसर म्हणजे जंगलदर्शनासाठी एक आदर्श अशी जागा.
सातपुड्याच्या दर्याखोर्यांमध्ये वसलेला, अनेक घाट व दोन डोंगरउतारांच्या मधल्या बेचक्यातून वाहणाऱ्या ओढ्या-नाल्यांचा, नद्यांचा मेळ असलेला, अमरावती, अकोला, बुलढाणा जिल्ह्यात मिळून अंदाजे तब्बल तीन हजार चौरस किलोमीटर एवढ्या विस्तृत परिसरात वसलेला मेळघाट व्याघ्र प्रकल्प. वन्यप्राण्यांचं एक सदृढ आश्रयस्थान, मोठा परिसर, डोंगर-दर्या, खाच खळगे, विपुल झाडी. त्यामुळेचं ससे, सांबार, चितळ, नीलगाय, गवे, रानडुक्कर, अस्वल, कोल्हे, कोळसुंद तथा रानकुत्रे, बिबटे आणि जंगलाचा आत्मा असणारे वाघ ही मोठ्या संख्येने येथे राहतात. याशिवाय मोर, सर्पगरुड, ससाणे, घार, पोपट, सुगरण, पारवे, बुलबुल, सुतार, मैना असे रानपक्षीही आहेत. सरपटणा-या प्राण्यामधे घोणस, मण्यार, फुरसे, फड्या नाग, अजगर, धामन, हरणटोळ या सापांचा सामवेश आहे. तसेच अभयारण्यातून वाहणा-या नद्यांमध्ये साधारण वीस प्रजातींचे मासे, मगरी व घोरपडी आढळून आल्याच्या नोंदी आहेत.
मेळघाट हे शुष्क पानगळीचं जंगल, मुख्यतः सागाची दाट झाडी, जोडीला बांबू, अर्जुन, ऐन, मोह असे प्रमुख सोबती, इतरही अनेक वृक्ष, वेली, झुडपे आहेत. साधारणपणे आठ -नऊ महिने हिरवंगार जंगल व पाण्याचे अगणित स्रोत यामुळे वन्यप्राणी नजरेस पडणे अत्यंत दुर्मिळ अशी गोष्ट, अगदी सांगायचंच झालं तर गवे, सांबर आणि अस्वल हेच ते काय तुलनेने सहज दर्शन देणारे प्राणी, इतर प्राणी जंगलाच्या कडेकोट संरक्षणात सुरक्षित. उन्हाळ्यात पानगळीमुळे जरा मोकळं-ढाकळं झाल्याने काही काळाकरिता प्राण्यांचे दर्शन जरा सुलभ होत पण आमचा मुख्य उद्देश प्राणीदर्शन नाही तर जंगलदर्शन होता म्हणून डिसेंबराच्या मध्यालाच मेळघाटच्या दर्शनाचा मुहुर्त साधला गेला.
अभयारण्य म्हणून मेळघाटला १९६७ साली मान्यता मिळाली तर वाघांच्या घटत्या संख्येवर उपाय शोधण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून हा परिसर १९७४ साली संरक्षित व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित केला गेला. मेळघाट संरक्षित व्याघ्र प्रकल्पाचा विस्तृत परिसर सेमाडोह, चिखलदरा, हरिसाल आणि शहानूर या चार विभागात पसरलाय. या सर्व विभागातून सफारी उपलब्ध आहेत. तसेच यापैकी शहानूर विभागात सुप्रसिद्ध नरनाळा आणि धारगड हे दोन किल्ले तर चिखलदरा विभागात गाविलगड हा किल्ला आहे. यापैकी धारगड किल्ल्यावर जाण्यास मनाई तर नरनाळा किल्ल्याची नियंत्रित सफर करता येते. गाविलगडला चिखलदऱ्यावरून अगदी सहज जाता येते.
या सर्व पर्यायांमधून आम्ही सफारीसाठी निवडला तो सेमाडोह विभाग. मुक्कामासाठी याचं विभागातील कोळकास या पर्यटन संकुलाची निवड केली. सफारी आणि मुक्काम दोन्हींच आगाऊ आरक्षण मॅजिकल मेळघाट (https://www.magicalmelghat.in) या संकेतस्थळावरून करता येते.
पुण्याहून मेळघाटला जाण्यास पुणे ते जालनापर्यंत पोहोचल्यावर, जालना ते अमरावतीपर्यंत पुढे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आम्ही जाताना निवडलेला मार्ग हा पुणे- छत्रपती संभाजी नगर- जालना- चिखली - खामगाव- शेगाव- अकोट- परतवाडा- सेमाडोह - कोळकास असा होता. वाटेत शेगावला श्री. गजानन महाराजांच्या समाधी मंदिराचं दर्शन घेऊन पुढे अकोटकडे मार्गस्थ झालो. अकोटला चहासाठी एक थांबा घेत सकाळी साडेआठच्या आसपास परतवाड्याला पोहोचलो.
परतवाडा शहरातून अमरावती महामार्गावर डावीकडे वळून व्याघ्रशिल्पाजवळ पोहोचलो. या शिल्पापासून दोन फाटे फुटतात, एक फाटा चिखलदऱ्याकडे तर दुसरा सेमाडोह मार्गे धारणीला व पुढे मध्यप्रदेशात जातो, कागदोपत्री हा अमरावती-इंदूर महामार्ग म्हणून ओळखला जातो. परतवाडा ते कोळकास संकुल हा जवळपास संपुर्ण घाटरस्ता दोन्ही बाजूला पसरलेल्या दाट जंगलातून जातो. अरुंद, चढ-उतार व जागोजागी हेअर पिन बेंड वाटावी अशी वळणं असा हा मार्ग आहे. परतवाड्यापासूनच सेमाडोह रस्त्याला लागल्याबरोबर जंगलाचे रंग आजूबाजूला दिसू लागतात. सागाचे सरळसोट वृक्ष दरीतून वर आलेले दिसत राहतात. खाली एखादया ओढ्याकडेला पांढऱ्या खोडाचा अर्जुन वृक्ष लक्ष वेधून घेतो. हिरव्या बांबूची बेटं जागोजागी दिसू लागतात. आता सिपना नदीही मग जागोजागी भेटत राहते, इतरही छोटे-मोठे ओढे नाले मार्गात दिसत राहतात.
परतवाड्यामधून सेमाडोहमध्ये जंगल सफारी संचालित करणारे भोला मावसकर यांच्याशी फोनवरून बोलणं झालं होतं. आमच्या जंगल सफारीची संपुर्ण जबाबदारी त्यांच्याकडे होती. ते आमच्या गाडीची वाट पाहत सेमाडोह गावात थांबले होते. आमची गाडी तिथून जाताना आवाज देऊन त्यांनी थांबवली. पुढचा अर्धा तास त्यांच्याशी मेळघाटविषयी गप्पा झाल्या बरोबर छोटे समोसे, मुगाच्या डाळीची भजी व त्याबरोबर तोंडी लावायला खास त्या भागातल्या पद्धतीची कढी असा नाश्ता ही झाला. जंगल सफारीसाठी आमच्या गटातील सर्वांची नावे त्यांच्याकडे देऊन दुसऱ्यादिवशी सकाळच्या सफारीसाठी आरक्षण करून टाकलं व त्यांचा निरोप घेऊन सेमाडोह पर्यटन संकुलामध्ये प्रवेश केला.
सेमाडोहचे पर्यटन संकुल सिपना नदीच्या पलीकडे प्रशस्त जागेत वसले आहे. पर्यटकांच्या मुक्कामाची सोय इथे होते. वनखात्याने बऱ्यापैकी सुस्थितीत हा परिसर राखला आहे. अनेक प्राणिशिल्प व राखलेला बगीचा याठिकाणी आहे. शांत-सुंदर असा हा परिसर आहे पण आमचं मुक्कामाचे ठिकाण कोळकास हे तिथून अजून आत जंगलात पंधरा किलोमीटर दूर होत. त्यामुळे थोड्याच वेळात सेमाडोह संकुलाचा निरोप घेत कोळकासकडे प्रस्थान केलं.
सेमाडोह-धारणी रस्त्यावर सेमाडोहपासून साधारण चौदा किलोमीटर गेल्यावर कोळकास पर्यटन संकुलाची पाटी लक्ष वेधून घेते. इथून डाव्या हाताला वळून आत साधारण एक किलोमीटर च अंतर पार करून आपण कोळकास पर्यटन संकुलाच्या गेटसमोर येतो. हा एक किलोमीटरचा रस्ता अगदी एखाद्या जंगल सफारीत लागणाऱ्या घनदाट जंगलातून जातो. गेटवर नावनोंदणीचा सोपस्कार पार पाडून आम्ही कोळकास संकुलात प्रवेश केला व आमच्या मुक्कामाच्या ठिकाणाचा ताबा घेतला.
कोळकास हे वनखात्याचे एक पर्यटन संकुल. हे संकुल सिपना नदीच्या अगदी काठाला वसले आहे. सर्व बाजूंनी घनदाट जंगल आहे. ह्या संकुलाचे दोन भाग आहेत अप्पर कोळकास आणि लोअर कोळकास. लोअर कोळकासमध्ये पर्यटकांसाठी ७ कॉटेज, २ डोर्मिटरीज, कॅन्टीन आणि वनखात्याच्या कर्मचार्यांसाठी राहण्याची घरे आहेत.
आम्ही आमच्यासाठी ८ बेडची डोर्मिटरी आरक्षित केली होती. गेल्याबरोबर ताबा घेऊन फ्रेश झालो. डोर्मिटरी यथातथाच होती. भिंतींना पोपडे धरले होते, रंग उडाला होता. खिडक्यांच्या जाळींना भोकं पडली होती. आत एक प्रकारचा कुबट वास भरून राहिला होता. तसंही ऐन जंगलाच्या मध्यात आम्ही काही लॅव्हीश सोय अपेक्षित केली नव्हतीचं. हायकर्स पार्श्वभुमीमुळे गैरसोयीत राहणे तसे काही नवीन नव्हतेच. असो...पण मुक्कामाच्या सोयीतील उणीव इथला परिसर भरून काढतो. नदीकडेला असणारा डोह, एक लोखंडी मचाण, नदीपात्राकडे जाणारी हत्तीवाट, गर्द झाडी, निरव शांतता, निवांत वातावरण सर्व ताण-तणाव, व्याप ,चिंता विसरायला लावतो.
लोअर कोळकासमधूनच एक चढणीचा रस्ता वर जातो ते म्हणजे अप्पर कोळकास. इथे एक व्हिआयपी गेस्ट हाऊस असून तिथं ४ प्रशस्त खोल्या आहेत. यातील २ खोल्या व्हिआयपींसाठी कायम राखीव असतात तर दोनचं खोल्या पर्यटकांसाठी उपलब्ध असतात. लोअर कोळकास ते अप्पर कोळकास अंतर साधारण अर्धा किलोमीटर आहे मात्र दोन्ही बाजूंना घनदाट जंगल आणि अस्वलादी वन्यप्राण्यांचा वावर असल्याने रात्री-बेरात्री परिसरात फिरण्याचे धाडस न करणे हेच उत्तम.
गेस्ट हाऊस हे उंचावर असल्याने खाली सिपना नदीच्या एखाद्या नेकलेससारख्या प्रवाहाचे दृश्य दिसते. सध्या पाणी फक्त एका कोपऱ्यातून वाहत असल्याने दृश्य तितके सुंदर दिसत नसले तरी पुढे पसरलेले जंगल पाहता पावसाळ्यात जेव्हा नदी दुथडी भरून वाहत असेल त्यावेळच्या दृश्याची कल्पना करूनचं अंगावर शहारा आल्याशिवाय राहत नाही. गेस्ट हाऊसच्या समोरच एक लहानशी बाग, तिथं कड्यावर बसवलेली बाकडी आणि खाली सिपना नदीचे दृश्य. वाघाचं रिअल साईझ शिल्प व एका कोपऱ्यात लाकडी मचाण अगदी नदीकडेला खेटून उभं केलंय. या मचाणावर उभे राहून खालील दृश्य पाहणे एक रोमांचक अनुभव ठरतो.
दुपारच्या जेवणासाठी कँटीनला आलो. कॅन्टीनमध्ये एक खानसामा व दोन मदतनीस आहेत. मर्यादित निवड यादीतून ऑर्डरप्रमाणे जेवण बनवून मिळते, तासभर आधी सांगावं लागतं. आम्ही दाल तडका, आलू मटार, जिरा राईस, फुलके असे भरपेट जेवण केलं. तेलाचा वापर जरा जास्त वाटला पण इथल्या खानसाम्याच्या हाताला चव आहे हे मात्र खरं. जेवण करुन खोलीवर गेलो आणि जरा गप्पा मारुन थोड्या वेळासाठी निद्राधीन झालो.
उठून परिसरात फेरफटका मारला, कोळकास मध्ये पाळीव हत्तींचा तळ देखील आहे. हे हत्ती कोळकास भोवती छोट्याशा राईडसाठी वापरले जातात. पर्यटक प्रत्येकी २०० रुपये देऊन हत्तींवरून सफारीची मजा घेऊ शकतात. हत्तींच्या आसपास थोडा वेळ घालवून पुन्हा अप्पर कोळकासला एक फेरी मारली. तिथून आल्यावर चहा घेऊन शेकोटी करायची परवानगी आहे का याची चौकशी केली. अपेक्षेप्रमाणे परवानगी नव्हती, त्यामुळे जेवणाची ऑर्डर देऊन गप्पा मारीत वेळ घालवला. जेवण लवकरच उरकून झोपण्यासाठी निघालो असता कॅन्टीनमधील एकजण आला व सांगू लागला की साहेबांनी तुम्हाला शेकोटी करण्यासाठी परवानगी दिलीय फक्त ती छोटीशी व काळजीपूर्वक करून नंतर पुर्ण विझवण्याची काळजी घ्या. कदाचित डोर्मिटरीची अवस्था माहीत असल्याने तिथे हे पुर्ण रात्र कसे काढू शकतील म्हणून दया येऊन साहेबांनी परवानगी दिली असावी.
असो, पडत्या फळाची आज्ञा मानून आम्ही पालापाचोळा, प्लास्टिक, झाडाच्या पडलेल्या साली गोळा करून शेकोटी पेटवली. मग त्या शेकोटीच्या कडेने पुढचे तीन-चार तास जागवले. सकाळी सफारीच्या गाड्या ६ वाजता येणार होत्या म्हणून रात्री बारानंतर नाईलाजाने झोपण्यासाठी गेलो.
सफारी
सकाळी सव्वासहाला आमच्या जिप्सी थेट आमच्या खोलीच्या दारात हजर होत्या. सर्वजण आधीच तयारीत होतो. प्रत्येकी ४ असे दोन गाड्यात लगेच जाऊन बसलो. ठीक साडेसहाला आमच्या गाड्या सिपना गेटच्या दिशेने धावू लागल्या. प्रचंड थंडी, त्यात ओपन जिप्सी, चहूबाजूला जंगल व अंधुकसा प्रकाश अशा वातावरणात सिपना गेटला एन्ट्री करून आमच्या गाड्या सफारीच्या मार्गावरून हळुवार धावू लागल्या. इथले जंगल विलक्षण सुंदर आहे. सर्वत्र सागाची झाडी अगदी शिस्तीत, रांगेत उभी केल्याप्रमाणे सरळसोट उंचंच-उंच वाढली आहेत. याबरोबरच पांढर्या सालीचा अर्जुन, मोह, ऐन असे अनेक वृक्ष दिसतात पण सागाचे एकतर्फी प्राबल्य आहे हे मात्र खरं. बांबूची बेटे ही बरीच आहेत. जंगल अगदीच हिरवे आहे.
सफारी सुरू झाल्यावर साधारण पंधरा मिनिटांनी,एक नदी ओलांडून उजवीकडे वळण घेत जिप्सी अगदी हळूहळू जात होती. तोच वाटेत एक एकटी मादी सांबर दिसली. इंजिन बंद करून गाड्या थांबल्या तशी ती एकटक आमच्याकडे पाहू लागली. आसपास तिच्या कळपाचं अस्तित्व कुठं ही जाणवत नव्हतं. बहुदा ती एकटीच असावी. उजव्या बाजूने हळूहळू धीटपणे चालत ती रस्त्यावर जिप्सीसमोर आली व साधारण वीस फुटांवर काही सेकंद उभी राहून आमच्याकडे पाहत डावीकडे निघून गेली. मग आम्ही ही पुढे निघालो. अजून दहा एक मिनिटे गाडी चालल्यानंतर पुन्हा एका नदीपाशी आलो. इथे सिमेंटचा बांध घालून पाणी अडवलं होतं, एका बाजूला दूरपर्यंत त्या पाण्याचा फुगवटा गेला होता. आमच्या गाईडने बरोबर मध्यात गाडी थांबवून उजव्या बाजूला पाहायला सांगितलं. साधारण हजारभर फुटांवर गर्द झाडीतून दोन-तीन गवे पाण्यावर आल्यासारखे दिसत होते. दूरवर पसरलेला शांत पाण्याचा फुगवटा, त्याच्या दोन्ही बाजूला दाट जंगल व त्यातून उतरणारे गवे असं विलक्षण सुंदर दृश्य होत ते. तिथून गाडी पुढे घेत गवे पाणी पीत असलेल्या ठिकाणाच्या समोरच्या बाजूला आम्ही गाडी पुन्हा थांबवली. तो जवळपास दहा-बारा गव्यांचा मोठा कळप होता. तिथून थोडावेळ त्यांना पाहून गाड्या पुढं निघाल्या.
अगदीच दहा मिनिटांवर पुन्हा रस्त्याच्या उजव्या बाजूला झाडीत मोठी शिंगे असलेली दोन नर सांबरं, गाडीची चाहूल लागताच, अजिबात हालचाल न करता अगदी एकटक आमच्याकडे पाहत होती. तब्बल पाच ते सहा मिनिटे जिवंत प्राणी पाहतोय की एखादं चित्र अस वाटायला लावणारी स्तब्धता गाडीच्या इंजिनाच्या सुरू होण्याच्या आवाजाने भंग पावली व दोघे ही आत झाडीत पळून गेले व आम्ही ही पुढच्या मार्गाला लागलो. पुढचा अर्धा-पाऊण तास अनेक चढ-उतार, पाणवठे मागे टाकत, जंगलाची शांतता, सौंदर्य अनुभवत आम्ही फिरत राहिलो. दरम्यान कोणताही प्राणी दिसला नाही की पक्षांचा आवाजही आला नाही. अगदी निशब्द जंगल शांतता अनुभवायला मिळाली आणि हे फक्त वाघाच्या जंगलातच शक्य असतं.
पुढे जंगलातील प्रोटेक्शन कॅम्पमध्ये सफारीमधून छोटासा ब्रेक घेतला. याठिकाणी भर जंगलात वनकर्मचारी चोवीस तास मुक्काम ठोकून जंगलाच्या रक्षणासाठी तैनात असतात. याठिकाणी थोडावेळ अंग मोकळं करून पुन्हा आमच्या सफारीला सुरुवात झाली. दहा-पंधरा मिनिटांच्या प्रवासानंतर समोरून दोन जिप्सी आल्या, त्यांना एक सर्पगरुड व ससा याशिवाय काही दिसलं नव्हतं. त्यांच्या गाडीतील गाईडने आमच्या गाईडला लोकेशन सांगितलं व आम्ही पुढे झालो, थोडं पुढं गेलो तर अजून दोन जिप्सी आल्या, त्यांना अगदी दोन मिनिटांच्या अंतरावर मागे एक अस्वल दिसलं होतं. गाईडने त्याबद्दल माहिती घेतली व आमची गाडी पुढे पळू लागली. एका छोट्या ओढ्याजवळ , भल्या मोठ्या अर्जुन वृक्षाच्या उंच फांदीवर सर्पगरूड अजिबात हालचाल न करता निवांत उन्हं खात बसला होता. आमच्या आगमनाचा त्याच्यावर ढिम्म परिणाम झाला नाही. सर्वांना तो नीट दिसेपर्यंत पाचेक मिनिटे गेली व मग आमची गाडी अस्वलाच्या शोधात थोडी वाकड्या वाटेने दौडू लागली.
पाच मिनिटे गाडी पळवल्यावर ही अस्वलाचा काही माग लागला नाही म्हणून मग अरुंद रस्त्यावर मागे-पुढे करून गाडी रिव्हर्स घेतली, आमच्याच मागच्या जिप्सीला हे करण्यात थोडा वेळ गेला तोपर्यंत आम्ही मघाचा सर्पगरूड बसलेल्या ठिकाणच्या ओढ्याचा चढ चढत होतो आणि अचानकचं आमच्या गाईडने इशारा केला, ड्रायव्हरने भर चढावर झटक्यात इंजिन बंद केलं, गाईड दबक्या आवाजात फक्त पुटपुटला "टायगर...टायगर", आता परतीच्या मार्गावर काय प्राणी दिसणार नाहीत म्हणून निवांत बसलेलो आम्ही अविश्वासाने का होईना पण एकदम अलर्ट झालो. गाईडने हात केलेल्या दिशेला पाहिले तर रस्त्याच्या डाव्या हाताला चढत जाणाऱ्या टेकडीच्या चढावरील गवतात एक प्रचंड धूड दुबकून बसलेलं दिसलं, गाडीचं इंजिन बंद होताचं ते उठून उभं राहिलं, कोवळ्या उन्हात पिवळया धम्मक चमकणाऱ्या कातडीवर काळ्या धारींची नक्षी, पुर्ण वाढ झालेलं शरीर, आमच्या विरुद्ध दिशेला डावीकडे चढावर धड ठेवून मान आमच्याकडे वळवून संपुर्ण डावी बाजू गवताच्या चादरीआडून आम्हाला दाखवत चार पावले पुढे जाऊन गवतातून त्याने मागे वळून आमच्याकडे पाहिलं, काही सेकंदांची स्मशान शांतता आमच्या मागच्या जिप्सीच्या इंजिनाच्या आवजाने भंग पावली. पुढं काय आहे याची कल्पना त्यांना नव्हती, इशारा करून त्यांना थांबवतो न थांबवतो तोच वाघाने पुन्हा टेकडी चढायला सुरुवात केली, मागची जिप्सीही जागेवर थबकली, त्यांना ही चढ चढून जाणाऱ्या त्या प्रचंड धुडाच दर्शन झालं, मग इतका वेळ सुचलं नव्हतं ते मोबाईल कॅमेरे पटापट बाहेर आले व तो क्षण साठवण्याच्या कवायतीत लागले. पुढच्या मिनीटभराच्या आत वाघोबाची स्वारी ऐटीत पावले टाकीत दृष्टीआड झाली पण आम्हाला आयुष्यभरासाठी एक अविस्मरणीय क्षण देऊन गेली.
अगदी दहा-पंधरा मिनिटांपूर्वी पास होणाऱ्या दोन जिप्सीमधील लोकांशी आम्ही याच ठिकाणी तर बोललो होतो. म्हणजे त्यावेळी ही वाघ तिथेच होता ?? आम्ही सर्पगरूड पाहत होतो त्यावेळीही कदाचित तो आम्हाला पाहत असेल काय ?? गाडी रिव्हर्स घेऊन परत येत असतानाही तो आमची चाहूल घेत होता काय ??
आमच्या आधी काही वेळापुर्वीच तब्बल चार जिप्सी इथूनच पास झाल्या होत्या, त्यांना त्याच दर्शन झालं नव्हतं पण नंतर वळून आलेल्या आम्हाला मात्र त्याने अलगद दर्शन दिलं होतं.
जंगलातल्या अनिश्चिततेने आम्ही दि:मूढ झालो होतो. अगदी काही वेळापुर्वी निवांत दिसणारं व जवळपास कोणताच प्राणी नाही असं अगदी खात्रीनं सांगतंय असं वाटायला लावणारं जंगल क्षणार्धातचं किती बदललं व साक्षात जंगलाच्या राजाला आमच्या समोर घेऊन आलं. शरीरातील रक्त आता दुप्पट वेगाने वाहत होत, आमची थंडी पळून गेली होती व अगदी पहिल्याच सफारीच्या शेवटाला सर्वोच्च आनंदाची अनुभुती आम्हाला प्राप्त झाली होती.
आमच्या ड्रायव्हर, गाईडची अवस्था ही काही वेगळी नव्हती, मुळात सेमाडोहच्या जंगलाची तऱ्हा पाहता त्यांच्यासाठी सुद्धा व्याघ्रदर्शन हा अत्यंत दुर्मिळ योग असतो. त्यामुळे ते ही प्रचंड खुश होते. अशा अत्यंत आनंदाच्या वातावरणात आम्ही परतीचा रस्ता पकडला, सर्वच जण समाधानी होते. सागाच्या जंगलाने वेढलेल्या वाटा मागे टाकत, वाटेत येणाऱ्या नद्या ओलांडत, गेट पार करून सेमाडोह-धारणी रस्त्यावर आलो. रस्त्याला लागताच जिप्सी भरधाव वेगाने दौडू लागल्या, ४X४ वाहनाचा वेग आणि रस्त्यावरचा कंट्रोल आता पहिल्यांदा जाणवला. वेगाने अंगात पुन्हा हुडहुडी भरली, पाच-सात मिनिटात आम्ही कोळकास संकुलात प्रवेश केला. संपुर्ण संकुलात आमच्या व्याघ्रदर्शनाची द्वाही फिरली. सर्वांनीच आमच्या टीमचे अभिनंदन केले, आमचे गाईड विजय आणि शुभम यांच्याबरोबर खास फोटोसेशनचं सत्र पार पडलं व या आनंदोत्सवाची सांगता चहा-पोहे पार्टीने झाली.
आनंदाचा भर ओसरल्यावर मग आता पुन्हा संध्याकाळची सफारी करण्याची गरज कुणालाच वाटेनाशी झाली. या सर्वोच्च बिंदूवर यावेळच्या मेळघाट भेटीला विराम द्यावा असे सर्वानुमते ठरले. मग कोळकास कॅन्टीनचा खानसामा व मदतनीस तसेच हत्तींचे माहूत, अप्पर कोळकास येथील मदतनीस इत्यादी लोकांची भेट घेऊन दोन दिवसांच्या पाहुणचाराबद्दल त्यांचे आभार मानले व कोळकास पर्यटन संकुलाचा निरोप घेतला. वाटेत सेमाडोह गावात भोला मावसकर यांची भेट घेतली व त्यांचे मनापासून आभार मानत, पुन्हा मेळघाटला येण्याचे आश्वासन देत निरोप घेतला व चिखलदऱ्याची वाट धरली.
प्रतिक्रिया
2 Jan 2023 - 6:23 pm | चक्कर_बंडा
गेले काही दिवस भटकंती सदरात "प्रवेश निषिद्ध" असा संदेश येत असल्याने या सदरात ही भटकंती टाकण्याचे धारिष्ट्य केले आहे. शक्य असल्यास हे "भटकंती" सदरात हलवावे अशी संपादकांना नम्र विनंती.
वाघाचं छायाचित्र नाही, एक हलकसं चलचित्र मात्र आहे हे इथे टाकलेले नाही.
छायाचित्र साधारण वाटू शकतात, त्या क्षेत्रात एकदम अडाणी लोकांनी ती काढलीत, कळावे ही नम्र विनंती....
2 Jan 2023 - 7:28 pm | कंजूस
चांगलं राखलं आहे. या दिलेल्या फोटोंवर समाधान मानून आहोत. जाणार नाही.
2 Jan 2023 - 7:49 pm | कर्नलतपस्वी
छान वर्णन आहे. प्रकल्पा बदल कल्पना आली.
प्राणीदर्शन हेतू नसतानाही व्याघ्र दर्शन होणे हे मोठे भाग्यच.
आम्ही मात्र पुण्यातले रा गा बागेतली वाघ बघून खुश होतो.
लेख आवडला.
2 Jan 2023 - 8:31 pm | श्रीगणेशा
भटकंती वर्णन छान लिहिलं आहे.
तो शेवटचा "धन्यवाघ" संदेश/फोटो आवडला!
3 Jan 2023 - 11:21 am | श्वेता२४
ही सहल बकेटलिस्ट मध्ये आहे. प्रवास व राहण्याबद्दल माहिती दिलीत हे बरे झाले. फोटोही मस्तच. वा.खू. साठवली.
4 Jan 2023 - 9:11 am | प्रचेतस
छान लिहिलंय.
मेळघाटाचं जंगल अतिशय सुंदर आहे. माझ्या मेळघाटच्या भटकंतीची आठवण झाली. मेळघाट ४: कोळकास (अंतिम)
5 Jan 2023 - 9:08 am | चक्कर_बंडा
जबरदस्त !!! सर्व भाग एकाच बैठकीत वाचून काढले. तुमचे सर्वच फोटो अगदी PRO लेव्हल आहेत.
परतीच्या वेळी, हरीसाल-शहानुर मार्गे परत यायचा विचार केला होता पण स्थानिकांकडून रस्त्याच्या अवस्थेबद्दल ऐकून व कोळकासला पोहोचल्याबरोबर स्टेपनी बाहेर काढावी लागल्यामुळे तो विचार रहीत करून चिखलदऱ्याला गेलो.
पर्यटकांसाठी मचाण व नाईट सफारी सध्याच्या SFO मॅडमनी बंद केली आहे.
5 Jan 2023 - 9:13 am | चक्कर_बंडा
सर्वांचे मनापासून आभार !!!
9 Jan 2023 - 2:16 am | टर्मीनेटर
मस्त लिहिलंय, आवडले! फोटोही छान 👍