२) भारतीय विचार – मोक्ष आणि ज्ञान

अभिजीत's picture
अभिजीत in काथ्याकूट
29 Dec 2022 - 8:03 pm
गाभा: 

(२) भारतीय विचार – मोक्ष आणि ज्ञान – (१) (६४८)
भारतीय दर्शनांचा मूळ प्रश्न ‘आत्यंतिक दु:ख निवृत्ती व शाश्वत सुख निर्मिती’ म्हणजे मोक्ष हा आहे. हा मोक्ष मनुष्याला जिवंतपणी कसा मिळू शकतो, त्यासाठी मनुष्याने स्वत:त योग्यता कशी निर्माण करावी याबद्दलची सगळी चर्चा म्हणजे भारतीय विचार! ‘आत्यंतिक दु:ख निवृत्ती व शाश्वत सुख निर्मिती’ म्हणजे मोक्ष आणि त्याची जाणीव मनात स्थिर होणे यालाच ज्ञान म्हणतात. अद्वैतमतानुसार या चराचर सृष्टीच्या मुळाशी असेलेलं चैतन्य म्हणजेच मी आहे याची अनुभूती निर्माण होऊन मन पूर्णत्वात स्थिर होते. या पूर्णत्वाच्या मनस्थितीमुळे मनुष्य व्यवहारी जगाकडे अधिक सजगतेने वावरतो, अधिक वस्तुनिष्ठपणे व्यवहार करतो आणि शारीरिक अथवा मानसिक दु:खांची परिस्थिती आली तरी धीराने जीवन कंठतो. उत्तरोत्तर अशा मनुष्याची बुद्धी आणि मन पूर्णत्वात अधिक अधिक दृढ होत जाते आणि यालाच मोक्ष म्हणतात. हा मोक्ष म्हणजेच ज्ञान.
वेदांत या चर्चेचा अंतिम चरण आहे आणि आपण ज्याला बुद्धिवाद म्हणतो, ज्यावर आपला आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोण आधारित आहे त्या बुद्धिवादावर वेदांत पूर्णपणे कसा खरा उतरतो हे पाहू. वैज्ञानिक प्रयोग करून निर्माण होणाऱ्या ज्ञानाला मान्यता मिळायसाठी ‘प्रमाण’ (प्रुफ) निर्माण असावे लागते. असे प्रमाण मिळवण्यासाठी लागणाऱ्या कसोट्या म्हणजे -
१) जे कोणी प्रयोग करू इच्छितात त्यांना प्रयोगाचे प्रमेय, सिद्धता आणि साध्य स्पष्टपणे माहीत असणे, व
२) प्रयोगाच्या सिद्धता पद्धतीनुसार कोणीही प्रयोग केला तरी त्याचा निकाल एकसारखाच येणे.
भारतीय दर्शन शास्त्रांमध्ये प्रमाणांचा अतिशय बारकाईने विचार केला आहे. किंबहुना, भारतीय दर्शने जर केवळ faith किंवा belief असतील तर, प्रमाण निर्मितीची गरजच उरत नाही. पण भारतीय दर्शनांमध्ये वेदांताचा दावा – मोक्ष right now, right here (जीवनमुक्ती) – हा आहे त्यामुळे मानवी बुद्धीत प्रमाण निर्मिती करणे हा वेदांताचा प्रमुख विषय आहे. वैज्ञानिक प्रयोगातून निर्माण होणारे प्रमाण आणि वेदांतिक प्रमाण यांत महत्त्वाचा फरक एकच – वेदांतात प्रमाणाचा विषय, प्रमाण निर्माण करणारा आणि साध्य ही तिन्ही एकच आहेत – ते म्हणजे वेदांताचा अभ्यास करून प्रमाण निर्माण करू पाहणारा मनुष्य हा स्वत:च स्वत:चा सच्चिदानंद आत्मा समजून घेतो. त्यामुळे हा प्रवास वैयक्तिक म्हणूनच सुरू होतो परंतु अद्वैताची जाणीव निर्माण झाल्यावर प्रमेय, सिद्धता आणि साध्य ही एकाच आहेत ही लक्षात येते. वैयक्तिक अनुभूती असल्यामुळे बऱ्याचदा वैयक्तिक अनुभव यासदराखाली पारलौकिक (occult) अनुभव यात घुसडले जातात आणि वेदांताला अवैज्ञानिक व गूढ (mystic) प्रकार म्हणून हेटाळले जाते. अर्थात यांत नुकसान जे परंपरेपासून तुटलेले सर्व सामान्य लोक असतात, त्यांचेच होते. भारतीय दर्शने सहा प्रकारची प्रमाणे मान्य करतात – प्रत्यक्ष (पाच ज्ञानेंद्रियांनी निर्माण होणारे ज्ञान), अनुमान (Inference), उपमान (Comparison), अर्थापत्ती (Postulation), अनुपलब्धी (Non-apprehension) आणि शब्द (Verbal testimony). यातील शब्द प्रमाण सोडले तर बाकीची प्रमाणे मानवी बुद्धी नेहमी स्वतंत्रपणे निर्माण करू शकते. यातूनच चार्वाक, जैन, बौद्ध, न्याय, वैषेशिक, सांख्य, योग (पतंजली) आणि मीमांसा या दर्शनांचा विकास झाला. ही सर्व दर्शने द्वैत-मत म्हणजे ‘एकच ब्रह्म-ईश्वर विश्वाच्या मुळाशी आहे’ ही नाकारणारी आहेत. अद्वैत हे एकमेव दर्शन असे आहे ज्यात सर्वव्यापी अशा निर्गुण ब्रह्माची आणि सगुण ईश्वराची मांडणी केली आहे. उपनिषदांत पुन:पुन्हा ज्याचे विवरण केले आहे त्यालाच अद्वैत दर्शन म्हणतात. शब्द प्रमाण ज्याला revelations म्हणजेच वेदांतिक ज्ञान म्हणतात ते उपनिषद लिहिणाऱ्या ऋषींना स्फुरले. खालील तक्ता ज्ञान मिळवण्याच्या म्हणजे प्रमाण कसे निर्माण होते याचे विवेचन करतो.

  • चार्वाक - फक्त ‘प्रत्यक्ष’ प्रमाण
  • बुद्ध आणि जैन - प्रत्यक्ष, अनुमान, शब्द (वेद मान्य पण ईश्वर नाही)
  • वैशेषिक आणि सांख्य-योग - प्रत्यक्ष, अनुमान, शब्द (वेद मान्य पण ईश्वर नाही)
  • न्याय - प्रत्यक्ष, अनुमान, शब्द (वेद मान्य पण ईश्वर नाही), उपमा (आंशिक), अर्थापत्ती (आंशिक), अनुपलब्धी(आंशिक)
  • मीमांसा - प्रत्यक्ष, अनुमान, शब्द (वेद मान्य पण ईश्वर नाही), उपमा, अर्थापत्ती,
  • अद्वैत - प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमा, अर्थापत्ती, अनुपलब्धी

हे संक्षेपाने मांडण्याचा उद्देश हा आहे की भारतीय विचारात बुद्धीचा वापर करून वैध ज्ञान मिळवण्याविषयी अतिशय सखोल अभ्यास केला गेला आहे हे समजावे. भारतीय विचार हा आधुनिक विज्ञानानुसार शास्त्रीय मानावा की नाही ही शंका ज्यांना असते त्यांना यातून पुढील अभ्यासासाठी दिशा मिळावी हाही उद्देश आहेच!
या तक्त्याचा वापर करताना याचे भान ठेवावे की, भारतीय विचारात या सर्व दर्शनांमधून मोक्ष मिळतो यावर पक्की श्रद्धा आहे. ही श्रद्धा शेकडो-हजारो वर्षांच्या सलग हिंदू जीवनपद्धतीतून निर्माण झाली आहे. हिंदू मनाचा सहिष्णूपणा यातूनच निर्माण झाला आणि त्या सहिष्णुपणाचे पोषण आणि वर्धन होत आहे व पुढेही हे चालू राहील यात शंका नाही. ही सर्व दर्शने निर्माण करणारे ऋषी, संत, मुनी, महात्मे, तीर्थंकर यांना मोक्ष मिळाला आणि या दर्शनांच्या अनुषंगाने जीवनपद्धतींचे प्रवाह यातून भारतीय परंपरा निर्माण झाली. या जीवनपद्धतींचेनुसार आपापले जीवन जगणारे सर्वजण मोक्ष मिळवण्याच्या योग्य मार्गावर आहेत हेच भारतीय विचाराचे फलित आहे.

आता पुढच्या भागात भारतीय विचारात ज्ञान म्हणजे काय आणि ते मनात निर्माण होऊन स्थिर होण्याच्या प्रक्रिया काय आहेत यावर विचार करू.

आपण ज्याला हिंदू धर्म म्हणतो आणि अंधश्रद्धा, अवैज्ञानिक, प्रतिगामी म्हणून जी टीका केली जाते, ती सहसा कर्मकांडावर असते. कर्मकांडाच्या रूढी किंवा पूजा पद्धती या ‘मीमांसा’ या दर्शनशास्त्रात येतात. मीमांसा दर्शन म्हणजे वेदांचा पूर्व भाग. सूर्य, इंद्र, मरुत, सोम वगैरे देवता आणि त्यांचे आरध्य, यज्ञयाग विधी करुन स्वर्गप्राप्ती कशी करावी यावर वेदांच्या पूर्व भागाचा भर आहे. मीमांसा दर्शन याचा सैद्धांतिक पाया आहे. या कर्मकांडांवर पुरगोमी विचारातून जी टीका आधुनिक काळात (युरोपियन रेनेसान्स मुळे निर्माण झालेला गेल्या ३००-४०० वर्षांचा modernity चा काळ) होते तशी टीका होण्याचा हा काही पहिला काळ नव्हे. वेदांतातच म्हणजे उपनिषदांतच यावर जोरदार टीका केली आहे. मुंडक उपनिषदाच्या प्रथम मुंडकांच्या दुसऱ्या खंडात आलेले पहिले सात श्लोक मंत्रविधी व मंत्रविधीच्या कर्मातून असे कर्म करणाऱ्यास स्वर्गप्राप्ती कशी होते आणि असे कर्म न केल्यास अशा पुरुषाच्या सात पिढ्या कक्षा नरकात जातात यांचे वर्णन आहे. आठव्या श्लोकापासून अशा कर्मातून निर्माण होणारे फळ (स्वर्ग) कसे अस्थिर आहे, अविद्येचे द्योतक आहे व अशी स्वर्गप्राप्ती करून घेणारास ही कर्मफळ क्षीण झाल्यावर संसारात पुन:प्रवेश करावा लागतो अशी टीका आहे. पुढे बाराव्या श्लोकात अस्थिर कर्मफळांच्या (जी मुळात अस्थिर आहेत) मागे न लागता ब्रह्मविद्येत स्थिर झालेल्या गुरूस शरण जावून ब्रह्म जाणण्याचा प्रयत्न करावा अशी शिकवण आहे. अर्थात कर्मकांड पूर्णपणे टाकून द्या असे वेदांत कुठेच म्हणत नाही पण शाश्वत आनंदप्राप्ती कसा विचार करावा याची दृष्टी उपनिषदे देतात. भारतीय परंपरेची नाळ तुटल्यामुळे ईश्वर, आत्मा थोतांड आहे, हिंदू धर्म कालबाह्य आहे, अवैज्ञानिक आहे वगैरे विचार प्रचलित झाले आहेत. ‘आत्यंतिक दु:ख निवृत्ति आणि शाश्वत सुख प्राप्ती’ या मोक्षाचे मार्ग दाखवणारा हिंदू धर्म ज्याला आपण सरसकट ‘अध्यात्म’ म्हणतो त्यात अनुभव, अनुभूति आणि ज्ञान यात नेहमी गल्लत केली जाते. विविध दर्शन परंपरांची नाळ तुटल्यामुळे आणि किमानपक्षी तोंडओळखही नसल्यामुळे जिज्ञासु लोकांना एकतर शब्द खेळांची किंवा अनुभवांची चटक लावली जाते किंवा लागते. श्रीशंकराचार्यांच्या गुरूंचे गुरु श्री गौडपाद मांडुक्य कारिकेमध्ये (३.१६) मंद, मध्यम आणि उच्च असे मनुष्याच्या बुद्धीचे तीन प्रकार सांगतात. ब्रह्म समजणे हे बौद्धिक असल्यामुळे बुद्धीची पातळी येथे महत्त्वाची ठरते. इथे मंद बुद्धी म्हणजे आजचा रूढार्थ म्हणजे कमी बुद्धीचे किंवा बुद्धीने विकलांग असा नाही. ज्यांच्या बुद्धीला ‘ब्रह्म हेच अद्वैत आहे’ याचे ज्ञान झाले आहे अशा बुद्धीला उच्च बुद्धी म्हटले आहे. मंद बुद्धी म्हणजे ज्यांना ‘ब्रह्म हेच अद्वैत आहे’ ही समजलेले नाही अशी बुद्धी, आणि मध्यम बुद्धी म्हणजे जे जिज्ञासु बुद्धी! जे मंद बुद्धी आहेत त्यांच्या साठी कठोपनिषद ॐकाराची पूजा करणे हा श्रेष्ठ मार्ग सांगते, जे मध्यम बुद्धीचे आहेत त्यांच्यासाठी ॐकारध्यान आणि जे तीक्ष्ण बुद्धी आहेत त्यांना ब्रह्म ॐकारातच ब्रह्म ज्ञान होते. ‘ब्रम्ह बुद्धीच्या गुहेत स्थापित होते तेंव्हा द्वैत नष्ट होते आणि अद्वैताची समाज निर्माण होते’ ही संकल्पना समजली नसेल तर हा सगळा एकतर काहीतरी गूढ प्रकार आहे किंवा फक्त शब्द खेळ असा समज निर्माण होणे साहजिकच आहे. ‘श्रवण-मनन-निदिध्यासन’ या मार्गे मनुष्य आपल्या बुद्धीला तीक्षता आणू शकतो. आपण जेंव्हा सायकल चालवायला सुरुवात करतो आणि पहिल्यांदा ज्या वेळी तोल सांभाळून पेडल मारतो त्या क्षणी आपल्याला सायकल चालवण्याचा ‘अनुभव’ येतो. बहुतेक सामान्य लोकांना यातून अतिशय आनंद होतो. असा अनुभव जितक्या वेळा आपण घेतो तितक्या वेळा आपण त्यातून शिकतो आणि ‘हळूहळू’ सायकल चालवणे हे ज्ञान आपल्या अंगवळणी पडते. त्यानंतर तो पहिला नवथर अनुभव मागे पडतो, सुरुवातीची ती आनंदाची अनुभूति मागे पडते व तोल सांभाळत सायकल चालवणं ही ज्ञान आपल्या जेंव्हा हवं असेल तेंव्हा आपल्यापाशी उपलब्ध असेल आशा स्थितीत आपण पोचतो. आता प्रयत्न करूनही आपण सायकल चालवणे विसरू शकत नाही. आता असा विचार करा की, एकदा सायकल चालवायला यायला लागली की आपल्या बाबतीत असं कधीच होत नाही की, ‘एका विवक्षित क्षणी मला सायकल चालवण्याचा अनुभव घेता येतो आणि नंतर मला सायकल कशी चालवायची हे आठवत नाही किंवा ते आठवण्यासाठी प्राणायाम, आसनं, समाधी वगैरे प्रकार करावे लागतात’. अनुभवातून निर्माण झालेली अनुभूति जर शाश्वत ज्ञानापर्यंत पोचत असेल तरच ती खरी विद्या! केवळ अनुभव आणि अनुभूति यांतच आपण अडकलेले असू तर ती अविद्याच हे समजावे. आपण आपल्या आयुष्यात असेच शिकतो आणि कोणतीही ‘विद्या’ अशीच साध्य होते. जो जिज्ञासु आहे त्याला विद्या कशी प्राप्त होते हे समजावे यासाठी ‘सायकल शिकणं’ हे उदाहरण दिले.
अद्वैत सिद्धांतानुसार ब्रह्म बुद्धीत प्रस्थापित होण्याची क्रिया ही कोणत्याही इतर विद्येप्रमाणेच आहे. प्रथम या संकल्पनांचा व्यूह समजणे (श्रवण), मग स्वत:ची प्रत्येक कृती या संकल्पनांच्या कसोट्यांवर मोजून समजून घेणे या प्रक्रियेचा (मनन) सराव करावा लागतो. या मननातून स्वत:त होणारा बदल समजून घेणे (निदिध्यासन) आणि हळूहळू ‘दु:ख निवृत्ति व आनंद प्राप्ती’ या अनुभवाची एक-एक पायरी चढत अद्वैताचे ज्ञान पक्के होवू लागते. इथे एकच-एक असा क्षण अपेक्षित नाही. दुर्दैवाने या ब्रह्म ज्ञान प्राप्तीचा रूढ समज असा अजिबात नाही. आपल्या सगळ्यांना बुद्धाची कथा माहीत असते. बोधिसत्वाच्या झाडाखाली समाधिस्थ अवस्थेत असताना गौतमाला परम शांतीचे गूढ उकलले आणि तो बुद्ध (ज्ञानी) झाला अशी कथा! पुढे स्वामी विवेकानंद आणि त्यांच्या अनुषंगाने गुरु रामकृष्ण परमहंसांच्या ध्यान-समाधी-कुंडलीनी-राजयोग-हठयोगाच्या विविध कथा आपण ऐकलेल्या असतात. आपल्या संत आणि गुरु परंपरांमधून कितीतरी असे ‘अनुभव’ पुन:पुन्हा आपण ऐकत राहतो. त्यातून ध्यान-समाधी-कुंडलीनी-राजयोग-हठयोग ते ‘कृपा (grace या अर्थी) अशाच साधनांचा मारा होत राहतो आणि यातूनच ‘ब्रह्म प्राप्ती म्हणून जे काही सांगितले जाते, ते मला मिळेल’ असा विचार दृढ होतो. या ठिकाणी हेही नमूद केले पाहिजे की, काही लोक असे असू शकतात की ज्यांना हे ज्ञान हळूहळू न होता एकाच क्षणी होऊ शकते. भगवान श्री रमण महर्षि यांचे चरित्र वाचले तर हे जाणवते की मदुराईच्या मिनाक्षी मंदिरात आणि नंतर तिरूवनामलाईच्या अरुणाचल डोंगरावर उन्मनी अवस्था प्राप्त झाली आणि त्यातून बाहेर पडल्यावर अद्वैत ज्ञान आपल्यात पूर्णपणे स्थापित झाले आहे हे त्यांना उमगले. श्री रमण महर्षि याला अक्रम मुक्ती (sudden liberation) म्हणतात. ‘मी कोण आहे?’ या प्रश्नाचा शोध घेत क्रमाक्रमाने जेंव्हा बुद्धी अद्वैतात स्थिर होते त्याला क्रम मुक्ती म्हणतात. सामान्य मनुष्याला क्रम मुक्तीचा मार्ग योग्य आहे. दुर्दैवाने श्री रमण महर्षि प्रमाणेच आपल्याला उन्मनी अवस्था येणार आणि एका क्षणात मुक्ती मिळणार हेच इतकं ठसवलं जातं की सामान्य मनुष्य त्याकडे आकृष्ट होतो किंवा हे थोतांड आहे म्हणून दुर्लक्ष करतो. याचं कारण म्हणजे परंपरेतून आलेली तात्विक बैठक कोणीही सहसा समजावून सांगत नाही किंवा सामान्य मनुष्य सुद्धा असे प्रयत्न करत नाही आणि त्यामुळं आपलं ‘वैज्ञानिक दृष्टीचं(!)’ मन श्रद्धा-अंधश्रद्धा यात हेलकावे खात राहते. काही जण यातून ‘नास्तिक’ विचारांवर विश्वास (faith/belief या अर्थी) ठेवतात तर काही स्वत:ला आस्तिक (faith/belief या अर्थी) समजून त्यावर विश्वास ठेवतात. बरेचसे लोक अनुभव म्हणजेच ज्ञान किंवा सहज शॉर्ट-कट म्हणून त्याकडे पाहतात आणि गोंधळ सुरू राहतो. एकदा लोक-समुदाय म्हटला की जे गुण दोष कोणत्याही व्यवस्थेत निर्माण होतात त्याला अध्यात्म क्षेत्र तरी कसं अपवाद असेल. इथूनच दांभिकपणा, अपसमज, त्यातून निर्माण होणारी फसगत, व्यावहारिक गणितं वगैरेचा उगम होतो.
आता आत्मा, ब्रह्म, ईश्वर, मोक्ष आणि ज्ञान यांचा मानवी जीवनाशी आणि दृश्य जगाशी असलेला संबंध यावर विचार करू.

प्रतिक्रिया

धन्यवाद. तुमचे धागे वाचतो आहे. अतिशय उत्तम आशय आहे.

मूकवाचक's picture

30 Dec 2022 - 1:10 pm | मूकवाचक

+१

सस्नेह's picture

30 Dec 2022 - 2:38 pm | सस्नेह

वाचतेय.....

कर्नलतपस्वी's picture

30 Dec 2022 - 6:46 pm | कर्नलतपस्वी

दर्शन शास्त्रात गती नाही... छान लिहीले आहे पण कळत नाही त्यामुळे कुठलीच प्रतिक्रीया देत नाही. दगडावर सतत पाणी पडल्यावर काहीतरी खुणा उमटतात त्याच प्रमाणे एवढे वर्ष या जगात घालवल्यावर काहीतरी मनास भावलेले विचार आपल्या समोर मांडत आहे. चुक बरोबर माहीत नाही.

प्रारब्धानुसार अन्नासाठी दाहीदीशा अशाच परीस्थीतीत या विषया कडे कधीच लक्ष गेले नाही. आमचे आजोबा दत्त संप्रदायातील अधिकारी,अनुग्रहीत, मोठ्ठा शिष्य परीवार पण काही शिकावे,समजुन घ्यावे अशी उपरती कधीच झाली नाही.

उत्तर भारतात राहिल्यामुळे तुलसीदास, सूरदास,कबीर कानावर पडले. तसेच संत साहित्य थोडेफार वाचनात आले. त्यांनी मांडलेले विचार काहीसे समजले आवडले.
जसे,

पहले रचा प्रारब्ध पिछे रचा शरीर l
तुलसी चिंता क्यूं करे भज ले श्रीरघुबीर ll

किंवा

वहाँ न दोजख(नर्क), बहिस्त मुकामा(स्वर्ग)।
यहाँही राम, यहॉँही रहमाना।।

जर सर्व काही पूर्वनिर्धारित आहे व जे काही आहे ते इथेच आहे तर मी चिंता कशाला करू.

योगेश्वराने अर्जुनाला पर्यायाने समस्त मानवांना सांगीतले आहे की,

रंगहीन मी या विश्वाच्या रंगाने रंगलो
कौरवांत मी पांडवांत मी
अणुरेणूत भरलो
मीच घडवितो मीच मोडितो
उमज आता परमार्था
कर्तव्याने घडतो माणूस
जाणून पुरुषार्था
कर्मफलाते अर्पून मजला
सोड अहंता वृथा
सर्व धर्म परि त्यजून येई
शरण मला भारता
कर्तव्याची साद तुझ्या तुज
सिद्ध करी धर्माथा
कर्तव्याने घडतो माणूस
जाणून पुरुषार्था
उमज आता परमार्था

कर्तव्याच्या पुण्यपथांवर मोहांच्या फुलबागा,कधी मोहाला बळी पडलो कधी वाचलो.

असो,कर्म जसे समजले/ते त्या प्रमाणे करत गेलो/करतो व इदं न मम म्हणत पुढे चालतो.

हा विचार पटला त्यामुळे दर्शन शास्त्रा, कर्मकांड ,मोक्ष वगैरेच्या भानगडीत पडत नाही.

चामुंडराय's picture

31 Dec 2022 - 12:50 am | चामुंडराय

छान आणि महितीप्रद लेख.
भारतीयांचे असे कालातीत ज्ञान शालेय जीवनात का देत नाहीत हा मोठा प्रश्नच आहे.
न्यूयॉर्कच्या वेदान्त सोसायटीचे स्वामी सर्वप्रियानंद (Swami Sarvapriyanand) ह्यांची सोप्या आणि ओघवत्या इंग्रजी भाषेतील वेदान्त तत्वज्ञानावरील विवेचनात्मक प्रवचने (discourses) यू-ट्यूब वर उपलब्ध आहेत. स्वामीजी अतिशय चांगल्यारीतीने अद्वैत तत्वज्ञान समजावून सांगतात. जिज्ञासूंनी जरूर ऐकावीत.