१) भारतीय विचार – आत्मा, ब्रह्म, ईश्वर

अभिजीत's picture
अभिजीत in काथ्याकूट
24 Dec 2022 - 1:29 am
गाभा: 

(१) भारतीय विचार – आत्मा, ब्रह्म, ईश्वर
भारतीय विचार परंपरेत जीव-जगत-ईश्वर या तीन entities चा विचार विविध प्रकारे केला जातो. यातूनच षडदर्शने, बौद्ध, जैन व चार्वाक परंपरांचा उगम झाला व या परंपरांचा विकास अजूनही होत आहे. या विविध परंपरा केवळ तात्विक चर्चा म्हणून निर्माण झाल्या नाहीत. त्या-त्या काळी असलेल्या समाजाची परिस्थिती, त्यावेळचे आर्थिक, सामजीक व आध्यात्मिक प्रश्न आणि त्यात त्याकाळच्या पारंपरिक विचारांच्या त्या समाजाला जाणवणाऱ्या त्रुटी यातून मार्ग काढले गेले आणि या परंपरांचा उगम झाला, विकास होत राहिला. ही प्रक्रिया अजूनही सुरूच आहे. आत्मा, ईश्वर, ब्रह्म, माया, मोक्ष, विवेक आणि श्रद्धा यांचे अर्थ भारतीय विचार परंपरेत काय आहेत आणि आधुनिक जगात (गेल्या अडीचशे-तीनशे वर्षांपासून आधुनिक विचार प्रगल्भ होत गेला याअर्थी) या संकल्पनांचे संदर्भ कसे आहेत ही जर समजलं पाहिजे. आस्तिक आणि नास्तिक या दोन्ही गटात या संकल्पना समजलेले लोक नाहीत असे नाही पण चर्चेत याचे संदर्भ येत नाहीत आणि ज्यांचं मत अजून पक्कं व्हायचं आहे त्यांचा अजूनच गोंधळ वाढतो. या चर्चेसाठी भारतीय विचार परांपरेच्या अद्वैत मताचा आधार घेऊन सुरुवात करू. यामुळे चर्चेला एक दिशा मिळेल असे मला वाटते.

आत्मा – सृष्टीच्या निर्मितीच्या मुळाशी व सृष्टीमध्ये जे अद्वितीय असे चैतन्य आहे तोच आत्मा. आत्मा या शब्दाचा अजून एक अर्थ सूक्ष्म शरीर असा आहे. सूक्ष्म शरीर म्हणजे ज्याला अस्तित्व आहे पण जे डोळ्यांनी दिसत नाही. मन, भावना, बुद्धी, स्वत्वाची जाणीव (अहंकार), विचार आणि पंच ज्ञानेंद्रिये हे दिसत नाहीत यालाच सूक्ष्म शरीर म्हणतात. यात कारण शरीर नावाचे एक शरीर मानलेले आहे. कारण शरीरामुळे सूक्ष्म आणि बाह्य शरीर (जे स्थूल पणे दिसते) निर्माण होते ही मूळ कल्पना आहे. काही ठिकाणी आत्मा म्हणजे स्व असाही अर्थ आहे. कोणत्या संदर्भात आत्मा हा स्व-म्हणून, कोठे सूक्ष्म शरीर म्हणून आणि कोठे तो शब्द चैतन्य याअर्थी वापरला आहे हे समजणे आवश्यक आहे. गीतेतल्या प्रसिद्ध ‘वासांसि जीर्णानि’ श्लोकात (गीता २.२२) ‘मनुष्य जुनी वस्त्रे टाकून नवी वस्त्रे घेतो, त्याप्रमाणे आत्मा जुने शरीर टाकून नवीन शरीर धारण करतो’ अशी शिकवण आहे. इथे आत्मा या शब्दाचा संदर्भ सूक्ष्म शरीर असा आहे. त्यांच्या पुढचाच श्लोक ‘नैनं छिन्दन्ति’ (गीता २.२३) – ‘आत्म्याला शस्त्रे कापू शकत नाहीत, विस्तव जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही आणि वारा वाळवू शकत नाही’, त्यात आत्मा याचा अर्थ ब्रह्म या अर्थी आहे. आत्मा, ब्रह्म याअर्थी अद्वितीय आहे आणि सूक्ष्म शरीर याअर्थी जितके जीव तितकी सूक्ष्म शरीरे – बहु – याअर्थी आहे.

ब्रह्म – तैतरिय उपनिषद ब्रह्म शब्दाची व्याख्या ‘सत्यम् ज्ञानम् अनंतम् ब्रह्म’ अशी करते. ‘सतचिदानंद’ अशीही ब्रह्म ची दुसरी व्याख्या प्रचलित आहे. ब्रह्म शब्द आत्मा म्हणजे ‘सृष्टीच्या निर्मितीच्या मुळाशी व सृष्टीमध्ये जे अद्वितीय असे चैतन्य आहे’ या अर्थी आहे. उपनिषदांनुसार ब्रह्म सर्वत्र, निर्गुण, अविनाशी, निराकार आणि अचिंत्य असे आहे. स्थल-कालाची उत्पती यातून झाली आणि स्थल-कालाचा लय ब्रह्मामध्ये होतो व ही प्रक्रिया पुन:पुन्हा होत राहते.

ईश्वर – ब्रह्म यालाच समानार्थी शब्द परंतु कोणत्या संदर्भात ब्रह्म ईश्वर होते आणि कोणत्या संदर्भात आत्मा होते ही समजणे महत्वाचे आहे. ब्रह्म जेंव्हा नाम-रुपामध्ये व्यक्त होते त्या नाम-रूपाला जगत् (सृष्टी) म्हणतात. सर्व सजीव-निर्जीव वस्तूंनी सृष्टीची रचना होते. या सृष्टीच्या मुळाशी आणि सृष्टीच्या प्रत्येक नाम-रूपात जे ब्रह्म आहे तोच ईश्वर. नाम-रूपात्मक सृष्टीची निर्मिती करण्याची जी सृजनात्मक शक्ति तिला ‘माया’ म्हणतात. इथे माया, ईश्वर आणि ब्रह्म यांचा संबंध महत्वाचा आहे. ब्रह्म मूळ आहे. छांदोग्य उपनिषदात ‘बहू स्याम् प्रजायेय इति’ – ‘बहु (many, नानात्व) व्हावे’ अशी त्या ‘तत्वाला’ (ब्रह्म) कामना झाली आणि सृष्टीची निर्मिती झाली अशी श्रुती आहे. या कामनेला – सृजनात्मक शक्तीला – माया हे नाव दिले आहे. ईश्वराने (ब्रह्म) सृजनात्मकतेने (मायेने) सृष्टी उत्पन करताना प्रथम त्रिविध गुणांची (सत्व, रज, तम) निर्मिती केली त्यामुळे सृष्टी गुणयुक्त आहे. अशा ईश्वराला सगुण ईश्वर असे नाव आहे. ईश्वर सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी निराकार, अविनाशी, सनातन असे असणारे ब्रह्म असल्यामुळे तोच ईश्वर निर्गुणही आहे. विशिष्टअद्वैत मतानुसार ईश्वर निर्गुण असूच शकत नाही, त्यामुळे ब्रह्म ही सविशेषच असते आणि सगुण ईश्वर हा ‘हरी’ (विष्णू) होय. काही संप्रदाय शंकराला सगुण ईश्वर मानतात तर काही देवीला! उपासना पद्धती मध्ये यांचे प्रतिबिंब पडलेले दिसते. अब्राहमीक धर्मांमध्ये असलेला दयाळू, सर्वसत्ताधीश आणि सर्वशक्तिमान असलेल्या ईश्वर (गॉड, अल्लाह) या संकल्पनेत आणि उपनिषदांनी दर्शवलेल्या ईश्वर संकल्पनेत काही मूलभूत फरक आहेत. औपनिषदिक ईश्वर हा सृष्टी सोडून स्वर्ग नावाच्या जागी रहात नाही. किंबहुना, स्वर्ग हा सुद्धा जगताचा भाग आहे आणि ही सर्व सृष्टी ईश्वरामध्येच आहे. अब्राहमीक विचारांमध्ये ईश्वराचं कार्य हे भक्तांच्या पारलौकिक आयुष्यात महत्वाचे असते. अब्राहमीक ईश्वर त्याच्या भक्तीमुळे प्रसन्न होवून भक्ताला स्वर्ग प्रदान करतो. भक्त जर ईश्वराने सांगितलेल्या मार्गाने गेला नाही तर कोपतो आणि भक्ताला शिक्षा करतो. आता अद्वैतमतांच्या आत्मा, ब्रह्म आणि ईश्वर या तिन्ही संकल्पना केवळ अमूर्त आहेत आणि आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवर खऱ्या आहेत की नाहीत हा आस्तिक-नास्तिक वादातला मूळ वाद आहे. अर्थात पुढे यातून सश्रद्ध समाजात रूढी निर्माण होतात आणि श्रद्धा-अंधश्रद्धा यांचा वाद सुरू होतो.

या संकल्पना रोजच्या जीवनात कशा उपयोगी आहेत, त्यातून काय साध्य होते यासाठी सत्य-मिथ्या या समजणे महत्वाचे आहे.
सत्यवस्तू ची व्याख्या – सत्य म्हणजे ती वस्तु जी ३ कसोट्यांची पूर्तता करू शकते
(१) जी वस्तु भूत-वर्तमान-भविष्य काळात नेहमी अस्तित्वात असते,
(२) जिच्यात कोणताही बदल घडत नाही,
(३) तिचे अस्तित्व स्वतंत्रपणे असते, ती वस्तु इतर कोणत्याही वस्तूवर अवलंबून असत नाही.
या ३ कसोट्या लावून तार्किकदृष्ट्या विचार केला असता हे लक्षात येते की सृष्टीतील सर्व जड-तरल, सजीव-निर्जीव वस्तु या तिन्ही कसोट्या पार करू शकत नाहीत. आता याच ३ कसोट्या ‘ब्रह्म’ या संकल्पनेला लावल्या तर ब्रह्म सत्य वस्तु म्हणून सिद्ध होते.

मिथ्या – बोलीभाषेत मिथ्या चा अर्थ असत्य, व्यर्थ किंवा भ्रम निर्माण करणारे असा आहे. अद्वैतमतानुसार मिथ्या वस्तूची व्याख्या सुस्पष्ट आहे. मिथ्या वस्तु ती जी
(१) स्थल-कालाला बाध्य आहे,
(२) जिच्यात काळानुसार बदल होतो,
(३) जी इतर काही वस्तूंची बनलेली असते.
सत्य-मिथ्या समजण्यासाठी काही पारंपारिक रुपकांचा वापर केला जातो. पाणी आणि लाट या रुपकात, लाट प्रत्यक्ष दिसते, लाट विशिष्ट स्थल-कालात निर्माण होते, तिची वाढ होते आणि एका क्षणी लाटेचा अंत होतो. मुळात लाट ही पाण्यावर अवलंबून असते. पाण्याशिवाय लाटेचे अस्तित्व शक्य नाही. या रुपकाच्या चौकटीत विचार करता पाणी स्वतंत्रपणे अस्तित्वात आहे, लाटेवर पाणी अवलंबून नाही आणि लाट निर्माण होण्याआधी, लाट असताना आणि लाट फुटल्यानंतर (नष्ट झाल्यानंतर) पाण्याचे अस्तित्व तसेच राहते, त्यात कोणताही बदल घडत नाही. पाणी-लाट रुपकात पाणी सत्य आहे आणि लाट मिथ्या आहे. तसेच दुसरे रुपक सोने आणि दागिने ही आहे. अंगठी, चेन, बांगड्या ही सोन्याचीच नाम-रुपे आहेत. अंगठी वितळवून चेन आणि चेन वितळवून बांगडी केली तरी मुळाशी सोनेच असते. या रुपकाच्या चौकटीत दागिने मिथ्या आणि सोने सत्य. मिथ्या या शब्दाच्या तांत्रिक (टेक्निकल) व्याख्येनुसार मिथ्या म्हणजे भ्रम नव्हे. मिथ्या वस्तु अस्तित्वात असते पण मिथ्या वस्तूला स्थल-कालाचे बंधन असते आणि मिथ्या वस्तु सत्यावर अवलंबून असते. सत्य वस्तूचे नाम-रूप म्हणजे मिथ्या.

मिथ्या शब्दाचा गैरअर्थ कसा प्रचलित होतो यासाठीचे उदाहरण म्हणजे एक प्रसिद्ध श्लोक ‘ब्रह्म सत्यम् जगन् मिथ्या’! हा श्लोक आद्य शंकराचार्यलिखित ‘ब्रह्मज्ञानावलीमाला’ नावाच्या श्लोकसंग्रहातील असून ‘ब्रह्म सत्यम् जगन् मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापरः| अनेन वेद्यं सच्छास्त्रमिति वेदान्तडिण्डिमः||२०||’ असा आहे. अर्थात, ‘ब्रह्म हे सत्य आहे, जग मिथ्या आहे आणि विविध वेदवाक्यांमधून याचाच उद्घोष होत आहे’. प्रचलित मराठीत मिथ्या चा अर्थ भ्रामक, खोटा असा आहे. अद्वैत वेदांताचा परिचय नसल्यामुळे ‘जग खोटं आणि भ्रामक आहे, एखाद्या मृगजळाप्रमाणे’ असा अर्थ लावून वेदांत हे दर्शन आपल्या वस्तुस्थिती पासून किती दूर आहे, किंवा जग आणि व्यवहार नांकारणारे आहे असे वाटू लागते. पण सत्य-मिथ्या यात जग मिथ्या आहे म्हणजे खोटे आहे असा नाही हे आता समजावे.

आता पुढच्या भागात मोक्ष आणि ज्ञान यावर विचार करू.

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

27 Dec 2022 - 4:23 pm | आनन्दा

वाचत आहे

अभिजीत's picture

29 Dec 2022 - 8:04 pm | अभिजीत

धन्यवाद

कंजूस's picture

27 Dec 2022 - 6:57 pm | कंजूस

सजीवांच्या बाबतीत जो विचार आहे की जन्म - वाढ -मृत्यू तो निर्जिवांनाही लागू आहे.
.
बाकी बौद्ध, जैन व चार्वाक परंपरांचा उगम झाला .
म्हणजे तत्त्वज्ञानाची बैठक वेगळी आहे.
बौद्धमताने ईश्वर आणि आत्मा नाकारला. कर्म आणि पुनर्जन्म यात गोंधळ आहे. जातककथांतून पुनर्जन्म दिसतो. मोक्ष म्हणजे निर्वाण, या जन्मम‌त्यू चक्रातून मुक्तता.
जैनांनी कर्म,पाप,पुण्य आणि पापाचे निराकारण मार्ग घेतला. पुनर्जन्म आहे, ईश्वर आहे. अहिंसा मतांचा अतिरेक म्हणजे जीवनाचा एकांगी विचार फार टोकाचा केला.
ब्राह्मण धर्मात जातीभेदाचा, पौराणिक कथांचा,पाप पुण्याचा फार विचार झाला. आत्मा,कर्म,ईश्वर आहेच.

अभिजीत's picture

29 Dec 2022 - 8:09 pm | अभिजीत

निर्जीव वस्तूंसाठी जन्म - वाढ -मृत्यू म्हणजे काळाच्या मोजपट्टीवर निर्जीव वस्तू नसणे - ती वस्तू एका विशिष्ट स्वरूपात या जगात असणे आणि अशी वस्तू नष्ट झाल्यावर असलेला काळ!
बाकी प्रतिसादाबद्दल - पुढच्या काही भागांत यावर लिहीन
धन्यवाद

सजीवांच्या बाबतीत जो विचार आहे की जन्म - वाढ -मृत्यू तो निर्जिवांनाही लागू आहे.

अगदी योग्य. विविध कलावंतांच्या कलाकृतींच्या अभ्यासातून हे प्रकर्षाने जाणवते. कलाकृतींचेही 'नशीब' असते. उदा. मोनालिसा या चित्राला लाभलेले वलय. व्हॅन गॉग, व्हरमीर, पिकासो यांची चित्रे. मोझार्ट वगैरेंच्या संगीत रचना. मोरोपंत, वामनपंडित आदिंचे काव्य. बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेऊन अशा कलानिर्मितींचे फक्त 'नशीब' बघूनही विस्मय वाटतो.

.
व्हॅन गॉगने रंगवलेले हे चित्र १९४५ साली आग लागून नष्ट झाले. 'पिझारो' ची अनेक तैलचित्रे युद्धाचे वेळी सैनिकांनी बुटांना चिखल लागू नये म्हणून जमिनीवर अंथरून ठेवली होती ती सगळी नष्ट झाली.

मूळ लेखाबद्दलः अलिकडे काही काळापासून बहुतांश मिपावाचक हे गंभीर, अभ्यासपूर्ण, वैचारिक, अध्यात्मिक, तात्विक इत्यादि लेखनाविषयी उदासीन झालेले असून, आत्मा, ब्रह्म, ईश्वर वगैरेंविषयी कुणाला काही आस्था राहिलेली नाही की काय असे वाटते.
मोबाईल, टीव्ही, कायप्पा, यूट्यूब, नेटफ्लिक्स इत्यादीतून चोवीस तास अखंड कोसळणार्‍या करमणुकीचा हा परिणाम असावा का ?

कंजूस's picture

28 Dec 2022 - 12:52 pm | कंजूस

विचार मांडण्यापेक्षा ते करून बघत आहेत. कारण भविष्य हे वर्तमान जगण्यात आहे.

कर्नलतपस्वी's picture

28 Dec 2022 - 1:42 pm | कर्नलतपस्वी

आत्मा, ब्रह्म, ईश्वर वगैरेंविषयी कुणाला काही आस्था राहिलेली नाही की काय असे वाटते.
मोबाईल, टीव्ही, कायप्पा, यूट्यूब, नेटफ्लिक्स इत्यादीतून चोवीस तास अखंड कोसळणार्‍या करमणुकीचा हा परिणाम असावा का ?

एक तर दोन वित खळगी भरताना होणारी ओढाताण, परस्पर विरोधाभास व राहीली साहीली कसर करोना या मुळे ब्रह्म सत्यं जगन मिथ्या यावरचा विश्वास उडल्या सारखा वाटतोय.

जान है तो जहान है वरना दुनिया कब्रस्तान है ,हेच जास्त खरे वाटते.

गहन विषय व वेळ नाही त्यामुळेच या विषयाकडे दुर्लक्ष होते असे वाटते.

अभिजीत's picture

29 Dec 2022 - 8:12 pm | अभिजीत

खरंय!
आपल्या समृद्ध परंपरेचा अभ्यास नसल्यामुळे आपल्या सर्वांचीच अशी अवस्था थोडीबहुत आहे.

कर्नलतपस्वी's picture

28 Dec 2022 - 1:43 pm | कर्नलतपस्वी

आत्मा, ब्रह्म, ईश्वर वगैरेंविषयी कुणाला काही आस्था राहिलेली नाही की काय असे वाटते.
मोबाईल, टीव्ही, कायप्पा, यूट्यूब, नेटफ्लिक्स इत्यादीतून चोवीस तास अखंड कोसळणार्‍या करमणुकीचा हा परिणाम असावा का ?

एक तर दोन वित खळगी भरताना होणारी ओढाताण, परस्पर विरोधाभास व राहीली साहीली कसर करोना या मुळे ब्रह्म सत्यं जगन मिथ्या यावरचा विश्वास उडल्या सारखा वाटतोय.

जान है तो जहान है वरना दुनिया कब्रस्तान है ,हेच जास्त खरे वाटते.

गहन विषय व वेळ नाही त्यामुळेच या विषयाकडे दुर्लक्ष होते असे वाटते.

चित्रगुप्त's picture

28 Dec 2022 - 3:52 pm | चित्रगुप्त

या संदर्भात मला माझे एक स्नेही/नातलग/गुरू यांची आठवण आली. त्यांचे इंग्रजी, फ्रेन्च आणि रशियन भाषेवर प्रभुत्व होते आणि मराठीखेरीज या तिन्ही भाषांमधील तत्वज्ञानादि विषयांवरील ग्रंथ त्यांनी अभ्यासिलेले होते. पुष्किनचे महाकाव्य त्यांना मुखोद्गत होते. ते वयाने माझ्यापेक्षा वीसेक वर्षे मोठे असतील.
माझ्या तारुण्यात मीही मराठीतले अनेक तत्वज्ञानपर ग्रंथ वाचायचो आणि त्यावर बोलणे/लिहीणेही मला आवडायचे. एका मित्रासोबत याविषयी तासनतास चर्चा करणे आणि अन्य मित्रांना अनेक पानी पत्रे लिहीणे वगैरे मी हिरिरीने करायचो. मी तिशीत असताना एकदा ते मला म्हणाले की हे सगळे तत्वज्ञान वगैरे निव्वळ शब्दांची निरूपयोगी भेंडोळीच्या भेंडोळी असून ती कितीही उलगडायचा प्रयत्न केला तरी काहीही हाती लागत नाही. त्यापेक्षा आपण प्रत्यक्ष हातांनी काहीतरी काम करणे - मग ते घरातला केर काढणे वा खिडकीला रंग लावणे अशातले अगदी किरकोळ का असेना - जास्त श्रेयस्कर असते. (या संबंधात गुर्जीएफ बद्दल खूप चांगले वाचनात आले होते) सुरुवातीला मला त्यांचे हे म्हणणे पटले नाही, पण अनुभवाअंती माझेही तसेच मत झाले. तेंव्हापासून मी त्या वाटेला गेलेलो नाही.
'पतंजलींची योगसूत्रे' हा मात्र एकदम वेगळाच, विलक्षण प्रकार आहे, त्याचा अभ्यास/सराव सर्वांनी अवश्य केला पाहिजे.

तत्वज्ञान (तर्क, संकल्पनांचा व्यूह आणि प्रारूपे याअर्थी) , अनुभव आणि अनुभूती या मार्गाने ज्ञानप्राप्ती हा भारतीय विचार आहे. पुढच्या काही भागात यावर लिहीन.
धन्यवाद.

धागाकर्त्याचे खालील चर्चेविषयी काय मत आहे, हे जाणून घेण्यास आवडेल