@सहित्य सम्पदक भट्कन्ती दालन उघडत नाही म्हणून लेख इथे डकवला आहे.
Döstädning उर्फ Death Cleaning उर्फ मोकळे हात !
@अनिंद्य, यांनी एका वेगळ्याच विषयाला हात घातला.संवेदनशील वाचकांचे विचारांना चालना देणारे प्रतिसाद आले. विषयाच्या अनुरूप जगायचा,वागायचा प्रयत्न करतोय. बाकी सर्व सोपे वाटले पण पहिल्या व तिसर्या पिढीतला गुंता कसा सोडवायचा हे लक्षात येत नाही.
माझी नात व मी पहिल्या दिवसा पासून एकत्र आहोत,आमच्यातले नाते आता खुप गुंतागुंतीचे झालेय.
"तुझं माझं पटेना व तुझ्या वाचून कठेना", या गुंत्यातून कसा पाय सोडवायचा कळत नाही.असो, आजचा विषय जरा वेगळा पण थोडा वरील विषयाला धरूनच आहे.
दुसरी माय
नात म्हणजे दुधावरची साय
आजोबांची दुसरी माय
किती जरी आजोबा मोठा
तिच्या पुढ्यात नेहमीच छोटा
तीच म्हणू शकते .........
आजोबा तुम्हाला काय बी कळत नाय
नात नाही आधाराची काठी
ती तर पाडव्याची गाठी
थोडे दिवसच मिळते पण
मिळते फक्त उतारवयासाठी.......
नात म्हणजे अप्रतिम भेट
आली देवा कडून थेट
जशी झुळूक थंड वार्याची
धार नितळ नीळ्या झर्याची
नात म्हणजे दुधावरची साय
आजोबाची दुसरी माय........
अनुभवल्या बिगर कळत नाय......
१८-८-२०२०
दुपारची वामकुक्षी अनिवार्य. माझ्याशी खेळा म्हणून नात हट्ट धरून बसली.मी म्हणालो जर मला थोडा वेळ झोपून दिलेस तर मी तुला 'वर्ल्ड टुर', वर घेऊन जाईन. आजची पिढी हुशार व सतर्क आहे. नात म्हणाली माझा व्हिझा पण नाही झालायं, मला फसवता काय? पण कसातरी समझौता झाला व मला तासभर झोपेची परवानगी मिळाली.
झोप झाली, चहा पिऊन ताजा तावाना झालो व दोघेही निघालो भटकंती साठी.आपण कुठे चाललोय हे तीला न सांगता शाहू काॅलेज रोडवरच्या सेव्हन वंडर पार्क मधे घेऊन आलो. पुणे तेथे काय उणे.
छोटीशीच बाग,एका दृष्टीक्षेपात तीच्या लक्षात आले व चेहर्यावरचा आनंद बघून समाधान वाटले.
/br>
****
/>
सेव्हन वंडर्स ड्रीम पार्क
सेव्हन वंडर्स ड्रीम पार्क किंवा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण उद्यान हे पुण्यातील सहकारनगर,स्वारगेट भागात शाहू काॅलेज रोडवर,राजीव गांधी ई-प्रशिक्षण केंद्रा समोर आहे. हे एक छोटेसे थीम पार्क,उद्यानाचे वैशिष्ट्य म्हणजे जगातील सात आश्चर्यांच्या हुबेहुब,लघु प्रतिकृती इथै नीटनेटकेपणे उभारल्या आहेत. दोन लघुस्मारकां मधे व्यवस्थित अंतर व एकमेकांना सीमेंटच्या मार्गाने जोडले आसल्यामुळे अगांतुकांची गर्दी वाटत नाही. प्रत्येक लघुस्मारका जवळच माहीती फलक असल्या मुळे मनोरंजना बरोबरच सामान्य ज्ञानातही भर पडते. सभोवताली हिरवीगार झाडी, गवताची कुरणे व आकर्षक बगीचा आहे. इथे छायाचित्रे काढण्यास कुठल्याही प्रकारचे शुल्क अथवा मनाई नाही. प्रत्येक लघुस्मारका जवळ छायाचित्र घेणाऱ्यांची गर्दी दिसते. चिन ची भिंत सोडून बाकीच्या सहा लघुप्रतीकृती बागेत उभारल्या आहेत. या गोष्टींचा आनंद जागेवर जाऊनच जास्त मिळावा म्हणून थोडीच छायाचित्रे इथे डकवत आहे.
/>
१.आयफेल टाॅवर २.पिसा, झुकता मनोरा
/>
३.पिरॅमिड्स
/>
४.स्टोनहॅन्ज
/>
५.ताजमहाल ६.The Colosseum
/>
लघुस्मारका व्यतिरिक्त, थीम पार्क मध्ये विविध सुपरहिरो व लोकप्रिय कार्टून पात्रांचे कट-आउट्स देखील आहेत.पालक आणि मुले बॅटमॅन, मोगली, हनुमान आणि इतरांसोबत छायाचित्रे घेण्याचा आनंद घेताना दिसत होती. सात आश्चर्ये पाहण्या व्यतिरिक्त, काही मुले कुटुंबासोबत हिरवळीवर बसून सहलीचा आनंद घेत होती तर काही लहान मुले बागेत झोपाळा, घसरगुंडी सारख्या राइड्सचा आनंद घेत होती.एकंदरीत वातावरण आमोद प्रमोद व उत्साहवर्धक होते.दोन आकडी वय माझे या बागेतील बागडणारे बालपण बघून थोड्या वेळा पुरते का होईना एक आकडी झाल्या सारखे वाटले.
/>
स्वातंत्र्याचा पुतळा सेल्फी पॉइंट
/>
जीराफ सेल्फी पॉइंट
/>
सेव्हन वंडर्स ड्रीम पार्क मधे वरील गोष्टींच्या शिवाय एक 4D थिएटर देखील आहे. याचे नाव दादासाहेब फाळके यांच्या नावावर आहे आणि ते दररोज संध्याकाळी १० मिनिटांचे छोटे शो चालवतात. 4D अनुभवा सह Aladdin, Adventures of Alibaba या सारख्या विविध बाल चित्रपटांचा आनंद घेऊ शकता. काही कारणास्तव सिनेमागृह बंद होते व बागेत प्रवेश शुल्क सुद्धा नव्हते. तसे प्रवेश शुल्क मात्र विस रूपये आहे. विशेश म्हण्जे बाग सोमवार ते रविवार सातही दिवस सकाळी सहा ते दहा व संध्याकाळी चार ते आठ वाजेपर्यंत संपुर्ण वर्षभर उघडे असते.
सकाळी आसपासचे लोक चालण्या साठी,व्यायामा साठी प्रतिदिन येतात. या बागेत खुल्या मैदानावर व्यायाम उपकरणे सुद्धा उपलब्ध आहेत. संपूर्ण बागेचे अवलोकन व सिनेमागृहातले चित्रपट बघण्या साठी साधारण एक तास पर्याप्त आहे. वर्षभरात जरी भेट देता येत असली तरी चांगले,आनंद वर्धक वातावरण नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत असते. हे उद्यान पुणे रेल्वे स्थानकापासून फक्त ७-८ किमी अंतरावर आहे व विमानतळा पासून सुमारे 15 किमी आहे. हे उद्यान सहकारनगर भागात आहे आणि शहराच्या कानाकोपऱ्यातून येण्यासाठी बस,रिक्षा व वैयक्तीक वाहानाने आपण सहज येऊ शकतो. गाडी पार्क करण्यासाठी मर्यादित जागा आहे. या उद्यानाचे व्यवस्थापन पुणे मनपा करते.अगांतुकां बरोबर येथील कर्मचाऱ्यांचा व्यवहार खुप चांगला वाटला.संध्याकाळची वेळ व अपर्याप्त प्रकाश योजनेमुळे येथील लघुस्मारकांचे सौंदर्य हवे तसे उठून दिसत नव्हते. कलात्मक प्रकाश योजना केल्यास उद्यानाचे सौंदर्य निश्चितच आणखीन लोकांना आकर्षित करेल.
आजूबाजूला खाण्याचे पदार्थ विक्रीस नसल्यामुळे बटाट्यांच्या चकत्यांची खाली पाकीटे,खाली बाटल्या वगैरे कचरा नदारद होता. शिशीर ऋतूमुळे पाला पाचोळा मात्र भरपूर होता. वाहनतळाची पर्यायी व्यवस्था झाल्यास वाहतूक कोंडी व स्थानिक लोकांना होणारा त्रास वाचेल.उद्यान सर्व वयोगटातील लोकांना उपयुक्त आहे तेंव्हा यात काही मुलभूत सोयी होणे अपेक्षित आहे. संबधीत अधिकाऱ्यांना याबद्दल विनंती पत्र पाठवले आहे.
/>
बागुल उद्यान /नाला पार्क टी -५५ टॅन्क
/>
स्वर्गीय वसंतराव एकनाथ बागुल उद्यान,
याच परीसरात जवळच एक किलोमीटर अंतरावर स्वर्गीय वसंतराव एकनाथ बागुल उद्यान, ज्याला नाला पार्क म्हणूनही ओळखले जाते, ते सात एकरांवर पसरलेले आहे. यात विशेश आकर्शण संगीतमय कारंजे, मुलांसाठी एक उद्यान, जॉगिंग ट्रॅक आणि लोकांना बसून हिरवळीचा आनंद घेण्यासाठी एक चांगले पसरलेले लॉन आहे.त्याचा पाया 1995 मध्ये घातला गेला.
बागेच्या आवारातच 20,000 चौरस फुटांचा भूखंड कलेच्या संवर्धना साठी वापरत तीन मजली पंडित भीमसेन जोशी कलादालन,संकुल बांधले आहे. हिंदुस्थानी गायक पंडित भीमसेन जोशी यांच्या नावावर असलेल्या या संकुलात एक मिनी थिएटर, एक संगीत ग्रंथालय आणि एक कलादालन आहे.
कलादालनात विविध घराण्यातील नामवंत शास्त्रीय गायकांची मोठी चित्रे लावलेली आहेत. संगीत लायब्ररीमध्ये अभ्यागतांना संगीत ऐकण्यासाठी संगणक आणि हेडफोनसह 28 क्यूबिकल्स आहेत. (मनपाच्या संकेतस्थळावरून) उशीर व लेझर खेळाची वेळ झाल्यामुळे म्हणून कलादालन बघता नाही आले.
उद्यानात मोठ्ठा म्युझिकल फाउंटन हैदराबादच्या तज्ञांनी बांधला. 1,000 तोटी वाले अनेक फव्वारे 20-फूट-उंच पाण्याची विवीध रंगी नक्षीदार चित्रे रेखाटतात. समोरच सुमारे सहाशे लोकांना बसता येईल एवढ्या मोठ्या क्षमतेच्या खुले सभागृह आहे. त्रि-आयामी लेझर खेळाचा आनंद प्रेक्षक इथेच बसून घेतात. प्रत्येक आठवड्याच्या दिवशी 20 मिनिटांचे दोन लेसर शो आणि आठवड्याच्या शेवटी संध्याकाळी तीन शो असतात.
/>
-----------------------------लेझर शो
/>
एक झलक
/>
या उद्यानात भरपूर हिरवळ असून बॉटलब्रश, कैलाशपती, कांचन, सोनेरी दुरांटा अशी अनेक झाडे आहेत. येथे जिराफ, चित्ता, हत्ती, हरीण, कासव आणि मगरींच्या फायबर ग्लासपासून तयार केलेल्या मोठ्या प्रतिकृतीही आहेत. मुलांना खेळायला झोपाळे व घसरगुंड्या आहेत तर नागरिकांना फेरफटका मारायला लांब हिरवळ आहे.
उद्यानात सर्वांना मोफत प्रवेश आहे. सकाळी ६ ते १० व संध्याकाळी ४ ते ८.३० उद्यान चालू असते.
उद्यानात शिरताच टि-55 हा रणगाडा सर्वांचे लक्ष वेधून घेतो. याचे जवळच माहीती फलक आहे. म्युझिकल फाउंटन जवळ दोन APC, बख्तरबंद गाड्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतात. लेझर खेळाच्या शेवटी प्रसिद्ध वंदेमातरमची धुन,तीच्या तालावर रंगीत कांरज्यांचा नाच व बख्तरबंद गाड्या देशभक्तीचे वातावरण निर्माण करतात मग अपसुकच प्रेक्षकांच्या तोंडून भारत माता की जय ही घोषणा बाहेर पडते.
इथे वाहनां साठी मुबलक जागा आहे. खाण्या पिण्याच्या हातगाडय़ा आहेत. मुलांना आवडणारे चटपटे पाॅपकाॅर्न सुद्धा आहेत. मोठ्यांसाठी रसवंती , पाव भजी,कच्ची दाबेली,महिलांसाठी चाट,पाणीपुरी सुद्धा आहे.येथील स्वच्छता वाखाणण्या सारखी आहे मात्र पर्याप्त प्रकाश योजना इथे सुद्धा नदारदच होती. नाला पार्क असून सुद्धा कुठलाही घाण, वास किंवा कचरा आजिबात आढळून आला नाही.
शेजारीच श्री गजानन महाराज संस्थानची भव्य अकर्षक मंदिर वजा इमारत आहे.
एकुण काय, मनोरंजन,सामान्य ज्ञान,संगीत,देशभक्ती,देवभक्ती, खादंती या सर्वच गोष्टी एकत्रीत झाल्यात.रस्त्यात ताज्या भाज्यांचे विक्रेते व फुलवाले रांगेने बसलेले होते.अपसुकच महिलावर्ग तीकडे आकर्षित न झाला तरच नवल.
घरी परत येत असताना बिबवेवाडी मधील आवडत्या कल्याण भेळ मधे भेळ, पावभाजी,पिझ्झा व कुल्फी याची पार्टी झाली.याचे मालक वारकरी आहेत. मंद आवाजात अभंगवाणी सतत चालू असते. हातगाडी ते भेळ माॅल असा यांचा जबरी प्रवास आहे.गेली बारा वर्ष नियमित ग्राहक असल्याने बर्यापैकी ओळख आहे.
अशी छोटीशीच भटकंती उर्जा देऊन गेली. My Nanu strongest म्हणत पुढच्या रविवारी कुठे अशी नातीने गुगली टाकली.
उद्यानाचे उत्तम व्यवस्थापना साठी पुणे मनपा व सर्व कर्मचारी आभिन्दानास पात्र आहेत यात शन्काच नाही.
प्रतिक्रिया
14 Dec 2022 - 11:56 am | कर्नलतपस्वी
फोटो डकव्ण्यत चुकी झाली. चु .भु, दे.घे.
14 Dec 2022 - 2:01 pm | कंजूस
नक्कीच जाऊ.
नातीचा गुगली आवडला.
सेव्हन वंडर पार्क यांचे स्थानिक नाव काय आहे?
14 Dec 2022 - 2:24 pm | कर्नलतपस्वी
कंजूस भौ,स्थानिक नाव यशवंतराव चव्हाण उद्यान, सहकारनगर. गूगल करा सर्व माहीती उपलब्ध आहे. संध्याकाळी चार ते आठ च्या दरम्यान गेल्यावर दोन्ही उद्यान व लेझर शो चालवतात आनंद घेता येईल.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
14 Dec 2022 - 2:54 pm | कंजूस
PMPML BUS शोधण्याची एकही चांगली साईट नाही.
15 Dec 2022 - 9:41 am | प्रचेतस
उद्यान खूपच सुरेख दिसतेय. नूतन आश्चर्यांच्या प्रतिकृती एकदम हुबेहूब केल्यात. ओबडधोबडपणा जराही दिसत नाही, शिवाय अगदीच लहान नसून उलट भव्यच दिसत आहेत.
धन्यवाद कर्नलसाहेब या धाग्याबद्दल. एक मिपा कट्टा इथे आयोजित केलाच पाहिजे.
15 Dec 2022 - 10:25 am | कर्नलतपस्वी
पाताळेशवर सारखे इथले कर्मचारी पाताळात धाडण्यात उत्सुक दिसले नाही.
खुले प्रेक्षागृहात सहज जमू शकतो .
15 Dec 2022 - 11:04 am | Bhakti
मस्तच!ही बाग ४-५ वर्षांपूर्वी कन्येसह पाहिली होती.छान आहे.फोटो सापडले की देईन इथे.नात गोड आहे.
15 Dec 2022 - 12:11 pm | गोरगावलेकर
नवीन ठिकाणाची ओळख करून देण्याची आपली शैलीही आवडली.
15 Dec 2022 - 1:45 pm | श्वेता२४
नेहमीप्रमाणे कविता झकास. छान आहे बाग. नात गोड आहे. मला माझे आजोबा आठवले. मी पण त्यांचा हात धरुन कुठे कुठे फिरत असे. असो. छान भटकंती वर्णन.
15 Dec 2022 - 2:37 pm | सरिता बांदेकर
छान माहिती,फोटो,नात.
सर्वच छान. पुण्याला यावं लागेल यासाठी.
17 Dec 2022 - 10:12 am | कर्नलतपस्वी
प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासून आभार.
22 Dec 2022 - 1:13 pm | टर्मीनेटर
अरे वाह... मस्त आहे हे 'सेव्हन वंडर्स ड्रीम पार्क' 👍
संकल्पना आवडली! चीन ची भिंत तेवढी बांधयची का बाकी ठेवली असावी हा प्रश्न मात्र उगाचच सतावतोय 😀 उद्यानाच्या कुंपणाचा थोडासा भाग कींवा एखादा कोपरा सातवे जागतिक आश्चर्य असलेल्या 'त्या' भिंतीसारखा बांधला असता तर संकल्पना पुर्णत्वास गेली असती असं उगाचंच वाटतंय... आपल्या अपेक्षाच फार हो 😂
अवांतरः
योगायोग बघा कसा असतो, हा लेख वाचत असताना सेव्हन वंडर्स ड्रीम पार्क मधल्या ताजमहालाचा फोटो बघितला आणि बुऱ्हाणपुरला माहेरी गेलेल्या एका मित्राच्या बायकोने आत्ताच तिथला एक फोटो व्हॉट्सऍप वर पाठवलाय. तिथे एका शौकीनाने स्वतःचे रहाते घर म्हणून 'ताजमहालाची' हुबेहूब प्रतिकृती उभारली आहे. अतिशय सुंदर बांधकाम केलेले असल्याने ह्या माणसाचे रहाते घर आता एक पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला आले आहे 😀