भरली भेंडी
साहित्य :-
भेंडी - स्वच्छ पुसून, डेखं काढून आणि मधे उभ्या चिरून
डाळीचं पीठ - पाव किलो भेंडीसाठी साधारण ३ चमचे
जाड/बारीक - रवा अर्धा चमचा
कोरडं खोबरं - २ चमचे
धने पावडर - अर्धा लहान चमचा
जिरे पावडर , गरम मसाला, लाल तिखट, हळद, चाट मसाला - प्रत्येकी १ लहान चमचा
बारीक चिरलेली कोथिंबीर
साखर - अर्धा चमचा
मीठ - चवीनुसार
साजूक तूप - १ चमचा
फोडणीचे साहित्य- तेल, मोहरी, जिरे, हिंग
कृती :-
एका कढल्यात डाळीचं पीठ, रवा आणि कोरडं खोबरं वेगवेगळे भाजून घेणे. भाजून झाल्यावर हे तिन्ही जिन्नस एकत्र करून त्यात धने-जिरे पावडर, गरम मसाला, लाल तिखट, हळद, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीपुरते मीठ, थोडीशी साखर घालून एकत्र करणे. हे तयार मिश्रण मधे उभ्या चिरलेल्या भेंडीत दाबून भरणे.
एका कढईत नेहमीपेक्षा थोडे जास्त तेल घालून तेल तापले की फोडणी करून घेणे. त्यात भरून ठेवलेल्या भेंड्या घालणे. गॅस मोठा ठेऊनच परतणे.
भेंड्या छान परतल्या गेल्या की बाजूने साजूक तूप घालणे.
गॅस बंद केल्यावर वरून चाट मसाला, मीठ व हवे असल्यास लाल तिखट भुरभुरावे.
गरम असतानाच ताव मारावा. :)
टीप :-
या भेंड्यांना पाण्याचा हात न लावल्याने अजिबात तार येत नाही. तरीही तार सुटलीच तर वरून थोडासा लिंबाचा रस घालावा.
-- शाल्मली.
प्रतिक्रिया
13 Dec 2008 - 3:01 pm | परिकथेतील राजकुमार
आजच रात्री करुन बघतो !
भेंडी म्हणजे आमचा जीव की प्राण !
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
13 Dec 2008 - 4:42 pm | सुनील
फोटो आणि पाकृ छान.
तार सुटलीच तर लिंबाचा रस घालण्याबद्दल तुम्ही सांगितले आहेच. तरीही, जर भरायच्या मिश्रणात थोडी चिंचेची पेस्ट घातली तरी चालू शकेल असे वाटते.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
14 Dec 2008 - 2:21 pm | शाल्मली
<<जर भरायच्या मिश्रणात थोडी चिंचेची पेस्ट घातली तरी चालू शकेल असे वाटते.<<
मी चिंचेचा कोळ घालून कधी करून पाहिली नाही. परंतु, चिंचेमुळे भेंडी ओलसर होईल असे वाटते.
पुढच्या वेळेस तशी करून बघीन.
--शाल्मली.
13 Dec 2008 - 5:19 pm | विसोबा खेचर
आमची लै फेवरेट पाकृ. आमच्या घरी म्हातारीने परवाच केली होती..!
फोटूही जोरदार! आजची खादाडी सदरात केव्हातरी टाकता येईल.. अजूनही येऊ द्या अश्याच उत्तमोत्तम चवदार, चटकदार पाकृ!
शाल्मलीकाकूंना धन्यवाद.. :)
तात्या.
13 Dec 2008 - 6:15 pm | विनायक प्रभू
असेच म्हणतो
13 Dec 2008 - 5:25 pm | यशोधरा
मस्त गं शाल्मली! फोटोपण एकदम छान आलाय!
13 Dec 2008 - 7:22 pm | रेवती
माझी आवडती भाजी.
रवाही घालतात हे माहीत नव्हतं. आता अश्या प्रकारे करून बघीन.
फोटू चवदार आलाय.;)
रेवती
13 Dec 2008 - 7:39 pm | शितल
मी दाण्याचा कुट, ओले खोबरे, आणि दोन चमचे बेसन,थोडासा लिबांचा रस, कोथंबिर, आणि कोल्हापुरी मसाला आणि दोन चमचे तेल घालुन मसाला तयार करते.
ह्या प्रकारे ही एकदा करून बघेन.
फोटो मस्त आला आहे. :)
13 Dec 2008 - 9:49 pm | प्राजु
मी ही शितलने सांगितल्याप्रमाणेच करते. कोल्हापूरी मसाला वापरून.
ह्या पद्धतीनेही करून पाहीन आता.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
13 Dec 2008 - 11:26 pm | स्वाती राजेश
रेसिपी छान आहे...
रवा घालून कधी केली नव्हती..छान कल्पना आहे..
नक्की करून पाहीन.
14 Dec 2008 - 12:32 am | वर्षा
मस्त आहे पाकृ! करुन पाहणार नक्की!
(पण मला इथल्या (अमेरिकेतल्या) थोराड भेंड्या बघून त्या घ्याव्याश्याच वाटत नाहीत...आपल्या भारतातल्या कश्या छान असतात )
14 Dec 2008 - 12:33 am | चकली
"भेंड्या छान परतल्या गेल्या की बाजूने साजूक तूप घालणे.
गॅस बंद केल्यावर वरून चाट मसाला, मीठ व हवे असल्यास लाल तिखट भुरभुरावे."
हे मस्त आहे. यामूळे रेसिपी जास्त आवडली.
चकली
http://chakali.blogspot.com
14 Dec 2008 - 12:40 am | चतुरंग
भन्नाट पाकृ. मस्तच आलाय फोटू! :)
भाजून झाल्यावर हे तिन्ही जिन्नस एकत्र करून....
ह्या वाक्यातला 'जिन्नस' हा शब्द वाचून फार बरे वाटले! खूप दिवसानी मला हा शब्द वाचायला मिळाला.
(खुद के साथ बातां : रंगा, तू करणार का रे प्रयत्न भरली भेंडी करायचा? :O नुसतं खायला येतं पदार्थ करायच्या नावानी बोंब! :S )
चतुरंग
15 Dec 2008 - 6:01 pm | स्वाती दिनेश
भेंडी माझी फेवरिट,
तुझी भाजी पण झकास झालेली दिसते आहे,
स्वाती
15 Dec 2008 - 7:49 pm | शाल्मली
सर्व खवय्यांना धन्यवाद. :)
--शाल्मली.
30 Dec 2008 - 7:56 pm | राघव
काय दिसतीये ती भरली भेंडी!!
मला तर बघूनच तोंडाला पाणी सुटलं =P~
मस्त!! बायकोला सांगावे लागेल.. या आठवड्यात भेंडीची भाजी नक्की!!
मुमुक्षु