उकडीचे मोदक

मनि२७'s picture
मनि२७ in पाककृती
6 Sep 2022 - 12:54 pm

साहित्य उकड साठी - १ वाटी सुवासिक तांदूळ पिठी. (आंबेमोहोर किंवा बासमती ची घ्यावी ), १ वाटी पाणी, तूप, मीठ.
सारण साठी - बारीक किसलेले ओले खोबरे १ वाटी, १ वाटी किसलेला गूळ तूप, वेलची आणि जायफळ पूड, खसखस एक चमचा.
कृती- सारणाची - गॅस वर एक कढई ठेऊन त्यात थोडा तूप टाकावे. त्यात किसलेला ओला नारळाचा किस टाकून थोडा परतवावं. त्यात किसलेला गूळ टाकावा. गुळाचं पाणी सुटून गूळ वितळायला लागेल. मिश्रण सतत हलवत राहावे. थोड्या वेळाने गूळ आणि खोबरायचा मिश्रण घट्ट होत जाईल. त्यावेळी ह्यात जायफळ पूड आणि वेलची पूड घालावी. एक लहान चमचा खसखस पण टाकावी. मिश्रण छान एकजीव होई पर्यंत हलवत राहावे आणि त्या नंतर गॅस बंद करावा. सारण तयार आहे.

पारी साठी- प्रथम गॅस वर एका भांड्या मध्ये १ वाटी पाणी उकळत ठेवावे. पाणी उकळत आला कि त्यात किंचित मीठ आणि एक चमचा तूप टाकावे. मग त्यात तांदूळ पिठी टाकून सतत हलवावे. हे करतांना गॅस कमी असावा. त्या नंतर पीठ छान एकत्र पाण्यामध्ये मिसळून घ्यावे आणि भांड्यावर झाकण ठेऊन गॅस बंद करावा. उकड ला चांगली वाफ आल्यावर २ ते ३ मिनिटांनी उकड एका परातीत काढून घ्यावी. थोडा पाणी आणि तुपाचा हात लावून उकड छान मळून घ्यावी. उकड थोडी गरम असतांनाच माळवी फार गरम असेल तर वाटीला खालच्या बाजूला तूप लावून त्याने माळली तरी चालेल. उकडीचा छान गोळा मळून झाला कि झाकून ठेवावा. त्यातला एक लिंबू आकाराचा गोळा हाती घ्यावा. त्याची छान वाटी करून घ्यावी. त्यात मावेल ठेवढा गूळ खोबऱ्याचं सारण भराव. आणि हळू हळू गोल गोल फिरत मोदकाचा वरील भाग बंद करावा. आणि मोदकाला छान आकार द्यावा. कळ्या येण्यासाठी तुम्ही लहान चमचा तुपात बुडवून देखील कळीचा आकार देऊ शकता.
सगळे मोदक वरील प्रमाणे भरून घ्यावे. आणि छान तयार करावे. आता मोदकांना वाफ देण्यासाठी एका मोठ्या भांड्यात आणि उकळत ठेवावे. त्या वर एक चाळणी ठेवावी. चाळणीला छान तूप लावून घ्यावे किंवा त्यावर केळीचे किंवा हळदीचे पण ठेवावे. त्याला सुद्धा तूप लावून घ्यावे. आता एका वाटी मध्ये पाणी घ्यावे आणि आपला एक एक मोदक पाण्यात बुडवून चाळणीत उकडण्यासाठी ठेवावा. प्रत्येक मोदकावर एक केशराची काडी टाकावी त्याने मोदकाला रंग सुरेख येतो. केशर मिश्रित दूध घातलं तरी चालत. पण एक किंवा दोन थेंबच टाकावे. आता मोदक साधारण १५-२० मिनिटे छान वाफवून घ्यावे.
बाप्पाचा आवडीचा मोदक प्रसाद तयार आहे.

प्रतिक्रिया

छान रेसिपी... पण फोटो नसल्याने फाउल धरण्यात आला आहे 😀

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Sep 2022 - 7:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रेसेपी छान. उकडीचे मोदक आवडतात. पण, पाककृतीत फोटो असला पाहिजे, ही अलिखित अट असते.

तेव्हा, पुढील रेसीपीत फोटो जरुर टाका. पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

-दिलीप बिरुटे