मिसळपावने मला काय दिले!

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in काथ्याकूट
1 Sep 2022 - 10:38 am
गाभा: 

कालच मिसळपाव संस्थळाचा सोळावा वर्धापन दिन झाला ( पंधरा वर्षे पूर्ण केली )
ही गोष्ट एका संस्थळाने इतकी वर्षे पूर्ण केली इतपतच मर्यादित नाही.
मी मिसळपावच्या अगदी पहिल्या नाही पण सुरवातीच्या सदस्यांपैकीमलाही येथे येऊन तब्बल साडेचौदा वर्षे झाली असे दिसतेय.
या इतक्या वर्षात मिपा ( मिसळपाव) ने मला काय दिले याचा विचार करत होतो.
मग लक्ष्यात आले की मोजता येणार नाहीत इतक्या गोष्टी आहेत.
मिपा वर जेंव्हा जॉइन झालो तेंव्हा इथले मोकळे वातावरण पाहून गम्मत वाटली.
कोणताच अभिनिवेष नसलेल्या मोकळ्या चाकळ्या गप्पा हे स्वरुप आवडलेच. पण इथले वातावर अगदी घरातल्यासारखेच वाटले.
लोक लेख लिहितात. त्यावर चरा होतात, वादविवाद होतात. अगदी अनोळखी असलेले लोक मित्र होतात.
हे इतक्या पुरतेच नाही.
मिपा मुळे मी व्यक्त व्हायला शिकलो.
लेखन करायला शिकलो. माझी पहिली कादंबरी ही मिपामुळेच लिहीली गेली.
अनेक प्रकारचे मित्र मिळाले.
अगदी कधी न पाहिलेले अनोळखी लोकही मिपामुळे अगदी घरातल्या सारखे झाले.
रामदास धमाल मुलगा छोटा डॉन , आनंदयात्री , पेठकर काका , दाढे डॉक्टर , गवि , प्रभू मास्तर , तात्या अभ्यंकर , ब्रिटीश , स्वाती राजेश , ३.१४अदिती, क्लिंटन , नीलकांत , यांसारखे एरवी कधी सम्पर्कात आले नसते असे अनेक मित्र मिळाले.
राजकारण , पाकक्रिया , सिनेमे , कविता , प्रवास , पुस्तके कशावर चर्चा होत नाहीत इथे!
मिपा हे एक संस्थळ नाही. ती एक संस्कृती आहे. जगभरात पसरलेले.
जगात कुठे जा मिपाकर भेटतीलच. पेठकर काका लंडन ला आले होते तेंव्हा आवर्जून भेटले.
लंडनला असताना आदुबाळ , वगैरे मंडळीनी काढलेली ग्रीनीच आणि बाथ सिटीची ट्रीप तर खूपच स्मरणात राहील.हे योग केवळ मिपामुळे.
हे माझे काही.. मिपामुळे मला मिळालेले

प्रतिक्रिया

विवेकपटाईत's picture

1 Sep 2022 - 1:44 pm | विवेकपटाईत

मराठी येत नसतानाही मराठी लिहणे शिकविले. आपले विचार प्रयत्न केल्यास आपण शब्दांत मांडू शकतो. एकाच धाग्यावर भिन्न-भिन्न प्रतिसाद वाचता-वाचता एकाच समस्येचे विभिन्न बाजू समजू लागलो आणि सरकारी कागदांवर चांगल्या रीतीने नोटिंग करणे शिकलो. हा ही फायदा मिळतो.

कर्नलतपस्वी's picture

1 Sep 2022 - 1:52 pm | कर्नलतपस्वी

+१
वयोमानानुसार (मिपा सदस्य काल) तुम्ही आजोबा.
आम्हालाही,विजूभौ, मुवी,चित्रगुप्त, पैजारबुवा,चौको,शेखर मोघे आणी बरेच मित्र मीळाले.
शुद्धलेखन सुधारले,भाषासमृद्धी, भाषाशुद्धी कडे वाटचाल सुरू झाली.
कधी हत्यारे चालवत होतो आता लेखणी चालवायला शिकत आहे.
लाँग लिव्ह मिपा आणी कुटुंब.

कुमार१'s picture

1 Sep 2022 - 2:22 pm | कुमार१

मिपा हे माझे एक विस्तारित कुटुंब झाल्याची सुखद भावना आहे.

• ३ ‘मिपा-पुणे कट्टे’ तसेच १ जालीय कट्टा : संस्मरणीय.
त्यातून मला आपल्यातील काहींच्या भेटीचा आनंद मिळाला. या सगळ्याचा परिणाम म्हणूनच मनापासून लेखन करता आले.

चौथा कोनाडा's picture

1 Sep 2022 - 10:27 pm | चौथा कोनाडा


मिपा हे एक संस्थळ नाही. ती एक संस्कृती आहे. जगभरात पसरलेले.


💖

अगदी समर्पक +१,११,१११ /-

ला़ख पतेकी बात !

हा एक मराठी विकिपेडीया आहे.
.......एक वाचक.....

श्रीगणेशा's picture

2 Sep 2022 - 9:12 am | श्रीगणेशा

मिपामुळेच मला नियमित लिहिण्याची सवय लागली. स्वतःचे विचार लिखाणातून एकत्रित (consolidate) करायला शिकता आलं. लहानपणी व तरुण वयात राहून गेलेलं पुस्तके वाचन थोडं फार तरी पूर्ण करण्याची प्रेरणा मिपावरील विविध विषयांवरील वाचनातून मिळाली. माझ्या मराठी शब्दसंग्रहात आणि त्याच्या नियमित वापरात लक्षणीय भर पडली!

काही प्रत्यक्ष आणि बऱ्याच अप्रत्यक्ष ओळखीतून वेगवेगळे विचार असणारे, वाचन लिखाण जगलेले मिपाकर वाचून पाय जमिनीवर राहिले.

सर्व मिपाकरांना मिपावर्धापन दिनाच्या, गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! _/\_

उत्तमोत्तम वाचायला मिळाले, जिंदादिल चर्चांचा भाग होता आले, फॅन व्हावं अशी लेखकमंडळी मिपावर पहायला मिळाली. हे मिपाचे मोठेच योगदान.

जेम्स वांड's picture

2 Sep 2022 - 11:36 am | जेम्स वांड

लिहिण्याची कला दिली, उत्तम विचार संग्रही ठेवायची कला दिली, ग्रामीण कथांचा बाज अजून एक्सप्लोर करण्याची संधी दिली, राजकीय वादांत पण खेळीमेळीचे वातावरण टिकवणे दिले आणि अतिशय नीच मनोवृत्तीने "अभ्यासाविणा प्रकटोन" अतिशय चीप बोलणाऱ्या लोकांना इग्नोर करण्याची पण कला दिली.

तुषार काळभोर's picture

2 Sep 2022 - 1:39 pm | तुषार काळभोर

यावरून प्रशांत यांनी बरोब्बर दोन वर्षांपूर्वी सांगितलेला किस्सा आठवला. त्यांना कसे एकदा अवचितपणे फ्रान्समधील रेल्वे स्टेशनवर चित्रगुप्त भेटले ते...
श्रीगणेश लेखमाला २०२० - आठवणी मिपाकर्सच्या
a

शशिकांत ओक's picture

5 Sep 2022 - 11:55 am | शशिकांत ओक

चित्रगुप्त एकदम पॅरिसमध्ये अवतरले पाहून आनंद झाला

"देणाऱ्याने देत जावे
घेणाऱ्याने घेत जावे
घेता घेता एक दिवस
देणाऱ्याचे हात घ्यावे."

च्या धर्तीवर मिपावर माझ्या बाबतीत असे झाले -

"लिहिणाऱ्याने लिहीत जावे
वाचणाऱ्याने वाचत जावे
वाचता वाचता एक दिवस
लिहिणाऱ्याचे हात घ्यावे."

जवळपास सहा वर्षांपूर्वी मिपाचे सदस्यत्व घेतले असले तरी आधीची ३-४ वर्षे वाचक होतो. अनेक मिपाकर लेखकांचे उत्तमोत्तम लेखन वाचत होतो, त्यातल्या बोका-ए-आजम आणि जव्हेरभाऊ (जव्हेरगंज) ह्यांच्या लेखमालिकांवर प्रतिसाद देण्यासाठी म्हणुन २०१६ मध्ये मिपाचे सदस्यत्व घेतले आणि तेव्हापासून इथेच रमलो.

मिपाकरांचे लेखन वाचता वाचता एके दिवशी लिहायला सुरुवात केली. काल्पनिक वगैरे काही लिहायचे म्हणजे त्यासाठी भरपूर विचार करणे आले, तेवढा वेळ आणि संयम नसल्याने सर्वात सोपा असा अनुभवाधारित लेखनाचा मार्ग चोखाळला! त्याला मिपाकरांकडून मिळालेले प्रोत्साहन आणि सकारात्मक प्रतिसादातुन आपणही दीर्घलेखन करू शकतो असा साक्षात्कार झाला. त्याआधी कधी फेसबुक/ट्विटरवर पण स्वयंस्फूर्तीने चार सहा ओळींची पोस्ट न लिहिलेल्या माझ्या सारख्या एका सामान्य वाचकाला बरे-वाईट कसे का असेना पण ते लिहिण्यासाठी प्रवृत्त करण्याचे श्रेय हे सर्वस्वी मिपा आणि मिपाकर वाचक/लेखकांचे आहे 🙏

बाकी मिपावर अनेक चांगले मित्र/मैत्रिणी मिळाल्या आहेतच, त्यातल्या काही जणांशी प्रत्यक्ष भेटी झाल्या आहेत / होत असतात.

मिपा हे एक संस्थळ नाही. ती एक संस्कृती आहे.

+१००००० आणि त्या संस्कृतीचा पाईक असल्याचा मला सार्थ अभिमान आहे!

मिपा सदस्य घेण्यापूर्वी पासून लिखाण कागदावर होते. मिपा सदस्य घेऊन ते लिखाण मिपावर प्रकाशित केले.
तात्यांची आठवण येणे सहाजिक आहे.
इतर अनेक सदस्य कट्यांत प्रत्यक्ष भेटले. अनेक सदस्य जवळचे मित्र झाले. अर्थात सर्वच जण ओपन माईंडचे हितेच असे नाही. काही सदस्यांची कोर्ट कज्जे पर्यंत मजल गेली हे ही आठवते.

मिपाने बरेच काही दिले.

मी माझे पहिले पस्तक - वगनाट्य वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही हे मिपा ला व मिपा सदस्यांना डेडीकेट केले होते. त्यानंतर अजून दोन पुस्तके ध्वनि प्रदूषणावर प्रकाशित केली.

मिपामुळे विचार प्रगल्भ झाले, लिखाणात सातत्य आले. मिपाच्या सर्वात आनंदी काळात सदस्य असल्याचा अभिमान वाटतो आहे. दर दिवशी लिखाण असे महिनाभर केल्याचे मला आठवते आहे.

मिपा फुलो, फळो अजून बहरो, आमच्याकडून अनेक प्रकारचे लिखाण मिपावर येवो या सदिच्छा व्यक्त करतो.

प्रचेतस's picture

2 Sep 2022 - 4:16 pm | प्रचेतस

मिपाने बरेच काही दिले.

मिपामुळे थोडंसं लिहिता आले. शेकडो मिपाकरांना प्रत्यक्ष भेटता आले, त्यातले बरेचसे जीवाभावाचे मित्र झाले. सगळ्यात पहिला भेटलेला मिपाकर म्हणजे ५०फक्त, पहिला घरी आलेला मिपाकर म्हणजे अप्पा जोगळेकर. नंतर मिपाचे बरेच कट्टे झाले, मिपाकरांच्या घरी मुक्काम करुन पाहुणचार घेतला गेला, माझ्या घरीही कित्येक मिपाकर येऊन गेले, अजूनही येतात. अजूनही कट्टे होतात मात्र आता कट्ट्यांचे स्वरुप बरेचसे खाजगी राहिलेले आहे :).

मिपाकरांसोबत रायगड, राजगड, लोहगड, पाटेश्वर, लोणीभापकर, वेरुळ, अजिंठा, देवगिरी, कान्हेरी, वसई, भीमाशंकर, पिंपरी दुमाला, पेडगाव, कोकण, किकलीम महाबळेश्वर, सातारा, वाई, भुलेश्वर, घारापुरी, ताम्हिणी, कार्ले, भाजे, बेडसे, पाताळेश्वर अशा कित्येक एक दिवसापासून ते दोन तीन दिवस मुक्कामाच्या भ्रमंती झाल्या. मिपाने जीवन समृद्ध केलं.

कपिलमुनी's picture

2 Sep 2022 - 8:15 pm | कपिलमुनी

आता कट्टे खासगी होण्याचे कारण म्हणजे कट्टे व्हॉट्स ॲप वर ठरतात , सार्वजनिक धागे निघत नाहीत.

अनिंद्य's picture

5 Sep 2022 - 11:57 am | अनिंद्य

मिपाने 'आनंद' दिला.

सर्वस्वी अपरिचित व्यक्तींकडून भरभरून 'कौतुक' मिळाले, त्यामुळे लिहिण्याचा उत्साह टिकून राहिला / राहतो.

चौथा कोनाडा's picture

5 Sep 2022 - 11:05 pm | चौथा कोनाडा

+१

अगदी. हेच म्हणतो !

चंद्रगुप्त काका व बहुगुणी सर ह्यांची ही आठवण आली, त्यांना मला भेटायचे आहे.

सुमो's picture

8 Sep 2022 - 11:28 am | सुमो

वाचायला मिळाले इथे. लेखन आपला प्रांत नाही हे माहिती होते त्यामुळे चांगलं कसदार वाचायला मिळेल तिथे वाचत गेलो.

रेसिपीज,प्रवासवर्णनं,घमासान चर्चा, रसग्रहण,व्यक्तिचित्रं असं सगळं वाचता आलं मिपावर.

थँक्यू मिपा.

मिसळपाव मुळे मला अनेक मित्र मिळाले.
एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे या सर्वांचे वाचन उत्तम आणि चौफेर आहे.
प्रचेतस , बॅटमॅन, अशा अनेकांना भेटलो नाही
३.१४ अदिती ( संहीता जोशी ), पेठकर काका , धमाल मुलगा , छोटा डॉन , रामदास , प्रभू मास्तर , सर्वसाक्षी , तात्या अभ्यंकर , दाढे डॉक्टर , इनोबा , विनायक पाचलग , श्रावण मोडक , यक्कू , आदुबाळ , स्वाती राजेश , अशी कितीतरी नावे सांगता येतील . या सगळ्या मित्रांना एरवी कधी भेटू शकलो नसतो. मिपामुळे हे शक्य झाले.
देशोदीशीचे मित्र मिळाले

नावांची यादी वाचताना मधेच काय काय गमावलं याचीही आधी दचकवणारी आणि मग दुखरी जाणीव झाली. असो.

श्री विजुभाऊ, तुमच्याच लेखावर तुमचीच तेच सांगणारी प्रतिक्रिया बघुन औत्सुक्य वाटले.

प्रचेतस's picture

8 Sep 2022 - 5:35 pm | प्रचेतस

:)

घारापुरीला भेटलोय की विजुभाऊ :)

घारापुरीचे शैवलेणे - मिपाकरांसोबत

विजुभाऊ's picture

8 Sep 2022 - 6:02 pm | विजुभाऊ

हो हो आठवले की.
नामबदलामुळे थोडा गोंधळलो

विजुभाऊ's picture

8 Sep 2022 - 5:25 pm | विजुभाऊ

हो द्विरुक्ती झाली खरी.
पण त्या बर्‍याच जणाना आता मिस करतो. त्यातला एक आनंदयात्री आता कुठे आहे तेही माहीत नाही.
पण खूप हळवे लिहायचा तो. आगरी भाषेत ब्रीटीश लिहायचा. त्याला भेटेपर्यंत मी त्याला पक्का आगरी इसमच समजत होतो.
रामदास, गवी , बोका ए आझम , यांचे लिखाण मिस करतो.
रामदासांच्या ऑफिसला एकदा गेलो होतो तेथे येताना गाडी चालवताना बासरी वाजवणारे त्यांचे ब्रांच मॅनेजर हे देखील एक धमाल व्यक्तीहोते.
मुंबैत घारापुरी लेण्याची सहल , इंग्लंड मधे बाथ सिटीची सहल हे वेगळाच अनुभव देऊन गेले.
आनंदाचे असे पुष्कळ क्षण आहेत असे.
यक्कू च्या जाण्याचा धक्का बसला होता. बरेच दिवस लागले त्यातून सावरायला.
हे सगळे घरचेच आहेत असे अजूनही वाटते.

Trump's picture

8 Sep 2022 - 5:52 pm | Trump

भाऊ, गेले ते दिवस.

मुक्त विहारि's picture

8 Sep 2022 - 7:48 pm | मुक्त विहारि

कठीण समय येता, मिपाकर कामास येतात...

पर्णिका's picture

9 Sep 2022 - 2:40 am | पर्णिका

हे योग केवळ मिपामुळे .. मिपामुळे मला मिळालेले

फारच सुंदर मागोवा ... तुमचे लेखन नक्की वाचेन. :)

इरसाल's picture

9 Sep 2022 - 11:15 am | इरसाल

राहिलो कां?

विजुभाऊ's picture

9 Sep 2022 - 12:12 pm | विजुभाऊ

बस क्या गुरु,.....
तुमच्या कडे गुरगावला आलो होतो ते कसा विसरेन.

धर्मराजमुटके's picture

9 Sep 2022 - 1:31 pm | धर्मराजमुटके

छान ! मी देखील सहज माझा मिसळपाव वरील प्रवास पाहिला असता जवळजवळ साडेतेरा वर्ष झालेली दिसली. एवढी वर्षे कशी गेली ते कळालेच नाही. मिपा आयुष्याचा एक महत्वाचा भाग झाला आहे. इतका की ब्राऊजर मधे नेहमी मिपा चा एक टॅब उघडलेला असतो. मिपा प्रशासनाने एकदा संपादक मंडळावर येणार काय अशी विचारणा केली होती तसेच एकदा मी जुने धागे खुप प्रमाणात वर काढले होते तेव्हा ताकीद / समज दिली होती ते आठवले.
तेरा वर्षात एकाच कट्ट्याला (ठाणे घोडबंदर ला झालेला) प्रत्यक्ष हजर राहायला जमले.
एका धाग्यात कोणीतरी I am not here to make friends असे म्हटल्याचे आठवते पण मी But I am not here to make foes too हे तत्त्व पाळण्याचा प्रयत्न केला.
मित्र म्हणावे तर खास अशी मैत्री कोणाशी झाली नाही मात्र कोणी शत्रू देखील बनले नाहीत. आयुष्यात काही मिळविले नाही पण काही गमावले देखील नाही हीच मराठी मध्यमवर्गीय माणसाची हीच काय ती कमाई :)

आता कुणीतरी मी मिसळपाव ला काय दिले यावर एखादा धागा काढा.

मुक्त विहारि's picture

9 Sep 2022 - 6:32 pm | मुक्त विहारि

सुर्याला प्रकाशाची गरज नसते, तसेच कुणीही मिपाला काही देऊ शकत नाही ....

मिपा स्वयंभू आहे आणि ते स्वयंभूच राहील ...


तसेच कुणीही मिपाला काही देऊ शकत नाही ....


असं नसतयं. जग दिल्या घेतल्याचं आहे. टाळी एका हाताने वाजत नाही.

आग्या१९९०'s picture

10 Sep 2022 - 9:45 pm | आग्या१९९०

मिपाला देण्याचा बरेचजण प्रयत्न करतात. काहींनी मिपाला ' पोलीस टाईम्सचा ' दर्जा देण्याचा प्रयत्न केला परंतु मिपा व्यवस्थापनाने त्यांचे धागे उडवून तो दर्जा नम्रपणे नाकारला.

काहींनी मिपाला ' पोलीस टाईम्सचा ' दर्जा देण्याचा प्रयत्न केला परंतु मिपा व्यवस्थापनाने त्यांचे धागे उडवून तो दर्जा नम्रपणे नाकारला.

तोच तर प्रॉब्लेम आहे. त्याच धाग्यात असलेले, त्याच प्रतिसाद कर्त्यांनी दिलेले आणि तस्सेच प्रतिसाद इतर धाग्यांवर महिनो न महिने टिकून आहेत तिथे दर्जा आड येत नसावा बहुतेक. अर्थात हे खाजगी मालकीचे संस्थळ असल्यामुळे चालकांचे अधिकार मान्य असावेच लागतात नाहीतर चपला घालण्याचा पर्याय असतोच पण मग दर्जा आणि धोरण यातील धरसोड उघड होते एव्हढेच.

आग्या१९९०'s picture

10 Sep 2022 - 11:28 pm | आग्या१९९०

तोच तर प्रॉब्लेम आहे. त्याच धाग्यात असलेले, त्याच प्रतिसाद कर्त्यांनी दिलेले आणि तस्सेच प्रतिसाद इतर धाग्यांवर महिनो न महिने टिकून आहेत तिथे दर्जा आड येत नसावा बहुतेक.

फरक आहे. वेगवेगळ्या धाग्यांमध्ये असे प्रतिसाद लपले जातात परंतु पूर्ण धागाच त्या विषयावर असेल तर लक्ष वेधले जाते. वृत्तपत्रातही अशा बातम्या छापल्या जातात, परंतु पूर्ण पानच त्यासाठी राखणाऱ्या वृत्तपत्रांचा दर्जा वेगळा असतो. मिपाही दर्जा सांभाळण्यासाठी अशी काळजी घेते हे योग्यच आहे.

मुक्त विहारि's picture

10 Sep 2022 - 11:31 pm | मुक्त विहारि

तिथे टाळी स्वीकारल्या जात नाही....

कधी भेटलो तर खुलासा करीन...

वामन देशमुख's picture

10 Sep 2022 - 11:06 am | वामन देशमुख

मिसळपावने मला काय दिलंय याचं मोजमाप होणार नाही.

तरीही मागच्या दहा-बारा वर्षांत - संयम बाळगणे, तारतम्य ठेवणे, ३६० अंश विचार करणे, अधिक प्रभावीपणे व्यक्त होणे, अधिक चांगल्या रीतीने मराठी भाषा वापरणे, इतरांचे म्हणणे किमान ऐकून घेणे, काही बाबी अंगाला लावून न घेणे (फाट्यावर मारणे), सकारात्मक विचार करणे, स्वतःची मते तपासून बघणे, गरज असल्यास त्यांत बदल करणे... इत्यादी गोष्टी मला शिकवण्यात मिपाचा सिंहाचा वाटा आहे.

मुक्त विहारि's picture

10 Sep 2022 - 11:10 am | मुक्त विहारि

सहमत आहे ...

एकाच नाण्याला असंख्य बाजू असतात, हे मिपानेच पटवून दिले आहे ..

काही बाबी अंगाला लावून न घेणे

खरेच हे खूप महत्वाचे आहे.

सर टोबी's picture

11 Sep 2022 - 9:46 am | सर टोबी

मिपावर मी बरेच वर्षं वाचनमात्र होतो. सुरवातीलाच संस्थानिक असल्यागत मालकांचं वागणं बघून आणि काही लाडावलेल्या सभासदांची वर्तणूक बघून फारसं काही चांगलं मत झालं नाही. तरीपण कशामुळे तरी वाचत राहिलो. त्यानंतर एकदा सदस्यत्व घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. तेव्हा बहुदा सदस्यत्व फक्त निमंत्रितांसाठीच आहे की काय असे वाटून गेले. नंतर काही वर्षांनी दुसऱ्यांदा प्रयत्न केला तेव्हा सदस्य होता आले.

इथे काही जणांना जिवाभावाचे मित्र मिळाले, काही जणांना संपादक मंडळाच्या सहभागाविषयी विचारणा झाली हे माझ्यासारख्या किनाऱ्यावरील माणसाला अचंबित करते. कुठल्या गिरणीतलं पिठ वापरत असतिल बरे हि मंडळी?

मिपावर काही सुंदर विनासायास वाचायला मिळाले हे निःसंशय. पण त्यासाठी मिपाला मखरात बसविण्याची माझी तयारी नाही. अशा लोक सहभागाशिवाय मिपालादेखील अस्तित्व नाही हेही तितकेच खरे.

काही सदस्यांच्या लिखानांचा आणि सामाजिक दृष्टिकोनाबद्दल मला खरंच आदर होता. पण त्यांच्या राजकीय विचारसरणीमुळे ती माणसं मनातून उतरली हेही तितकेच खरे. दान जसे सत्पात्री असावे तसेच निष्ठा ज्यांना वाहायच्या तेहीं सत्पात्रीच असावे अशी माझी धारणा आहे.

भविष्य काळात समाज माध्यमांच्या आचार संहितेच्या कक्षात मिपा येईलच. तो दिवस लवकर यावा हि अपेक्षा.

मित्रहो's picture

11 Sep 2022 - 8:31 pm | मित्रहो

मी साधारण मे २०१४ पासून मिपाचा सदस्य आहे. मी नियमितपणे अधून मधून लिहित असतो. फार कमी प्रमाणात प्रतिसाद देत असतो. कधी कोणताही मिपा कट्टा अटेंड केला नाही त्यामुळे प्रत्यक्ष कुणाशीही भेट नाही. कुणी कधी भेटले तरी मी ओळखणार देखील नाही. वर कुणीतरी म्हटल्याप्रमाणे कुणी मित्र नाही तसे कुणी शत्रू देखील नाही.
मिपामुळे लिहिते राहण्याची इच्छा टिकली. काही मंडळींच्या लेखावरील प्रतिक्रिया कायम लक्षात राहिल्या. या अशा प्रतिक्रियांमुळे लिहिते राहता आले. कुणीतरी एक वाचणारा आहे म्हटले की लिहिण्याची इच्छा टिकून राहते.

धाग्याला दोन वर्षे होऊन गेली.
मधल्या काळात काही नवे सदस्य झालेत.
त्यानी लिहावे "मिसळपाव ने मला काय दिले" ते.