सजलेल्या दख्खनच्या राणीतून प्रवास (भाग-1)

पराग१२२६३'s picture
पराग१२२६३ in भटकंती
24 Aug 2022 - 6:18 pm

दख्खनची राणी

त्या दिवशी दख्खनची राणी प्रवासाला निघण्यापूर्वी कधी नव्हे इतकी सजत होती. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या तिच्या नेहमीच्याच फलाट क्र. 9 वर ती खूप लवकर येऊन उभी राहिली होती. मी फलाटाजवळ पोहचत होतो, तेव्हा तिला यार्डातून घेऊन आलेला कल्याणला राहणारा (म्हणजे कल्याण लोको शेडचा) WDS-6S हा पिवळ्या रंगाचा कार्यअश्व मला लांबूनच दिसला. फलाटावर आल्याबरोबर राणीला सजवण्यासाठीची लगबग सुरू झाली होती. तसा त्या दिवशी काही तिचा वाढदिवस नव्हता आणि असला तरी ती तिच्या वाढदिवसालाही सजत नाही इतकी त्या दिवशी सजत होती. इतकंच नाही तर कधी नव्हे ते मध्य रेल्वेच राणीला सजवत होती हे अतिशय विशेष!

दख्खनच्या राणीला लवकरच नवीन, अत्याधुनिक LHB डबे जोडले जाणार असं गेली चार वर्ष सतत सांगितलं जात होतं; पण ते ‘लवकरच’ काही उजाडत नव्हतं. तिच्या आधी मुंबई-पुणे धावणाऱ्या इतर गाड्यांना असे डबे आलेही, पण मानाच्या राणीला काही तसे डबे मिळेनासे झाले होते. दख्खनच्या राणीसाठी खास डबे तयार होण्यात बराच वेळ गेला आणि जेव्हा डबे मुंबईत दाखल झाले, त्यानंतरही तीन महिने डबे दादर आणि माटुंग्याच्या मध्ये उभेच होते. पण शेवटी तो दिवस उजाडला होता आणि त्या दिवशीपासून दख्खनची राणी अत्याधुनिक LHB डब्यांसह नव्या रंगरुपात प्रवाशांच्या सेवेत दाखल होत होती. मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी तिला हार, फुलं, फुगे लावून सजवायला सुरुवात केली होती. या सजलेल्या राणीच्या सोर उभं राहून फोटो काढण्याचा मोह प्रत्येकालाच होत होता. पण त्यात दख्खनच्या राणीची विशेष ओळख असलेल्या भोजन यानाकडं (Dining Car) आणि पर्यायानं त्याच्या सजावटीकडं सर्वात जास्त लक्ष दिलं जात होतं.

दरम्यान, फलाटावर सगळीकडं Railfans ची मोठी गर्दी दिसत होती. हल्ली YouTube मुळं Railfans हा नवा समुदाय उदयास आलेला आहे. या सगळ्या गर्दीतून सजत असलेल्या दख्खनच्या राणीचे फोटो काढत मी पुढे पहिल्या डब्याजवळ, राणीच्या कार्यअश्वाच्या जागी पोहचलो. तो यायला अजून थोडा वेळ असला तरी तो येत असल्याचे संकेत मिळत होते त्याच्या हॉर्नवरून. तोपर्यंत इथे जमलेल्या Railfans ची चर्चा सुरू झाली होती. कोणतं लोको आज लावलं पाहिजे, लावलं जाईल यापासून कॅमला लवकर सेवानिवृत्त करू नये वगैरे वगैरे. डाऊन राणीला सर्वात पुढे असणारा Vista Dome सजवलेला होता आणि राणीच्या वैशिष्ट्यपूर्ण रंगसंगतीतला तो सजलेला Vista Dome मस्तच दिसत होता. काही मिनिटांतच राणीचं सारथ्य करण्यासाठी अजनीचा पांढराशुभ्र WAP-7 हा कार्यअश्व गाडीजवळ आला; तेवढ्यातच त्याचे फोटो काढायला Railfans ची एकच धावपळ सुरू झाली. इंजिनाची गाडीशी जोडणी होईपर्यंतही त्यांना दम नव्हता. खाली रुळांवर उतरून समोरी फोटो काढण्यासाठी त्यांची पळापळ सुरू होती. गडीशी जोडणी केली जात असताना रुळांवर उतरलेल्यांना लोको पायलट हॉर्न वाजवून जरा बाजूला व्हा म्हणते होता, पण त्याकडे कोणी फारसं लक्ष दिलं नाही. कारण त्या सगळ्यांना आपापल्या चॅनेल्सवर टाकण्यासाठी फोटो आणि व्हिडिओ हवे होते.

व्हिस्टा

इंजिनाची जोडणी झाली, HOG यंत्रणेची जोडणी झाली, लोको पायलट आणि गार्ड यांच्याबरोबरच अन्य कर्मचाऱ्यांची गाडी सोडण्याआधीची पूर्वतयारी होत आली होती. प्रवाशांची लगबग सुरू होतीच. गाडी सुटायला 10च मिनिटं राहिली होती त्यामुळं मी माझ्या डब्याजवळ पोहचलो, माझा डबा शेवटी-शेवटी होता. LHB डबे जोडल्यावर दख्खनची राणी 20 डब्यांची होणार अशा बातम्या येत होत्या, प्रत्यक्षात तिचा पूर्वीपेक्षा एक डबा कमीच झाला. त्यातच अनारक्षित एकच, शेवटचा डबा दिसत असल्यामुळं अनारक्षित आणि पासवाल्यांचा गोंधळ होत होता.

ठीक 17:10 ला दख्खनची राणी LHB डब्यांबरोबरच्या पहिल्या प्रवासासाठी निघाली. माझ्या डब्यात जरा गर्दी कमी होती. दादर ओलांडायच्या आधीच गाडीतील खानपान सेवेतील कर्मचाऱ्यांची ये-जा सुरू झाली होती. आधी चहावाला आणि पाणी बाटलीवाला आला. दिवसभर मुंबईत फिरणं झालेलं असल्यामुळं मी लगेच त्याच्याकडून चहा घेतला आणि बाहेरचं दृश्य न्याहाळत चहा संपवलाही. त्यानंतर नाश्त्याची ऑर्डर घ्यायला एक जण आला. मी ऑर्डर न देता, थोड्या वेळानं वाटलं तर घेऊ असा विचार केला. दख्खनच्या राणीनं आज दादरच्या आधीपासूनच चांगला वेग पकडला होता. मात्र पुढे ठाण्याच्या वेशीवर पोहचल्यावर तिचा वेग बराच कमी झाला. ठाणं ओलांडत असताना परत जरा वेग घेत आहे म्हटलं तोवर कळव्यापासून पुन्हा हळुहळू धावायला लागली. मुंबईत पाऊस नसला तरी आता थोडा सुरू झाला होता.

आता गाडीत तपासणीस आला होता. माझ्या पलिकडच्या आसनांवर असलेल्यांशी त्याची चर्चा सुरू होती आणि त्यातच तो त्या प्रवाशांना समजावण्याचा प्रयत्न करत होता. LHB डबे आल्यावर जनरल डब्यांबाबत प्रवाशांना काहीच समजत नव्हतं. त्यामुळं त्याला प्रत्येकाला सारखं समजावत बसायला लागत होतं. तो माझ्याजवळ आला, मी तिकीट दाखवलं; पण माझ्या समोर बसलेल्यानं दादरच्या आधीपासूनच हेडफोन लावून मोबाईलमध्ये डोळे घालून ठेवले होते. त्यामुळं त्याला तपासणीसानं हाक मारलेलीही ऐकू आली नाही, म्हणून मी त्याला जागं केलं.

लिंक
https://avateebhavatee.blogspot.com/2022/08/1_24.html

प्रतिक्रिया

एक_वात्रट's picture

24 Aug 2022 - 6:41 pm | एक_वात्रट

एलएचबी डबे लावल्यावर गाडीच्या प्रवासाला लागणारा वेळ काही कमी झाला आहे का? ह्या गाडीने प्रवास करून तिच्या डायनिंग कारमध्ये गरमागरम ऑम्लेट ब्रेड खायची इच्छा अनेक दिवस मनात आहे, पाहू कधी योग येतो ते!

पराग१२२६३'s picture

29 Aug 2022 - 1:07 pm | पराग१२२६३

एलएचबी डबे सुरू झाल्यापासून दख्खनच्या राणीच्या वेगात फारसा फरक पडलेला नाही.

सौंदाळा's picture

24 Aug 2022 - 7:54 pm | सौंदाळा

मस्तच.
आतले फोटो पण पाहिजे होते. विस्ता डोम कसा आहे? या ऋतुमधे लोणावळ्यातून विस्ता डोम मधे बसून जाणे म्हणजे डोळ्यांचे पारणे फिटेल.

कॅलक्यूलेटर's picture

25 Aug 2022 - 5:31 pm | कॅलक्यूलेटर

मस्त! वेगळ प्रवास वर्णन. कातळधार ला जाताना या गाडीत बसायचा म्हणजे उभ राहायचा योग् आला होता. पण प्रचंड गर्दी त्यामुळे बाकी काही बघता नाही आल. पण आतले डबे खूप छान आहेत!

प्रदीप's picture

29 Aug 2022 - 6:06 pm | प्रदीप

हे असेच लिहीत चला. वाचतो आहे.