कोळेश्वर ट्रेक १९.०९.२१ जांभळी गावाकडून

Vivek Phatak's picture
Vivek Phatak in भटकंती
3 Aug 2022 - 12:10 pm

कोळेश्वर ट्रेक १९.०९.२१ (जांभळी गावाकडून)

खरं म्हणजे मी ह्याच दिवशीच्या दुसऱ्या ट्रेकला जाणार होतो. पण आदल्या दिवशीच विशालचा ह्या ट्रेक बद्दलचा मेसेज आला. हा TTMM ट्रेक, म्हणजे ट्रेकचा खर्च सर्व participant मधे विभागून होता. शिवाय बरोबर नेहमीची मित्र मंडळीही होती. त्यामुळे बुक केलेला ट्रेक कॅन्सल करून ह्या ट्रेकला जॉईन झालो. आमचा १४ जणांचा ग्रुप होता.

१८ तारखेला सकाळी औरंगाबादहून रवाना झालो आणि बाणेरला पोचलो तेव्हा सध्याकाळचे ६ वाजले होते. बस रात्री ११.३० ला निघणार होती. माझ्याकडे वेळ भरपूर होता. ट्रेकसाठी सॅक तयारच होती, ती थोडी व्यवस्थित भरली, थोडा आराम करून रात्री १०.३० बाणेरहून निघून बस पीकअप पॉइंट मॅकडोनाल्ड, JM रोड ला पोचलो तेव्हा ११ वाजले होते. दुसऱ्या दिवशी अनंत चतुर्दशी होती, त्यामुळे बाजूलाच असलेल्या गणपती मंडळात चाललेली लगबग बघत, गणपती दर्शन घेऊन होईस्तोवर बस आली. पुढचे pickup घेत साधारण १२ वाजता बस सातारा रस्त्याला लागली आणि वाई मार्गे रात्री २.३० वाजता जांभळी ह्या पायथ्याच्या गावात पोचली.

.

.

बसमध्येच ५.३० वाजे पर्यंत झोप काढली. बाहेर अंधार आणि वातावरण ढगाळ होते. Weather App वर ह्या भागात thunderstorm ची warning दिलेली होती. बस गावातल्या देवळाजवळ थांबली होती. सगळं आवरून, थोडी पोट पूजा केली. गावात चहाची व्यवस्था झाली. चहा पिऊन ७.३० वाजता आम्ही ट्रेक सुरु केला. आम्ही ज्या बाजूने जायला निघालो होतो, तिकडून न जाता भात खाचरे पार करत एका काकांनी आम्हाला योग्य वाटेला लावले. कारण त्यांच्या मते आम्ही ठरवलेल्या मार्गात बंधाऱ्याच्या सांडव्यावरून पाणी वाहतय आणि बरीच निसरडी जागा आहे, पाय सटकायची भीती होती.

.

.

.

असो. त्यांनी सांगितलेल्या वाटेने आम्ही पठार चढायला सुरुवात केली. आता ढग बऱ्यापैकी विरळ झाले होते. जांभळी बंधाऱ्याच्या कडेकडेने जंगलातून आमचे मार्गक्रमण चालू होते. वाट हळू हळू वर चढत होती. कास पठारासारखे हे पठार यायला सोपे आणि प्रसिध्द नसल्यामुळे इथे फक्त ट्रेकर्सच येतात पण त्यांची संख्याही कमीच असते. त्यामुळे वर जाणाऱ्या पायवाटा सततच्या पावसामुळे आणि अस्ताव्यस्त वाढलेल्या झाडांमुळे,कारवीमुळे पटकन सापडत नव्हत्या. त्यामुळे काही ठिकाणी अस्ताव्यस्त माजलेल्या झाडांमधून त्यांच्या काटेयुक्त फांद्या बाजूला करून वाट शोधत जावे लागत होते. गुगल बाबाची पण मदत होती. खाली ओल्या मातीमुळे जळवांचा सुळसुळाट होता. हे आम्हाला खूप वेळाने समजले. तो पर्यंत त्यांनी आपला कार्यभाग साधला होता. काही बुटावर, काही मोज्यांवर तर काही पायावर विराजमान होत्या. आमच्या ग्रुप पैकी एक दोघे सोडले तर सर्वांना त्यांनी आत्तापर्यंत लक्ष केले होते. तन्मयने त्यांच्या वर dettol चा प्रयोग केला आणि तो कमालीचा यशस्वी झाला. जळू चिकटली असेल त्या ठिकाणी dettol चे दोन तीन थेंब टाकल्या बरोब्बर जळू सर्रकन पायावरून घसरून पडायची. मग चिकटलेल्या ठिकाणी हळद लावली की रक्त थांबायचे. डेटॉल टाकल्यावर ती ज्या वेगाने खाली घसरायची तो क्षण व्हिडिओत बंदिस्त करण्यासारखा होता. त्या ॲक्टिविटीचे तन्मय ने माझ्याच पायावर चित्रीकरण केले. पण तो रक्तरंजित व्हिडिओ प्रदर्शित केला नाही.

.

.

.

वर जाणारी वाट चांगलीच दमावणारी होती. पण आजुबाजूचे वातावरण फारच निसर्गरम्य होते. मधेच थांबत, थोडं पाणी पीत, फोटो काढत जळवांना चुकवत (हो!! आत्ता जमिनीवरही बारीक लक्ष्य ठेऊन होतो कारण पावसामुळे जमिनीवर पडलेल्या पालापाचोळ्याने करडा रंग धारण केल्याने जळवा पटकन दिसत नव्हत्या ना म्हणून) वर चढत होतो. समोर रायरेश्वर पठार, केंजळगड आणि आम्हा दोघा मधले धोमधरणाचे पाणी सतत साथ देत होते. वेगवेगळ्या angle ने त्यांचे मोहक रूप आम्हाला फोटो काढण्यासाठी संमोहित करत होते.

.

.

.

.

.

एव्हाना जांभळी गावातून निघून २.५/३ तास होत आले होते. वर चढणारी वाट आणि चढ काही संपायचे नाव घेत नव्हता. कारवी च्या दाट जंगलातून मोकळे आकाश दिसायला लागले की वाटायचे आता आले पठार. पण लगेच एक वळण यायचे की परत वर जाणारी वाट. असे मधेच दिसणाऱ्या मोकळ्या आकाशाने दोन तीनदा हुल दिली. अगदी फायनल स्टेजला पठारावर चढण्यापूर्वी आम्ही वाट चुकलो. पुढे गेलेलो परत मागे येत, दाट गवतातून विशाल आणि दिलीप सरांनी वाट शोधली. पठारावर चढण्यापूर्वी फायनल hike आधी लागणारी खिंड आणि त्यात खोदलेल्या पायऱ्या बघून आश्चर्य वाटते. सकाळी ७.३० वाजता सुरू केलेली कोळेश्वरची चढाई करायला तीन तास लागले.

.

.

.

.

.

पठारावर पोचल्यावर दिसणारा नजारा अतिशय अप्रतिम होता. सभोवार हिरवागार गालिचा पसरला होता, पिवळी आणि छोटी छोटी जांभळी फुले वाऱ्यावर डुलत होती. समोर दरीत धोम धरणाचा पसारा, डावीकडे रायरेश्वर पठार आणि दिमाखदार केंजळगड, उजवीकडे लांबवर दिसणारा कमळगड. सगळे कसे हिरव्यागार गालीचाने नटलेले. अतिशय शुध्द आणि आल्हाददायक हवा. सकाळी दिसलेले ढग आता कुठेच दिसत नव्हते. इथे मस्त अर्धा तास time pass आणि पोट पूजा केली. डूलणाऱ्या छोट्या जांभळ्या फुलांचे VDO केले. परत एकदा बूट मोजे काढून जळवा चेक केल्या. खालून दरीतून एक मामा वर येत होते. ते वर आल्यावर, ते त्यांच्या जवळच असलेल्या झोपडी वजा घरात घेऊन गेले. त्यांच्याकडून काही जणांनी मध घेतला. मामा आम्हाला कोळेश्वर मंदिरापर्यंत घेऊन गेले आणि पुढची वाट दाखवून परत फिरले. मंदिर अतिशय दाट झाडीत वसलंय. चारी बाजूंनी २-३ फुटांच्या कच्चा भिंती आहेत. मंदिराला छत नाही. मध्यभागी महादेवांचा मुखवटा आहे.

.

.

.

.

.

तिथून परत पठारावरची वाटचाल सुरू केली. बारा वाजून गेले होते. पुढची वाट दाट जंगलातून, कारवीच्या गचपनातून, वेड्यावाकड्या वाढलेल्या शेवाळ दाटलेल्या झाडांच्या असंख्य फांद्यातून होती. वाट मधेच हरवत होती, थोडी शोधाशोध केल्यावर परत सापडत होती. मी जानेवारी २१ मधे हा ट्रेक, जोर गावातून वर चढून, कोळेश्वर पठार, कमळगड आणि नांदगणे गावात उतरणे असा केला होता. पण पुढे फर्न वनस्पतीचे लांबचलांब पठार पार करे पर्यंत वाटेची ओळख लागत नव्हती. त्या वेळी आम्ही, कमळगड करायचा म्हणून कोळेश्वर मंदिरात गेलो नव्हतो.

.

.

पठाराचा हा भाग लांबपर्यंत फर्न वनस्पतीने व्यापलेला आहे. त्यामुळे जरा मोकळं आकाश दिसायला लागले. ऊन नव्हतच. आता दाट जंगल ही नव्हते. सरळसोट पायवाट होती. आदिवासी लोकांची एक दोन घरं लागली. एका घराच्याजवळ असलेल्या मोठ्या झाडाखाली विशालने सॅक टाकली आणि तो आडवा होणार इतक्यात मला तिथे जळू दिसली. लगेच आम्ही मुक्काम हलवला आणि पुढे निघालो. वाटेत माकडांची एक टोळी भेटली. चांगली मोठ मोठी बरीच माकडे होती. पुढे अजुन एक झोपडी लागली. कुत्र्यांनी भुंकून भुंकुन आमचे स्वागत केले. समोर मोकळी जागा होती. जळावांचा मागमूस नव्हता. म्हणून मस्त गोल रिंगण करून शिदोरी सोडली. देवाण घेवाण करत मस्त जेवण झाले. तिथल्या मावशींनी मस्त ताक करून आणले. त्यांना योग्य मोबदला देऊन पुढे निघालो.

.

३.३० वाजून गेले होते. आता पुढचे टार्गेट कोळेश्वर-कमळगड ची खिंड होती. दमदार चाल करत ४.३० वाजता खिंडीत पोचलो. कमळगड प्रत्येक वळणावर साथ देत होता आणि जवळ जवळ येत होता. बलकवडे धरण पण दृष्टिपथात आले होते. पाणी खूप गढूळ दिसत होते. याउलट धोमचे पाणी मात्र स्वच्छ होते. खिंडीत आम्ही काही जण रेंगाळलो कारण आता कमळगड करून परत खाली पोचेपर्यंत खूप उशीर होणार होता त्यामुळे कमळगड ड्रॉप केला.

.

.

.

खिंडीतून डावीकडे कमळगड ची वाट होती आणि उजवीकडे दोन वाटा होत्या. एक वाट थोडी वरची आणि दुसरी पहिलीच्या डावी कडची. आमच्यातल्या काही जणांनी खाली गावात उतरायला सुरुवात केली होती. आम्ही त्या ठिकाणी आलो तर हे लोकं ऑलरेडी गेले होते. रेंज मिळाल्यामुळे आम्ही त्यांना कॉल केला आणि त्यांचा ठावठिकाणा विचारला. त्यांनी उजवीकडे वळा आणि मग डावीकडे असे सांगितले. आम्ही उजवीकडे वळून वरची वाट पकडली कारण ती जरा मोठी आणि जास्त मळलेली वाटत होती. आम्ही १५-२० मिनिटे पुढे गेलो पण कोणीच दिसेना. वातावरण थोडेसे ढगाळ झाल्यामुळे आणि संध्याकाळ होत आल्यामुळे थोडा अंधार व्हायला लागला होता. त्या वाटेत झाडोरा पण खूप होता. त्यातच बिबट्या फॅमिलीचे ताजे pugmarks दिसले. नुकतेच संपूर्ण कुटुंब तिथून गेले असावे. थोडी टरकली होती पण pugmarks चे ठसे तर हवेच म्हणून पटापट फोटो घेतले. आपण वाट चुकतोय हे लक्षात यायला लागले. आम्ही आवाजही देत होतो बाकीच्यांना. त्यांचा रिस्पॉन्स अस्पश्ट येत होता आणि खालून येत होता. आम्ही वाट चुकलो होतो. मागे खिंडीतून दोन वाटा उजवी कडे जात होत्या त्यात आम्ही गल्लत केली. त्यातली डावी वाट घ्यायच्या ऐवजी उजवी घेतली आणि चुकलो. परत १५ मिनिटे मागे गेलो आणि योग्य वाट पकडली. १० मिनिटे चालून गेल्यावर मंडळी भेटली. थोडी मस्करी झाली.

.

.

समोर बलकवडे धरणाचा नजारा मस्त दिसत होता. ५ मिनिटे थांबून पुढे निघालो. पाच वाजले होते. पुढे १.३० तासात सतत पाय चालवत, बलकवडे धरण प्रत्येक वळणावर बघत, फोटो काढत नांदगणे गावात उतरलो. गावात नुकतेच गणपती विसर्जन झाले होते. विसर्जन करून परतणाऱ्या बायाबापड्या आवर्जून आम्हाला प्रसाद देत होत्या. गावातल्या देवळाच्या पायरीवर गावातले बापे मंडळी विसर्जनाचा शिर्याचा प्रसाद वाटत होते. तिथे बरीच गर्दी होती गावकऱ्यांची. आम्हाला अगदी आग्रह करून प्रसादाचा भरपूर शिरा प्रत्येकाला दिला. गावकऱ्यांचा तो गोड आग्रह मोडवला नाही. मंदिर जवळच धरणाचे पाणी होते. तिथे आम्ही सगळे फ्रेश झालो. काही मंडळींना पोहायचा मोह आवरला नाही. फ्रेश होऊन सगळे बसमध्ये स्थानापन्न झाले. वाटेत वाईला एका हॉटेलवर मस्त जेवण केले आणि ट्रेकच्या आठवणी घोळवत पुण्याकडे प्रस्थान केले. रात्री १२ वाजता घरी पोचलो. सकाळी ७.३० ते संध्याकाळी ६.३० अशी जवळपास १०-११ तासांची मस्त पायपीट झाली पण ट्रेक यशस्वीरीत्या पार पडल्यामुळे ते लक्षातही आले नाही.

.

.

प्रतिक्रिया

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

3 Aug 2022 - 3:49 pm | ॲबसेंट माइंडेड ...

सगळे फोटो सुंदर आहेत.

राजेंद्र मेहेंदळे's picture

3 Aug 2022 - 4:03 pm | राजेंद्र मेहेंदळे

एव्हढा मोठा पल्ला एका दिवसात करायचा म्हणजे माहितगार लोक बरोबर पाहिजेत. एखाद्या ठिकाणी वाट चुकली किवा काही अडचण आली तर सगळ्यांचीच पंचाईत व्हायची. बाकी फोटो मस्तच.
जोर आणि जांभळी गावामधुन ट्रेकची सुरुवात केल्यास वेळेत किती फरक पडतो? चालणारे गडी तयारीचे असल्यास वन डे मध्ये कमळगड नीट बघुन होतो का? दोन दिवसाचा पुणे-ते-पुणे प्लॅन केल्यास रायरेश्वर किवा केंजळगड जोडुन बघता येइल का? स्वतःचे वाहन न्यायचे नसल्यास एस्टीची सोय आहे का?

वाई मधून ST बस मिळेल जांभळी साठी, जोर ला जाणारी ST अजून सुरु नाही झाली. आणि जाणार असाल तर मला पण सांगा मी पण येईन.

जोरकडून कोळेश्वर पठारावर आपण तास दीड तासात पोचू शकतो आणि जोरकडून वर चढणारी वाट कोळेश्र्वर मंदिराच्या जवळपास येते. त्यामुळे जोरकडून चढून कमळगड आपण व्यवस्थित पाहू शकतो. आम्ही तसा ट्रेक केलाय.
जांभळीकडून मात्र कोळेश्वर पठारावर पोचायला साधारण ३ तास लागतात. जांभळीकडून चढून कमळगड करायचा असल्यास बरोबरचे भिडू चांगले चालणारे हवेत.
हो दोन दिवसात रायरेश्वर or केंजळगड करून करता येईल.

सतिश गावडे's picture

3 Aug 2022 - 9:02 pm | सतिश गावडे

चालणारे गडी तयारीचे असल्यास वन डे मध्ये कमळगड नीट बघुन होतो का?

मी आणि इतर दोन मिपाकरांनी महिनाभरापूर्वी पुण्याहून सकाळी निघून एका दिवसात कमळगड केला होता. अर्थात उतरताना दाट कारवीमुळे वाट चुकलो आणि हे दुर्गभ्रमण आमच्यासाठी अविस्मरणीय झाले तो भाग वेगळा. 😀

तुमच्या प्रश्नाचे उत्तर हो असे आहे. गडाचा विस्तार खूपच छोटा आहे. जेमतेम पाच मिनिटात गडाच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकाला जाऊ इतके कमी अंतर आहे. वर एक शे दिडशे फुट कातळात खोदलेली विहीर सोडली तर इतर काहीच अवशेष नाही. आम्ही ज्या गावातून चढाई सुरु केली तिथून गडावर पोहचायला साडेतीन तास लागले. (मुरलेला दुर्गआरोहक नसल्याने त्या गावाचे नाव आठवत नाही आता. मात्र आम्ही धोम धरणाच्या डाव्या बाजूने गेलो होतो.)

उतरताना दाट कारवीमुळे वाट चुकलो आणि तीव्र उतार असलेल्या कड्यावरुन कसेबसे उतरलो. मी आता आपल्याला रेस्क्यू टीम बोलवावी लागणार या निष्कर्षाला आलो होतो. सुदैवाने लवकर उतरायला सुरुवात केल्याने उजेडाचा फायदा घेत उतरलो.

कर्नलतपस्वी's picture

3 Aug 2022 - 4:43 pm | कर्नलतपस्वी

तुमच्या बरोबर घरबसल्या भटकंती झाली.

13:08 चा जांभळ्या फुलांचा फोटो आवडला.

सतिश गावडे's picture

3 Aug 2022 - 8:44 pm | सतिश गावडे

प्रवास वर्णन आणि निसर्गचित्रे आवडली.

महीनाभरापूर्वीच कमळगड उतरताना दाट कारवीच्या जंगलामुळे वाट चुकलो होतो आणि तीव्र उतार असलेल्या कड्यावरुन एक तासभर बूड टेकवत/घसटत खाली उतरलो होतो त्याची आठवण झाली 😀

मुक्त विहारि's picture

3 Aug 2022 - 9:25 pm | मुक्त विहारि

छान फोटो...

सुरेख वर्णन आणि छायाचित्रे

सौंदाळा's picture

4 Aug 2022 - 10:55 am | सौंदाळा

हेच म्हणतो,
मस्त झालेला दिसतोय ट्रेक

गोरगावलेकर's picture

16 Aug 2022 - 3:38 pm | गोरगावलेकर

फोटोही छान