भटकंती-लेण्याद्री, नाणेघाटाच्या परिसरात

प्रचेतस's picture
प्रचेतस in भटकंती
2 Aug 2022 - 10:02 pm

जुलैभर धुव्वाधार पाऊस कोसळून गेला तरी यावेळी कुठेच भटकंती झाली नव्हती. असंच मित्रांशी गप्पा मारता मारता कुठेतरी जाऊन येऊ असे ठरले आणि ठिकाणही लगोलग निश्चित झाले ते म्हणजे जुन्नरच्या परिसरात भटकून यायचे, अर्थात लेण्याद्री आणि नाणेघाटात. रविवार म्हणजे वेळच वेळ होता. ही दोन्ही ठिकाणे अगदी आरामात करता येतील आणि वाटेत ठिकठिकाणी थांबत थांबत इथला बहरलेला निसर्ग भरभरुन पाहात जाऊ असे ठरले आणि त्यानुसार सकाळी निघाली. पुरोहितला नाष्टा करुन जुन्नरला आलो. वाटेत मानमोडी लेण्यांचा गट लक्ष वेधून घेत होता. शिवनेरीला साखळीच्या वाटेला हल्लीच रेलिंग लावल्याचे पायथ्यावरुनच दिसले. शिवनेरी खूपदा केला असल्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठवणी जागवत लेण्याद्रीच्या वाटेस लागलो. तिथून लेण्याद्री जेमतेम ७/८ किलोमीटर अंतरावर.

महाराष्ट्रात ठिकठिकाणी लेणी आहेतच, पण बारकाईने नजर टाकल्यास ती कोकणातील प्राचीन बंदरापासून सह्याद्रीच्या कड्यांच्या भिंती पार करुन देशावर पोहोचणार्‍या प्राचीन घाटमार्गांच्या आसपासच ती कोरल्याचे लक्षात येते. व्यापारी मार्गांवरील श्रेष्ठींसोबत निघणार्‍या बौद्ध श्रमणांचे वर्षावास म्हणूनच ही लेणी खोदण्यात आली. या घाटमार्गांच्या संरक्षणासाठी असलेले दुर्ग लेण्यांपेक्षाही अधिक प्राचीन हे सहज मानता यावे. उदा. बोरघाटाचे संरक्षक दुर्ग म्हणजे राजमाची,लोहगड, विसापूर, कोरीगड आणि त्यांच्या संरक्षणाखाली असलेली लेणी म्हणजे कार्ले, भाजे, बेडसे, कोंडाणे. चौल, महाड ते पैठण या मार्गावरील लेणी म्हणजे कुडे, मांदाड, पाले आणि त्यांचे संरक्षक दुर्ग म्हणजे तळेगड, घोसाळगड, रायरी, मानगड, कावळ्या. या मार्गांपेक्षाही सर्वात महत्वाचा घाटमार्ग म्हणजे श्रीस्थानक (ठाणे), कलियान (कल्याण) या बंदरांवरुन येणारा आणि जुन्नरवरुन जाऊन प्रतिष्ठान (पैठण) येथे पोहोचणारा नाणेघाट. ह्याच परिसरात कित्येक प्राचीन घाटवाटा आहेत. नाणेघाटाच्या जवळच असलेले भोरांड्याचे दार, माळशेज घाटाची प्राचीन वाट, आंबोली येथून निघणार्‍या दार्‍या घाट, आंबोली घाट, तिरंगी घाट, डोणीचे दार, खुट्टे धार, भीमाशंकरजवळील गणपती घाट, रानशीळ घाट, आहुपे घाट इत्यादी अनेक, मात्र घाटांचा राजा हा नाणेघाट. ह्या परिसराला इतके महत्व असण्याचे कारण म्हणजे जीर्णनगर, जुण्णनगर अर्थात जुन्नर नावाचे प्राचीन वैभवशाली नगर. ही क्षत्रपांची महत्वाची नगरी तर होतीच पण ही सातवाहनांची उपराजधानी. किंबहुना पैठणच्या आधी ही सातवाहनांची राजधानीच असावी अशी येथील संपन्न अवशेषांवरुन म्हणण्यास वाव आहे. नाणेघाटातील सातवाहनांचा प्रतिमालेख येथील सर्वात महत्वाचा आहेच मात्र ह्या जुन्नर परिसरात ज्ञात अशी २०० च्या आसपास कोरीव लेणी, आणि कित्येक महत्वाचे शिलालेख येथे आहेत. नाणेघाट, शिवनेरी किल्ल्याच्या कड्यातील कित्येक कातळकोरीव लेणी, तुळजा लेणी, मानमोडी लेणी समूह, लेण्याद्री, लेण्याद्रीच्या डोंगरातच मागील बाजूस असलेला सुलेमान गट, बल्लाळ लेणी अशी कित्येक लेणी येथे विखुरलेली आहेत. ह्या लेण्यांच्या संरक्षणासाठी किल्ल्यांची एक मजबूत फळीच येथे उभी राहिलेली आहे. खुद्द नाणेघाटाचा पाठीराखा असणारा बेलाग जीवधन, त्याच्या आजूबाजूचे चावंड, हडसर, निमगिरी, सिंदोळा, हटकेश्वर, नारायणगड हे सर्वच अतीप्राचीन, किमान दोन ते अडीच हजार वर्षांपूर्वीचे कातळकोरीव दुर्ग. नाणेघाटाचा संरक्षक जसा जीवधन तसाच जुन्नरसारख्या वैभवशाली शहराचा आणि त्यालगत असणार्‍या शिवनेर, तुळजा, मानमोडी आणि गणेश लेणींचा संरक्षक दुर्ग म्हणजेच शिवनेरी. चला तर मग लेण्याद्रीची अल्पशी भटकंती करुयात.

जवळपास तीस लेणी लेण्याद्रीच्या डोंगरात आहे. येथे असलेल्या क्रमांक ७ येथील विहारात असलेल्या अष्टविनायकांपैकी एक असलेल्या गिरिजात्मजाच्या वास्तव्यामुळे ह्या लेणीसमूहाला गणेश लेणी म्हणून ओळखले जाते. किमान ३० लेणी ह्या समूहात आहेत पैकी दोन चैत्यगृहे आणि इतर लहानमोठे विहार. क्र. ७ चे लेणे हा येथील अतिशय विस्तीर्ण विहार. ज्यांनी कुणी नाशिकच्या त्रिरश्मी डोंगरात असलेली पांडवलेणी पाहिली असतील त्यांना तेथील क्र. ३ आणि क्र. १० मधील अनुक्रमे नहपान विहार आणि देवी लेण्याशी असलेले साम्य सहज लक्षात यावे. पर्सिपोलिटन धर्तीचे सालंकृत सातकर्णी स्तंभ, तेथील विहार कक्षांना असलेली चौकटीतले प्रसंग, विहारात असणारे शयनकक्ष आणि समोरील बाजूस असणारा विस्तीर्ण कक्ष आणि त्यात अर्ध उठावात असणारा स्तूप. हा अर्धउठावात असलेला दागोबा म्हणजेच सध्याची शेंदूर लावलेली गणेशमूर्ती यात मलातरी काहीच शंका वाटत नाही. अर्थात ही लेणी बळकावलेली नसून बौद्ध धर्माचा पूर्ण र्‍हास झाल्यावर ह्या बेवसाऊ झालेल्या मूळच्या बौद्ध लेण्यांत कालांतराने हिंदूंनी त्यांच्या दैवतांची स्थापना करुन ह्या लेणी जागत्या ठेवल्या. ह्याचे अजून एक उदाहरण म्हणजे घोरावडेश्वराची लेणी. असो.

जेमतेम २०/२५ मिनिटे गणेशलेणीत पोहोचायला लागत असलेली तरी ही पायर्‍यांची चढाई अगदी उभी असल्याने खूप दमछाक करते. गणेश लेणीत जायला एक कातळकोरीव मार्ग असून आपला प्रवेश व्हरांड्याच्या अंतर्भागात होतो.

पायथ्यावरुन दिसणारी गणेशलेणी

a

गणेशलेणी समूहातील इतर लेणी

a

रविवार असल्याने गणपती दर्शनाला बरीच गर्दी होती.

गणेश लेणीत जायचा कातळकोरीव मार्ग

a

गणेश लेणीचा विस्तीर्ण विहार व त्यातील कक्ष

a

गणेशलेणीच्या व्हरांड्यात अतिशय देखणे असे पर्सिपोलिटन धर्तीचे सातकर्णी स्तंभ आहेत. खाली तळखडा, त्यावर स्तंभ, त्यावर उपडा घट, त्यावर लहान आमलक आणि त्याच्यावर हर्मिकेची सात पायर्‍यांची उलटी रचना आणि त्यावर प्राण्यांच्या जोड्या अशी यांची रचना. गणेश विहारातील स्तंभांवर वाघ, सिंह, हत्ती अशा प्राण्यांच्या जोड्या आढळतात.

गणेश लेणीतील स्तंभरचना

a

गणेश लेणीतील स्तंभरचना

a

स्तंभावरील व्याघ्राची रचना

a

गणेश लेणीतून दिसत असणारा शिवनेरी

a

गणेश लेणीच्या बाजूलाच आहे येथील ६ व्या क्रमांकाचे लेणे म्हणजे येथील चैत्यगृह

पिंपळपानाकृती नक्षी असणारे प्रवेशद्वार, आतील बाजूस ओळीने असणारे सातकर्णी स्तंभ, वरचे गजपृष्ठाकार छत, त्यावर फासळ्यांची रचना आणि ह्या सर्वांशी विलक्षण समतोल साधून असणारा देखणा स्तूप हेच याचे वैशिष्ट्य आणि हेच याचे सौंदर्य. चैत्यगृहाच्या प्रवेशद्वारावरील चार स्तंभ आज पूर्णपणे झिजले आहेत मात्र आतील अजुनही व्यवस्थित आहेत.

चैत्यगृहाचे प्रवेशद्वार

a

चैत्यगृहाचा अंतर्भाग

a

जोते (पाताळ), वेदिकापट्टी, अण्ड (पृथ्वी), हर्मिका (स्वर्ग) यांचे प्रतिक असणारा स्तूप

a

सालंकृत स्तंभांवरील वाघ, गज यांच्या जोड्या

a

सालंकृत स्तंभ
a

याच स्तंभांवर एक आश्चर्य लपलेले आहे ते म्हणजे स्फिंक्स. मानवी चेहरा आणि सिंहाचे शरीर असणारी ही ग्रीक मिथिकल रचना. येथील लेण्या खोदण्यात यवनांचा अर्थात ग्रीकांचाही हातभार लागत असे. व्यापाराबरोबरच कलेचे, संस्कृतीचेही आदानप्रदान होत असे ह्याचे अतिशय स्पष्टपणे दर्शन ह्या शिल्पांद्वारे होत असे. नासिक लेण्यात स्फिंक्स आणि अथेना दिसतात तर भाजे लेण्यात सेंटॉर, पॅगेसस ही यवनी शिल्पे दिसतात. इथला स्फिन्क्स ओळखणे तसे सोपे आहे. स्फिन्क्सची जोडीच येथे असून एकाचा अर्धा भाग पूर्णपणे तुटला आहे तर एक स्फिन्क्स आजही पूर्णपणे शाबूत आहे.

मानवी शिर, कानात कुंडलं आणि शरीर मात्र सिंहाचे अशी याची रचना

स्फिन्क्स जोडी

a

स्फिन्क्स

a

स्फिन्क्स बघून चैत्यगृहाच्या बाहेर पडलो.

लेण्याद्रीतील इतर लेणी मात्र तुलनेने अवघड आहेत, पावसामुळे निसरड्या झालेल्याअरुंद पायर्‍या, पूर्णपणे मोडलेल्या वाटा ह्यामुळे येथे जाणे तसे धोक्याचेच आहे.

लेण्याद्रीतील इतर लेणी

a

लेण्याद्रीतील इतर लेणी

a

लेण्याद्रीतील इतर लेणी

a

लेण्याद्री समूह

a

लेण्याद्री बघून झपझप उतरलो ते निघालो थेट नाणेघाटात. वाटेत शिवनेरीच्या पुढे गेल्यावर उजवीकडे डोंगरात तुळजा लेणी लक्ष वेधून घेत होती. आपटाळ्याच्या पुढे निसर्ग एकदम वेगळेच रूप धारण करतो. आत्तापर्यंत पांढरे काळे असणारे ढग आता गडद रूप धारण करु लागलेले असतात, मधूनच एक जोरदार सर बरसून जात असते, भातखाचरं पाण्याने तुडुंब भरलेली असतात, चहूबाजूंनी हिरवं हिरवं झालेलं असतं. चावंड, हडसर, जीवधन असे तालेवार गड खुणावू लागलेले असतात.

दोन डोंगरांची दिसणारी जोडगोळी म्हणजे हडसर उर्फ पर्वतगड

a

सर्व बाजूंनी असलेल्या कातळकड्यांचं नैसर्गिक संरक्षण लाभलेला चावंड उर्फ प्रसन्नगड

a

अगदी चित्रातल्या घरासारखी दिसणारी एक वस्ती

a

इथल्या परिसरावर निसर्गाने अगदी भरभरुन कृपा केली आहे.

a

एक सुंदर निसर्गचित्र, पाठीमागे ढगात बुडालेला वर्हाड्या डोंगर

a

एका पावसाळी तळ्यात अर्धवट बुडालेले एक झाड

a

अशीच सुरेख निसर्गचित्रे बघत बघतच नाणेघाटात पोहोचलो तर तिथे प्रचंद गर्दी. घाटातल्या नळीत तर अक्षरशः बॉटलनेक झालं होतं. इतकी गर्दी याआधी येथे कधीच पाहिली नव्हती. येथे येणार्‍या ९९% लोकांना तरी नाणेघाटाचे महत्व, येथील प्रतिमालेख, येथील इतिहास, येथील कला अआणि संस्कृती माहिती आहे का विचाअर मनात तरळून गेला.

नाणेघाटावरुन दिसणारे दृश्य, उजव्या बाजूस दिसत आहेत ते गोरखगड आणि मच्छिंद्र सु़ळका

a

नाणेघाटातल्या नळीची सुरुवात आणि दगडी रांजण

a

ढगात लपलेला जीवधन

a

नाणेघाटावर खूप वेळा लिहिले असल्याने ह्यावर आता अधिक लिहित नाही.

गुहेतील शिलालेख

a

खूप गर्दी असल्याने बाजूच्याच टेकाडावर गेलो, तिथून नानाच्या अंगठ्याचे एक वेगळेच रूप दिसते.

नानाचा अंगठा

a

कोकणात कोसळत असणारा पाऊस

a

नाणेघाट पाहून परतीच्या प्रवासास निघालो, वाटेत डोंगराची, ओहोळांची असंख्य रूपे दिसत होती.

a

जीवधन किल्ला

a

वाटेत नळवंडी गावाजवळून वाहणारा खळाळता प्रवाह इथले आकर्षण, गाळ नसलेली दगडगोटे मिश्रित वाळू, आरसपानी खळाळता प्रवाह ह्यामुळे येथे डुंबणे खरोखरच आनंददायी आहे.

a

खळाळता प्रवाह

a

इथे अगदी तासनतास बसून राहावेसे वाटते

a

सुरेख निसर्गचित्र

a

इथून निघालो ते शिवनेरीच्या पायथ्यालाच एक पेशवेकालीन शिवमंदिर आहे, तेथे गेलो, येथे पाण्याची कुंडे, दोन वृंदावने आणि भग्न झालेले बुरुज आहेत, येथीलच एका बाहेरच्या कुंडापाशी मावळतीपर्यंत बसलो आणि मग घरच्या वाटेला लागलो.

a

प्रतिक्रिया

पावसाळी वातावरण अद्भुत. हिरवेगार दृश्य. नितळ स्वच्छ पाण्याचा तो ओढा तर अतीव सुंदर. जियो वल्लीशेठ.

ते स्फिंक्स म्हणजे काही भारतीय प्रतीक असण्याची कितपत शक्यता? यावनी कामगार अशा ठिकाणी नियुक्त होत असतील का? काही धार्मिक बंधने?

गामा पैलवान's picture

3 Aug 2022 - 2:18 am | गामा पैलवान

गवि,

जियो वल्लीशेठशी सहमत आहे. प्रचेतस यांच्या नजरेतनं सह्याद्री पाहणं ही एक पर्वणीच असते.

आ.न.,
-गा.पै.

प्रचेतस's picture

3 Aug 2022 - 9:21 am | प्रचेतस

ते स्फिंक्स म्हणजे काही भारतीय प्रतीक असण्याची कितपत शक्यता

शून्य. मूळात स्फिन्क्स ही ग्रीक प्रतिमा आहे. शिवाय ही बौद्ध लेणी आहे. यवनी कामगारांची नियुक्ती अशा ठिकाणी होतच असे. शिवाय लेण्यांना कित्येक देणग्या ह्या यवनांनी सुद्धा धर्मादाय केलेल्या आहेत त्यासंबंधीचे शिलालेख कित्येक लेण्यांत आहेत. साहजिकच ग्रीक शिल्पे येथे असणे स्वाभाविकच आहे. आपण म्हणता तशी हायब्रीड शिल्पे हिंदू मिथकांत देखील आहेत उदा. गंडभेरुंड, हयग्रीव, तुंबरु पण ती येथे कोरली जाणे केवळ असंभव.

चित्रगुप्त's picture

3 Aug 2022 - 4:57 am | चित्रगुप्त

व्वा.
काय ती लेणी, काय ते डोंगार, काय त्या मूर्ती, काय ती स्फिंकं, काय ते शिलालेख, काय ते लिखाण .... अद्भुत सगळं.
अर्ध्याहून जास्त आयुष्य आम्ही दिल्ली परिसरात (वाया-) घालवण्यातून काय काय गमावलं, याची बोचरी जाणीव असे काही वाचले- बघितले की पुन्हा पुन्हा घायाळ करत असते.

शनिवार रविवार सोडून इथे गेल्यास सगळे डोंगर नद्या परिसर फक्त आपल्यासाठीच असतो.
मोजक्याच फोटोंसह लेख छान झाला आहे.

कर्नलतपस्वी's picture

3 Aug 2022 - 8:19 am | कर्नलतपस्वी

आम्हीपण लेण्याद्री पाहिला,एकदा नाही अनेकदा.
लहान होतो,शाळेतून सहलीला गेलो.माकडांबरोबर मजा केली.

तरुणपणी गेलो तर बरोबर च्या माकडांबरोबर मस्ती केली.

लग्नानंतर गेलो,गणपतीला हे माग ते माग यातच वेळ गेला.

आता पैलतीर दिसताना शिखराला नमस्कार करतो आणी परत येतो.

आता कबीराच्या दोह्या सारखी परीस्थीती,

ते दिन गए अकारथ ही, संगत भई न संग । प्रेम बिना पशु जीवन, भक्ति बिना भगवंत ।

पण आता तुमचा लेख वाचला तर आसे वाटतयं,

तीरथ गए से एक फल, संत मिले फल चार । सतगुरु मिले अनेक फल, कहे कबीर विचार ।

दुर्गविहारी's picture

3 Aug 2022 - 11:33 am | दुर्गविहारी

सध्या याच परिसराची माहिती लिहीत असल्यामुळे थोडी माहिती इथे पोस्ट करतो.
जुन्नर परिसरातील लेण्याद्री व त्याच्या शेजारील टेकडीवरील प्रसिद्ध थेरवाद (हीनयान) पंथीय लेणी-समूह. जुन्नरपासून ५ किमी. उत्तरेस कुकडी नदी ओलांडून या समूहास जाता येते. मध्ययुगीन काळात सध्याच्या गणेश लेणी-समूहातील लेणे क्र. ७ मध्ये गणेशाची स्थापना झाल्याने या संपूर्ण टेकडीलाच ‘लेण्याद्री’ किंवा ‘गणेश टेकडी’ (गणेश पहाड) या नावाने ओळखले जाऊ लागले. या लेणींचे मूळ नाव “कपिचित बुद्ध लेणीं” असे होते. त्याचे मूळ कारण म्हणजे या लेणींवर असलेल्या वानरांचा वावर होय!
या लेणी-समूहात एकूण ३० लेणी असून, त्यांत दोन चैत्यगृहे व बाकीचे विहार व साध्या खोल्या आहेत. या लेण्यांत एकूण सहा ब्राह्मी शिलालेखही कोरण्यात आले आहेत. लेण्यांचा क्रम साधारणतः ईशान्येकडून नैर्ऋत्येकडे आहे.
लेणे क्र. ६ हे चैत्यगृह दक्षिणाभिमुख असून याचा चैत्यगवाक्ष पूर्णपणे बंद आहे. लयन स्थापत्यानुसार हे चैत्यगृह इ. स. दुसऱ्या शतकाच्या पहिल्या दशकात खोदल्याचे सांगितले जाते. हा टप्पा लेणी कोरण्याच्या पध्दतीतील बदल सुचवतो. या टप्प्यात चैत्यगृहाचा सभामंडप आणि मुखमंडपाच्या कोरीवकामातील बारीक सारीक तपशील मागे पडत गेले. चैत्यगृहाच्या आत जे गजपृष्टाकार छत होते ,ते मागे पडून सपाट छत असा बदल झाला.
या लेण्याच्या आतील बाजूस अर्धस्तंभ व त्याच्या मागे, डावीकडे व उजवीकडे एकूण सोळा स्तंभ आहेत. स्तूपाच्या मागील सहा स्तंभ साधे अष्टकोनी आहेत; तर बाकीचे मुखमंडपातील स्तंभांसारखेच अलंकृत असून वरती पशुशीर्ष आहेत. डावीकडील दुसरा व उजवीकडील चौथा यांत स्त्रीमुखे असलेले ‘स्फिंक्स’ कोरले आहेत. त्यांचे शरीर घोड्यासारखे दिसते. अशाच प्रकारची स्त्रीमुखे असलेले स्फिंक्स पितळखोरे व कार्ले लेण्यांतही आढळून येतात. यवन किंवा ग्रीकांच्या प्रभावामुळे वरील प्रकारचे स्फिंक्स महाराष्ट्रातील लेण्यांत कोरले असावेत, असे सुरेश जाधव यांचे मत आहे.इ.सन 2 र्या शतकातील एक शिलालेख व्हरांड्यातील आतल्या भिंतीवर द्वारकमानिवर कोरलेला आहे. या शिलालेखात ‘सुलसदत्त, ह्या कल्याण येथील सोनाराच्या मुलाने दिलेल्या दानाचा उल्लेख केला आहे.
लेणे क्र. ७ ही जुन्नर तालुक्यातील सर्वात मोठी गुंफा(विहार) आहे. विहारात मध्यभागी प्रशस्त मंडप असुन तीन बाजुला वेगवेगळ्या आकाराचे 20 निवासकक्ष आहेत. या विहारात प्रवेशासाठी दगडात कोरलेल्या पायर्यांचा जीन आहे. जिन्याच्या शेवटी स्तंभ असलेल्या व्हरांड्यातील मधल्या दारातून विहार प्रवेश करता येतो.विहाराच्या प्रांगणात व डावीकडे पाण्याची टाकी खोदली आहेत, तर दर्शनी भागावर दगडी बाकांवर आधारित सहा स्तंभ आणि दोन्ही बाजूंच्या कडेस अर्धस्तंभ कोरले आहेत.
दगडी बाकांस कक्षासने व त्याच्या बाहेरील बाजूस वेदिकापट्टीचे नक्षीकाम केलेले दिसते. स्तंभांवर वरील बाजूस पाठीला पाठ टेकून बसलेले सिंह, हत्ती व बैल कोरले आहेत. विहाराचा सभामंडप १७.३९ मी. खोल, १५.५५ मी. रुंद व ३.३८ मी. उंच असून मंडपात कोठेही खांबांचा आधार नाही. याच्या तिन्ही बाजूंस दगडात कोरलेला अखंड बाक असून बाजूंच्या भिंतींत एकूण २० खोल्या भिक्षूंच्या निवासासाठी कोरल्या आहेत. लेण्यात मध्यभागी गणेशशिल्प असून मंडपाच्या भिंतींवर सतींचे हात कोरले आहेत. गर्भगृहाच्या डावीकडील खोलीत अठराव्या शतकातील हिंदू देव-देवतांची भित्तिचित्रे आहेत.
हि गुंफा महाराष्ट्रातील भाविक आणि गणेश भक्तांच्या दृष्टीने फार महत्वाची आहे. मध्ययुगातील मागील भिंतीतील दोन निवासकक्ष एकत्र करून तिथे “गिरीजात्मज” गणपतीची स्थापना करण्यात आली आहे. हा गणपती अष्टविनायकांपैकी एक असुन “गिरीजात्मज “नावाने जगप्रसिद्ध आहे. गुंफा क्र.१४ ही एक चैत्यगृह आहे. पण त्याचा मंडप आयताकार असुन छत सपाट आहे. चैत्यगृहाला व्हरांडा असून व्हरांड्यात एक शिलालेख कोरलेला आहे. हा शिलालेख ‘कपिलाचा नातू व तपसाचा पुत्र असलेल्या आनंद’ या भक्ताने चैत्यगृसाठी दिलेल्या दानाविषयीचा आहे. या गुंफांचा काळ साधारण इ.स 2 रे शतक आहे.
या लेणी समुहातील सर्व लेण्यांचा कालखंड पहिले शतक ते तीसरे शतक असाच गणला गेला आहे.
फ्रायरचे निरीक्षण :-
प्राचीन भारत अर्थात हिंदुस्थानाला अनेक परकीय प्रवासांनी भेटी दिल्या.त्यांनी त्यांचे निरिक्षण आणि अनुभव लिहून ठेवले.त्यामुळे आज आपल्याला त्याकाळच्या अनेक गोष्टींची कल्पना येते.या परकीय प्रवाशांपैकी एक म्हणजे 'जॉन फ्रायर'.( १६५०–३१ मार्च १७३३ ).त्याच्या भारतभेटीत काही काळ सुरतेत वास्तव्य केल्यावर फ्रायर एप्रिल १६७५ मध्ये मुंबईस आला. तेथून त्याला जुन्नरच्या मोगल सरदाराकडे पाठवण्यात आले.
जुन्नरच्या या मुक्कामात फ्रायरने काही आजुबाजुची ठिकाणे देखील पाहिली.यात त्याने गणेश लेणी बघीतल्याचा उल्लेख सापडतो.मात्र त्यावेळी लेण्यात वटवाघळे आणि मधमाश्या असल्याचे त्याने लिहीले आहे.याचा अर्थ त्यावेळी लेण्याद्री गणपतीची मुर्ती लेण्यात होती कि नव्हती ते समजत नाही, कदाचित नसावी,कारण गणेश मुर्ती असती तर निदान इथे भाविकांची वर्दळ निश्चितच असती. या लेण्याचे त्याला मुंबई मुक्कामात पाहिलेल्या कान्हेरी लेण्याशी साधर्म्य वाटते.
त्याच्या भारत व पर्शिया भेटीचा पत्ररूपी वृत्तांत अ न्यू अकाउंट ऑफ ईस्ट इंडिया अँड पर्शिया बिइंग नाइन यिअर ट्रॅव्हल्स १६७२-१६८१ या ग्रंथात प्रसिद्ध आहे.पुढे लंडन येथे त्याचे निधन झाले.

तपशीलवार माहितीसाठी धन्यवाद.

balasaheb's picture

11 Dec 2022 - 2:23 pm | balasaheb

खुप मस्त

दुर्गविहारी's picture

3 Aug 2022 - 11:41 am | दुर्गविहारी

दोन डोंगरांची दिसणारी जोडगोळी म्हणजे हडसर उर्फ पर्वतगड

हा बहुधा निमगिरी आणि हनुमंतगड असावा.हडसरची टेकडी छोटी तर मुख्य गड त्रिकोणी आकाराचा असून प्रशस्त माथा आहे.हडसर असा दिसत नाही.

इथून निघालो ते शिवनेरीच्या पायथ्यालाच एक पेशवेकालीन शिवमंदिर आहे, तेथे गेलो, येथे पाण्याची कुंडे, दोन वृंदावने आणि भग्न झालेले बुरुज आहेत, येथीलच एका बाहेरच्या कुंडापाशी मावळतीपर्यंत बसलो आणि मग घरच्या वाटेला लागलो.

याच्याविषयी अधिक माहिती देतो.
याविषयी पहिली दंतकथा अशी सांगतात कि बाळाजी जर्नादन भानु उर्फ नाना फडणवीस यांचा मेहुणा बळवंतराव मुंढे यांनी .इ.स.१७७७ मध्ये कोळ्यांचे बंड मोडून काढले तेव्हा यात सामिल असलेले पाच कोळी पळून गेले.बळवंतरावांनी शिपाई पाठवून त्यांना कैद करुन शिवनेरीवर आणले व त्यांना ठार मारले.परंतु मृत्युनंतर कोळ्यांना सदगती प्राप्त न होता त्यांची भुत झाली.आणि त्या भुतांनी आपल्यावरचा अन्यायाचा बदला म्हणून बळवंतरावाला छळायला सुरवात केली.त्यावर उपाय म्हणून बळवंतरावांनी अनेक पंचाक्षरी ( म्हणजे मांत्रिक) बोलावून दानधर्म केले.पुजा,अनुष्ठाण केली.पण भुतबाधेतून सुटला होईना.म्हणून अखेर शिवनेरीच्या पायथ्याशी त्यांच्या नावाची पाच लिंगे स्थापन करुन देवालय बांधले. यानंतर त्या भुतांनी बळवंतरावांचा पिच्छा सोडला.
दुसर्‍या एका दंतकथेनुसार मुसलमानी आमदनीत जुन्नर येथे कोणी ब्राम्हण सुभेदार होता.पुढे काही कारणामुळे बादशहाची त्याच्यावर इतराजी झाली.त्याने जुन्नरच्या सुभेदाराला दरबारात बोलावून घेतले आणि त्याला आरोपी ठरवून कैदेत टाकले. तेव्हा त्या ब्राम्हणाने देवाला नवस केला, 'मी या संकटातून मुक्त होउन आलो तर पंचलिंगाचे मंदीर बांधीन' नंतर चौकशी अंती तो निर्दोष होता हे सिध्द झाले.मग बादशहाने कैदेतून त्याची सुटका केली.केवळ देवाची कृपा म्हणून आपली सुटका झाली असे त्या ब्राम्हणाला वाटले.जुन्नरला परत आल्यावर त्या सुभेदाराने शिवनेरीच्या पायथ्याशी पंचलिंग मंदीर बांधले आणि बोललेला नवस फेडला.
या दुसर्‍या कथेत थोडे तथ्य निश्चितच आहे.कारण सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात शिवनेर व चास तालुक्यात कोळ्यांनी बंड केले होते.यावेळी जुन्नरचे सुभेदार होते बाळाजी महादेव नावाचे ब्राम्हण गृहस्थ. कोळ्यांच्या बंडाचे पारिपत्य होउन बंदोबस्त झाला कि श्रींचे देवालय बांधीन म्हणुन त्यांनी नवस केला होता.जेव्हा कोळ्यांचा पुंडावा मोडून शांतता प्रस्थापित झाली तेव्हा पेशव्यांनी २० मार्च १७८७ रोजी सनद पाठवून दोन हजार रुपयात मंदीर बांधावे अशी आज्ञा केली. याविषयीची तपशीलवार सनद सवाई मधावराव पेशवे यांच्या रोजनिशीत १०३७ ( ९४३) पृष्ट क्रमांक २०२ वर प्रकाशित करण्यात आलेली आहे.

हा बहुधा निमगिरी आणि हनुमंतगड असावा.हडसरची टेकडी छोटी तर मुख्य गड त्रिकोणी आकाराचा असून प्रशस्त माथा आहे.हडसर असा दिसत नाही.

आपण म्हणता ते बरोबर असावे. हडसरच्या दोन्ही माथ्यांवर जाऊन आलोय कदाचित दोन माथ्यांमुळे तो हडसर असावा असा लांबून भास होतो.

याच्याविषयी अधिक माहिती देतो.

पंचलिंग मंदिराविषयीची माहिती रोचक आहे. नंदीमंडपापाशी कुंडाच्या कड्याला शाळुंकेविरहीत पिंडी दिसते ते बहुधा मूळ लिंग असावे असे वाटते.

केवळ अप्रतिम छायाचित्रे!

ज्ञानोबाचे पैजार's picture

3 Aug 2022 - 12:24 pm | ज्ञानोबाचे पैजार

वल्लीदांचे लेख म्हणजे पर्वणीच असते
त्याला दुर्गविहारींची पुरवणी म्हणजे आज का दिन बन गया.
पैजारबुवा,

यश राज's picture

3 Aug 2022 - 12:49 pm | यश राज

अप्रतिम वर्णन आणि छायाचित्रे.

खूप छान माहितीपूर्ण लिखाण आणि अप्रतिम फोटो..

अनिंद्य's picture

3 Aug 2022 - 1:46 pm | अनिंद्य

सुंदर पावसाळी प्रवास !

स्फिंक्स, अथेना, सेंटॉर, पॅगेसस... यवनी शिल्पे इथे असल्याचे पहिल्यांदाच वाचले. तुमचा व्यासंग दांडगा आहे प्रचेतस _/\_

सौंदाळा's picture

3 Aug 2022 - 2:48 pm | सौंदाळा

अप्रतिम लेख आणो फोटो
शेवटचा फोटो सगळ्यात आवडला.
नाणेघाटचा पण लोहगड होऊ लागला की काय?

सतिश गावडे's picture

3 Aug 2022 - 6:05 pm | सतिश गावडे

नाणेघाटचा पण लोहगड होऊ लागला की काय?

हे विधान तुम्ही नाणेघाटातील अनेक माणसे असलेले चित्र पाहून "आता नाणेघाटातही लोहगडाप्रमाणे गर्दी होऊ लागली आहे का?" अशा अर्थी केले असावे असा अंदाज आहे.

एखादे निसर्गरम्य ठिकाण सहज जाता येऊ शकेल असे असेल, रस्ता चांगला असेल, एका दिवसात जाऊन परत येता येत असेल तर गर्दी होणे साहजिकच आहे. अशा वेळी कुणी तिथे जावे आणि कुणी जाऊ नये हे ठरवण्यासाठी कोणते निकष लावणार? :)

सौंदाळा's picture

3 Aug 2022 - 7:16 pm | सौंदाळा

हो, तुमचा अंदाज बरोबर आहे.
लोकांनी जरुर त्यांना पाहिजे तेथे पाहिजे त्या वेळी जावे.
पुर्वी सकाळी लवकर निघून नारायणगावला मिसळ खाऊन ओझर, लेण्याद्री, शिवनेरी आणि संध्याकाळी घरी परत. कधी कधी नाणेघाट असा प्रोग्रॅम असायचा.
पण येवढी गर्दी होत असेल तर विकांतासाठी हा पर्याय माझ्यासाठी तरी बाद.
२००० च्या आसपास भुशी डॅमला पण खुप जाणे व्हायचे पण एका पावसाळ्यात अशाच अचाट गर्दीमुळे ते बंद केले ते आजतागायत तिकडे परत जावेसे वाटले नाही.
साईबाबा शिर्डी देवस्थान पण असाच अनुभव.

प्रचेतस's picture

3 Aug 2022 - 7:21 pm | प्रचेतस

इथे मात्र एक फरक आहे, अगदी थेट नाणेघाट सोडला तर इतरत्र कुठेही गर्दी आढळत नाही, चावंड, हडसर तर अगदी आरामात करता येतात, आंबोली, हातवीज, दुर्गवाडीत तर जवळपास कुणीही नसते.

स्वधर्म's picture

3 Aug 2022 - 6:05 pm | स्वधर्म

सगळंच अप्रतिम. आपल्या व्यासंगाला नमस्कार!
त्या काळच्या लोकांनी जी निर्मिती करून ठेवली आहे, ती पाहिली, की आत्ताचे आपले स्थापत्यविज्ञान पुढे गेले आहे, की मागे आले आहे असा प्रश्न पडतो. केवळ अद्वितीय निर्मिती.

खूप सुंदर चित्रे आणि त्याहून सुंदर वर्णन

मुक्त विहारि's picture

3 Aug 2022 - 8:13 pm | मुक्त विहारि

बाकी नेहमी प्रमाणे ...

काय तो लेख ... काय ती प्रकाशचित्रे आणि काय ते प्रतिसादातील दुवि यांचे किस्से आणि माहिती ....

एकदम ओक्के ....

सतिश गावडे's picture

3 Aug 2022 - 8:48 pm | सतिश गावडे

चांगलीच झालेली दिसतेय वर्षा सहल प्रचेतस तुमची. कधी तरी आम्हालाही न्या की राव लेण्याद्रीला. आम्ही येतो म्हटले की तुम्ही फक्त नाणेघाट म्हणता. 😀

मुक्त विहारि's picture

3 Aug 2022 - 9:31 pm | मुक्त विहारि

मग आपसूकच लेण्याद्रीला नेतील ...

सतिश गावडे's picture

3 Aug 2022 - 9:56 pm | सतिश गावडे

प्रचेतस यांच्यासोबत नाणेघाट दोन वेळा आणि शिवनेरी एकदा पाहून झालंय. :)

मुक्त विहारि's picture

9 Aug 2022 - 3:52 pm | मुक्त विहारि

आपण बघतो ती दगडी कला...

आणि वल्ली दाखवतात ती लेणी आणि कलाकुसर ....

काही लोकं सुतावरून स्वर्ग गाठतात, वल्ली तुटलेल्या अंगठ्या वरून, लेणी शिल्प नजरेसमोर साकारतात... हा स्वानुभव घेऊन झाला आहे ...

जाउयात की, यावेळी तुळजा आणि जमल्यास मानमुकुट पण करुन येऊ. :)

अष्टविनायक यात्रावाल्यांची गर्दी मधल्या वारीही असते.

जेमतेम २०/२५ मिनिटे गणेशलेणीत पोहोचायला लागत असलेली तरी ही पायर्‍यांची चढाई अगदी उभी असल्याने खूप दमछाक करते.

अगदी सहमत, अनुभवाचे बोल. :)
लेख आवडला. छायाचित्रेही सुंदर...
तळ्यातील झाड, परतीच्या प्रवासातील पहिला फोटो,जीवधन किल्ला हे फोटो फारच आवडले.

टर्मीनेटर's picture

5 Aug 2022 - 4:22 pm | टर्मीनेटर

सुंदर माहिती आणि वर्णन!
सगळे फोटोजही भन्नाट 👌

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Aug 2022 - 6:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अप्रतिम छायाचित्रे. लिहिते राहा मालक.

-दिलीप बिरुटे

प्रदीप's picture

5 Aug 2022 - 8:19 pm | प्रदीप

नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण लेख!

किसन शिंदे's picture

6 Aug 2022 - 8:13 pm | किसन शिंदे

तिथला निसर्ग जसा आहे तसाच वल्ल्याने त्याच्या फोटोत कैद केलाय यात काही शंकाच नाही. जुन्नरचे 'फॅब फाईव्ह' कंप्लिट करताना या संपूर्ण परिसरात वारंवार फिरणे झाले असल्यामुळे ही भटकंती रिलेट झाली आहे.

फिरते रहा आणि लिहीते रहा वल्लीशेठ!

प्रसाद गोडबोले's picture

6 Aug 2022 - 11:30 pm | प्रसाद गोडबोले

मस्त !

राजेंद्र मेहेंदळे's picture

9 Aug 2022 - 1:46 pm | राजेंद्र मेहेंदळे

वल्लींचा हा लेख कसा काय नजरेतुन सुटला काय माहित. आज पहिले आधाशासारखा लेख वाचला. मग परत स्क्रोल करुन निवांतपणे फोटो बघितले.
वा गुरु वा!! माळशेज परीसर आणि किल्ले या आधी फिरलोय (एक्सेप्ट चावंड). पण हे फोटो फारच सुंदर!!
आणि त्यात तुमच्या लेण्यांबद्दलच्या खास टिपा म्हणजे चेरी ऑन द केक.
रच्याकने- ते मधे मधे लोक्स पुस्तकाविषयी विचारतात तुम्हाला. झाले का लिहुन?

MipaPremiYogesh's picture

9 Aug 2022 - 6:19 pm | MipaPremiYogesh

अप्रतिम माहिती प्रचेतस , खूपच सुंदर , फोटो पण खूप छान

गोरगावलेकर's picture

16 Aug 2022 - 3:37 pm | गोरगावलेकर

नाणेघाटला जायचे खूप दिवसांपासून मनात आहे . बघूया कधी योग येतो ते.
आपल्या लेखातून फोटोंसोबत खूप नवीन माहितीही मिळते.