ऑगस्ट २०२२ हा महिना सुरू झाला असल्याने ताज्या घडामोडींचा नवा धागा काढत आहे.
६ ऑगस्टला उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान होईल. या निवडणुकीत भाजपकडून बंगालचे माजी राज्यपाल जगदीप धनकड आणि तृणमूल काँग्रेस सोडून इतर सगळ्या विरोधी पक्षांकडून काँग्रेस नेत्या मार्गारेट अल्वा हे उमेदवार आहेत. मार्गारेट अल्वांची उमेदवारी जाहीर करताना आपल्याला विश्वासात घेतले नाही या कारणाने तृणमूल काँग्रेस हा एक प्रमुख विरोधी पक्ष मतदानात भाग घेणार नाही. तसेच बिजू जनता दलानेही जगदीप धनकड यांना समर्थन दिले आहे. त्यामुळे ते देशाचे पुढचे उपराष्ट्रपती बनतील हे जवळपास नक्की आहे. राजकारणात (खरं तर कुठेही) कधी कोणाचे नशीब फळफळेल हे सांगता येत नाही. जगदीप धनकड हे त्यातीलच एक.
त्याचे झाले असे की १९८९ च्या लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या असताना २५ सप्टेंबर १९८९ रोजी काँग्रेसविरोधी राजकारणातील एक महत्वाचे नेते आणि हरियाणाचे मुख्यमंत्री देवीलाल यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त दिल्लीत बोट क्लबवर विरोधी पक्षांची विराट सभा झाली होती. त्या सभेसाठी जगदीप धनकड यांनी राजस्थानातील त्यांच्या झुनझुनू या ठिकाणाहून ७५ ट्रकभरून लोक आणले होते. त्या सभेत ७ लाख लोक हजर होते असे मी अन्यत्र वाचले आहे. एका ट्रकमध्ये कितीसे लोक मावत असतील? मला नाही वाटत ५०-६० पेक्षा जास्त लोक एका ट्रकमध्ये मावत असतील. अगदी १०० लोक एका ट्रकमध्ये कोंबले असे धरले तरी एकूण सभेला उपस्थित असलेल्या लोकांच्या तुलनेत १% हून थोडे जास्त लोक धनकड यांनी आणले होते. खुद्द देवीलालांच्या लक्षात जगदीप धनकड यावेत असे त्यात काय होते कल्पना नाही. पण ते आले. त्यावेळी धनकड ३८ वर्षाचे होते. 'ये छोरा होनहार है' असे म्हणत देवीलालांनी त्यांना जनता दलाची झुनझुनूमधून उमेदवारी मिळवून दिली. त्यापूर्वीचे १० वर्षे ते जयपूरला राजस्थान उच्च न्यायालयात वकीली करत होते. ते झुनझूनूमधून जिंकून लोकसभेत गेले आणि मग वि.प्र.सिंग यांच्या सरकारांमध्ये उपमंत्री होते.
पुढे १९९१ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळच्या दोनेक महिन्यात त्यांनी राजीव गांधींचा विश्वास संपादन केला. त्यावेळेसही धनकड यांना झुनझुनूमधूनच उमेदवारी हवी होती पण १९८९ मध्ये स्वतः धनकड यांनी ज्यांना पराभूत केले ते काँग्रेस उमेदवार कॅप्टन अयुबखान यांची १९६५ च्या युध्दात वीरचक्र मिळाल्यामुळे असलेली ओळख आणि तसेच ते अल्पसंख्य समुदायातील असल्याने त्यांना उमेदवारी नाकारून धनकड यांना उमेदवार बनवायला राजीव गांधी तयार नव्हते. म्हणून शेवटी त्यांना अजमेरमधून उमेदवारी देण्यात आली. त्यांच्यासाठी राजीव गांधींनी स्वतः प्रचारसभा घेऊनही त्यांचा भाजप उमेदवाराने पराभव केला. पुढे १९९३ ते १९९८ या काळात धनकड राजस्थान विधानसभेत काँग्रेस पक्षाकडून आमदार होते. १९९८ मध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी परत एकदा झुनझुनूमधून काँग्रेस उमेदवार म्हणून निवडणुक लढवली. त्यावेळी त्यांच्यासमोर ज्येष्ठ नेते शीशराम ओला (तिवारी काँग्रेसमधून बाहेर पडून त्यांनी स्वतःचा गट स्थापन केला होता त्याचे ते उमेदवार होते) आणि भाजपचे मदनलाल सैनी होते. त्या निवडणुकीत धनकड यांची अनामत रक्कम जप्त झाली होती. धनकड यांचे त्यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष असलेले अशोक गेहलोत यांच्याशी जमायचे नाही. १९९८ च्या राजस्थान विधानसभा निवडणुकीत ८-९ महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत हरलेल्यांना उमेदवारी द्यायची नाही हा नियम काढून गेहलोत यांनी जगदीप धनकड यांचे तिकीट कापले. त्यानंतर धनकड १९९९ मध्ये काही महिने राष्ट्रवादीत आणि २००० मध्ये भाजपत सामील झाले.
जवळपास २० वर्षे भाजपत काढूनही भाजपने त्यांना कोणत्याही निवडणुकीत उमेदवारी दिली नाही की कोणते महत्वाचे पद दिले नाही. तरीही ते पक्षात राहिले आणि आपल्या वकिलीत रमले होते. २०१२ च्या सुमारास दोन वर्षांनी होणार्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप स्वतःच्या बहुमताने सत्तेत येईल याची सुतराम शक्यता दिसत नव्हती. तरीही ते भाजपमध्येच राहिले. काँग्रेसमध्ये परत जायचा विचार त्यांनी केला नाही. अशोक गेहलोत यांच्याशी त्यांचे जमायचे नाही हे एक कारण असू शकेल. म्हणजे १९८९ मध्ये देवीलालांच्या नजरेत ते भरणे जसे त्यांच्या पथ्यावर पडले त्याप्रमाणेच अशोक गेहलोत यांच्याशी न जमणेही त्यांच्या पथ्यावर पडले असे दिसते. हा त्यांच्या नशीबाचाच भाग म्हणायला हवा.
मधल्या वर्षांमध्ये जगदीप धनकड हे नाव विसरायलाच झाले होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकींच्या वेळेस विकीपीडीया की अन्यत्र कुठे झुनझुनू लोकसभा मतदारसंघाविषयी वाचत असताना तिथे पूर्वी जिंकलेल्यांची नावे होती त्यात ते नाव वाचल्यावर 'अरे हे पण होते' हे आठवले. तेव्हा सांगायचा मुद्दा म्हणजे पक्षात कोणतेही पद न मिळता कोणत्याही निवडणुकीत उमेदवारी न मिळताही जगदीप धनकड टिकून राहिले. गेल्या २० वर्षात रा.स्व.संघाशी त्यांनी जुळवून घेतले. लॉकडाऊनपूर्वी राजस्थानातील संघ पदाधिकार्यांची बैठक होती त्यासाठी मोहन भागवत राजस्थानात आले होते तेव्हा ते जगदीप धनकड यांच्या फार्महाऊसवरही आवर्जून गेले होते.वास्तविकपणे सर्वोच्च न्यायालयातील आघाडीचे वकील आहेत त्यांच्यात त्यांच्या नावाची गणना होते. पण कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी, प्रशांत भूषण हे इतर त्याच लीगमधले वकील कोणत्या ना कोणत्या उचापात्या मधून मधून करत असतात. असे कशातही नाव धनकड यांचे सहसा येत नाही. तरी नाही म्हणायला त्यांच्या नावावर एक बट्टा म्हणजे काळवीट शिकारप्रकरणी त्यांनी सलमानखानचे वकीलपत्र घेतले होते ही एक वादग्रस्त केस त्यांच्या नावावर आहे. पण ती केस वगळता बातम्यांमध्ये यावी अशी कोणतीही केस त्यांनी लढवलेली नाही.
अशा जगदीप धनकड यांची निवड जुलै २०१९ मध्ये अचानक बंगालच्या राज्यपालपदावर झाली. नियमावर बोट ठेऊन ममता सरकारला ते व्यवस्थित नडले. फेब्रुवारी २०२२ मध्ये ममता सरकारने बंगाल विधानसभेचे अधिवेशन ७ मार्चला बोलावायची शिफारस राज्यपालांकडे केली. पण राज्यपालांकडे शिफारस गेली त्यात एक घोळ होता. नेहमी सभागृहाची बैठक सकाळी ११ ला भरते (११ ए.एम) त्याऐवजी काही कारणांनी ती दुपारी २ ला भरवावी (२ पी.एम) अशी शिफारस ममता सरकारला करायची होती. पण ए.एम आणि पी.एम मध्ये घोळ झाला आणि राज्यपालांना गेलेल्या शिफारसीत विधानसभेची बैठक ७ मार्चला रात्री २ वाजता (२ ए.एम) बोलवावी अशी शिफारस गेली. ती शिफारस बघून राज्यपालांनी सरकारच्या मुख्य सचिवांना राजभवनावर बोलावून घेतले. पण ममता सरकार आणि राज्यपाल यांच्यातून विस्तव जात नसल्याने मुख्य सचिव तिथे गेलेच नाहीत. मग राज्यपालांनी सरकारने केलेल्या शिफारशीप्रमाणे ७ मार्चला रात्री २ वाजता विधानसभेची बैठक बोलावली. राज्यपाल मंत्रीमंडळाने केलेल्या शिफारशीला बांधील असतात आणि मला विधानसभेचे सत्र रात्री दोनला बोलवायची शिफारस आली त्याला मी काय करू असे त्यांनी म्हटले. मग पळापळ झाली. मुख्य सचिव राज्यपालांकडे गेले आणि त्यांनी पी.एम च्या ऐवजी ए.एम लिहिणे ही चूक आहे हे राज्यपालांना सांगितले. त्यावर मग नियमावर बोट ठेऊन मंत्रीमंडळाच्या शिफारसीला आय.ए.एस अधिकारी कोणत्या आधारात चूक म्हणत आहेत हा प्रश्न विचारला. मग परत मंत्रीमंडळाने सुधारीत शिफारस राज्यपालांकडे पाठवली आणि विधानसभेची बैठक दुपारी २ ला बोलावण्यात आली. कलकत्त्याजवळचे जादवपूर विद्यापीठ हे दिल्लीतील जे.एन.युची कनिष्ठ आवृत्ती शोभावी असे आहे. तिथे तत्कालीन केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो गेलेले असताना सी.ए.ए च्या प्रश्नावरून विद्यार्थ्यांनी त्यांना घेरले. त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो की काय अशी परिस्थिती आली. हे कळल्यावर राज्यपाल जगदीप धनकड स्वतः तिथे गेले आणि आपल्या सुरक्षारक्षकांचा वापर करून त्यांनी बाबूल सुप्रियोंची सुटका केली.
भाजपने आतापर्यंत भैरोसिंग शेखावत आणि वैंकय्या नायडू या वरीष्ठ नेत्यांना उपराष्ट्रपतीपदाची संधी दिली आहे. शेखावत तर पक्षाचे खूपच मोठे नेते होते- वाजपेयी- अडवाणींच्या बरोबरचे. वैंकय्या नायडू तितके ज्येष्ठ नसले तरी बर्यापैकी वरीष्ठ होते. त्यामानाने जगदीप धनकड हे नाव एकदम किरकोळ दिसते. असे म्हटले जात आहे की शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने जाट समाज भाजपपासून दुरावला आहे त्याला एका जाटाला उपराष्ट्रपती करून परत जवळ करायचा प्रयत्न आहे. तसेच जगदीप धनकड हे सुध्दा शेतकरी कुटुंबातील आहेत. पण शेतकरी आंदोलनाचा राजस्थानात फारसा प्रभाव नव्हता. जो काही होता तो पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशात. तसेच हरियाणा-पश्चिम उत्तर प्रदेशातील जाट राजस्थानातील जाटांना आपल्या बरोबरचे मानतात का हा एक प्रश्न आहे. त्याहूनही मोठा प्रश्न म्हणजे असे कोणाला राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती बनवून त्याचा निवडणुकांच्या राजकारणावर किती फरक पडतो? फार नसावा. नाहीतर प्रणव मुखर्जींना राष्ट्रपती केल्यावर काँग्रेसने बंगालमध्ये मोठे यश मिळवायला हवे होते. तसे झाले नव्हते.
असो. जगदीप धनकड यांना शुभेच्छा.
प्रतिक्रिया
4 Aug 2022 - 10:08 pm | धर्मराजमुटके
बातमीदार काहीही ठोकतात. काँग्रेस ला कधीही हादरा बसू शकत नाही.
4 Aug 2022 - 10:44 pm | जेम्स वांड
उरल्या सुरल्या वाश्यातून एखाद जरी निखळला तर बोडक्या वर पडायचं झापाच घर हे म्हणून म्हणतोय मी
5 Aug 2022 - 3:33 am | राघव
हा हा.. आपल्याला सगळ्यांना हे वाटू शकेल हो.. पण खुद्द काँग्रेसलाच हे मान्य नाही म्हटल्यावर काय बोलणार! :-)
4 Aug 2022 - 10:20 pm | श्रीगुरुजी
कुलदीप बिष्णोई म्हणजे माजी मुख्यमंत्री भजनलालचा मुलगा. भजनलाल १९७७ नंतर जनता पक्षात गेले व हरयाणाचे मुख्यमंत्री झाले. १९८० मध्ये इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यानंतर भजनलालांनी आपले संपूर्ण मंत्रीमंडळ इंदिरा कॉंग्रेस पक्षात विलीन करून आपली खुर्ची वाचवली होती.
4 Aug 2022 - 10:46 pm | जेम्स वांड
पण हे काँग्रेस मुक्त वायदा करून काँग्रेस युक्त पक्ष करणे काही रुचले नाही बुआ मला तरी.
4 Aug 2022 - 11:31 pm | श्रीगुरुजी
हे मलाही बरेचसे पटलेले नाही. परंतु मला विचारतंय कोण? महाराष्ट्रात तर याचा अतिरेक झालाय.
5 Aug 2022 - 6:02 am | कंजूस
कॉ. आलीच नसती तर राष्ट्रपती राजवट नक्की होती.
5 Aug 2022 - 6:56 am | निनाद
उमेश कोल्हे हत्येसाठी निधी गोळा करणाऱ्या आणि मारेकऱ्यांना आश्रय देणाऱ्या आणखी दोन गुन्हेगारांना एनआयएने अटक केली. निधी गोळा करणारा अब्दुल रशीद आणि मारेकऱ्यांना आश्रय दिल्याचा आरोपी अब्दुल सलीम यांचा समावेश आहे.
भारतीय जनता पक्षाच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना सोशल मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर पाठिंबा देणारी पोस्ट कथितपणे पाठवल्याबद्दल उमेश कोल्हे यांची २१ जून २०२२ रोजी चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती.
5 Aug 2022 - 9:58 am | सुबोध खरे
संजय राऊत यांनी न्यायाधीशांना सांगितले कि त्यांना दिलेल्या खोलीला खिडकी नव्हती
room where he has been kept has no window and ventilation.
Special public prosecutor Hiten Venegaokar, who appeared on behalf of the ED, said Raut was kept in an AC room and hence there was no window. Raut later said that although the A C system is in place there, he cannot use it due to his health condition.this ed building is centrally airconditioned. Mr Raut was given a room which is about 500 sq feet
इ डी ची हि इमारत सेंट्रली एअर कंडिशन्ड आहे आणि श्री राऊत याना ५०० चौरस फुटांची खोली दिली होती तेथे त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता.
कांगावा आणि रडारड किती असावी
5 Aug 2022 - 10:55 am | श्रीगुरुजी
अर्वाच्य शिव्या हासडताना, धमक्या देताना, मग्रूरी करताना, वाटेल ते खोटे आरोप करताना, बरळताना, फुशारक्या भारताना, खोटे श्रेय घेताना, भुवया उंचावून डोळे गरागरा फिरविताना हृदयविकाराचा किंवा श्वास घेण्याचा अजिबात त्रास होत नाही.
5 Aug 2022 - 12:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कॉंग्रेसचं आज देशभरात महागाईविरोधात आंदोलन सुरु आहे, देशभर कार्यकर्ते, नेत्यांची धरपकड सुरु आहे. (संदर्भ बातम्या) संसद ते राष्ट्रपती भवनापर्यंत जाणारा मोर्चा रोखला गेला आहे. महाराष्ट्रातही नेत्यांची धरपकड सुरु आहे, महागाई, बेरोजगारी,ईडीच्या विरोधातही हे आंदोलन सुरु आहे. देशभर महागाईबद्दल प्रतिक्रिया उमटणे सध्या गरजेचेच आहे, आम्ही वाटेल ते निर्णय घेऊ असे समजून कारभार करणा-या केंद्रसरकार विरोधात जनतेनेही रस्त्यावर उतरणे गरजेचे आहे, सध्या तिस-यांदा रेपो दरात वाढ होत आहे, त्यामुळे कर्ज महागणार असे म्हटल्या जात आहे. एकुणच, केंद्र सरकारच्या धोरणाविरुद्ध आता हळुहळु असंतोष वाढत आहे, ही चांगली गोष्ट होत आहे. महागाई विरोधात सुरु असलेल्या आंदोलनास शुभेच्छा...!
-दिलीप बिरुटे
5 Aug 2022 - 3:13 pm | राघव
महागाई विरोधी आंदोलन हे निमित्त आहे.. मूळ कळ ईडीच्या कारवाईचीच आहे.
पण चांगलंय, काँग्रेस उशीरा का होईना आणि कोणत्याही कारणासाठी का होईना, एक राष्ट्रीय पक्ष म्हणून आपली विरोधी पक्षाची भूमिका जरा बजावायला लागते आहे. हे गरजेचेच आहे. सरकारवर अंकुश ठेवण्याचे काम विरोधी पक्षांनी केलेच पाहिजे. आंदोलनास शुभेच्छा.
7 Aug 2022 - 6:13 am | चौकस२१२
शशुभेच्छा ..अमचय पन हे अन्दोलन मह्गै विरुध्च रहावे हे श्रि चरनि प्रर्थना , य अल्लह पर्वर्दिगर , हे प्रभु
5 Aug 2022 - 2:16 pm | कंजूस
सर्वच विरोधी पक्षांनी वापरले आहे. ते टाकल्यावर झब्बू मिळत नाही.
5 Aug 2022 - 11:12 pm | कपिलमुनी
माजी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला नव्या प्रभागरचनेचा निर्णय सध्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे ह्यांनी रद्द केल्याने गृहमंत्री एकनाथ शिंदे ह्यांनी आनंद तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांनी नाराजी व्यक्त केल्याचं समजतं!
6 Aug 2022 - 11:03 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सुत्रांच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात मंत्रीपदाची वाट पाहणा-या आमदारांसाठी मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीच्या वा-यावर वा-या करीत आहेत, मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, हे मा. एकनाथ शिंदे गटाला विश्वासात न घेता दिल्ली दौरा करीत आहेत, असे फुटीर गटाचे प्रमुख, मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
चालु द्या....! =))
-दिलीप बिरुटे
6 Aug 2022 - 7:55 am | जेम्स वांड
आपल्या लेकीच्या पहिल्या मासिक पाळीचा महोत्सव करून मासिक पाळी आणि स्त्री आरोग्य विषयावर प्रबोधन करण्याचा एक कार्यक्रम आयोजित केला आहे. ह्या प्रसंगी
6 Aug 2022 - 8:41 am | रात्रीचे चांदणे
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा आणखीन एक दिल्ली दौरा. शपथविधी झाल्यापासून ७-८ दिल्ली दौरे तरी झाले असतील. महाराष्ट्रा सारख्या राज्याचा कारभार तोही मंत्रिमंडळ नसताना आणि त्यात हे दिल्ली दौरे. पहिले मुख्यमंत्री घराबाहेर पडत नव्हते आणि हे घराबाहेर पडले की थेट दिल्ली.
6 Aug 2022 - 10:04 am | श्रीगुरुजी
शपथ घेऊन आज ३७ दिवस होताहेत. सर्व खाती अधिकृतपणे शिंदेंकडे आहेत. फडणवीस बिनखात्याचे मंत्री आहेत.
मंत्रीमंडळ बनविणे अत्यंत अवघड आहे. शिंदे गटाला जास्तीत जास्त १५ मंत्रीपदे देणार आहेत म्हणे. शिंदे गटाच्या ४० पैकी जास्तीत जास्त १५ आमदार मंत्री होऊ शकतील. मंत्रीपद नाही मिळाले तर उर्वरीत २५ पैकी काही जण किंवा सर्वजण ठाकरेंकडे परत जाऊ शकतात. त्यासाठी पक्षांतरबंदी कायदा किंवा कोणताही घटनात्मक अडथळा नाही, कारण आपण अजून शिवसेनैतच आहोत असे शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे. तसे झाले तर अजून अस्थिरता निर्माण होऊन शिंदेना कदाचित राजीनामा द्यावा लागेल.
कदाचित हे ओळखूनच फडणवीस घाईघाईने हव्या त्या गोष्टी करीत आहेत. आरे मेट्रो, बुलेट ट्रेन, महापालिका प्रभाग रचना वगैरे करून नंतर राष्ट्रपती राजवट आली तरी हरकत नाही अशी योजना असावी.
भाजपच्या वाट्याला २७ मंत्रीपदे येणार आहेत म्हणे. त्यातील काही मंत्रीपदे अपक्ष व छोट्या पक्षांना द्यावी लागतील. काही मंत्रीपदे विखे, पाचपुते, दरेकर, लाड अश्या आयारामांना द्यावा लागतील. म्हणजे मूळ भाजपेयींना जेमतेम १०-१२ मंत्रीपदे मिळतील. त्यातून भाजपमध्ये सुद्धा असंतोष निर्माण होईल.
हा तमाशा तातडीने थांबवून महाराष्ट्रात काही काळ राष्ट्रपती राजवट आणून काही काळाने मुदतपूर्व निवडणूक घ्यावी असे माझे मत आहे.
6 Aug 2022 - 10:17 am | क्लिंटन
मला वाटते त्याच कारणामुळे भाजपने एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केले असावे. समजा फडणवीस मुख्यमंत्री झाले असते तर शिंदे गटाचे आमदार कधी परत जातात ही टांगती तलवार कायम राहिली असती. आता हे आमदार परत गेले आणि सरकार पडले तरी ते एकनाथ शिंदेंचे सरकार पडेल- थेट भाजपचे नाही.
शिंदे-फडणवीसांच्या सततच्या दिल्ली वार्यांमुळे ठाकरेंच्या 'महाराष्ट्र दिल्लीपुढे झुकला' या दाव्याला पाठबळ मिळेल. लोकांची स्मरणशक्ती फार तोकडी असते. महाभकास आघाडीने कसा सावळागोंधळ घातला होता हे लोक हळूहळू विसरायलाही लागले असतील. त्यात मंत्रीमंडळ विस्तार न झाल्याने आणि शिंदे-फडणवीसांच्या दिल्ली वार्यांमुळे एक महिन्यापूर्वी ठाकरे जाऊन शिंदे आल्यानंतर जे एक वातावरण निर्माण झाले होते ते आता हळूहळू विरायला लागले आहे असे वाटते.
कधीकधी शिंदे आणि फडणवीस हे दोघेही एकत्र दिल्लीला गेले होते. जर मंत्रीमंडळात मुख्यमंत्र्यांसह दोनच सदस्य असतील तर ते दोघेही एकाचवेळी राज्याबाहेर जाणे अयोग्य आहे. २०१६ मध्ये केजरीवालांचे जीभेचे ऑपरेशन झाले होते त्यासाठी ते बंगलोरमध्ये होते. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया फिनलंडमधील शाळांचा अभ्यास करायला म्हणून तिथे होते आणि इतर सगळे मंत्री पंजाब आणि गोव्यात विधानसभा निवडणुकांसाठी पक्षाचे काम करायला गेले होते. त्यावेळी दिल्लीत सरकारचा एकही मंत्री उपस्थित नव्हता. त्याचवेळी दिल्लीत डेंग्युची साथ चालू होती आणि एकही मंत्री उपस्थित नाही अशी परिस्थिती होती. त्यावर भाजपने टिकेची झोड उठवली होती. त्याविषयी मी पण मिपावर लिहिले होते. आता महाराष्ट्रात तरी काय वेगळे चालू आहे? समजा डेंग्युची साथ नसेल पण कुठेतरी पूर किंवा कोणत्या ना कोणत्या समस्या असताच. अशावेळी मंत्रीमंडळातील मुळात असलेले दोन सदस्य वरचेवर राज्याबाहेर असणे अयोग्य आहे.
6 Aug 2022 - 2:08 pm | श्रीगुरुजी
कोणतीही गरज नसताना भाजपने १९८९ पासून कॉंग्रेसविरोधी मतांमध्ये शिवसेनेच्या रूपात एक प्रतिस्पर्धी निर्माण करून पुढील २५ वर्षे स्वत:ची वाढ खुंटवून ठेवली.
सुदैवाने २०१४ मध्ये भानावर येऊन भाजपने सेनेचे जोखड मानेवरून फेकले व त्याचा फायदा होऊन भाजप स्वबळावर बहुमताजवळ पोहोचून ५ वर्षे मुख्यमंत्रीपदही मिँळाले.
दुर्दैवाने २०१९ मध्ये पुन्हा एकदा भाजपला अवदसा आठवली आणि पुन्हा एकदा सेनेशी युती करून हातातली सत्ता घालवली.
मागील अडीच वर्षे भाजप स्वबळावर होता व पुढील निवडणुकीच्या वेळी मविआच्या अत्यंत गलथान कारभाराचा फायदा मिळविण्यासाठी भाजपला प्रयत्न करता आला असता. परंतु आता शिंदे गटाच्या स्वरूपात भाजपने पुन्हा एकदा आपल्या मतात एक वाटेकरी निर्माण करून ठेवलाय. सरकार पाडून भाजपने उद्धव ठाकरेंना एक एस्केप रूट मिळवून दिला आणि जसा काळ पुढे सरकेल तश्या मविआच्या चुका आपोआप जनतेच्या विस्मृतीत जातील.
किमान पुढील दोन विधानसभा निवडणुकीत भाजपला सत्तेत यायची संधी नाही असे माझे मत आहे.
6 Aug 2022 - 3:21 pm | शाम भागवत
भाजप सत्तेत नसल्याने फडणवीसांचा पत्ता कट होणार किंवा पुन्हा परत एकदा उपमुख्यमंत्री म्हणून येणार. फडणवीस विरोधक पुन्हा एकदा जिंकणार.
:)
7 Aug 2022 - 6:09 am | चौकस२१२
" भाजपने सेनेशी युती करायाला नको होती" हे सिंहा वलोकन करून म्हणणे सोपे आहे
महाराष्ट्रात एक "विविष्ट प्रकारचे" राजकारण खेलले जाते त्यात भाजप ला सत्तेचं जवळ जाणयासाठी का होईल सेना हाच पक्ष त्यातल्या त्यात जवळचा होता
तसे नसते केले तर वर्षानुवर्षे विरोधातच राहावे लागले असते
भाजपला त्यांचे पाठीराखे = संघ महाराष्ट्रातून निर्माण झाला असला तरी महाराष्ट्रात भाजपला कसे "बाहेर ठेवावयाचे " ते टूल किट ठरलेलं होते आणि ते यशस्वी हि होत होते
हा हे मान्य कि "आतातरी स्वबळावर लढावे" असे अनेक भाजप समर्थकांना वाटते .. ते साहजिक आहे पण आता हि सेना फोडीची ची गोची होऊन बसली आहे त्यामुळे भाजपपुढे २. वर्षांनंतर काय कर्यायाचे हा विचित्र प्रश्न आहेच ... ९ यात हे गृहीत धरलेआहे कि १) २. वर्षे हे सरकार टिकेल आणि नव्या निवडणूक घोषित त्याआधी होणार नाहीत आणि २) शिंदे गटाला २. वर्षांनंतर मुळ शिवसेना पक्षाचा ताबा मिळणार नाहीये ( कारण अर्थात हे कि सर्व "शेअ र होल्डर" एकाच कुटुंबातील आहेत )
7 Aug 2022 - 8:44 am | श्रीगुरुजी
तसे नसते केले तर वर्षानुवर्षे विरोधातच राहावे लागले असते
१९८६ ते १९८९ या काळात श्रीरामजन्मभूमी आंदोलन, बोफोर्स भ्रष्टाचार, शाह बानो प्रकरण अश्या अनेक मुद्द्यांवरून भाजपने गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक अश्या अनेक राज्यात जनाधार वाढविला होता. १९९० मध्ये
राजस्थान, मध्य प्रदेश व हिमाचल प्रदेशात विधानसभा निवडणूक जिंकून सत्ता मिळविली होती. १९९० मध्ये गुजरातमध्ये १८२ पैकी ६७ जागा व बिहारमध्ये ३२४ पैकी ३९ जागा जिंकल्या होत्या. १९९१ मध्ये उत्तर प्रदेशात व १९९३ मध्ये दिल्लीत विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळविले होते. १९९४ मध्ये कर्नाटकात २२४ पैकी ४० जागा जिंकल्या होत्या. भाजपचे १९८९ मध्ये लोकसभा निवडणुकीत ९० तर १९९१ मध्ये १२० खासदार होते. १९८५ मध्ये फक्त २ खासदार व एकही राज्यात सत्ता नसलेल्या भाजपने पुढील ७-८ वर्षात मोठी झेप घेतली होती.
महाराष्ट्रात सुद्धा गोपीनाथ मुंडे, महाजन अश्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने आपला जनाधार मोठ्या प्रमाणात वाढविला होता. आजूबाजच्या सर्व राज्यात भाजपची घोडदौड सुरू असताना त्यापासून महाराष्ट्र अलिप्त राहणे शक्यच नव्हते.
महाराष्ट्रात १९८० मध्ये भाजपचे १४ आमदार होते व १९८५ मध्ये १६ आमदार होते. १९९० मध्ये भाजप स्वबळावर लढला असता तर किमान ६०-७० आमदार जिंकून कॉंग्रेसचा एकमेव प्रतिस्पर्धी भाजप राहिला असता.
१९८९ मध्ये सेनेचे मुंबई महापालिकेत १७० पैकी ७५ नगरसेवक होते व संभाजीनगर महापालिकेत ६० पैकी २६ नगरसेवक होते. मुंबईत २ आमदार होते. म्हणजे मुंबई व संभाजीनगर महापालिकेपलिकडे सेनेचे अस्तित्व शून्य होते.
अश्या वेळी सेनेला जागांचा प्रचंड मोठा वाटा देऊन (२८८ पैकी १८३ जागा सेनेला) युती करून स्वतःच्या मतांवर सेनेला महाराष्ट्रात पसरविणे व कॉंग्रेसविरोधी मतात एक वाटेकरी निर्माण करून या मतांचा मोठा वाटा नगण्य सेनेच्या घशात घालणे व दुय्यम स्थान स्वीकारून स्वपक्षाची वाढ खुंटविणे हा अत्यंत चुकीचा निर्णय होता.
7 Aug 2022 - 6:11 am | चौकस२१२
हा तमाशा तातडीने थांबवून महाराष्ट्रात काही काळ राष्ट्रपती राजवट आणून काही काळाने मुदतपूर्व निवडणूक घ्यावी असे माझे मत आहे.
१००%
6 Aug 2022 - 11:23 am | विवेकपटाईत
ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गुट वर चढला. ४०/२७ आघाडी घेतली.
6 Aug 2022 - 8:16 pm | क्लिंटन
जगदीप धनकड यांनी ५२८ मते मिळवत उपराष्ट्रपती पदासाठीची निवडणूक जिंकली आहे. प्रतिस्पर्धी उमेदवार मार्गारेट अल्वा यांना १८२ मते मिळाली. जगदीप धनकड देशाचे नवे उपराष्ट्रपती असतील. त्यांचे अभिनंदन.