थोडे आतही डोकवा !

वाहीदा's picture
वाहीदा in काथ्याकूट
8 Dec 2008 - 2:33 pm
गाभा: 

थोडे आतही डोकवा !

राजकारण आणि राजकारणी ही भ्रष्टतेची गंगोत्री आहे, हे निदान झालेले आहे. पाण्यावर उमटणारा पहिला तरंग ही राजकारणी मंडळी असतील, तर त्या तरंगातील शेवटच्या वर्तुळात आपणही आहोत, याचा विसर पडू देता कामा नये. .......

मुंबईतील दहशतवादी हल्ल्यातील घटनेनंतर निर्माण झालेला जनक्षोभाचा अवमान करण्याचा हेतू नाही; परंतु एक निर्भय, शिस्तबद्ध समाजच देशाची सुरक्षितता, प्रतिष्ठा यांची मुहूर्तमेढ करू शकतो. लाचार, स्वार्थी, आपमतलबी समाजात लफंग्या राजकारण्यांचेच पीक येणार, हेही विसरता येणार नाही. आपण प्रत्येक पावलावर किंमत मोजतोच आहोत; आता छोट्या परीक्षांनाही बसू यात- देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी.

मुंबईतील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय मन हादरून गेलं आहे. राजकारण्यांविरुद्धचा उग्र संताप त्याच्या मनात नुसता दाटलेला नाही, तर तो उफाळूनही आलेला आहे. राजकारणी बदलले की स्थिती बदलेल, अशा विलक्षण भाबड्या मनःस्थितीत तो आहे. भावनावेगातून क्रांती घडत नसते आणि परिवर्तनाची अपेक्षा केली जाते तेव्हा ते सर्वंकष असावं लागतं. इस्राईलसारखं चिमुकलं राष्ट्र शत्रूंच्या गराड्यात राहूनही ताठ मानेनं जगू कसं शकतं? अमेरिकेत दहशतवादी हल्ला एकदाच होतो; त्यानंतर त्या देशाला दहशतवादी ओरखडाही काढू शकत नाहीत, या विचारांनी भारतीय मनात काहूर केलं आहे. अन्य राष्ट्रांत असं का घडतं आणि आपला देश कायम उसवल्यासारखा का वाटतो, याचा विचार राजकारणी करोत वा ना करोत; आपण व्यक्तिगत पातळीवर करणार आहोत का? राष्ट्र नावाचं एकजीव रसायन बनणं, ही प्रक्रिया आहे. असं एकजीव रसायन बनण्यासाठी त्या देशाचं एक सामूहिक चारित्र्य आकार घ्यावं लागतं. देशाचं राष्ट्रीय चारित्र्य कसं आहे, त्यावरच त्या देशाची प्रतिष्ठा ठरते.

हे राष्ट्रीय चारित्र्य समाजातील प्रत्येक घटक आपली जबाबदारी पूर्णांशानं पार पाडतो आहे का, यावरच ठरतं. प्रचंड असुरक्षिततेनं ग्रासल्यावर प्रत्येक भारतीय मन पेटून उठलं आहे. हीच वेळ आहे स्वतःलाही काही प्रश्‍न विचारण्याची- स्वतःच स्वतःच ी झाडाझडती घेण्याची. दहशतवाद्यांकडे कोणत्या रायफल्स होत्या, कोणती स्फोटकं होती, याची माहिती बाहेर आल्यावर आणखी किती हानी झाली असती, याचा अंदाज बांधता येऊ शकतो. आपण आपल्या जीवनात दखलपात्र गुन्हा केला नसेल; पण आपल्या सोयीसाठी आपल्या कोणकोणत्या छोट्या कृत्यांवर पांघरूण घातलं आहे, याचा हिशोब देऊ तेव्हाच अनेक प्रश्‍नांची उत्तरं सापडतील. दहशतवाद्यांच्या स्फोटकांनी किती हानी होते त्याची मोजदाद करता येऊ शकते; पण आपल्या छोट्या छोट्या कृत्यांनी आपण राष्ट्रीय चारित्र्य नासवून टाकतो. दहशतवादी घटना ही त्याचीच मोजलेली किंमत आहे. आपला पहिला राग राजकारण्यांवर आहे. त्यांच्या संदर्भातच आपण किती कर्तव्य पार पाडतो? गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या राजकारण्याला निवडणुकीत मिळणारा विजय, ही आपलीच कामगिरी असते. पाच वर्षांत एकदा येणाऱ्या निवडणुकीतील मतदान करण्यातही आपण निरुत्साही असतो. ते टाळण्यासाठी आपल्याकडे कारणांची यादी आहे. राजकारणी घमेंड दाखवत आपल्या नाकावर टिच्चून गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचा उमेदवार लादतात आणि बहुतेकदा तो निवडूनही येतो, याला जबाबदार कोण? राजकारण्यांच्या संपत्तीत होणारी वाढ आपण डोळे मिटून पाहत राहतो. कालपर्यंत पैशाला महाग असणारा राजकीय कार्यकर्ता गाडीतून कसा फिरतो, त्याच्या मालमत्तेत कशी वाढ होते, त्याच्या गळ्यात सोन्याची चेन आणि हातात सोन्याची ब्रेसलेट्‌स कशी येतात, ही चर्चा आम्ही फक्त तोंड दाबून करत राहतो. अशांना उघड आव्हान देण्याची आपली हिंमत नसेल तर दहशतवाद्यांविरुद्ध लढण्याची भाषा आजच सोडून द्यायला हवी.

देशावर संकट आलं, तरच आमच्या ऐक्‍याचं दर्शन घडणार; अन्यथा आम्ही जात, भाषा, धर्म याच्या कोशात वावरत राहणार, त्याच्याशी संबंधित लढाया जिवावर उदार होऊन लढणार. मनामध्ये जात, धर्म, भाषा यांचं विष घेऊन वावरणार. बाह् य हल्ला करणाऱ्यांना या समाजातील ऐक्‍य किती पोकळ आहे, हे समजत का नाही? अशा पद्धतीच्या चिरफाळ्या झालेल्या समाजाची एकसंधता कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे तात्पुरतीच असते, याचं भान आपल्याला येणार कधी?

आपण वाहनाचा परवाना एजंटाशिवाय किंवा पैसे न घेता मिळवला आहे? वाहन परवाना मिळत असताना आपण त्यासाठी घालवावा लागणारा वेळ आणि मनस्ताप वाचविण्यासाठी पैसे देतो. एवढी साधी परीक्षा देण्यासाठी आम्ही तयार नाही. चौकातील लाल दिवा पोलिस असेल तरच पाळायचा, ही आमची सचोटी आहे. मुलाला शाळाप्रवेश नामवंत शाळा वा महाविद्यालयात मिळावा यासाठी आम्हाला दुष्कीर्तीच्या राजकारण्याची मदत वावगी वाटत नाही. दीडदमडीच्या पोराटोरांची फ्लेक्‍सवर चमकणारी छायाचित्रं पाहून आमचे फक्त रक्त उसळते; पण शहर गलिच्छ करणाऱ्यांना निवडणूक लढविण्याची हिंमत होणार नाही, असे मतदान घडविण्याचा वज्र निर्धार आम्ही करू शकत नाही. आपल्या पोराबाळांचं करिअर ही आपली सर्वोच्च प्राधान्याची बाब असते. त्यात अडथळा येऊ नये म्हणून आम्ही शाळेत मुलांना एनसीसीत टाकण्याचं टाळणार. गॅसटंचाई असेल तर गॅस डिलिव्हरीवाल्याला परस्पर पटवून जादा पैसे देणं, हा आम्ही धोरणीपणा मानतो. खासगी वाहतुकीस मनाई आहे, असा बोर्ड वाचत आम्ही निर्लज्जपणानं खासगी वाहतुकीचा आश्रय घेतो. कायद्याला फाट्यावर मारणाऱ्या व्यवसायाला आम्ही शरण असतो. मोफत वीज घेणारा बळिराजा "आजच सारं पाणी ओढून घेतलं पाहिजे,' अशा मानसिकतेनं पाण्याचा अनिर्बंध वापर करतो, त्या क्षणी त्याच्या मनात अन्य कोणत्याही शेतकऱ्याचा विचार नसतो. सोसायटीतील टाकी ओव्हर फ्लो होण्याशी किंवा वस्तीतील नळकोंडाळं वाहत असण्याशी आमचा संबंध अजिबात नसतो, त्याची जबाबदारी आमच्या दृष्टीनं यंत्रणांची असते.

सर्वांत भ्रष्ट समजल्या जाणाऱ्या महसूल, पोलिस आदी अनेक खात्यांत काम करण ारे समाजाबाहेरचे नाहीत; त्यांच्या कुटुंबातील मंडळी त्यांच्या साऱ्या पदांचे फायदे सुखेनैव घेत असतात. त्यांचे सगेसोयरे, मित्रपरिवारही त्याचे लाभ उपटताना जराही अस्वस्थ होत नाहीत. राजकारणी देशाचे किती वाटोळे करताहेत, त्यांच्याशी तुलना करीत आम्ही आमच्या छोट्याछोट्या चुकांचं समर्थन करीत पुढे वाटचाल करतो आहोत. राजकारण आणि राजकारणी ही भ्रष्टतेची गंगोत्री आहे, हे निदान झालेलं आहे. पाण्यावर उमटणारा पहिला तरंग ही राजकारणी मंडळी असतील, तर त्या तरंगातील शेवटच्या वर्तुळात आपणही आहोत, याचा विसर पडू देता कामा नये. मुंबईतील दहशतवादी हल्ल्यातील घटनेनंतर निर्माण झालेला जनक्षोभाचा अवमान करण्याचा हेतू नाही; परंतु एक निर्भय, शिस्तबद्ध समाजच देशाची सुरक्षितता, प्रतिष्ठा यांची मुहूर्तमेढ करू शकतो. लाचार, स्वार्थी, आपमतलबी समाजात लफंग्या राजकारण्यांचंच पीक येणार, हेही विसरता येणार नाही. आपण प्रत्येक पावलावर किंमत मोजतोच आहोत; आता छोट्या परीक्षांनाही बसू यात- देशासाठी- देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी. जय हिंद!

- अभय कुलकर्णी
abhay.kulkarni@esakal.com

प्रतिक्रिया

चन्द्रशेखर गोखले's picture

9 Dec 2008 - 9:40 am | चन्द्रशेखर गोखले

अभय कुलकर्णी,
अतिशय सुंदर आणि अंतर्मुख करणारा लेख लिहील्या बद्दल आपले अभिनंदन..! आपण म्हणता ते आगदी योग्यच आहे,
शेवटी समाज, देश म्हणजे तरी काय हो..? व्यक्ती व्यक्ती मिळुनच समाज बनलेला आहे. एका तत्ववेत्त्याने म्हंटल आहे,
what you are the society is. The society is you and you are the society..! राज्यकर्ते करीत असलेला भ्रष्टाचार हा आपल्या व्यक्तीगत जीवनातील चारित्र्याचा परिपाकच आहे. आपली कामे सहजपणे व्हावीत म्हणुन आपण देत असलेली चिरीमिरी हेच राज्यकर्त्यांच्या हजारोकोटींच्या भ्रश्टाचाराचे मुळ आहे, हे आपण लक्षात घेतले पाहीजे. रुपयाच शेण खाल्ले काय आणि १००रुपयाचे शेण खाल्ले काय शेण ते शेणच असते.. शेण विकणारा आणि शेण खाणारा दोघेही बरबटलेले असल्यावर स्वच्छ हाताने मतदान तरी कस करणार...? परीवर्तन करायचच असेल तर ते स्वतः पासुन... दुसर्‍याला बदलायच असेल तर उपदेश पुरे असतो.. पण स्वतःला बदलायच म्हणजे प्रत्यक्ष क्रुती हवी.. इथेच तर खरी मेख आहे.....