हंपी, हंपी आणि पुन्हा हंपी! भाग ४ (अंतिम)

Primary tabs

एक_वात्रट's picture
एक_वात्रट in भटकंती
8 May 2022 - 6:06 pm

१० ऑगस्ट

केएसटीडीसी मयुरा भुवनेश्वरीमधल्या एकूण व्यवस्थेवर आम्ही समाधानी असलो तरी काल दिलेला नाश्ता मात्र अजिबातच चांगला नव्हता. रविवारी इडली-सांबार आणि उडीदवडे होते. मात्र हे पदार्थ फक्त शनिवार-रविवारच बनवले जातात असं सांगून हॉटेलवाल्यांनी काल फक्त पोहे आणि उपीट यावर आमची बोळवण केली होती. साहजिकच आम्ही तक्रार केली; तेव्हा आज जरा चांगला नाश्ता मिळाला.

एकंदर मयुरा भुवनेश्वरी मला आवडलं. सगळीच सरकारी हॉटेलं ऐसपैस जागेवर वसलेली असतात, त्यात हंपी एक खेडं, त्यामुळे इथं जागेला तोटा नव्हता. गाड्या लावायलाही इथं बक्कळ जागा होती. खोल्या थोड्या छोट्या होत्या आणि न्हाणीघरांमधे थोडी अजून स्वच्छता चालली असती, पण परिस्थिती एकूणच चालवून घेण्यासारखी होती. सगळ्या सरकारी हॉटेलांप्रमाणेच ह्या हॉटेललाही लागून एक छोटीशीच पण सुंदर बाग आहे. (एकदा आम्ही थोडा वेळ फिरायला गेलो तर तिथं माकडांच्या टोळ्यांनी उच्छाद मांडलेला. माकडं झाडावरचे नारळ खाली फेकत होती आणि आतलं खोबरं खात होती. माकडकुळातले प्राणी प्राथमिक हत्यारं बनवून आपलं खाणं मिळवतात हे लहानपणी पुस्तकात वाचलेलं, आज प्रत्यक्ष पहायला मिळालं!)

असंच इकडेतिकडे फिरताना मला ह्या हॉटेलातला कूलर दिसला.वेगवेगळ्या प्रकारच्या कोल्ड्रिंक्सनी कूलर गच्च भरला होता आणि विशेष गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या बाटल्या काचेच्या होत्या. कूलर पाहिल्यावर एकदम बालपणात गेल्यासारखं वाटलं. त्यावेळी प्रवासाला बाहेर पडलो की काचेच्या बाटल्यांमधलं कोल्ड्रिंक हे विशेष आकर्षण असे. इथे वरच्या डाव्या कोप-यात दिसणारं ‘माझा’ हे माझं लहानपणी आवडतं पेय होतं. नंतर ते दोन लिटरच्या प्लास्टिकच्या बाटल्यांत मिळायला लागलं आणि त्याची चवच गेली.

आजचा दिवस आमचा हंपीतला शेवटचा दिवस होता. आजची मुख्य आकर्षणं होती, ससिवेकालू आणि कडवेकालू ही गणपतीची दोन प्रसिद्ध मंदिरं आणि उग्र नरसिंह मंदिर. हंपीतली गर्दी काल सोमवारमुळं ब-यापैकी आणि आज मंगळवारमुळं बरीचशी कमी झाली होती. हंपीतली मंदिरं तर सुंदर आहेतच, पण हंपीत नुसतं फिरायलाही फार मजा येते. इथली गर्द झाडी, आखीवरेखीव रस्ते आणि जिकडे नजर जाईल तिथे पसरलेले भग्नावशेष, मोठमोठे दगड यामुळं हंपीत निरुद्देश भटकणं हाही एक आनंददायी अनुभव असतो. तरी इथे एखादा दिवस सायकलीनं फिरण्याचं नियोजन करून आम्ही गेलो, ते राहिलंच. एखादं ठिकाण पायी चालत जाऊन पहायचं होतं, तेही राहिलंच. पण जसं मी आधी म्हटलं तसं, ठीक आहे, हे करायचं म्हणून तरी हंपीत परत एक सहल काढता येईल.

सासिवेकालू मंदिराकडे जाताना आम्हाला रस्त्यात एक मंदिर दिसलं. आम्ही खरं तर तसेच पुढे निघालो होतो, पण कुणीतरी म्हटलं थांबूयात म्हणून थांबलो. ह्या मंदिराचं नाव होतं चंडिकेश्वर मंदिर. हे फारसं प्रसिद्ध नाही आणि आत शिरताच त्याचं कारण कळून येतं. हंपीतल्या दहा मंदिरांपैकी एक असं ह्याचं रूप आहे, वेगळं, समोरच्याला आकर्षित करेल असं काही ह्या मंदिरात नाही. पाचेक मिनिटांत आम्ही निघालो. कशी गंमत आहे पहा, हे एकटं मंदिर एखाद्या गावात असतं तर ते पहायला ५० किलोमीटर प्रवास करून मी गेलो असतो, आता इथे ५ मिनिटांहून जास्त वेळ रेंगाळायलाही तयार नव्हतो.

उग्र नरसिंह मंदिर हंपीतल्या सगळ्यात प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे. किंबहुना हंपी म्हटलं की डोळ्यासमोर येतात विजयविठ्ठल मंदिरातला तो दगडी रथ आणि ही उग्र नरसिंहाची मूर्ती. मूर्ती साधारण पंधरा ते वीस फूट उंच आहे. गंमतीची गोष्ट म्हणजे मूर्तीच्या समोर लावलेली आडवी जाड दगडी पट्टी मूर्तीचाच एक भाग असल्याचा अनेकजणांचा समज असला तरी तो एक गैरसमज आहे. मुर्तीचे जतन करताना भापुविनं ती पट्टी लावलेली आहे. पुराव्यासाठी ब्रिटिश लायब्ररीच्या संग्रहात असलेले आणि साधारण 1855 साली काढलेले हे छायाचित्र (http://www.bl.uk/onlinegallery/onlineex/apac/photocoll/n/019pho000000208...) पाहता येईल.नरसिंहाच्या मांडीवर बसलेली लक्ष्मीची मूर्ती आता जवळपास सगळीच नष्ट झाली असली तरी तिचे हात मात्र अजूनही पाहता येतात.

उग्र नरसिंह मंदिराशेजारीच आहे बडविलिंग मंदिर. आपल्या भल्यामोठ्या शिवलिंगासाठी हे मंदिर प्रसिद्ध आहे. अतिशय चिमुकल्या ह्या मंदिरात सतत पाणी भरलेले असते.


ही दोन मंदिरे पाहून आम्ही पुढे निघालो. वाटेत लागले कृष्ण मंदिर. हंपीत काही मोजकी महाप्रचंड मंदिरे आहेत, त्यातलेच हे एक. ह्याचे महाद्वारच एवढे विशाल आहे की उग्र नरसिंह मंदिरापेक्षाही उंच भरावे. हंपीतल्या प्रसिद्ध मंदिरात गणना होत नसल्याने मंदिर अर्थातच मोकळे होते.

मंदिराच्या गोपुराच्या डागडुजीचे काम चालू होते. लोखंडी पहाड (Scaffolding) अगदी पार वरपर्यंत नेलेला दिसत होता. किल्ल्यांवरच्या गुहा, भुयारं, मंदिरातले अंधारे प्रदक्षिणा मार्ग हे सगळे प्रकार आपल्याला जाम आवडतात. जिथे राजेरोसपणे प्रवेश आहे त्यापेक्षा जिथे प्रवेश नाही अशा जागांचं आकर्षण मला जास्त आहे. पहाड पाहून असं वाटलं की वर चढावं आणि गोपूर आतून कसं दिसतं ते पाहून यावं. मंदिराच्या दारात बसलेल्या रखवालदाराला मी विचारलंदेखील, ‘तुम्ही कधी वर गेला आहात का?’ माझा प्रश्न त्याला जरा विचित्र वाटला असावा. माझ्याकडे एक कटाक्ष टाकून तो म्हणाला, ‘उपर क्या है? जो देखना है, वो यहीं है!’
कृष्ण मंदिरासमोरच एक दगडात कोरलेली पाण्याची टाकी आहे. त्या टाकीवर विजयनगर साम्राज्याची अधिकृत मुद्रा कोरलेली आहे.


कृष्णमंदिराचा निरोप घेऊन आम्ही निघालो सासिवेकालू गणेश मंदिराकडे. सासिवेकालू म्हणजे मोहरीचा दाणा - आपल्या विशिष्ठ आकारामुळे ह्या गणपतीला हे नाव मिळालेले आहे. मंदिरातली गणेशमुर्ती आठेक फूट उंच असावी. आपण मंदिर म्हणत असलो तरी नेहमीच्या मंदिरात आढळणारी कुठलीच गोष्ट (मुख्यमंडप, गर्भगृह, शिखर) इथे नाही. आठ दहा खांब आणि त्यामधे मूर्ती - असा एकूण साधासोपा मामला.ह्या मंदिराकडून विरुपाक्ष मंदिराकडे चालत निघालो की मधे लागते हेमकूट टेकडी. ह्या टेकडीवरील मंदिरांना हेमकूट मंदिर समूह म्हटलं जातं.आकारानं छोटी अनेक मंदिरे इथे आहेत. खडकात खोदलेली (की नैसर्गिकरित्या निर्माण झालेली) काही तळीही इथे दिसतात. ह्या मंदिर समूहापैकी विरूपाक्ष मंदिराच्या अगदी जवळ असलेली त्रिकूट मंदिर, जैन मंदिर ही मंदिरं आम्ही आतून पाहिली.काल रात्र झाल्यानं आम्हाला विरूपाक्ष मंदिरात दर्शन घेता आलं नव्हतं, तेव्हा आम्ही आज मंदिरात शिरलो. मुख्य सभामंडपात छतावर अनेक सुंदरसुंदर चित्रं रंगवलेली आहेत, पण कॅमेरा किंवा भ्रमणध्वनी आत नेला नसल्यानं त्यांची छायाचित्रं काही मला काढता आली नाहीत.

दर्शन घेतल्यावर आम्ही देवळाच्या मागच्या बाजूस असलेल्या एका खोलीत महाप्रसादाचाही आनंद घेतला. जेवण चांगलं होतं, पण मी म्हणेन महाप्रसाद खावा तर उडुपीच्या श्रीकृष्ण मंदिराचाच. एवढं सुंदर जेवण त्यानंतर मी कुठल्याच मंदिरात जेवलेलो नाही.

जेवण झाल्यावर आम्ही निघालो थोडी खरेदी करायला. हंपीकडे नेणा-या रस्त्यांवर दगडी वस्तू विकणारी अनेक दुकानं आपल्याला पहायला मिळतात. मूर्त्या, फुलदाण्या, कासवं, दिवे अशा अनेक दगडी वस्तू या दुकानांबाहेर ओळीनं मांडून ठेवलेल्या असतात. अशीच दोनतीन दुकानं आम्ही फिरलो. शेवटी एका दुकानातून ५/६ खलबत्ते, काही दिवे आणि दोन सुंदर बुद्धमुर्तींची खरेदी झाली.

खरेदी झाल्यावर आम्ही निघालो परत एकदा मंदिरयात्रा करायला. सकाळी राहिलेला कडालेकालू गणेश आणि काल मातंग पर्वतावरून दिसलेलं अच्युतराया मंदिर आता आम्हाला पहायचं होतं.

कडालेकालू गणेश मंदिरानं मात्र आमची निराशा केली. एक तर ह्या मंदिराच्या गर्भगृहात अंधार आहे, त्यात लोखंडी रेलिंगनं बंदिस्त केल्यामुळं तुम्ही आत जाऊही शकत नाही. त्यामुळे हा गणपती एखाद्या तुरुंगात डांबलेल्या एखाद्या कैद्यासारखा भासतो!कडालेकालू गणेश मंदिर पाहून आम्ही निघालो अच्युतराया मंदीर पहायला. विरुपाक्ष मंदिरातून मुख्य प्रवेशदारातून निघणारा रस्ता आपल्याला थेट अच्युतराया मंदीरापर्यंत घेऊन जातो. अर्थात हंपीच्या शिरस्त्याप्रमाणे वाटेत पहाण्यासारख्या अनेक वास्तुंची रेलचेल आहे. सगळ्यात पहिला दिसतो तो एकाच शिळेतून कोरलेला महाप्रचंड नंदी. हा नंदी मी आत्तापर्यंत पाहिलेला सगळ्यात मोठा नंदी आहे.

इथे सुरू होतो कच्चा रस्ता. ह्या रस्त्यावरही अनेक मोठमोठे दगड आणि लहानमोठी मंदिरं आहेतच.कच्च्या रस्त्याने तसेच पुढे चालत गेलो की उजव्या बाजूला दिसते मातंग टेकडी.


मातंग टेकडीवरून अच्युतराया मंदीराचं विहंगम दृष्य काल आम्ही पाहिलं होतं, आणि आज ते मंदिर जवळून पहायला आम्ही निघालो होतो.अच्युतराया मंदिरही भलंमोठं आहे. या मंदिराचं वैशिष्ठ्य म्हणजे त्याला दोन महाद्वारं आहेत. महाद्वार, त्यावर गोपूर, तटबंदी म्हणून दगडी खांबांनी बनवलेले व्हरांडे, मधे मुख्य मंदिर हे सगळे हंपीतल्या मंदिरांमध्ये आढळणारे घटक इथेही आहेतच.
आत मुख्यमंदिराशेजारी असलेल्या एका छोट्या मंदिरात खांबांवर काही विठ्ठलमूर्त्या कोरलेल्या आहेत. विठ्ठलाची मूर्ती मी आजपर्यंत कुठल्याही मंदिरात पाहिलेली नाही - त्यामुळे ह्या मंदिरात विठ्ठलमुर्ती पाहणे हा एक आश्चर्यचकित करणारा अनुभव होता.अच्युतराया मंदिरापासून आपण नदीच्या दिशेने निघालो की डाव्या बाजूल लागते पुष्कर्णी. ही बहुधा हंपीतली सगळ्यात मोठी पुष्कर्णी असावी.ह्या पुष्कर्णीपासून उजवीकडे गेलो की लागते विठ्ठल मंदिर आणि डावीकडे लागते चक्रतीर्थ. आम्ही अर्थातच चक्रतीर्थाकडे निघालो. चक्रतीर्थ म्हणजे तुंगभद्रानदीवर बनवलेला एक छोटासा घाट. इथे अर्थात एक मंदिर आहेच (आम्ही आत मात्र गेलो नाही.) हंपी बाजारात दिसणारी दुकानांची रचना इथेही दिसते. पावसाळा असल्यामुळे नदीला बरेच पाणी होते. पण ‘हे पाणी काहीच नाही, काल त्या वरच्या दुकानांच्या पाय-यांपर्यंत पाणी पोचले होते’ असे तिथे मासे पकडणा-या एका कोळ्याने म्हटल्यावर आणि पुरावे म्हणून त्याच्या भ्रमणध्वनीत काढलेली छायाचित्रे दाखवल्यावर आम्ही आश्चर्यचकित झालो. पकडलेले मासे त्याने तिथेच एका खळग्यात नदीच्या पाण्यात (जिवंत) सोडले होते - मासे मांगूर (कॅटफिश) असावेत.संध्याकाळची वेळ होती. आम्ही निवांत एके ठिकाणी बसलो. हंपीतल्या ‘इवॉल्व बॅक’ ह्या पंचतारांकित हॉटेलमध्ये राहिलेल्या काही मुलांना घेऊन एक गाईड आला होता. मुले कोरॅकल सफारीला गेली आणि आमच्या गप्पा सुरू झाल्या. माणूस मोठा गप्पिष्ट आणि बोलघेवडा होता. अनेक वर्षे स्वतंत्रपणे गाईड म्हणून काम केल्यावर आता तो ह्या पंचतारांकित हॉटेलशी संलग्न झाला होता. मागच्या ३/४ वर्षांपर्यंत लोक हंपी गावात विरुपाक्ष मंदिराशेजारी कसे रहात होते, मग शासनाने त्यांचे पुनर्वसन कसे केले, त्यामध्ये इथल्या स्थानिक आमदाराने कसे सहकार्य केले, अनेक वर्षांपासून हंपीत कसे बदल होते गेले, हंपीत सगळ्यात जास्त लोक महाराष्ट्रातून येतात आणि आपल्यापैकी अनेक गाईडांना देखील मराठी कसे येते, हंपीत काही वर्षांत पूर्णपणे वाहनबंदी कशी होईल आणि मग हंपी फिरण्याचा फक्त चालणे हा एकच मार्ग कसा राहील अशा अनेक गोष्टी त्याने आम्हाला सांगितल्या. आम्हीही आमचे काही प्रश्न त्याला विचारून घेतले.

हंपीतला आजचा आमचा शेवटचा दिवस. राहून राहून उदास व्हायला होत होतं. असं वाटत होतं की इथेच रहावं - रोज दिवसभर मंदिरं पहावीत आणि संध्याकाळी ह्या घाटावर येऊन बसावं. पण मग असंही वाटलं की हे सगळं म्हणायला ठीक आहे, १० दिवसात इथे रहायचा आपल्याला कंटाळा येणार नाही कशावरून?


अर्धा एक तास थांबून आम्ही निघालो. हॉटेलवर पोचलो. जेवलो आणि बॅगा वगैरे भरून गाडीत ठेवून टाकल्या. हंपीतली कुठलीकुठली ठिकाणे पाहिली आणि कुठलीकुठली पहायची राहिली ह्या यादीवरून परत एकदा नजर फिरवली. ‘भोजनशाळा’ पहायची राहिली होती आणि फारशी दूरही नव्हती. तेव्हा उद्या सकाळी ती पाहून पुण्याला सटकावे असे ठरले.

१० ऑगस्ट

उठलो आणि सगळं आवरून नाश्त्याला पोहोचलो. आजही गर्दी तशी कमीच होती. पटापट नाश्ता उरकला आणि भोजनशाळा पहायला निघालो. भोजनशाळा रस्त्याला अगदी लागूनच आहे. भोजनशाळा म्हणजे एका जलवाहिनीच्या दोन्ही बाजूंच्या दगडांत कोरलेल्या असंख्य थाळ्या.

मधल्या जलवाहिनीचे प्रयोजन मला कळले नाही. (जेवून झाल्यावर ताटे त्वरित साफ करण्यासाठी पाण्य़ाची सोय म्हणून?) ही बहुधा सैनिकांच्या जेवणाची सोय असावी. राजाने दिलेल्या खास मेजवान्या इथे पार पडत नसाव्यात.

भोजनशाळेशेजारीच एक भलामोठा तलाव आहे.


भोजनशाळा पाहून आम्ही थेट पुण्याचा रस्ता पकडला. वाटेत काही विशेष घडले नाही. सोलापूरच्या अलीकडे एका हॉटेलात दुधातली शेवभाजी खाल्ली - छान होती. आजकाल पुण्यात शिरताना आधीचा १०/१२ तासांचा प्रवास जेवढा थकवत नाही तेवढा शेवटचा एका तासाचा प्रवास थकवतो. इथेही हेच घडले. शेवटी रात्री १० वाजता आम्ही घरी पोहोचलो आणि एका अतिशय सुंदर सहलीची सांगता झाली.

प्रतिक्रिया

सुरिया's picture

8 May 2022 - 6:27 pm | सुरिया

लक्ष्मी नरसिंहाच्या मुर्तीस ती आडवी पट्टी उगीच लावली नाही पुरातत्व खात्याने. आपण दिलेल्या लिंकमधे नीट पाहा. नरसिंहाचे मुर्तीचे मांडीपासुन पाय फोडलेले आहेत. आणि मूळ मुर्तीत तो पट्ट तसा असावाच.
ln
अय्यप्पन स्वामीची चित्रे पहा.
as
त्या आसनात तो पट्ट तसाच असतो. खात्याने त्याबर हुकुम पाय आणि तो पट्ट पुन्हा बनवुन जोडलेले आहेत.
बाकी फोटो सुंदर आले आहेत

सहमत.
योगपट्ट म्हणतात त्याला.

१) डमरू. हा लाकडी डमरू एका गुडघ्याखाली ठेवायचा असतो. मांडी घातल्यावर वरच्या पायाचा गुडघा.
२) एक इंग्रजी वाई आकाराची दांडी साधुंकडे असते. त्या आधाराने हात ठेवून जपमाळ ओढायची.

एक_वात्रट's picture

13 May 2022 - 6:45 pm | एक_वात्रट

तुमच्यामुळे आज काही नविन माहिती मिळाली.

मी आजपर्यंत ती आडवी पट्टी फक्त आधारासाठी लावली आहे ह्या भ्रमात होतो. आपल्या टिप्पणीमुळे आणि आपण जोडलेल्या छायाचित्रांमुळे ती आडवी पट्टी मूळ मुर्तीचाच एक भाग होती हे स्पष्ट होते आहे. चूक दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद!

चांगली झाली मालिका.
वाइड अँगलचे फोटो तिरपे येतात. बाकी स्पष्ट आणि छान.

अनिंद्य's picture

9 May 2022 - 10:35 am | अनिंद्य

लेखमाला छान.
आता हंपी या हिवाळ्यात नक्की.
योगपट्टाच्या फोटो आणि माहितीसाठी आभार.

एक_वात्रट's picture

13 May 2022 - 6:46 pm | एक_वात्रट

प्रतिसाद देणा-या सगळ्यांना धन्यवाद!

अर्धवटराव's picture

13 May 2022 - 8:57 pm | अर्धवटराव

त्या खरच विठ्ठल मूर्ती कोरल्या आहेत का? जिथे समचरण आहेत तिथे हात कटीवर नसुन हातात काहितरी धरलय, आणि कटीवर हात आहेत तिथे समचरण नाहित.

मुक्त विहारि's picture

15 May 2022 - 8:07 pm | मुक्त विहारि

वाखूसा

गोरगावलेकर's picture

16 May 2022 - 9:14 am | गोरगावलेकर

हा भाग व संपूर्ण लेखमाला छानच. फोटोही सुंदर.
प्रतिसादांमधूनही नवीन माहिती मिळाली.

चौथा कोनाडा's picture

16 May 2022 - 6:00 pm | चौथा कोनाडा

अप्रतिम प्रचि आणि समर्पक माहिती.
बोले तो एक s दम झकास !
हम्पीला जाण्याआधी संदर्भायसाठीचा उत्तम धागा.

कृपया याच्या आधीच्या भागाचे लिंक्स द्यावे.

इरसाल's picture

17 May 2022 - 4:44 pm | इरसाल

मधल्या जलवाहिनीचे प्रयोजन मला कळले नाही.
ती जलवाहिनी नसावी. दोन्ही बाजुच्या पंगतीला वाढण्यासाठी वाढप्यांना वाढत वाढत चालण्यासाठी असलेली जागा असु शकेल.(पंगतीच्या मागच्या बाजुने वाढणे शक्य दिसत नाही)