✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

चीनचा विस्तार

प
पराग१२२६३ यांनी
Tue, 04/12/2022 - 14:33  ·  लेख
लेख
दक्षिण प्रशांत महासागरातील सोलोमॉन द्विपेनं (Solomon Islands) अलीकडेच चीनबरोबर एक सुरक्षाविषयक करार केला आहे. या कराराचा तपशील फुटल्यावर वाढलेल्या चिंतेमुळे वॉशिंग्टन, कॅनबेरा, वेलिंग्टनहून वेगाने हालचाली होऊ लागल्या आहेत. त्यामुळे अमेरिकेने आपल्या आशियाविषयक अधिकाऱ्यांना तिकडे पाठवले आहे. काही महिन्यांपूर्वीच झालेल्या ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, अमेरिका (AUKUS) संधीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या नव्या हालचाली आहेत. करारातून चीन प्रशांत महासागरात आपल्या प्रभावाचा विस्तार करत आहे. सोलोमॉन द्विपे आणि चीन यांच्यातील सुरक्षा करारानंतर जाग आल्यावर अमेरिकेने त्या देशातील आपला राजदुतावास पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सोलोमॉन द्वीपाची राजधानी होनिआरातील आपला दुतावास अमेरिकेने 1993 मध्ये बंद केला होता. मात्र आता दक्षिण प्रशांत क्षेत्रातील अमेरिकेचा प्रभाव वाढवण्यासाठी तो राजदुतावास पुन्हा सुरू केला जात आहे. 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाने बो जाहीरनाम्यात (Boe Declaration) प्रवेश केला. हवामान बदल हा प्रशांत महासागरीय बेटांवरील जनजीवन, सुरक्षेसमोरील सर्वात मोठा धोका असल्याचे आणि त्याविरोधात एकत्रित कार्य करण्याचे या जाहीरनाम्यात म्हटले गेले आहे. पण ऑस्ट्रेलिया हवामान बदलाच्या विरोधात फारसे प्रयत्न करताना दिसत नाही आहे, असे या क्षेत्रातील द्विपीय देशांचे मत झाले आहे. तसेच सोलोमॉन द्विपेच्या मते, नोव्हेंबर 2021 मध्ये देशात झालेल्या हिंसक उठावाच्या पार्श्वभूमीवर असा एखादा करार करण्याची आवश्यकता होती. कारण अशा घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुरेशी संसाधने त्या देशाकडे नाहीत. सोलोमॉन द्वीपेबरोबर झालेल्या सुरक्षाविषयक करारामुळे ऑस्ट्रेलियासह न्यूझीलंड आणि अमेरिका यांच्या हितांवरही परिणाम होणार आहे. अशा वेळी प्रशांत महासागरातून चालणारी व्यापारी वाहतूक सुरक्षित आणि विनाअडथळा व्हावी यासाठी चीन, अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि युरोपीय देश यांच्यासह या क्षेत्राबाहेरील देशांसाठीही आवश्यक ठरत आहे. ओबामा प्रशासनाने प्रशांत महासागरीय क्षेत्रातील अमेरिकेचे वर्चस्व अबाधित ठेवण्याच्या आणि चीनच्या वाढत्या शक्तीला आवर घालण्याच्या हेतूने Pivot to Asia हे धोरण स्वीकारले होते. त्यानुसार अमेरिकेच्या नौदल आणि हवाईदलाच्या ताफ्यापैकी 60 टक्के संसाधने प्रशांत महासागरीय क्षेत्रात तैनात केली गेली आहेत. त्याचा आपल्या प्रशांत महासागरीय हितसंबंधांवर होणारा विपरीत परिणाम पाहून चीननेही या क्षेत्रात नवनवे देश आपल्या प्रभावाखाली आणण्यास सुरुवात केली आहे. सोलोमॉन द्विपे हे त्याचे एक ताजे उदाहरण आहे. सोलोमॉन द्पिपे हा ओशेनिया खंडात येतो. प्रशांत महासागरात वसलेला 6 लहान आणि सुमारे 900 छोट्या-छोट्या बेटांचा हा देश आहे. या सगळ्या बेटांचे एकत्रित क्षेत्रफळ फक्त 28,400 चौरस किलोमीटर असले तरी त्याच्या विशेष आर्थिक क्षेत्राचे (Exclusive Economic Zone) क्षेत्रफळ तब्बल 15,89,477 चौरस किलोमीटर आहे. या सगळ्या क्षेत्रफळाचा एकत्रित विचार केला, तर ते भारताच्या क्षेत्रफळाच्या जवळजवळ निम्मे होते. या बेटांची मालकी 1886 ते 1893 दरम्यान जर्मनी, फ्रांस आणि मग ब्रिटनकडे आली. 1893 पासून 1978 पर्यंत ब्रिटन सोलोमॉन बेटांचा संरक्षक (Protectorate) बनला. भारताचे प्रशांत द्विपीय देशांशी संबंध भारताने शाश्वत विकास उद्दिष्टे (Sustainable Development Goals) साध्य करण्यासाठी त्या देशांना सर्वतोपरी मदत करण्याचे जाहीर केले आहे. हवामान बदलाच्या मुद्द्यावर प्रशांत महासागरातील द्विपीय देशांना पूर्ण सहकार्य करण्याचे भारताने मान्य केलेले आहे. त्यासाठी भारत त्या देशांना अपारंपारिक ऊर्जा क्षेत्राच्या विकासासाठी मदत करणार आहे. भारताच्या पुढाकाराने सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये (International Solar Alliance) प्रशांत महासागरातील द्विपीय देश सहभागी झाले आहेत. भारताच्या अंतराळ कार्यक्रमातही या देशांची मदत होत आहे. भारताने तेथील देशांमध्ये शाश्वत किनारी आणि महासागरीय संशोधन संस्था आणि सागरी जीवशास्त्र संशोधन केंद्र उभारली आहेत. भारत आणि प्रशांत महासागरीय द्विपीय देशांमधील वाढत्या सहकार्याच्या पार्श्वभूमीवर सोलोमॉन द्विपेच्या चीनबरोबरील सुरक्षा सहकार्याच्या करारामुळे भारताचीही चिंता वाढणे स्वाभाविक आहे. लिंक https://avateebhavatee.blogspot.com/2022/04/blog-post_12.html
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
1660 वाचन

💬 प्रतिसाद (1)

प्रतिक्रिया

चीनी नौदलाचा तळ चालवण्यासानी?

निनाद
Wed, 04/13/2022 - 07:35 नवीन
सोलोमॉन बेटाचे पंतप्रधान सोगावरे यांनी तैवानशी असलेली ३६ वर्षांची मैत्री अचानकपणे एका रात्रीत कोणतीही सल्लामसलत न करता, चीनकडे बदलली आहे. यामुळे यात अनेक प्रकारची देवाणघेवाण झाली असेल का हा प्रश्न तयार होतो. त्यात पोलिस प्रशिक्षणाच्या उद्देशाने सोलोमन बेटांवर उच्च-शक्तीच्या शस्त्रांच्या गुप्त चीनी शिपमेंट बाबत उघडपणे बोलले जाऊ लागले आहे. सोलोमॉन द्विपांनीचीनबरोबर सुरक्षाविषयक करार केला पण त्याला चीन मात्र हा करार नौदलाचा तळ चालवण्यासाठी नाही असे म्हणतो. अर्थात हा दावा हास्यास्पद आहे. कारण या आधी असाच करार चीन ने जिबुतीसाठी केला आहे. आणि या कराराचे काय झाले ते पाहण्यासारखे आहे.
  • हा करार करतांना चीनसाठी लष्करी बंदर सुविधांबद्दल बोलून द्विपक्षीय सुरक्षा कराराच्या मसुद्यावर स्वाक्षरी करण्यात आली होती.
  • चीन आणि जिबूती एका लॉजिस्टिक केंद्राबद्दल चर्चा करत आहेत असे चीन म्हणत असे.
  • चीनी जहाजांवरील कर्मचार्‍यांना चांगली विश्रांती आणि भरपाई मिळावी यासाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे.
२०१७ मध्ये जेव्हा ही सुविधा पूर्ण झाली आणि वापरात आली तेव्हा आंतरराष्ट्रीय आणि अगदी काही चिनी माध्यमांनी चीनचा पहिला परदेशी नौदल तळ म्हणून उल्लेख केला आहे. म्हनजे अधिकृतपणे लॉजिस्टिक सुविधा म्हणून वर्णन केले पण प्रत्यक्षात जिबूतीमध्ये चिनी नौदल तळ बांधला गेला आहे. जागतिक वाहतुकीमध्ये जिबुतीचे महत्त्व फार मोठे आहे. तेथे थेट लष्करी तळ बांधणे म्हणजे जगावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न मानला जातो. आता हेच सोलोमॉन द्विपांमध्ये ही होणार असे दिसते आहे. मुख्य म्हणजे चीन या करारांतर्गत ज्या सुरक्षा कर्मचारी पाठवणार आहे. आता याला अजून इतर पदर आहेत. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला आशिया आणि पॅसिफिकला जोडणाऱ्या प्रमुख शिपिंग लेनमध्ये सोलोमन बेटे आहेत. या मोक्याच्या जागेवर चीनचा डोळा आहे. ऑस्ट्रेलिया आणि सोलोमन्स यांचे पूर्वापार संबंध आहेत. ऑस्ट्रेलियाने सोलोमन्सला दिलेल्या गार्डियन-क्लास गस्ती नौकांसाठी ते इथे तळ बांधत आहेत. म्हणजे एकाच देशात दोन विरोधी शक्ती येणार आहेत. याशिवाय PNG आणि न्यूझीलंड पोलीस संरक्षण दले येथे कार्यरत आहेत. सोलोमन बेटांमधील चिनी लष्करी तळामुळे ऑस्ट्रेलियाला या प्रदेशात आपली लष्करी तैनाती लक्षणीयरीत्या वाढवण्यास प्रवृत्त करेल कारण बेटे ऑस्ट्रेलियाच्या अगदी जवळ आहेत. न्यू कॅलेडोनिया, वानुआतु आणि फिजी आणि सोलोमन बेटांच्या जवळचा हा शेजारी प्रदेश आहे. त्यामुळे हा प्रदेश आता जागतिक राजकरणात ठळकपणे पुढे आला आहे. अर्थात याला अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांची पैश्याकडे पाहण्याची वृत्ती कारणीभूत आहेतच. उदा. येथे बेटे असल्याने प्रामुख्याने शॉर्ट वेव रेडियो चालतो. पण ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडने ही आपली बातम्या आणि हवामानाचे अहवाल देणारी सेवाच बंद करून टाकली. येथील अनेक गरीब लोकांसाठी ही सेवा महत्त्वाची होती. कारण तेथे शॉर्ट वेव रेडियो सहजतेने आणि फुकटात पोहोचतो. आणि ही शॉर्ट वेव रेडियो सेवा बंद झाल्याझाल्या चीन ने त्याच फ्रिक्वेंसीवर आपल्या सेवा चालू केल्या!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा