क्यूं ना निकले घरसे दिल..?

गवि's picture
गवि in प्रश्नोत्तरे
1 Apr 2022 - 4:24 pm

गेल्या महिन्यात अनेक मोठ्या कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम आवरते घेऊन कर्मचारी वर्गाला ऑफिसात पुन्हा तन,मन,लस वगैरे असं सर्व एकत्रित घेऊन रुजू होण्याचे आदेश दिले. अनेकांना पुन्हा एकदा अक्षरश: लहानपणीच्या उन्हाळी सुट्टया संपून रेनकोटच्या आत दप्तर लपवत शाळेत जाण्याचा फील आला. काहींना, विशेषत: महिलांना ते बरंही वाटलं. घरी होत्या तेव्हा डबल काम पडत होतं.

"घरीच आहेस तर गरमागरम पोळ्या तरी ऐनवेळी करुन वाढ."
"एकीकडे पोरांचा अभ्यास पण घे."
"मम्मा, क्लासचं कनेक्शन सारखं ब्रेक होतंय, बघ गं जरा..रिचार्ज कर पटकन".. इत्यादि.

स्वत: ऑफिसात पोचून काम करणं सुटसुटीत, आणि ज्या गृहिणी होत्या त्यांनाही त्यांचे कपाळीचे "प्राक्तन" किमान आठ नऊ तास तरी घराबाहेर पडल्याने थोडी दुपारची उसंत मिळाली.

काही जणांबाबत वेगळं झालं. सतत डोक्याशी डोकी असल्याने एकमेकांच्या सोबतीतली गोडी गेली होती. एकमेकांच्या कंपन्यांमधले सगळे जार्गन्स, शॉर्टफॉर्म्स, टीम स्ट्रक्चर, टारगेटस इतकंच नव्हे तर एकमेकांच्या कंपन्यांचा पुरता वार्षिक ताळेबंद एकमेकांना कळला होता. पतींनी पत्नींसमोर हग्या दम खाल्ला आणि पत्नीला कोणी स्टिंकर टाकला म्हणून पतींचे बाहू फुरफुरले होते.

त्यांना ऑफिसात परत जाण्याच्या कल्पनेने जरा हायसंच वाटलं असू शकेल.

काहींना ऑफिसात फिजिकली जाण्यापूर्वी कम्फर्ट झोन पूर्ण मोडल्यागत अगदी खूप अस्वस्थता आली, पण दोन चार दिवस प्रत्यक्ष गेल्यावर चहापाणी, बिडीकाडी, गॉसिप, इतर देखणी दृष्ये, आवडीच्या महिला अथवा पुरुषासोबत कॉफी मशीनजवळ माफक काव्यशास्त्रविनोद.. अशा अनेक गोष्टी पुन्हा जमून आल्या आणि ते ऑफिसात समाधान पावले.. चक्क एन्जॉय करायला लागले. उत्साह आला. इ इ .

तरीही एका सर्व्हेनुसार (नाही. कोण्या दूरदेशीच्या टेक्सास विद्यापिठाने वगैरे केलेला सर्व्हे अथवा संशोधने पूर्वी फेमस होती, काहीही ठोकून देण्यासाठी.. तसला नव्हे)..दर दहा पैकी सहा, म्हणजे साठ टक्के लोक वर्क फ्रॉम होम सोडून ऑफिसात जायला तीव्र नाखूश आहेत. इतके की बळेच ऑफिसात यायला लावल्यास ते नोकरी त्यागणं पसंत करतील. आणि तितकेच लोक अन्य सिनारियोत अधिक पगार किंवा वरिष्ठ पद सोडून द्यायला तयार होतील. केवळ घरी राहायला मिळावे म्हणून .

सर्वेक्षणाबद्दल कुठेही लिंका मिळतील.
एक लिंक इथे आहे

तुम्ही कोणत्या प्रकारात मोडताय? तुमचा सदरा कोणत्या सदरात पडतोय? (बाय द वे, घरुन काम करताना किमान सदरा घालून बसावेच लागते हो...)

ज्या लोकांना वर्क फ्रॉम होम ही सोय उपलब्ध होऊ शकली.. म्हणजे जे त्या प्रकारच्या जॉबमधे असलेले सुदैवी जीव आहेत त्यांच्यासाठी हे अधिक प्रस्तुत ठरेल. ज्यांचे जॉब्स "वर्क फ्रॉम होम"साठी सुटेबल नाहीत त्यांनी मोठाच कार्यभाग तोलला. त्यांचे आभार आहेतच. त्यांना व.फ्रॉ.हो.वाल्यांबद्दल काय वाटले? हेवा वगैरे वाटला का? इथे प्रतिसादात व्यक्त झाल्यास आजन्म उतराई.

तळटीप: ऑफिसची ब्यान्डविड्थ वापरुन लेखन आणि प्रतिसादन करण्यात कित्ती कित्ती सुख आहे.. तर ते एक असो.

ऑफिस

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

1 Apr 2022 - 4:35 pm | कुमार१

चांगल्या चर्चेच्या प्रतिक्षेत !

श्वेता व्यास's picture

1 Apr 2022 - 5:00 pm | श्वेता व्यास

अस्मादिक वर्क फ्रॉम होम सोडून ऑफिसात जायला तीव्र नाखूश. हापिस खूप लांब आहे, रोजच्या लांबच्या प्रवासाची सवय गेली आता.

कर्नलतपस्वी's picture

1 Apr 2022 - 5:11 pm | कर्नलतपस्वी

आमच्या सारख्या सेवानिवृत्तांना घरच्या आंतरजालावर विना व्यत्यय ओ टी टी बघण्याचा आनंद.बिना "मेरी गो राऊंड" सिनेमा बघावयास मीळतील.

प्रथमदर्शनी प्रतिसाद, सविस्तर नंतर

कर्नलतपस्वी's picture

1 Apr 2022 - 5:23 pm | कर्नलतपस्वी

आख्खी ब्यान्डविड्थ आय टी तल्या मुलाबाळांनी, शाळेतल्या बाईंनी,उरली सुरली आजीच्या मधुराज किचन नी खाल्ली आणी आजोबांच्या वाट्यास डोक्यावरच टक्कल आणी मोबाईल वरच चक्कर......
Loading.....Loading.......

काय हो हे कर्नलसाहेब..

हसून हसून खपल्या गेले आहे. :-))

तर्कवादी's picture

1 Apr 2022 - 5:13 pm | तर्कवादी

मला ऑफिसला जायला आवडेल पण आमचे अजून वर्क फ्रॉम होम चालू आहे.
माझी पत्नी साधारण गेले ८-९ महिन्यांपासून नियमितपणे ऑफिसला जात आहे. त्यामुळे दिवसभर मी घरी एकटाच असतो. या रुटीनची आता सवय लागली आहे तरी ऑफिसला जायला आवडेल

वामन देशमुख's picture

1 Apr 2022 - 5:14 pm | वामन देशमुख

मातं उद्योगात काम करत असताना १६ मार्च २०२० पासून घरून काम करणं सुरु झालं. लवकरच त्यात पूर्णपणे रूळलो आणि "यापुढे पैसे कमावण्यासाठी घराबाहेर पडायचे नाही, पैसे खर्च करण्यासाठीच काहीवेळा घराबाहेर पडायचे." असं ठरवून टाकलं. गरज पडली तर उद्योग क्षेत्र बदलेन पण हा निश्चय बदलणार नाही असंही ठरवून टाकलं. श्रीकृपेने माझे क्लायंट्स माझ्याशी सहमत आहेत. म्हणून किमान २०२५ पर्यंत तरी मला WfH सोडण्याची गरज नाही; पुढचं पुढे बघू.

माझ्या मते ज्यांचे काम कॉम्प्युटरवरून चालते अश्या सर्व लोकांनी घरूनच काम करावे; त्यांच्या कंपन्यांनी त्यांना तसे करू द्यावे.

घरून काम करण्याचे फायदे -

  1. ऑफिसला प्रवास करून जाण्याचे आयुष्यातले दरमहा २० ते ६० तास वाचतात. (ही सर्वात मोठी जमेची बाजू आहे.)
  2. प्रवासाचे दरमहा पाच-दहा हजार रुपये वाचतात.
  3. कपडे, पादत्राणे, इतर accessories (मराठी?) इ वरचा खर्च वाचतो.
  4. इतर अनुषांगिक खर्च वाचतात. (वाहनांची झीज वगैरे)
  5. प्रवासाचा शिणवटा येत नाही.
  6. प्रदूषणापासून संरक्षण होते.
  7. गरम ताजे अन्न खाता येते.
  8. याशिवाय इतरही अनेक फायदे आहेत; (ते मिपाकर्स सांगतीलच!)

घरून काम करण्याचे तोटेही आहेत. ऑफिसातून काम करण्याचेही फायदे-तोटे आहेत.

मला घरून काम आवडते; मी ते करतो.

#Life'sFunWithWfH 😊

फायदे तोटे यांच्याशी बाडिस.

माझ्या मते ज्यांचे काम कॉम्प्युटरवरून चालते अश्या सर्व लोकांनी घरूनच काम करावे; त्यांच्या कंपन्यांनी त्यांना तसे करू द्यावे.

आमेन..

आपल्या ओठी साखर पडो, इच्छेनुसार त्रैलोक्यसुंदरीचे चुंबनही लाभो..

करोना सुरु झाल्या पासुन घरुनच काम करत आहे. घरुन काम करणे आवडते कारण भयंकर त्रास दायक प्रवास टाळायची तीव्र इच्छा.
घरुन काम करायचे फायदे :-
ट्रॅफिक आणि प्रदुषण युक्त प्रवास करावा लागत नाही.
प्रवास आणि त्याने होणारी शारिरिक दगदग आणि मानसिक त्रागा होत नाही.
इंधन आणि पर्यायाने पैशाची बचत.

घरुन काम करायचे तोटे:-

अधिकचे काम.
क्लायंटला या संपूर्ण काळात कळले आहे की काम करणारा व्यक्ती कुठे जाणार आहे ? तेव्हा कधीही फोन करुन [ विशेषतः कार्यालयाची वेळ संपुन गेल्यावर ] काम सांगणे.
विजेचे वाढीव बील्,हापिसातला सेंट्रलाइझ एसीच गारवा घरी नाही.
घरकोंबडा फिलिंग !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chandra Official Song... :- Chandramukhi

ऑफीसमधे परत जाण्यासाठी माझी असहमती.
घरुन चांगले आणि जास्त काम होत आहे. पुण्यात ऑफीसमधे येणे \ जाणे म्हणजे नको होते. काही वर्षांपुर्वी असाच कोणता तरी सर्व्हे पाहिला होता. भारतीय लोकांची प्रोडक्टीव्हिटी या वैतागवाण्या प्रवासामुळे कमी होते असे काहीसे निष्कर्श होते.
शहरांची बेसुमार झालेली वाढ आणि बिल्डर लॉबीला पण यामुळे लगाम बसेल.
घरी काम करुन माझी तरी मनस्थिती ऑफिसपेक्षा चांगली राहते. माहीती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांनी तरी वर्क फ्रॉम होम दिले पाहिजे. टीम बिल्डिंग, स्प्रिंट / रिलीज प्लॅनिंग वगैरे साठी टिमला ऑफिसमधे बोलवावे. आता घरुन काम करणारे आणि बाहेरच्या राज्यात किंवा लांबच्या शहरात राहणारे बरेच ज्युनिअर, मिड लेव्हल एक्स्पिरीयनसचे लोक ऑफीस चालू झाले तर रिझाईन मारायच्या तयारीत आहेत. ऑन अदर साईड छोट्या गावातून, खेड्यातून पुण्यासारख्या शहरात आलेल्या काही लोकांना मात्र हायब्रीड मॉडेल पाहिजे. २,३ दिवस ऑफिस, २,३ दिवस घर. कारण पुण्यात हॉटेलिंग, ट्रेकिंग, मॉल, मुव्हिज वगैरे चंगळ करता येते. मात्र मायक्रो मॅनेज करणारे, फक्त पीपल मॅनेजमेंट करणारे लोक मात्र फुल्ल टाईम ऑफिस पाहिजे असेच म्हणतायत. मॅनेजमेंट मीटींगमधे वर्क फ्रॉम होममुळे टीमची प्रोडक्टीव्हीटी कमी झाली आहे वगैरे सांगत आहेत.
थोडक्यात म्हणजे सगळ्या प्रकारचे लोक आहेत. कंपनीने पण काही महिन्यांपूर्वी याबद्दल सर्व्हे घेतला होता पण त्याचा रिझल्ट मात्र शेअर केला नाही.

गवि's picture

4 Apr 2022 - 1:05 pm | गवि

मबा, सौन्दाळा,

प्रवास हीच मुख्य गले में अटकनेवाली हड्डी आहे. लोकांना गोळा करुन हापिसला आणणे असे कठीण होऊन बसले आहे की ज्याचे नाव ते. खुद्द wfh पक्षाला पाठिंबा असला तरी एच्चार पॉलिसी पाळावी लागते म्यानेजर लोक्सना.

घरकोंबडा फीलिंग हा एक वेगळा मानसिक विषय आहे. तो खरा आहे. आळस अधिक वाढणे आणि मानसिक मान्द्य येणे हेही होते फार काळ घरातून काम केल्यास.

चावटमेला's picture

1 Apr 2022 - 8:06 pm | चावटमेला

मात्र मायक्रो मॅनेज करणारे, फक्त पीपल मॅनेजमेंट करणारे लोक मात्र फुल्ल टाईम ऑफिस पाहिजे असेच म्हणतायत. मॅनेजमेंट मीटींगमधे वर्क फ्रॉम होममुळे टीमची प्रोडक्टीव्हीटी कमी झाली आहे वगैरे सांगत आहेत.

+७८६, हे मात्र एकदम खरं. चपखल निरीक्षण

तुषार काळभोर's picture

1 Apr 2022 - 9:59 pm | तुषार काळभोर

दोन वर्षे झाली की पहिल्या लॉकडाउनला!! दीड-पावणे दोन महिने रोज एक दीड तास आयटीच्या मीटिंग्ज करणं, आपापल्या घरी/गावी गेलेल्या लोकांच्या अडचणी सोडवणं असे गेले. पण उत्पादन क्षेत्रात घरून करून करून असं काय काम करणार?
सहा मेला पुण्यात असलेले झाडून सगळे लोक हापिसात हजर. उत्पादनावर मर्यादा असल्याने (अशीही देशात लॉकडाउनमुळे मागणी नव्हतीच) एकच शिफ्ट सुरू होती. हळू हळू दुसरी शिफ्ट आणि दिवाळीच्या आसपास फुल्ल उत्पादन सुरू झालं. शक्य तेवढ्या लोकांनी घरून काम करावं अशा सुचना असूनही बहुतेक लोक येतच होते. मग २०२१ च्या फेब्रुवारीत एकावेळी १००+ जण पॉझिटीव्ह सापडल्यावर प्रत्येक लॅपटॉप धारकाने सक्तीने दोन तृतियांश अन डेस्कटॉपधारकाने एक तृतियांश घरी राहिलेच पाहिजे, ऑफिसात ५०%हून अधिक हजेरी नको, असे नियम बनवले गेले. तरी ६०-७०% लोक येतच होते. घरून काम कोणालाच नको होतं. अगदी ज्यांचा उत्पादनाशी थेट संबंध नाही अशा सेल्स अन फायनान्सच्या लोकांनाही घरून काम नकोच होतं. नोव्हेंबरपासून वर्क फ्रॉम होम प्रकार संपला अन सगळं सामान्यपणे सुरू झालं.
घरून काम नको असण्याची ढोबळ कारणे अशी होती:
१. निम्म्याहून अधिक लोकांकडे घरी इंटरनेटची जोडणी नव्हती. त्यातील अर्ध्यांकडे अजूनही नाही. त्यांना कंपनीकडून ४जी डेटाकार्ड हवं आहे. आणि आम्ही (आयटी विभाग) ते देणं बंद केलंय.
१-अ. इंटरनेट जोडणी नसण्याची कारणे : विनाकारण खर्च आहे, कंपनीच्या कामासाठी मी वैयक्तिक खर्च का करू, मुलांवर परिणाम होतो, इंटरनेट ही वाईट गोष्ट आहे, इंटरनेट म्हणजे फालतूपणा. घरी इंटरनेट जोडणी उपलब्ध नाही (म्हणजे कोणताही सेवा पुरवठादार तिथे जोडणी देत नाही), असं कोणाचंही नाही!
२. उत्पादन क्षेत्र आहे, त्यामुळे बहुतेक विभागांची कामे प्रत्यक्ष हजर राहूनच होतात.
३. बहुतेक लोक केवळ गरज म्हणून कॉम्प्युटर वापरतात. त्यांना ती असून अडचण, नसून खोळंबा वाटते. बहुतेक लोकांची कॉम्प्युटर वापरण्याची कौशल्ये मर्यादित आहेत. (२००५ सालचं मनपा/महावितरण इत्यादी सरकारी कार्यालयातील चित्र डोळ्यांसमोर आणा). त्यामुळे ऑनलाईन काम करणं, कॉल्स अटेंड करणं, हे बहुतेकांना त्रासदायक वाटतं.
४. वरील काही प्रतिसादात आलेली मातं क्षेत्रातील ऑफिसात जाण्याची कारणे : जसे चहापाणी, बिडीकाडी, गॉसिप, इतर देखणी दृष्ये, आवडीच्या महिला अथवा पुरुषासोबत कॉफी मशीनजवळ माफक काव्यशास्त्रविनोद अशी उत्पादन क्षेत्रात गैरलागू आहेत :)
५. वरील काही प्रतिसादात आलेले मातं क्षेत्रातील घरून काम करण्याचे फायदे : प्रवासाचा शीणवटा, गरम जेवण, प्रदूषण, कपडे : उत्पादन क्षेत्रात गैरलागू आहेत :)
तळटीप : आमची कंपनी भोसरी एमायडीशीत नाही. फ्रेंच एमेन्सी आहे ;)
अजून तळातली टीप : वरील अनुभव अपवादात्मक नाही. उत्पादन क्षेत्रात असंच असतं.

ताजा कलमः
तरीही माझ्या वैयक्तिक सर्व्हेनुसार (नाही. कोण्या काचेच्या इमारतीत काम करणा-या वगैरे लोकांचा केलेला सर्व्हे अथवा संशोधने पूर्वी फेमस होती, .... तसला नव्हे)..दर दहा पैकी सहा, म्हणजे साठ टक्के लोक ऑफिसात जाणं सोडून वर्क फ्रॉम होम करायला तीव्र नाखूश आहेत. इतके की बळेच वर्क फ्रॉम होम करायला लावल्यास ते नोकरी त्यागणं पसंत करतील. आणि तितकेच लोक अन्य सिनारियोत अधिक पगार किंवा वरिष्ठ पद सोडून द्यायला तयार होतील. केवळ कंपनीत जायला मिळावे म्हणून .

गवि's picture

1 Apr 2022 - 10:04 pm | गवि

रोचक..

सुरिया's picture

1 Apr 2022 - 11:05 pm | सुरिया

अपनेको क्या फरकच गिरा वो बतातू.
पैलेसेच मतलब कोरोणा बोरोणा से पेलेसेच अपणा मकाणसे काम चालू था. हमारी वो जो है वो फिरंगी कंपणी के वास्ते हफ्ते का ५ दीन जाती थी कामकू. अभी वो जाती ९ बजे. तबसे अपणाच हुकूमत. कौन पुछने वालाच नई. की क्या करता बावा. घंटा भर काम करके गाय छाप निकाल ली. एक मस्त बार भऱ्या तो फिर घंटा भर अच्छा काम चलता.
जबसे ये माटमिला कोरोना आया. बेगम बैठी बेडरूम मे लॅपटॉप लेको. उसका नाक बोले तो पूछो मत यारो. डोबरम्यान क्या सुंघते उस्से तेज हमारी बेगम. बाल्कनी जाके होले होले गायचाप निकाली तो उस्को बू आती बावा. जरा नीचे जाकें पैरा मोकले करके आतू बोले तो हजार शके खाती. किधर जाना, कायकू जाना, साथामेच आती, एक ना लाख लफडे. खुद की स्पेस नाम की चीज गुम गई यारा.
अब उपरवालेकी रहेम से हौर नीचेवालोकी हरकत के वजासे फिरसे आनेको बोले बेगम के हापिस वाले. पैले बोले तीनच दीन आव. अब पाच दीन आव बोलराईले.
थोडा पेट्रोल का जान दे. थोडा मेकप बिकप का जान दे. थोडा गंदगी रैन दे लेकीन स्पेस नामकी जो चीज है वो मिलरी.

बर्याच काळाने पोटभर मिरजी भाषा वाचून मजा आली.

ऑन सेकंड थॉट, मिरजी भाषेबद्दल चुभूद्याघ्या.

हैदराबादी किंवा दक्षिणी भागातली असू शकेल.

मिरजी तर अर्धी मराठीच असते. फल्ली में फुग्गा आया वगैरे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Apr 2022 - 6:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

.मैं अच्छी हूं घबराऊ नको ऎसा खत में लिखो ।
कोणी मेल्याने तुझको लिखा मैं निकली रोडापर
अगर तुझको शक है मुझपर नहीं निकलूंगी बाहर
मैं पानी को जाऊ क्या नको ऎसा खत में लिखो ।
(चोप्य पस्ते)

-दिलीप बिरुटे

Nitin Palkar's picture

4 Apr 2022 - 1:37 pm | Nitin Palkar

पडने कू मजा आया. क्या लिखा वो पढने के वासते फिर एक बार पढा..

सौन्दर्य's picture

8 Apr 2022 - 10:54 pm | सौन्दर्य

बोर हुआ तो बोरीयत निकलने के वास्ते फिर फिर आया और पढा और खूब हस्या.

प्रसाद गोडबोले's picture

3 Apr 2022 - 10:43 pm | प्रसाद गोडबोले

११ एप्रिल

११ एप्रिल ला अमचे ऑफिस सुरु होतेय . कधी एकदा ऑफिसात जातोय असं झालंय मला !!

२ वर्षं घरी बसुन कंटाळा आला. मुख्य म्हणजे घरात बसुन काम केल्यामुळे घरातील लोकांना आपल्या कामाची किंमत (वर्थ) कळत नाही हे खुप आधीच लक्षात आलेले, आता तर एकदम प्रकर्षाने जाणवत आहे हे . "बघितलं तर काय खाडखुड करत कीबोर्डच बडवत असता अन तासन तास हेडफोन गप्पा मारत बसत असता" ह्या वाक्याला प्रत्युत्तर नाही. आणि प्रत्युत्तर देऊ ही नये (तसेही वादविवादात जिंकण्याचे शक्यता ऑफिसात , घरात शुन्य .), त्यापेक्षा आपला वेळ आणि प्रत्यउत्तर द्यायला लागणारा ब्रेन स्पेस वापरुन ऑफिसात काम केले तर किमान २ ४ पैसे जास्त बोनस तरी मिळेल.

८ - १० तास ऑफिस , जायला १ तास यायला १ तास. असे १२ तास खर्चुन घरी आला की पटकन १ २ पेग मारायचे अन झोपी जायचं बस्स विषय संपला .

बाकी काम संपले तरी ऑफिसात खुप काही असते करण्या सारखे . टेबल टेनिस खेळणे , पूल स्नुकर खेळणे , कॅन्टीन मध्ये जाउन स्नॅक्स खात गप्पा टप्पा, , कधी कॉफी मशीन किंवा पॅन्ट्री एरियात दुसर्या टीम मधील लोकांशी नेटवर्किंग , किंवा कधी ऑफिस कॅम्पस बाहेर दुसर्‍या कंपनीतील कोणी सुबक ठेगंणी दिसली तर तिला कोल्ड अ‍ॅप्रोच करणे , मग तिच्या सोबत फ्लर्टिंग , कॉफी / ब्रेकफास्ट डेट्स , योग जुळुन आलाच तरी फेक सिक लिव्ह टाकुन "सेलिब्रेशन" वगैरे वगैरे... ,
ऑफिस संपल्या वर कलीग्स सोबत बीयर पीत एकॉनोमिक्स फिलॉसॉफीच्या गप्पा. (घरी अ‍ॅडम स्मिथ, केन्स, हायेक , फ्रेडरिक नीचा , माकियावेली , इन्व्हिजिबल हॅन्ड , वेल्थ ऑफ नेशन्स, एक्झेन्स्टेन्शियॅलिझम , रियालपॉलितिक वगैरे नावे काढली तर आपल्याला वेडाचा झटका असे समजुन अ‍ॅम्ब्युलन्स बोलावतील की काय अशी भीती वाटते.)

खुप काही करण्यासारखे असते ऑफिसात ! बास आता अजुन अनेक लाटा आल्या तरी येऊ दे पण ऑफिस सुरु होऊ दे देवा !!

मग तिच्या सोबत फ्लर्टिंग , कॉफी / ब्रेकफास्ट डेट्स , योग जुळुन आलाच तरी फेक सिक लिव्ह टाकुन "सेलिब्रेशन" वगैरे वगैरे... ,

ह्य ह्य ह्य.. वस्ताद आहात हां पठ्ठे मार्कसबापू.. काव्यशास्त्रविनोद म्हणतो तो हाच... ते सेलिब्रेशन वगैरेचा तपशील इकडे टाकणेबल असतो का?

प्रसाद गोडबोले's picture

4 Apr 2022 - 3:41 pm | प्रसाद गोडबोले

ते सेलिब्रेशन वगैरेचा तपशील इकडे टाकणेबल असतो का

>>> लिहितो कधी तरी वेळ काढुन. फुरसतमध्ये करायची लिहायची गोष्ट आहे ;)

चौथा कोनाडा's picture

4 Apr 2022 - 12:51 pm | चौथा कोनाडा

ऑफिसची ब्यान्डविड्थ वापरुन लेखन आणि प्रतिसादन करण्यात खुप खुप सुख मिळवलं त्याबद्दल .. हार्दिक अभिनंदन ! :-)

गवि's picture

4 Apr 2022 - 1:16 pm | गवि

खुप खुप सुख मिळवलं

खूप खूप वगैरे तुमची शब्दरचना कळसबिन्दूचा भास उत्पन्न करतेय. डॉ कुमारेक यांना चर्चा अपेक्षित होती ती हीच असेल का?

संदर्भ: पयला प्रतिसाद.

चौथा कोनाडा's picture

4 Apr 2022 - 1:18 pm | चौथा कोनाडा

कळसबिन्दू ..... डॉ कुमारेक ..... !!!
😄

Nitin Palkar's picture

4 Apr 2022 - 1:41 pm | Nitin Palkar

हा .... हा .... हा .... !

राजेंद्र मेहेंदळे's picture

4 Apr 2022 - 3:08 pm | राजेंद्र मेहेंदळे

व.फ्रॉ.हो. ला दोन वर्षे झाली ना भाऊ, प्रोजेक्ट बदलले ,लोक सोडुन गेले, नवे आले, प्रमोशने ,डिमोशने झाली पुलाखालुन बरेच पाणी वाहुन गेले. घरुन काम तर चालुच आहे, पण आता कमी उत्पादकता, घरकोंबडा फीलिंग वगैरे रोग मागे लागले आहेत. परंतु आपणच हाय खाल्ली तर टीमला काय समजवणार? म्हणुन गप्प बसलोय.

चांगली बाजु म्हणजे अ‍ॅट्रिशन जास्त असल्याने कंपनीत एम्प्लॉयी फ्रेन्डली वातावरण आहे, प्रोजेक्ट ठिकठाक चालु आहे त्यामुळे दिवस ढकलतोय.
वाईट म्हणजे ऑफिसमध्ये जाता येता, कॅन्टीन्,लॉबी,रेस्ट रूम्,स्मोकिंग झोन,पार्किंग लॉटमध्ये होणार्‍या गप्पा,चर्चा अशा महत्वाच्या गोष्टींना मुकतोय. एकदम आयसोलेटेड फिलिंग, सोशलायझेशन अजिबात नाही. गाडी पडुन आहे,बाइकही वापरली जात नाही, कपडे पडुन आहेत, बर्‍याच पॅण्ट होइनाशा झाल्यात. ईस्त्रीवाले, गाडी धुणारे लोकही माझे ऑफिस चालु व्हायची वाट बघायलेत, म्हणजे त्यांचा धंदा वाढेल. एक ना दोन. थोडक्यात आठवड्यात २-३ वेळा का होईना ऑफिस चालु होणे गरजेचे आहे.

थोड्कयात, बहुजनहिताय, बहुजनसुखाय.. ऑफिस सुरु व्हायला हवेय.. :-))

चांगली बाजु म्हणजे अ‍ॅट्रिशन जास्त असल्याने

बाय द वे, कोविडमुळे सर्वत्र आर्थिक स्थिती गोठलेली असताना लोक जॉब सोडून दुसरा सहज कसा मिळवू शकताहेत? मूळ सर्व्हे आणि इतर काही प्रतिसाद यातील रिझाईनचा जो उल्लेख आहे त्याचा विचार लोक इतक्या सहज करु शकताहेत? मला जे मर्यादित क्षेत्र दिसलं त्यात लोक दोन वर्षे घरी बसलेत, नोकरीसाठी वाटेल ते करत आहेत. निम्म्या पगारास आणि एण्ट्री लेव्हल पोस्टला तयार होत आहेत.

कोणत्या क्षेत्रांमधे राजीनामा टाकण्याची लक्झरी आहे शिल्लक?

वामन देशमुख's picture

4 Apr 2022 - 7:51 pm | वामन देशमुख

करोना काळापासून मातं क्षेत्रात प्रचंड तेजी आहे. बहुतांश मोठ्या / मध्यम / लहान कंपन्यांना फ्रेशर / लॅटरल लोकांची मोठी गरज आहे.

नोकरभरतीचे व नोकरीबदलाचे प्रमाण वाढले आहे. लोकांचे पगार वाढले आहेत. पगाराच्या ऑफर्स वाढल्या आहेत.

काहीजणांना ऑफिसातून काम हवे आहे. काहीजणांना घरून काम हवे आहे. कंपन्या शक्य झाल्यास त्या-त्या प्रकारे ऑफर्स देत आहेत.

---

दुर्दैवाने, इतर अनेक क्षेत्रात मंदी आहे, नवी नोकरभरती नाही. आहे ती नोकरी टिकवली तरी खूप आहे अशी परिस्थिती आहे

राजेंद्र मेहेंदळे's picture

4 Apr 2022 - 7:58 pm | राजेंद्र मेहेंदळे

आय टी मध्ये तरी मागचे २ वर्षे पब्लिक धास्तावुन आहे तो जॉब पकडुन स्वस्थ बसले होते. प्रमोशन बिमोशन काय मागत नव्हते. व्हॅरिएबल पे सुद्धा बघत नव्हते.
पण आता मार्केट पुन्हा ओपन झाले आहे. आणि ठराविक स्किल्स अणि एका विशिष्ट मर्यादेत (१०-१२ वर्षे) अनुभव असेल तर एकेका माणसाला २-३ ऑफर्स सुद्धा मिळतात. मस्त धंदा आहे.

म्हणजे एक फुटकळ ऑफर घेउन रिझाइन मारायचे आणि नोटिस पिरियड चालु करायचा. मग निवांत ईतर ईंटरव्ह्यु देत राहायचे आणि "मी लवकर जॉइन करु शकतो" हे सांगुन अधिक पैसे मागायचे. मग तो इतके देतोय, तु किती देशील? असे तिसर्‍याला सांगायचे. आणि शेवटपर्यंत हा कुठे जॉइन करेल याची कुणालाच खात्री नाही. मग कधीतरी लिंक्ड ईन वरुन समजते की हा पठ्ठा न सांगितलेल्या एका पाचव्याच कंपनीत जॉइन झालाय.

माझा एक सिनीयर मित्र तर एकदा ईंटरव्ह्यु घेत असताना समोरच्या मुलीला फार काही येत नव्हते. यावर तो आपला वैताग आवरायचा प्रयत्न करत असतानाच ती मुलगीच त्याला विचारती झाली" तुमची सॅलरी रेंज काय आहे?" त्याने ठराविक रेंज सांगितल्यावर तीच म्हणाली "आय बॅक आउट, अ‍ॅज आय हॅव ऑलरेडी अनदर ऑफर मोर थॅन धिस". यावर त्याने तत्काळ ईंटरव्ह्यु थांबवला आणि "नीट चौकशी करुन कँडीडेट आणा" म्हणुन एच आर ची तासली

उत्पादन क्षेत्रात सुद्धा असेच आहे.

चेतन's picture

8 Apr 2022 - 9:58 am | चेतन

आमच्या फिल्ड्मध्ये अ‍ॅट्रिशन बरेच आहे (उत्पादन सोफ्ट्वेअर). माझ्या टिममध्ये सहाजण सोडुन गेले. कमितकमी ४०% जास्त पगारवर (८५% सुध्दा). गेल्या दोन महिन्यात १९ इन्टर्व्यु घेतले, चार लोकाना ऑफर दिली. एकही जण हझर झाला नाही (जास्त पगार मिळाला). :-(
आत्तासुध्दा माझ्याकडे ४ जागा आहेत. (पगार ८-१२).

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Apr 2022 - 7:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धागा प्रतिसाद लंबर एक रुमाल टाकून ठेवतो. (व्यस्तय काका)
पण तुमचा चक्क धागा बघुन...!

-दिलीप बिरुटे

आज आपण इथे आपल्या व्यस्त दिनक्रमातून आणि कार्यक्रमातून वेळ काढून पायधूळ झाडली. डोळे पाणावले. हृदय जडावले. आपल्या ऋणात राहणेच पसंत करेन. असेच लक्ष असू द्या.

बाकी तुमचे वर्क फ्रॉम होम कधीच बंद झाले असेल ना? कॉलेजे सर्वच ऑफलाईन क्लासरूममधे चालू आहेत ना? तुम्हाला कसे वाटले पुन्हा कॉलेजात जाताना?

प्रचेतस's picture

4 Apr 2022 - 9:42 pm | प्रचेतस

किती तो प्रेमळ संवाद.

तुम्हाला कसे वाटले पुन्हा कॉलेजात जाताना?

एक दुरुस्ती सुचवतो: तुम्हाला कसे वाटले पुन्हा कॉलेजात गेल्यावर?

गवि's picture

5 Apr 2022 - 10:21 am | गवि

धन्यवाद.
दुरुस्ती कामकाजात घेतली गेली आहे. जाताना आणि गेल्यावर.. म्हणजे जाण्यापूर्वी आणि गेल्यावर असे दोन्ही कळल्यास उत्तम.

बापूसाहेब's picture

4 Apr 2022 - 10:28 pm | बापूसाहेब

ऑफिस सुरू झाले पाहिजेत.
पूर्णतः नाही पण आठवड्यात 1-2 दिवस तरी ऑफिस ला येणे कम्पल्सरी करावे.
WFH करणे ही परिस्थितीनुसार आलेली मुजबुरी होती. WFH मॉडेल इतकेच चांगले असते तर कित्येक कंपन्यांनी ते कोरोना आधीच सुरू केले असते.
WFH मुळे कोण नेमका कीती बिझी आहे आणि कोणाला किती काम द्यायला हवे हे manager लोकांना समजण्यास अडचणी येत आहेत.
कित्येक लोक दिवसभर बिझी स्टेटस लावून इतर कामे करत होते.
अशा लोकांना समजावून काम करून घेणे त्रासदायक बनले होते ( निदान सुरवातीच्या काळात तरी)

करोना काळात नवीन लोक भरती करण्यास इतके अडथळे आले की विचारू नका. अत्यंत भंगार लोक टीम मध्ये आली. जर F2F interview असते तर त्यांचे behavioural स्किल्स एकंदरीत वागण्याची पद्धत बोलण्याची पद्धत हे समजणे सोपी गेले असते पण व्हिडीओ call वर फक्त चेहरा आणि हावभाव पाहून सेलेक्षन करणे खूप अवघड काम..

त्याचसोबत बऱ्याचशा स्त्री कर्मचाऱ्यांनी घरीच आहोत म्हणून pregnancy प्लॅन केल्या.. त्यामुळे उर्वरित टीम वर कामाचा आधिकचा ताण आला.

घरीच असल्याने कित्येक कर्मचारी इंटरनेट , इलेक्ट्रिसिटी चे कारण सांगून तासनतास गायब होत होते. ( अजूनही होतात)

WFH असल्याने कोणतेही टीम bonding नाही... ऑफिस मधे काम करताना जो काही free वेळ भेटेल तो एकमेकांना समजण्यात, नवीन ओळखी बनवण्यात, इतरांच्याकडून शिकण्यात , गप्पा गोष्टी, events साजरे करण्यात घालवला जातो.. पण WFH मध्ये लोकांनां अश्या गोष्टीत काहीही इंटरेस्ट नाही. Events arrange केले तरी उपस्थिती नाममात्र.. जे आहेत ते फक्त उपस्थिती दाखवण्यासाठी आलेले.. बाकीच्यांच महिती नाहि पण मी हे सगळं मिस करतो.

मी ॲप्रिसल डिस्कशन घेतं असताना एक मुलीने मध्येच कॅमेरा बंद केला , हेडफोन mute केला आणि चिकन बिर्याणी खायला सुरवात केली. जेव्हा तिची बोलायची वेळ यायची तेव्हा ती काहीतरी खात आहे हे स्पष्टपणे समजत होते... ( तिचा मेनू मला माहिती होता कारण डिनर कंपनी sponsored होता.. virtual टीम डिनर जो की २ दिवसापूर्वी झालेला होता त्या इव्हेंट ला ही बाई गैरहजर होती पण दोन दिवसांनी पिंग करून मी आत्ता डिनर ऑर्डर केला तर चालेल का असं विचारून तिने ऑर्डर place केली.. मी संमती दिली कारण मला इतकं मायक्रो management नाही आवडत. म्हणलं जाऊदे.. टीम डिनर इव्हेंट मिस झाले असेल काही करणानी... )

वर्षातुन एकदा येणाऱ्या apprisal डिस्कशन बाबत ही बाई इतकी सीरियस असेल तर इतर मीटिंग बदल न बोललेले बरे. बरं कंप्लेंट करावी तर ती पडली बाईमाणूस.. व्हिडिओ on करण्यासाठी जबरदस्ती केली तर HR la काहीही सांगून माझी इमेज खराब करण्याची शक्यता.. ( अलिखित नियम... Man is guilty unless proven innocent and Women is innocent unless proven guilty )
कसाबसा तो कॉल आटोपला.
अशी कित्येक उदाहरणे देऊ शकेल जिथे फक्त आपण समोरच्या व्यक्तीस दिसत नाही याचा गैरफायदा घेउन लोकं कामाच्या ऐवजी इतर धंदे करत असतात.

मी समाजप्रिय प्राणी असल्यानं मी ऑफिसला जाण्यास उत्सुक आहे.
माझ्यामते कामाव्यतिरिक्त बऱ्याचश्या गोष्टी आहेत ज्या आपण ऑफिस मधे एन्जॉय करतो.. त्यामुळें ऑफिस हे हवेच...
पण बदलत्या काळानुसार माझी पसंती हायब्रीड मॉडेल la. आपल्या पसंतीच्या २ दिवसा साठी ऑफिस आणि बाकीच्या दिवसात Wfh.

उत्तम प्रतिसाद. पटण्याजोगे.

मॅनेजर लोकांची बाजू वेगळी आहे इन जनरल, आणि टीम मेंबर्स/ रिपोर्टिंग एम्प्लॉयीजचे विचार वेगळे आहेत असं असावं. काम करणारे कष्टाळू लोक कुठूनही काम नीटच करत आहेत. आणि मुळात टाळाटाळ करणारे wfh मधे अगदीच सुट्टी घेतल्यासारखे वागत आहेत असं व्यक्तिगत निरीक्षण.

सौन्दर्य's picture

4 Apr 2022 - 11:32 pm | सौन्दर्य

संपूर्ण कोरोना काळात कामाच्या विविक्षित स्वरूपामुळे ऑफिस मधूनच काम केलं.
मात्र पंधरा वर्षांपूर्वी मार्केटिंगमध्ये असताना घर हेच ऑफिस असल्यामुळे बॉसचा कधीही फोन आला तरी तो घ्यावाच लागायचा व वर "घर पे ही हो ?" अश्या खवचट प्रश्नाला नाईलाजाने "हो" म्हणून उत्तर द्यावे लागायचे, जे आवडायचे नाही.

आत्ताच्या लॉकडाऊनमधेही बॉस लोकांनी "किधर हो?" असा प्रश्न कॉलच्या सुरुवातीला उगाच टाकणे हे प्रातिनिधिक झालं होतं. "अरे मेल्या, तू काम बोल. मी कमोडवर बसलोय" असे स्पष्टवक्तेपणाचे प्रयोग कोणीतरी करायला हवे होते.

चावटमेला's picture

5 Apr 2022 - 10:33 am | चावटमेला

आमचं ऑफिस सुरू झालं २ आठवड्यांपूर्वी. मी पुढच्या आठवड्यापासून जाईन म्हणतो. कार सर्विसिंग ला टाकली आहे. पण पुन्हा हिंजवडी च्या ट्रॅफिक च्या विचारानं पोटात गोळा आला आहे

समीरसूर's picture

5 Apr 2022 - 2:12 pm | समीरसूर

माझं ऑफीस हिंजवडीला. तिथे येतेय मेट्रो. ट्रॅफिकची लागलेली वाट बघता घरून काम करणे जास्त सोयीस्कर आहे असे वाटते. येऊन-जाऊन तीन तास ट्रॅफिकमध्ये अडकायला नको वाटतं. पण त्याचबरोबर बाकी व्यवसाय-धंदे (कँटीन्स, बसेस, दुकाने, कमर्शियल स्पेस, इंटेरियर, वगैरे) सुरु होण्यासाठी ऑफीसेस सुरु होणे गरजेचे आहे हे ही तितकेच खरे. एखाद्या मोठ्या कंपनीवर अवलंबून अनेक छोटे-मोठे व्यवसाय असतात. ते सुरु होणे आवश्यक आहे.

बाकी मी २ वर्षात २-३ वेळा माझ्या काही कलिग्जना भेटलेलो आहे. बाकीच्यांना भेटलेलो नाही; खरं सांगतो, काहीच फरक पडत नाही. समजा, एका क्ष नावाच्या व्यक्तीला ऑफीसेस सुरु असतांना रोज भेटत होतो आणि आता त्या व्यक्तीला मी शुक्रवार, २०-मार्च-२०२२ पासून भेटलेलोच नाहीये तर मला त्या व्यक्तीला भेटणे आवश्यक वाटते का? मी त्या व्यक्तीला भेटणे मिस करतो का? त्या व्यक्तीला न भेटल्याने माझे किंवा त्याचे काम अडतेय का? त्या व्यक्तीला भेटून सोबत चहा वगैरे प्यावा असे खरंच मनापासून वाटतेय का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे बहुतांशी 'नाही' आहेत. काहीही, अक्षरशः काहीही फरक पडत नाही. आमचे दोन वर्षे उत्तम काम चालले आहे. नाही म्हणायला आत सगळे उघडल्याने लोकांना बाहेर जावे लागते आणि त्यामुळे २०२०-२१ सारखी प्रॉडक्टिविटी आता मिळणार नाही; पण लोकं उशीरापर्यंत काम करतायेत. कुणीच बघत नाहीये म्हणून एक प्रकारची बेफिकिरी येण्याची शक्यता आहे हे मात्र खरे.

महिला आणि मातांसाठी अजूनही घरून काम करणे हा पर्याय सोयीचा आहे. जूनपासून शाळा नियमित सुरु झाल्यावर कदाचित त्यांना ऑफीसला जाऊन काम करता येणे शक्य होईल.

दोन वर्षात सवयी बदलल्या आहेत; त्या पुन्हा बदलणं सोपं नसेल. शिवाय ट्रान्स्पोर्टचा मुद्दा आहे. आमच्या ऑफीसातले लोकं म्हणतात नियमित बस सेवा असेल तर ऑफीसला जाऊ, अन्यथा नाही. आमची कंपनी उत्कृष्ट बससेवेसाठी आख्ख्या भारतात प्रसिद्ध होती. ऑफीसातून काम करण्याची बळजबरी केली तर लोक नोकरी सोडायलादेखील मागे-पुढे पाहणार नाहीत हे ही खरे. जे कर्मचारी आपापल्या गावी गेलेत त्यांचे महिन्याचे २०-२५ हजार (भाडे, इतर खर्च) वाचतायेत; ते कशाला आता पुन्हा पुण्यासारख्या ठिकाणी येऊन डोक्याला शॉट लावून घ्यायला सहजासहजी तयार होतील? कित्येकांनी मुलांसाठी शाळांचे बेटर आणि कमी खर्चाचे ऑप्शन्स ऑलरेडी आपलेसे केलेले आहेत. पुण्यातील घर चालवण्याच्या मासिक खर्चात जळगाव/नाशिक सारख्या ठिकाणी दोन महिने निघतात.

एकंदरीत हे वाटते तितके सोपे नाही. काहीतरी सॉलिड मोटिवेशन असल्याशिवाय लोकं ऑफीसात जायला फारसे तयार होणार नाहीत. काही इन्सेंन्टिव, अलाउन्स, रिवार्ड्स, प्रिविलेजेस, रेकग्निशन असं काहीतरी सुरु केल्यास फरक पडण्याची शक्यता आहे...

नेहमीप्रमाणे "समीरसुरेख" प्रतिसाद. एकंदरीत आयटी क्षेत्रातल्या एम्प्लॉयीजकडे अजून भरपूर निगोशीयेशन पॉवर आहे असे म्हणावे लागेल. इतर क्षेत्रात "अमुक द्या, तर येतो" टाईप मागण्या ऐकून घेणे तर सोडाच, पगार कपात किंवा थेट नोकरी जाणे असंही झालं आहे.

मुक्त विहारि's picture

7 Apr 2022 - 7:12 pm | मुक्त विहारि

वाचत आहे ....

(आमच्या काळांत, असे काही न्हवते...)

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

9 Apr 2022 - 4:04 am | हणमंतअण्णा शंकर...

माझा कल हायब्रीड मॉडेल कडे आहे.

व्यक्तीनुसार फायद्यातोट्यांचे गणित बदलत असले तरी मध्यमवयीन लोकांना हाय्ब्रीड मॉडेल सोयीचे आहे असे माझे सर्वसाधारण मत आहे.

म्हणजे महिन्यातून तीन-चारदा किंवा आठवड्यातून एक-दोनदा ऑफिसमध्ये भेटणे आणि एकत्र काम करणे किंवा चकाट्या पिटणे आणि उर्वरित वेळात घरून काम असे मॉडेल बर्‍याच कंपन्या आजमावत आहेत.

माझ्यासारख्या व्यक्तीला भारतातील अगडबंब शहर अजिबात आवडत नाही. जिल्ह्याची ठिकाणे उदा. कोल्हापूर, बहुतांशी आवडतात. जिकडे गावाकडचा असह्य कंटाळा आणि साचलेपणा नाही आणि मेट्रोसारखी घिसाडघाई आणि बजबजपुरी नाही. उत्तम शिक्षण, बरे इन्फ्रा, उत्तम इंटरनेट आणि चांगला गोतावळा असेल तर कोल्हापूर-बेळगावात अजिबात बोअर होत नाही. आइ-बापाचं घर असेल तर भाडे, खाणेपिणे यांच्यावरचे खर्चसुद्धा वाचतात. खायला प्यायला चांगलं मिळतं, पटकन शहराबाहेर पडता येतं, नाटकं-बिटकं सुद्धा उत्साहाने करता येतात म्हणून पुण्या-मुंबई-बेंगलोर-हायद्राबाद येथील कंपन्यांमध्ये पूर्ण वर्क-फ्रॉम-होम हा माझ्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. पगार दाबून आणि खर्च कमी हे आवडणार नाही तर काय?

मैत्र आणि गोतावळा मात्र आवश्यक आहे. माझे बहुतेक मित्र हे पोस्ट-बारावी आहेत. शिवाय इंटरनेट आणि इतर घडामोडी-भानगडी यातून एखाद्या शहरात मित्रांचा गोतावळा बांधणे काही फारसे अवघड नसले तरी ते सगळ्यांनाच जमेल असे नाही.. एखाद्या स्पेस मध्ये एकत्र येउन जी ऑरगॅनिक मैत्री तयार होते ते आभासी मार्गाने रिप्लीकेट करणे तसे अवघड आहे. कामाच्या ठिकाणी मैत्री होतेच, आणि जर कामाचे ठिकाण खूप काळ तेच असेल बहुतांशी घनिष्ठ मैत्र्या होतात. उदा. बँक, सरकारी ऑफिस इत्यादी. परंतु आयटीमध्ये माझे धोरण दर अडीच वर्षाला कंपनी बदलणे असल्याने कामाच्या ठिकाणी मैत्र्या जरा सैल, सोयीच्या घडल्या. त्यात तर मोदींमुळे माझे काही कॉलेजमधले मित्रसुद्धा दुरावले. हे मी अतिशयोक्त बोलत नाही. पण भावना दुखावण्याच्या प्रचंड लाटा कोविडपूर्व काळात येऊन गेल्या. उभे उभे गट पडले. त्यामुळे असलेले घट्ट मित्रसुद्धा कमी झाले आणि सोयीनुसार केलेल्या तोंडओळखी वाढल्या. त्यामुळे पुण्यासारख्या शहरात देखील मला काही काळ एकटं वाटत असे. हा एकटेपणा घालवायचा आहे पण तरीही काम पुण्यात असल्याने पुणं सोडता येत नाही अश्या कात्रीत मी अडकलो होतो. आणि लॉकडाऊन ने हा प्रश्न चटकन सोडवून टाकला. ज्यांचे बालपण, पौगंड निमशहरी भागात गेले आहे आणि कामानिमित्त शहरात स्थलांतर करावे लागले आहे अशांना मोठ्या शहराविषयी फारसं ममत्त्व नसते. कुठेतरी मध्येच अडकले असतात. शहराचे फायदेही हवे असतात, आणि गावातला निवांतपणाही हवा असतो पण गावातली मान'सिक'ता नको असते अशांचं एकतर मोठं शहर खूपच भलं करतं किंवा नैराश्य तरी देतं. जर शहरात पैशांची चणचण असेल तर मात्र अशा लोकांना प्रचंड नैराश्य येते. सुदैवाने पैसे रग्गड मिळत असल्याने मला नैराश्य आले नाही, काही उत्तम खाद्यकेंद्रे सोडल्यास मी पुण्याला फारसं मिसही केलं नाही.

माझं पुण्यातलं राहतं घर सोडून मी पहिल्यांदा थेट गाव गाठलं. घरातला खूप पसारा आवरला, मोठा टीव्ही घेतला आणि घर फर्निश्ड अवस्थेत तीनेक महिन्यांनी भाड्याने देऊन टाकले. भाडेकरू समोरच्याच बिल्डिंग मधले ओळखीचे लोक असल्याने त्यानांही त्रास झाला नाही, मलाही झाला नाही. सुदैवाने मला अतिशय जबरदस्त इंटरनेट आमच्या रावळगुंडवाडीतही मिळाले असल्याने मी वर्षभर दणक्यात गावाहून काम केलं. तिथं माझा मासिक खर्च फक्त ३५०० रुपये यायचा..तोही कारण घरचा किराणा मीच भरत असे आणि त्यात काही 'फॅन्सी' आयटम्स असत जसे की उत्तम प्रतीचे तांदूळ, राजमा इत्यादी. भाज्या घरच्या, तृणधान्य घरचे, शुद्ध हवा, घरच्या मस्त देशी कोंबड्या, कोंबडे आणि अंडी, घरची म्हैस. अ‍ॅब्सलूटची बॉटल धरून अजून एक सतराशे रुपये मासिक पकडा. नुकतीच नवीन कंपनी जॉइन केली असल्याने पगारवाढही घसघशीत मिळाली होती.. कामाला एक सांगकाम्या असा सगळा जामानिमा..माझा बहुतांश वेळ अमेरिकन वेळेला जुळवून कामातच जात असल्याने आणि इतर कोणत्याही कटकटी नसल्याने हा वेळ खूप सुखाचा गेला. शेजारच्या डोंगरावर मी म्हैस चरायला नेत असे. करोनाचा हाहाकार उंबर्‍यापर्यंत पोचला नव्हता. दुसर्‍या लाटेत मात्र बरीच खटपट करून लस मिळवली आणि थोडा निर्धास्त झालो.. पुण्यातली निर्बंध चैन कधी मधी आठवे. काही साध्या गोष्टींसाठी सुद्धा मला रावळगुंडवाडीवरून विजापूरला जावे लागे. त्यात एका बालमित्राने अमेझॉनचे डिलिव्हरी कंत्राट घेतले आणि तो माझ्या अनेक डिलिव्हरीज मला वाडीत आणून देई. कन्झुरिझमचा लोभस अध्याय रावळगुंडवाडीतही चालू झाला.

आजवर नुसतीच हावरटपणाने गोळा करून ठेवलेली सगळी पुस्तके वाचून झाली. खूप चित्रपट पाहून झाले. रिफोल्ड मेथडने एक परदेशी भाषा शिकून झाली.

आयुष्यावर एकाच वेळेस सुखाचे आणि घरच्या करोनाबळीचा दोघांचेही घाव बसले. माझे काम रिमोटपणे होत असल्याने मला प्रश्न पडला की हे आधी का नाही झालं? मला हैदराबादमध्ये, बेंगलोरमध्ये भीषण दिवस काढावे लागले नसते. मी इतके पैसे घालून पुण्यासारख्या ठिकाणी घर तरी का घेतलं? मग नंतर जाणवलं की साथीने काही गोष्टी आमूलाग्र याही पूर्वी बदलल्या आहेत आणि करोना-साथ हा काही पहिला अपवाद नाही. त्यामुळं जर तर ला अर्थ नाही. घरच्यांबरोबर वेळ घालवता आला. मुलांच्या अकाली निधनांनी, मानसिक समस्यांचा निचरा न झाल्याने, नैराश्यातून केलेल्या आत्महत्त्यांनी कुटुंबियांची प्रचंड वाताहत झालेली आहे. खूप सोसलं गेलं आहे याची, आणि कोरडवाहू शेतीवर अवलंबून असलेल्या माझ्या पूर्वजांनी जीवतरी कसा तगवून धरला असेल याची जबरदस्त जाणीव झाली. आपण फिनिक्सप्रमाणे राखेतून उठलो आहोत हे जाणवून प्रचंड अभिमान वाटला आणि खूप सोसलेल्या कुटुंबाला खूप अ‍ॅक्टीव्हपणे दारिद्र्यातून वर काढता आले याचे कुटुंबासोबत प्रत्यक्ष राहिल्याने समाधानही वाटले. त्या दृष्टीने हे सक्तीचे वर्क फ्रॉम होम मी वर्क फ्रॉम गाव/कुटुंब केल्याने माझ्या पत्थ्यावरच पडले आहे.

मुक्त विहारि's picture

9 Apr 2022 - 8:46 am | मुक्त विहारि

तारतम्यता ठेऊन आणि प्रमाणात सर्व काही असावे, असे दाखवणारा प्रतिसाद...

आमचे बाबा महाराज डोंबोलीकर म्हणतात की, डाॅलर मध्ये कमवावे आणि रुपयांत खर्च करावे...

हणमंतअण्णा, सविस्तर आणि मनातलं बोलणारा प्रतिसाद खूप आवडला. निमशहरातून मेट्रोत आयटी नोकरीत आलेल्या अनेकांना तुमच्या प्रतिसादाशी थेट रीलेट करता येईल.

या आणि अशा अनेक लहान मोठ्या आकाराच्या, पण आपापलं म्हणणं मनापासून व्यक्त झालेल्या प्रतिसादांमुळे धाग्याचं सार्थक होतंय.

चौथा कोनाडा's picture

10 Apr 2022 - 5:18 pm | चौथा कोनाडा

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर,

💖

खुप सुंदर प्रतिसाद ! एक नंबर आवडला !

वामन देशमुख's picture

10 Apr 2022 - 4:18 pm | वामन देशमुख

मग काय ठरलं शेवटी?

घरून काम करायचंय की काम करून घरी यायचंय?