भीमाशंकर ट्रेक ०२.०१.२०२२ चढाई बैल घाटाने-उतराई गणपती घाटाने

Vivek Phatak's picture
Vivek Phatak in भटकंती
23 Mar 2022 - 2:44 pm

भीमाशंकर ट्रेक ०२.०१.२०२२
चढाई बैल घाटाने-उतराई गणपती घाटाने

२०२२ वर्षाची सुरुवात दोन नितांत सुंदर घाटवाटांच्या ट्रेकने झाली. जंगल भटक्यांना अजुन काय पाहिजे. एक कोकणातून, कर्जत तालुक्यातील नांदगावपासून वर जवळजवळ १००० मीटर्सवर भीमाशंकरला घेऊन जाणारी तर दुसरी भीमाशंकरहून पुन्हा कोकणात म्हणजे खांडसला (तालुका कर्जत) तेव्हढेच अंतर उतरणारी. एक थोडीशी आडवळणाची, त्यामानाने कमी वापराची, कमी रूळलेली पण अतिशय सुंदर, दाट झाडोऱ्याची रानशिळ घाटवाट. ह्याच वाटेला बैलघाट सुद्धा म्हणतात. तर दुसरी जास्त मळलेली नियमित वापराची गणेश/गणपती घाटवाट. दोन्हीही वाटा तुमच्या शारीरिक क्षमतेचा कस पाहणाऱ्या आहेत. एक तीव्र चढाची तर दुसरी तीव्र उताराची. मागे मी पावसाळ्यात भीमाशंकर ट्रेक भोरगिरीहून केला होता आणि नंतर पावसाळा संपल्यावर लगेचच लोणावळा - भीमाशंकर असा रेंज ट्रेक केला होता. आता भीमाशंकर कडे जाणाऱ्या अजुन दोन वाटा जोखायची संधी STF मुळे आली होती.

आमचा STF चा (Sahyadri Trekkers Foundation), २ जानेवारीचा भीमाशंकर ट्रेक बैलघाटाने चढून, गणेश/गणपती घाटाने उतरणारा होता. वाकड ब्रीजखाली सकाळी ५ वाजता पीकअप घेऊन आणि आणखी पुढे एकदोन पीकअप घेऊन आमची बस आधी एक्स्प्रेसवेने आणि नंतर कर्जत कशेळे पार करत नांदगाव ह्या बैलघाटाच्या पायथ्याच्या गावी पोचली तेव्हा ८.३० वाजले होते. समोर अशक्य उंचीच्या भीमाशंकर डोंगररांगेच्या पायथ्याशीच एका housing project च्या प्रवेशद्वारावर, ट्रेक बद्दलची सविस्तर माहिती देऊन ट्रेकला लगेचच सुरुवात झाली. इतका निसर्ग संपन्न परिसर, अगदी समोरच अंगावर अतिशय दाट अभयारण्य मिरवणारी उंचच उंच भीमाशंकर डोंगररांग, डावीकडे रांगेपासून जरासा सुटा असलेला सिद्धगड, उजवीकडे दिसणारा पदरगड आणि ह्या हिरव्याकंच निसर्गाच्या अगदी पायथ्याशीच होऊ घातलेले, त्याला हानी पोहोचवणारे सिमेंट काँक्रिट चे जंगल.. किती विरोधाभास.

.

.

.

.

.

ह्या होऊ घातलेल्या "काँक्रीटीकरणातून" बाहेर पडल्यावर अगदी लगेचच बैलघाटाची वाट जंगलात शिरते. ही संपूर्ण घाटवाट अतिशय सुंदर अश्या घनदाट जंगलाने व्यापलेली आहे. त्यामुळे भीमाशंकर गाठेपर्यंत, जवळपास 1000 मीटर्स चढेपर्यंत, उन्हाचा त्रास कुठेही जाणवत नाही. मात्र ही वाट सुरू झाल्यापासून सतत वरच चढत जाते. मधेमधे ती आता कोरड्या पडलेल्या धबधब्याच्या मार्गातून जाते त्यामुळे भले मोठमोठे दगडधोंडे पार करत वर चढावे लागते. तुमच्या शारीरिक क्षमतेचा चांगलाच कस लागतो. हा संपूर्ण प्रवास अतिशय सुंदर जंगलानुभव देणारा आहे. अतिशय उंचच उंच, 30/40 मीटर्सपर्यंत अनिर्बंध वाढलेले विविध प्रकारचे, हिरवेगार पण हिरव्या रंगांच्या विविध छटा परिधान केलेले वृक्ष, प्रदूषण रहित अतिशय स्वच्छ हवा, हवाहवासा वाटणारा सुखद गारवा.

.

.

.

.

.

जवळपास ६०% चढून झाल्यावर वाट पठारावर येते. इथे थोडा ब्रेकफास्ट ब्रेक घेतला. सगळे ग्रुप मेंबर्स येईपर्यंत थोडा टाईमपास केला. दाट जंगलामुळे पुढचे काही दिसत नव्हते त्यामुळे बऱ्याच जणांचा चढ संपल्याचा समज झाला. पण पठारावरच्या नागमोडी वाटेने जेव्हा पुन्हा उंची गाठायला सुरुवात केली आणि थोडे मोकळंवनात आल्यावर बाजूचा उंच डोंगर पहिला, तेव्हा कळले अजुन बराच पल्ला गाठायचाय. वाटेच्या नागमोडी चालीमुळे आता भीमाशंकर जवळ आले असे वाटत असतानाच वाट अजुन अजुन एक वळण घेते आणि पुन्हा पुन्हा वर चढते. सकाळी ९ वाजता सुरू केलेली चढाई, भीमाशंकर मंदिराच्या कमानीजवळ आलो तेव्हा १२.१५ ला संपली.

.

.

.

.

.

.

.

ही आमची देवदर्शन करण्यासाठीची ट्रीप नसल्यामुळे कमानी जवळूनच भोलेशंकरांना मनोभावे नमस्कार केला. रविवार असल्यामुळे खूप गर्दी होती. आजूबाजूच्या दुकानांमध्ये, हॉटेल्स मधे खूप गजबजाट होता. त्यामुळे न थांबता कमानीच्या उजवीकडून पार्किंग पार करत पुढे निघालो. २००/२५० मीटर्स पुढे गेल्यावर लगेचच खांडसला उतरणारी गणपती घाटवाट सुरू होते. इथे वाटेवर थोडेसे पुढे जाऊन जंगलात पोटपूजा केली. पाणी बाटल्या भरून घेतल्या आणि पुढे निघालो. पुढे दोन वाटा फुटत होत्या तिथे थोडीशी गल्लत झाली. ज्या वाटेवर लगेचच उतार आहे, ती वाट बरोबर आहे असे कळल्याने आधी सरळ जाणारी वाट सोडून, दुसरी वाट जी उजवीकडे जात होती तिथे लगेचच उतार होता त्यामुळे ती वाट बरोबर आहे असे समजून तिथे खडूच्या खुणा केल्या आणि दोन्ही बाजूच्या झाडांना खुणेसाठी रिबिनी पण बांधल्या. पण पुढे ती वाट गच्च झाडोऱ्यात बुजलेली होती. मग परत मागे आलो. एक गावकरी भेटला त्याने सरळ वाट आहे तीच बरोबर आहे असे सांगितले. मग परत आधी केलेल्या खडूच्या खुणा बुजवल्या, झाडाच्या रिबिनी काढल्या आणि योग्य वाटेवर पुन्हा खडूखुणा केल्या आणि रिबिनी बांधल्या. कारण आपण चुकीच्या खुणा केल्या किंवा चुकीच्या खुणा नीट मिटवल्या नाहीत तर नंतर वाट शोधणाऱ्या ट्रेकर्ससाठी ती दिशाभूल होईल.

.

.

Padargad

Padargad closeup

आता संपूर्ण उतार किंवा अधेमधे डोंगराच्या कडेकडेने जाणारी सुंदर पायवाट होती. ही वाट उतरताना सुरवातीला काही वेळ झाडांचा आडोसा होता पण नंतर एकदा पठारावर आल्यावर झाडे विरळ झाली आणि मग उन्हाचा तडाखा जाणवायला लागला. बैलघाट चढताना जो पदरगड लांब दिसत होता तो आता जवळजवळ येत होता. पदरगडाला जाण्यासाठी खांडसहून गणपती घाटाचीच वाट पकडावी लागते. पदरगडाकडे जाणारी वाट पण दिसली. त्यावाटेजवळच एक काठोकाठ भरलेली विहीर होती. तिथे सगळ्यांनी पाणी बाटल्या भरून घेतल्या. थंडगार पाण्याने चेहरा धुतला. त्यामुळे थकवा दूर होऊन मस्त फ्रेश वाटले. विहिरी भोवती ग्रुप फोटोज् काढले. समोर भीमाशंकरला जाणारी शिडीची वाट दिसत होती. मागे वळून बघताना भीमाशंकर खूपच उंचावर दिसत होते.

.

.

.

.

आता वाट पदरगडाला डावीकडे ठेऊन पठारावरून पुढे निघाली आणि वाटेवरील सुंदर गणपती मंदिरा जवळून खाली उतरली. बाप्पाचे दर्शन घेऊन आम्हीपण त्या वाटेवरून उतरते झालो. एव्हाना ४ वाजले होते. पुढे झपाझप उताराची वाट उतरत अर्ध्या तासात खाली खांडस गावात पोचलो जिथे आमची बस उभी होती. फ्रेश होऊन सगळ्यांनी थोडे स्ट्रेचिंग केले. गरमागरम चहा पिऊन ६ वाजता पुण्याकडे रवाना झालो. जाताना लोणावळ्यापर्यंत खूपच गाढ झोप लागली. तळेगाव पासून काही लोकांना ड्रॉप करत करत, ९.३०/९.४५ वाजता बाणेरला अगदी घरासमोर हायवेवर बसने मला ड्रॉप केले आणि एका अती सुंदर घाटवाटेच्या ट्रेक ची सांगता झाली.

.

.

.

.

.

.

विवेक फाटक
०३.०१.२२

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

23 Mar 2022 - 7:23 pm | कर्नलतपस्वी

भीमाशंकर गाडीतून २०२१ फेब्रुवारी मधे गेलो होतो. आम्ही राजगुरुनगर, (खेड-मंचर) चे. पन्नास कि मी अंतरावर भीमाशंकर, साधारण पन्नास वर्षापूर्वी गावातील लोक महाशिवरात्रीनिमित्त एस टीने चास ,वाडा मार्गे भीमाशंकर डोगंराच्या च्या उत्तर पच्छीम पायथ्यापासून चढून देवाच्या दर्शनास जायचे. चार तासाची पायपीट, वरती जाताना गुडदाणी ,राजगिरा वडी,भाजलेल्या शेगां बरोबरच, दर्शन झाल्यावर तात्पुरत्या उभारलेल्या पालांवर तिखट जाळ साबुदाणा खिचडी व ताक मिळायचे. कवठाचं फार महत्त्व. कातकडी व अन्य जंगलाचे राजे कवी,बेलफळे विकायला बसायचे जगंलातून छोटीशीच कातकड्यानीं मळलेली पायवाट. आता चास धरणामत जुने वाडा गाव पाण्याखाली गेल्यामुळे हा रस्ता बहुतेक बंद झालाय.तसेच श्रावणी सोमवार, दोन्ही वेळचा निसर्ग एकदमच वेगळाच. चिखलात निसरडी घसरडी वाट कितीही केलं तर दोन चार वेळा आकाश जरूर दिसायचे.श्रावणात हिहिरव्यागार दाट जंगलात ठिकठिकाणी कोसळणारे जजलप्रपात जणू हिरव्याकंच पैठणीला पांढर्‍या जरीचा काठपदरच वाटायचे. महाशिवरात्र नवी पालवी,आंब्याला मोहर, सुकलेल्या धबधब्याच्या खुणा.
मित्रांबरोबर चार पाच वेळा तरी गेलो आसेन.

धन्यवाद कर्नलतपस्वी.भीमाशंकर हे माझे ट्रेकिंगसाठी अतिशय आवडते ठिकाण आहे. इथे जाणाऱ्या वेगवेगळ्या घाटवाटा अतिशय देखण्या आहेत. त्यामुळे हा ट्रेक करताना, मग तो कुठल्याही वाटेने असो, खूप मजा येते. हा अनुभव खूपच आनंददायी असतो.

प्रचेतस's picture

24 Mar 2022 - 7:06 am | प्रचेतस

वाडा गाव धरणाच्या बाजूलाच विस्थापित झालंय, रस्ता सुरू आहे, आता तिकडून जाणारा डांबरी रस्ता चास, वाडा, मंदोशीमार्गे तळेघरला मिळतो.

कर्नलतपस्वी's picture

24 Mar 2022 - 2:16 pm | कर्नलतपस्वी

मी बरेच वर्षाव राजगुरुनगर च्या पुढे गेलोच नाही.

कंजूस's picture

24 Mar 2022 - 5:11 pm | कंजूस

१) गूगल map प्रमाणे
https://www.google.com/maps/@19.0365444,73.57745,11z

२) open street map प्रमाणे
https://www.openstreetmap.org/#map=12/19.0478/73.5918&layers=N
इथे भोरगिरीचा रस्ता दिसतो.

कंजूस's picture

23 Mar 2022 - 8:25 pm | कंजूस

बैलघाटाची वाट वरती बस डेपोत निघते का?

कशेळेची शेअर रिक्षा ( आता ओम्नि taxi) आता खांडसलाच जातात त्यामुळे गणपती घाटानेच जा ये करतो. नांदगावला जाण्याची वेळ आलीच नाही. वाटेत काही पक्षी, प्राणी ( शेकरू?) दिसले का?

@कंजूस, होय बैलघाटाची वाट वर बसस्टँड जवळच निघते. थोडीशी अवघड श्रेणीतील आहे पण अतिशय निसर्गसंपन्न आहे. वाटेत पक्षी अथवा प्राणी नाही दिसले पण पक्षांचे गुंजारव कानावर पडत होते. गणपती घाट आणि शिडीची वाट नेहमीची वापरातील आहे त्यामुळे वाटेत बरेच ट्रेकर्स भेटतात. पण बैलघाट किंवा रानशिल वाटेवर क्वचीतच कोणीतरी भेटते.

पुण्याकडून घाटवाटांचा अनुभव घ्यायचा तर वरून प्रथम खाली यावे लागते आणि नंतर परत वरती. परंतू घाटमाथ्या्वर जाण्यात/पोहोचण्यातच बराच वेळ खर्च होतो. इथे तो प्रश्न सोडवला आहे. तेही एका दिवसात.

राजेंद्र मेहेंदळे's picture

25 Mar 2022 - 2:27 pm | राजेंद्र मेहेंदळे

उन्हाने तापत चाललेल्या वातावरणात हा लेख वाचुन आणि प्रचि बघुन थंडगार वार्‍याची झुळूक आल्यासारखे वाटले. हे जंगल असेच टिकुन राहो अणि धनदांडग्यांची नजर इथे न पडो हीच ईशचरणी प्रार्थना.

अवांतर-STF ची जास्त माहिती मिळेल का? ग्रुप जॉइन करता येइल का?

तुमच्या तारखांना जायचे झाल्यास एक पर्याय सुचवतो.
चार पाच जणांचा गट आणि त्यापैकी एक जण माहितगार असेल तर पर्याय आहे.
सध्या एसटी बंद आहे नाही तर
१) शिवाजीनगर डेपो ते भिमाशंकर बसने. सकाळी 05:00,06:00,07:00 अशा बस असायच्या. नऊ ते दहापर्यंत पोहोचून दर्शन करून दुपारी एकला गणपती घाटाने उतरायचं. खांडस ते कशेळे. कशेळे ते कर्जत ओटो. मग रेल्वेने पुणे.
दुपारी उतरताना पश्चिमेचा वारा मिळतो. त्रास होत नाही.
कर्जतला 18:35 डे क्वीन, आणि 19:30 सिंहगड मिळेल सहज.

श्रावण महिन्यात गाईडही लागणार नाही. भाविक लोक जात असतात.

Bhakti's picture

26 Mar 2022 - 11:19 am | Bhakti

छान,वाखू साठवली.

सिरुसेरि's picture

27 Mar 2022 - 12:19 am | सिरुसेरि

छान मोहिम .

चौथा कोनाडा's picture

29 Mar 2022 - 6:01 pm | चौथा कोनाडा

व्वा, भन्नाट ट्रेक ! सुंदर वर्णन, फोटो मोठे असले असते तर बरे झाले असते !

गोरगावलेकर's picture

29 Mar 2022 - 11:15 pm | गोरगावलेकर

फोटो आणि माहिती दोन्ही छान . ८-१० वर्षांपूर्वी भिमाशंकरला एकदाच जाणे झाले तेही गाडीने . लोणावळा-तळेगांव अशा कुठल्याशा रस्त्याने गेलो होतोआणि वाटेत कुठेतरी एका धरणाच्या बॅक वॉटर साठ्यापाशी थांबल्याचे आठवते