गुजरात सहल २०२१_भाग ७-अडलज वाव व अहमदाबाद

गोरगावलेकर's picture
गोरगावलेकर in भटकंती
10 Feb 2022 - 10:49 am

आधीचा भाग येथे वाचा
गुजरात सहल २०२१_भाग ६-जुनागड

सहलीचा नववा दिवस.
अहमदाबादला रात्री उशिरा पोहचून झोपेपर्यंत खूप उशीर झाला होता तरीही नाश्ता आटोपून नऊ वाजता सर्वजण अडालज वावला जाण्यासाठी गाडीत येऊन बसले होते. हॉटेलपासून अंतर अर्ध्या पाऊण तासाचेच (२०किमी) होते . दहाच्या आतच अडालजला पोहचलो.
अडालज गावातील ही पायऱ्यांची विहीर अडालज वाव किंवा रुडाबाईनी वाव नावाने ओळखली जाते. राणा वीर सिंग याने या विहिरीचे काम सुरु केले होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी राणी रुडाबाईने ही विहीर सन १४९८-९९ सालात बांधली होती. विहीर बांधण्यामागचा उद्देश प्रजेकरिता व यात्रेकरूंना पाण्याची सोय व्हावी, घटकाभर आराम करता यावा हा होता. स्थानिक लोकांसाठी या जागेचे आध्यत्मिक महत्वही होते.

सुरुवातीलाच दिसणारा फलक व मंदिर

विहिरीच्या पश्चिम बाजूस आवारात प्रवेश करण्याच्या ठिकाणी तिकीट खिडकी असून माणशी रु.२५/- आकारल्या जातात.

विहीर उतरायला सुरुवात करतांना

विहिरीची बांधकाम रचना उत्तर - दक्षिण असून दक्षिण बाजूकडून पायऱ्या उतरण्यास सुरुवात होते. विहीर पाचमजली असून दक्षिणेकडील बाजूने तीन दिशांनी प्रवेश करता येतो. काही पायऱ्या उतरल्यावर हे सर्व रस्ते पहिल्या मजल्यावर एका चौरस मोकळ्या जागेत एकत्र येतात. येथे छताकडील अष्टकोनी मोकळ्या जागेतून उजेड पडतो. इतर भाग झाकलेला असल्या कारणाने दुपारच्या वेळेसच विहिरीत ऊन पडू शकते ज्यामुळे विहिरीच्या आतले तापमान बाहेरच्यापेक्षा कमी राहते.

पहिल्या मजल्यावरील या लँडिंगच्या चार कोपऱ्यांमध्ये छोट्या खोल्या असून अतिशय सुंदर नक्षीकाम केलेल्या खिडकी-सज्जे व दरवाजे दिसतात.

उजेड, ऊन येण्यासाठी छताची अष्टकोनी मोकळी जागा व बाजूचे कोरीव नक्षीकाम

येथून उत्तरेकडे पायऱ्या उतरत जातात. एक एक मजला खाली उतरत जात असताना अतिशय कलात्मक असे विहिरीचे खांब व तुळया आपल्या नजरेस पडतात.

बाजूच्या भिंतींवरही अनेक भौमितिक ,फुले, प्राणी व मानवी शिल्प दिसतात

वेगवेळ्या मजल्यांवरून दिसणारी विहीर

सर्वात तळाचा मजला. येथे पाण्याचे कुंड आहे. ज्यामधून वाटसरूंना पिण्यासाठी पाणी घेता येत असे.

येथून वरच्या मजल्यांचे अतिशय छान दर्शन होते. याच्यापुढे अगदी शेवटी उत्तर बाजूस विहीर आहे पण सध्या तिकडे जाण्याचा रस्ता बंद केलेला आहे.

पाण्याचे कुंड व तेथून दिसणारे वरचे पाचही मजले.

कुठलेही सिमेंट न वापरता एकात एक दगड अडकवून केलेली बांधकाम रचना

विहिरीचे छत. विहीर व पाण्याचे कुंड असलेल्या जागी लोखंडी जाळ्या लावण्यात आल्या आहेत.

थेट पाण्याच्या कुंडाकडे जाण्यासाठी विहिरीच्या दोन्ही बाजूस असलेले चक्राकार जिने

छताच्या जाळीतून घेतलेला विहिरीचा फोटो

बाहेर एक फलक आहे त्यावरील माहितीनुसार व लोक कथेनुसारसुलतान मोहम्मद बेगडा बरोबरच्या लढाईत राजा वीरसिंग यांचे निधन झाले. मोहमद बेगडाने राणी रुडाबाईच्या सौंदर्यावर मोहित होऊन तिच्याकडे लग्नाचा प्रस्ताव ठेवला. बेगडाने विहीर पूर्ण करण्यास मदत करावी या अटीवर राणीने लग्नास होकार दिला. बेगडाने विहीर पूर्ण करण्यास सहकार्य केले. यामुळेच विहिरीच्या बांधकामाच्या शैलीत हिंदू, जैन यांच्याबरोबरच इस्लामिक शैलीचाही प्रभाव दिसतो. विहीरचे काम पूर्ण झाले परंतु बेगडा राणीशी लग्न करू शकला नाही कारण त्यापूर्वीच राणीने विहिरीत उडी मारून जीव दिला.
( अवांतर:बेगडाचे मूळ नाव मोहम्मद शाह. असे म्हणतात याने चम्पानेरचा पावागढ व गिरनारचा जुनागड हे दोन गड जिंकल्याने त्याला 'बेगडा' (बे-गडा ) ही उपाधी मिळाली)

दुसऱ्या एका कथेनुसार विहिरीचे बांधकाम पूर्ण झाल्यावर बेगडाने कारागिरांना प्रश्न विचारला 'असेच बांधकाम तुम्ही पुन्हा करू शकाल का? उत्तर होकारार्थी आल्यावर असे निर्माण परत होऊ नये याकरिता सर्व कारागिरांची हत्या करण्यात आली.

विहिरीच्या वरील सहा कबर व आजूबाजूचा परिसर

येथून निघून आम्ही गांधीनगर येथील अक्षरधाम मंदिराला भेट दिली. या मंदिरासाठी प्रवेश विनामूल्य आहे. मंदिरात मोबाईल फोन, कॅमेरा नेण्यास सक्त मनाई आहे.
स्वामीनारायण पंथाचे हे मंदिर आद्य गुरु भगवान श्री स्वामी नारायण यांना समर्पित आहे.
मंदिर गुलाबी रंगाच्या वाळूकाश्म दगडापासून साकारण्यात आले आहे. मंदिराच्या तळमजल्यावर 'हरी मंडपम' हे पवित्र स्थान आहे. येथे स्वामीनारायण व त्यांचे शिष्य यांच्या प्रतिकृती स्थापित आहेत. पहिल्या मजल्यावर श्री स्वामी नारायण यांच्या जीवनातील महत्वाच्या प्रसंगांचे चित्रण आहे.
मंदिराचा परिसर २३ एकर परिसरात असून आकर्षक बगीचे, लाईट अँड साउंड शो, संध्याकाळचा संगीत कारंजे प्रदर्शन इ. गोष्टीही पाहण्यासारख्य आहेत. आम्ही मात्र मुख्य मंदिर व थोडासा आजूबाजूचा परिसर पाहून परत फिरलो. आठवण म्हणून
शंभर रुपये देऊन मंदिरातर्फे नेमलेल्या फोटोग्राफरकडून एक फोटो काढून घेतला. (या एकाच जागेहून मंदिराच्या दिशेने रोखलेल्या कॅमेरात आपला फोटो काढून मिळतो)

जेवणानंतर सायन्स सेंटर बघायची इच्छा होती पण रविवार असल्याने तिकिटासाठी खूप मोठ्या रांगा लागल्या होत्या. काल रात्री उशिरा झोपून आज लवकर उठलो होतो तसेच कालचा गिरनार पर्वत चढाईचा थकवाही होता त्यामुळे आजचे पर्यटन स्थळ दर्शन थांबवून हॉटेलवर परत आलो.
थोडासा आराम करून राहिलेला वेळ शॉपिंगला जाऊन सत्कारणी लावण्याबाबत महिलांचे एकमत झाले. हॉटेलपासून एक दीड किलोमीटरच्या अंतरावरच बाजार असल्याचे कळले किंवा असेही म्हणता येईल की या सर्व गोष्टींचा विचार करूनच हॉटेल ठरविले होते. पायीच निघालो. आधी लागला लाल दरवाजा येथील बाजार. अहमदाबादमधील अगदी स्वस्त बाजारांपैकी एक. येथे लहान मुलांचे कपडे, बूट-चप्पल, इलेकट्रॉनिक वस्तू, आर्टिफिशियल ज्वेलरी, घरातील सजावटीच्या वस्तू इ.कमी किमतीत मिळू शकतात. घासाघीस करण्याचे कौशल्य हवे. आम्हाला काही चांगल्या कपड्यांची खरेदी करायची होती. शोध घेत पुढे निघालो. शेवटी पोहचलो एकदाचे इच्छित स्थळी. "रतन पोळ" बाजार. साडी, ड्रेस मटेरियल, शर्ट, पॅन्ट इत्यादींची शेकड्याने दुकाने येथे आहेत. कमी किमतीपासून अतिशय महागडे कपडेही येथे विक्रीस आहेत. किरकोळ तसेच ठोक विक्रीचीही दुकाने आहेत. येथे किमतीची घासाघीस नाही. मनासारखी खरेदी झाली. साडे आठ वाजले होते. बाजार बंद व्हायची वेळ झाली होती.
आजची खरेदी आटोपल्यावर खादाडीसाठी जायचे ठरले होते. येथील मानेक चौकातील खाऊ गल्ली खूप प्रसिद्ध असल्याचे ऐकले होते. कापड दुकानदाराला पत्ता विचारला तर त्याने सांगितले या गल्ल्लीतून बाहेर पडल्यावर रास्ता ओलांडला कि तुम्ही थेट खाऊ गल्लीतच असाल. मानेक चौक हा सकाळचा भाजी बाजार, दुपारी ज्वेलरी दुकाने व रात्री स्ट्रीट फूडसाठी प्रसिद्ध आहे. रात्री दुकाने बंद झाली की गल्लीत खाद्य पदार्थांचे स्टॉल लागण्यास सुरुवात होते. जिलेबी, पावभाजी , चाट, डोसा, सॅन्डविच, आईस्क्रीम, कुल्फी अशा अनेक प्रकारांचे स्टॉल येथे लागतात.
खरेदीसाठी आमचा ग्रुप विखुरला होता. त्यांची वाट बघत आम्ही एक एक पदार्थ चाखायला सुरुवात केली.

पोटॅटो ट्विस्टर विथ पेरी पेरी अँड मेयॉनीज

सेवपूरी टोकरी चाट व दही शेव पुरी

चीझ पायनापल सॅन्डविच विथ आईस्क्रिम .

जामून शॉट/किवी शॉट/पेरू शॉट

विखुरलेला ग्रूप थोड्या वेळात आम्हाला येऊन मिळाला. त्यांच्याबरोबर डोसा, रबडी, कुल्फी झाली.

रात्रीचे अकरा वाजायला आले तरी खव्वयांची गर्दी ओसरत नव्हती .
गजबजलेली खाऊगल्ली

आमचं खाऊन झालं होतं . निघायचा निर्णय घेतला व रिक्षाने पाच-दहा मिनिटात हॉटेलवर पोहचलो.

क्रमश:

पुढचा व अंतिम भाग: मोढेरा सूर्य मंदिर व रानीकी वाव

प्रतिक्रिया

निनाद's picture

10 Feb 2022 - 11:11 am | निनाद

जबरदस्त आहे हे.
श्रीकृष्ण आणि गोपी यांचे कोरीवकाम सुंदर आहे. अगदी स्वतः जाऊन पाहावेसे वाटले.
तुम्ही अप्रतिम फोटो काढता!

रात्रीचे चांदणे's picture

10 Feb 2022 - 11:46 am | रात्रीचे चांदणे

विहिरीचे फोटो मस्त आहेत. नेहमीप्रमाणे हाहि भाग उत्तम

Bhakti's picture

10 Feb 2022 - 11:52 am | Bhakti

मस्त!
विहीर सुरेख!ती पाहून सुधा मूर्ती यांचे हरवलेल्या मंदिराचे रहस्य पुस्तक आठवलं.त्यात अशाच मोठ्या कलाकुसरीने नटलेल्या विहीरेचे वर्णन आहे.

अनिंद्य's picture

10 Feb 2022 - 12:42 pm | अनिंद्य

अदलज बाव - फोटो फारच छान आले आहेत. त्या उलट्या आसोपालव तोरणाच्या खिडकीत फोटो काढले असतीलच सर्व सहलकऱ्यांनी.

लाल दरवाजा - रतनपोळ - माणिक चौक म्हणजे सगळा तुडुंब गर्दीचा भाग.

जामुन शॉट आणि कैरी+ग्रीनचीली शॉट घरी अनेकदा करतो :-)

पु भा प्र

आता येथे आत जाण्याचा दरवाजा लाकडी चौकट बसवून बंद केला आहे. त्यामुळे खिडकीजवळ जाऊन कोणी फोटो काढून घेतला नाही.

हे अलीकडेच झाले असावे. पाचेक वर्षांपूर्वी मी काढलाय त्या खिडकीत फोटो.

कालच घरी करून पाहिला हा प्रकार.
बिग बास्केटहून जांभळाचा गोठवलेला गर मागवला. (रु.२३५/- अर्धा किलो)
डब्यावरच्या पाककृतीत सोडा मिसळायला सांगितले होते पण मी पाणीच वापरले. छान लागला.
आता कैरीचाही करून पाहीन. उन्हाळ्याकरिता मस्तच.

अनिंद्य's picture

7 Apr 2022 - 8:48 pm | अनिंद्य

जय हो !

विजुभाऊ's picture

10 Feb 2022 - 2:38 pm | विजुभाऊ

पायर्‍यांची विहीर http://misalpav.com/node/15718
बरोब्बर अकरा वर्षांपूर्वी इथे होतो

गोरगावलेकर's picture

11 Feb 2022 - 9:41 am | गोरगावलेकर

आपलाही लेख वाचला. छान लिहिलंय. खरं तर आधीच वाचनात यायला हवा होता. पुढच्यास ठेच मागचा शहाणा 😜

अडलज वाव इथले चक्राकार जिने हे कॉलॅप्सिबल आहेत.

एक_वात्रट's picture

10 Feb 2022 - 2:43 pm | एक_वात्रट

प्रवासवर्णनाचे सातही भाग वाचले. प्रवासवर्णन नेहेमीप्रमाणेच सुंदर झाले आहे. तुमच्या फोटोग्राफीत दिवसेंदिवस सुधारणा होत असलेली दिसते, त्याबद्दल अभिनंदन. गुजरातमध्ये अहमदाबाद, वडोदरा , चंपानेर-पावागढ आर्किओलॉजिकल पार्क अशी एक आणि भुज, जुनागढ, गीर अभयारण्य अशी एक आणि कच्छचे छोटे रण अशा तीन सहली झाल्या आहेत. गुजरात सहलीमध्ये जेवण हे एक जास्तीचे आकर्षण असते (अनेकांना हे गोड जेवण आवडत नाही, मला मात्र ते भयानक आवडते). १००/१५० रुपयांत अनेक पदार्थांनी नटलेली अमर्याद थाळी - परमसुख!

सध्या वडोद-याजवळ स्टॅच्यू ऑफ युनिटी हे आणखी एक आकर्षण उदयास आले आहे, पाहू जायचा कधी योग येतो ते!

छोटे रन अहमदाबादपासून जवळ पडते. येथे जंगली गाढव अभयारण्य आहे असे वाचले आहे.
सध्या वडोद-याजवळ स्टॅच्यू ऑफ युनिटी हे आणखी एक आकर्षण उदयास आले आहे.
चांगले ठिकाण आहे. तीन वर्षांपूर्वी माझे जाणे झाले आहे येथे

कंजूस's picture

10 Feb 2022 - 2:45 pm | कंजूस

दणकून पर्यटन आहे.

अनिंद्य's picture

10 Feb 2022 - 2:48 pm | अनिंद्य

एकात एक दगड फसवून केलेली बांधकाम रचना....

'फसवून' ऐवजी 'अडकवून' असे कराल का प्लीज ?

गोरगावलेकर's picture

10 Feb 2022 - 3:12 pm | गोरगावलेकर

बदल केला आहे. सुचवल्याबद्दल धन्यवाद!

विजुभाऊ's picture

10 Feb 2022 - 2:50 pm | विजुभाऊ

तो हिंदीचा आक्रमक असर ( परीणाम) आहे.

सिरुसेरि's picture

10 Feb 2022 - 10:44 pm | सिरुसेरि

सुरेख प्रवास वर्णन आणी फोटो .

गोरगावलेकर's picture

10 Feb 2022 - 11:19 pm | गोरगावलेकर

@ निनाद . फोटो क्रेडिट :कन्या व तिचा VIVO X 60 मोबाईल कॅमेरा
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. काही फोटो DSLR कॅमेरा

@रात्रीचे चांदणे. प्रतिसादाबद्दल धन्यवाद

@Bhakti. 🙏 पुस्तक वाचलेले नाही. मिळाल्यास जरूर वाचेन.

सुक्या's picture

11 Feb 2022 - 12:35 am | सुक्या

आज सारे भाग वाचुन काढले. सुरेख प्रवास वर्णन आहे हे. सारे फोटो तर लाजवाब . . .

चौथा कोनाडा's picture

11 Feb 2022 - 12:22 pm | चौथा कोनाडा

सुरेख भटकंती वर्णन आणि सुंदर अप्रतिम प्रचि !
अमदावदला असताना मी ही आवर्जून अडालज वाव ला भेट दिली होती.
तेव्हा एका साडीच्या फोटो शूटचे काम सुरु होते, धमाल आली बघायला.
(ते फोटो फेसबुक वर टाकलेत मी)
खुप अप्रतिम शिल्पकारी आहे !
पुन्हा त्या आमच्या माणिक चौक, अक्षरधाम मंदिर, स्टॅच्यू ऑफ युनिटी या सहलीचे क्षण उपभोगले !

टर्मीनेटर's picture

11 Feb 2022 - 12:48 pm | टर्मीनेटर

मस्तच झालाय हा पण भाग 👍
भटकंती, खान-पान, फोटो सगळंच भारी!

प्रचेतस's picture

12 Feb 2022 - 7:10 am | प्रचेतस

हा भागही खूप आवडला, फोटो, वर्णन खूपच भारी, गुजरात भटकंतीला प्रवृत्त करणारं.

गोरगावलेकर's picture

12 Feb 2022 - 10:44 pm | गोरगावलेकर

@ कंजूस, सिरुसेरि, सुक्या,चौथा कोनाडा, प्रचेतस प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार
@टर्मीनेटर . 🙏 यावेळी काही प्रतिसादात आपल्या लेखातील एमोजी कोड वापरायचा प्रयत्न केला आहे.

कर्नलतपस्वी's picture

9 Mar 2022 - 1:29 pm | कर्नलतपस्वी

आतापर्यंत चे सारे भाग वाचले.वाचताना इतके छान वाटले तर बघताना काय वाटेल. फोटो मस्तच. धन्यवाद