२० ते २२ नोव्हेंबर
कोकण पाहायचे दूरच, पण साधं "येवा कोकण आपलाच असा" हेही ऐकलं किंवा वाचलं नव्हतं. डिसेंबरची पर्यटनगर्दी अजून दूर होती. त्यामुळे चार-पाच दिवस हाताशी ठेऊन, खूप नियोजन न करता निवांत फिरण्याचं नियोजन होतं. नेहमीप्रमाणे कोणी तयार होणार नाही हे माहीत असूनही सगळ्यांना सोबत यायचा आग्रह करून झाला होता. अशा मोहिमांसाठी आवश्यक मानसीक तयारी, नवीन हवामानात रुळण्याची प्रक्रिया (acclimatization) बेस कॅम्पवर, अर्थातच सासुरवाडीत, पूर्ण झाली होती.
कदाचित मनात आलं तर कोकणातच स्थायिक होता येईल अशा विचाराने सौं ने सामानाची बांधाबांध केलेली दिसत होती. नकाशातलं अंतर कमी वाटत असल्याने निवांत प्रवासाला सुरुवात झाली.
मुळशी धरण, ताम्हिणी घाट रस्ता
घाट रस्त्याच्या उजव्या बाजूने सोबत करणारं, डोंगरांनी वेढलेलं, अथांग पसरलेलं धरणाचं पाणी.
दापोली मुरुड
जाता जाता स्वतःचंच सोनेरी प्रतिबिंब पाहण्यासाठी किनाऱ्यावर ओझरतं डोकावणारा सूर्य.
कर्दे
पहाटेची वेळ. लाटांचा किनाऱ्याशी अविरत सुरू असलेला संवाद. दूर क्षितिजावर लुकलुकणारे असंख्य दिवे.
वेळ थांबवून ठेवावी, असं वाटेल, अशी शांत, रम्य, आगळीवेगळी पहाट.
उजाडायला लागलं तसं दिसू लागलेल्या छोट्या-मोठ्या नौका. क्षणभर, लहानपणी खेळताना पाण्यात सोडलेल्या होड्या जिवंत होऊन समोर आल्यासारखं वाटलं.
हर्णे बंदर
समुद्रात रात्रभर मासेमारीसाठी भटकून, बंदरात पहाटेपासून हळू हळू गोळा झालेल्या अनेक नौका. एवढ्या नौका एकाच ठिकाणी, इतक्या दाटीवाटीत पाहण्याची ही पहिलीच वेळ.
आंजर्ले
नदी, खाडी, समुद्र आणि सर्वात उजवीकडे कड्यावर, झाडांच्या गर्दीत लपलेलं, कड्यावरचा गणपती मंदिर.
मंदिर सभामंडप. कोकणवासीयांनी जपलेलं वेगळेपण, मंदिर परिसरातील शांतता आणि स्वच्छता, सर्व काही लक्षात राहणारं.
जास्वंदीच्या फुलांनी सजलेली, पाहतच राहावी अशी मोहक, आखीव-रेखीव गणपती मूर्ती.
कर्दे
मानवी हस्तक्षेपापासून अजूनही थोडासा का असेना पण दूर राहिलेला शांत, निवांत, विस्तीर्ण समुद्रकिनारा.
कर्दे ते बुरोंडी प्रवास
जिथे कुणाही निसर्गप्रेमीची पावलं थबकतील अशी एक अनवट वाट.
दूरपर्यंत निर्जन परिसर, निळाशार समुद्र, हिरवाईने नटलेले डोंगर, सोनेरी किरणे.
आजही त्या वाटेवरील प्रवासाचं, तिथल्या निसर्ग सौंदर्याचं गारूड मनावर कायम आहे.
जरी ते चित्रांत किंवा शब्दांत व्यवस्थित साठवता आलं नसलं तरीही!
खूप खूप वर्षांपूर्वी. इसवी सन २०१७.
क्रमशः
प्रतिक्रिया
23 Jan 2022 - 4:55 am | कंजूस
थोडक्यात आटपलं. फोटो आवडले. हा 'गारंबिचा बापू' कादंबरीचा परिसर.
वाहन नसल्यास फारसं काही पाहता येत नाही कोकणात. दापोलीकडची पन्हाळेकाजी लेणी पाहायचं यामुळेच राहिलं आहे.
23 Jan 2022 - 1:14 pm | श्रीगणेशा
धन्यवाद _/\_
खरं आहे, वाहन आवश्यक. आणि वेळही.
थोडंच लिहिता आलं.
अजून एकदा निवांत प्रवास करण्याचं मनात आहे.
23 Jan 2022 - 5:14 am | श्रीरंग_जोशी
सुंदर आहेत छायाचित्रे. आटोपशीर वर्णन आवडले.
23 Jan 2022 - 1:18 pm | श्रीगणेशा
धन्यवाद _/\_
उलट मागे वळून पाहताना, छायाचित्रांवर अजून बरीच मेहनत घेता आली असती असं वाटतंय आता :-)
23 Jan 2022 - 9:37 am | अनिंद्य
फोटो तर सुंदर टिपले आहेतच, मला 'कॅप्शन्स' खूप आवडली, काव्यमय.
23 Jan 2022 - 8:10 pm | श्रीगणेशा
धन्यवाद अनिंद्य_/\_
23 Jan 2022 - 10:08 am | गोरगावलेकर
अप्रतिम फोटो आणि थोडक्यात वर्णन.
या रस्त्याने हरी हरेश्वर-केळशी-आंजर्ले, हर्णे, दापोली असा प्रवास केला आहे. खूप सुंदर परिसर आहे .
23 Jan 2022 - 8:53 pm | श्रीगणेशा
धन्यवाद _/\_
23 Jan 2022 - 6:34 pm | कर्नलतपस्वी
असेतूहिमाचल फिरलो पण कोकण मात्र सेवानिवृत्त नंतर बघायला मिळाले.
कश्मीर बद्दल म्हंटलं जाते,
"गर फिरदौस बर रूये ज़मी अस्त/ हमी अस्तो हमी अस्तो हमी अस्त"
(पृथ्वीवर जर स्वर्ग कुठे आहे तर तो इथे आहे इथे आहे).
कश्मीर आणि कोकण दोन्ही ऋषी मुनींची भुमी, एक कश्यप तर दुसरी परशुरामाचे म्हणून दोन्ही स्वर्गच.
मागील दहावर्षात कोकणात वेगवेगळ्या मार्गाने गेलो. Travel by own vehicle is drivers delight. I hate to sit on co driver seat.
लेखकाचे अभिनंदन.
23 Jan 2022 - 8:55 pm | श्रीगणेशा
धन्यवाद कर्नल साहेब _/\_
24 Jan 2022 - 9:18 am | प्रचेतस
कोकण सुंदरच आहे, कितीही वेळा गेलं तरी मन भरत नाही.
24 Jan 2022 - 10:45 am | श्रीगणेशा
खरं आहे _/\_
कोकणातील पावसाळाही एकदा पाहायची उत्सुकता आहे.
24 Jan 2022 - 10:52 am | बेकार तरुण
मस्त फोटोज...
कर्दे मधील सागर सावली मधे राहिला होतात का? त्या गेटच्या फोटोवरुन वाटत आहे..
मस्त भाग आहे एकदम...
24 Jan 2022 - 12:42 pm | श्रीगणेशा
सागरहील (sagarhill) मधे -- कदाचित कर्दे किनाऱ्यासमोरील डोंगर पायथ्याला असल्यामुळे नाव दिलं असावं.
पर्यटकांची गर्दी नव्हती त्यामुळे, तिथे पोहोचल्यावर ऐनवेळी तीन चार ठिकाणी चौकशी करून इथे राहिलो होतो.
24 Jan 2022 - 11:06 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फोटो माहिती आवडली. शेठ. मी करोनापूर्वी असाच सागरी किना-याने प्रवास केलेला. कड्याचा गणपतीला रात्री गेलो होतो. लोकांची श्रद्धा एक पाय समुद्रात आणि दुसरा इथे. पूर्वी मंदिर तिथे होतं असे काही तरी पण ते आवडलेलं आपल्याला. सुवर्णदुर्ग, केळशी, हरिहरेश्वर, आंजर्ले, हर्णे, याकुबबाबा दर्गा, अजून बरेच असे फिरलेलो. मजा आलेली. राहण्याची सोय नीट झाली नाही. राहण्याचा प्लॅन न करता फिरत राहिलो. हाल व्हायचे. आता एवढे तेवढे चालायचेच.
तुमच्या फोटोंनी पुन्हा एकदा ती सहल व्यवस्थित प्लॅन करुन करावी असे वाटायला लागले आहे. धन्यवाद.
-दिलीप बिरुटे
24 Jan 2022 - 12:45 pm | श्रीगणेशा
धन्यवाद सर _/\_
तुमच्या आठवणीतील कोकण सफर वाचायला आवडेल.
आणि तुमच्या पुढील कोकण सहलीसाठी शुभेच्छा!
त्यावरही जरूर लिहा.
24 Jan 2022 - 8:09 pm | टर्मीनेटर
मस्त आहेत सगळे फोटोज 👍
24 Jan 2022 - 8:12 pm | चौथा कोनाडा
कोकणाची सफर घडवून आणणारे प्रचि सुंदरच आहेत !
आकाश केशरी करुन टाकणाऱ्या भाकरी एवढा सूर्याचा फोटो खुप आवडला !
25 Jan 2022 - 12:12 am | श्रीगणेशा
धन्यवाद टर्मिनेटर, चौको _/\_
Point and shoot कॅमेरातून घेतले होते फोटो, त्यामुळे बऱ्याचशा उणिवाही आहेत.. focus, details इत्यादी.
पुढील भेटीत DSLR! :-)
4 Feb 2022 - 12:13 am | विकास...
स्थायिक होता येईल अशा विचाराने सौं ने सामानाची बांधाबांध केलेली दिसत होती .. हे बाकी छान लिहिलेय .. फोटो एकदम बेस्ट