गेल्या आठ वर्षांपासून आमच्या 'हिवाळी सहल ग्रुप' ची सहल नोव्हेंबर अखेर किंवा डिसेम्बरची सुरुवात या काळात होत असते. (अपवाद सन २०२०)
संपूर्ण ग्रुप जवळच्या नातेवाइकांचाच असून बहुतेक पुरुष मंडळी शेती व्यवसायाशी निगडित आहेत. महिला प्रत्यक्ष शेतात राबत नसल्या तरी शेतीविषयक व इतर घर कामांमध्ये खुप व्यस्त असतात. वर्षातून ८-१५ दिवस कुठेतरी निवांत मिळावेत इतकीच त्यांची अपेक्षा असते. त्यासाठी त्यांना सोबत घेऊन जाणारे कोणीतरी पाहिजे होते तो पुढाकार आम्ही घेतला व गेल्या आठ वर्षात वेगवेगळ्या राज्यात हिवाळी सहली केल्या. आता पुढची पिढी घर व व्यवसाय इ. कामे सांभाळण्यास सक्षम झाली असल्याने सगळ्यांना सहलीसाठी पुरेसा वेळही काढता येतो.आर्थिक श्रीमंती नसली तरी सर्वजण मनाचे सर्व श्रीमंत आहेत. प्रवासात मला अमुक सीट का दिली किंवा जेवण-खाणे याबाबत कुणाची काहीही तक्रार असत नाही. खर्चाच्या बाबतीत सहल संपल्यावर आवर्जून विचारून घेणार आम्ही अजून काही देणे लागतो का.
सहलीची आखणी, साधारण खर्च, आरक्षण इ. कामे याची जबाबदारी सर्वस्वी आम्ही दोघे व आमच्या दोन्ही मुली यांच्यावरच सोडलेली असते. सगळ्यांच्याच घरी मांसाहार वर्ज असला तरी सहलीत कोणी काय खावे- प्यावे यावर कोणाचेही बंधन नसते तसेच काय परिधान करावे यावरही नसते. गावी डोक्यावर कायम पदर घेऊन वावरणाऱ्या शेतकरी कुटुंबातील महिला सहलीत हळूहळू चुडीदार-कुर्ता, जीन्स-टॉप घालून फिरायला लागल्या जे भटकंतीत काही ठिकाणी सुटसुटीतही पडते. चाळीशी, पन्नाशीपर्यंत बहुतेकांचे पर्यटन झालेलेच नाही त्यामुळे राहून गेलेली हौस मौज पुरेपूर उपभोगण्याचा सर्वांचा प्रयत्न असतो. सलग आठ वर्ष विनातक्रार सहली होत आहेत यातच ग्रुपचे यश सामावले आहे. अवांतर बरेच झाले आता सहलीविषयी.
या सहलीची साधारण कल्पना येईल इतपत सहलीचा वृत्तांत देण्याचा माझा हा एक छोटासा प्रयत्न. यावेळी सहल ठरली गुजरातची. एकाच सहलीत संपूर्ण गुजरातमधील प्रमुख पर्यटन स्थळे पाहणे शक्य नसल्याने कच्छ व सौराष्ट्र हा भाग निवडला. त्यात शेवटी थोडासा मध्य व उत्तर गुजरातही सामील झाला. यात जाण्यायेण्याचा प्रवास सोडला तर नऊ रात्र व दहा दिवस आमच्याजवळ होते. सहलीचे काही सदस्य मुंबईहून गांधीधामला तर उरलेले जळगांवहून गांधीधामला पोहचणार होते. त्याप्रमाणे तीन महिने आधी रेल्वेचे आरक्षणही करून झाले. एकदा जाण्या येण्याचे दिवस निश्चित झाल्यावर इतर चौकशी सुरु केली. कोणकोणती ठिकाणे बघायची ते ठरवले. त्यानंतर मुक्कामासाठी हॉटेल , गांधीधामला रेल्वेतून उतरल्यापासून ते सहल संपवून परतीच्या रेल्वे स्टेशनवर येईपर्यंत भटकंतीसाठी गाडी आरक्षित केली.
सहलीची तारीख जशी जशी जवळ यायला लागली तसे थोडेसे दडपण यायला लागले. कारण करोनाविषयक येणाऱ्या बातम्या काही उत्साहवर्धक वाटत नव्हत्या. तरीही ठरल्याप्रमाणे ३ डिसेम्बरला दुपारी मुंबईतील चौघांचा दादरहून दादर-भुज गाडीने प्रवास सुरु झाला. साधारण त्याच वेळी बाकीच्या नऊ पर्यटकांनी जळगांवहून विशाखापट्टणम-गांधीधाम या गाडीने प्रवास सुरु केला. दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजता मुंबईकर गांधीधामला पोहचले. थोडावेळ वेटिंग रूममध्ये काढला. तासाभरात जळगावहून येणारी गाडीही येथे पोहचली. मधल्या काळात आमची दहा दिवसांच्या भटकंतीसाठी बुक केलेली १७ आसनी ट्रॅव्हलर गाडीही स्टेशनच्या बाहेर येऊन उभी असल्याचा ड्रायव्हरचा फोन आला. स्टेशनमधून बाहेर पडत असतांना दुरूनच पोलीस चौकशी सुरु असल्याचे दिसले. बहुतेक लशींचे डोस घेतले आहेत कि नाही ते चेक करत असावे असे वाटले. जवळ गेल्यावर कळले ते काहींच्या सामानाची झडती घेत आहेत कोणी लपवून दारूच्या बाटल्या वगैरे तर आणल्या नाहीत ना!
स्टेशन बाहेर येऊन गाडीत सामान टाकले आणि येथून सुरु झाली ग्रुपची एकत्रित सहल.
स्टेशनबाहेर एक ग्रुप फोटो
सहलीतले पहिले ठिकाण होते दोन तासांवरील (१००किमी) मांडवी येथील विजय विलास पॅलेस.
वास्तविक भूज पासून हे अंतर एक तासाचेच आहे पण जळगावकडून येणारी गाडी गांधीधामपर्यंतच असल्याने आम्ही तेथेच उतरायचा निर्णय घेतला होता. साडे नऊला मांडवीला पोहचून एका हॉटेलमध्ये तात्पुरत्या वेळेकरिता रूम सांगून ठेवल्या होत्या तेथे जाऊनताजेतवाने झालो. कपडे बदलले, जिलेबी-फाफड्याचा नाश्ता झाला आणि निघालो विजय विलास पॅलेस बघायला.
सन १९२९ साली महाराव केंगरजी III यांच्या काळात युवराज विजयराज यांच्यासाठी हा राजवाडा फक्त ग्रीष्म काळात वापरायच्या उद्देशाने बांधला होता. सन २००१ च्या भूकंपात भुज येथील 'रणजित विलास' महालाच्या काही भागात पडझड झाली त्यानंतर शाही कुटुंब (महाराव प्रागमूळजी व राणी प्रीती देवी) येथे वास्तव्यास आले होते. महालाच्या डागडुजीनंतर सन २०१८ ला ते परत रणजित विलास पॅलेसला राहावयास गेले. प्रागमूळजी यांचे याच वर्षी मे महिन्यात करोनामुळे निधन झाले.
४५० एकराच्या विस्तीर्ण जागेत हा राजवाडा वसवला आहे. याचे बांधकाम वाळूचे दगड (सॅण्ड स्टोन) वापरून करण्यात आलं आहे. राजवाड्याचे झरोके, सज्जे, छत्री अतिशय विलोभनीय आहेत. तळमजल्यावर भित्तिचित्रे आहेत, पाहुण्यांसाठीचा दिवाणखाना व छोटेसे वस्तू संग्रहालय पाहता येते. पहिला मजला शाही कुटूंबासाठी राहण्यासाठी असून तेथे प्रवेश नाही. या मजल्यावर गच्ची असून अतिशय सुंदर कठडे, सज्जे आहेत. मध्यभागी आणखी एक मजला इतक्या उंचीवर छत्री आहे जेथून आजूबाजूचा अतिशय सुंदर परिसर नजरेस पडतो. सभोवती बगीचे असून परिसरातच हेरिटेज हॉटेलही झालेले आहे. जवळपास दोन किमीचा खाजगी समुद्र किनारा आहे. हॉटेलचे बुकिंग असल्यास हा किनारा वापरता येतो.
तिकीट दर
महालाचे प्रथम दर्शन
दिवाणखाना
सुंदर खिडक्या
महाराणी प्रीतीदेवी ( मूळची त्रिपुराची राजकन्या,आज महाराणी ८३ वर्षांच्या आहेत!)
गच्चीतून दिसणारे कठडे, कमानी, छत्र्या.
गच्चीतून वरच्या छत्रीत जाण्यासाठीचा गोल जिना
वरच्या छत्रीतून दिसणारा परिसर
वरच्या छत्रीत थोडा आराम
महाल पाठीमागच्या बाजूने
महाल बघण्यास जास्त वेळ लागत नाही पण गच्ची व वरच्या छत्रीत फोटोग्राफी करण्यात तास-दीड तास केव्हाच निघून गेला . मांडवीत इतरही काही बघण्यासारखी ठिकाणे आहेत पण वेळेअभावी ती सोडण्यात आली आणि दुपारी येथून एक वाजता कच्छच्या रनसाठी रवाना झालो.
क्रमश:
प्रतिक्रिया
27 Dec 2021 - 12:11 pm | खेडूत
छान सविस्तर सुरुवात झालीय.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत...
27 Dec 2021 - 12:22 pm | अनिंद्य
सुरुवात छान झाली. असे वार्षिक कुटुंब-पर्यटन जमायला पाहिजे.
राजस्थानच्या पूर्वाश्रमीच्या राजपरिवारांकडून प्रेरणा घेऊन गेली काही वर्षे अनेक गुजराती महाल हेरिटेज पर्यटनासाठी सज्ज होत आहेत. बडोद्याचा लक्ष्मीविलास कधी होतो ते बघायचंय.
27 Dec 2021 - 12:40 pm | चंद्रसूर्यकुमार
मस्तच. एकदा मांडवी आणि कच्छच्या किनारी भागांची सहल काढावीच लागणार. त्यावेळी ही लेखमाला उपयोगी होईल :)
27 Dec 2021 - 12:56 pm | ॲबसेंट माइंडेड ...
छान सुरवात.
पुढील भागाच्या प्रतिक्शेत.
27 Dec 2021 - 2:41 pm | कंजूस
सहकुटुंब सहल कल्पना आणि प्रत्यक्षात आणणे आवडले।
27 Dec 2021 - 3:01 pm | अनन्त्_यात्री
सहल वृत्तांत.
27 Dec 2021 - 6:15 pm | Bhakti
खुप छान फोटो आणि परिवार!
27 Dec 2021 - 6:35 pm | सुरसंगम
मस्त भट्कंती.
27 Dec 2021 - 8:01 pm | गोरगावलेकर
@खेडूत: प्रयत्न करते लवकर पुढचे भाग टाकण्याचा
@अनिंद्य: असे वार्षिक कुटुंब-पर्यटन जमायला पाहिजे.
हल्ली सगळ्यांच्या वेळा जमणे महाकठीण काम. त्या जमल्या तरच शक्य
@चंद्रसूर्यकुमार: आपले बहुतेक प्रतिसाद राजकीय धाग्यांवरच दिसतात. इथे आवर्जून प्रतिसाद दिलात त्याबद्दल धन्यवाद
@ॲबसेंट माइंडेड ... : लवकरच पुढचे भाग टाकायचा प्रयत्न राहील
27 Dec 2021 - 8:13 pm | चंद्रसूर्यकुमार
:)
मला पर्यटनाची आवड आहे. कच्छ रणोत्सवला चार वर्षांपूर्वी भेट दिली होती. त्यावेळेस भूज शहर आणि कलाकुसरीसाठी प्रसिध्द असलेल्या एका गावातही गेलो होतो. त्याविषयी कदाचित पुढच्या भागांमध्ये उल्लेख असेल म्हणून त्याविषयी आता काही लिहित नाही. तरीही त्यात राजकारण घुसडायचेच असेल तर एक लिहितो- मोदी २०१४ मध्ये पंतप्रधान झाल्यावर पहिल्यांदा बराक ओबामांना भेटले तेव्हा त्यांनी कच्छच्या त्या गावातून ओबामांसाठी एक कलाकुसरीची गोष्ट भेट म्हणून नेली होती :) त्यावेळी मांडवी आणि कच्छमधील बीच रिसॉर्ट्स बघायची राहिली. ते बघायला कच्छला परत कधीतरी जायचेच आहे.
पुढील भागांची वाट बघत आहे.
27 Dec 2021 - 11:23 pm | टर्मीनेटर
उत्तम सुरुवात 👍
पुढील भागाची वाट पाहत आहे!
28 Dec 2021 - 12:17 am | सौन्दर्य
मी गुजरातेत नोकरीनिमित्ते १८ वर्षे काढली असल्यामुळे संपूर्ण गुजरात पायाखालून गेलं आहे. तुमचे हे प्रवास वर्णन वाचताना पुनःप्रत्ययाचा अनुभव आला. फोटोग्राफी एकदम सुरेख. बहुतेक फोटोंच्या खाली थोडक्यात माहिती लिहिल्यामुळे गोंधळ होत नाही.
पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत.
28 Dec 2021 - 7:33 am | प्रचेतस
एकदम मस्त सुरुवात.
राजवाडा अतिशय सुरेख आहे. आजूबाजूची हिरवाई प्रचंड दिसतेय.
कच्छच्या रणाच्या प्रतीक्षेत.
28 Dec 2021 - 7:56 am | मित्रहो
मी सुरतेच्या पुढे कधी गेलो नाही. कच्छला एकदा जायचे आहेच.
सुंदर महाल आणि फोटो
28 Dec 2021 - 8:54 am | गोरगावलेकर
@ कंजूस:अचानक सुचलेली ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यात सर्व मेम्बरनी आमच्यावर दाखविलेला विश्वास सर्वात महत्वाचा ठरतोय.
@ अनन्त्_यात्री, Bhakti, सुरसंगम सर्वांचे आभार
28 Dec 2021 - 4:07 pm | गोरगावलेकर
@टर्मीनेटर, सौन्दर्य, प्रचेतस, मित्रहो प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार
28 Dec 2021 - 4:28 pm | मुक्त विहारि
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत
28 Dec 2021 - 5:02 pm | राजेंद्र मेहेंदळे
लेखन आणि फोटो दोन्ही छान. पुभाप्र
30 Dec 2021 - 10:46 am | कंजूस
आणि इतर काही संस्थानिक काळाची पावले ओळखून ब्रिटिशांना अगोदर सामील झाले आणि लोकांच्या रोषास पात्र झाले.( बाकीच्यांनी आणि सामान्य जनतेते नंतर कित्ता गिरवला, विलायतेला मुलांना शिक्षणासाठी पाठवण्यात धन्यता मानली ते सोडा) शिंद्यांनी उज्जैनमध्ये पुनर्वसनामुळे जे नाव कमावले ते ग्वाल्हेरात गेले. तिथे तर रिक्षावालाने रागाने चिडूनच विचारले "क्या आपको सिंदिया पालेस देखना है? यहां आधी जमीन उनकी है।" नंतर चौकात झाशीच्या राणीचा पुतळा आल्यावर मान दिला.
सांगण्याचा मुद्दा हा की या संस्थानिकांच्या महालांत युरोपातून आणलेल्या वस्तुंची भरमार आहे. परदेशी प्रवाशांना यात स्वारस्य नसते. त्यांना इथल्या कलाकृती पाहायच्या असतात.
30 Dec 2021 - 10:53 am | कंजूस
कारण आणि आम्ही वीस पंचवीस वर्षं इनमीनतीन पर्यटन केले. एक रुम,एक रिक्षा, स्थानिक बसेस. पटापट निर्णय आणि बदल. आगावू आरक्षण फक्त रेल्वेचे. जे मोठ्या ग्रुपमध्ये शक्य नसते.
5 Jan 2022 - 10:20 pm | चौथा कोनाडा
आमच्या सहली अश्याच असायच्या. या अनिश्चितेत वेगळेच थ्रिलींग असायचे.
आता मात्र बुकिंग करून, माहिती गोळा करूनच जातो.
मोठ्या समुहाने फार थोड्या केल्या सहली.
30 Dec 2021 - 4:48 pm | कर्नलतपस्वी
राजवाडा कोल्हापूर च्या राजवाड्या सारखाच दिसतोय. बाकी मुघल आणी राजस्थानी स्थापत्यकलेचा पगडा बहुतेक ठिकाणी बघायला मीळतो.
पर्यटन एक स्ट्रेस बस्टर व रिचार्ज आहे.
2 Jan 2022 - 8:06 pm | गोरगावलेकर
@मुक्त विहारि, राजेंद्र मेहेंदळे, कंजूस, कर्नलतपस्वी प्रतिसादाबद्दल सर्वांचे धन्यवाद
3 Jan 2022 - 3:03 pm | सिरुसेरि
माहितीपुर्ण प्रवास लेखन .
4 Jan 2022 - 11:04 pm | नागनिका
कच्छ मध्ये बाटिक बांधणी चा व्यवसाय खूप मोठया प्रमाणात चालतो.. ४ वर्षांपूर्वी तिकडे जाण्याचा योग आला होता, तेंव्हा बटिक बांधणी आणि ब्लॉक प्रिंटिंग कारखान्याला भेट दिली होती.